मोहन घराणे परिचय
मंदोशी गावचे मोहन घराणे हे पश्चिम भागात मोठे जमीनदार म्हणून प्रख्यात होते. रामजी मोहन, भाऊ मोहन व शिवराम मोहन हे मंदोशी गावचे मुलकी पाटील होते. गावातील लग्नसमारंभ असो की कुठलाही सण पाटलाचा मान पहिला असायचा. पोलिस, न्यायाधीश अशा सर्वच भूमिकांत पाटलाचे महत्त्व होते. त्यांच्या घरात एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे त्यांच्या घरी 30 ते 40 माणसे असायची.
मुख्य पुरुष मानाचे मोहन
मानाजी मोहन हे मोहन घराण्याचे मुख्य पुरुष होते.
मोहन घराण्यामध्येमोहन घराणे एकत्र कुटुंब पद्धती
त्यांच्या घरात अगंतूक आलेला पाहुणा अगदी महिना, महिना राहत असे. कधी कधी काही अगंतुक बाहेर गावचे लोक अगदी महिना महिनाभर फुकट रहायचे. घरात मानसेच एवढी असायची की प्रत्येकाला वाटायचं असेल दुसऱ्या भावाचा किंवा भावजईचा पाहुणा. त्यामुळे पाहुण्यांना किंवा अगंतुक असलेल्या एक दोघांना मोहन घराणे पाहुणेच समजून त्यांची सरबराई करायचे.
शेतीची मशागत
मोहन घराण्याकडे शेतीची मशागत करण्यासाठी त्यावेळी बैलांच्या चार जोड्या होत्या. म्हणजे एकूण आठ बैल.
गावातील रोकडे वस्ती मधील लिंबाजी पाटोळे हे त्यांच्याकडे चाकरी होते. ते कायम शेत नांगरणी आणि अवनीच्या वेळेस गाळ करण्यासाठी प्रसिद्ध होते. अवणीचा गाळ करावा तर लिंबाजी पाटोळे यांनीच अशी त्यांची ख्याती होती.
लिंबाजी पाटोळे सारखेच चार-पाच गडी देखील त्यांच्याकडे चाकरी होते.
मोहन घराणे पाटीलकी
पूर्वी पेशव्यांच्या काळात पाटीलकी मोठ्या गावापुरती मर्यादित होती.पण इंग्रजांनी लहानातल्या लहान गावासाठीसुद्धा “मुलकी पाटील” नेमले.
उद्देश:
1. प्रत्येक गावाचा महसूल (कर) वेळेवर मिळावा.
2. गावशिस्त आणि पोलिसी कामकाज पाहण्यासाठी स्थानिक जबाबदार व्यक्ती असावी.
3. सरकारच्या आदेशांची थेट गावात अंमलबजावणी होण्यासाठी मध्यस्थ.
इंग्रजांच्या काळात मोहन घराण्याला मुलकी पाटीलकी बहाल करण्यात आली होती.
सुरुवातीला रामजी मोहन हे मुलकी पाटील होते. सन 1876 साली पहिल्यांदा रामजी मोहन हे मुलकी पाटील झाले. ते सन 1876 ते सन 1927 पर्यंत पाटील होते.
त्यानंतर सन 1927 ते सन 1933 पर्यंत भाऊ मोहन हे मुलकी पाटील होते. त्यांनी सन 1933 मध्ये पाटील या पदाचा राजीनामा दिला. व त्यांच्या सुशिक्षित पुतण्याला म्हणजेच शिवराम मानाजी पाटील यांना पाटीलकी बहाल केली.
सन 1933 ते सन 1978 पर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत प्रदीर्घकाळ शिवराम मोहन हे त्यावेळी मंदोशी गावचे मुलकी पाटील होते. त्यानंतर लक्ष्मण मोहन यांना पाटील होण्याची संधी होती. परंतु ऐनवेळी ते मुंबईला निघून गेल्यामुळे त्यांना पाटील काही होता आले नाही.
आणि पुढे मोहन घराण्याकडे असलेली पाटीलकी लक्ष्मण मारुती तळपे यांच्याकडे गेली.
इंग्रज सरकारकडून त्यांना खास पाटील इनाम व पासोडीचे वतन ह्या जमिनी देण्यात आल्या होत्या. मालकी जमिनी तर वेगळ्याच होत्या. शिवाय गवताचे रान, आडवं व विविध झाडे झुडपे असलेली राने अशा अनेक जमिनी होत्या.
पाटलांची पाण्याची मोट आणि शेती
पिपळडहाळ येथे ओढ्याच्या कडेला मोहन पाटील यांची मोट होती. चार बैलांच्या सहाय्याने ओढ्यातील पाणी पखाली मधून शेताला दिले जात असे. लिंबाजी पाटोळे हे मोट चालवत असत.
लिंबाजी पाटोळे हे मोटे वरची गाणी, मोट चालवताना असे काही म्हणत की नुसते ऐकत रहावे. असे लोक सांगायचे.
स्वातंत्र्य पूर्वीच्या त्या काळात मोहन पाटील हे भात निघाल्यावर रब्बीच्या हंगामात कांदे बटाट्याचे पीक घेत असत. त्यांच्याकडे गावातील अनेक लोक कामाला जात असत.
त्या काळात मंदोशीच्या ओढ्यावर सुलपाजवळ मोहनांची खूप मोठी बांधण होती. या बांधणीचा बांध घडीव दगडामध्ये आणि कमावलेल्या चुन्यामध्ये त्या बांधाचे बांधकाम केले होते.
या बांधणीला 25 खंड्या भात होत असे. म्हणजे 250 पोती भात. नुसत्या बांधणीलाच एवढे भात. तर इतर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शेतीतून किती उत्पन्न मिळत असेल विचार करा.
त्यावेळेस भात खरेदी करण्यासाठी व्यापारी खटार गाड्या घेऊन मोहनांकडे येत असत. व भात विकत घेऊन जात असत. भात खरेदीच्या बदल्यात काही रक्कम रोख असे तर काही वस्तूच्या स्वरूपात असे. व्यापारी येताना खटार गाड्या मधून बाजरीची पोती, गुळाच्या ढेपी (एक गुळाची ढेप वीस किलोची असायची.) व असे अनेक जीवनावश्यक वस्तू घेऊन येत असत.
भात शेती बरोबरच ते नाचणी, सावा, वरई व खुरासणी यांची पिके घेत असत. त्याबरोबरच भुईमूग, उडीद, मसूर, हरभरा, हुलगा, वाटाणा इत्यादी पिके सुद्धा मुबलक काढत असत.
गरीब शेतकऱ्यांना मदत
गावातील गरीब शेतकऱ्यांचे धान्य श्रावण भाद्रपद महिन्यात संपत असे. त्यामुळे लेकरा बाळांची आबाळ होई. अशावेळी लोक सिताराम मोहन पाटील यांच्याकडे जात असत. व त्यांच्याकडून सात-आठ पायल्या भात घेऊन येत असत. या भाताच्या बदल्यात लोक त्यांच्याकडे भात कापणी करत असत.
लिंबाजी पाटोळे
लिंबाजी पाटोळे हे खास औत हाकण्यासाठी त्यांच्याकडे होते. तर शंकर अहिलू तळपे हे सकाळी उठून हिरव्यागार गवताच्या पेंढ्यांचा एक भारा त्यांच्या दारात टाकत असत. त्या बदल्यात एक वेळचे जेवण व महिन्याभराचा गुळ आणि चहा पावडर मिळत असे.
शिवराम मोहन पाटील
शिवराम मानाजी मोहन यांच्याकडे मंदोशी गावची मुलकी पाटीलकी होती. ही पाटीलकी अगदी इंग्रज काळापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत सन 1978 पर्यंत त्यांच्याकडे होती.
शिवराम पाटील यांना त्यावेळी इंग्रज सरकारने अमर्याद अधिकार दिले होते. शिवराम पाटील यांचे शिक्षण व्ह.फा. म्हणजे (Vernacular final) म्हणजेच सातवीपर्यंत झाले होते. त्यामुळेच त्यांना पाटीलकी मिळाली होती.
गावातील जमिनीच्या नोंदी बाबत तलाठ्याला मार्गदर्शन करणे, गावचा न्याय निवडा करणे. महसुलाच्या नोंदी ठेवणे, महसूल गोळा करणे अशी विविध कामे त्यांना करावी लागत असत. त्या बदल्यात त्यांना इंग्रज सरकारने पाटील ईनाम म्हणून जमिनी दिल्या होत्या. पाटीलकी गेल्यानंतरही स्वातंत्र्योत्तर काळात या जमिनी त्यांच्याकडेच राहिल्या.
पूर्वी महाराष्ट्रात पेंढार म्हणून एक जात होती. ते लोक झुंडीने गावात प्रवेश करत असत. व झुंडीने गावावर हल्ला करून घरातील मालमत्तेची लूट करायचे. गावातील गरीब लोकांनी लहान मुलांना ठेवलेले भाजी भाकरी घरात घुसून घेऊन जायचे.
एकदा मंदोशी गावात असेच हे पेंढार लोक झुंडीने आले होते. एकट्या शिवराम पाटील यांनी त्यांना पिटाळुन लावले.गंमत अशी की त्यावेळेस नेमका अचानक पाऊस होऊन ओढ्याला महापूर आला होता. हे पेंढार लोक माराच्या भीतीने गावडोहामध्ये उड्या मारून पोहत पोहत पळून गेले.
मोतीराम मोहन पाटील
मोतीराम मोहन पाटील हे जास्त कडक व आडदांड स्वभावाचे होते. त्यांनी शेतात कधी काम केले नाही. परंतु त्यांना तमाशाची जास्त आवड होती.
त्यावेळेस मंदोशी गावचा तमाशा होता. विष्णू कमाजी हुरसाळे हे तमाशा मालक होते. त्यांच्या तमाशात मोतीराम मोहन पाटील व संपत कृष्णा जढर नाच्याचे काम करायचे. या तमाशामध्ये शंकर अहिलु तळपे, कुशाबा दगडू बांगर, ढोलकी पटू ज्ञानदेव तळपे असे अनेक कलाकार होते.
मंदोशी गावचा तमाशा कोकणामध्ये फारच प्रख्यात होता.
सिताराम मोहन पाटील
सिताराम मोहन पाटील हे अतिशय शांत संयमी व मनमिळाऊ स्वभावाचे गृहस्थ होते. परंतु गावात त्यांच्या शब्दाला किंमत होती. ते आडल्या नडलेल्याला नेहमीच सढळ हाताने मदत करत असत. त्यांना खेड तालुक्याच्या पश्चिम भागात खूप मान सन्मान होता. बय आणि बाबा हे त्यांच्या तोंडात नेहमी येणारे शब्द होते.
शंकर मोहन पाटील
हे कावीळ उतरण्यासाठी खास रामबाण औषध देत असत. शिवाय विंचू, साप डसल्यावर ते उतरवत असत. शिवाय ते बाहेरचे (भुत बाधा) देखील पाहत असत.गावची यात्रा ठरल्यावर प्रसादिक भारुड आणण्यासाठी गाव शंकर मोहन यांच्यावर जबाबदारी सोपवत असे.
मोहन पाटलांची ख्याती
मोहन पाटलांचे कुणीही पुरुष माणूस रस्त्याने चालले की स्त्रिया पायातल्या चपला हातात घ्यायच्या व पदर डोक्यावर घेऊन चालायच्या. पायातील जोडव्यांचा किंवा हातातील बांगड्यांचा आवाज सुद्धा करत नसत. लहान मुले खेळत असल्यास त्यांना पाहताच आपला खेळ थांबवत असत. व ते निघून गेल्यावर पुन्हा खेळत असत.
वर्षातून एकदा गावातील त्यांच्याकडे काम धंदा करणाऱ्या लोकांना ते बोलावत असत व तांदळाच्या पिठाचे गुळ व डाळीच्या पुरणाचे उंडे बनवून ते खायला देत असत. हे उंडे तेव्हा फारच प्रसिद्ध होते.
शिमग्याच्या सणाला घरातील प्रत्येक सदस्याला कपड्याचे दोन जोड घेतले जात. स्त्रियांसाठी लुगडी व चोळीचे खण, पुरुषांसाठी धोतर जोड व पटका, पूर्वीचे पटके नऊ हात लांब असत. मुलांसाठी अंगात घालण्यासाठी बंडी असे. चड्डी नसे. त्यावेळी मुलांनी लंगोटी लावण्याची प्रथा होती.
सर्व प्रकारचे धार्मिक सण साजरे केले जात. सण समारंभासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक असे.
दिवाळीला उकडलेल्या डांगराचा गर तांदळाच्या पिठात गुळ घालून त्याचे वडे बनवले जात असत. त्यांना भोकाचे वडे असे म्हणत. तसेच काकडीच्या गरात गुळ व तांदळाचे पीठ घालून ते हळदीच्या पानावर थापून पातेल्यामध्ये वाफेवर शिजवले जाई. त्याला पातोळ्या म्हटले जात असे. हे दोन पदार्थ दिवाळीला अतिशय सगळीकडेच प्रसिद्ध होते.
दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी गावातील झाडून सारे लोक मोहन पाटलांच्या घरी भेटायला येत असत.
गुढीपाडवा व वीर नाचवने
गुढीपाडव्याला मोहन पाटलांची गुढी ही सर्वात उंच असे. त्याच्या खालोखाल इतर लोकांच्या गुढ्या असत.
गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी मोहन घराण्यांचा वीर नाचवण्याचा कार्यक्रम व्हायचा. या कार्यक्रमासाठी वाड्या वस्त्यांमधून लोक जमायचे. ढोल ताशे, व सनई चौघडे यांच्या गजरात मिरवणूक निघत असे.
उंच काठी घेऊन मिरवणूकीचा कार्यक्रम सुरू व्हायचा. त्यानंतर प्रसाद वाटप केला जात असे. (आता करतात का नाही काही माहीत नाही.) त्यानंतर आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी व्हायचे.
शिकार करणे हा त्यावेळी लोकांचा खूप मोठा छंद होता. गावामध्ये मोहन पाटलाकडे व दुलाजी देवळा तळपे यांच्याकडे बंदूका होत्या. अजून दोन जणांकडे अशा गाव मिळून चार बंदुका होत्या.
जंगलात शिकारीला जाण्याची पद्धत
गावकरी वर्षातून दोनदा शिकारीला निघायचे. सबंध राने, वने तुडवीत मोठ्या रानात हे लोक भयभीत होऊन शिरायचे. एकमेकांचे हात धरून झुंडीने रान तुडवायचे. कुठून सशाने जरी उडी मारली तरी वाघ आला अशा भीतीने ओरडायचे.
लाठ्या काठ्या आपटीत, आरडाओरडा करीत सारे रान उठवीत. कुठून तरी आठ दहा रानडुकरांचा कळप दौडू लागे. मग डुक्करे आपल्या अंगावर येतील या भीतीने बंदुका रोखल्या जात. काही लोक झाडावर चढून बसत.
लाठ्या, काठ्या घेऊन पळणारे लोक'अरे लवकर बार काढा, लवकर बार काढा असे ओरडत सुटत. आणि मग जीवाच्या आकांताने चाप ओढून ढमा ढमा बार काढले जात. त्यातला एखादा रानडुक्कर आडवा होई. त्याच्यावर पुन्हा दोन गोळ्या घालून तो मेलेलाच आहे याची खात्री करून घेतली जाई.
तथापि डुक्कर कोणाच्या गोळीने मेले याची चर्चा होऊन पुढे भांडणे माजण्या पर्यंत पाळी येई. पहिली गोळी कुणी मारली हे कुणीच सिद्ध करू शकत नसे. तरी पण पहिली गोळी माझीच असे प्रत्येक बंदूकवाला म्हणायचा. आणि भांडणे व्हायची.
सत्यनारायण पूजा व करमणुकीचे साधने
उन्हाळ्याच्या दिवसात सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन केले जायचे. संध्याकाळी करमणुकीसाठी प्रसादिक नाट्यरूपी भजनी भारुड यांचा कार्यक्रम असायचा.
दरवर्षी मोहन घराण्यांकडे सत्यनारायणाची पूजा असायची. संध्याकाळी जेवणाच्या पंगती बसायच्या. आमटी, भात, शाकभाजी हे जेवण असायचे. त्यानंतर भारुडाचा कार्यक्रम असायचा.
ही परंपरा पुढे गणपत मोहन यांनीही काही काळ चालू ठेवली होती.
पांजी
दर तीन वर्षांनी मंदिराकडे मोहन घराणे पावसाळ्याच्या सुरवातीला मुक्तार देवाला मेंढ्याचा बळी देत असत. त्याला पांजी असे म्हटले जात असे.
या पांजीचे जेवण जेवण्यासाठी गावातील लोक पितळ्या घेऊन जात असत. हे जेवण रात्री पावसाच्या रिपरीपीमध्ये चालत असे. अजूनही ही प्रथा चालू आहे.
एकत्र कुटुंब पद्धत
पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंबात इतके सदस्य असायचे की, कुटुंबातील लग्न झालेल्या जोडप्यामध्ये भांडण झाले किंवा भावंडं आपसात भांडले तर घरातील वडीलधारी मंडळी मतभेद मिटवायचे. त्याचबरोबर योग्य तो सल्ला देखील द्यायचे.
मात्र आजच्या युगात असे वाद झाले तर घर सोडण्याचा पहिला निर्णय घेतात. तसेच आयुष्यातील महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यासाठी अनुभवी माणसांच्या सल्ल्याची गरज असते. अशात मुलांना त्यांच्या जीवनात पुढे जाण्यासाठी कुटुंबातील अनुभवी व्यक्तींच्या सल्ले कामी येतात.
उतरती कळा
सन 1958 नंतर मोहन पाटलांच्या घराण्याचे विभक्तीकरण झाले. कुटुंबे वेगवेगळी झाली. त्यानंतर या घराण्याचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले. शिवराम पाटलांचे 1978 साली निधन झाल्यानंतर मुलकी पाटीलकी गेली. व पोलीस पाटील हे पद निर्माण झाले. त्यांना शेत जमीन रूपी इनाम देण्याऐवजी दरमहा पगार चालू झाला.
पूर्वी मुलकी पाटलाला असलेले सर्व अधिकार काढून घेतले. गावात भांडण तंटा झाल्यावर गावातले वाद पाटील मिटवत असे. परंतु अधिकार काढून घेतल्यामुळे हे वाद पोलीस स्टेशनला, कोर्टामध्ये जाऊ लागले.
त्यामुळे पाटीलकीचे महत्त्व हळूहळू कमी झाले. सरपंच, चेअरमन, सोसायटीचे डायरेक्टर, ग्रामपंचायत सदस्य, पुढारी, कार्यकर्ते यांना वाजवी महत्त्व आले.
सद्यस्थिती
गणपत मोहन आणि खंडू मोहन हे गावात कारभारी आहेत. रामभाऊ मोहन, मारुती मोहन, हरिभक्त परायण आहेत. लक्ष्मण सिताराम मोहन हे साधु महाराज झाले आहेत.
रामभाऊ मोहन यांचा मुलगा मच्छिंद्र हा मुंबई येथे नोकरी करतो.आणि दामू मोहन यांचा मुलगा कृष्णा हा देखील चाकण येथे नोकरी करतो.
शिवराम पाटील यांचा मुलगा दत्ता हे चाकण एमआयडीसी मध्ये कंपनीत नोकरी करतात. तर त्यांची मुलगी सौ. सुंदरबाई देवराम बांगर या अंगणवाडी सेविका या पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांना गावात त्यांच्या वडिलां इतकाच खूप मानसन्मान आहे.
लक्ष्मण मोहन यांचा मुलगा देवराम यांची भात गिरणी व पिठाची चक्की आहे. शिवाय त्यांचे वेल्डिंगचे दुकान देखील आहे.
शांताराम मोहन यांच्या मुलाचे राजगुरुनगर मध्ये बेकरी आणि दुधापासून बनणाऱ्या पदार्थांचे दुकान आहे. दुसरा मुलगा चाकण येथे नोकरी करतो. त्याची पत्नी आरोग्य सहायिका (ANM) आहे.
शांताराम मोहन यांचा भाऊ तुकाराम हा पुणे येथे स्थायिक आहे. दुसरा भाऊ हरिभाऊ हा मुंबईला कंपनीत परमानंट आहे.
मारुती मोहन यांचा मुलगा अरुण इंजिनियर आहे. शंकर मोहन यांचा मुलगा संतोष गावी शेती करतो.
त्यामुळे एकेकाळी चाळीस-पन्नास माणसे असलेले घर आता सुने सुने आहे. शेवटी काय तर कालाय तस्मै नमः
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)
दुसरी पिढी
1) रामजी मानाजी मोहन
2) हरी मानाजी मोहन
3) चिंगाजी मानाजी मोहन
तिसरी पिढी
1) मारुती रामजी मोहन
2) मानाजी रामजी मोहन
3) भाऊ रामजी मोहन
4) गेनू रामजी मोहन
1) बाळा हरी मोहन
1) नाना चिंगाजी मोहन
चौथी पिढी
1) सिताराम मारुती मोहन
1) गंगाराम भाऊ मोहन
1) भगवंता नाना मोहन
2) यशवंत नाना मोहन
3) शंकर नाना मोहन
पाचवी पिढी
1) लक्ष्मण सिताराम मोहन
2) प्रभाकर सिताराम मोहन
1) दत्तात्रय शिवराम मोहन
2) चंद्रकांत शिवराम मोहन
1) रामभाऊ गंगाराम मोहन
2) दामू गंगाराम मोहन
1) गणपत भगवंता मोहन
2) मारुती भगवंता मोहन
3) महादू भगवंता मोहन
1) शांताराम यशवंत मोहन
2) तुकाराम यशवंत मोहन
3) हरिभाऊ यशवंत मोहन
1) संतोष शंकर मोहन












