Translate

अशोक सुतार

img src="..." alt=" अशोक सुतार">
अशोक सुतार', हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला कलंदर माणुस. अशोक माझ्या पेक्षा चार वर्षांनी मोठा.शिवाय माझ्या शेजारीच लागुन त्याचे घर आहे. त्यामुळे त्याला मी  लहानपणापासून अतिशय जवळून ओळखतो.

अशोक हा लहानपणा पासून कुशाग्र बुद्धी असलेला, अत्यंत  हुशार मुलगा होता. त्याचा चौथी पर्यत कायम पहिला क्रमांक यायचा.त्याचे वडील लोहारकाम व सुतारकाम करायचे.शिवाय मामा टेलरिंग काम करायचे.त्यामुळे अशोक या तीनही कलांमध्ये लहानपणापासून पारंगत होता.

कब्बडी, कुस्ती व क्रिकेट मध्ये अशोकचा हात कुणी धरू शकत नव्हते. 

त्यावेळी भागात सर्व गावांमध्ये चौथी पर्यंतच शाळा असल्यामुळे पश्चिम भागातील मुलांना पुढील शिक्षणासाठी डेहणे येथे जावे लागत असे.तेव्हा गावातील सर्व शाळकरी मुलांना protection (संरक्षण) पुरवण्याचे काम अशोक करायचा. गावातील एखाद्या मुलाशी कुणी बाहेरच्या गावच्या मुलाने मारामारी केली.. व अशोकला नंतर कळले तर अशोक त्या मुलाला चांगलाच चोप देत असे.त्यामुळे आमच्या गावातील मुलांमुलीकडे वाकड्या नजरेने कुणी पहात नसे. एवढा अशोकचा त्यावेळी वचक होता.

अशोकला खालच्या वर्गातील मुले अशोकदादा' म्हणत असत. अशोक वरच्या वर्गात असल्याने परिक्षेच्या वेळी त्याच्या पुढे मागे खालच्या वर्गातील गावातील कुणीतरी मुलगा/मुलगीचा क्रमांक यायचा.तेव्हा अशोक पर्यवेक्षक बाहेर गेल्यावर पटकन त्या मुला /मुलीला तेवढ्या वेळात उत्तरे सांगायचा. 

तो काळ क्रिकेट या खेळाने भारलेला काळ होता.प्रत्येकाच्या मनात क्रिकेट या खेळाने "गारूड" केलं  होतं. सुनिल गावस्कर, रवी शास्री, कपीलदेव, व्यंकटेश प्रसाद, संजय मांजरेकर यांचा सुवर्णकाळ होता.अशोकच्या मामाकडे तेव्हा रेडिओ असायचा.

त्याकाळी टि.व्ही.नव्हता. तेव्हा वन डे मँच हा प्रकार नसायचा.टेस्ट मँच खेळली जायची. ही मँच तीन दिवस चालायची.गावातील सर्व तरूण पोरं अशोकच्या दारात काँमेंट्री ऐकायला जमत असत.यातुनच गावात क्रिकेटचे बीज रोवले गेले.

अशोकचे मामा बाळू सुतार हे लाकडाची छान बँट बनवून द्यायचे.

श्री. नामदेव शंकर तळपे यांच्या नेतृत्वाखाली श्री. काळभैरवनाथ क्रिकेट संघाची स्थापना झाली.अशोक सुतार डावखुरा फलंदाज सेहवाग सारखी स्फोटक फलंदाजी करायचा. त्याला उत्तम साथ (The wall) श्री.चंद्रकांत वाघमारे (बत्या) करायचा.

तेव्हा सामने हे आँल आऊट असयचे. ही जोडी लवकर आऊट होत नसे. जोडीला श्री.चिमण जढर उत्कृष्ट बँट्समन व बाँलर,धोनी सारखा हेलीकँप्टर शाँट्स मारायचा..व धावगती वेगाने पुढे न्यायचा परंतू लवकर बाद व्हायचा. 

श्री.वामन जढर, श्री.मारूती आंबवणे (विकेट किपर) श्री.सोपान तळपे व कैलास सुतार (कुडे गाव) मध्यमगती गोलंदाज श्री.किसन आंभवणे कै.अहिलू (गोट्याभाई) श्री.कांताराम तळपे हे ब-यापैकी खेळाडू होते.तर श्री.नामदेव तळपे, मध्यम गती गोलंदाजी करत असे, 

श्री.धोंडू विष्णू तळपे हा शोएब अख्तर सारखी सुपरफास्ट गोलंदाजी करायचा.भलेभले फलंदाज त्याला भ्यायचे. तर चीमन जढर फास्टर गोलंदाजी करायचा. सोपान तळपे हा ही मध्यमगती गोलंदाज होता.

परंतू अशोक सुतार हा एकमेव असा फलंदाज होता की संपुर्ण मँच फिरवायचा.आणि मंदोशीचा विजय सुकर करायचा.त्या

 काळात सन १९८४ ते १९८८ मध्ये घोटवडी येथे तृतीय क्रमांक,डेहणे येथे चतुर्थ क्रमांक टोकावडे येथे तृतीय क्रमांक तर  कारकुडी येथे द्वितीय क्रमांक मंदोशी संघाने पटकावला होता.या चारही क्रिकेट स्पर्धा मध्ये अशोक सुतारने कमालीची बँटींग करून संघाला सामने जिंकून दिले होते. 

त्यामुळे गावातील सर्व ज्यांना क्रिकेट मधले ओ की ठो कळत नाही अशा सर्व अबालवृद्ध व माता भगीनींना संघाबद्दल प्रचंड अभिमान वाटायचा. गावातील लोक कौतुक करायचे. बाहेरगावी सामने असले की गावचे लोक सामने पहायला पोरांबरोबर जात असत.

सन १९८५ साली मंदोशी गावाने श्री.नामदेव तळपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नावठिका (मंदोशी) येथे फेब्रुवारी महिन्यात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. 

तेव्हा जवळजवळ १४ संघ दाखल झाले होते.या स्पर्धा तीन दिवस चालल्या होत्या. तेव्हा तेथे कै.देवराम तळपे यांनी बेसन लाडू व भजीचे दुकान लावलेले मला चांगले आठवते.शिवाय बर्फाच्या गारेगारी विकणारे पाच सहा सायकल स्वार दाखल होतेच.

स्पर्धेमध्ये व्यत्यय निर्माण करणाऱ्या टोकावडे गावच्या एक जणाला श्री.लक्ष्मण बाळू हुरसाळे यांनी चोप दिल्याने प्रचंड दहशत निर्माण झाली होती.त्या धसक्यानेच पुढील स्पर्धा सुरळीतपणे पार पडल्या होत्या. 

टोकावडे व कारकुडी संघाला हरवुन. मंदोशीचा संघ सेमी फायनल मध्ये गेला होता.नंतर सेमी फायनल मध्ये खरोशी संघाला धुळ चारली होती. प्रथम क्रमांक डेहणे दुसरा क्रमांक मंदोशी तीसरा क्रमांक तेरूंगण तर चौथा क्रमांक खरोशीचा आला होता.

खरोशी संघा बरोबर प्रथम गोलंदाजी करताना मंदोशी संघाने टिच्चून गोलंदाजी केली होती.श्री.धोंडू तळपे २ षटकात १५ धावा देऊन तब्बल तीन फलंदाज बाद केले होते.श्री. चीमन जढर यांनी दोन षटकात १६ धावा देऊन  दोन फलंदाज बाद केले होते.

श्री,नामदेव तळपे यांनी दोन षटकात १४ धावा देऊन दोन फलंदाज बाद केले होते.तर श्री.सोपान तळपे यांनी दोन षटकात १९ धावा देऊन १ फलंदाज बाद केला होता. अशा प्रकारे आठ षटकांच्या या खेळात आवांतर धावासह ७३ धावा व ८ फलंदाज बाद झाले होते.

तर फलंदाजी करताना अशोक सुतार याने शेवट पर्यंत आउट न होता..३४ धावा केल्या होत्या. श्री.चंद्रकांत वाघमारे याने २१ धावा करून तो सातव्या षटकात बाद झाला होता.त्या नंतर आलेल्या श्री.चीमन जढर यांनी एका षटकात दोन षटकार व एक चौकाराच्या सहाय्याने १९ धावा करून मंदोशी संघाला दुसरा क्रमांक मिळवून दिला होता.या वेळी मंदोशी ग्रामस्थांनी प्रचंड जल्लोष केला होता.

(या स्पर्धेची स्कोअर वही अजूनही मी जपुन ठेवलेली आहे.)

विशेष म्हणजे अशोक सुतार हा उत्कृष्ट कुस्तीपटू देखील होता. लांग, बांगडी, पट, ढुंगनी, उपट ह्या डावात तो तरबेज असायचा. सलामीला खेळताना डोळ्याची पात लवते न लवते तोच लांग मारून प्रतिस्पर्धी पैलवान जमीनीवर उताना पडलेला दिसे.

अशोक सुतारची कुस्ती दोन मिनिटाच्या आत चितपट होत असे.प्रतिस्पर्धी पैलवानाला देखील आपण इतक्या लगेच कसे चितपट झालो हा भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असे. आखाड्यात एकच जल्लोष पहायला मिळे.अशोक वर बक्षिसांची खैरात होई.अनेक पदके, सन्मानचिन्ह,वस्तू रोख रक्कम त्याला मिळाली.

भागात एक नावाजलेला पैलवान म्हणुन त्याची गणना होऊ लागली. मंदोशी गावचे नाव अधीच श्री.बारकू तळपे, कै.खेमा तळपे कै.हरिभाऊ आंबवणे, श्री,विष्णू पांडू तळपे, श्री.विष्णू गोमा तळपे,श्री.कुशाबा आंबेकर, श्री.होनाजी मोसे, श्री,हरिभाऊ हुरसाळे यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते.

त्या ध्वजाला पताका लावण्याचे काम अशोकने केले..गावचे नाव उज्वल केले.अतिशय सन्मानाची व प्रतिष्ठेची शेवटची कुस्ती त्याच्यावर लावली जायची.व तोही या संधीचे सोने करत असे.त्यावेळी त्याला गावातील/ भागातील लोकांचे अलोट प्रेम मिळाले, अमाप प्रसिद्धी मिळाली.

अशोकच्या नशिबाने त्याला लहान वयातच हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळाली..असे असतानाही यात्रेच्या हंगामात त्याची कुस्ती बहरतच होती. क्रिकेटच्या खेळात त्याची बँट तळपतच होती. त्यावेळी तो प्रसिद्धीच्या व लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्याच्या पुढे आम्ही तेव्हा पालापाचोळा होतो..    

से असतानाही त्याने कधीच माज केला नाही.गर्व,अभिमान बाळगला नाही..नाहीतर थोड्याशा प्रसिद्धीने अर्ध्या हाळकुंडाने पिवळे होणारे कितीतरी जण समाजात असतात.

एकदा गावात जातीयवादाची केस झाली होती.पुणे ग्रामीण चे एस.पी.साहेब गावात आले होते.त्यांनी दोनही पार्ट्यांना एकत्र बोलावुन घेतले..हे प्रकरण मिटवण्यासाठी अशोकने अत्यंत महत्वपुर्ण भुमीका बजावली होती.तेव्हा स्वतः एस.पी. साहेबांनी त्याचे अभिनंदन केले होते.

परंतू नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.मुबईला गेल्यावर वाईट मित्रांच्या संगतीमीळे अशोक नशेच्या आहारी गेला..पुढे त्याची कंपनीही गुजरातला गेली..कंपनीने अनेक जणांना थोडेफार पैसे देऊन घरी पाठवले.त्यात अशोकही होता.

घरी आल्यावर अशोक घरे बांधण्याची कामे करू लागला. उत्तम कामामुळे त्याला घराची कामे मिळू लागली.त्याचे तेथेही नाव झाले.परंतू येथेही दारूने त्याचा पिच्छा सोडला नाही.दारू पासुन परावृत्त करण्यासाठी खुप लोकांनी प्रयत्न केले.परंतु तो बधला नाही.

पुढे तो पुर्णपणे व्यसनाधीन झाला.लोक त्याला काम देईनात. मदत करीनात. या मुळे घरी सर्वांची उपासमार होऊ लागली.शेवटी त्याच्या पत्नीने ऊदरनिर्वाहासाठी राजगुरूनगर गाठले.अशोकही तिकडे गेला.

मी त्याला खुप समजावून सांगीतले. त्याला मी दहा- बारा हजार रूपायाची हत्यारे विकत घेऊन दिली..काही दिवस त्याने चांगले काम केले..परंतू थोड्या दिवसातच तो पुन्हा दारू पिऊ लागला यामुळे त्याचे जवळचे नातेवाईक मित्र त्याला सोडून गेले. त्याला लोक टाळू लागले.ओळखीचा जो भेटेल त्याच्याकडे तो पैसे मागु लागला.लोक त्याला अर्थीक मदत करायला कचरू लागले.त्याची सर्व प्रतिष्ठा धुळीला मिळाली..

आता कधीतरी अशोक दिसतो. हाडाची काडे झालेला अशोक झोकांड्या खात रस्त्याने चाललेला अशोक...मळकी जीर्ण झालेली कपडे घातलेला अशोक ....तो बोलताना येणारा.प्रचंड उग्र दर्प..

त्याला पाहून मन सुन्न होते..काळीज चिरते.अगदीच गलबलून येते..मदत करायची इच्छा असुनही मदत करता येत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल...😥😥

✍️ माझा हा लेख मूळतः StoryMirror, Marathishrushti आणि Pratilipi वर देखील प्रकाशित झाला आहे. लेखक: रामदास तळपे

रामदास तळपे ग्रामीण संस्कृती 



सुगीचे दिवस

नवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते. त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते. वारा भणभणत असतो. त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर  सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते.

आता भाताच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. अनेक संकरित जाती विकसित झाल्या आहेत. या जातीचे पीक भरपुर येते. प्रत्येक तांदळाची एक वेगळीच चव चाखायला मिळते. परंतु अस्सल गावरान तांदूळाचा भात खाण्यात जी मजा आहे ती मात्र कशातच नाही.

पुर्वी भाताचे अनेक देशी वाण होते. खडक्या, कोळंब, तामकुडा, तांबडा रायभोग, कमवत्या, जीर,  इंद्रायणी असे ते वाण होते. पीक कमी परंतू चव मात्र अप्रतिम. भात जर शिजत असेल तर त्याचा दरवळ बाहेर अंगणभर येत असे.परंतू आता संकरित वाण आल्याने गावठी वाण कमी झाले आहेत.

भात कापणीचा हंगाम सुरू व्हायच्या आधी लोक आपापल्या विळ्यांना लोहराकडुन धार लावून घेत. 

आमच्या शेजारीच चीमण लोहराचा भाता असे. सकाळी सात वाजल्या पासुन पंचक्रोशीतील लोकांची विळ्यांना धार लावण्यासाठी मोठी गर्दी व्हायची. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम चालू असायचे.

गावातील वयोवृद्ध लोक भाताचे भारे बांधण्यासाठी भाताच्या पेंढ्यांचेच आळे (दो-या) वळायचे. शिवाय भात साठवण्याच्या कणगी खाली बुडाला आधार म्हणुन पेंढ्याचीच गोल चुंबळ विणायचे. काही लोक नविन कणगी तयार करायचे तर स्रीया जुन्या रिकाम्या कणगी शेणाने सारवुन वाळवुन ठेवायच्या. ही सर्व तयारी आधीच करावी लागे.

भात कापणी

भात कापणीची जय्यत तयारी सुरू व्हायची. अगदी सकाळीच भात खाचरात जाऊन भाताचे पीक कापायला सुरूवात करायची. सुरूवातीला भात कापायला मजा वाटायची. नंतर मात्र डोक्यावरचे ऊन व सारखे वाकल्यामुळे कंटाळा यायचा. परंतू पाथ मागे राहता कामा नये या जाणीवेतुन भात कापायलाच लागले. आमच्याकडे भात कापणीला येटाळणी म्हणतात. 

अंधार पडे पर्यत भात कापायचे. नंतर घरी आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करायची.दिवसमर भात कापल्यामुळे अंग अंबून जायचे. अंघोळ करताना अंगावर गरम पाणी घेतल्यावर स्वर्गीय आनंद व्हायचा.

जेवण झाल्यावर मात्र लगेच अंथरूणावर पडायचे.लगेचच झोप लागायची. दुसऱ्या दिवशी मात्र उठुशीच वाटायचे नाही. सर्व अंग ठसठस करायचे.या कुशीवरून त्या कुशीवर होता येत नसायचे. परंतू नाईलाजाने उठावेच लागे.

पुन्हा सर्व आवरून पुन्हा शेतात भात कापायला जायचे. भात कापायला खाली वाकता येत नसे.इतके अंग दुखायचे. परंतू बळेच खाली वाकुन भात कापायला लागायचे.

भात कापताना अनेक विषयावर गप्पा मारत भात कापायचे. विळ्याने कुणाची बोटे कापायची. तरोट्याचा किंवा टणटणीचा पाला वाटुन त्याचा रस बोटावर पिळायचा. काथाडीने बोट बांधायचे. मग पुन्हा काम सुरू करायचे.खाचरात पाणी असेल तर मात्र खाचरात आळाशा करता येत नाहीत. सर्व भात खाचराबाहेर काढताना खुप त्रास व्हायचा.

दुसऱ्या दिवशी अंग बसल्यामुळे कालच्या इतके अंग दुखायचे नाही.

भाताची येटाळणी केल्यावर दुपारी मस्तपैकी नदीत किंवा ओढ्याच्या पाण्यात मनसोक्त पोहायचे. मासे पकडायचे.

पुर्वी ठराविक ठिकाणीच खळी असायची.एका खळ्यावर चार- पाच लोकांची भात झोडणी चालायची. एका एका खळ्यावर महिनाभर काम चालायचे. भात झोडणी झाल्यावर नाचणी. नाचणी सावा किंवा वरई, खुरासणी, हुलगा इत्यादी. धान्य असायची. परंतू आता मात्र भात सोडले तर सर्वच जवळजवळ बंद झाले आहे.

खळे

खळे तयार करताना सुद्धा मजा यायची. पहिल्या दिवशी खळ्यावर जाऊन पाच फावडी मारायची. नंतर दुसऱ्या दिवशी खळ्यावरचे सर्व गवत फावड्याने काढायचे. खड्डे भरून घ्यायचे. खळ्याच्या मध्यभागी तिवडा रोवायचा. खळ्यात पाणी मारायचे. नंतर शेण, पाण्यात कालवुन खळ्यात पसरायचे. निरगुडीच्या डहाळ्यांनी सारवायचे. झाले खळे तयार..याला शेणकाला म्हणतात. दुस-या दिवशीही अशाच पद्धतीने शेणकाला करायचा.

कापलेल्या भाताच्या आळाशा जमा करून भारे बांधायचे. हे भारे खळ्यावर घेऊन यायचे. खळ्याच्या एका बाजुला भारे उतरायचे. खळ्यात तिवड्याला लाकडी घडवंची बांधायची.

भात झोडणी

गावातील पाच दहा जण एकत्र येऊन कधी दिवसा तर कधी रात्री भात झोडतात. पुर्वी दिवसाच भात झोडायची कामे व्हायची. परंतू आता खळी राहीलेली नाहीत. खाचरातच ताडपत्री अंथरून त्यावर भात झोडतात.

पुर्वी खळ्यात लोक चप्पल घालत नसत. परंतू ताडपत्रीने पाय भाजत असल्यामुळे चप्पल घालूनच भात झोडायला लागते. परंतू खळ्याची मजा ताडपत्रीला नाही.

खळ्यात धान्य असल्यामुळे रात्री खळ्यात मुक्काम करावा लागे. बरोबर दोघे, तीघे मित्र किंवा जेष्ठ माणसे असत. संध्याकाळी खळ्यात झोपल्यावर गार वारा व वर आकाशाचे छत, त्यामध्ये चांदण्या, उगवता किंवा अस्ताला गेलेला चंद्र पहायला मजा वाटे. आकाशात ध्रूव तारा, तिकांड, बाज, ती चोरून नेऊ पहाणारे चोर, असे चांदण्यांचे प्रकार पहाताना व त्याबद्दल जेष्ठांकडुन माहीती ऐकायला मोठे कुतुहल वाटे.

सकाळी भात झोडायला पाच- सात गडी असत. प्रत्येकाकडे रस्सी असे. रस्सीच्या सहाय्याने भात झोडायला सुरूवात करत. पहिले दोन ठोके भाताच्या राशीवर मारून उरलेले ठोके लाकडी घडवंचीवर मारत. एकच खणाखणी होई. भाताचे भारे पटापट कमी होत.

खळ्यात भात झोडल्यावर बराच कचरा होई. याला गळंदा म्हणतात. हा गळंदा गोळा कराण्याचे काम एखादा वयस्कर माणुस करत असे.

दुपार पर्यंत भात झोडुन झालेले असे. खळ्यात भाताची रास तयार असे. चांगले पीक आल्यावर भाताची भलीमोठी रास तयार होई. शेतक-याच्या चेहऱ्यावर  समाधान झळकत असे. घराकडुन गुळाभाताचा नैवेद्य आणुन धान्याच्या राशीला व शेताला दाखवायचा. भाताच्या राशीत सकाळी ठेवलेला नारळ फोडायचा. नंतर गुळाभाताचा नैवेद्य व नारळाच्या खोब-याचा तुकडा पानावर खायचा..हे खाताना खुप मजा यायची.

दुपार नंतर सुपाच्या पाठीमागे कोरड्या राखेने गुणाकाराच्या रेघा मारायच्या.व भात उपनायाला सुरूवात करायची.हे काम तज्ञ माणुस करायचा.वारा नसल्यावर वारा यायची वाट पहायला लागायची..त्या दुरदृष्टीनेच जेथे वारा असतो अशा ठिकाणी खळी तयार केलेली असत.

भात उपणुन झाल्यावर पोत्यात भरले जायचे. तो पर्यंत आंधार झालेला असे. या भातांची बाचकी घरी घेऊन आंधारातुन जाताना नाकीनऊ येत.

काही शेतकऱ्यांच्या खळ्यात भाताच्या राशीला कोंबडा कापायची प्रथा आसायची. संध्याकाळी खळ्यावर कोंबड्याचा पातळ रस्सा व भात खायला मोठी मजा यायची. भरपुर भात व तितकाच गरम रस्सा असायचा. काही जण खाऊन झाल्यावर नुसताच गरम रस्सा पीत असत.

 हरभरा 

भाताची झोडणी झाल्यावर ओल असलेले शेत नांगरून हरभरा, मसुर किंवा गहू पेरत. चांगले पीक येई. या पीकाचे रान डुकरांपासुन संरक्षण करण्यासाठी लोक शेतात मांडव करत. त्या मांडवावर रात्री झोपायचे. काहीजण जमीणीवर त्रिकोणी खोपटे करून त्यामध्ये झोपत. मांडवाच्यावार झोपायला मजा येई. आजुबाजुंच्या शेतकऱ्यांच्या आरोळ्यांनी शिवार दुमदुमुन जात असे. मांडवावर मेंढी कोट खेळत.नंतर पत्र्याचा डबा वाजवायचा..किंवा दिवाळीतले शिल्लक रोज एक दोन फटाके वाजवायचे. मोठीच गम्मत असे.

हारभरा भरल्यावर एखादा शेतकरी शेतात हुळा खायला येण्याचे आवातन देई. आम्ही चारपाच जण शेतात जात असू. खळ्यात काटक्या व गवत पेटवून त्यावर मस्त घाट्यांनी भरलेला हरभरा भाजला जात असे. हरभरा भाजुन झाल्यावर आग विझवुन तेथेच बसून गप्पा गोष्टी करत हरभ-याचा हुळा आम्ही फस्त करत. कधीकधी हभभरा समजुन एखादा गरम खडा तोंडात जाई. जीभ भाजे. परंतू चार पाच मित्रांबरोबर हरभ-याचा/वाटाण्याचा किंवा गव्हाचा हुळा खाताना मोठी मौज वाटत असे. हुळा खाऊन झाल्यावर एव्हाना आंधार पडू लागलेला असे.

असे ते भारलेले दिवस होते. हे दिवस मी पाहिले व अनुभवलेही. हे मोठेच भाग्य म्हणावे लागेल. 

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)


भागीत गुरूजी


१९ जुन १९८६ साली श्री.पंढरीनाथ भागीत गुरुजी मंदोशी गावच्या शाळेत हजर झाले. तत्पुर्वी शाळेची अवस्था अतिशय वाईट होती. जवळ जवळ वर्षभर शाळेत शिक्षकच नव्हते.

हुरसाळे वाडीचे कै.विठ्ठल मोरमारे गुरुजी त्यांची शाळा करुन दुपारी दोन तास शाळा उघडायचे.असे सतत वर्षभर चालले होते. त्याकाळात पुर्णवेळ शिक्षक नसल्याने खुप मुलांचे अतोनात  शैक्षणिक नुकसान झाले.

img src="..." alt=" भागीत गुरुजी ">

आम्ही चौथीला असतांना जुन महिना असावा. पाऊस पडायला सुरूवात झाली होती. ओढे नाले ओसांडुन वाहत होते. शाळा बंद असल्यामुळे पोरं मासे,खेकडे पकडणे, गुरे संभाळणे ही कामे करत होती.

आणि एक दिवस अचानकच सकाळी १०.१५ वा.शाळेची घंटा घणघणली. सर्व मुलांमाणसांना अश्चर्याचा धक्का बसला. कुणीतरी सांगितले नविन मास्तर आलेत. सर्वच लोकांना व मुलांना कोण नविन गुरूजी आलेत हे पाहण्याच्या उत्सुकते पोटी शाळेकडे आपापल्या मुलांना घेऊन शाळेकडे चालू लागले.

शाळेत गेल्यावर पहातो तर पांढरा शुभ्र कडक इस्त्री असलेला लेंगा,पैरण व टोपी गळ्यात मफलर असलेले गुरूजी आम्हाला दिसले. लोकांना गुरूजीनीच ओळख करून दिली.

मी श्री.पंढरीनाथ भागीत गुरूजी.इथे जवळच असलेल्या भोमाळे गावचा आहे. यापुर्वी कहू येथे होतो. आजच बदलीने या शाळेवर हजर झालो आहे.

तेव्हा उद्या पासुन सर्वांनी आपापल्या मुलांना शाळेत पाठवायचे. कुणीही मुलांना घरी ठेवायचे नाही. अशी लोकांना सक्त ताकीदच देऊन टाकली.तीही कडक शब्दांत.

दुसऱ्या दिवशी नियमित पणे शाळा भरली. साफसफाई झाल्यावर प्रार्थना सुरू झाली. नंतर राष्ट्रगीत झाले.

यापुर्वी आम्ही कधीच प्रार्थना किंवा राष्ट्रगीत म्हटलेले नव्हते. त्यामुळे शाळेत एक नविनच उत्साह जाणवत होता..

गुरूजींची शिकवण्याची पद्धत खासच होती. शिवाय शाळा सुटायच्या आधी अर्धा तास उजळणी, पाढे, कविता गुरूजींच्या मागे मोठ्याने म्हणताना मजा येत असे..नंतर हे सर्व मुलेच स्वतःहुन म्हणू लागली.

शाळेला जोडुनच पाठीमागे व शाळेच्या उजव्या बाजुला लोकांनी गुरे बांधण्यासाठी व पेंढा ठेवण्यासाठी पडव्या बांधलेल्या होत्या..गुरूजींनी सबंधितांना बोलावुन त्या पडव्या काढुन टाकायला सांगीतलंं.

यावर त्यांनी गुरूजी पडव्या काढल्या तर आम्ही गुरे कुठे बांधू? राहुद्या त्यांचा शाळेला काय त्रास आहे का?असे म्हणून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला..परंतू गुरूजींनी कडक भाषेत त्यांना ताकीद दिली.

दोन दिवसात पडव्या काढल्या नाहीत तर मला वर कळवायला लागेल! बघा मग ? ही मात्रा सबंधितांवर लागू झाली आणि त्यांनी लगेचच पडव्या काढायला सुरूवात केली.त्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील त्यांना मदत केली.

तेव्हा शाळेच्या उजव्या बाजुला व पाठी मागे मोठ मोठे उकिरडे होते. गुरूजींनी व विद्यार्थ्यांनी पाठीमागे रस्त्याच्या खाली मोठा चर खोदुन त्यामध्ये कचरा साठवण्याची व्यवस्था केली. बराचासा कचरा जाळून टाकला. या साठी ग्रामस्थांनी सुद्धा मदत केली.

भागीत गुरुजी आले तेव्हा शाळेची अतिशय वाईट स्थिती झाली होती एका बाजूला शाळेची भिंत ढासळली होती तर पुढील बाजूच्या खिडक्या तुटल्या होत्या शिवाय दरवाजाही तुटलेला होता त्यामुळे शाळेमध्ये कुत्री- मांजरे वास्तव्यास होती. त्यांनी बरीचशी जमीन उकरली होती.

त्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून थोडेफार पैसे जमा केले. श्री.दुंदा बांगर यांनी पडलेली भिंत दुरुस्त करून दिली. श्री.कांताराम तळपे यांनी खिडक्या व दरवाजा दुरुस्त करून दिला. सौ.अनुसयाबाई शकर जढर(पारधी) यांनी शाळेच्या आतुन व बाहेरूनच्या भिंती, शेणा- मातीने लिंपून शेण व राखेने सारवून काढल्या. त्यासाठी त्यांना दहा रुपये मजुरी दिल्याचे मला स्पष्ट आठवते. 

हे सर्व झाल्यावर शाळेला छान पैकी रंग देऊन वर छताला रंगीबेरंगी पताका लावण्यात आल्या. शाळेला कुलूपाची सोय केली.

यापूर्वी शाळेला कुलूप नसायचे, त्यामुळे शाळेत इतर वेळी पत्त्यांचा डाव चालायचा. कुत्री - मांजरे आत जायची. शाळा कुलुप बंद झाल्यावर हे सर्व बंद झाले. अशा प्रकारे भागीत गुरुजीनी शाळेला नवचैतन्य दिले,

काळी परिपाठाला होणाऱ्या प्रार्थना राष्ट्रगीत व प्रतिज्ञा कविता, भक्तीगीते, भावगीते, समुहगीते यामुळे शाळेला नवचैतन्य आले. लोकही कौतुकाने हे सर्व ऐकायला बाहेर थांबत असत.

भागीत गुरूजी ज्यावेळी गावात प्रवेश करत असत किंवा लांबुन दिसत.तेव्हा खेळत असलेल्या मुलांची त्रेधातिरपट उडत असे.तात्काळ मुले हातपाय धुऊन दप्तर घेऊन शाळेचा रस्ता पकडत.स्वच्छ गणवेश,दररोज अंघोळ,बारीक केस,नखे काढलेली असलीच पाहीजे असा गुरूजींचा आदेशच असे. 

भागीत गुरुजींच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे बाहेर गावचे विद्यार्थी देखील मंदोशीच्या शाळेत दाखल होऊ लागले. त्यामुळे शाळेचा पट १२ वरून ३०च्या दरम्यान झाला. पर्यायाने दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती झाली.

सन १९९३ मध्ये भागीत गुरुजींनी इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यासाठी तेव्हाचे तत्कालीन उपसरपंच कै.शंकरराव हुरसाळे यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्व प्रयत्नातून पाचवीचा वर्ग मंदोशी गावात सुरू झाला. 

त्याबरोबर अजून एक शिक्षकांची नियुक्ती झाली.आता गावात भागीत गुरुजी, सुनील हांडे गुरुजी, कै. मुक्ताजी मदगे आणि शिवराम सुपे गुरुजी असे तीन शिक्षकआले. नंतर श्री,संजय नाईकरे आले.

पुढच्या वर्षी सहावीचा वर्ग मंजूर झाला. श्री संजय नाईकरे हे अजून एक शिक्षक हजर झाले. त्यानंतर सातवीचा वर्ग अशा प्रकारे इयत्ता सातवी पर्यंत शाळा मंदोशी गावात सुरू झाली. 

शाळेचे वर्ग वाढत असताना शाळेला वर्गखोल्या देखील मंजूर झाल्या.आणि शाळेला एकूण सहा शिक्षक मिळाले. यासाठी भागीत गुरुजींचे परिश्रम व योगदान हे अतिशय महत्त्वाचे होते. 

याच काळात अनेक विद्यार्थी तयार झाले. अनेकांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या लागल्या तर अनेक जण चांगल्या पदावर पोहोचले. 

मंदोशी गावचा शाळेचा पट १५३ वर पोहोचला तेव्हा बीट पातळीवर व केंद्र पातळीवर होणाऱ्या अनेक शालेय स्पर्धा मंदोशी गावात होत असत.

बाहेर गावचे विद्यार्थी व शिक्षक,गावचे विद्यार्थी व शिक्षक यांना जेवणाची व्यवस्था मंदोशी गावाकडुन असायची. त्यामुळे अनेक बाबींसाठी शाळेला गावानेही भरपुर सहकार्य केले.

पुर्वी शाळेत एक दोन तुकडे झालेला व तसाच जोडलेला फळा होता.शाळेचे दप्तर ठेवण्यासाठी एक छोटी लाकडी पेटी होती.पाय तुटलेला एक टेबल व खुर्ची होती.बस्स इतकेच काय ते साहित्य होते परंतू नंतर याच काळात नविन शाळेचे बांधकाम झाले.

नविन वर्गखोल्या,नविन कपाटे,टेबल खुर्च्या, नवीन बेंच, वाचनालया साठी नविन पुस्तके, टिव्ही, टेपरेकॉर्डर, स्पिकर सेट, खेळाचे साहित्य, भजनाचे साहित्य, बँड, ढोल, तुतारी,मुलांना नविन दप्तर, गणवेश, पाठ्यपुस्तके, स्काँलरशिप, विद्यावेतन मोफत दुध वाटप असे कितीतरी साहित्य व योजना आल्या. भागीत गुरूजींच्या काळात या छोट्या शाळेचे वटवृक्षात रूपांतर झाले.

केंद्र पातळी,बीट पातळी,तालुका पातळी वर शाळेचा भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक आला.तसेच जिल्हा पातळीवर देखील शाळेचा तृतीय क्रमांक आला. यासाठी कै,मुक्ता मदगे गुरूजी,प्रसिद्ध हर्मोनियम वादक श्री.धर्मा बुधाजी तळपे यांचे मोलाचे योगदान लाभले.

भागीत गुरूजीं विषयी सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या मनात आदराची भावना होती.भागीत गुरूजी मंदोशी गावात सहकुटुंब तब्बल २२ वर्ष राहीले..ते गावचा एक घटक होते. 

गावातील प्रत्येक सामाजीक कार्यात ते भाग घेत. यात्रेला ते भरघोस देणगी देत. लोकांच्या सुखदुःखात भाग घेत.गावात वादविवाद झाल्यावर दोनही बाजुच्या लोकांना चार समजुतीच्या गोष्टी सांगत. प्रसंगी अर्थीक मदत देखील करत.

त्यांच्या काळात १२विद्यार्थी असलेला पट १५३ वर जाऊन पोहचला.व शिवाय एका शिक्षकाचे सहा शिक्षक झाले.शाळेला कै.मारूती मोरमारे, गुरूजी,श्री.शंकरराव विरणक,गुरूजी ,श्री.माळी गुरूजी असे पात्र मुख्याध्यापक लाभले. परंतू भागीत गुरूजींचे महत्त्व यत्किंचितही कमी झाले नाही.

श्री.पंढरीनाथ भागीत,श्री.सुनिल हांडे, श्री.संजय नाईकरे व कै.मुक्ता मदगे गुरूजी, किसन म्हातारबा तळपे यांनी ख-या अर्थाने विद्यार्थी घडवले. आज ते विद्यार्थी समाजाचा एक घटक बनुन चांगल्या प्रकारचे जीवन जगत आहेत. याचे श्रेय या सर्वांना दिले पाहिजे.

सन 2009 मध्ये त्यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाली. व ते जि प प्राथमीक शाळा साबुर्डी येथे हजर झाले. तेथेही त्यांनी चांगल्या प्रकारे विद्यार्जानाचे काम केले.

एप्रिल 2023 मध्ये त्यांना विस्तार अधिकारी या पदावर अत्यंत अल्प काळासाठी पदोन्नती मिळाली. आणि लगेच जून 2023 रोजी सेवानिवृत्त झाले.

आता भागीत गुरूजी कधीतरी भेटतात. मग आम्ही अवार्जुन वेळ काढुन गावातल्या मागील घटनांना ऊजाळा देतो.ते दिवस आठवतो. 

समाधानाची भावना आमच्या दोघांच्याही मनात तयार होते. "कालाय तस्मैय नमः"अशा या गुणसंपन्न शिक्षकाला भावी आयुष्य सुखसमृद्धीचे व आरोग्य संपन्न जावो ही सदिच्छा...

✍️ माझा हा लेख मूळतः StoryMirror, Marathishrushti आणि Pratilipi वर देखील प्रकाशित झाला आहे. लेखक: रामदास तळपे


रामदास तळपे ग्रामीण संस्कृती

गाव तस चांगलं ...

मंदोशी गाव हे ख-या अर्थाने महाराष्ट्रात प्रख्यात झाले ते पावसाळ्यात ओसांडून वाहणाऱ्या धबधब्यामुळे.पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग,डोंगर द-या मधुन ओसांडणारे पाणी व धबधबे. तत्कालीन शिक्षक श्री.संजयजी नाईकरे यांचे यामध्ये  मोठे योगदान आहे. पावसाळ्यात हे निसर्गवैभव पहायला हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात.

तसे पाहिले तर मंदोशी गावाने अनेकांना पुढे आणले. कै.विष्णू कमाजी हुरसाळे! के.खेमा तळपे, श्री,सहदेव जढर, कै.विष्णू पांडु तळपे, श्री.विष्णू गोमा तळपे, कै.हरिभाऊ आंबवणे श्री.बारकू तळपे, श्री.किसन गोडे, श्री.होनाजी मोसे श्री.कुशाबा अंबेकर या नामवंत पहिलवानांनी अनेक संस्मरणीय कुस्त्या केल्या.

त्याकाळी या कुस्त्या केवळ पागोट्यावर (फेटा) असत. त्यानंतर श्री.हरिभाऊ हुरसाळे,श्री.महादू मोहन, श्री.अशोक सुतार, श्री.दत्ता आंबवणे, श्री.अंकुश हुरसाळे, श्री.प्रकाश आंबेकर. दत्ता तळपे, श्री.सुरेश तळपे, श्री.भिमाजी मिलखे अशा अनेक जणांनी गावचे नाव अजरामर केले.

पश्चिम भागात मंदोशी गावाला एक परंपरा होती..भागात दरारा,होता नावलौकिक होता. आणि अजूनही आहे.

जसे गावासाठी पहिलवान मंडळींचे योगदान होते. तसेच अनेक कलाकार सुद्धा होते..फार पुर्वी गावचा तमाशा होता. कै.विष्णू हुरसाळे, कै.मोतीराम मोहन, कै.संपत जढर कै.बुधाजी तळपे, कै.शंकर अहिलू तळपे असे असे अनेक कलाकार होऊन गेले या कलाकारांनी त्यांची कला कोकणापर्यंत सादर करून मंदोशी गाव कुठेतरी आहे याची जाणीव करून दिली.

त्यानंतर गावात हर्मोनियम (पायपेटी) पेटीमास्तर तयार झाला पाहिजे या जाणिवेतुन गावाने श्री.धर्मा बुधाजी तळपे यांना हार्मोनियम शिकवण्यासाठी गावाने पेटीमास्तरची नेमणुक केली. त्याचा संपुर्ण खर्च (पगार) त्यावेळी गावाने उचलला.

नंतर गावाने त्या काळात साधारण १९६८-६९ साली रुपये गावाने वर्गणी काढून ५०००/-ची मुंबईवरून नवीन पायपेटी विकत आणली.त्यानंतर परत एकदा कै.सिताराम तळपे.श्री.चिंधू धोंडू तळपे. कै.नामा जढर यांनी सुद्धा तमाशासाठी योगदान दिले.

मंदोशी गावचे एकतारी भजन फार प्रसिद्ध होते.कै.बाळासाहेब तळपे (सरपंच ) वीणा व चिपळ्या अप्रतीम वाजवायचे. कै.ज्ञानदेव तळपे पखवाद उत्तम वाजवायचे. त्याकाळात या भजनाला वाडा,भिमन्याहार व भामन्याहार अशा दोन्हीही भागात या भजनाला प्रचंड मागणी होती. त्यांनीही एक प्रकारे गावाचे नाव रोशन केले.

जावळेवाडीचा तमाशा सुद्धा मला आठवतो. कै.नारायण तळपे व श्री.बबन गोडे (मा.सरपंच) (राजा) श्री.शंकर गवारी (कल्याण) व श्री.दुलाजी गोडे (चेअरमन) द्वारपाळ हे पात्र करायचे.

गोडे परिवाराचा सुद्धा पुर्वी गावात दरारा होता.वचक होता. त्यांच्याकडे खेड, आंबेगाव व जुन्रर तालुक्यातुन अनेक लोक येत असत. येवढे त्याकाळात त्यांचे येवढे सबंध होते. हे अश्चर्यकारकच म्हणावे लागेल.

त्याच प्रमाणे कै.शंकर राघुजी हुरसाळे यांचे सुद्धा तत्कालीन राजकीय पुढारी खासदार श्री.अशोकराव मोहळ, कै.साहेबराव सातकर, आमदार कै.नारायणराव पवार अशा अनेकांशी जवळचे संबध होते. ते मंदोशे गावचे उपसरपंच होते. ओढणी आदिवासी संस्थेचे व्हाईस चेअरमन देखील होते.

पश्चिम भागात कै.बाळासाहेब तळपे यांचा सुद्धा प्रचंड दबदबा होता. परंतु अल्पावधीतच त्यांची राजकिय कारकिर्द बहरलीच नाही त्यातच ते गेले.

श्री.धर्मा तळपे, श्री.सुदान बारवेकर, कै.चंद्रकांत मोहन, श्री.बबन आहिरे, श्री.दिगांबर उगले, कै.विष्णू पांडू तळपे यांनी सगीत भजन तालुक्यात प्रसिद्ध केले मला आठवतय सन १९९५ साली मंदोशी गावच्या भजनाचा प्रथम क्रमांक आला होता. सन २००५ पर्यत या भजनाचा सुवर्णकाळ होता.

मला आठवतय आठवड्यातील चार दिवस हे भजन बाहेरगावी असायचे. ख-या अर्थाने मंदोशी गावाचे नाव तेव्हा सगळीकडे दुमदुमत होते. कै.चंद्रकांत मोहन यांची भजने अद्यापही कानात रुंजी घालतात.

पुर्वी गावात लग्न कार्यासाठी, यात्रांसाठी गावचा ताफा फार प्रसिद्ध होता. श्री.नामदेव रोकडे (सनई) कै.शांताराम रोकडे (सनई) श्री.कचर रोकडे (ताशा) बबन आहिरे (ताशा) कै.श्रीपत रोकडे धोटा, श्री.शिवराम रोकडे (ढोलकी/ संबळ) यांच्या ताफ्याला सन १९८५ ते १९९९ पर्यत प्रचंड मागणी होती.

हा ताफा खेड,आंबेगाव,जुन्नर व मावळ या चार तालुक्यामध्ये गावचे नाव गाजवत होता. ख-या अर्थाने मंदोशी गाव जिल्ह्यात पोहचवण्याचे काम या मंडळींनी केले आहे.

श्री.दत्ता आंबेकर अध्यक्ष व दे आई प्रतिष्ठान संचालक यांनी दे आई प्रतिष्ठाणची स्थापना करून भागात प्रथमच हळदीकुंकू, आरोग्य तपासणी, झाडांचे वाटप, भजन, किर्तन या सारख्या माध्यमातून समाजसेवेची मुहर्तमेढ रोवली व अद्यापही त्यांचे कार्य चालू आहे. त्यांचे समाजासाठी मोठे योगदान आहे.

कै.नारायण हुरसाळे यांनी म्हटलेले श्लोक कै.दत्तू हुरसाळे यांनी म्हटलेले श्लोक व मंगलाष्टका श्री.सुदाम बारवेकर यांनी वाचलेली पोथीव अध्याय अद्यापही जुने लोक विसरू शकलेले नाहीत.

श्री.वामण जढर यांच्या अमृता व नमृता या दोन मुलींनीसुद्धा बाल किर्तनकार म्हणून भरपुर प्रसिद्धी मिळवली व गावचे नाव महाराष्ट्रभर पोहचवले.

आताही ह.भ,प.अशोक महाराज हुरसाळे एक तरूण प्रवचनकार व किर्तनकार म्हणून नावारूपाला येत आहेत.श्री.रोहिदास व श्री.एकनाथ वाघमारे, श्री.गोपाळ हुरसाळे श्री.सुदामराव तळपे साहेब श्री.दत्ता गोडे, श्री.नामदेव हुरसाळे,श्री नामदेव तळपे साहेब (मंदिर बांधकामात मोलाचे कार्य) श्री.एकनाथ तळपे (उपसरपंच / बिरसा ब्रिगेड) श्री.अरूण मोहन श्री.यमन हुरसाळे, श्री.शिवाजी हुरसाळे,श्री.अनिल तळपे (अध्यक्ष शिक्षक समिती) श्री.देवराम मोहन यांचे सुद्धा गावासाठी भरपुर योगदान आहे. श्री.शंकरराव गवारी हे सुद्धा सामुदायिक वधूवर सुचक मंडळाच्या माध्यमातून काम करत आहेत त्यांनी सुद्धा गावचे नाव नाशिक, अहमदानगर, ठाणे व पुणे अशा चार जिल्ह्यात नेले आहे.

प्रा.श्री.गणेश हुरसाळे सर यांनी सुद्धा पुण्यासारख्या विद्येचे माहेघर असलेल्या शहरात शुन्यातुन ज्ञानज्योत क्लासेसच्या माध्यमातून मंदोशी गावचे नाव मोठे केले आहे. २५-३० शिक्षक त्यांच्याकडे नोकरी करतात.

मी सुद्धा ग्रामीण संस्कृतीच्या माध्यमातून गावचे नाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक जन आपापल्या परीने गावचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न करत आहेत या सारखा आनंद नाही.तरी  सगळेजण एकत्र येत नाही. हे मोठे दुर्देव म्हणावे लागेल..

 रामदास तळपे ग्रामीण संस्कृती 



बोलीभाषेतील हद्दपार झालेले ग्रामीण शब्द

जुने मराठी शब्द आणि अर्थ

आपल्या लहानपणी आपण सर्रास वापरनारे अनेक ग्रामीण बोलीभाषेतील शब्द आज जवळ जवळ हद्दपार झाले आहेत. जे शब्द उच्चारत आपण घडलो, वाढलो मोठे झालो त्या शब्दांबाबत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे या भावनेतुन आज मी जुन्या मराठी भाषेतुन हद्दपार किंवा खुप दिवस आपल्या कानावर न पडलेल्या शब्दांना उजाळा देत आहे.हे शब्द वाचताना या शब्दाबद्दल तुमच्याही काही आठवणी असतील तर त्या जागृत झाल्याशिवाय राहणार नाहीत. 

तसेच शहरात रहाणा-या आपल्या मुलांबाळांना सुद्धा याचा उपयोग होईल. आणि आपली प्रिय मातृभाषा ही लयास न जाता ती दिवसोंदिवस वृध्दींगत झाली पाहिजे याचे भान तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे.

शेतीनिष्ट शब्द

कुडवना - जमीन खणन्याचे लाकडी छोटे  औजार.

सरजाम - शेतीची मशागत करण्यासाठी    लागणारी सर्व औजारांचा संच.

शेत नांगरणी साठीचे लाकडी औजारे

नांगराचा दात, हाळस. रूमणे, मुठ, जुकाड, शिवळं, यालं, कुळव, कुळवाची दांडी, फास, जानवळी, वसु, साखळी, लोड, फराटं, फाळ, पाभर

लोखंडी वस्तू 

साखळी, फास, वसू, फाळ, पहार, टिकाव, खोरे, फावडे, कोयता, विळा, कुऱ्हाड  

चामडी वस्तू 

जुपण्या, चाबुक असे अनेक शब्द आहेत ते प्रांत निहाय बदलू शकतात.

मोट - विहिरीतुन शेतीसाठी बैलांच्या    साहाय्याने पाणी काढण्याचे साथन

पखाल - विहिरीतुन मोटेच्या सहायाने पाणी साठवुन वर काढण्याचे चामड्या पासुन बनवलेले साधन.

पोहरा- आड/ विहिरीतुन दोराच्या साहाय्याने पाणी काढण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडाची, गोल बुडाची, लोखंडी बादलीसारखी वस्तु. याचे बुड गोल असल्यामुळे ती ताबडतोब पाण्यात बुडत असे.

विहिरीच्या पाण्यात डुंबणारा/पोहणारा तो 'पोहरा क्षमता सुमारे १०-१२ लिटर असते.'आडातच (पाणी) नाही तर पोहऱ्यात कुठुन येणार' ही म्हण पोहरा या शब्दावरूनच तयार झाली आहे.

धान्य साठवणूक करण्याच्या वस्तू 

कनंग - मेसकाठीपासुन बनवलेले भात    साठवण्याचे धान्य कोठार.

कनगा-  कनगी पेक्षा थोडा मोठा असतो.

तटटया -भात साठवण्याचे चटई सारखे  मेस काठी पासुन बनवलेले कोठार. यातील धान्य संपल्यावर वळकुटी करून ठेवता येते.

पाटी - शेण किंवा धान्य वाहुन नेण्यासाठी वापर करतात.

हारा -  पाटी पेक्षा थोडा  मोठा असतो.

दुरडा-  लग्न,पुजा किंवा जेवणावळीसाठी या मध्ये भात ठेवतात.

टोपले- या मध्ये भाकरी ठेवतात.

डुरकुले व कणगुले - कणगी पेक्षा अगदी लहान असते.

शिफ्तार - जीर्ण झालेले टोपले. यामध्ये राख भरून ठेवतात व त्यावर अंडी ठेवतात. त्यावर कोंबडी बसवतात. 21 दिवसानंतर पिले जन्माला येतात. त्यासाठी शिफ्ताराचा उपयोग केला जात असे.

शीकं - मांजर दूध पिऊ नये म्हणून  शिक्यामध्ये दुधाचे भांडे ठेवून ते उंच जागेवर बांधून ठेवतात. हे शक्यतो दोरी बांधून बनवलेले असते.

बलाद - भिंतीमध्ये धान्य साठवुन      ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था.

डालगे- कोंबड्या एकत्रित करून वरून हे ठेवतात.

डालगा - वाळलेला पालापाचोळा वाहुन आणन्याचे साधन.

सुप- धान्य पाखडण्याची (नीट करणे) वस्तू.याचा उपयोग भात उपणने व त्याला वारा घालने, देवक          बांधने,बलुतेदारांना धान्य वाटने यासाठी करतात.

मासे पकडण्याची साधने.

तोंडया,भोताड, बुडदुड, येंडी, गळ

पेटे - सहा -सात वाळलेले भोपळे च-हाटाच्या सहाय्याने एकत्र बांधुन केलेले साधन याचा उपयोग नदीतील          पाण्यातुन पैलतिरावर जाण्यासाठी केला जातो..

धान्य मोजन्याची साधने.

पायली, अधुली, आठवा, निठवा. मापटी, चिपटी.

स्वयंपाकाची साधने - 

चुल - चुल स्वयपाक करण्याची  मातीचे साधन चुलीच्या पाठी थोडी जागा असते त्याला भानवस म्हणतात.चुलीच्या उजव्या बाजुला वऊल असते त्यावर तयार झालेले भात किंवा कालवणाचे पातेले ठेवतात. वऊलाच्या पाठीमागे एक मडके पुरलेले असते.त्यात मीठ ठेवतात .हे सर्व चुलीचेच भाग असतात.

दांड-  चुलीच्यावर आडवा बांधलेला बांबू किंवा काठी यावर पावसाळ्यात घोंगडी वाळत घालतात.

काठवट - पुर्वीचे पीठ मळण्याचे लाकडी भांडे.

कहाल - पेजवळ्या (घावणे) करण्याचे  बीडा पासून बनवलेले भांडे.

तानतवली /चरवी किंवा कासांडी - दुध ठेवण्याचे छोटे पसरट व उभट भांडे.

तवली - कढी,आमटी व बोंबलाचे          कालवण करण्याचे मातीचे भांडे.

माठ-  पिण्याचे पाणी ठेवण्याचे मातीचे    भांडे.

रांजण - ताक बनवण्याचे मातीचे मोठे      भांडे.

आहार - पेटलेल्या चुलीतील निखारे

चाटू -  आमटी, कालवण वाढण्याचे       लाकडी साधन.

पितळी - जेवणाचे ताट (पितळ्या ह्या पितळ या धातुपासुन बनवलेल्या असत)

पाटा- यावर मिरची वाटतात.दगडी साधन

वरवंटा - मिरची वाटण्याचे दगडी साधन

घडोशी - घडवंची यावर पाणी पिण्याची    भांडी ठेवतात.हांडे वगैरे..

तपेले - मध्यम आकाराचे तांब्या किंवा      पितळाचा छोटा हांडा .

चिमटा - चुलीतील निखारे किंवा गरम      वस्तू उचलन्याचे साधन

इंगळ - चुलीतील पेटलेले कोळसे

उखळ - भात कांडण्यासाठी असलेले दगडी खोल दगडी (गल) साधन

मुसळ - भात कांडण्याचे लाकडी साधन

शेंबी - मुसळाच्या तळाला असणारे लोखंडी गोल आकाराची वस्तू.

कालवण - आमटी किंवा पातळभाजी

कोरडयास- आमटी किंवा पातळ भाजी

घरा विषयीच्या वस्तू 

चोपणे - पुर्वी प्रत्येक घरामधील जमीन ही मुरूम टाकुन चोपण्याच्या साहायाने चोपुन सपाट केली जायची. त्यानंतर शेण व पाणी एकत्र करून जमीणीवर ते मिस्रण शिंपडले जायचे. त्याला शेणकाला करणे म्हणतात. त्यावर परत चोपण्याच्या सहायाने चोपुण सपाट करायची.

बारी - खिडकी

कोन्हेरे /देवळी - घरातील छोट्या वस्तू ठेवण्यासाठी भिंतीत केलेली आलमरी कपाट

घोंगता - पावसापासुन भिजू नये यासाठी घोंगडीमध्ये प्लँस्टीक कागद घालून तयार करतात..

तिळस - लोखंडी तार घोंगडीचा घोंगता निसटून जाऊ नये यासाठी तिळशीचा उपयोग करत,

तडकी - कारवीच्या लाकडाच्या काठ्यांपासुन बनवलेला झाप दरवाजा)

कुहीट - गवताचे छप्पर पुर्वी गावात ७५% घरे कुहीटीची असत.

पडाळ- जनावरांचा गोठा

दगडाचे जोते - पुर्वी श्रीमंत लोकांचे वाडे व घरे जोत्यांची असत. जोते म्हणजे घराच्या पायाचे दगड हे जोते तीन थरांचे असते. सगळ्यात खालच्या दगडाला बेंद्री म्हणतात. त्याच्या वरच्या थराच्या दगडाला गुंड्या म्हणतात तर सर्वात वरच्या दगडाला पानथरी असे म्हणतात. 

जोते हे दगड घडवून तयार करावे लागायचे.खुपच कष्टप्रद असे हे काम होते.आता जोते बनवने कारागिंरा अभावी नामशेष झाले आहे.(आमच्या घराचे जोते अजुनही शाबुत आहे)

खांब - लाकडाचे असतात.

तुळई -  लाकडाचा मोठा खांब दोन समोरासमोरील लाकडी खांबावर ठेवतात.

लग -एक लाकडी खांबाचा प्रकार दोन शेजारील खांबावर ठेवतात.

आडं - पुर्वी घरे बांधताना घराच्या मध्यभागी तुळईच्या वर छोट्या खांबाचे आडे असायचे.

पाखाडी  - घराच्या आड्यच्या दोन्ही खालच्या बाजुकडे  छोटे खांब असतात त्याला पाखाडी म्हणतात.

वासे - घराच्या छपरावर लाकडाचे लांब बांबू आडे व पाखाडी यावर बसवतात.

बँटम - लाकडाच्या छोट्या पट्या.वास्यांवर आडव्या बाजुने ठोकतात.त्यावर कौले बसवतात.

खण- घरातील दोन खांबामधील अंतर (साधारण पाच फुटांचे अंतर) पुर्वी घरे ही तीन खण,पाच खण व नऊ खणांची असत.

पडद्या - घराच्या समोरील व घरातील आडव्या भिंती.

चांधई - घराच्या दोन्हीही बाजुच्या दगडी भिंतीवरील निमुळत्या विटांच्या भिंती.

पडघी/ पढई - घराच्या मागच्या बाजुची छोटी आडवी खोली.

कोन्हेरे- भिंतीमधील छोटे बिगर दरवाजाचे अत्यंत छोटे कपाट.याला देवळी हा पण शब्द आहे.

भंडारी- घराची छोटी खिडकी

भानलस - चुलीच्या मागील ओट्याची जागा...भाकरी भाजल्यावर तवा उभा करतात..शिवाय भानवशीच्या उजव्या बाजुला छोटे मडके असायचे त्यामध्ये प्रामुख्याने मीठ ठेवत.व त्यावर छोट्या गाडग्या मडक्यांची उतरंड असे.भानवशीवर प्रामुख्याने मांजरे झोपत. 

घडुशी - पाण्याची भांडी ठेवण्यासाठी असलेली लाकडी घडवंची या घडवंचीला तीन लाकडी पाय असत.त्यावर हांडे व इतर भांडी ठेवत.

घडवंच्या मध्ये दोन प्रकार होते.साधी लाकडाची तीन पाय असलेली व दुसरी चार लाकडी पाय असलेली घडवंची.

शिवाय या घडवंचीलाच छोटी लाकडी मांडणी असे.त्यामध्ये पितळी व तांब्यांची भांडी ठेवत.त्याकाळी हे दृश्य अगदी शोकेस कपाटासारखे दिसे.

मांडव - पुर्वी प्रत्येकाच्या घरासमोर मांडव  असायचा.मांडवा शिवाय घराला शोभा नसे.

मेढी - मांडव तयार करण्यासाठी घराच्या अंगणात दोन्ही  आडव्या बाजुला तीन दोन इंग्रजी  Y सारखे लाकुड रोवत.

दर खणने- मेढी रोवण्यासाठी छोट्या पहारीने घेतलेला खड्डा.

फोकाट्या - मेढींवर उभे आडवे ठेवण्यात येणारे लाकडी बांबू.त्यावर निर्गुडीच्या फांद्या टाकून त्यावर गवता किंवा भाताचा पेंढा टाकत.झाला मांडव तयार.

या मांडवात दुपारी स्रीया रिकाम्या वेळेत गोधड्या शिवत,. पोरे पत्ते खेळत.. दारावर आलेले लोक (डबे करणारा, मासे घेऊन येणा-या कातकरणी, भांड्यावाला, बांगड्यांवाला, सुया दोरा विकणा-या वैदीनी,बोंबील,वाकट,भाजी विकणारे असे सगळेच लोक अथवा बायकांचा सौदा या अंगणातच होत असायचा.

शेनकाला - भरपुर शेन व पाणी एकत्र करून अंगणात टाकुन खराट्याने सगळीकडे पसरवणे..यालाच शेनकाला म्हणतात. हे वाळल्यावर अंगण सुंदर दिसते.

हगामा- हंगामा...कुस्त्यांचा आखाडा 

उरूस - यात्रा

सुपारी फोडणे - साखरपुडा

द्याज - पुर्वी नवरदेवाकडुन नवरीकडील मुलीला ठराविक किलो तांदुळ,डाळ व पैशाच्या स्वरूपात दिले जाणारी मदत.

इतर काही शब्द

गरसुळ - मंगळसुत्र

तोडे - पायात घालायचा पुर्वीचा एक दागीना. याला बाजूबंद देखील म्हणतात 

याळा - दंडात घालायचा पुर्वीचा एक दागीना

पुतळ्या - गळ्यात घालायचा पुर्वीचा एक दागीना

इस्तू-  विस्तव

सपार - मातीच छोटे घर

कुत्रू-  कुत्रा

केरसुणी - झाडू

शिरई- झाडू

औंदा/ यंदा - यावर्षात

कुपितार - विचित्र 

गैबान्या - मंद

किडुक - साप

इळंमाळं - दिवसभर

सानच्याला - संध्याकाळी 

जित्राब - म्हशी..जनावर

कापड - कपडे

ढाळवांत्या - जुलाब व उलट्या

गोमतार - गोमुत्र

माळवं - भाजीपाला 

धसकाट - ज्वारी बाजरी भात कापल्यावर जमीनीत राहिलेला काही भाग

चघाळ - जनावरांचा खाऊन उरलेला चारा 

म्होरं - पुढे

इदरं - द्वाड, हट्टी

तिवडा - पूर्वी धान्य मळण्यासाठी खळ्याचा वापर करत. खळ्यात कणसं टाकून त्यावर बैल, फिरवलेजायचे. त्यांना गोल फिरता यावे म्हणून खळ्याच्यामध्ये उभे लाकूड रोवले जायचे त्याला तिवडा म्हणत.

भुसकाट -धान्य मळल्यानंतर जो बारीक भुगा राहतो त्याला भुसकाट म्हणतात. याला जनावरं खातात.

वैरण -ज्वारी, बाजरी व भात काढल्यानंतर जो भाग एका जागी बांधून पेंडी बांधली जायची त्याला वैरण म्हणतात.

वळचण - घराच्या उतरत्या भागावरून जे पाणी पडते तो पत्र्याचा भाग जरा लांबपर्यंत घेतलेला असतो.                त्यामुळे पाणी घरापासून लांब पडते. 

बलुतं - पूर्वी वस्तू विनिमयाची पद्धत होती. त्यावेळी शेतकर्‍यांच्या गरजा गावातच भागवल्या जायच्या. सुतार, लोहार, तेली, माळी असे बारा प्रकार असायचे त्यांना बलुतं म्हणत. या बलुत्यांना शेतकरी आपल्या शेतात जे पिकेल ते थोडं थोडं प्रत्येकालाच देत असे त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असे.

लोंबी - गहू पेरल्यानंतर ज्यामध्ये गहू तयार होतो त्याला लोंबी म्हणतात.

तलंग - कोंबडीच्या लहान पिल्लाला तलंग म्हणतात.

कालवड - गाईच्या लहान पिल्लाला स्त्रीलिंगी असले तर कालवड म्हणतात व पुल्लिंगी असेल तर खोंड म्हणतात.

रेडकू - म्हशीचे लहान पिल्लू स्त्रीलिंगी रेडकू आणि पुल्लिंगी असेल तर टोणगा/रेडा म्हणतात.

दुरडी -दुरडी मेसाच्या कांब्यापासून तयार करतात त्यातून पाणी गळते... धान्यात माती, कचरा असला तर ते धान्य दुरडीत टाकायचे दुरडीत पाणी घेऊन किंवा पाण्यातच दुरडी हालवायची त्यामुळे माती केर-कचरा निघून जातो.

हारा - मेसाच्या कांब्यापासून विणून तयार केलेला असतो. लहान असते त्याला टोपलं म्हणतात, मोठ असेल त्याला हारा म्हणतात. जास्तकाळ हारा टिकावा म्हणून शेणाने सारवला जातो.

बाचकं -धान्य भरण्यासाठी पोत्याचा उपयोग केला जातो त्यात छोटं पोतं असते त्याला बाचकं म्हणतात.

वटकावण, -भाकरी भाजीत भिजू नये म्हणून पितळीत भाकरी ज्या बाजूला असेल त्या बाजूला उंचवटा करायचा. हा उंचवटा करण्यासाठी एका बाजूला उतार असलेला लाकडाचा तुकडा असायचा. त्यालाच वटकावण म्हणत.

पका - खुप

तेली - त्याला

वांझुटी - मुल नसलेली स्त्री

 पडाळ - पडवी गुरे बांधण्यासाठी केलेली जागा  

खंडी -   २० मणाची खंडी.

मण -    ४० शेराचा मण.

पायली - दोन आदुल्या म्हणजे पायली.

आदुली - चार आठवे म्हणजे एक आदुली.

औदासा - एक शिवी 

मापटं - (आठवा) एक शेर म्हणजे  दोन मापटं (आठवा)

चिपटं - (निठवा) दोन चीपटं म्हणजे एक मापटं (आठवा)

आगाद - सुरुवातीलाच... आम्ही यावर्षी आगाद लावणी केली.

आठवार - लग्न न झालेला...

आपाप - आपोआप, 

आईच्यान - आई शपथ

आळाण - बेसन 

 इवळने - ओरडणे

उनून - गरम, उलीउली - थोडा थोडा


इवाईन - विमान, इळमाळ - दिवसभर

उलिसा - थोडासा 

लय वाढखू - खुप वेळ

केंधुळा - खुप वेळ 

कुहीट- झोपडी वरचे जुने गवत 

कोडगा - निर्लज्ज, खकाणा - धूळ

गावडी - गाय,   गुताडा - गुंता

गोट - गोष्ट, बिरडं - शर्टाचे बटण

घासल्याट - रॉकेल   झावळा - सायंकाळ

डाकतर - डॉक्टर 

दाठीमुठीचा- खोटं खोटं 

धवळा - पांढरा        वजवज - हळूहळू 

नवाल - आश्चर्य        मॉकार - पुष्कळ 

नवचंडी - नवरात्र      म्हंगाला - म्हणाला

वायला - वेगळा      हाडहाड्या - खादाड

सत्री - छत्री   येटाळणी - भाताची कापणी   शिराई - झाडू         गबाळ्या - अस्वच्छ 

आम्हाली - आम्हाला   तुम्हाली - तुम्हाला

तेली - त्याला             मपला - माझा 

तूपला - तुझा            डंगरी - म्हातारी

गवारी - गुराखी          इरना - इरले 

गैबान्या - येडपट        इस्तु - विस्तव

ईदरं - विक्षिप्त                        ढाळवांत्या - जुलाब उलट्या 

पटका - फेटा, बंडी

बयाद्वार - व्यवस्थित, घडूशी - घडवंची 

न्याकाळ - सरळ 

पान लागणे - साप चावणे

बेंडगुळ - एक शिवी 

आराटबाट्या - एक शिवी

फाटी - सरपण  खासखन्या - एक शिवी

चिरगुट - चिंधी,  दूंदया - जुनी घोंगडी 

आखटी - शेकोटी 

फलाण्या बिस्तान्या - अमुक अमुक 

लांडी - लांडोर

१. वेळ /किती वाजले? आता प्रत्येक जण 'टाइम' काय झाला ते विचारतो!

२. स्थलांतर - दुष्काळ पडला किंवा एखादी रोगाची साथ आली तर पूर्वीचे लोक स्थलांतर करत म्हणजे दुसऱ्या गावी जाऊन रहात ; हल्ली सगळे लोक 'शिफ्ट' होतात!

३. टांगा/बग्गी - हे जुने घोड्याकरवी ओढले जाणारे वाहन व्यवहारातून साधारण १९७० च्या आसपास गायब झाले. त्यानंतर या शब्दाचाही व्यवहारात हल्ली उपयोग करण्याचा प्रसंग येत नाही.

४. रहाट/मोट - पूर्वी पाणी अनेक ठिकाणी विहिरीतून बाहेर काढण्याची ही साधने इतिहासजमा झाल्यावर या शब्दांचा वापर संपला. आता त्याची जागा पंप किंवा मोटर या शब्दांनी घेतली आहे.

५. महाविद्यालय - हा शब्द लांबीला मोठा असल्याने तुलनेने छोटा शब्द कॉलेज मराठीमध्ये त्या ऐवजी स्थानापन्न झाला आहे.

६. चर्चा - खरे तर हा शब्द अतिशय सुटसुटीत असल्याने त्याचा अवलंब मराठी भाषिकांनी करायला काही हरकत नाही पण तोसुद्धा हल्ली कमी ऐकायला मिळतो- पाहाल तिकडे लोक काही तरी 'डिस्कस' करत असतात!

७. वाढ दिवस - या शब्दाला बहुतेक देशी तुपाचा वास येत असावा म्हणून हल्ली अगदी अतिसामान्य व अशिक्षित घरातील पोरंसुद्धा बर्थडे(उच्चार 'ब थडे')साजरा करतात !

८. औक्षण - वाढदिवसाच्या दिवशी मूळचे किंवा मुलीचे औक्षण करणे म्हणजे तिला/त्याला ओवाळून आशीर्वाद देणे. ते जवळपास थांबल्यावर शब्द लोकांच्या विस्मृतीत जाताना दिसत आहे.

९. मेजवानी/पंगत - एखाद्या शुभ प्रसंगाचे औचित्य साधून नातेवाईक व मित्र परिवाराला मेजवानी दिली जाई आणि त्यांना रांगेत बसवून जेवण वाढले जाई. 

रांग या शब्दाला संस्कृत पंक्ती असा शब्द असल्याने त्याचा थोडा अपभ्रंश होऊन पंगत असा शब्द मराठीमध्ये रूढ झाला होता. 

हल्ली बहुतेक जणांना पंगतीपेक्षा स्वयंसेवा म्हणजे 'बुफे' अधिक सोयीस्कर वाटत असल्यामुळे ते दोन्ही शब्द आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

मेजवानी अन्य कारणाने असल्यास तिला आता सर्रास 'पार्टी' हा शब्द समाजात रूढ झाला आहे.

१०. अडचण - हा शब्द वापरायला असंख्य लोकांना सध्या काय अडचण वाटते तेच मला समजेनासे झाले आहे- त्यांना छोट्या-मोठ्या अडचणी नव्हे तर एकदम 'प्रॉब्लेम'च असतात!

या खेरीज कित्येक शब्द आहेत त्यांच्याबद्दल असेच पुन्हा कधी तरी लिहीन.

आता पुढचे काही शब्द पहा-

११. वाव - हा शब्द खरे तर अगदी सुटसुटीत आहे पण तो वडीलधाऱ्यांना वापरण्याचा वाव कमी मिळाल्याने असावे बहुतेक; नव्या पिढीला केवळ 'स्कोप' माहिती आहे!

१२. अर्धांगवायू - हा शब्द इंग्रजीमधील पॅरालीसीस साठी आहे बहुसंख्यांच्या ध्यानात नाही.

१३. हृदयविकाराचा झटका - एवढे लांबलचक कोण म्हणणार हो! त्यापेक्षा इंग्रजी हार्ट अटॅक लाच मराठी करून टाकू या!(मराठी वृत्तपत्रातील मराठी वाचून अनेकदा मलाच असा झटका येईल का अशी भीती मला काही प्रसंगी वाटत असते!)

१४. मागणी - हल्ली या अस्सल मराठी शब्दालाच 'डिमांड' उरलेली दिसत नाही!

१५. प्रस्तुत -हल्ली रॉकेटपासून ते एखाद्या बड्या असामीची पोरे एखाद्या नव्या चित्रपट किंवा क्रिकेटच्या सामन्यातून केवळ लॉन्च होतात . प्रस्तुत शब्द एवढ्या लवकर अप्रस्तुत का बनला तेच समजत नाही!

१६. रोचक - रुची शब्दावरून उद्भवलेला हा शब्द खरे तर इंग्रजीतील 'इंटरेस्टींग'ला छान मराठी पर्याय आहे पण वापरला जात नाही एवढे खरे.

१७. मधुमेह- कित्येक लोकांना सतावणाऱ्या इंग्रजी डायबेटीस ला मराठीमध्ये असा शब्द आधीपासून आहे हे सांगायची पाळी यावी?

१८. तपासणी - इंगजीतील इन्स्पेक्शन आणि व्हेरिफिकेशन अशा या दोन्ही छटा संदर्भानुसार हा मराठी शब्द दाखवू शकतो पण हल्ली फार ऐकायला मिळत नाही.

१९. लक्ष्य - इंगजीतील टार्गेट साठी असलेला हा शब्द व्यवस्थापन शास्त्रातील मंडळींनी पुढाकार घेतला तर अधिक वापरात येऊ शकेल असे माझे मत आहे.

२०. नातीगोती - हल्ली हा शब्द लुप्त होत चालला आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे नातेवाईक सुद्धा नोकरी/व्यवसायाच्या निमित्ताने जगभर विखुरले जात आहेत. इंग्रजीमधील आणि त्यांच्या प्रभावाखालील मराठीसुद्धा माध्यमांमुळे 'रिलेशनशीप'ने तर बहुसंख्य लोकांच्या मनांना भलत्याच संशयाकडे ढकलण्याचे काम चालविले आहे.

हा आहे आणखी काही मराठी शब्दांचा संच -

२१. नाश्ता- हल्ली हा शब्द मागे पडून ब्रेकफास्ट शब्द पुढे चालला आहे.

२२. भोजन - हा शब्द लाँच किंवा डिनरच्या आक्रमणापुढे टिकाव धरू शकलेला नाही. त्याला हिंदी 'थाळी' शब्दाने काही ठिकाणी बाजूला ढकलले आहे. मात्र सर्वात पुढे धावणारा शब्द 'राईस-प्लेट' आहे!

२३. भात - खरे तर किती साधा सोपा शब्द आहे,पण हॉटेलध्ये गेल्यावर हॉटेलचा सेवक मराठी जाणत नाही म्हणून महाराष्ट्रात राहून मराठी लोक त्याला 'अब राईस लाओ' असं सांगतात तेव्हा हसावे की रडावे असा मला प्रश्न पडतो!

२४. फलक - होर्डिंग किंवा बोर्ड याला एकसुद्धा जोडाक्षर नसलेला मराठी शब्द आता कुणी वापरताना आढळत नाही. त्यावरून माझ्या मनातील जुनी समजूत - "समाज सहजसोपे शब्द उच्चारायला अधिक क्लिष्ट शब्दांपेक्षा अधिक सहज पसंत करतो" आता गैरसमजूत असल्याचे मला समजू लागले आहे!

२४. प्रशाला - या शब्दाला आता मराठी जनतासुद्धा तुच्छतेनेच पाहू लागली आहे. प्रत्येकाला इंग्रजी माध्यमाच्या एखाद्या 'इंटरनॅशनल स्कुल'मध्ये आपल्या पोरांनी शिकावे (मात्र त्याची 'फी' मराठी माध्यमाच्या शाळेपेक्षा ज्यास्त नसावी) असे वाटू लागले आहे!

२५. उड्डाणपूल - हा शब्द फार जुना नसला तरी फार नाव नाही पण तरी फ्लाय ओव्हर शब्दाला लोकांचा अधिक प्रतिसाद मिळतो. कदाचित अन्य भाषिकांकडे पत्ता विचारताना त्याला लवकर प्रतिसाद मिळतो असा अनुभव याला कारण ठरत असावे.

२६. सखी - हा शब्द खरे तर सध्याच्या गर्लफ्रेंड शब्दाला अत्यंत चपखल शब्द आहे पण तो जुन्या भावगीतांच्या इतिहासाबरोबर अंतर्धान पावला आहे. (सखी मंद झाल्या तारका आठवते का ?)

२७. अंगरक्षक - या शब्दाला सर्रास बॉडीगार्ड शब्दाने विस्मृतीच्या गर्तेत ढकलून दिले आहे!

२८. धोकादायक - हा शब्द ज्या शब्दांच्या स्पर्धेत मागे पडला ते म्हणजे इंग्रजीतील 'डेंजरस' आणि 'रिस्की'. हिंदीतील खतरनाक आहेच त्यांच्या जोडीला!

२९. आघात - या शब्दाची उचलबांगडी प्रामुख्याने धक्का आणि तडाखा या शब्दांच्या अतिरेकी वापराने मराठी अर्धवटराव माध्यमांनी घडवली आहे.

३०. एकमेव - इंग्रजीमधील unique या शब्दाला असा शब्द मराठीत आहे हेच अनेकांच्या आता ध्यानी मनी राहिलेले नाही.

आज मराठीप्रेमींना स्मरण करून देण्याजोगे आणखी काही शब्द पाहू -

३१. अंतर्धान - इंग्रजी शब्द disappear ला हा अत्यंत चपखल मराठी शब्द आहे.

३२. गुंतागुंत - इंग्रजी complexity म्हणजे मराठी गुंतागुंत !

३३. भारदस्त - इंग्रजी elegant शब्दाला अर्थाच्या छटेने खूप जवळ जाणारा शब्द आहे.

३४. पोक्त - प्रगल्भ(इंग्रजीत mature ) या संस्कृत शब्दाला हा दुसरा पर्याय बोलीभाषेचा विचार करता मला अधिक सोपा वाटतो.

३५. तक्ता - chart

३६. आलेख - इंग्रजीतील graph

३७. तातडीची - urgent

३८.निकड - म्हणजे गरज (requirement /need )

३९. पत - म्हणजे इंग्रजीत credibility

४०. उत्पात - म्हणजे विस्फोट (चालू पत्रकारितेच्या भाषेत 'धक्का'!)

४१. घळ - म्हणजे लहानशी दरी किंवा मोठा चर

४२. ओरखडा - म्हणजे इंग्रजीमधील scratch

४३. क्षय - म्हणजे एखादी गोष्ट हळू हळू झिजत निकामी होणे ( हल्ली फारसा ऐकिवात येत नसलेल्या TB या आजारात रुग्णाला हाच अनुभव येत असे.) यालाच इंग्रजीत wear and tear म्हटले जाते.

४४. अविश्वसनीय - इंग्ग्रजी incredible ला १००% समर्पक मराठी शब्द. एखादी घटना आपल्याला थक्क/विस्मयचकित करते तेव्हा उपयोगाला येतो.

४५. (हाड)वैर - हल्ली या शब्दापेक्षा पिढीजात दुश्मनी शब्द अधिक प्रचलित आहे,का कुणास ठाऊक!

४६. सफलता/साफल्य- हे शब्द इंग्रजी success मुळे मागे पडले आहेत.

४७. आमटी/वरण/डाळ - जसे रोजचे खाणे तशी भाषा . अधिकाधिक लोक महाराष्ट्रातसुद्धा हॉटेलातील पंजाबी किंवा चायनीज खाऊ लागल्यावर हे शब्द आता गायब व्हायची वेळ जवळ येऊ लागली असावी. 

आता सगळे 'दालचावल/दाल तडका' नाही तर भात; नव्हे 'राईस' मागतात. तुफान चालणारी बहुतेक हॉटेले अमराठी भाषिकांची असल्याने त्याचा अर्थकारणावरील पगडा आता आपल्या भाषेवरसुद्धा आक्रमण करत असल्याचा हा मी पुरावा मानतो.

४८. संडास-हा शब्द आता गेल्यात जमा आहे. आता सगळीकडे 'वॉशरूम' शोधल्या जातात.

४९. न्हाणीघर- काही काळ या शब्दाला इंग्रजी बाथरूम शब्दाने मात दिली होती. आता बाथरूम शब्दसुद्धा कमी ऐकायला मिळतो कारण बहुतेक घरे-दुकाने- वसतिगृहासारख्या संस्थांमधून स्नान करण्याची सुविधा आणि शौचाची व्यवस्था एकाच ठिकाणी आणण्यात आली आहे.

५०. लागवड - हा शब्द ट्री प्लांटेशन शब्दाच्या माऱ्यामुळे शहरी लोक विसरूनच गेले आहेत.

मराठी रिचार्ज (रिचार्जला मराठीत मला अद्याप शब्द सुचलेला नाही!)

५१.निम्मा/अर्धा - या शब्दांना 'हाफ' मराठी लोकांनी मारून टाकल्यात जमा आहे!

५२. खास/विशेष - आता सगळीकडे चहासुद्धा साधा नाही तर नॉर्मल आणि खास/विशेष नाही तर स्पेशल असतो.

५३. मोटरसायकल - हा शब्द मुळात मराठी नव्हताच पण रुळला असे वाटत असतानाच त्याचे बाईकने पाहता पाहता उच्चाटन करून टाकले!

५४. घृणा - हा शब्द छोटा असून लोकांना त्यापेक्षा हेट अधिक जवळचा का वाटावा हे मला उमगलेले नाही. (किळस शब्द मुळातच किळसवाणा वाटल्याने बहुसंख्यांनी त्याला आधीच उचलून बोली भाषेबाहेर फेकले आहे.)

५५. आक्रीत - म्हणजे आश्चर्यकारक घटना (उदा. एखाद्या सांबर किंवा हरणाने शिंगांनी बिबट्याला पळवून लावले )

५६. सुगम- म्हणजे सहज समजते असे. हल्लीचे संगीतसुद्धा दुर्गम झाल्याने की काय,कुणास ठाऊक , हा शब्द आता ऐकू येत नाही!

५७. चाचणी - सगळे लोक हल्ली टेस्ट घेत/देत असतात , कशाचीही अगदी यंत्र किंवा वाहनांची चाचणी घेत नाहीत.

५८. कार्यालय- हा शब्द फारसा कोणी वापरत नाही ,त्याच्या तुलनेत ऑफिस हा शब्द कित्येक पटींनी अधिक प्रचलित झाला आहे,

५९. ढब - हा शब्द तर आता ऐतिहासिकच म्हणावा लागेल. त्या तुलनेमध्ये शैली हा शब्द काहीसा इंग्रजी स्टाईल (style ) ऐवजी कधी-कधी ऐकायला मिळतो.

६०. परिपक्व - एखादे फळ व्यवस्थित पिकले म्हणजे परिपक्व झाले . तशीच काही वेळा कठोर निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीसुद्धा परिपक्व बनावी लागते. या शब्दाला काहीसा जवळ असा प्रगल्भ म्हणजे इंग्रजीत matured शब्द ही काही वेळा वाचनात येतो.

६१. दंडक - म्हणजे नियम जो बहुतेकदा व्यक्त्तीने स्वतःच निवडलेला असतो. उदाहरणार्थ - अंघोळ आणि पूजा केल्याशिवाय तात्या पाणीसुद्धा पीत नसत, तसा त्यांचा दंडकच होता.

६२. ताळा - म्हणजे इंग्रजीत Talley

६३. पडताळणी - म्हणजे इंग्रजीतील verification .उदाहरणार्थ पोलिसांनी पडताळणी केल्याशिवाय कधी कधी संकटाला आमंत्रण ठरू शकते.

६४. तपासणी - म्हणजे check up . उदा. सरकारी नोकरीवर रुजू करून घेण्यापूर्वी उमेदवाराची वैद्यकीय तपासणी अनिवार्य आहे.

६५. विस्कळीत - म्हणजे अनियमित अथवा विचलित . उदा. एखाद्या दिवशी दूर गावाला जायचे असले तर बहुसंख्यांची दिनचर्या गावी पोचेपर्यंत विस्कळीत होते.

६६. विचलित - म्हणजे इंग्रजीत disturbed /anxious . उदा. सगळ्या खबरदाऱ्या घेऊनसुद्धा जेमतेम दहा दिवसात वडिलांना पुन्हा उपचारांसाठी मुंबईला इस्पितळात दाखल करावे लागल्याचे समजल्यावर अजय न्यू जर्सीमध्ये बराच विचलित झाला.

६७. उतावळा/उतावीळ -म्हणजे इंग्रजीत impatient ; याला दुसरा चांगला मराठी शब्द आहे अधीर (ज्याला धीर नाही असा/अशी)

६८. जोम - म्हणजे इंग्रजी vigour . हा शब्द हल्ली फारच कमी वापरला जातो. त्या तुलनेत हिंदी जोश हा शब्द अधिक लोकप्रिय होत चालला आहे. (त्याचा देशामधील लाखो जोशींशी काही संबंध आहे काय ते मला कुतूहल आहे.)

६९. आज्ञा- जा शब्द खरे तर उर्दू हुकूम आणि इंग्रजी ऑर्डर याला चपखल मराठी (मूळ संस्कृत) शब्द आहे पण काही बालनाट्य किंवा ऐतिहासिक नाटके वगळता तो मला कधी कोणी वापरताना पहायला मिळाले नाही.

७०. अवांतर - म्हणजे इंग्रजी मधील Extra curricular. उदा. माझ्या मुलीचे अवांतर वाचन शाळेत असल्यापासून दांडगे होते आणि तिला त्याचा परदेशात गेल्यावर खूप उपयोग झाला.

७१. अवखळ - म्हणजे खोडकर ,चांगल्या अर्थाने स्वतंत्र किंवा अनियंत्रित . उदा. गायीची वासरे सहसा अवखळ असतात.

७२. अकस्मात - म्हणजे अपेक्षा नसताना . पावसाळ्यात अकस्मात वीज पडून शेतकरी दगावल्याची बातम्या आपण दर वर्षी वाचतो.

७३. मोप/ बक्खळ - हे शब्द ग्रामीण भागात खूप या अर्थाने पूर्वी सर्रास वापरले जात. आता फारसे ऐकू येत नाहीत.

७४. दबदबा - म्हणजे इंग्रजीतील influence . त्यात भीतीयुक्त आदर असतो. उदा."रावबहाद्दूर साहेबांचा त्यांच्या पंचक्रोशीत चांगलाच दबदबा होता."

७५. नाठाळ - म्हणजे सातत्याने उपद्रव निर्माण करणारा माणूस किंवा प्राणी. उदा."काही घोडे अत्यंत नाठाळ असतात,अपरिचित व्यक्तीला त्यांच्यावर स्वार होणे अशक्य करून सोडतात."

७६.अंमळ - म्हणजे अगदी थोडेसे.उदा. "आमटी छानच झाली आहे,फक्त मीठ अंमळ कमी चालले असते."

७७. अलगूज - म्हणजे पावा /बासरी हे वाद्य.

७८. अलगद - म्हणजे अगदी हळुवार . "जाईच्या वेलाजवळून जाताना एक फूल अलगद माझ्या डोक्यावर पडले. मला तो शुभशकुन वाटला."

७९. बिलंदर - म्हणजे चालू मराठी लोकांच्या इंग्रजीत ज्याला चॅप्टर म्हणता येते. कदाचित एखाद्या वस्ताद व्यक्तीलाही बिलंदर म्हणता येईल पण वस्ताद हा शब्द कुस्तीच्या क्षेत्रातसुद्धा प्रचलित आहे व त्याचा अर्थ वेगळा असू शकतो,तसे बिलंदरचे नाही.

८०. सर्वेसर्वा- म्हणजे बहुरंगी-ढंगी किंवा हरहुन्नरी ;इंग्रजीत all -in -one . उदाहरणार्थ कै. पु ल देशपांडे 'वटवट' या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा होते. त्याचे लेखन-दिग्दर्शन-संगीत-अभिनय अशा सगळ्या आघाड्या भन्नाट होत्या.

८१.फट /भेग/सांदी - म्हणजे सध्याच्या प्रचलित भाषेत gap (यातील सांदी हा शब्द संधी म्हणजे जोड या संस्कृत शब्दाचे अपभ्रष्ट रूप असावे असे माझे मत आहे.) "हरवलेली किल्ली घराच्याच एखाद्या सांदीकोपऱ्यात पडली असेल,नीट शोध." असा सल्ला अनेक घरातून दिला गेला असेल.

८२.चविष्ट - ह्या शब्दाला आता 'टेस्टी'ने हद्दपार केल्यात जमा आहे.

८३. व्यग्र - म्हणजे इंग्रजीत busy . हिंदीच्या अनिष्ट प्रभावामुळे मराठी माध्यमेसुद्धा याच्या ऐवजी 'व्यस्त' असा शब्द प्रयोग काही वेळा मराठीत वापरतात 

पण तसे करणे अनुचित वाटते कारण व्यस्त शब्दाचा मराठी अर्थ निराळा आहे - तो विषम प्रमाणात बदलणाऱ्या दोन परस्पर-संबद्ध गोष्टींमधील संबंध दर्शवणारा शब्द आहे(होता). 

इंग्रजीत सांगायचे झाल्यास B varies inversely as A . यातील inversely म्हणजे व्यस्त प्रमाणात . (B म्हणजे व्यक्तीला मिळणारा फळाच्या तुकड्याचा आकार आणि A म्हणजे फळाचे वाटप केल्या जाणाऱ्या व्यक्तींची संख्या अशी कल्पना करा.)

८४. शिपाई - हा शब्द मुळात उर्दू/हिंदी सिपाहीवरुन आलेला पण नंतरच्या काळात सैनिक/जवान किंवा अन्यत्र peon या शब्दांच्या भाऊगर्दीत आता कुणी तो फारसा वापरत नाही.

८५. मेळ - म्हणजे coordination तसे coordination नसेल तर आजसुद्धा काही ठिकाणी खात्यात ताळमेळ नाही असा शब्द ऐकू येतो. त्यातील ताळ म्हणजे ताळा म्हणजे पडताळणी,एखादी बाब तपासून बघणे.

८६. बडदास्त - म्हणजे व्यवस्था किंवा त्याच्याशी निगडित पाहुणचार/सरबराई. उदा. "पाहुण्यांची नीट बडदास्त ठेवा,ते फार मोठे सरकारी अधिकारी आहेत."असे एखादा अतिथिगृहाचा प्रमुख तेथील व्यवस्थापकाला सांगताना म्हणत असे.

८७. वादंग - इंग्रजीतील dispute साठी मराठीमधील अत्यंत चपखल शब्द!

८८. गचाळ - म्हणजे इंग्रजीत callous /shabby .भोंगळ हा शब्दसुद्धा काही वेळा याला समानार्थी ,मानला जातो पण माझ्या आकलनानुसार भोंगळ शब्द सहसा राहाणीमानाशी जोडलेला असतो. "क्षेत्ररक्षण गचाळ असेल तर चांगले गोलंदाजसुद्धा सामना वाचवू शकत नाहीत."

८९. सूतिकागृह - म्हणजे इंग्रजीतील               maternity home

९०. टिचकी - म्हणजे इंग्रजीमधील क्लिक 

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)  



 

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...