जुन महिन्याच्या १० तारखेनंतर भातरोपांसाठी पेरणी केल्यावर शेतकरी मोठ्या आशेने पावसाची वाट पहात असतो. थोड्याशा पावसाने रोपे उतरून वर आलेले असतात. परंतु त्यानंतर पावसाने विश्रांती घेतलेली असते. पाऊस काही पडत नाही. भात रोपे सुकून जाऊ लागतात. कधी स्वच्छ ऊन तर कधी नुसतेच आकाशात काळे ढग घोंगावत राहतात. कधी असे वाटते की आता खुप पाऊस पडेल पण कसले काय ? पाऊस पडेल तर शपथ,उगाच शेतकऱ्यांना आशेला लावायचे काम निसर्ग करत असतो. पाऊस काही पडत नाही.
एव्हांना काही ठिकाणी रोपांनी माना टाकायला सुरूवात झालेली असते.मग काही शेतकरी मोटारपंप इंजीनपंप तर काही शेतकरी हंडयांमध्ये पाणी भरून भातरोपे जगवन्याचा केवीलवाना प्रयत्न करत असतात.
हे सर्व झाल्याव शेवटचा पर्याय म्हणुन ठिकाणी सर्व महिला एकत्र येतात. प्रत्येक महिला घागर भरून पाणी घेऊन डोंगरावरील शंकराच्या पिंडीवर मोठया भक्तीभावाने व विवीध प्रकारची गाणी म्हणुन पाणी घालतात. हे पाणी बाहेर जाणार नाही याची काळजी घेतात. यालाच देव कोंडणे असे म्हणतात.
मला आठवते, माझ्या लहानपणी एकदा भातरोपांसाठी पेरणी केल्यावर अशीच एकदा पाऊसाने ओढ दिली होती. शेतकरी वर्ग मोठया जिद्दीने पोराबाळांसह घागर,कळशी,हांडा यांच्या सहाय्याने रोपे जगवत होता. त्यामध्ये मी सुद्धा होतो.
परंतू तो एक केविलवाना प्रयत्न होता.पाऊस काही पडत नव्हता.पाऊस असता तर सर्व भागाची आवणी (लावणी) केव्हाच झाली असती.
आणि एके दिवशी अचानक धुओली, वांजाळे, शिरगाव व मंदोशी या चार गावच्या महिलांनी निर्णय घेतला की सर्वांनी घागरी भरून पाणी आणायचे व सुळ्याचा महादेव कोंडायचा.(चार गावच्या हद्दीत उंच डोंगरावर शंकराचे जागृत देवस्थान)
ठरल्या प्रमाणे सकाळी सर्व गावच्या महिला जंगलातील उंच डोंगर असलेल्या महादेव मंदिराकडे घागरीत पाणी घेऊन निघाल्या. त्यात आम्ही मुलेही होतो. सकाळीच पाऊसाचे वातावरण तयार झाले होते.
अगदी सकाळी जंगलातुन चालताना मजा वाटत होती. पक्षी गात होते.मध्येच एखादा ससा आम्हाला पाहुन वायू वेगाने पळत होता.आम्ही आम्ही उभा डोंगर चढून वर चालत होतो. घामाच्या धारा अंगातुन वाहत होत्या.
असेच चालत वर उंच डोंगरावर पोहचलो.आणि थंडगार हवेची झुळुक लागायला सुरूवात झाली.आणि क्षणात मन टवटवीत झाले.
थोडयाफार फरकाने वांजळे,धुओली,शिरगाव व मंदोशी या गावच्या महिला जमा झाल्या.सुळ्याच्या महादेवाची यथासांग पुजा करण्यात आली. देवाचे न्हाणीद्वार बंद करण्यात आले.आणि प्रत्येक महिला तिने आणलेली घागर महादेवाच्या पिंडीवर रिती करू लागली.

आणि काय अश्चर्य थोडयाच वेळात टपटप पाऊसाचे थेंब पडायला लागले. आणि थोड्याच वेळात जोरदार सरी कोसळायला लागल्या. सर्व भिजुन चिंब झाले. जोरदार पाऊस पडु लागला प्रत्येक महिला व मुले देवाचे दर्शन घेऊन वाट फुटेल तशी घराकडे परतु लागली.
पाऊस पडतच होता.एव्हाना ओढ्यानाल्यांना पुर आला.
जिकडे तिकडे पाणीच पाणीच खळखळणारे झरे ! झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे!...दिसु लागले.
आम्ही पाउलवाटेने चाललो होतो.पाऊस आम्हाला त्याच्या जोरदार सरींमुळे झोडपत होता. खाली गावात ओढ्याला मोठा पुर आला होता.व त्या पुरात जंगलातील ओंडके वाहत येत होते. मोठ्या लांटामध्ये हे ओंडके अचानक गायब व्हायचे व थोड्याच वेळात दुर कोठेतरी अचानक दिसायचे.



उघड पावसा ऊन पडू दे ! उडू बागडू हसू खेळूदे!
असे म्हणन्याची पाळी आमच्यावर आली.परंतू दुस-याच दिवसापासून खोळंबलेली शेतीची भात लागवडीची कामे जलदगतीने सुरू झाली...