ग्रीष्मातले तप्त ऊन भाजून काढायचे. अंगाची लाही लाही व्हायची. घामाच्या धाराने अंग भिजून जायचे.याच वेळी उन्हाळ्यातील शेतीची कामे बऱ्यापैकी झालेली असत.
बाजाराच्या आठवणी
हा हा म्हणता जून महिना उजडायचा.आकाशात ढग घोंगवायला सुरुवात व्हायची. ऊन सावल्यांचा खेळ सुरू व्हायचा. तोपर्यंत एक, दोन वळीव पडून गेलेले असायचे. हवेमध्ये बऱ्यापैकी गारवा निर्माण झालेला असायचा. आणि अशातच वेध लागायचे ते शाळा सुरू होण्याचे.
शाळेतील मुलांना नवीन शाळेचा गणवेश घ्यायचा असे. वह्या आणि पुस्तके घ्यायचे असत. नवीन दप्तर, छत्री, बूट घ्यायचे असत. त्यामुळे नेहमी बळेच पाठीमागे लागून बाजाराला जाणाऱ्या मुलांना आई वडील अगदी पुढे घालून बाजाराला नेत असत.
पावसाळ्यापूर्वी बाजाराला जाणे खूपच गरजेचे असे. कारण ग्रामीण भागात सुरुवातीचे तीन महिने धुवाधार पाऊस पडत असायचा.त्यामुळे तीन महिन्यांचा बाजार एकदमच करायचा असे. अगदी घरातील दोन-तीन माणसांना सुद्धा बाजाराला घेऊन जावे लागत असे.
जनावरे सांभाळणाऱ्या गुराख्याला घोंगडी आणि कागद घ्यायचा असे.बाजरी, कडधान्य, मीठ, मसाले, स्वयंपाकाच्या वस्तू असे बरेच साहित्य खरेदी करायचे असायचे. तुटलेली छत्री दुरुस्त करायची असे.
शनिवार हा वाडा गावच्या बाजाराचा दिवस असायचागा वाकडील काही लोक व स्त्रिया अगदी पहाटे उठून स्नानादी क्रियाकर्म करून बाजरीच्या भाकरी, शेंगदाण्याची किंवा लसणाची चटणी फडक्यात गुंडाळून बाजाराला निघण्याची तयारी करत असत. बाजारात विक्री करण्यासाठी तांदूळ,गहू, ज्वारी, कोंबड्या,अंडी भुईमुगाचे बी,मध,अशा विविध वस्तू बाजारात विकण्यासाठी अगदी सकाळीच घेऊन जात असत.
गावाच्या स्टॅन्ड पासून अगदी सकाळी एसटी असे. शिवाय दूध वाहतूक करणारी दूध गाडी सुद्धा अगदी सकाळीच गावाकडून जात. अगदी सकाळी स्टैंड वर बाजाराला जाणाऱ्या लोकांची जत्रा भरे. काही लोक एसटी मधून तर काही लोक दूध वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून बाजाराच्या ठिकाणी जात असत.
छत्रपतींच्या काळा पासूनची बाजारपेठ वाडा गाव
पश्चिम महाराष्ट्रातील वाडा ही खेड तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनची बाजारपेठ होती. त्यावेळी संपूर्ण मावळ भागातून बाजार करण्यासाठी लोक वाढायला येत असत. वाडा गाव हे पश्चिम महाराष्ट्रात तांदळाची मोठी बाजारपेठ होती. मावळ भागातून उत्पादित होणारा तांदूळ वाडा गावात विक्रीस उपलब्ध असे. तांदूळ खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक,उत्तर प्रदेश मधून व्यापारी लोक त्यावेळी येत असेल. पश्चिम भागातील खडक्या, जीर, रायभोग, इत्यादी उच्च प्रतीचा माल विक्री करण्यासाठी उपलब्ध असे.
एसटी मधून व ट्रक मधून अगदी कोंबून भरलेले बाजारकरू वाडा गाव जवळ येताच त्यांची उतरण्याची लगबग सुरू होई. गाडीतील चेंगराचेंगरी मधून मार्ग काढत लोक उतरू लागत.
धान्य बाजार
गाडीतून उतरताच बाहेर बाजारात जिकडे तिकडे माणसेच माणसे दिसत. गर्दीच्या कोलाहालातून व घोंगटातून वाट काढत आम्ही पुढे सरकत राहू. बाजारा च्या सुरुवातीलाच ज्वारी, बाजरी, गहू,भुईमगाचे बी घेण्यासाठी व्यापारी वजन काटा व रिकाम्या पिशव्या मांडून अगदी ऐसपैस बसत असत. समोर अनेक शेतकरी आपला माल विकण्यासाठी गर्दी करून उभे राहत असत. व्यापारी शेतकऱ्यांचा माल सुरुवातीला अगदी पाडून मागत असत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अगदीच ना पसंती असे. काही वेळाने मालाची घासा घिस करून आपला माल विक्री करत असत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या तिथे धान्याच्या पोत्यांच्या थप्प्या लागत.
अनेक शेतकरी लोक भुईमुगाची बी, ज्वारीचे बी, भाताचे बी अशी अनेक बी बियाणे घेऊन विक्री करण्यासाठी बसलेले असत.तिथेही बियाणे घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची गर्दी असे.
प्रसिद्ध तांदळाची बाजारपेठ
थोडे पुढे गेल्यावर प्रसिद्ध अशी तांदळाची बाजारपेठ असे. तेथे शेतकरी व व्यापारी आणि फुटकळ ग्राहक यांची प्रचंड गर्दी असे. गर्दीतून वाट काढून पुढे जावे लागे. शेतकरी लोक आपापला तांदूळ घेऊन विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी बसत असत. काही लोकांचा अगदीच थोडा माल असे त्यामुळे ते आपला माल फुटकळीने विकत असत.
मोठा शेतकरी असलेले लोक व्यापाऱ्यांना आपला तांदूळ विकत असत. काही छोटे व्यापारी किंवा दुकानदार हे सुद्धा तांदूळ विकत घेऊन आपल्या दुकानात विकत असत. व्यापारी वर्गाने विकत घेतलेला तांदूळ ट्रकमधून कर्नाटक, बेळगाव, महाराष्ट्रातील उर्वरित भाग, व अगदी पंजाब पर्यंत पोहोचत असे.
अंतू शेठच्या राईस मिल मधून भरडून आणलेल्या तांदळाची दरवळ सगळीकडे सुटत असे. तांदळाच्या दरवळीच्या सुगंध देखील आम्ही तांदळाच्या बाजारातून फिरत राहु.
प्रसिद्ध अशी अनंत केदारी यांची राईस मिल
यासाठी मोठमोठे शेतकरी आदल्या दिवशीच खटार गाडीमध्ये भाताची पोती घेऊन वाडा गावामध्ये दाखल होत असत. प्रसिद्ध अशा अनंता केदारी यांच्या राईस मिलमध्ये शुक्रवारी काळापासून ते शनिवारी पहाटेपर्यंत भाताची गिरणी चालू असे. कारण शनिवारी शेतकऱ्यांना तांदूळ विक्री करावा लागत असे. त्यामुळे ही धांदल उडत असे.
त्यावेळी अनंत केदारी यांची राईस मिल फारच प्रसिद्ध होती. अनंत केदारी हे लोकांना ऐन वेळेस आर्थिक मदत करत असत. व सुगी संपल्यानंतर त्यांच्याकडून धान्य विकत घेत असत. ते आणि अनेक विद्यार्थ्यांना देखील मदत करत होते. शिवाय ते जिल्हा परिषद सदस्य होते.
तेथेच त्यांची शेंगदाणे ,खुरासणी,सुर्यफुल यांची तेल गिरणी होती.या ठिकाणी प्रचंड गर्दी व्हायची.भात भरडण्यासाठी व तेलाचे घाणे काढण्यासाठी पहाटे पासुन नंबर लागायचे.लोक भाताची पोती खटारगाडीत किंवा ट्रकमध्ये भरून भात भरडण्यासाठी साठी मुक्कामाच्या तयारीने यायचे.
तांदूळ विकून आलेल्या पैशातून लोक पावसाळ्यापूर्वीचा बाजार करण्यासाठी लगबग करत.
कोंबड्या व अंड्यांचा बाजार
तांदळाच्या बाजाराच्या अगदी शेजारीच अनेक शेतकरी स्त्रिया कोंबड्या व अंडी विकायला घेऊन बसत असत.
तेथेही काही व्यापारी व फुटकळ ग्राहक यांची प्रचंड गर्दी असे. अगदी घासा घिस करून कोंबड्यांची व अंड्यांची विक्री होत असे. अनेक मोठमोठे व्यापारी कोंबड्या व अंड्यांची खरेदी करत असत. व दूर शहरात छोट्या छोट्या दुकानदारांना ते विकत असत.
त्यामुळे कोंबड्या व अंड्यांचे खरेदी करण्यासाठी दूरदूरचे व्यापारी वाडा गावी येत असत. ज्याप्रमाणे वाडा ही तांदळाची बाजारपेठ होती त्याचप्रमाणे कोंबड्या व अंड्यांची सुद्धा होती. कोंबड्या विकून झाल्यावर बायका लगदी पैसे घेऊन बाजार करण्यासाठी बाजाराच्या गर्दीत दिसेनाशा होत असत.
वषटाचा बाजार
त्या शेजारीच अनेक दुकानदार वाकट, बोंबील, सुकट, खारा मासा, ढोमेली पाटयामधून घेऊन विकायला बसत असत. तेथे माल विकत घेण्यासाठी स्त्रियांची प्रचंड झुंबड उडे. सगळीकडे या मालाचा सुगंध की दुर्गंध? दरवळत राहायचा. अगदीच नाकाला रुमाल किंवा पदर लावून तेथून मार्गक्रमण करावे लागत असे.
अनेक बायका पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी सुकट, वाकट, बोंबील, इत्यादी मालाची खरेदी करत असत. घरी गेल्यावर पॅक बंद डब्यात त्यांना हा म** ठेवायचा असे.
विविध दुकाने
पुढे संसार उपयोगी साहित्य, खेळण्याची दुकाने, भांड्यांची दुकाने, आरसे, कंगवे व स्त्रियांची सौंदर्य प्रसाधनाची दुकाने, चप्पल व बूट यांचे दुकाने ओळीने मांडून दुकानदार विक्री करण्यासाठी बसलेले असत.
बाजारातील वाद-विवाद
जागेवरून काही दुकानदारांची वादावादी होई. दोन्ही बाजूला दोन दुकानदार ठराविक अंतर सोडून बसलेले असत. तेवढ्यात तिथे एक म्हातारा दुकानदार येऊन आपले कापडांचे दुकान थाटू लागे.
तेवढ्यात शेजारचा दुकानदार त्याला म्हणे
अरे ये म्हाताऱ्या? ती जागा नारायण शिंप्याची आहे. उचल तिथून तुझे दुकान.
म्हातारा म्हणे त्याने विकत घेतली आहे का? असे म्हणून तो आपले दुकान बेफिकीरपणे थाटू लागे. काही वेळानंतर नारायण शिंपी तेथे हजर होई.
नारायण शिंपी मग त्या म्हातार्याच्या दुकानाजवळ आपले कपड्यांची गाठोडे आपटून म्हणे हे म्हाताऱ्या? माझ्या जागेवर का बसलास.ही जागा माझी आहे.
यावर म्हातारा म्हणे, या जागेवर नाव लेहलं हाय का तुझं?
लवकर दुकान उचल, नाहीतर फेकून देईल!
फेक बरं? म्हातारा नारायण शिंपी ला म्हणे.
यावरून दोघांची एकच वादावादी होई. गिर्हाईक लोक त्यांची गंमत बघत असत. मग शेजारचे दोन्ही दुकानदार त्यावर मार्ग काढत. दोघे दुकानदार थोडे त्यांचे दुकान थोडे सरकवून बसत. व म्हाताऱ्याला ही थोडं सरकायला सांगत. म्हाताऱ्याही मग थोडं सरकून नारायण शिंप्याला आपले दुकान थाटायला जागा करून देत असे. हेच चौघे दुकानदार दुपारनंतर आपापली माझी भाकरी एकमेकांना देत. सकाळी झालेले भांडण विसरून जात.
तोपर्यंत गर्दीचा भर होई. जिकडे तिकडे प्रचंड गर्दी असे. दुकानापुढे गिर्हाईकांची प्रचंड गर्दी होई. दुकानदार गिर्हाईकांची गर्दी पाहून हातबल होत असत. लोकांना बाजार घेऊन घरी जाण्याची घाई असे.
घोंगड्यांचा बाजार
पावसाळ्यात पावसापासून रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना घोंगडीची अत्यंत आवश्यकता भासायची. यासाठी दूरवरून सांगली जिल्ह्यातून अनेक व्यापारी घोंगड्या विकण्यासाठी वाडा गावच्या बाजारात येत असत. अनेक प्रकारच्या घोंगड्या विक्रीसाठी उपलब्ध असत.
त्या काळात घोंगडीला प्रचंड मागणी असे. व घोंगडीचे भावही जास्तच असत. तरीही घोंगडी ही घ्यावीच लागे. घोंगडी, ब्लॅंकेट, सोलापुरी चादरी इत्यादीं मालाच्या थप्प्या लागलेल्या असतात. त्यावेळी घोंगडी चे दोन प्रकार होते.
काळी घोंगडी व भुरकट घोंगडी. काळ्या घोंगडीला विशेष मागणी होती. अनेक लोक तेथे घोंगडी घेण्यासाठी गर्दी करत. व अगदी पारखून निरखून घोंगड्या घेत असतात. बाजार भावावरून व्यापारी व शेतकरी यामध्ये अगदीच घासा घीस होत असे.
अनेक स्त्रिया घोंगडी खरेदी करण्यासाठी आलेले असत. परंतु त्यांना त्याचा भाव करता येत नसे. ओळखीचा माणूस दिसतच त्या त्याला बोलावत.
दादा.. चल. मला तेवढी घोंगडी घेऊन दे..
घोंगडी च्या दुकानात जाऊन अनेक काळ्या व भुरकट घोंगड्या उलथ्या, पालथ्या करून त्यातून एक मनाजोगती घोंगडी निवडून त्याचा भाव काय हे व्यापाऱ्याला विचारले जाई.
व्यापारी म्हणे 70 रुपये
काय बोलता? मागच्या आठवड्यात तर 45 रुपयाला नेली होती. एका आठवड्यात एवढी किंमत वाढली काय?
किती देणार बोला?
45 रुपये.
परवडत नाही.. साठ रुपये द्या आणि घेऊन जा.
शेवटचे पन्नास रुपयाला द्या नाहीतर राहू द्या पुढच्या दुकानात जातो.
असं करा 55 रुपये दे आणि घ्या.
नाय परवडणार पन्नास रुपयाला द्यायचे असेल तर बघा.
बर ठीक आहे घ्या. असे संवाद चालत.
बापू केदारी यांचे स्टेशनरी दुकान
आम्ही काही बाजार घेऊन बापू केदारी यांच्या दुकानात जात असू. तिथे गिर्हाईकांची प्रचंड गर्दी असे. दुकानदार सराईतपणे गिऱ्हाईकांना त्यांच्या वस्तू देत असत. आम्ही तिथे गेल्यावर बापू केदारी आमच्या वडिलांना म्हणत. या..या.. गुरुजी या, काय घ्यायचय मुलाला? द्या इकडे यादी.
ये नारायण ही यादी घेरे? यादीतील वस्तू काढून दे पटकन गुरुजींना.
100 पेजेस 200 पेजेस वह्या, दुरेघी वह्या, कंपास पेटी, रंगपेटी, पेन, पेन्सिल, खोड रबर, पुस्तके, अशा अनेक शालोपयोगी वस्तू घ्यायच्या असत.
बापू केदारी यांच्या दुकानात असलेले सेल्समन पाहिजे ते साहित्य काढून देत असत. त्यावेळी प्रत्येक वहीवर सुनील गावस्कर, कपिल देव, मांजरेकर अशा क्रिकेटर ची चित्रे असत. आम्ही आवडत्या क्रिकेटर ची चित्रे असलेल्या वह्या घ्यायचो.
छत्र्या खरेदी
छत्रीच्या दुकानात तर प्रचंड गर्दी असे. त्यावेळी साध्या छत्री आणि टेरीकॉटच्या छत्र्या व साध्या मांजरपाट काळ्या कापडाच्या छत्र्या विक्रीस उपलब्ध असत. साध्या छत्र्या स्वस्त असत. अनेक गरीब गिर्हाईक साध्या छत्र्या पसंत करत. तर मध्यमवर्गीय लोक मात्रे टेरीकॉटच्या छत्र्या विकत घेत असत. टेरीकोटच्या छत्र्या टिकायला चांगल्या व अगदी हलक्या असत. परंतु साध्या छत्र्या पाऊस आल्यावर खूप जड होत. व लवकर वाळत देखील नसत.
छत्र्या विकत घेतल्यावर साबुर्डीच्या गोपाळे पेंटर कडून, किंवा विजय पेंटर कडून छत्रीवर रंगीत अक्षरात नाव व पत्ता टाकून घेत असू. दोन रुपयात पेंटर नाव टाकून देत असत.
नवनीत शेठ, कादर भाई कापड व्यापारी
वह्या पुस्तके व छत्री घेऊन मुख्य बाजारपेठेत नवनीत शेठ, कादर भाई, यांच्या दुकानात कपडे घेण्यासाठी प्रचंड गर्दी असे. काही लोकांना कापड घ्यायचे असे. तर काही लोकांना रेडिमेड कपडे घ्यायचे असत.
रेडीमेड कपड्यांचे सुद्धा दोन प्रकार असत. साध्या जाड्या भरड्या कापडाच्या खाक्या चड्डया. आणि मांजरपाट कापडाची शर्ट. तसेच टेरीकोट चड्ड्या व टेरिकोट शर्ट सुद्धा विक्रीस उपलब्ध असे. टेरीकोट कपडे ही तुलनेने महाग असत.अनेक लोक रेडिमेड कपडे घेत असत. रेडीमेड कपड्यांची शिलाई अगदीच कच्ची असे. शिलाई लगेच उसवत असे. त्यामुळे काही लोक कापड घेऊन ते शिंप्याकडे शिवायला देत.
लेंगा, पैरण स्पेशलिस्ट दामू अण्णा
वाडा गावात पेहरण व लेंगा पेशालिस्ट दामू अण्णा क्षीरसागर हे फार प्रसिद्ध होते. ते सकाळी दिलेले कपडे संध्याकाळपर्यंत शिवून देत असत. ही त्यांच्या धंद्याची खासियत होती. दामू अण्णांच्या दुकानात गिऱ्हाईकांची प्रचंड गर्दी असायची. फुल पॅन्ट, शर्ट इत्यादी शिवण्यासाठी तेथे गर्दी असायची. व्यवस्थित माप घेऊन तेथे कपडे शिवण्याचे काम चाललेले असायचे.
काही लोक शिवून झालेली कपडे नेण्यासाठी तेथे आलेली असत. शिवून तयार झालेल्या कपड्यावर गिऱ्हाईकांचे नाव लिहिलेले असे. दामू अण्णा सराईतपणे गिऱ्हाईकांची शिवलेली कपडे शून्य मिनिटात त्यांना काढून देत असत.
भाजी मंडई
भाजी मंडई मध्ये देखील ग्राहकांची प्रचंड गर्दी असे. त्यावेळी लोक लाल मिरच्या, आणि कांदे घेण्यासाठी फारच गर्दी करत असत. लाल मिरच्यांचे मोठे मोठे ढग लावून भाजीचे व्यापारी बसलेले असत. नाका तोंडात मिरच्यांचा वास जाऊन ठसका लागे.
मिरच्या विकत घेऊन शेजारीच असलेल्या मिरची कांडप केंद्रात त्याची भुकटी बनवली जाई. काही स्त्रिया मसाला बनवत असत. मिरची कांडप केंद्रातही प्रचंड गर्दी असे. काही स्त्रिया मिरच्या घेऊन त्या वाळवून घरात असलेल्या उखळात कुठून त्याची भुकटी बनवत असत.
मिरची प्रमाणे कांद्यांना सुद्धा खूपच मागणी असायची. त्यावेळी गावरान असा फिकट गुलाबी कांदा फारच प्रसिद्ध होता. कांदा फोडताच नाका तोंडातून पाणी येत असेल. आत्ताच्या बाजारपेठेत तो कांदा कुठेच दिसत नाही. लोक अगदी 25 ते 30 किलो कांदा विकत घेत असत.
मसाल्यांची दुकाने
बाजारातील मसाल्यांच्या दुकानात स्त्रियांची रेडीमेड आयता मसाला घेण्यासाठी तोबा गर्दी असे. अनेक मसाल्यांचे व्यापारी बाजारात येऊन आपला माल विकत असत. त्यामध्ये धने, जिरे, गरम मसाला, मोहरी,सौदा, बडीशेप, हिंग, तेज पत्ता, हळद, हळकुंडे, अशा अनेक मसाल्याच्या वस्तू घेण्यासाठी गर्दी होत असे.
खाऊची दुकाने हॉटेल
बाजारात रस्त्याच्या कडेला वाडा गावची काही हॉटेल मालक आपापली दुकाने थाटत असत. तेथे कळीचे लाडू, म्हैसूर पाक, गोडी शेव, आणि भेळ इत्यादी वस्तू विकायला असत. अनेक बाजार करू या दुकानांमधून खाऊच्या वस्तू खरेदी करत.
ग्रामपंचायत शेजारी असलेले पावडे यांचे हॉटेल
बाजारात सकाळपासून फिरल्यामुळे लोक दमून भागून गेलेले असत.पोटामध्ये भुकेने कावळे ओरडत असत. आणि मग अचानक आपापल्या आवडीच्या हॉटेलमध्ये पाय फिरकू लागत.
बाजाराच्या दिवशी हॉटेलमध्ये सतत ताजा माल काढण्याचे काम चालू असे. मिसळ व भाज्यांच्या घमघमाटाने लागलेली भूक अजूनच व्याकुळ करू लागे. कधी एकदा मिसळ आणि भजावर ताव मारतो असे होई. या आधी बाजारात एक दोन बर्फाच्या गारेगारी खाल्लेले असत. परंतु त्या पाण्याने भुकेची आग थोडीच शमणार आहे?
वाडा गावच्या ग्रामपंचायत शेजारी पावडे यांच्या हॉटेलमध्ये अनेक बाजार करू आपल्या जवळची थोडक्यात बांधलेली भाकरी सोडून जेवायला बसत असत. त्यासाठी मिसळ त्याकाळी फारच प्रसिद्ध होती. मिसळ बरोबर आणलेली भाकरी आणि चटणी खाल्ली जात असे.
मिसळ च्या जोडीला वडा आणि भजी देखील असत. जिलेबी असे. कळीचे लाडू असत. लोक आपापल्या आवडीप्रमाणे हॉटेलमधल्या पदार्थांची मागणी करायचे.
जेवण करून झाल्यावर तृप्तीचे ढेकर देत हॉटेलमधून बाजार करू बाहेरचा रस्ता धरत. तोपर्यंत दुपारचे चार साडेचार वाजलेले असत. सगळ्यांना मग घरी जायची घाई होई.ए
सटी स्टँड येथील राहुळ यांचे हॉटेल
एसटी स्टँड जवळील राहुल यांच्या हॉटेल सुद्धा प्रसिद्ध होते. पश्चिम भागातील मावळतील आलेले अनेक लोक त्या ठिकाणी आपल्या भाकरीची गाठोडे सोडून मिसळवर ताव मारत असत रावळ यांची म्हातारी गल्ल्यावर असे.
कहाणे वडापाव
त्यावेळी कहाणे यांचा वडापाव सुद्धा फारच प्रसिद्ध होता. वडापाव खाण्यासाठी त्या ठिकाणी एकच गर्दी उसळत असे. लोक उभे राहून बसून मिळेल ती जागा बघून वडापाव खात असत.
स्टॅंडवर आल्यावर बाजार करू एसटीची वाट पाहत असत. तर काही ठिकाणी लोक ट्रकांमध्ये बसलेले असतात. त्यावेळी जीप, मोटरसायकल वगैरे यांची सुविधा नव्हती. एसटीला प्रचंड गर्दी असे. आपल्याजवळील बाजाराच्या पिशव्या घेऊन लोक एसटी मध्ये जागा धरण्यासाठी एकच गर्दी करत. काही लोकांना मात्र हे जमत नसे. काही लोक ट्रक मध्ये आपला बाजार घेऊन बसत असत. त्यामध्येही चेंगराचेंगरी होई. कुणाचे पाय बाजारांच्या पिशव्यांवर पडत असत. त्यावरून भांडणे होत.
स्टॅन्ड वरील ममता क्लिनिक आणि डॉक्टर काजळे व दिक्षित यांचे क्लिनिक
एसटी स्टँड जवळील डॉक्टर अविनाश कुलकर्णी यांच्या दवाखान्यात मावळातील थंडी तापाचे, सर्दी पडशाचे, असे अनेक संसर्गजन्य आजाराने ग्रस्त असलेले पेशंट उपचार घेण्यासाठी येत असत. तेथे सुद्धा खूपच गर्दी असे.
त्याचप्रमाणे डॉक्टर काजळे, दीक्षित यांच्या दवाखान्यात सुद्धा पेशंटची खूपच गर्दी असायची.
कडलक आत्यांचा खवा
पोलीस चौकीच्या पाठीमागे राहणाऱ्या कडलक आत्यांचा खावा सुद्धा फारच प्रसिद्ध होता. त्यांच्या खव्याचा सुगंध दरवळत राहायचा. कवा घेण्यासाठी सुद्धा तिथे खूपच गर्दी असायची. मी वाड्याला कधी कधी त्यांच्या घरी मुक्कामाला थांबत असे.
नाईक यांचे घड्याळाचे दुकान
ग्रामीण भागातून आलेल्या अनेक लोकांची घड्याळांची दुरुस्ती नाईक यांच्या घड्याळाच्या दुकानात चालत असत. आपापली घड्याळ दुरुस्त करण्यासाठी उभे राहत.
एसटी किंवा ट्रक बाजारकरूनी फुल भरल्यावर मार्गक्रमण करीत असे. प्रत्येक स्टॉपवर लोक उतरल्यामुळे हळूहळू गर्दी कमी होई.
आपला स्टॉप आल्यावर एकदाची गाडीतून उतरून घरच्या दिशेने पावले चालू लागत. कधी एकदा घरी जाऊन आपण घेतलेल्या वस्तू मित्रांना दाखवतोय असे होई.
रामदास तळपे
खुप छान तळपे साहेब 👌👌👌
उत्तर द्याहटवासचित्र वाचनीय पोष्ट . तपशीलवार वर्णन व माहिती दिली आहे खूप छान साहेत
उत्तर द्याहटवाछान वर्णन
उत्तर द्याहटवाखूप छान लेख !
उत्तर द्याहटवामलाही लहानपणी
मंचरचा आठवडी बाजार
आई आज्जीबरोबर पायी
यायचो ,
आता मंचरही बद ललं
काळाच्या ओघात
खूप काही हातातून निसटलं
अन नवं सापडलं ...!
भूतकाळ डोळ्यासमोर उभा केला आहे,इतंभूत माहिती,वर्णन , बारसारीख तपसिल दिला आहे, बालपणाचे दिवस,पुन्हा उजाळा दिल्यासारखे वाटले,गेले ते दीन गेले
उत्तर द्याहटवा