Translate

आमचा गोटयाभाई

माझ्या चुलत भावाचे नाव जरी अहिलू होते तरी सारा गाव त्याला गोट्याभाई असेच म्हणत असे. नंतर नंतर तर लोक भाई असेच हाक मारत असत.

img src="..." alt=" गोटयाभाई ">
गोटयाभाई हा अतिशय गरीब परंतु हुशार होता. अनेक लोक त्याच्याकडून काम करून घेत असत. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी त्याचा सल्ला आवर्जून घेतला जात असे.

अगदी प्रथमपासून गोट्याभाई आणि कांताराम हे वर्गात शेजारी शेजारी बसत असत. अभ्यासात त्या दोघांची तुलना केली तर गोट्याभाईच्या मानाने कांताराम थोडा अधिक हुशार होता. त्यामुळे परीक्षेच्या वेळी बगळ्या सारखी मान उंच करून तो कांतारामच्या खांद्यावरून जे काही दिसेल तो त्याच्या पाटीवर उतरून काढत असे. परीक्षेचा निकाल लागला की ते दोघेही नापास होत असत. आणि मग गोटयाभाई कांतारामला म्हणत असे. 

तुझं बघून काढलं म्हणून मी नापास झालो. आणि त्याच्या अपयशाचे खापर तो कांतारामवर फोडत असे.

खरे सांगायचे तर त्याचे अभ्यासावर म्हणावे असे लक्ष कधीच नव्हते. अनेकदा तो दांड्या मारायचा. त्याने दांडी मारली की कांताराम त्याच्या बापाला ही बातमी देत असे. आणि मग त्याला शिव्या देत त्याचा बाप त्याची बखुट पकडून फरपटत शाळेत आणत असे. 

बिचाऱ्याची बायको वारली होती. मुलीचे लग्न केले होते. गोट्याभाई आणि तो दोघेच राहत असत. त्याचा बाप म्हणजेच आमचा चुलता शंकरबाबा मोल मजुरी करून पोट भरत असे. गोट्याभाई त्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या साऱ्या अपेक्षा गोटयाभाईवर एकवटून राहिल्या होत्या. 

तो भराभर दहावीपर्यंत शिकेल आणि गावच्या शाळेत शिक्षक होईल. शिक्षक झाला की चार पैसे हाती घोळतील असा तो मनात विचार खेळवीत असे.

पण दुर्दैवाची गोष्ट अशी की गोट्याभाई शिकला नाही. अभ्यासात फारसे लक्ष त्याने कधीच घातले नाही. खरं म्हणजे तो अत्यंत चौकस बुद्धीचा होता. पण त्याच्या चौकस बुद्धीला वळण देणारा कुणी भेटला नाही. ही आदिवासींची पोरं शिकून काय करणार? चार बुके शिकतील आणि शाळा सोडून घरी बसतील. असेच मास्तर गृहीत धरत असत.

शाळेत असताना अभ्यासात त्याने लक्ष कधी घातलेच तर त्याचे शंकेखोर मन सर्वांच्या पुढे धावत असे.

एका हौदात 14 बादल्या पाणी ओतले. आणि त्यामधून तीन बादल्या पाणी गळून गेले तर हौदात किती बादल्या पाणी राहिले? 

हे तनपुरे गुरुजींचे आवडते गणित होते. पुन्हा पुन्हा तोच गळका हौद आणि तेच पाणी. फक्त आज 14 बादल्या पाणी टाकले, तर उद्या 25 बादल्या. आज तीन बादल्या पाणी गळले तर उद्या अकरा बादल्या पाणी गळेल एवढाच फरक पण हौद हा गळलाच पाहिजे.

पण हे गणित वजाबाकी करून सोडवण्या ऐवजी गोटयाभाईला एका मागून एक अशा शंका येत असत.

हौद जर गळत आहे तर त्यात मुद्दाम विहिरीतून पाणी काढून 14 बादल्या कोण कशाला ओतील? 

आणि जो माणूस एका मागोमाग 14 बादल्या पाणी ओततो तो हौदाचा नळ बंद केल्याशिवाय कसा ओतील. आणि बरोबर किती बादल्या पाणी गळले हे कसे कळणार? तोटीतुन पाणी गळले म्हणावे तर एक बादली पाणी गळताच, हौदात पाणी ओतणारा माणूस तोटी का बंद करीत नाही?

अशा एका मागोमाग एक रास्त शंका डोक्यात आल्यामुळे हे वजाबाकीचे गणित आहे हे बिचाऱ्याच्या लक्षात सुद्धा येत नसे.

माझ्या घरात एका भांड्यात सहा लिटर दूध आहे. ते तीन भांड्यात सारख्या प्रमाणात ओतायचे असल्यास प्रत्येक भांड्यात किती दूध घालावे लागेल. हे तनपुरे गुरुजींचे दुसरे आवडते गणित. 

आपल्या घरी उभ्या आयुष्यात काही एवढे दूध येणार नाही याची त्यांना पुरेपूर खात्री होती. म्हणून माझ्या घरी एका भांड्यात अशीच सुरुवात करून ते दुधाचे काल्पनिक सुख उपभोगीत असतील असे  गोटयाभाईला वाटे.

हे ऐकले की गोट्याभाई तुच्छतेने हसायचा. हळूच कांतारामला म्हणायचा. यांच्या घरात सहा लिटर दूध? सहा लिटर पाणी मिळायची मारामार.

आणि मग प्रत्यक्ष गणितात डोके खूपसतांना त्याला पुन्हा शंका यायच्या. एकच घरचे दूध ना? मग ते तीन भांड्यात वाटून आणखी दोन भांडी कशाला खरकटी करायची? आणि मग ती घासणार कोण?

या व्यवहारातल्या शंका त्याला बेहिशोबी गणिते सोडवायला कधीच उपयोगी पडल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या पाटीवर नेहमीच भोपळा पडत असे. त्याच्या शंकांचे कधीच कोणी निरसन केले नाही. उलट तो "ढ" आहे म्हणून त्याला इतर कामे सांगण्यात मास्तरांचा वेळ जाऊ लागला आणि ती कामे करण्यात  गोटयाभाईचा शिक्षणाचा वेळ खर्च पडू लागला.

ए, गोटया ? उठ, मोठा पाटी घेऊन बसला आहे. जंटलमन होणार.जा! कातकरणीनी मासे आणलेत का बघून ये. असले तर दीड रुपयाचे माशांचे वाटे घेऊन ये. त्यावेळी दहा पैशाला एक वाटा असायचा. जास्त वाटे घेतले की दोन वाटे ज्यादा मिळायचे. परंतु गुरुजींना किती रुपयाला किती माशाचे वाटे मिळतात हे माहीत नसायचे.

असले एखादे काम तनपुरे गुरुजी सांगायचे. मग गोट्याभाई गावात चौकशी करायला जायचा. दीड रुपयाचे सतरा माशाचे वाटे घेऊन यायचा. येताना त्यातले पाच सात माशाचे वाटे आपल्या घरी आणून टाकायचा आणि बाकीचे तनपुरे गुरुजींच्या घरी नेऊन द्यायचा.

मासे घरी देऊन आल्यावर शाळा सुटून गेलेली असायची. मास्तर एकटेच वर्गात बसलेली असायचे.

गोटया? गावातून मासे आणायला इतका वेळ? माशाचे वाटे मोजून तरी घेतलेस ना? बरोबर वाटे मोजून घेतले आहेत ना? आणि अजून दोन एक्स्ट्रा मागून घेतले की नाही.

हो घेतले तर ! नाक खाजवत गोटया बोलायचा. आणि आपले दप्तर घेऊन घरच्या दिशेने सुसाट निघून जायचा.

ज्यावेळी पहिलीला मला शाळेत घालण्याचा प्रसंग निर्माण झाला आणि जेव्हा मला हे कळले तेव्हा शाळा नको मी शाळेत जाणार नाही असे म्हणत मी मोठयामोठयाने रडण्यास प्रारंभ केला. ही रडारड आठवडाभर तरी चालली होती. मला वाटते त्यावेळी मी जेवढा एकूण रडलो तेवढा पुढल्या आयुष्यात कधीच रडलो नाही. 

नवीन कपडे, नवीन पाटी, नवीन पेन्सिल, अशी कितीतरी प्रलोभने मला दाखवण्यात आली. पण मी कशाला भुललो नाही. रडणे थांबवले नाही. रडणे थांबवले नाही. कधी खरा रडलो, कधी ओढून ताणून रडलो, सुक्या डोळ्यांनी, ओल्या डोळ्यांनी जमेल तसा रडलो. माझ्या सतत रडण्याने घरी कुणीतरी द्रवेल असे वाटले होते. पण त्या रडण्याचा कोणावरही फारसा परिणाम झाला नाही. मला वाटत होते. माझी आई माझे कौतुक करेल, मला पाठीशी घालीन, शाळेच्या संकटातून वाचवेल. पण असे काहीही झाले नाही.

पुढे पुढे रडताना मी आडवा पडून रडू लागलो, व्याकुळ होऊन गडबडा लोळू लागलो. हेतू हा की आईचे मातृप्रेम द्रवू लागेल. परंतु झाले उलटेच 

मेल्या डुकरासारखा काय लोळतो? असे म्हणत उलट तिने पाठीत धपाटेच घातले. 

नाही म्हणायला माझी आजी तेवढी माझ्या सहाय्याला धावून आली. 

शिकून सवरून करायचे आहे काय? घरचा वाडवडिलार्जीत जमीन जुमला आहे. शेती भातीवर नजर ठेवून राहील आणि आपले पोट भरेल असे ती उठता बसता म्हणू लागली. शिकून सवरून खायचे काय? शिकून का कोठे पोट भरते? शिकून शेवटी मास्तरचाच मार खायचा ना?

तथापि त्या समंजस म्हातारीचे कुणी काही ऐकले नाही. जीने बाबांना जन्म दिला. तिचेही ते ऐकायला तयार झाले नाहीत.(आई थोर तुझे उपकार हे गीत त्यांनी बालपणी बहुदा पाठ केले नसावे)

माझे रडे थांबावे म्हणून ती मला समजावू लागली. 

तु चिंता करू नको. तुला कोण शाळेत घालते ते पाहतेच मी. असे म्हणून तिनेही आव्हान स्वीकारले. 

पण सारेच फुकट. माझे रडणे जसे घरात कोणी मनावर घेतले नाही तसेच आजीचे बोलणेही कोणी मनावर घेतले नाही. 

सोमवार उजाडला. मला शाळेत नेण्याची  जबाबदारी गोटयाभाई कडे दिली होती. त्यादिवशी मी जबरदस्त धांगडधिंगा घातला. गडबडा लोळलो. चिक्कार लाथा झाडल्या. परंतु गोटयाभाईने मला बगलेत पकडले. आणि शाळेत आणून सोडले.

शाळेत बसल्यावर देखील क्षणभर पळ काढण्याचा एक विचार मनात आला. पण पळ काढणे शक्य नव्हते. गुरुजींच्या हातात छडी होतीच. शिवाय पोरांची वानरसेना देखील होती. तीही त्यांनी अंगावर सोडली असती. शिवाय मी पळून जाईल या भीतीने गोटयाभाई देखील शाळेच्या बाहेर बसून माझ्यावर पहारा करीत होता. मी शाळेतून पळून जाईल म्हणून आठ दिवस सतत तो शाळेच्या बाहेर बसून राहत असे.

त्याने जसे मला पहिल्या दिवशी शाळेत नेले. तसेच पहिल्या दिवशी त्यानेच मला ओढ्यावर पोहायला देखील नेले होते.

आमच्याकडे तेव्हा गाड्याचे बैल होते. गोटयाभाईच्या लग्नाला वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी आमच्या चुलत्याने खटार गाडीला हे बैल जुपले. व त्यामध्ये लग्नाचे नवरदेवासह वऱ्हाड बसवले. शिरगावच्या खिंडीमध्ये वऱ्हाड गेल्यावर बैल जे उधळले की ज्याला म्हणतात ते.

खटारगाडी मधील सर्व वऱ्हाडाच्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी खटार गाडीतून उड्या मारल्या. व आपला जीव वाचवला. नंतर ही खटारगाडी सटवाई मंदिराच्या पुढे जाऊन लोकांनी पकडली होती.

पुढे गोटयाभाईला दारूचे व्यसन जडले. सतत तो दारू पीत असे. परंतु दारू पिऊन कधी त्यांने गावात दंगामस्ती केली नाही किंवा कधी कुणाला शिवीगाळ केली नाही.

गोट्या भाईची आई त्याच्या लहानपणीच देवाघरी गेली होती. तिला एक विचित्र आजार झाला होता. ती दुपारी गावात कुणी नसल्यावर लोकांच्या कोंबड्या कापून शिजवून खात असे. त्यानंतर थोड्याच दिवसात ती देवा घरी गेली.

गोट्याभाईला त्याच्या वडिलांनीच लहान पणापासून सांभाळले होते. बिचाऱ्याने मुलाची आबाळ होऊ नये म्हणून दुसरे लग्न देखील केले नाही. शंकरबाबा हे गावात दगडाला सुरुंग घेण्यासाठी प्रसिद्ध होते. शिवाय भात काढणीच्या वेळेस भाताचे भारे बांधण्यासाठी पेंढ्याच्या रस्सी (आळे) वळत असत. व ते विकत. काही काळ ते गावच्या देवाचे पुजारी देखील होते. त्यामुळे त्यांना गावाकडून सुगीच्या दिवसात धान्यरूपाने बलूते मिळत असे.

गोटयाभाईचे त्याच्या वडिलांवर म्हणजे शंकरबाबा वर खूप प्रेम होते. शंकर बाबा साधारण 90 वर्षे वयापर्यंत जागला. परंतु शेवटपर्यंत गोटयाभाईने त्याची सेवा चाकरी केली.

दुर्दैवाने आज गोटयाभाई हयात नाही. परंतु त्यांचा एक मुलगा गणपत हा राजगुरुनगर मधील प्रसिद्ध कलर कॉन्ट्रॅक्टर आहे.मोठमोठ्या बिल्डिंगची कलरची कामे तो करत असतो. तर दुसऱ्या खंडू हा सुद्धा गोट्याभाई सारखाच प्रामाणिक आहे. 

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)


 

  



 





विष्णू आचारी

हॉटेल जनसेवा

विष्णूचं एक छोटं हॉटेल होतं, हॉटेल जनसेवा.

img src="..." alt=" विष्णू आचारी ">
त्या हॉटेलच्या पाटीवर नुकतीच अंघोळ केली आहे अशी दिसावी अशा एका केस मोकळे सोडलेल्या स्त्रीचं चित्र होतं. हॉटेलच्या नावात असलेली जनसेवा गिऱ्हाइकांना प्रत्यक्ष दिसावी असा त्या चित्रकाराचा हेतू असावा.

मला मात्र ते चित्र फार आवडायचं. वाटायचं हॉटेल हे एक घरच आहे. आणि त्या घराच्या उंबरठ्यावर ही त्या घराची वत्सल बाई उभी आहे. 

मंद हसत. न हलता‚ न बोलता‚ मूकपणे स्वागत करत.

वास्तविक ते हॉटेल होतं अब्बासभाई तांबोळी या गृहस्थांचं. विष्णू तिथं एक नोकर होता पण सगळं गाव त्या हॉटेलला विष्णूचं हॉटेल असंच म्हणायचं. आज आपल्या सगळ्या समाजजीवनाचं हॉटेल झालं आहे. 

ऐन थंडीचे दिवस असायचे. धुक्यानं झाडंपेडं‚ कौलारू घरं‚ रस्ते यांचा कबजा घेतलेला असायचा. भल्या पहाटे उठलेल्या विष्णून भट्टी पेटवलेली असायची. त्यातून उठलेले धुराचे लोळ जनसेवाच्या कौलारू पाक्यातून उसळून बाहेरच्या धुक्यात मिसळलेले असायचे.

विष्णू आचारी

विष्णुने रात्री चिरून‚ मीठ घालून‚ तासभर मळून ठेवलेला कांदा अंगभर मुरलेला असायचा. एक भली मोठी कढई भट्टीवर चढायची. 

पावसाळी हंगामात झाडाच्या पानावळी वरून टपोरी थेंबावळ टपटप उतरावी तशी विष्णुच्या कसबी बोटांतून कढईतल्या तापल्या तेलात ठसठशीत कांदाभजी उतरू लागायची. ती आपल्या पोटात सामावून घेऊन फुलविताना तापलं तेल फसफसून उकळू लागायचं. खरपूस खमंग वास धुक्याचे हात हातांत धरून दूरवर पसरायचा.

img src="..." alt=" भजी प्लेट">
भजीलोभी जीव त्यानं सैरभैर व्हायचे. वासाच्या रोखानं चालत येणारी अनेक खवैय्यी पावलं विष्णूच्या हॉटेलची पायरी ओलांडू लागायची.

मीही जनसेवा समोर यायचो. धुक्यानं झाकाळलेल्या पाटीवर नजर टाकायचो. ती मोकळे केसवाली बाई धुक्यामुळं दिसायची नाही. काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं. 

चलाख पाकोळीसारखी हालचाल करणारा विष्णू आतून मला हाकारायचा‚ चल ये राम पैल्या घान्याची पिलेट सरत आली.

मी आत जायचो. सगळी बाकडी माणसांनी दाटलेली असायची. पण कसलीच घाई-गडबड नसायची. 

स्वच्छ बनियन घातलेला व आखूड लेंगा असलेला‚ तेल लावून केस नेटके मागं परतविलेला‚ सावळ्या रंगाचा‚ शिडशिडीत अंगचणीचा‚ थोडासा पाठीत वाकलेला विष्णू माझं हसून स्वागत करायचा. बोटांच्या फटीत पिठाचे रपटे दाटलेला हात उंचावून भट्टीच्या दिशेला करीत तो मला हळूच म्हणायचा‚ 

जा ! आत जा, नीट! 

विष्णूच्या खास भट्टीच्या खोलीत शेकोटीसमोर माझी बैठक जमायची. खरपूसलेल्या कांद्यांच्या पाकळ्यांची भजी पोटात उतरायची.

विष्णुची आवड

विष्णूला सिनेमाचा आंबट शौक होता. ज्या दिवशी सिनेमाला जायचं असेल त्या दिवशी रात्री विष्णूच्या हातातील शिकलबाज सुरी सरासर कांदे चिरून मोकळी व्हायची. 

कांद्याच्या पाकळ्या मिठाच्या पाण्यात मळून त्या मुरतीला घालून‚ विष्णू व्हिडिओ थिएटरची वाट धरायचा. मिळालेल्या पगारातील पैसे खर्चून रोज एकातरी माणसाला आपल्याबरोबर सिनेमा बघायला लावायचा. 

हाच विष्णू गावाच्या मारुतीच्या देवळात उभ्या राहिलेल्या सप्ताहाची दिंडी टाळ-मृदंगाच्या गजरात बाहेर पडली की कपाळावर बुक्क्याची बोटं ओढली आहेत अशा थाटात दिंडीत सामील व्हायचा. 

जय जय राम क्रिष्ण हारी म्हणत लयीत एक पाय मागं-पुढं टाकीत दिंडीत रमून जायचा.

विष्णुच्या लग्नातील गंम्मत

मला आठवतंय. विष्णुचं लग्र‚ त्याच्या भज्याची चव चाखलेल्या गाववाल्यांनी मोठ्या थाटानं लावलं होतं. 

मीही त्याच्या लग्रासाठी घोटवडी या गावी गेलो होतो. लग्र दुसऱ्या दिवशी होतं. आम्ही त्या गावी दहा मैल चालत‚ रात्रीचे पोचलो होतो. 

पाटलाच्या वाड्याचे अंगण असते तशा एका ओट्यावर आमची झोपण्याची व्यवस्था केली होती. खाली घोंगडी अंथरलेली होती. 

रात्रभर आमच्यापैकी कुणालाच झोप आली नाही. काहीतरी एकसारखं अंगाला चावत होतं. डास‚ ढेकूण‚ पिसवा यांपैकी काय ते मात्र आम्हाला काही केल्या कळत नव्हतं. 

काड्याच्या पेटीतील काड्या पेटवून आम्ही ते गनिमी काव्यानं हल्ला करणारे जीव शोधू बघत होतो. थकत होतो. पहाट झाली आणि अंथरलेली घोंगडी उचलण्यात आली. खाली केसांची काळीशार बिछायत पसरलेली आम्हाला दिसली. 

विष्णुच्या पाहुण्यानं न्हावी डोकी भादरतो त्या ओट्यावर आम्हाला झोपवून आमची अगदी बिनपाण्यानं केली होती. एका हातानं शर्टात‚ बनियनात घुसलेले केसांचे बाण काढण्याचे निष्फळ प्रयत्न करीत दुसऱ्या हातानं आम्ही विष्णूच्या केसावर अक्षता त्या दिवशी टाकल्या.

विष्णुचाआवडता सण दसरा

दसऱ्याच्या दिवशी विष्णू फार मजेदार पेहराव करायचा. पांढराधोट लेंगा‚ त्यावर शानदार शर्ट‚ कोट आणि मस्तकी शेमलेबाज फेटा. त्या फेट्यात खुपसलेले पिवळे रसवंत कोंभ असायचे. त्या वेषात त्याला बघितलं की पटायचं नाही की विष्णू हा आचारी आहे.

सोने घे. सोन्यावानी ऱ्हा. नावासारखा हो राम. म्हणत विष्णू माझ्या हाती आपट्याची पानं देऊन माझे हात मायेनं दाबायचा. त्यानं केलेली सूचना मी पडत्या फळाची आज्ञा मानून नावासारखंच व्हायचा विडा उचलायचा.

माझा मित्र सुभाष हा एक इदरकल्याणी साथीदार सरलष्कर म्हणून बरोबर घेऊन मी लूट घेऊन यायचा. आत्याने पाळलेल्या इंग्लिश कोंबड्यांची अंडी मी आणि सुभाषनं लाटलेली असायची. ती उकडून फस्त करण्यासाठी आम्हाला निवांत जागा हवी असायची.

आम्ही मग विष्णूच्या हॉटेलातील भट्टीच्या खोलीत यायचो. खिशातील अंडी विष्णूनं चहासाठी ठेवलेल्या पाण्याच्या अधणात सोडायचो. एकदा आम्ही अशी अंडी सोडली आणि विष्णू लगेच त्या खोलीत आला. फडकं घेऊन त्यानं अधणाचं भांडं भट्टीवरून उचललं आणि ते चहाच्या बंबात ओतलं. मी आणि सरलष्कर सुभाष एकमेकांकडं बघतच राहिलो. विष्णूनं ओतलेल्या पाण्याबरोबर अंडीही बंबात पडली आणि फुटली. विष्णू ते पाणी घेऊन तसाच तरातर निघून गेला.

अंडी चोरीची असल्यामुळं त्याला बोलायची चोरी होती. विष्णूनं त्या पाण्याचा चहा गाळायला सुरुवात केली. चहा पिणारी गिऱ्हाइकं कधी नव्हे ती त्याला म्हणू लागली‚ 

विष्णू चहा उबस मारतोय रे बाबा. 

विष्णूलाही बंबाच्या तोटीतून दुधाच्या सायीसारखे लांबट‚ पांढरे तंतू का येताहेत ते कळेना. जगातल्या लोकांनी एग्ज करी चाखली असेल‚ एग्ज बिर्याणीची चव घेतली असेल पण त्या दिवशी डेहणे करांनी एग्ज टी चा अजब मामला चाखून पाहिला. 

विष्णू कधी आजारी पडल्याचं मला आठवत नाही. त्याचं कारण होतं तिन्ही हंगामात विष्णू भीमा नदीच्या थंडगार पाण्याची भल्या पहाटे अंघोळ करून यायचा.

मी गाव सोडलं आणि विष्णू माझ्या नजरेआड झाला. मध्यंतरी एकदा गावी गेलो. जाताना मोठ्या उत्सुकतेनं मी गाडीतून उजव्या हाताला हॉटेल जनसेवा च्या पाटीवरची केस मोकळे सोडलेली वत्सल बाई दिसेल म्हणून बघितलं. माझी निराशा झाली. 

हॉटेल जनसेवाच्या जागेवर खताचं दुकान होतं. ती मोकळे केसवाली बाई आणि विष्णू कुठं गेली असावीत मला कळेना. मी गावात चौकशी केली. हॉटेल जनसेवाची आता जनसेवा बेकरी झाली आहे. 

विष्णुनं बऱ्याच दिवसांपूर्वी गाव सोडलं आहे. रेव्हेन्यू खात्यात तो शिपाई झाला आहे. परवा त्याची माझी गाठ पडली. खाकी कपड्यावर तांबडा आडवा पट्टा घातलेला आहे अशा अवस्थेत. तो तांबडा पट्टा बघताना मला वाटलं माझ्या मनातील विष्णूवर कुणीतरी आपल्या काळ्या‚ राकट हातांनी लाल फुली मारली आहे. कुळकायद्याच्या नोटिशी काढण्यासाठी वापरतात तसल्या पिवळ्या कागदाच्या रंगाची दाटी विष्णूच्या चेहऱ्यावर मला दिसली. त्या हॉटेल जनसेवाच्या पाटीवरील मोकळ्या केसांच्या बाईनं विष्णूला फसविलं तर नाही ना अशी मला शंका आली.

विष्णूला घेऊन मी एका हॉटेलात गेलो. अगदी अभावितपणे कांदाभज्यांची ऑर्डर देऊन बसलो. चांगल्या बारा वर्षानंतरची ‘सुधारलेली भजी आमच्यासमोर आली. ती खाताना आम्ही एकमेकांकडे सहेतुक बघितलं. मला जाणवून गेलं‚ विष्णूच्या जीवनाचं भजं काळाच्या कढईत करपेपर्यंत घालून नियतीनं ते आपल्या अज्ञात झाऱ्यानं ढोसलेलं असावं. आणि ते खरं निघालं आहे. विष्णू आज एकटा आहे. रेव्हेन्यूचा शिपाई. 

माझ्यासमोर खाल्लेल्या भज्यांची मोकळी प्लेट आहे. मी विचार करतो आहे. पोटांत गेलेली ही उडप्याची नि:सत्त्व भजी बाहेर काढून‚ प्लेटमध्ये पुन्हा भरून मला पोऱ्याला ऑर्डर देता येईल का 

भजी कॅन्सल...

रामदास तळपे ( ग्रामीण संस्कृती)

पूर्वीची गावाकडील करमणुकीची साधने

उन्हाळ्याच्या दिवसात सर्व लोक अंगणात झोपायचे. सकाळी सकाळी जाग यायची तीच मुळी प्रल्हाद शिंदे यांच्या ऐका सत्यनारायणाची कथा किंवा चल ग सखे चल ग सखे पंढरीला या गाण्यानी.

अरे! आज कोणाची तरी पूजा आहे वाटतं? विचारल्यावर कुणीतरी सांगायचे. आज गणपत मोहनाची पूजा आहे.

गावात सर्व गाव आणि वाड्या वस्ती मिळून दरवर्षी 25 ते 30 जणांच्या पूजा असायच्या परंतु गणपत मोहन यांची पूजा म्हणजे मोठे पर्वणीच असायची. कारण त्या पूजेला प्रसादिक भारुड मंडळाचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी भारुड पाहायला मिळणार म्हणून मोठा आनंद व्हायचा.  

गावाकडे पूर्वी सत्यनारायण महापूजा, यात्रा जत्रा निमित्त करमणुकीची साधने म्हणून भजनी भारुड यांना खूपच मागणी होती. गावागावांमध्ये भजनी भारुडे असायची.

img src="..." alt=" भारुड ही कला सादर करताना कलाकार ">
सत्यनारायणाच्या महापूजा निमित्त सुद्धा अनेक सधन लोक भजनी भारुडाचा कार्यक्रम ठेवायचे.

आमच्या गावात गणपत मोहन हे मुंबईला असल्यामुळे दरवर्षी त्यांच्याकडे गावाला ते पूजेचा कार्यक्रम ठेवत असत. त्यांच्या पूजेला सर्वात जास्त पर्वणी म्हणजे भारुडाचा कार्यक्रम हा ठरलेला असायचा.

त्या काळातली भारुडे ही जमिनीवर होत असत. स्टेज हा प्रकार तेव्हा कोणाच्या गावीही नव्हता. 

एक रंगीत पडदा असायचा. त्या पडद्यासमोर भारुड करण्यासाठी थोडीशी जागा मोकळी ठेवून प्रेक्षक बसत असत. पडदयाच्या मागे भारुडातील पात्र काम करणारी लोक भारुडातील वेगवेगळी कपडे घालून सजण्या धजण्याचे काम करत असत.

गावातील वाड्या वस्तीचे लोक भारुडाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी करायचे. संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत पूजा संपायची. त्यानंतर तीर्थप्रसाद व लगेच जेवणाच्या पंगती बसायच्या.

त्यानंतर अंगणातच भारुडाचा कार्यक्रम सुरू व्हायचा. 

त्या काळात टोकावडे, धामणगाव, भोमाळे, सरेवाडी, नाव्हाची वाडी अशी अनेक भारुड मंडळे होती. त्या काळात भारुड मंडळांनी करमणुकीचे काम करता करता धार्मिक भावना जोपासण्याचे काम केले.

img src="..." alt=" सत्यनारायण पूजा">
तिसरी, चौथीला असताना एकदा गणपत मोहन यांच्या पूजेच्या निमित्ताने भोमाळे येथील भारुड मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मी मित्र मच्छिंद्रसह सगळ्यात पुढे भारुड पाहण्यासाठी बसलो होतो.

भजन मंडळी बसलेल्या मध्यभागी मृदंग वाजवणारा माणूस कोंबड्यासारखी मान उडवीत मोठमोठ्याने मृदंग वाजवीत होता. पाय पेटीवाला नाना प्रकारचे स्वर काढून लंबकासारखा दोन्ही बाजूने हेलकावे खात होता. तर टाळ वाजवणारे छातीवर हानुवटी टेकवून जोरजोरात टाळ कुटीत होते. खरं म्हणजे लोकांच्या गोंगाटापेक्षा टाळांचा आवाज कमी पडतो म्हणून ते टाळावरच सुड उगवीत होते. 

हा सारा प्रकार ऐन रंगत आला तेव्हा कुठे भारुड मंडळाची पात्र रंगून तयार झाली. 

पहिले पात्र उमावराचे आले. लाल जरीचे धोतर व त्याचप्रमाणे पिवळा जरीचा अंगरखा डोक्यावर पिवळा फेटा व हातामध्ये एक पूजेचे ताट घेऊन उमवरा नाचत नाचत आला.

भजनी मंडळांनी जोर जोरात सर्व वाद्य वाजवून आसुरी आनंद घेण्याचा प्रयत्न केला.

उमावरा शिरीधरा दयेचा देतो आसरा.. असे गायन करायला सुरुवात केली. खूप वेळ नाचल्यावर उमावरा असलेले पात्र एका कोपऱ्यात उभे राहिले.

त्यानंतर सावळ्या नावाचे पात्र येऊन भजनाच्या वाद्यामध्ये जोरात उंच उड्या मारून नाचू लागले. अंगणातील मांडवाला त्याचे डोके लागते की काय अशी आम्हाला भीती वाटू लागली.

खूप वेळ नाचल्यावर व दमुन भागून सावळ्याच्या पात्राचा संवाद सुरू झाला. परंतू खूप वेळ नाचल्यामुळे सावळ्याला नीट संवाद देखील म्हणता येईना. अशी त्याची अवस्था झाली.   

त्यानंतर आपल्या दोन काळ्या हातांना लाल रंगाचे दोन लाकडी हात बांधून आणि एक सोंडेचा लालबुंद मुखवटा तोंडावर धरून पोट खपाटीला गेलेला गणपती बाकावर बसला होता. बरोबर सरस्वतीही आली होती. 

पावसाळ्यात अंगावर घेतो त्या इरण्याचा साठा मधोमध कापून त्यामध्ये डोके घालून तो साठा सरस्वतीने कमरेला बांधला होता. त्यावर निळ्या रंगाची शाल गुंडाळली होती. व पुढे मेसाच्या काठीची चोच तयार केली होती. व पाठीमागे खरोखरच्या मोराची पिसे चिकटवली होती. असा हा मोराचा मुखवटा बांधून सरस्वती मोरावर स्वार झाली होती. तिने कमरेच्या मोरा सकट नाच केला आणि घामाच्या धारांनी तिचा पोलका चिंब भिजला तेव्हा तिने नाच थांबवला.

सरस्वती घामाच्या धारा शालूच्या पदराने पुसत असताना सूत्रधार आणि गणपती यांचा संवाद झाला. आणि हत्तीच्या सोंडेतून माणसाचा आवाज निघून भारुड मंडळीला आशीर्वाद मिळाला.

त्यानंतर मुख्य वगाला सुरुवात झाली. अरुंद बाकड्याचे सिंहासन करून राजा त्यावर अरुड झाला होता. बाजूला प्रधानजी उभा होता.

कोणत्याही क्षणाला तलवार बाहेर काढावी लागेल अशा पद्धतीने कमरेच्या तलवारीवर हात ठेवून राजा म्हणाला. परधानजी आपल्या या राज्याची येवस्था कशी काय हाये?

पण प्रधानजीने उत्तर दिले नाही. त्याचे राजाकडे लक्षच नव्हते. खुद्द राजाकडे पाठ फिरवून तो उभा होता. राजाच्या दरबारात आपल्याला फक्त उभे राहण्यापुरती जागा मिळावी म्हणून तो प्रेक्षकांकडे रदबदली करीत होता. 

अरे! जरा पाय ठेवण्यापुरती तरी जागा द्या.

जरा मारून घ्या मारून घ्या. खुद्द राजा ही प्रधानजीच्या मदतीला आला. 

राजाच्या सिंहासनाला चिकटून बसलेल्या काही लोकांनी किरकोळ हालचाल करून राजाचा आदर केला. पण ते तरी मागे कुठे जाणार ? जागा होती कुठे?

मग जागच्या जागी फिरत राजा पुन्हा म्हणाला.

परधानजी आपल्या या राज्यात येवस्था चोख हाये का न्हाय?

म्हराज, आपल्या राज्याची येवस्था चोख हाये पण...

परधानजी पण म्हणजे काय ? साफ साफ बोला?  राजा बोलला.

म्हाराज आपल्या राज्यात दैत्यांचा लय तरास होतो.

काय म्हणता? माझ्या राज्यात दैत्य? 

मी त्यांना ठार मारून टाकणार हाये. 

अशी गर्जना करत राजाने म्यानाशी झटापट करीत गंजलेली तलवार कशी बशी बाहेर काढली. उजव्या हातात तलवार धरून तलवारीचे टोक त्याने डाव्या हातात धरले आणि एकदा डावा पाय, तर एकदा उजवा पाय वर उडवीत वाद्यांच्या गजबजाटात बराच वेळ तांडव नृत्या सारखे नृत्य केले.

ते नृत्य चालू असताना अनेकांच्या हातापायावर राजाचे दणकट राजेशाही पाय पडून काही काळ रडण्या केकटण्याचा गोंगाट झाला. आणि तेथेच युद्धाला पुरेशी मोकळी रणभूमी तयार झाली.

तेवढ्यात आसमानाला भेदून जाणारी एक आरोळी उठली. लोक दचकून इकडे तिकडे पाहतात न पाहतात तोच आणखी आरोळ्या मागून आरोळ्या उठल्या. 

आरडाओरडा करीत तेथे नाचत दैत्य खुद्द प्रेक्षकांतूनच वाट काढत पुढे आला. वाटेत सापडलेल्या बिचार्‍या प्रेक्षकांना राक्षसी कृत्याचा प्रत्यय देत तो थेट दरबारात घुसला.

दैत्याचा वेष संपूर्ण काळा होता. तोंडाला अबीर बुक्का फासल्यामुळे तो अधिक भयानक दिसत होता. त्यातून फक्त सफेद डोळे तेवढे उठून दिसत होते. केसांची टोके कमरेला टेकली होती. 

त्याने आपली तलवार उपसली आणि त्या अरुंद अशा जागेत त्याने अक्षरशः थयथयाट केला.

आरोळ्या ठोकीत तो सिंहासनावर म्हणजे बाकड्यावर चढला. तिथून त्याने पुन्हा एक आरोळी ठोकून वरच्या छताला लागेल अशी उडी मारली. त्या उडी बरोबर वर टांगलेली आंब्याच्या पानांची तोरणे तुटून खाली आली.

शेवटी राजा आणि दैत्य यांची शाब्दिक देव घेव झाली. आणि प्रकरण ठरल्याप्रमाणे हातघाईवर आले. 

भजनी मंडळांनी सारे बळ एकवटून वाद्य वाजवली आणि लढाईला अनुकूल असे वातावरण निर्माण केले. 

बराच वेळ त्यांचे तुंबळ युद्ध झाले आणि अखेर सहा फूट लांबीचा दैत्य गारद झाला. तो मरून पडताच पडद्यावाल्याने पडदा धरायला हवा होता. परंतु विडी विझवून उठेपर्यंत पडदेवाल्याला उशीर झाला आणि डोळे मिटून मरून पडलेल्या दैत्याला वाटले, पडदा धरलेला आहे, म्हणून तो उठला आणि बाजूला पळाला. ते पाहून जिवंत झाला, जिवंत झाला असे ओरडत प्रेक्षकांनी गलका केला.

त्यानंतर पहाटेपर्यंत भारुड चालू होते. दरम्यान पावलोपावली लढाया झाल्या. राणीचे गायन झाले. द्वारपाळांचे विनोद झाले. आणि पहाटे कोंबडा आरवल्यावर भारुड संपले.

त्या काळात सर्वांची भाषणे तोंडपाठ होती असेही नाही. पण आख्यानाच्या अनुरोधाने जे ज्यावेळी सुचेल ते तोंडाबाहेर यायचे.

परंतु सन 1988 - 89 च्या काळात टीव्ही व व्हीसीआर मुळे हिंदी आणि मराठी चित्रपट गावोगावी आणि गल्लोगल्ली धुमाकूळ घालू लागले. आणि या भारुड मंडळांना उतरती कळा लागली. हळूहळू भारुड मंडळे नामशेष होण्याच्या मार्गावर आली.

त्यानंतर पुढे आमुलाग्र बदल झाला आणि लोक सत्यनारायणाच्या महापूजेला भारुडा ऐवजी प्रेक्षकांसाठी पिक्चर ठेवू लागले. 

गावाकडची तरुण मंडळी पिक्चर पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावांमध्ये जाऊ लागली. त्या काळात प्रत्येक गावात वाड्या वस्त्यांसह 30-40 पोरं असायची.

असेच एकदा मोरोशी येथे शांताराम तिटकारे गुरुजी यांनी त्यांच्या सत्यनारायणाच्या महापूजे निमित्त चित्रपट ठेवले आहेत असे कळाले.

संध्याकाळी आमच्या गावातील वाड्यावस्त्या पाच-पन्नास पोरं मोरोशी येथे चित्रपट पाहण्यासाठी गेलो त्यामध्ये मी सुद्धा होतो. 

तिथे गेल्यावर तेथील ग्रामस्थांनी आमचे स्वागत केले. व लगेच जेवण्यासाठी पंगतीमध्ये बसवले. सर्वांनी दोन दोन तीन वाढया आमटी, भात व शाक भाजीवर ताव मारला.

त्यानंतर ठरल्याप्रमाणे चित्रपट व्हिडिओ वर दाखवण्याचे काम सुरू झाले. पहिला पिक्चर लावला पटली रे पटली. त्यानंतर त्यांनी दुसरा एक मराठी चित्रपट लावला. परंतु आमची पोरे म्हणायची हिंदी चित्रपट लावा. तर ती मंडळी म्हणायची नाही आम्ही मराठी पिक्चर लावणार.

त्यावरून थोडेसे तू तू मै मै  झाले. शेवटी आमच्या गावातील सर्व पोरे घरी निघाली.  मोठे असलेल्या पोरांच्या डोक्यात एकच विचार घोळत होता.

मोरोशीच्या लोकांना पिक्चर पाहू द्यायचा नाही. त्यासाठी डीपी जवळ जाऊन आमच्या पोरांनी रात्रीच्या त्या काळ्याकभिन्न अंधारात खाचरातील ढेकळांनी पोल वरील दगडी डिओ पाडण्याचा प्रयत्न सुरु केला.

शेवटी गंगाराम जढर यांनी एका ढेकळाच्या तडाख्यात शिरगाव आणि मोरोशीचे दोन्ही डिओ पाडण्याचे महान कार्य केले. त्याबरोबर शिरगाव आणि मोरोशीच्या लाईट गायब झाल्या. आणि त्यांचा पिक्चर पाहण्याचा हेतू पूर्ण होऊ शकला नाही. याचे समाधान घेऊन मंदोशीचे कार्यकर्ते गावाच्या दिशेने चालू लागले.

परंतु दुसऱ्या दिवशी मोरोशीचे लोक संध्याकाळी आमच्या गावात येऊन मीटिंग घेणार आहेत असे कळल्यावर सर्वांचे धाबे दणाणले. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी आठ वाजता मोरोशीचे ग्रामस्थ मंदोशीमध्ये दाखल झाले.

थोड्याच वेळात सर्व पोरांना बोलावणे पाठवले. काही पोरं आली काही लपून बसली. मोरोशीच्या लोकांनी लाईटच्या पोलवरील डीवो पाडल्यावर प्रत्येकाच्या घरातील बल्ब आपोआप गळून पडले. शिवाय आमचा पिक्चर देखील बंद पाडले. त्यामुळे आमचे खूपच नुकसान झाले आहे ते तुम्ही भरून द्या असे मीटिंगमध्ये सुनावले. नाहीतर आम्ही पुढे पोलीस स्टेशनला कम्पलेट करू असेही सांगितले.

गावातील सर्व लोकांनी आम्हा पोरांना खूपच दुषणे दिली. व प्रत्येक पोराकडून दहा रुपये अशी वर्गणी काढून मोरोशीच्या लोकांच्या हवाली करतो असे सांगितल्यावर ते लोक निघून गेले.

आम्ही त्यांची लाईट घालवली होती व त्यांचा पिक्चर बंद पाडला होता हे मान्य. परंतु त्यांचे ब्लब मात्र गळून पडले नव्हते. व फिटिंग केलेल्या वायरही जळाल्या नव्हत्या हे खरे असूनही आम्हाला गावातील लोक काहीच बोलू देत नव्हते.

ठरल्याप्रमाणे प्रत्येक पोरांनी दहा रुपये याप्रमाणे वर्गणी जमा करून 390 मोरोशीच्या लोकांच्या हवाली केले. 

त्या बहाद्दरानी त्या पैशाचा एक बोकड आणून मटणाचा रस्सा आणि भात करून खाल्ला. हे आम्हाला खूप दिवसांनी कळले.

तर अशा या गावाकडील गमती जमती. आता मात्र गावाकडे नावालाही पोरं शिल्लक नाहीत. सर्व तरुण आणि त्यांच्या बायका मुले रोजगारासाठी शहरात दाखल आहेत. आणि म्हातारी कोतारी चार दोन माणसे मात्र गावात शिल्लक आहेत. 

पूर्वी प्रत्येकाच्या घरात आठ दहा असलेली जनावरे आता नावाला देखील सापडत नाहीत. गावाकडे अनेक लोकांनी सुंदर घरे बांधली आहेत परंतु त्या घरांमध्ये राहायला कुणीच नाही. सर्व घरे कुलूपबंद अवस्थेत घरमालकांची आणि घरातील माणसांची वाट पहात उभी आहेत दिवसेंदिवस महिनो महिने.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

 



 


गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच्या किंवा मचिंद्र्या असच म्हणायचा.

img src="..." alt=" शालेय मित्र">
शाळेत असताना आम्ही सुट्टीमध्ये पावसाळ्यात तांबडी माती आणायचो. आणि बांगरांच्या दगडावर मातीचे बैल, गणपती तयार करायचो. हे करत असताना पावसाच्या किती सरी आमच्या अंगावर कोसळ्याच्या हे आम्हाला कळायचे देखील नाही. एवढे गुंग होऊन आम्ही हे करत असू.
गणपती तयार केल्यावर लगेच आम्ही आमच्या घराच्या ओटी वरील कोनाड्यात बसवायचो आणि आरती करून लगेच ओढ्यावर बुडवायला न्यायचो. आमच्याबरोबर गावातील चार-पाच पोरं असायची. गणपती बुडवल्यावर येथेच्छ पोहोत बसायचो.
दर शनिवार व रविवार पावसाळ्यात हा आमचा कार्यक्रम ठरलेला असायचा. आंघोळ करून झाल्यावर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम असायचा. यासाठी मी घरून गूळ आणायचो. तर आमच्यापेक्षा लहान असलेला दत्ता आंबवणे हा लोकांच्या वाडग्यातील काकडीचे कळे तोडून आणायचा. गुळ व काकडीच्या कळ्यांचा प्रसाद आम्ही वाटायचो.

पाऊस सुरू झाल्यावर ठिकठिकाणी पडलेल्या आंब्याच्या कोयांना अंकुर फुटायचे. या अंकुरांना चॉकलेटी रंगांची कोवळी पाने फुटायची. आम्ही आंब्याची रोपे मिळेल त्या जागेत लावायचो. दररोज रोप किती मोठे झाले आहे हे पाहायचो.

काही कोया फोडून त्यातील अवरणामधून  पांढऱ्या रंगाचा भाग काढून त्याला एका बाजूने तिरप्या पद्धतीने  दगडावर घासायचो. त्यानंतर त्या कोईचा भाग फुंकल्यावर त्यामधून अतिशय सुंदर असा मधुर आवाज यायचा. हे लहानपणी आमचे अतिशय सुंदर खेळणे असायचे.

शाळेतील फुटक्या पाटीच्या कपच्या पासून तो रुपयाच्या नाण्याच्या आकाराची भिंगरी बनवायचा. त्याला दोन भोके पाडून दोरा ओवायचा व त्याची गाठ मारायची. दोन्ही बाजूला दोरा बोटात अडकवून मध्ये भिंगरी ठेवून दोऱ्याला पिळ भरायचा आणि त्यानंतर अगदी पाहिजे तितका वेळ भिंगरी फिरत राहायची. हा आमचा लहानपणीचा आवडता खेळ होता.

तसाच मेसकाठीच्या मोठया कंगव्या एवढ्या पात्याला दोरा बांधून आम्ही गोल गोल फिरवत राहायचो. त्यामधून जीप गाडीचा आवाज निघायचा. मोठी माणसे कुणाची गाडी आली म्हणून बाहेर यायची. व आमचा खेळ पाहून परत आत मध्ये निघून जायची.

नांदुरकीच्या पानांची पिपाणी करून ती वाजवणे हा सुद्धा आमचा असाच एक आवडता खेळ होता. या पिपाणी मधून अतिशय सुंदर असा स्वर निघत असे. मच्छिंद्रने मला दोन्ही हाताची दोन, दोन किंवा चार, चार बोटे एकदम तोंडात घालून शिट्टी वाजवायला शिकवली होती. कोण जास्त जोरात शिट्टी वाजवतो म्हणून स्पर्धा सुरू व्हायची. परंतु शिट्टयांचा गोंगाट ऐकून मोठी माणसे आम्हाला शिव्या देऊन हाकलून लावायची.

पावसाळा सुरू झाल्यावर डोंगरांच्या कुरुळात जमिनीवर अतिशय छोटी छोटी गुलाबी फुले यायची. मच्छिंद्र आणि मीही त्या ठिकाणी खाणायचो. त्या फुलांच्या मुळांना छोटी छोटी कंदमुळे असायची. आपल्याकडे जसे भाजीत किंवा चहात घालायचे "आले" असते. अगदी त्या सारखेच हे कंद असतात. या कंदांना "पंधी" असे म्हणतात.

हे कंद आम्ही घरी आणायचो आणि तव्यात पाणी आणि मीठ घालून शिजवायचो. याची चव अगदी अप्रतिम असायची.

त्यानंतर पाऊस संपल्यानंतर भाद्रपद आणि आश्विन महिन्यात रानातील गवतात अनेक छोट्या छोट्या वेलींना अगदी छोटे छोटे पिवळे फुले यायची. या फुलांच्या खाली अनेक छोटी छोटी हिरवीगार आणि पांढरट "मेकी" लागायची. ही मेकी अगदी बोटाच्या अंगठ्या एवढी असायची.

मेकीचा वरचे आवरण सोलल्यावर त्यामधून साखरेसारखा पांढरट भाग असायचा. ही मेकी खाताना आंबट,तुरट आणि एक वेगळीच चव लागायची. आम्ही खूप मेकी घरी आणायचो.

रानातील हाळंदे, चैताची भाजी, चैताचा बार, कर्टुली, आळिंब, पंधी, कुर्डूची भाजी, चिलुची भाजी, कवदरीचा कांदा, सोंडगे अशा अनेक रानभाज्या व खेकडे आणायचो.   

मला आठवतंय मच्छिंद्रचा एक उद्योग चालू असायचा. गावातील कुणा बाईबापडीचा घागर, हंडा किंवा कळशी विहिरीत पडली की तिचं पोर मच्छिंद्रच्या घरी येणारच. त्याच्या आईला कळू नये म्हणून चाचरत विचारणार‚ 

मच्यादादा हाऽये? 

त्याची आई भात चाळता चाळताच म्हणायची न्हाई मेल्या‚ 

मच्छिंद्र रानात गेलाय. चाळणीतील भात घसाघसा घुसळून टाकीतच मच्छिंद्रची आई ठरीव उत्तर देणार. आणि नेमका मच्छिंद्रच लटपट लटपट तुझं चालणं गं मोठं नखऱ्याचं या आपल्या आवडत्या गाण्याचे सूर कातऱ्या शीळेत घोळवीत टपकणार. 

मच्छिंद्रला समोर बघताच मग त्याच्या आईच्या हातातील चाळण आपोआपच गळून स्टेशन घ्यायची. चाळण थांबवून ती म्हणायची‚ 

तू हाईस व्हय रं मचिंदर? मला वाटलं रानात ग्येलास नि. 

चाळून चाळून डोक्यावरचा पुढं ओघाळलेला पदर ती हाताच्या झटक्यानं मागं सारायची. कपाळाला हात लावून ती मायेच्या पोटी मच्छिंद्रला कळवळून सांगायची‚ 

बाळा‚ नको की रं जाऊ. सापा-किरडाचं‚ इच्चू-मुंगीचं कशाला उतरतूस हिरीत? इस्तू पडू दे ह्येंच्या हांड्यावर!’’

आता मच्छिंद्र घराबाहेर पडणार या नापसंतीनं ती आपल्या गोंदल्या हातांनी चाळणीला नुस्ती गरागर घुसळून टाकायची. 

मच्छिंद्रला समोर बघताच त्याला बोलवायला आलेलं पोर हरकून जायचं. आपला गनिमी कावा विसरून ते पटकन बोलून जायचं‚ 

मच्यादादा आईनं बोलवलंय. हंडा काढायचा हाय.

आलो हां क्रिष्णा‚ कोणत्या हिरीत पडलाय रं? 

मच्छिंद्र सहज बोलून जायचा. त्याच्या आईच्या हातातील सरसरत फिरणारी चाळण गपदिशी थांबायची. कपाळाला हात लावून ती मायेच्या पोटी मच्छिंद्रला कळवळून सांगायची‚ 

बाळा‚ नको की रं जाऊ. सापा-किरडाचं‚ इच्चू-मुंगीचं कशाला उतरतूस हिरीत? इस्तू पडू दे ह्येंच्या हंड्यावं.

पॅरागॉन स्लिपरचं बटन पायाभोवती कुट्दिशी दाबून मच्छिंद्र आलेल्या पोराच्या खांद्यावर हात टाकून घराबाहेर पडायचा.  

विहिरीवर येताच मच्छिंद्र आपले कपडे उतरवून‚ ठाकठीक घड्या घालून एका साफ दगडावर फुंकर मारून त्या घड्या ठेवायचा. लंगोट कसलेल्या मच्छिंद्रला बघताना मला गोपीनाथ तळवलकरांच्या भिल्लाचा पोर या कवितेतील‚

तेजदार नागावानी दिसे कोवळा जीव  ही ओळ हटकून आठवायची. 

लंगोट कसलेला मच्छिंद्र मान वर करून एकदा सूर्याला नमस्कार करायचा. एखाद्या आखाड्यात आपली पहिल्या नंबरची कुस्ती ठरलेय अशा थाटात दोन-तीन दणकेबाज शड्डू ठोकायचा. आणि दोराला धरून तीस-चाळीस हात खोलावा असलेल्या विहिरात उतरू लागायचा.  

चिकटलेल्या पालीसारखा तो दोराला चिकटायचा. अंधारलेल्या‚ विहिरीत मच्छिंद्र लहान होत होत जायचा. दोर लडलड हबकत राहायचा. विहिरीच्या गाभ्यातून आम्हाला मच्छिंद्रची कातरी शीळ एकू यायची. लटपट लटपट तुझं चालणं ग, मोठं नखर्‍याचं.

मच्छिंद्रच्या चाहुलीनं विहिरीच्या कोनाड्यात आसरा धरलेले‚ पेंगत्या डोळ्यांचे पारवे दचकायचे. फडफडाट करीत विहिरीबाहेर उसळून यायचे. 

ते विहिरीच्या तोंडाशी आले की कठड्याभोवती‚ मच्छिंद्रचा पराक्रम बघायला दाटलेली मुलं दचकून मागं हटायची. तो पाण्यात उतरायचा. गाळात हात घालून चाचपून चाचपून हंडा शोधून काढायचा. पाण्यावर साचलेल्या काटक्या‚ पानांचा गाळ हंड्यात भरायचा. खालून एकसारखे दोरीला हबके देऊन इशारा करायचा. हंडा वर घेतला जायचा. पुन्हा दोर आत सोडला जायचा. त्याला धरून घामाघूम झालेला मच्छिंद्र विहिरीबाहेर यायचा.

एकदा मच्छिंद्रने या घागर-उद्धारात माझी चांगलीच पाचावर धारण बसविली होती. तो नेहमीसारखा विहिरीच्या तळात उतरला होता. 

मी घागर खेचून घेण्यासाठी काठावर उभा होतो. दोरीला हबके देऊन त्यानं इशारा केला. मी सरासर दोर खेचू लागलो. घागर तोंडाशी आली. ती बाहेर घ्यावी म्हणून मी हात घातला. 

एक फडफडता पारवा घागरीतून वर उसळला आणि हेलपटत उडून गेला. दचकून मागं हटत मी रहाटाचा हात सोडून दिला. बाणासारखी‚ जडशीळ घागर विहिरीच्या आत सूर मारत चालली. धडाधड करीत रहाटाच्या हातदांड्या गरगर उलट्या फिरू लागल्या. माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. ही घागर आत उतरलेल्या मच्छिंद्र च्या टाळक्यात कोसळणार. मी केविलवाणा कसातरीच ओरडलो. 

मच्या घागर सुटली रेऽ 

विहिरीच्या तळात पाण्यावर आदळलेल्या घागरीचा ‘धप्प्’ असा आवाज आला. पाठोपाठ मच्छिंद्रची मिश्कील कातरी शीळ आली लटपट लटपट तुझं चालणं गं, 

तो कसला महावस्ताद प्राणी होता. घागर सोडतानाच तो तळात एका सुरक्षित कोपऱ्यात जाऊन बसला होता. आणखी एक परवा विहिरीतून वर उधळत गेला. त्याने घागरीत दोन पारवे कोंबले होते. एक उडून गेला होता - पण दुसरा गरगरत परत गेलेल्या घागरीतून तसाच खाली गेला होता.

मच्छिंद्र आणि मी एकाच वर्गातून असायचो. परंतु तिसरी दोन वेळा नापास झाल्यामुळे तो मागे पडला. व मी पुढे गेलो. नंतर पुन्हा चौथी नापास झाल्यामुळे तो अजूनच मागे पडला. त्यामुळे हळूहळू आमची मैत्री कमी कमी होत गेली.

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत हिरडे वेचून आलेल्या पैशात कपडे वह्या पुस्तके आणि छत्री या पुरते पैसे मच्छिंद्र कमवायचा. मच्छिंद्रच काय पण सर्व मुले तेव्हा शाळेचा सर्व खर्च स्वतःच भागवायची. 

शाळा सुरू होण्याच्या चार दिवस अगोदर तळेघरच्या गुरुवारच्या बाजारातून कपडे छत्री आणि वह्या यांची खरेदी व्हायची. त्याने वह्या आणल्या की तो मला बोलवायला यायचा. मी त्याच्या वह्यांवर त्याचे नाव, शाळा इयत्ता विषय पहिल्या पानावर टाकायचो. पुस्तकांना कव्हर घालून द्यायचो.

मच्छिंद्र हा कसातरी नववीपर्यंत शाळा शिकला. त्यानंतर तो घरातील व शेतातील कामे करू लागला.

भागातील बरेच लोक भात शेतीची बेणनी झाल्यानंतर सातगाव पठार भागात बटाटे काढण्यासाठी जात असत. मच्छिंद्र देखील त्यांच्याबरोबर बटाटे काढण्यासाठी सातगाव पठारला गेला.

त्यानंतर त्याला तेथील एका माणसाने भोसरी येथील फुलेनगर या ठिकाणी काम करण्यासाठी नेले. व तेथेच कुठेतरी तो एका खाजगी हॉटेलमध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करू लागला.

हॉटेलच्या मालकाकडून कर्ज काढून त्याने त्याच्या बहिणीचे लग्न केले. त्यानंतर त्याचे स्वतःचे लग्न केले. अतिशय तुटपुंजा पगार व मालकाचे कर्ज फेडण्यामुळे त्याच्या हातात अतिशय कमी पैसे येत. त्यामुळे त्याला घरी आईला जास्त मदत करता येणे अशक्य झाले.

यातूनच तो घरी आल्यावर त्याची आई आणि त्याच्यामध्ये भांडणे होऊ लागली. त्याची आई म्हणायची. पूर्वी तू आम्हाला पैसे द्यायचा, आता पैसे देत नाही. तू तुझ्या सासुरवाडीला पैसे देत असला पाहिजे. त्याच्या आईला सर्व लोकांनी सांगूनही तिला ते पटत नसे. घरी आल्यावर सतत भांडणे होत.

सततच्या भांडणांना कंटाळून एके दिवशी त्याने अतिशय दुर्दैवी निर्णय घेतला आणि आयुष्य संपवले.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)






सच्चा मित्र काशिनाथ

सच्चा मित्र काशिनाथ व्यक्तिमत्व

आमच्या मंदोशी गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल.

img src="..." alt=" काशिनाथ जढर">
काशिनाथ हे आमच्या सबंध गावातील आदर्शवत व्यक्तीमत्व होते. गावात पुर्वी काशिनाथच्या शब्दाला खुप मान होता.व त्याच्या विषयी लोकांना आदर होता.

गावातील एक प्रमुख व्यक्ती काशिनाथ 

गावात कोणाचेही, कसलेही काम असो. लोक सल्ला घेण्यासाठीअथवा मदतीसाठी काशिनाथकडे धाव घेत. काशिनाथही त्यांना कधीच नाही म्हणत नसे.

गावात रात्री कोणत्यांना कोणत्या कारणास्तव मिटींग असे. एकेकजण बैठकीला येऊ लागे. परंतू अद्याप काशिनाथ आलेला नसे. लोक व जेष्ठ मंडळी काशिनाथची वाट पहात. प्रसंगी जेष्ठ मंडळी त्याला मिटिंगला येण्यासाठी एखाद्याला बोलवायला पिटाळत.

काशिनाथला मिटिंगला बोलावण्यासाठी मी कित्येक वेळा त्याच्या घरी गेलेलो आहे. त्यावेळी मला मोठे झाल्यावर गावात काशिनाथसारखे व्यक्तीमत्व व्हावे असे वाटत असे.

काशिनाथचा सल्ला 

त्यावेळी मी दहावीत असेल. तेव्हा मी लहान मुलांमध्ये व माझ्या समकक्ष मुलांमध्ये खेळत व बागडत असे. एके दिवशी काशिनाथ मला येऊन म्हणाला 

रामभाऊ तु आता मोठा झालाय. मोठ्या माणसांमध्ये येऊन बसत जा. लहान पोरासोरांत खेळणे कमी कर. 

त्याचा हा सल्ला मी तात्काळ आमलात आणला.

काशिनाथने केलेली मदत 

मी जेव्हा आकरावीला राजगुरूनगरला प्रवेश घेतला तेव्हा मला काँलेजला जाण्यासाठी व्ववस्थीत असे कपडे नव्हते. हे जेव्हा काशिनाथच्या लक्षात आले तेव्हा तात्काळ त्याने त्याचा नविन ड्रेस मला देऊन टाकला.

काशिनाथचे सामाजिक कार्य 

गावात दुध डेअरी व्हावी, अशी तेव्हा अनेकांची इच्छा होती. त्यासाठी सगळ्यात मोठे योगदान काशिनाथचे होते. 

त्यावेळी काशिनाथच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण ग्रामस्थ धुओली येथे तत्कालीन सोसायटी मँनेजर श्री.चिंतामण जठार यांचे घरी गेलो. तेथे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रत्येक सभासद ११ रूपये या प्रमाणे शेअर्स जमा केले.

अनेकांचे शेअर्स काशिनाथने स्वतः भरले, व श्री.काळभैरवनाथ दुध उत्पादक संस्थेची मुहार्तमेढ तेथेच रोवली गेली. 

सर्व ग्रामस्थांची इच्छा अशी होती की या डेअरीचे चेअरमनपद काशिनाथने स्विकारावे...परंतू काशिनाथने या पदासाठी नम्रपणे नकार दिला. पुढे महिनाभरातच श्री.काळभैरवनाथ डेअरी सुरू झाली. याचे संपुर्ण श्रेय काशिनाथ कडेच जाते.

काशिनाथ मुळे गावगाड्याच्या मुख्य प्रवाहात मी ओढला गेलो. आणि सामाजिक, राजकीय कार्याचा भाग बनलो. काशिनाथचा प्रत्येक सल्ला हा अभ्यासपुर्वक असे व तो भविष्यात तंतोतंत खरा ठरायचा.

गावात कोणाचे लग्न जमवायचे असो, लग्नाचे नियोजन असो, गावातील भांडण तंटा मिटवायचा असो, रूसवा फुगवा काढायचा असो, कोणाला मोठ्या दवाखान्यात न्यायचे असो,किंवा कोणतेही काम असो, काशिनाथ स्वतःच्या कामावर पाणी सोडून ही लोकांची कामे आवडीने करायचा. अद्यापही ही त्याची परंपरा चालू आहे.

शिकारीचे दिवस 

पुर्वी लोक सशाची, डुकरांची शिकार करायचे. डुकराची पारध कोणत्या रानात करायची. वाघुरी (जाळे) कोठे लावायच्या. पारध कोठून काढायची याचे संपुर्ण नियोजन काशिनाथ लिलया करायचा. 

त्याचप्रमाणे उन्हाळ्यात सकाळी लवकर रानाजवळ असलेल्या शेतात जाऊन काशिनाथ तेथे ससा येत असल्याचा माग काढे. सशाच्या लहान मोठ्या लेंड्यावरून ससा किती मोठा आहे याचा अचुक अंदाज काढे. 

त्याप्रमाणे संध्याकाळी दिवस बुडाल्यावर आम्ही त्याच्या बरोबर वाघुरी, करंड्या व घोंगड्या घेऊन रानातली वाट चालू लागायचो. वाघुरी कोठे मांडायच्या याचे संपुर्ण नियोजन काशिनाथ कडे असे. वाघुरी मांडून झाल्यावर प्रत्येकजण लहान झुडपाच्या जवळ घोंगडी पांघरूण बसायचा.

ससा आल्यावर वाघुरीच्या दिशेने ससा कसा पळवायचा व वाघुरीत पाडायचा हे काशिनाथ अचुक अंदाज व तितकीच चपळता दाखवत लिलया करायाचा.

मध गोळा करणे व शिकार

पुर्वी मी काशिनाथ बरोबर मोहरी (कड्या कपारीत असलेले मधमाशांचे पोळे) काढण्यासाठी पहाटेच जायचो. पहाटे रानात जाताना एक वेगळाच गारवा व रानातील झाडांचा फुलांचा सुंगध दरवळत रहायचा. व मन मन प्रसन्न होऊन प्रफुल्लीत व्हायचे.

कोवळ्या उन्हाच्या तिरपेच्या सहाय्याने मधमाशी कोठे जाते हे तो अचुक ओळखायचा. व बरोबर आम्ही तेथे पोहचायचो.

एकदा आम्ही काशिनाथच्या मार्गदर्शना खाली व त्याच्या नियोजनानुसार झाडावरील आग्या मोहळ अगदी सुरक्षित पणे काढले होते.

एकदा असेच संध्याकाळी मी, काशिनाथ व धोंडू विष्णू तळपे सशाच्या शिकारीला गेलो. वाघुरी लावून सशाची वाट पाहत बसलो. रात्र असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. 

अचानक वाघुरीच्या करंड्या पडल्याचा आवाज झाला. वाघुरीत ससा पडला म्हणून काशिनाथ व धोंडू वाघुरीच्या दिशेने धावले. वाघुरीतला ससा काशिनाथ पकडणार तेवढ्यात वाघुरीत पडलेले रान मांजर जोरात त्याच्या अंगावर फिसकारले. तसाच काशिनाथ मागे सरला. 

अरे! रामभाऊ बॅटरी आण. वाघुरीत दुसरेच काहीतरी आहे. 

मी बॅटरी घेऊन गेलो तर वाघुरीत रानमांजर होते. त्याला वाघरीतून काढायचे कसे हा प्रश्न होता. तेवढ्यात धोंडू एक मोठा दगड घेऊन आला. आणि मांजराच्या डोक्यात टाकला. मांजर जागच्या जागी गप्पगार झाले. आणि हेच मांजर आम्ही कंबळ वाघ (कातकरी) यांना दिले.

भाताचा चोरटा व्यापार 

लेव्ही बसलेय याचा फायदा घेऊन भाताची चोरटी ने-आण करणाऱ्यांची काशिनाथने एकदा अशीच पाचावर धारण बसविली.

होमगार्डचे खाकी कपडे घालून मी, धोंडू तळपे, अशोक सुतार, मारुती तळपे आणि काशिनाथ जढर नेहमीसारखे शिकारीला गेलो होतो. 

सावज हेरण्यासाठी काशिनाथ हातातील पॉवरबाज बॅटरी रानात चारीकडं फेकीत होता. 

त्या प्रकाशझोतात पोत्यांनी शिगोशिग भरलेली एक बैलगाडी आली. चोरटा भात व्यापार करणाऱ्या त्या गाडीतील व्यापाऱ्यांना वाटलं आपल्यावर ही पोलिसांची धाड आली. 

त्यांनी बैलांची मुस्कटं वळती केली आणि मागचा पुढचा विचार न करता दात ओठ खात बैल पिटाळायला सुरुवात केली.

क्षणात एक भयानक आवाज त्या शांत रानात उठला. दहा-वीस हात खोल असलेल्या एका दरीत बैल गाडीसह कोसळले होते. आम्ही दरडीत उतरून अगोदर जुपन्या ढिल्या करून बैलांना मोकळं केलं. 

सगळ्यांच्या मदतीनं गाडी दरडीबाहेर काढली. इकडं तिकडं विखुरलेली भाताची पोती पुन्हा गाडीत चढविली. बैलांना पाणी पाजून हुशार केलं. 

आम्हा शिकाऱ्यांचा तांडा घेऊन काशिनाथ गाडीत चढला. कासरे आपल्या हातात धरीत त्यानं ती भरलेली बैलगाडी सरळ गावात आणली.

बैल कुणाचे आहेत हे आम्ही ओळखलं होतं. त्या चोरट्याच्या दारात सरळ गाडी लावून काशिनाथने ललकारी दिली‚ 

अबे ओ बब्या बाहेर ये ! शिकार आव्या है रे! 

बबनराव बाहेर आला आणि आपली बैलं आणि गाडी बघताना त्याचा चेहरा खेटरानं मालिश केल्यासारखा झाला.

काशिनाथ बरोबरचे दिवस 

आयुष्यात मी काशिनाथ बरोबर खुप फिरलो कधी पायी तर कधी मोटारसायकवर तर कधी कारने.

एकदा आम्ही हिरडे गोळा करण्यासाठी पायीपायी पाभे, भोमाळे, खरपुड मार्गे तांबडेवाडीला गेलो. तेथे आम्ही पोहचलो २.३० वा. नंतर आम्हाला खुप भुक लागली. आता काय करायचे, असा विचार आला. आम्ही डोंगरावर होतो.

काशिनाथ म्हणाला काळजी करू नको. एक काम करू. 

खाली गाव आहे. तेथे लग्न आहे. कारण स्पिकरवरून लग्नाच्या गाण्यांचा, व आहेर पुकारल्याचा आवाज योतोय.

आपण खाली गावात जाऊ.

मी म्हटले अरे! तो अनोळखी गाव आपली तेथे ओळख ना पाळख कशाला तेथे जायचे त्या पेक्षा आपण घरी जाऊया.

काशिनाथ म्हणाला. 

नाही आपण जाऊच. त्याच्या पुढे काय बोलनार ? गेलो.

मला वाटते ते औंढे गाव असावे. तेथे गेलो तर सर्व लोक अनोळखी. कुणीच आमच्या ओळखीचे दिसेना. शिवाय लग्नाला अजुन खुप वेळ होता. तेव्हा लग्न झाल्यावर जेवण असायचे. 

आता काय करायचे. असा प्रश्न निर्माण झाला. इतक्यात आम्हाला आमच्याच गावातील श्री.शांताराम मोहन भेटले. ते आम्हाला पाहून अश्चर्यचकित झाले. ते त्यांच्या बहिनीच्या मुलीच्या लग्नाला आले होते. त्यांना सर्व हकिकत सांगीतल्यावर त्यांनी आम्हाला लगीनघरात नेऊन जेवायला वाढले. आम्ही भात आमटी व शाकभाजी व बुंदीवर ताव मारला. 

जेवण केल्यावर मग मात्र आम्ही परत घरच्या ओढीने चालू लागलो.

आम्ही भूत पाहिले  

काशिनाथ जढर एके दिवशी माझ्या कडे

आला व मला म्हणाला. रामभाऊ आज रात्री माझ्या बरोबर झोपायला रानात आमच्या गोठ्यावर यावे लागेल मी विचारले का रे ? 

तो म्हणाला अरे दादा व वहिनी लग्नाला गेले आहेत. ते येनार नाहीत व गोठ्यावर गायी बैल व म्हशी आहेत. तेव्हा जावं लागेल. मी त्याला होकार दिला.

रात्री आम्ही दोघे रानातील गोठ्यावर झोपायला गेलो. रात्री तेथे शांत झोप लागली. सकाळी अगदी पहाटेच जाग आली. नंतर झोप काही येईना.

चला बाहेर लगवीला जाऊ असा विचार करून काशिनाथला उठवले. आम्ही बाहेर आलो. नुकतेच उजाडत होते. गार वारा सुटला होता.

आमच्या गोठ्याच्या पुढे एक मोठा कडयासारखा डोंगर होता. तेथुन गावात येण्यासाठी पाउलवाट होती. ती वाट वळणावळणाची होती.आम्ही तेथेच लगवीला उभे होतो. 

मी अचानक वर समोर असलेल्या कड्याकडे पाहिले. तेथील पाउलवाटेने एक नउवारी लुगडे नेसलेली व डोक्यावर गाठोडे असलेली बाई चालली होती. मी काशिनाथला दाखविले.

तो म्हणाला अरे! ही तर चिंधाबाई आहे. आमच्या गावातील एक बाई जवळच असलेल्या नायफड या गावात दिली होती.आम्हाला वाटले तिच आहे. 

काशिनाथ म्हणाला 

अरे! ही इतक्या सकाळी कशाला आली असेल ? 

ही उठली असेल तरी कधी ? आणि निघाली असेल कधी ? 

कारण नायफड ते आमचे मंदोशी गाव सुमारे ५ कि.मी. असेल. 

शिवाय रानातून व डोंगरातून येणारी वाट.असे आम्ही बोलत होतो. चिंधाबाई वळणवळणाने असलेल्या पाउलवाटेने चालत होती. ती ज्या वळणावर आली, तेथे मोठे झाड होते. तेथे जवळच मोठा दगड होता.

आम्ही पहात असताना अचानक त्या झाडाचा कडकड आवाज झाला आणि झाड उन्मळून त्या बाईच्या अंगावर पडले. त्या बरोबर ते झाड व तो मोठा दगड खाली घरंगळत आला. एकच मोठा आवाज झाला. चिंधाबाईचे काय झाले असेल या विचारांनी आम्ही सुन्न झालो.

नंतर लगेचच गावात जाउन ही खबर लोकांना दिली. सर्व जण घटना घडली तेथे आलो. तर त्या ठिकाणी झाड, चिंधाबाई व दगड या पैकी काहीही दिसले नाही. लोकांनी आम्हांला वेडयात काढले. तुम्हाला भास झाला असेल असे म्हणून निघुन गेले.

परंतु एक कळले नाही. एकाच वेळी दोघांना कसा भास झाला. नव्हे ते भुतच होते याची पक्की खात्री झाली.

👉🏻 हेही वाचा अशोक सुतार व्यक्तिचित्र

विशेष म्हणजे चिंधाबाई अजुनही हयात आहे.

काशिनाथ कडे असलेले गुण 

काशिनाथच्या कामाचे मुल्यमापन करायचे झाल्यास योग्य नियोजन, अचुक अंदाज, योग्य मार्गदर्शन, सतत दुस-याला मदत करण्याची भावना,कार्यतत्परता,अजातशत्रू इत्यादी गुण त्याच्याकडे होते व आजही आहेत.

व्यसनाधीन झालेला काशिनाथ 

परंतु येवढा गुणसंपन्न माणुस असुनही काशिनाथ नियतीच्या फेऱ्यात अडकला. मद्याच्या नशेत हरवून बसला. कोणत्याही प्रकारजी त्याच्यावर जबाबदारी नसताना, कोणताही दबाव, कर्ज, नसताना काशिनाथ नशेच्या आहारी गेलाय. हा नियतीचाच भोग म्हणावा लागेल.

खुपदा सांगुनही त्याच्यावर काहीच फरक पडत नाही. गावात अनेक गट-तट झाले परंतु काशिनाथ बद्दल सर्वांनाच आस्था व अपुलकी राहीली. कोणच त्याला वाईट बोलू शकले नाही. मग तो कोणत्याही गटात असो. 

गावाला दिशा देणारे लोक मोठ्या पदावरून नव्हे, तर मोठ्या मनातून घडतात—हे काशिनाथच्या आयुष्याने दाखवून दिले. माणसाने केलेली निस्वार्थ सेवा, दिलेला सल्ला आणि लोकांसाठी वाहिलेला वेळ कधीच वाया जात नाही; तो अनेकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करतो.

आज व्यसनाच्या विळख्यात अडकला असला तरी त्याच्यातील चांगुलपणा, नेतृत्व आणि समाजासाठी झटणारी वृत्ती अजूनही जिवंत आहे. योग्य वेळी घेतलेला एक ठाम निर्णय आयुष्याला पुन्हा उजाळा देऊ शकतो.

काशिनाथ पुन्हा उभा राहील, पूर्वीसारखा समाजकार्य करील आणि गावासाठी प्रेरणास्थान बनेल हीच सर्वांची मनापासून इच्छा. कारण खरा माणूस कधी हरवत नाही, तो फक्त पुन्हा स्वतःला शोधण्याची वाट पाहत असतो.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)


गावाकडील श्रद्धा-अंधश्रद्धा, वारे–मावलया आणि जुन्या जेवणावळी : एक अनुभवकथा

ग्रामीण संस्कृतीतील वारे, मावलया आणि जुन्या जेवणावळींचे अनुभव

गावाकडे पूर्वी अनेक श्रद्धा अंधश्रद्धा असत. अनेक गावांमध्ये काही ठराविक लोकांच्या अंगात यायचे. अनेक आजारी पाजारी लोक त्यांच्याकडे अंगारे धुपारे करण्यासाठी जात असत.

त्यावेळेस अशा अंगात वारे येणाऱ्या लोकांची फारच चलती असायची. त्यांना गावात खूपच मान सन्मान असायचा. त्यांची शेतीची कामे बिनबोभाट होत असत.

जशी त्यावेळेस त्यांची चलती होती तशीच आमची ही खाण्याची पिण्याची चंगळ असायची.

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि गावातील वारे–अंगारे

अंगात वारे आणणारे लोक हमखास एखाद्या वरून बोकड, कोंबडा किंवा मेंढा यांचा उतारा द्यायला लावायचे. तसेच सटवाईला, देवाला, वीराला किंवा शेतातील थडग्याला कोंबडा देण्याची रीत असायची. 

लग्नकार्याला जावळ, देवकार्य यासाठी खास बोकडाची व्यवस्था केलेली असायची. शिवाय वारे आणणारे लोक सोबतीला असायचेच.

त्यामुळे ग्रामीण भागात अशा जेवणावळीसाठी मी आणि माझा चुलत भाऊ मारुती हमखास जात असू. त्यावरून माझी आई आणि आमची चुलती तुळशीआई आम्हाला खूपच शिव्या देत असायच्या. परंतु आम्ही काही त्यांचे ऐकायचो नाही.

अशा जेवणावळीसाठी फारच थोडे लोक असत. त्यामुळे मटणाची कमतरता नसे. थोडक्यात खाण्यापिण्याची चांगली चंगळ होती.

मोरोशीतील जेवणावळीचा प्रसंग

एकदा असेच आम्ही खास आमंत्रणा वरून मोरोशी येथे जेवायला गेलो होतो. शक्यतो हा कार्यक्रम रात्री होत असायचा. जेवण हे रानात असायचे. 

आम्ही तिथे पोचलो तेव्हा भात शिजून झाला होता. मटन तीन दगड मांडलेल्या चुलीवर डेंगी मध्ये शिजत होते. थोड्याच वेळात पंगती बसणार होत्या. 

दारुड्यामुळे कलंडलेली डेंगी

आणि अचानक एक जास्त दारू पिलेला माणूस तेथे आला आणि डेंगी मधील मटन शिजले आहे की नाही हे पाहण्यासाठी डेंगी मधील असलेला कलथा पकडून जोरा जोराने हलवू लागला. तेवढ्यात खालचा दगड सटकला आणि डेंग एका बाजूला कलंडली. 

डेंगी मधला बराचसा रस्सा खाली सांडला. कसेतरी आम्ही दोन-चार जणांनी डेंग सरळ केली. एक जणांचा राग इतका अनावर झाला की त्याने फडाफड दारुड्याच्या मुस्कटात लगावल्या.

आता ह्या समाजासाठी काय करायचे हा मोठा प्रश्न उभा राहिला. सर्व लोक विचार चक्रात बुडाले. 

मारुतीची हुशारी आणि गावकऱ्यांचे कौतुक

परंतु आमचा भाऊ मारुतीचा अनुभव दांडगा होता. 

तो म्हणाला. काही काळजी करू नका आपण बरोबर करू.

तात्काळ दुसरी एक तीन दगडाची चूल तयार केली. दोन मोठे पातेली भरून पाणी गरम केले. आणि परत एकदा मसाला कांदा, मिरची पावडर यांची फोडणी देऊन डेंगीतले मटन त्यात टाकले. आणि एक उकळी आल्यानंतर हे गरम पाणी ओतले.

त्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवलो. मोरोशी गावच्या लोकांनी आमच्या मारुतीची खूपच तारीफ केली. 

पाव्हणं तुम्ही होते म्हणून आम्ही जेवलो बर का! असे प्रशस्तीपत्रक दिले.

भूत, बळी आणि गावाच्या हद्दीतील तंटे

एकदा आमच्या गावात एका माणसाच्या शेतामध्ये भूत होते. आणि हे भूत त्या माणसाला खूप त्रास द्यायचे. घरातील माणसे सतत आजारी पडायची. त्यामुळे एका भगताने त्याला सांगितले की हे भूत आपण आपल्या गावच्या हद्दीतून बाहेर पाठवू यासाठी तुम्हाला मेंढ्याचा बळी द्यावा लागेल.

गावातला माणूस या गोष्टीला तयार झाला. दिवस ठरला वार ठरला. दिवस बुडताच आम्ही आमच्या गावच्या हद्दीच्या बाहेर म्हणजे नायफड गावच्या हद्दीत निघालो. 

गावातील दहा पंधरा माणसे होतीच. एकाच्या हातात मेंढा, एका जवळ पाण्याचा हंडा, एका जवळ तांदूळ आणि मसाले, एका जवळ इतर भांडी, आणि विशेष म्हणजे एका जवळ भूत..

फडक्यातील लिंबू–दगडाचे 'भूत'

आता हे भूत कसे होते? तर एका तांबड्या फडक्यात एक तीन धारी लिंबू बांधलेले होते. त्याला पाच-पन्नास टाचण्या खोचलेल्या होत्या.  

त्यासोबत एक छोटा दगड होता. दगडाला भरपूर शेंदूर फासला होता. आणि हे सर्व फडक्यात बांधून एक माणूस काठीला बांधून चालला होता.

आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा पूर्ण अंधार झाला होता. पायाखाली काहीच दिसत नव्हते. रातकिड्यांची किरकिर  नुकतीच चालू झाली होती.

आम्ही तिथे गेल्यावर लगेच भगताच्या अंगात आले. काठीला लाल फडक्यात बांधलेले भूत भगताच्या समोर ठेवले. त्यानंतर त्या लिंबाच्या आणि दगडाच्या समोर मेंढ्याचा बळी दिला.

भागताने भुताला खूप शिवीगाळ केली. आता या हद्दीतून पुन्हा आमच्या हद्दीत यायचे नाही अशी तंबी दिली.

त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू झाला. परंतु आमच्या जवळील पाणी संपले. काही लोक सोबत आणलेले हंडे घेऊन पाणी आणण्यासाठी रानात असलेल्या झुरीला गेले. आणि अंधारात चाचपडत कसेतरी पाणी आणले.

जेवण तयार झाले तेव्हा खूपच उशीर झाला होता. आम्हाला सपाटून भुका लागल्या होत्या. पंधरा-वीस लोक असल्यामुळे खूपच मटन होते त्यामुळे खाण्याची चंगळ होती.

नायफड गाववासीयांचा गोंधळ

जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण घरी आलो. परंतु दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर आमच्या गावात खूपच गोंगाट ऐकायला आला. 

आम्ही तिथे गेल्यावर नायफड गावची बरेच लोक तिथे आले होते. व तुमचे भूत आमच्या हद्दीत का सोडले? याचा विचारत होते.

प्रसंग मोठा बाका उभा राहिला होता. आता काय होईल याचा आम्ही अंदाज बांधत असतानाच भगताने याच्यावर मार्ग काढला. 

आता जे भूत आहे ते अमुक अमुक यांच्या हद्दीत आहे, परंतु आपण असे करू हे भूत आपण फॉरेस्टच्या हद्दीत घालू. 

कारण त्या माणसाच्या हद्दीलगत फॉरेस्टचे रान होते. परंतु आता परत एकदा पहिल्यासारखाच मेंढ्याचा बळी द्यावा लागेल? काय करायचं बोला?

👉🏻 हेही वाचा:- गावाकडील पोहण्याच्या आठवणी

यावरून खर्च कोण करणार यावरून परत वादावादी झाली. पुढचा खर्च कोणी केलं हे माहित नाही परंतु पुढच्या वेळी सुद्धा आम्ही जेवायला तेथे गेलो होतो हे निश्चित. असे प्रसंग गावाकडे नेहमीच घडत असतात.

एकदा असेच आमच्या वरच्या वाडीच्या माणसाला एका भगताने दुसऱ्या गावच्या हद्दीत बोकड कापण्याचा उतारा सांगितला. त्याप्रमाणे तयारी सुद्धा करण्यात आली.

बोकड कापण्याचा प्रसंग 

एके दिवशी या माणसाने दुसऱ्या गावच्या हद्दीत बोकड कापला. व तेथे सर्व कार्यक्रम केल्यावर बोकडाचे मटण परत आमच्या गावच्या हद्दीत आणले व तेथील पेटवून जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला.

परंतु थोड्याच दिवसात हा माणूस आजारी पडला. आणि एके दिवशी इहलोक सोडून परलोकवासी झाला. 

सर्व लोक त्याला दुसऱ्या गावचे हद्दीतून बोकडाचे मटण आणून आपल्या हद्दीत शिजवून खाल्ले त्यामुळे हा प्रकार घडला असे म्हणू लागले.

जेवण बनवताना सतत दारू पिणारे स्वयंपाकी

एकदा असेच आम्ही एका ठिकाणी रानात जेवायला गेलो होतो. जेवण बनवणारे सुरुवातीपासूनच थोडी थोडी अधून मधून दारू पीत होते. जेवायला बरीच लोक आले होते.

एकदाचे जेवण झाल्यावर वाढण्याचे काम सुरू झाले. जेवण बनवणारेच वाढण्याचे काम करत होते. त्यांचे सतत वाढण्याचे काम सुरू होते. ते येवढे दारू पिलेले होते की, त्यांनी सर्व जेवण आलेल्या लोकांना वाढून टाकले. 

त्यांच्या स्वतःसाठी काहीच जेवण शिल्लक राहिले नाही. शेवटी त्यांना उपाशीच घरी यावे लागले व घरी आल्यावर बेसन भात खावा लागला.

मावलया, भगतीनी आणि नवविवाहित स्त्रियांच्या परंपरा

पूर्वी गावात अनेक नवविवाहित स्त्रियांना मावलाया लागायच्या. एखादी नवविवाहित तरुणी अगदी खारकासारखी वाळुन जायची. सतत कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असायची. शक्यतो हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे हा आजार होत असावा.

स्त्रीच्या अंगात वारे आल्यावर एक साथ खूप वेळ घुमत राहायचे. हे वारे कधीही रात्री आपण रात्री दिवसाढवळ्या येत असेल. अगदी स्वयंपाक करताना सुद्धा वारे येई. त्यावेळी घरातल्या माणसांची चांगलीच पळापळ होत असे.

अशावेळी लोक लोक, गावात किंवा पंचक्रोशीत असणाऱ्या भगतीनीकडे जात असत. त्यावेळी अनेक गावामध्ये भगताप्रमाणेच भगतीनी देखील असत. भगतीन त्यांना या बाईला मावलयांनी पछाडले आहे असे सांगत असे.

ओढ्याजवळचा नैवेद्य कार्यक्रम

ओढ्याच्या कडेला असलेल्या उंच दगडाच्या खोबनीत या मावलाया बसलेल्या असायच्या. काही आजारी स्त्रियांच्या अंगात वारे यायचे. हे वारे म्हणजेच मावलया असायच्या. 

माऊलायांना महानैवद्य म्हणून एका मोठ्या टोपलीत किंवा पाटीमध्ये पुरणपोळ्या, कुरडया,पापड्या,भजी,शेव पापडी, सारभात, हे पदार्थ नैवेद्यासाठी असायचे.

फळे, नारळ, फुलांच्या वेण्या, गजरे, नऊवारी हिरवे लुगडे व चोळीचा खण आणि अगरबत्ती व पूजेचे साहित्य घेऊन गावातील स्रिया व इतर पाहुणे रावळे मावलाया असलेल्या ओढ्याच्या ठिकाणी जात असत. 

तेथे नैवेद्य अर्पण करून मग लोकांच्या जेवनावळी सुरू होत. हा कार्यक्रम साधारण दुपारी होत असे. 

ग्रामीण भागातील श्रद्धा-अंधश्रद्धा, वारे-मावलया, उतारे, गावच्या हद्दीचे वाद, रानातल्या जेवणावळी, आणि साध्या लोकांचे निरागस आयुष्य  हे सर्व त्या काळातील जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग होते.

ज्ञानाची कमी, आरोग्यसेवेचा अभाव आणि सामाजिक दडपण यामुळे लोक अनेकदा श्रद्धेच्या नावाखाली विचित्र प्रथा पाळत असत. कधी या प्रथांमुळे घरात शांती राहायची, तर कधी भीती अधिक वाढायची.

आजच्या काळात शिक्षण, आरोग्य आणि विज्ञान यांच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे अंधश्रद्धा कमी झाल्या, पण ग्रामीण संस्कृतीतील आठवणी, परंपरा, रानातले सण-उत्सव, जेवणावळी, गावची एकजूट  हे अजूनही मनाच्या कोपऱ्यात कायम जिवंत आहेत.

पूर्वीच्या चुका समजून घेणे आणि चांगल्या परंपरा जपणे हीच खरी प्रगती आहे. समाज बदलला, पण त्या काळातील अनुभवांची गंमत, लोकांच्या मनाची साधेपणा आणि आपुलकी आजही अविस्मरणीय आहे.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

 



मंदोशी गावचे बारवेकर सुतार

बारवेकर सुतार इतिहास

पूर्वीपासून सुतार हा ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक राहिला आहे. शेती, शेतकरी आणि सुतार हे समीकरणच म्हणावे लागेल.

img src="..." alt=" बारवेकर सुतार ">
आमच्या मंदोशी गावात बारवेकर सुतार खुप पूर्वीपासून म्हणजे सण 1846 पासुन वास्तव्य करून आहेत. आता सध्या त्यांची सहावी पिढी कार्यरत आहे.

सखाराम बारवेकर व बलुतेदारी पद्धत 

सखाराम बारवेकर हे जुन्या लोकांना आठवतात. ते गावच्या शेतकऱ्यांना शेतीची औजारे बनवून देत. त्या बदल्यात त्यांना धान्याच्या स्वरूपात मोबदला मिळे. त्यालाच बलुते असे म्हटले जाई.

पावसाळा सुरु होण्या पूर्वी लोक सुताराकडून नांगर, हळस,जुकाड,रूमने, पेटारी, पाभर, लोड, कुळव अशा अनेक वस्तू सुताराकडून बनवून घेत असत. त्यामुळे मे, आणि जुन महिनात सुतारांच्या दारात लोकांचो सकाळ पासुन ते संध्याकाळ पर्यंत वर्दळ असे.

बलुत्याच्या स्वरूपात मिळणारे धान्य 

वरील दोन महिने सोडले तर सुताराला काही काम नसे. मंदोशी गाव मोठा असल्यामुळे सुताराला खंडी दोन खंडी धान्य जमा होई. एखाद्या मोठ्या तालेवार शेतकऱ्यांइतके ते धान्य असे. 

बरेचसे धान्य सुतार वाड्याच्या बाजारात विकत असे.शिवाय उर्वरित काळात सुतार घरांची बांधकामे करत असे. त्यामुळे सुताराला या कामाच्या मोबदल्यात पैसे मिळत असे. त्यामुळे त्याकाळात सुतार हा समाज साधन कुटुंब म्हणून ओळखला जात असे.

गावच्या मंदिराचे बांधकाम 

आमच्या गावावर बारवेकर सुतार घराचे खुप उपकार आहेत. पूर्वी प्रत्येक गावात ग्रामदेवतेची मंदिरे असत. पण ही मंदिरे अगदी साधी गवती छप्पराची असत. 

सन 1925 साली श्री. कालभैरवनाथ मंदिर दगडी चौथरा, डबरी वंधकाम व वर कौले असे बांधकाम करायचे ग्रामस्थानी ठरवले. 

त्यावेळी सखाराम सुतारांनी हे काम तीन थरांचा दगडी चौथारा त्यावर दगडी बांधकाम असे अतिशय सुंदर बांधकाम केले. 

हे मंदिर मला स्पष्ट आठवते. त्यानंतर हेच मंदिर पुन्हा सन 1983 साली नव्याने बांधण्यात आले. पूर्वीचे मंदिर ओबढघोबड डबरात होते. 

परंतू सखाराम सुतार यांचे नातू दत्तात्रय बारवेकर, सुदाम बारवेकर  व सोपान बारवेकर यांनी संपूर्ण दगडी काम हे घडीव स्वरूपात करण्याचे ठरवले. 

दगड घडवण्याचे काम हे तीन बंधू जवळजवळ दोन वर्ष करीत होते. पूर्वीचा मूळ चौथरा तसाच ठेवून घडीव दगडी बांधकामात पुढे सुसज्ज अशा गच्चीसह अतिशय सुंदर असे बांधकाम त्यांनी 1985 मध्ये पूर्ण केले.

हे बांधकाम पश्चिम भागात पाहण्यासारखे होते. त्यावेळी असे बांधकाम कुठेच नव्हते. ही आमच्या गावच्या सुतारांची अप्रतिम कला होती.

त्यानंतर पुन्हा सन 2014 मध्ये मंदिराचे बांधकाम करण्याचे ठरवले. व त्याप्रमाणे बांधकाम झाले देखील. परंतु आजही सखाराम सुतार यांनी बांधलेला मूळ चौथरा व दत्तात्रेय सुदाम व सोपान बारवेकर यांनी घडीव दगडाच्या बांधलेल्या भिंती तशाच ठेवून वर कळसाचे काम करण्यात आले आहे. 

म्हणजेच मंदिराचा चौथारा व दगडी भिंती आजही ऐतिहासिक वास्तुकलेची साक्ष देतात. ही कला सखाराम सुतार आणि त्यांच्या नातवांची आहे.

सन 2014 मध्ये बांधलेले हे काम सुद्धा गावाने बारवेकर कुटुंबांना देण्याची तयारी दर्शवली होती. त्याप्रमाणे बैठका सुद्धा घेण्यात आल्या. परंतु बारवेकर कुटुंब हे गावापासून खूपच अलिप्त राहिल्याने त्यांना हे काम मिळाले नाही.

विष्णू बारवेकर सुतार

सखाराम सुतार यांचे पुत्र कै.श्री विष्णू बारवेकर हे सुद्धा उत्तम पद्धतीने काम करायचे. विष्णू बारवेकर हा माणूस अतिशय साधा होता. 

मध्यम व सडपातळ  बांधा, साधी राहणी, धोतर,पैरण, गळ्यात उपरणे व टोपी असा त्यांचा वेश होता. त्यांनी सुद्धा गावची खूप सेवा केली.

विष्णू बारवेकर यांना कोऱ्या नोटा जमवण्याचा छंद होता. त्या काळात एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये, वीस रुपये व 100 रुपये अशा त्या नोटा होत्या. 

विष्णू बारवेकर नोटांना कधीही घडी घालत नसत. या  कोऱ्या नोटा कागदी पिशवी अतिशय काळजीपूर्वक ठेवत. कुणाकडे कोरी नोट दिसली की ती हक्काने मागून घेत असत. मी त्यांना अनेक वेळा कोऱ्या नोटा दिलेल्या होत्या.

मी कधीकधी जाताना त्यांना दिसलो की ते माझी फार अस्थेंने माझी विचारपूस करत. मला घराकडे बोलवत. 

पेटीत जपून ठेवलेली कागदी पिशवी माझ्यापुढे आणून ठेवत व सोडून त्यातील कोऱ्या नोटा बाहेर काढत व माझ्याकडे देत असत.

रामजी! एवढ्या नोटा मोज बघू. किती आहेत मला सांग?

मी त्यांच्या सर्व नोटा मोजून त्याचा हिशोब त्यांना सांगत असे. या सर्व कोऱ्या नोटा काळजीपूर्वक पिशवीत ठेवून ती पिशवी पेटीत ठेवून देत असत.

विष्णू बारवेकर हे एकदा पाऊस सुरू झाला की शक्यतो घराच्या बाहेर निघत नसत. चिखलातून तर ते कधीच जात नसत. 

त्यांना पाण्या पावसाची चिखलाची खूप भीती वाटे. कधी कधी मी त्यांना दिसलो की ते मला हमखास बोलवून घेत असत.

ख्याली खुशाली विचारत असत. माझ्याबरोबर भरपूर गप्पा मारत. त्यामुळे त्यांचे आणि माझे संबंध खूप चांगले होते. माझ्यावर तर त्यांचा खूपच विश्वास असायचा.

सुदाम बारवेकर

विष्णू बारवेकर यांचा मुलगा म्हणजे श्री सुदाम बारवेकर. सुदाम बारवेकर हे माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे मित्र होते. सुदाम बारवेकर म्हणजे अतिशय कलाकार माणूस. 

त्यांच्या उमेदीच्या काळात माझ्या वडिलांनी सागाचा पलंग, सागाचे कपाट,टेबल व खुर्ची, सागाच्या पेट्या, लिहिण्याचा स्टूल, बसण्याचा स्टूल असे अनेक साहित्य बनवून घेतले होते.

सुदाम बारवेकर म्हणजे कलाकारित परफेक्ट माणूस. गावची बलुतेदारी करून त्यांनी या कलाक्षेत्रात त्या काळात खूपच सुंदर सुंदर अशी घरे बांधली, लाकडी फर्निचरच्या वस्तू बनवल्या. मंदिराची सुंदर अशी बांधकामे केली.

सुदाम बारवेकर यांचा आवाज हा अतिशय दैवी म्हणावा लागेल. श्रावण महिन्यात त्या काळात लोक श्री.नवनाथ, भक्तीविजय, रामविजय, पांडवप्रताप या अध्ययांचे पारायण करत. हे अध्याय वाचावे तर सुदाम बारवेकर यांनीच. 

सुदाम बारवेकर यांनी एकदा का अध्ययांच्या ओव्या वाचायला सुरुवात केली की एखादे उत्तम सुरावट असलेले  गाणे जसे आपण ऐकतो तसे लोक मन लावून ऐकत असत. 

सुदाम बारवेकर अध्याय वाचायला असतील तर अध्याय ऐकण्यासाठी लोकांची त्या काळात गर्दी होत असे.

सुदाम बारवेकर हे लग्नातील मंगलाष्टका सुद्धा अतिशय भारदस्त आवाजात म्हणत असत. त्यांच्या या मंगलाष्टका ऐकल्यावर अंगातून रोमांच उभे राहत. 

लोक विचारत कुठला माणूस आहे हा? त्यावर बाकीचे काही लोक सांगत, 

मंदोशीचे सुदाम बारवेकर आहेत ते.

त्यावर लोक म्हणत. 

काय सुंदर आवाज आहे या माणसाचा..

सुदाम बारवेकर हे भजनात उत्तम अभंग सुद्धा म्हणायचे. काही काळ त्यांनी व धर्मा बुधाजी तळपे आणि चंद्रकांत मोहन यांनी मंदोशी गावचे नाव खेड आंबेगाव,जुन्नर आणि मावळ या तालुक्यामध्ये अजरामर केले.

सुदाम बारवेकर यांनी भजनामध्ये पंडित भीमसेन जोशी, अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे यांची गायकी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे लोकप्रिय अभंग स्वतः म्हणून ते अभंग मंदोशी गावच्या भजनात लोकप्रिय केले.

सुदाम बारवेकर हे 1995 ते 2000 या काळात शिरगाव मंदोशी या ग्रामपंचायतचे सदस्य देखील होते. 

कैलास सुतार

सुदाम बारवेकर यांचा भाचा श्री.कैलास सुतार हे कुडे खुर्द या गावचे. ते सुद्धा काही काळ मंदोशीला असत. कैलास सुतार हे अतिशय उत्तम कलाकार होते. परंतु त्यांना त्याप्रमाणे साथ न मिळाल्यामुळे त्यांची कला विशेष बहरली  नाही. 

कैलास सुतार यांना आधुनिकतेची खूपच आवड होती. आणि त्याप्रमाणे कला जोपासली पाहिजे अशी त्यांची इच्छा असायची. परंतु आमचे गाव पडले अतिशय दुर्गम असे खेडेगाव. कैलासच्या नवीन कल्पनांचे खेडवळ लोक टिंगल, टवाळी करत.

कैलास सुतार यांनी मंदोशी गावच्या यात्रेत आलेल्या तमाशामध्ये दिवाना या चित्रपटातील गाणी फक्त पुरुष गायकांचा आवाज म्युट करून व स्त्री कलाकाराचा आवाज व म्युझिक तसेच ठेवून स्वतःच्या आवाजात एडिट करून सादर केली. 

त्यामुळे तमाशातील लोक सुद्धा अचंबित झाले. ही किमया फक्त कैलास स्वतःच करू जाणे. 

1990 च्या दशकात अतिशय खेडेगाव असलेल्या दुर्गम भागात राहून सुद्धा एडिटिंगची कल्पना वास्तवात कैलास सुतार कसा करू शकला हे कोडेच होते. ही त्यांच्या बुद्धीची किमयाच म्हणावी लागेल.

लाऊड स्पीकर आणि भक्तीगीते 

सुदाम बारवेकर यांच्याकडे त्या काळात लाऊड स्पीकर होता. सुदाम बारवेकर यांच्या घरावर दोन बाजूला दोन मोठी लाऊड स्पीकरची कर्ण कायमस्वरूपी लावलेली असत. 

रोज सकाळी सहा वाजता स्पीकरवर अभंग वाणी, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले लोकप्रिय अभंग, लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे यांच्या आजारावर गायकीने लोकप्रिय झालेले अभंग त्या काळात आम्ही ऐकत असु. 

संध्याकाळी सहा वाजता बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन स्पीकरवर ऐकायला मिळे. त्यामुळे अनेक लोकांना भक्तिमार्गाची गोडी लागली.

पिठाची व भाताची गिरणी

त्या काळात भाताची पिठाची गिरणी गावात नसल्यामुळे आम्हा सर्व लोकांना धुओली किंवा डेहणे येथे जावे लागे. 

डोक्यावर भाताची किंवा दळणाची ओझी घेऊन आम्ही धुओली किंवा डेहणे जात असू. 

परंतू लवकरच श्री.सुदाम वारवेकर यांनी त्यांच्या घरात भाताची व पिठाची गिरणी सुरू केली. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या मिटली.

👉🏻 हेही वाचा बारा बलुतेदार समग्र माहिती

पुढे श्री सुदाम बारवेकर गावापासून का काय माहित ? परंतु अलिप्त राहू लागले. गावच्या कोणत्याच कार्यक्रमात ते भाग घेत नाहीत.

आजही त्यांच्या आजोबांनी, वडिलांनी त्यांनी आणि त्यांच्या बंधूंनी केलेले कार्य गाव विसरलेला नाही. त्यांची कला आजही कलेच्या माध्यमातून चिरंतन टिकून आहे.

रामदास तळपे ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान 


ट्रॅक्टरपूर्वीचे दिवस: बैल, बैलगाड्या आणि शेतीची खरी ओळख

गावाकडील बैलांचे अनन्य साधारण महत्व

बैल हा पूर्वी शेतकऱ्याचा जीव की प्राण होता. ट्रॅक्टर नसलेल्या काळात शेती, वाहतूक, यात्रापरंपरा, लग्नकार्य सगळेच बैलांवर अवलंबून होते.

आज खेडे गावामध्ये ट्रॅक्टरला अनन्य साधारण महत्त्व आले आहे. शेतीची सर्व कामे आज ट्रॅक्टरने केले जातात. परंतु पूर्वी गावात प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल जोडी असायचीच. काही मोठ्या शेतकऱ्यांकडे तर चार चार बैल जोड्या असायच्या. 

img src="..." alt=" आमचे बैल">
त्यावेळी सर्व लोक शेतीवर अवलंबून असायचे. पुणे मुंबईला असलेले गावचे लोक सुद्धा अवनी, येटाळणी व इतर शेतीच्या कामासाठी मुद्दामहुन सुट्टी काढून गावाला यायचे. व गावच्या भावाला मदतीचा हात द्यायचे.  

त्यावेळी प्रत्येक कुटुंबाकडे बैल जोडी असायची आणि ज्याच्याकडे नसायची त्या कुटुंबाला आपल्याकडे काही नसले तरी चालेल परंतु बैल जोडी असायलाच पाहिजे. हे त्यावेळी प्रत्येकाचे स्वप्न होते. 

पूर्वी गावामध्ये प्रत्येकाकडे आठ-दहा गावठी गाया असायच्या. बैल असायचे. काही काही लोकांकडे तर पंधरा-वीस गायी असायच्या. गावात जनावर नाही असा एकही माणूस आढळत नव्हता.

ट्रॅक्टरपूर्वीची शेती आणि बैलजोडी

आमच्याकडे देखील पूर्वी बैल जोडी नव्हती. आपल्या घरी बैल जोडी असायला पाहिजे हे आमच्या नानाचे स्वप्न होते. परंतु घरी 18 विश्व दारिद्र्य असल्यामुळे बैल जोडी घेता येत नव्हती. त्यावेळी माझी आजी आणि माझा चुलता धोंडू तळपे हे बैल नसल्यामुळे कुडवण्याने शेती करायचे.

बैल खरेदी-विक्रीच्या आठवणी आणि अनुभव. 

आमचा पहिला बैल राजा 

img src="..." alt=" लेखकाचे वडील तळपे गुरुजी ">
सन 1973 च्या जानेवारी महिन्यात माझे वडील शिक्षक म्हणून रुजू झाले. आणि हळूहळू घरच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत चालली. 

प्रथम आपल्याला शेतीसाठी बैल पाहिजेत या विचाराने वडिलांनी आमच्या गावातीलच श्री विष्णू गोमा तळपे यांच्याकडून राजा नावाचा गोऱ्हा विकत घेतला. हा राजा बैल पावणे सहाशे रुपयाला विकत घेतला होता.

विष्णू गोमा व त्यांची मुले 

विष्णू गोमा तळपे यांना बैलांची मोठी हौस होती व अजूनही आहे. त्यांच्या गाईला गोऱ्हा झाला की विष्णू तळपे यांना खूप आनंद होत असे. मग ते त्या वासराची खूप काळजी घेत. 

नेहमीच ते जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करत. ऐन उन्हाळ्यात जेव्हा हिरवा चारा वाळून जाई तेव्हा ते अगदी कडे कपारीतून जिथे हिरवे गवत आहे तिथून ते आपल्या जनावरांसाठी आणत असत. उन्हाळ्यात देखील हिरवे गवत पाहून लोक चकित होत.

वासरू थोडे मोठे झाल्यावर विष्णू गोमा यांची मुले दगडू दादा, धोंडू व मारती त्या गोऱ्ह्याला दुसऱ्या बैलाबरोबर कढवानाला जुंपत असत. 

कढवानावर थोडा जड दगड ठेवला जाई. सुरुवातीला गोऱ्हा इकडे तिकडे पळण्याचा खूप प्रयत्न करायचा. कढवान व दगड उलटे पालटे व्हायचे. 

कधी कधी हातापायाला मार लागायचा. परंतु बैलाला शिकवायची प्रतिज्ञाच या तिघांनी केलेली असायची. 

दररोज दुपारनंतर या तिघांचे बैलाला शिकवण्याचे काम सुरू होत असे.

👉🏻हेही वाचा बैलगाडा शर्यती जुन्या आठवणी  

पारा नावाचा बैल (पाखऱ्या)

तर माझ्या बाबांनी विष्णू गोमा तळपे यांच्याकडून राजा हा गोऱ्हा विकत घेतला होता. त्यावेळी मंचर येथे बैलांचा मोठा बाजार भरत असे. मंचर येथे जाऊन वडिलांनी व नानांनी पारा नावाचा बैल विकत आणला. हा बैल आठशे रुपयाला आणला होता. या बैलाला आम्ही पाखऱ्या असे म्हणत असू.

राजा आणि पाखऱ्या या बैलांची जोडी काही जमली नाही कारण राजा हा गोऱ्हा होता तर पाखऱ्या हा मोठा बैल. त्यामुळे शेतीची नांगरणी करताना अडचण येत असे. मग आमच्या वडिलांनी आणि नानांनी राजा बैल म्हसा येथे रुपये 600 ला विकला.

आमचा तिसरा बैल हिरा

नवीन बैल घेण्यासाठी खूप प्रयत्न करूनही बैल मिळाला नाही. त्यामुळे मग बाबांनी आमचे आजोबा (आईचे वडील) लुमा ठोकळ यांच्याकडून हिरा नावाचा बैल विकत घेतला. 

हिरा व पाखऱ्या या बैलांची जोडी छान जमली. परंतु पुढे प्रॉब्लेम असा झाला की हिरा बैलाचा पुढचा पाय आपोआपच सांध्यातून निखळत असे. व थोडे प्रयत्न केल्यावर तो परत बसायचा.

दुसऱ्याच वर्षी बाबांनी व नानाने ही बैल जोडी विकण्याचे ठरवले. त्यावेळी बैलांना खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था केली व बैल तयार केले. 

म्हशाच्या बैल बाजाराला बैल घेऊन जायच्या आधी मंचर वरून आठशे रुपयाला आणलेला पाखऱ्या बैल आमच्याच गावातील चिंधु धोंडू तळपे व सिताराम दुलाजी तळपे यांनी तेराशे रुपयाला विकत घेतला. व म्हसा येथे सोळाशे रुपयाला विकला. 

आमचा चौथा बैल थैमन्या 

गावातच बैल विकला गेल्यामुळे दुसरा बैल विकण्याचे रद्द केले व त्यालाच दुसरा जोडी बैल घेण्याचे ठरवले. डेहणे येथे  धोंडीभाऊ सुतार हे बैल विकणार आहेत हे कळल्यावर आमच्या बाबांनी त्यांच्याकडून थैमण्या या नावाचा बैल विकत आणला. 

थैमण्या हा माझा अत्यंत आवडता बैल होता. थैमण्या हा रंगाने काळा होता आणि ठिकठिकाणी पांढरे मोठमोठे ठिपके त्यावर होते.

थैमण्या हा खूपच गरीब बैल होता. मी त्याच्या पोटाखालून जात येत असे. परंतु हा बैल खूपच वयस्कर होता. त्यामुळे पुढच्या वर्षी हे दोन्ही बैल विकण्यात आले.

थैमण्या हा म्हसा येथे अठराशे रुपयाला विकला. आणि दुसरा बैल हिरा हा शिरगावच्या किसन लांघी कोतवाल यांना 1200 रुपयाला विकला.

दोन्ही बैल विकल्यामुळे बैल जोडी विकत घेणे अतिशय आवश्यक होते.

गुलब्या आणि पैठण्या बैलांची जोडी 

त्यानंतर आमच्या बाबांनी आणि नानाने म्हसा येथून नारायण जठार धुओली यांच्याकडून बैल जोडी विकत घेतली. एका बैलाचे नाव गुलब्या तर दुसऱ्या बैलाचे नाव पैठण्या असे होते. 

हे दोन्ही बैल तांबूस रंगाचे होते. त्यातील गुलब्या हा बैल लहान मुलांवर धावत असे. तर पैठण्या हा अतिशय गरीब बैल होता.

ही बैल जोडी आमच्या नानाने जवळजवळ दोन-तीन वर्ष वापरली. परंतु गुलब्या बैल हा लहान मुलावर धावत असल्यामुळे गुलब्या बैल विकण्याचा निर्णय घेतला. व म्हशाच्या यात्रेमध्ये हा बैल विकला.

हौशा बैल 

त्यानंतर बाबांनी गावातीलच मोतीराम मोहन यांच्याकडून हौशा नावाचा बैल विकत घेतला. हा बैल रंगाने काळा होता.

ही बैल जोडी सुद्धा आमच्या नानाने जवळजवळ दोन वर्ष वापरली. त्यानंतर हे दोन्ही बैल म्हशाच्या बाजारात विकण्यात आले. 

बबन्या आणि पुतळा बैल 

आणि मग म्हशाच्या बाजारातूनच पंधराशे रुपयाला बबन्या नावाचा बैल विकत घेतला. व दुसरा पुतळा नावाचा बैल वांजळे गावच्या लक्ष्मण सोळसे यांच्याकडून सोळाशे रुपयाला विकत घेतला. 

आमच्या गोठ्यात ही बैलजोडी दीर्घकाळ राहिली. बबन्या बैलावर आमच्या घरातील सगळेच खूप प्रेम करायचे. बबन्या बैलाला देखील घरच्या माणसांचा खूपच लळा लागला होता.

आमच्या घराचे वेगळी झाल्यानंतर पुतळा बैल आमच्याकडे आला व बबन्या बैल आमच्या नानाकडे गेला पुढे काही दिवसांनी आमच्या नानांनी हा बैल म्हसा येथील बाजारात तीन हजार रुपयाला विकला. त्यावेळी सर्वात जास्त दुःख आम्हाला झाले होते.

आमचा नवीन बैल पक्षा

बबन्या व पुतळा ही बैल जोडी सुद्धा खूप वर्ष आमच्याकडे होती. पुतळा बैल विकून डेहणे येथील श्री नामदेव कशाळे यांच्याकडून पक्षा नावाचा बैल एकवीसशे रुपयाला विकत घेतला. ही आमची शेवटचीच बैल जोडी असावी.

आमचे मच्या आणि जेल्या बैल 

त्यानंतर बाबांनी डेहणे येथील हरिश्चंद्र कोरडे यांच्याकडून मच्या आणि जेल्या नावाचे दोन खिल्लारी बैल ( गाड्याचे) केवळ हौसे खातर विकत घेतले होते. 

ते केवळ गाड्याचे बैल होते. 

एक आठवण 

सन 1989 साली माझ्या नानाने आमच्या चुलत भावाच्या (गोटयाभाई) लग्नाला खटार गाडीला हे बैल जुपले. व त्यामध्ये लग्नाचे नवरदेवा सह वऱ्हाड बसवले. शिरगावच्या खिंडीमध्ये वऱ्हाड गेल्यावर बैल जे उधळले की ज्याला म्हणतात ते.

खटार गाडी मधील सर्व वऱ्हाडाच्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी खटार गाडीतून उड्या मारल्या. व आपला जीव वाचवला. नंतर ही खटार गाडी सटवाई मंदिराच्या पुढे जाऊन लोकांनी पकडली.

त्यानंतर मच्या हा बैल आमच्याच गावातील गंगाराम हुरसाळे यांना विकला व जेल्या बैल आमच्याच गावातील जयराम आंबेकर गुरुजी यांना विकला.

वडिलांचे निधन 

सन 1992 रोजी वडिलांचे निधन झाल्यावर परत मात्र कधीही बैल घेतले नाही किंवा घेण्याचा प्रसंग आला नाही.

वेगळे झाल्यावर आमच्या नानांनी बरेच बैल घेतले व विकले.

बैल म्हणजे शेतकऱ्यांचा जीव की प्राण 

त्यावेळी बैल म्हणजे शेतकऱ्यांचा जीव की प्राण होता. आता जसे लोक गाड्या, मोटरसायकली घेतात तसेच त्यावेळी लोक बैल घ्यायचे. 

एकच बैल ते सतत वापरत नसत. हा बैल विकून लगेच दुसरा घ्यायचा. तो विकून लगेच तिसरा घ्यायचा असे रहाटगाडगे सतत चालू असायचे.

बैलाच्या शिंगांना त्यावेळी विशेष महत्त्व होते. बैलांची शिंगे टोकदार असली पाहिजेत. 

बैलाला जास्त कांबळ (गळ्याखालचा भाग) नसली पाहिजे. वशिंद, बैलाचे दात, बैलाची चाल इत्यादी सर्व पारख करूनच बैल विकत घेतले जात असत.

गावात एखाद्या माणसाने बैल विकत घेतल्यावर गावातील अनेक लोकांची तिथे गर्दी जमत असे. काही जण त्यावेळी बैलांमध्ये आनेक उणीवा काढत असत. बैलाच्या किमतीवरून सुद्धा चर्चा झडत.

बैलाची शिंगे टोकदार करण्याची पद्धत 

दरवर्षी कोकणा मधून बैलाची शिंगे फोडण्यासाठी माणूस येत असे. तो बैलाची शिंगे टोकदार बनवून देत असे. अनेक लोक त्याच्याकडून बैलाची शिंगे टोकदार करून घेत असत.

एखाद्या छोट्या झाडाला बैल बांधला जाई दोन-चार जण बैलाचे मुंडके घट्ट पकडत. त्यानंतर हा शिंगे टोकदार करणारा माणूस त्याच्याकडील कानशीने बैलाची शिंगे लाकडासारखी घोळत राही. त्यामधून खूप रक्त येत असे. मला हा प्रकार अजिबात आवडत नसायचा.

बैलाची शिंगे टोकदार झाल्यावर त्यावर लोक वेगवेगळे झाडपाल्याचे औषध बैलाच्या शिंगाला चोळायचे. परंतु दोन-चार दिवसातच बैलाच्या शिंगांच्या जखमा बर्‍या व्हायच्या. त्यानंतर बैल मात्र मोठे रुबाबदार व डौलदार दिसायचे.

बैलाची शिंगे जशी टोकदार करत तसेच बैल बडवण्याचा कार्यक्रम सुद्धा अतिशय आघोरी होता.

बैलाची वय त्याच्या दातावरून ठरत असे. दुस,चौसा, गोरा, भादवा असे प्रकार होते. त्यावेळी खिल्लारी बैल हे अतिशय महाग असायचे. त्यामुळे हे बैल लोक विकत घेत नसत. गावठी बैलच अनेक लोकांकडे असायचे.

बैलगाडी शेतीचा अविभाज्य घटक 

त्यावेळी गावातील ठराविक लोकांकडे बैलगाड्या असायच्या. या बैलगाडीमधून लोक शेतीसाठी शेणखत वाहने, जनावरांसाठी पेंढा, वाळलेल्या गवताच्या पेंढ्या, सरपण, भाताची पोती, पाण्याची पिंपे, यात्रा, लग्न व देवदर्शन इत्यादी कामासाठी बैलगाडीचा सर्रास उपयोग होत असे. 

लग्नाचा नवरदेव वऱ्हाड बैलगाडीतून जात असे. त्यासाठी बैल गाडी अतिशय छान सजवली जायची. बैलाच्या अंगावर झोली बांधल्या जात.

img src="..." alt=" बैल गाडी">
आमच्या वडिलांनी सुद्धा भिवेगावच्या पांडुरंग वनघरे यांच्याकडून बैलगाडी विकत आणली होती. या बैलगाडी मध्ये मी रात्री अंगणात झोपत असे. ही बैलगाडी चालवण्याचा आनंद सुद्धा मी अनेक वेळा घ्यायचो.

आमची सारंगी गाय

img src="..." alt=" गाय व वासरू">

मी लहान असताना माझे आजोबा आईचे वडील लुमा ठोकळ यांनी दुधासाठी एक गाय दिली होती. 

या गायीचे नाव सारंगी असे होते. सारंगी गाय खूपच गरीब होती. व ती चांगले दूधही देत असे. ही गाय खूप वर्ष आमच्याकडे होती.

परंतु त्यावेळी जनावरांना खरकुताची साथ यायची. जनावरांच्या पायातील खुरामध्ये छोटे छोटे किडे पाडायचे. त्यावेळी आता सारखी औषधी उपलब्ध नसायची. 

आमची आजी व मी रानातून कुंभा या वनस्पतीची पाने आणत असू. ती दगडावर वाटून त्याचा रस व लगदा गायीच्या पायाच्या खुरामध्ये घालत असू.

परंतु थोड्याच दिवसात पावसाळा सुरू झाला. व खरकुत या आजाराने जास्त जोर धरला. आम्ही सकाळी पाहायचं त्यावेळी गोठ्यामध्ये सगळीकडे खरकुताचे किडे दिसायचे. आणि अशातच एके दिवशी आमची गाय आम्हाला सोडून गेली.

त्यानंतर आमच्या वडिलांनी डेहणे येथील श्री तुकाराम कोरडे यांच्याकडून एक गाय विकत आणली.

एक प्रसंग

त्यावेळी मी दुसरीला होतो. श्रावण महिना होता. आम्ही सर्व मुले शाळेत होतो. वेळ साधरण दुपारनंतर साडेचारची असेल, गुरुजी पाढे शिकवत होते आणि अचानक कुणीतरी शाळेत सांगायला आले की की आमच्या घरी गाय आणली आहे. मला खूप आनंद झाला.

काही मुलांनी गाय पाहण्यासाठी गुरुजींची परवानगी मागितली. तनपुरे गुरुजीं सह आम्ही मुले आमच्या वडिलांनी नवीन आणलेली गाय पाहण्यासाठी गेलो. तर काय अंगणात पांढरीशुभ्र गाय उभी होती, तिच्याबरोबर छोटे वासरू होते. चार-पाच लोक उभे होते. आई गाईची पुजा करून औक्षण करीत होती. तेवढ्यात आम्ही तेथे गेलो.

माणसे गप्पा मारत होती. सर्वांना माझ्या हस्ते गुळ वाटप करण्यात आला. गुळ वाटल्यावर बाकीची मुले शाळेत गेली. मी तेथेच थांबलो. त्यानंतर मोठ्या माणसांना चहापाणी झाला घरातील सर्वांना त्यावेळी खूपच आनंद झाला होता. घरात दूध दूभते आले होते.

चाहूर आणि शेतातले जेवण 

त्यावेळी गावात "चाहूर"  हा एक परावलीचा शब्द होता. चाहूर म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात गावातील सर्व बैल जोड्या घेऊन त्या शेतकऱ्याच्या शेताची दुरुस्ती करावयाची. 

त्या बदल्यात तो शेतकरी दोन वेळचे जेवण व ठराविक रक्कम द्यायचा. यालाच चाहूर असे म्हणत असत.

कुणाचा पावसाळ्यात बांध गेला असेल. कुणाच्या शेतात जास्त माती धुवून आलेली असेल. किंवा कोणाला नवीन भाताची खाचरे तयार करायची असतील. तर अगदी सकाळी सकाळी आपापली बैल घेऊन अशा शेतकऱ्यांच्या शेतात घेऊन जावयाचे.

संध्याकाळपर्यंत शेतीची कामे करायची. वीस बावीस बैल जोड्या असत. चाहूर असेल त्या दिवशी घरातील बाया माणसाची खूपच धावपळ असे. दिवसभर त्यांना खूप काम असायचे. 

शेतातील माणसांना दुपारचे जेवण म्हणजे नाचणीच्या किंवा तांदळाच्या भाकरी, मसुराची आमटी, कांद्याच्या फोडी, पापड हा बेत असायचा. त्यासाठी शेजारच्या बाया मदतीला यायच्या.

भल्या पहाटेपासून स्वयंपाकाची तयारी करावी लागायची. तेव्हा कुठे दुपारचे जेवण तयार व्हायचे.

दुपारी गर्द झाडीच्या छायेत जेवण झाल्यानंतर थंडगार पाणी पिऊन लोक वामकुक्षी घेत असत. तर सावलीमध्ये बांधलेल्या बैलांना वैरण काडी केली जात असे.

दोन-चार अति उत्साही लोक जवळच्याच रानात जाऊन आंब्यावर चढून पिवळे धमक पाड घेऊन येत असत. पाटी दोन पाट्या पिवळे धमक पाड खाण्यासाठी लोक त्यावर तुटून पडत.

आंबे खाऊन झाल्यावर पुन्हा शेतीचे काम सुरू होई.

शेतीची कामे आणि पुरणपोळीचे जेवण  

संध्याकाळी पुरणपोळीचे जेवण असे. लोक चावडीच्या दारात बसून गप्पा मारत असत व जेवणाची वाट पाहत असत. जेवणाचे एकदा बोलावणे आले की लोक सार पोळीवर तुटून पडत. एक एक माणूस पाच पाच सहा पोळ्या खात असे.

त्यावेळी कोणताही कार्यक्रम असो जेवण म्हणजे पुरणपोळी हा सर्रास लोकप्रिय प्रकार होता. मुलगी बघण्याचा कार्यक्रम, पाहुणे आल्यावर, शेतीच्या कामानिमित्त, यात्रा, सण व उत्सव, लग्न कार्य या सर्वांसाठी पुरणपोळी हा बेत ठरलेला असे.

आता मात्र पुरणपोळ्या हा प्रकार बंद होत चालला आहे. त्यावेळी चाहूर हा प्रकार अतिशय लोकप्रिय होता. 

साऱ्या गावाची औते एकच शेतकऱ्याकडे जात असत. एकच शेतकऱ्याच्या शेतामध्ये 25, 30 बैल जोड्या पाहून बैलांचा बाजार भरला आहे की काय असे वाटत असे. चाहूर हा एकमेकांना मदत करण्यासाठीचा प्रकार होता. 

परंतु आता चाहूर हा शब्द मदत करणे सोडाच परंतु ऐकायला देखील मिळत नाही. आताच्या पिढीला त्याचा शब्दही समजणार नाही.

परंतु त्यानंतर मात्र काळ बदलला पुरणपोळीची जागा चिकन,मटण आणि दारूने घेतली. दिवसाढवळ्या सुद्धा दारू पिऊन मगच शेतीच्या कामाला लोक सुरुवात करू लागले.

इर्जिक पद्धत

चाहूर या शब्दासारखाच दुसरा प्रकार म्हणजे "इर्जिक" होय. या प्रकारामध्ये गावातील ठराविक लोक एखाद्या शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी मदत करत असत. 

त्या बदल्यात तो शेतकरी मदत करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन वेळचे जेवण देत असे. संध्याकाळचा स्वयंपाक मात्र पुरणपोळीचा असे. थोडक्यात इर्जिक प्रकार म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला विनामोबदला केलेली मदत.

निष्कर्ष

गावाकडील बैल हे केवळ जनावर नव्हते, तर शेतकऱ्यांचे सोबती, आधारस्तंभ आणि कुटुंबातील एक अविभाज्य सदस्य होते. शेतीची प्रत्येक कामे, वाहतूक, यात्रा, लग्नकार्य, चाहूर–इर्जिकसारख्या पारंपरिक मदतपद्धती आणि गावातील सामाजिक नातेसंबंध या सगळ्यांच्या केंद्रस्थानी बैलच होते. 

त्या काळी बैलांची जोडी असणे म्हणजे शेतकऱ्याचा अभिमान, तर बैलगाडी म्हणजे घराचे मानचिन्ह.

तंत्रज्ञानाने शेती सोपी केली, ट्रॅक्टर आणि यंत्रयुग आले, पण त्याबरोबरच बैलांचे स्थान आणि त्यांच्या भोवती निर्माण झालेली संस्कृती हळूहळू हरवत गेली. आज गावात बैलजोडी दिसणे दुर्मिळ झाले आहे. 

एकेकाळी बैलांच्या हंबरण्याने, त्यांच्या झंकारणाऱ्या घंट्यांनी आणि बैलगाडीच्या चाकांच्या खडखडाटाने गजबजलेली गावची सकाळ आता शांत झाली आहे.

परंतु या सर्व बदलांनंतरही, त्या दिवसांची आठवण, बैलांच्या साथीने केलेली शेती, गावातील एकत्रित मेहनत, पुरणपोळ्यांचा बेत, आणि एकमेकांच्या मदतीने चालणारे जीवन या सर्वांचे मोल आजही मनात खोलवर कायम आहे.

बैल आता कमी झाले असले तरी त्यांच्याशी जोडलेली संस्कृती, परंपरा आणि स्मृती या आपल्या ग्रामीण वारशाचा एक अमूल्य ठेवा आहेत—जपण्यासारखा, सांगण्यासारखा आणि पुढच्या पिढीला समजावून देण्यासारखा.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)


आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...