Translate

केस कशामुळे गळतात? कारणे, घरगुती उपाय आणि आधुनिक उपचार | संपूर्ण मार्गदर्शक

प्रस्तावना

आजकाल केस गळणे ही समस्या केवळ वयस्कर लोकांपुरती मर्यादित राहिलेली नाही. तरुण, महिला, पुरुष, अगदी किशोरवयीन मुलांनाही केस गळतीचा सामना करावा लागत आहे. 

img src="..." alt=" केस गळणे बाबत माहिती >
बदलती जीवनशैली, ताणतणाव, चुकीचा आहार, हार्मोन्स असंतुलन, रसायनयुक्त उत्पादने यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळू लागतात.

साधारणपणे दररोज थोडे केस गळणे सामान्य मानले जाते. पण जास्त प्रमाणात केस गळत असतील, टक्कल पडू लागले असेल किंवा केस विरळ होत असतील, तर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.

या लेखात आपण केस कशामुळे गळतात, त्यामागची वैज्ञानिक कारणे, तसेच केस गळती थांबवण्यासाठी घरगुती व वैद्यकीय उपाय सविस्तर पाहणार आहोत.

केस गळण्याची नैसर्गिक प्रक्रिया

केसांची वाढ तीन टप्प्यांत होते:

1. वाढीचा टप्पा –  2 ते 6 वर्षे

2. संक्रमण टप्पा – 2 ते 3 आठवडे

3. विश्रांती टप्पा – 2 ते 3 महिने

वाढीच्या टप्प्यानंतर केस नैसर्गिकरित्या गळतात आणि नवीन केस उगवतात. परंतु जेव्हा ही प्रक्रिया बिघडते, तेव्हा केस गळती वाढते.

केस गळण्याची प्रमुख कारणे

अनुवंशिक कारणे, हार्मोन्समधील बदल, ताण तणाव, चुकीचा आहार, केमिकल युक्त वापर, चुकीच्या प्रकारे केसांची निगा इत्यादी कारणामुळे केसांची गळती होते.

1) आनुवंशिक कारणे (Genetic hair loss)

एखाद्याच्या कुटुंबात पूर्वजांचे टक्कल किंवा केस विरळ होण्याचा इतिहास असल्यास, पुरुषांमध्ये Male Pattern Baldness आणि महिलांमध्ये Female Pattern Hair Loss दिसू शकते. हे हार्मोन्समुळे होते.

उपाय:

वेळेवर उपचार

डॉक्टरांचा सल्ला

नियमित टाळूची काळजी

2) हार्मोन्समधील बदल

थायरॉईड, PCOD/PCOS, गर्भधारणा, प्रसूतीनंतर, रजोनिवृत्ती या काळात हार्मोन्स बदलतात, ज्याचा थेट परिणाम केसांवर होतो.

उपाय:

नियमित रक्ततपासणी

केस गळती वाढण्यामागे अनेकदा लोह (Iron), व्हिटॅमिन D, B12, थायरॉईड, साखर (Sugar) यातील बिघाड कारणीभूत असतो. 

नियमित रक्ततपासणी केल्यास शरीरातील कमतरता किंवा हार्मोनल असंतुलन लवकर समजते. त्यामुळे अचूक उपचार सुरू करता येतात आणि अनावश्यक औषधे टाळता येतात.

हार्मोनल उपचार

थायरॉईड, PCOS/PCOD, प्रसूतीनंतरचे बदल किंवा रजोनिवृत्तीमुळे हार्मोन्स असंतुलित झाले असतील, तर फक्त तेल किंवा घरगुती उपाय पुरेसे ठरत नाहीत. 

अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोनल उपचार घेतल्यास केस गळतीचे मूळ कारण नियंत्रित होते आणि केस पुन्हा वाढण्यास मदत होते.

संतुलित आहार 

प्रथिने, लोह (Iron), झिंक, बायोटिन, व्हिटॅमिन D यांच्या कमतरतेमुळे केसांची मुळे कमकुवत होतात.

केस मजबूत राहण्यासाठी प्रथिने, लोह, झिंक, बायोटिन, ओमेगा-3 आणि जीवनसत्त्वे अत्यंत आवश्यक असतात. 

डाळी, अंडी, हिरव्या भाज्या, फळे, सुकामेवा आणि पुरेसे पाणी यांचा समावेश असलेला संतुलित आहार केसांच्या मुळांना पोषण देतो आणि केस गळती कमी करतो.

थोडक्यात सांगायचे तर, नियमित तपासणी + योग्य उपचार + संतुलित आहार यांचा एकत्रित परिणाम केल्यास केस गळतीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.

3) ताणतणाव (Stress)

मानसिक तणावामुळे Telogen Effluvium होतो, ज्यामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात केस गळतात.

उपाय:

ध्यानधारणा, योगासने आणि हलकासा व्यायाम करणे गरजेचे असते.

पुरेशी झोप

अनेक लोक पुरेशी झोप घेत नाहीत. मध्यरात्री पर्यंत मोबाईल पाहत असतात. शिवाय सकाळी उठून कामाला जायचे असते. अशावेळी पुरेशी झोप होत नाही. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

4) केमिकलयुक्त केस उत्पादने

केमिकल शॅम्पू, स्ट्रेटनिंग, रंग, परमानेंट केल्याने केस कोरडे व नाजूक होतात. अगदी साबण लावल्यावर देखील केस गळू लागतात.

उपाय:

“नैसर्गिक उत्पादने वापरा” म्हणजे केसांची काळजी घेताना रसायनमुक्त (Chemical-Free), वनस्पतीजन्य आणि पारंपरिक घटकांपासून तयार केलेली उत्पादने वापरणे.

थोडक्यात आणि स्पष्टपणे

नैसर्गिक उत्पादने म्हणजे काय?

ज्या उत्पादनांमध्ये सल्फेट (SLS/SLES) नसतात,पॅराबेन, सिलिकॉन, कृत्रिम रंग, सुगंध नसतात आणि वनस्पती, फळे, औषधी वनस्पती यांपासून तयार केलेले घटक असतात अशी उत्पादने म्हणजे नैसर्गिक उत्पादने होय.

केसांसाठी नैसर्गिक उत्पादने कोणती?

1) नैसर्गिक तेल

नारळ तेल, एरंडेल तेल, तीळ तेल, बदाम तेल इत्यादी.

ही तेलं केसांच्या मुळांना पोषण देतात आणि त्यामुळे केमिकलसारखे साइड इफेक्ट होत नाहीत.

2) नैसर्गिक शॅम्पू / क्लींझर

शिकेकाई, रीठा, आवळा, कडुनिंब

हे केस स्वच्छ तर करतातच शिवाय नैसर्गिक तेल काढून टाकत नाहीत.

3) नैसर्गिक केस पॅक

मेहंदी, आवळा पावडर, कोरफड (Aloe Vera), दही,

या वस्तू केस मजबूत करतात, आणि केसातील कोंडा सुद्धा कमी करतात.

4) घरगुती उपाय

कांद्याचा रस, कोरफडीचा गर, भृंगराज पावडर

कोणतेही दुष्परिणाम न देता हळूहळू परिणाम देतात.

केमिकल उत्पादने टाळावीत का?

केमिकल शॅम्पू तात्पुरता परिणाम देतात

केस कोरडे, नाजूक करतात. केमिकल शाम्पू, साबण वगैरे दीर्घकाळ वापरल्यास केस गळती वाढू शकते.

सर्व केमिकल उत्पादने हानिकारकच असतात असे नाही. परंतु दीर्घकाळ आणि अति वापर टाळणे गरजेचे आहे.

नैसर्गिक उत्पादने वापरण्याचे फायदे

केसांची मुळे मजबूत होतात

 केस गळती कमी होते

कोंडा आणि खाज कमी होते.

त्यामुळे नैसर्गिक उत्पादने हा दीर्घकाळ सुरक्षित वापर मानला जातो.

चुकीची केसांची निगा

ओले केस जोरात पुसणे, घट्ट वेण्या, हेल्मेटचा जास्त वापर यामुळे केस तुटतात.

उपाय:

ओले केस सौम्य हाताने सुकवणे

सैल हेअरस्टाइल

मऊ कंगवा वापरणे

👉🏻 हेही वाचा सायबर सेक्युरिटी म्हणजे काय? संपूर्ण माहिती

केस गळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय

1) केस गळती थांबवण्यासाठी तेल मालिश

नारळ तेल + एरंडेल तेल

आठवड्यातून 2 वेळा मालिश

2) कांद्याचा रस

कांद्यामध्ये सल्फर असते, जे केस वाढीस मदत करते.

3) कोरफड (Aloe Vera)

टाळूला थंडावा देऊन केस मजबूत करते.

4) आवळा

आवळा रस किंवा पावडर केसांसाठी अत्यंत उपयुक्त.

सूचना: घरगुती उपाय हळूहळू परिणाम देतात. गंभीर केस गळतीमध्ये डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

केसांसाठी योग्य आहार

प्रथिने: डाळी, अंडी

लोह: पालक, डाळिंब

ओमेगा-3: अक्रोड, अलसी

पाणी: दररोज किमान 8–10 ग्लास

केस गळती कधी गंभीर मानावी?

दिवसाला 200 पेक्षा जास्त केस गळणे

टक्कल पडू लागणे

केस पुन्हा उगवत नसणे

टाळूवर जळजळ/खाज

अशा वेळी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक असतो.

केस गळती प्रतिबंधासाठी महत्त्वाच्या टिप्स

नियमित व्यायाम

संतुलित आहार

योग्य शॅम्पू

ताणतणाव कमी करा

धूम्रपान टाळा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1. केस गळणे पूर्णपणे थांबवता येते का?

योग्य कारण ओळखून उपाय केल्यास नक्कीच नियंत्रित करता येते.

Q2. तेल लावल्याने केस वाढतात का?

तेल मुळांना पोषण देते, परंतु आहार व जीवनशैलीही महत्त्वाची आहे.

Q3. दररोज केस धुणे योग्य आहे का?

अतिशय कोरडे किंवा तेलकट केस नसतील तर आठवड्यात 2–3 वेळा पुरेसे.

Q4. टक्कल पुन्हा भरते का?

प्रारंभिक टप्प्यात उपचार केल्यास शक्य आहे.

निष्कर्ष

केस गळणे ही समस्या दुर्लक्षित न करता वेळेवर उपाय केल्यास नियंत्रणात ठेवता येते. नैसर्गिक उपाय, योग्य आहार, मानसिक शांतता आणि योग्य उपचार यांचा संगम केल्यास केस निरोगी, दाट आणि मजबूत राहू शकतात.

परंतु आजच्या धावपळीच्या काळात आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष देताना लोक दिसत नाहीत. त्यामुळे नैसर्गिक उपाय ते करत नाहीत.

वेळ नाही ही सबब सांगून रसायनयुक्त साधनांचा वापर करतात. निरोगी राहण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे देखील आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.

केस गळती वाढत असल्यास ती दुर्लक्षित न करता आजच योग्य पावले उचला. कारण वेळेवर काळजी घेतल्यास केस पुन्हा निरोगी होऊ शकतात.

“हा लेख उपयुक्त वाटला असेल तर इतरांपर्यंत शेअर करा आणि नैसर्गिक जीवनशैली स्वीकारा.”

 ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान

घरी सोलर बसवा आणि वीज बिल भरणे बंद करा | घरगुती सोलर सिस्टीम सविस्तर मार्गदर्शक

प्रस्तावना

सतत वाढणारे वीज दर, अनियमित वीजपुरवठा या सगळ्यांवर घरगुती सोलर सिस्टीम हा दीर्घकालीन उपाय ठरतो.

img src="..." alt=" घरगुती सोलर बाबत माहिती  >
“घरी सोलर बसवा आणि वीज बिल भरणे बंद करा” ही केवळ जाहिरात नाही, तर योग्य नियोजन केल्यास प्रत्यक्षात शक्य होणारी गोष्ट आहे. 

या ब्लॉगमध्ये सोलर सिस्टीम कसे काम करते, किती खर्च येतो, सबसिडी कशी मिळते, नेट मीटरिंग म्हणजे काय, आणि तुमच्यासाठी कोणता सोलर प्रकार योग्य आहे हे सर्व सविस्तर समजावून सांगतो.

सोलर सिस्टीम म्हणजे काय?

सोलर सिस्टीम सूर्यप्रकाशातून वीज निर्माण करते. छतावर लावलेले सोलर पॅनल सूर्यकिरणांना विद्युत ऊर्जेत रूपांतरित करतात. ही वीज घरातील उपकरणांसाठी वापरली जाते, उरलेली वीज (नेट मीटरिंग असल्यास) वीज कंपनीला तुम्ही विकू शकता.

१ किलोवॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी साधारण १०० चौरस फूट सावलीमुक्त जागा लागते. 

घरगुती सोलर सिस्टीमचे प्रकार

1) ऑन-ग्रिड सोलर सिस्टीम

ऑन-ग्रिड सोलर सिस्टीम म्हणजे काय? (थोडक्यात माहिती)

ऑन-ग्रिड सोलर सिस्टीम ही घरातील सोलर यंत्रणा थेट वीज कंपनीच्या लाईनला (Grid) जोडलेली असते. या सिस्टीममध्ये बॅटरी नसते, त्यामुळे खर्च कमी येतो आणि देखभालही सोपी असते.

ऑन-ग्रिड सिस्टीम कशी काम करते?

सोलर पॅनल सूर्यप्रकाशातून वीज तयार करतात

इन्व्हर्टर DC वीज AC मध्ये बदलतो

आधी घरातील वीज वापर भागवला जातो

उरलेली वीज नेट मीटरिंगद्वारे वीज कंपनीकडे जाते

रात्री किंवा कमी उत्पादन असताना वीज थेट ग्रिडमधून मिळते

ऑन-ग्रिड सिस्टीमचे फायदे

वीज बिलात 80–100% बचत

बॅटरी नसल्यामुळे खर्च कमी

देखभाल अतिशय कमी

पर्यावरणपूरक व दीर्घकालीन उपाय

नेट मीटरिंगमुळे जादा वीजेचे क्रेडिट

मर्यादा

सुरक्षेच्या (Anti-Islanding Feature)  कारणास्तव ग्रीड फेल्युअरच्या वेळी ऑन-ग्रीड सिस्टम आपोआप बंद होते. त्यामुळे वीज पुरवठा बंद होतो.

कोणासाठी योग्य?

शहर/नगर भागातील घरे

जिथे वीजपुरवठा नियमित आहे

कमी खर्चात जास्त बचत हवी असणारे ग्राहक

2) ऑफ-ग्रिड सोलर सिस्टीम

ऑफ-ग्रिड सोलर सिस्टीम म्हणजे काय? (थोडक्यात माहिती)

ऑफ-ग्रिड सोलर सिस्टीम ही वीज कंपनीच्या लाईनपासून पूर्णपणे स्वतंत्र असलेली सोलर यंत्रणा आहे. या सिस्टीममध्ये बॅटरी अनिवार्य असते, त्यामुळे लाईट नसली तरीही घरातील वीजपुरवठा चालू राहतो.

ऑफ-ग्रिड सिस्टीम कशी काम करते?

सोलर पॅनल सूर्यप्रकाशातून वीज निर्माण करतात

इन्व्हर्टर वीज AC मध्ये रूपांतरित करतो

दिवसा वीज वापरली जाते व उरलेली वीज बॅटरीमध्ये साठवली जाते

रात्री किंवा ढगाळ वातावरणात बॅटरीतील वीज वापरली जाते

वीज कंपनीशी कोणताही संबंध नसतो

ऑफ-ग्रिड सिस्टीमचे फायदे

लाईट गेली तरी वीज उपलब्ध

ग्रामीण व दुर्गम भागांसाठी उत्तम

“वीज बिल जवळपास शून्य किंवा अतिशय कमी करता येते”

आपत्कालीन परिस्थितीत विश्वासार्ह

मर्यादा

बॅटरीमुळे खर्च जास्त

बॅटरीचे आयुष्य मर्यादित (5–7 वर्षे)

देखभाल तुलनेने जास्त

कोणासाठी योग्य?

जिथे वारंवार लाईट जाते

वीज कनेक्शन उपलब्ध नाही

शेतघर, फार्महाऊस, वाड्या-वस्ती

थोडक्यात निष्कर्ष:

वीजपुरवठा अनियमित किंवा नसलेल्या भागात ऑफ-ग्रिड सोलर सिस्टीम हा सर्वात विश्वासार्ह पर्याय आहे.

हायब्रीड सोलर सिस्टिम 

हायब्रिड सोलर सिस्टीम म्हणजे काय? 

हायब्रिड सोलर सिस्टीम ही ऑन-ग्रिड + ऑफ-ग्रिड यांचा संयोग असलेली आधुनिक सोलर यंत्रणा आहे. यात वीज कंपनीचे कनेक्शन (Grid) आणि बॅटरी दोन्ही असतात, त्यामुळे वीज बचतही होते आणि लाईट गेली तरी वीजपुरवठा सुरू राहतो.

हायब्रिड सिस्टीम कशी काम करते?

  • सोलर पॅनल दिवसा वीज निर्माण करतात
  • आधी घरातील वीज वापर भागवला जातो
  • उरलेली वीज बॅटरीमध्ये साठवली जाते
  • बॅटरी भरल्यानंतर जादा वीज नेट मीटरिंगद्वारे ग्रिडला जाते
  • लाईट गेली तर बॅटरी व सोलरवर घर चालते
  • रात्री किंवा बॅटरी संपल्यास ग्रिड वीज वापरली जाते

हायब्रिड सोलर सिस्टीमचे फायदे

  •  लाईट गेली तरी वीज उपलब्ध
  •  वीज बिलात 80–100% बचत
  •  बॅटरी + ग्रिडचा दुहेरी आधार
  •  आपत्कालीन परिस्थितीसाठी उत्तम
  •  आधुनिक व भविष्यकालीन उपाय

मर्यादा

  •  खर्च जास्त (बॅटरी व प्रगत     इन्व्हर्टरमुळे)
  •  सिस्टम थोडी क्लिष्ट

कोणासाठी योग्य?

  • शहरात राहून लाईट कटचा त्रास होतो
  • हॉस्पिटल, दुकान, ऑफिस, डेटा उपकरणे
  • सतत वीज आवश्यक असलेली घरे

थोडक्यात निष्कर्ष:
वीज बचत आणि अखंड वीजपुरवठा दोन्ही हव्या असतील तर हायब्रिड सोलर सिस्टीम हा सर्वोत्तम आणि स्मार्ट पर्याय आहे.

सोलर सिस्टीम कशी काम करते?

1. सोलर पॅनल सूर्यप्रकाश शोषून DC वीज तयार करतात

2. इन्व्हर्टर DC वीज AC मध्ये रूपांतरित करतो

3. घरातील उपकरणे AC वीज वापरतात

4. जास्त वीज असल्यास नेट मीटरिंगने ग्रिडला जाते

5. रात्री/कमी सूर्यप्रकाशात ग्रिड किंवा बॅटरीचा वापर

किती क्षमतेचा (kW) सोलर घ्यावा?

मासिक वीज वापर सुचवलेली सिस्टीम

100–150 युनिट 1 kW

200–300 युनिट 2 kW

350–450 युनिट 3 kW

500+ युनिट 5 kW

साधारणपणे 1 kW सोलर = 4 ते 5 युनिट/दिवस उत्पादन (महाराष्ट्र गुजरात या राज्यामध्ये,)

खर्च किती येतो? (अंदाजे)

सिस्टीम प्रकार1               1 kW अंदाजे खर्च

On-Grid                      ₹50,000 – ₹65,000
Off-Grid                     ₹80,000 – ₹1,10,000
हायब्रीड                         ₹90,000 – ₹1,30,000

राज्य/केंद्र सरकारच्या सबसिडीमुळे खर्च कमी होऊ शकतो.

सरकारी सबसिडी व नेट मीटरिंग

घरगुती सोलरसाठी केंद्र व राज्य शासनाने सबसिडी उपलब्ध केलेली आहे.

अर्ज प्रक्रिया: अधिकृत विक्रेता/वितरण कंपनीमार्फत करावी लागते.

(PM Surya Ghar, Muft Bijli Yojana)

केंद्र सरकारने आता नवीन 'पीएम सूर्य घर' योजना सुरू केली आहे. यामध्ये सबसिडीचे आकडे निश्चित आहेत.

​१ किलोवॅट साठी: ₹३०,०००

​२ किलोवॅट साठी: ₹६०,०००

​३ किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त: ₹७८,००० (कमाल मर्यादा)

“ही सबसिडी फक्त घरगुती (Residential) ग्राहकांसाठी आणि कमाल 3 kW पर्यंतच लागू आहे.”

नेट मीटरिंगमुळे उरलेली वीज वीज कंपनीला विक्री करता येते. नेट मीटरिंग: वापरलेली व तयार केलेली वीज युनिट-टू-युनिट वजा बिलातून होतात, कधी कधी क्रेडिट मिळते. 

नेट मीटरिंगची अट

ऑन-ग्रिड सिस्टमसाठी 'नेट मीटरिंग' अनिवार्य असते, कारण नेट मीटर बसवल्याशिवाय वीज कंपनी तुमचे बिल कमी करत नाही. 

नेट बिलिंग विरुद्ध नेट मीटरिंग

महाराष्ट्रात आता काही ठिकाणी १० किलोवॅटच्या वर 'नेट बिलिंग' लागू झाले आहे,तयार वीज ठराविक दराने खरेदी, केली जाते. आणि वापर वेगळ्या दराने केला जातो.

👉🏻 हेही वाचा शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर पंप योजना

सोलर सिस्टीमचे फायदे

वीज बिलात 90–100% बचत

25 वर्षांपर्यंत पॅनलचे आयुष्य

पर्यावरणपूरक, प्रदूषण कमी

घराची किंमत वाढते

वीज खंडित होण्याचा त्रास कमी (हायब्रिड/ऑफ-ग्रिड

पेबॅक पिरीयड

सोलरमध्ये केलेली गुंतवणूक साधारण ४ ते ५ वर्षांत वसूल होते आणि त्यानंतर पुढील २० वर्षे वीज मोफत मिळते.

सोलर बसवण्यापूर्वी लक्षात घ्यावयाच्या गोष्टी

छताची दिशा (दक्षिणमुखी सर्वोत्तम)

छतावर सावली नसणे

प्रमाणित पॅनल व इन्व्हर्टर

वॉरंटी (पॅनल 25 वर्षे, इन्व्हर्टर 5–10 वर्षे)

अधिकृत व अनुभवी विक्रेता

देखभाल व आयुष्य

महिन्यातून 1–2 वेळा पॅनल स्वच्छता

वायरिंग/इन्व्हर्टर तपासणी

बॅटरी असल्यास योग्य मेंटेनन्स

वार्षिक देखभाल खर्च अतिशय कमी

FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

Q1. सोलरमुळे वीज बिल पूर्णपणे बंद होते का?

योग्य क्षमतेची ऑन-ग्रिड सिस्टीम व नेट मीटरिंग असल्यास 90–100% बिल शून्य होऊ शकते.

Q2. पावसाळ्यात सोलर चालते का?

हो, पण उत्पादन थोडे कमी होते. वर्षभराचा सरासरी विचार केला जातो.

Q3. सोलर पॅनलचे आयुष्य किती?

साधारण 25 वर्षे; उत्पादन हळूहळू कमी होते.

Q4. सबसिडी कशी मिळते?

अधिकृत विक्रेत्यामार्फत अर्ज केल्यास थेट खात्यात/बिलात समायोजन.

Q5. बॅटरी आवश्यक आहे का?

ऑन-ग्रिडसाठी नाही. लाईट जाण्याचा प्रश्न असल्यास हायब्रिड/ऑफ-ग्रिड योग्य.

Q6. कोणते उपकरण किती चालेल? (Mini Use-Case)

उदा. 2 kW सोलरवर:

2 पंखे, 1 फ्रिज, 1 TV, 8 LED दिवे सहज चालतात.

निष्कर्ष

घरी सोलर सिस्टीम बसवणे म्हणजे एकदाचा खर्च, आयुष्यभराची बचत. वाढते वीज दर आणि पर्यावरणीय जबाबदारी लक्षात घेता सोलर हा आजचा नव्हे तर उद्याचाही शहाणपणाचा निर्णय आहे. योग्य क्षमतेची सिस्टीम, सबसिडीचा लाभ आणि नेट मीटरिंग यामुळे तुमचे प्रत्यक्षात “वीज बिल जवळपास शून्य किंवा अतिशय कमी करता येते”

​"तुम्ही तुमच्या घरासाठी किती किलोवॅटचा प्लांट बसवणार आहात? कमेंट्समध्ये सांगा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी आम्हाला संपर्क करा."

ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान


टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? फायदे, तोटे, प्रकार व योग्य योजना कशी निवडावी | संपूर्ण मार्गदर्शन

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? | Term Insurance सविस्तर माहिती.

प्रस्तावना

आजच्या अनिश्चित जीवनशैलीत कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता हा प्रत्येक घरातील प्रमुख व्यक्तीपुढे सर्वात मोठा प्रश्न असतो.

img src="..." alt=" टर्म इन्शुरन्स माहिती >
अलीकडच्या धावपळीच्या युगात अनेक  समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातच अपघात, आजारपण किंवा अकाली मृत्यू यामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट येऊ शकते. 

अशा वेळी “टर्म इन्शुरन्स (Term Insurance) ही सर्वात सोपी, स्वस्त आणि प्रभावी जीवन विमा योजना आहे, जी गरजेच्या वेळी कुटुंबाच्या मदतीला धावून येते.”

ज्यावेळी आपण दुचाकी किंवा चार चाकी गाडी खरेदी करतो तेव्हा गाडीचा विमा काढणे बंधनकारक असते. गाडीचा विमा नसेल तर आपणास दंड भरावा लागतो. किंवा भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

त्यासाठी अनेक लोक गाडीचा विमा काढतात परंतु स्वतःचा विमा काढत नाहीत ही फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.

म्हणूनच हया ब्लॉगमध्ये मी तुम्हाला टर्म इन्शुरन्सची संपूर्ण माहिती, फायदे, तोटा, पात्रता, प्रीमियम, योग्य योजना कशी निवडावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन देणार आहे. 

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?

टर्म इन्शुरन्स हा शुद्ध जीवन विमा (Pure Life Insurance) प्रकार आहे. ठराविक कालावधीसाठी (उदा. 10, 20, 30 वर्षे) विमा संरक्षण दिले जाते.

विमाधारकाचा मृत्यू पॉलिसी कालावधीत झाल्यास

वारसदाराला पूर्ण विमा रक्कम (Sum Assured) मिळते.

पॉलिसी कालावधी पूर्ण झाल्यावर विमाधारक जिवंत असल्यास

कोणतीही रक्कम मिळत नाही (Traditional Term Plan मध्ये).

विमा घेताना तंबाखू, मद्यपान किंवा आधीचे आजार लपवू नयेत, अन्यथा क्लेम फेटाळला जाऊ शकतो.

टर्म इन्शुरन्स का आवश्यक आहे?

1. कुटुंबाची आर्थिक सुरक्षा – उत्पन्न बंद झाले तरी घरखर्च, शिक्षण, कर्ज चालू राहते.

2. कर्ज संरक्षण – गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज सुरक्षित

3. स्वस्त प्रीमियम – मोठ्या कव्हरसाठी कमी हप्ता

4. मानसिक शांतता – भविष्यासाठी निश्चिंतता

टर्म इन्शुरन्सचे प्रमुख फायदे

खालील प्रमाणे टर्म इन्शुरन्सचे फायदे आहेत.

1. कमी प्रीमियममध्ये जास्त कव्हर

उदा. 30 वर्षांच्या व्यक्तीसाठी 1 कोटी रुपयांचे कव्हर फक्त ₹700–₹1000 प्रतिमहिना. हे प्रीमियम अंदाजे असून वय, आरोग्यस्थिती, व्यसन आणि विमा कंपनीनुसार बदलू शकतो.

वय, व्यसने आणि आरोग्यानुसार प्रीमियम बदलू शकतो" 

2. टॅक्स सवलत

कलम 80C अंतर्गत प्रीमियमवर करसवलत आहे.

कलम 10(10D) अंतर्गत विमा रक्कम पूर्णपणे करमुक्त

3. विविध विमा राइडर्स (Riders)

अपघाती मृत्यू राइडर 

अपघाती मृत्यू रायडर हा टर्म इन्शुरन्स किंवा लाइफ इन्शुरन्स पॉलिसीला जोडता येणारा अतिरिक्त लाभ (Add-on) आहे. पॉलिसीधारकाचा मृत्यू अपघातामुळे झाल्यास, मूळ विमा रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त विमा रक्कम कुटुंबाला मिळते.

कसा काम करतो?

तुमची मूळ पॉलिसी: ₹50 लाख

अपघाती मृत्यू रायडर: ₹25 लाख

अपघातात मृत्यू झाल्यास एकूण ₹75 लाख (₹50 लाख + ₹25 लाख) मिळू शकतात.

कोणत्या अपघातांमध्ये लागू?

रस्ते अपघात,रेल्वे / विमान अपघात

उंचावरून पडणे, आग, स्फोट, बुडणे,

विजेचा धक्का

नैसर्गिक मृत्यू (आजार, हृदयविकार इ.) झाल्यास हा रायडर लागू होत नाही.

कोणासाठी उपयुक्त?

वाहन चालक, बांधकाम, कारखाना कामगार, वारंवार प्रवास करणारे तरुण कमावते सदस्य

Critical Illness Rider / Policy

यामध्ये खालील आजार कव्हर होतात (कंपनीनुसार वेगळे असू शकतात):

कॅन्सर, हार्ट अटॅक, स्ट्रोक,किडनी फेल्युअर, बायपास सर्जरी, अवयव प्रत्यारोपण

आजार निदान झाल्यावर एकरकमी रक्कम (Lump Sum) मिळते.

कायम अपंगत्व राइडर

जर अपघातामुळे तुमचा हात / पाय पूर्णपणे गमवावा लागला किंवा

दिसणे / ऐकणे कायमचे गमावले किंवा

कायमचे अपंगत्व आले. तर पॉलिसीमध्ये ठरवलेली निश्‍चित रक्कम (जी तुम्ही रायडर म्हणून निवडली असेल) तुमच्या खात्यात जमा केली जाते.

4. कुटुंबाचे भविष्य सुरक्षित

वरील सर्व रायडर्स हे टर्म इन्शुरन्सला जोडले जाणारे अतिरिक्त Life Insurance फायदे आहेत. हे स्वतंत्र आरोग्य विमा (Health Insurance) नाहीत. 

त्याची अत्यंत आवश्यकता आताच्या काळात आहे. त्यामुळे मुलांचे शिक्षण, लग्न, घरखरेदी यासाठी आर्थिक आधार मिळतो

जर विमाधारकाने Waiver of Premium Rider घेतलेला असेल आणि त्याला गंभीर आजार किंवा कायम अपंगत्व आले, तर पुढील प्रीमियम माफ होतात व पॉलिसी चालू राहते.

👉🏻हे ही वाचा आरोग्य विम्याचे प्रकार संपूर्ण माहिती

टर्म इन्शुरन्सच्या मर्यादा

पॉलिसी पूर्ण झाल्यावर कोणताही परतावा नाही

बचत किंवा गुंतवणूक नाही

वेळेवर प्रीमियम न भरल्यास पॉलिसी बंद होते

मात्र, संरक्षणाच्या दृष्टीने हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

टर्म इन्शुरन्सचे प्रकार 

खाली दिलेल्या टर्म इन्शुरन्सच्या प्रकारांची थोडक्यात व सोप्या शब्दांत माहिती 

Regular Term Plan 


हा सर्वात साधा आणि स्वस्त टर्म प्लॅन आहे.
पॉलिसी कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला संपूर्ण विमा रक्कम मिळते.
पॉलिसी पूर्ण झाल्यावर कोणताही प्रीमियम परत मिळत नाही.
कमी प्रीमियममध्ये जास्त कव्हर मिळते.

Return of Premium Plan (TROP)

या प्लॅनमध्ये मृत्यू संरक्षण तर मिळतेच,
पण पॉलिसी कालावधी पूर्ण झाल्यावर विमाधारक जिवंत असल्यास भरलेला संपूर्ण प्रीमियम परत मिळतो.
Regular Term पेक्षा प्रीमियम जास्त असतो.
 “सुरक्षा + परतावा” हवे असणाऱ्यांसाठी योग्य.

Increasing Term Plan

या योजनेत विमा संरक्षण दरवर्षी ठराविक टक्क्यांनी वाढत जाते.
महागाई (Inflation) लक्षात घेऊन डिझाइन केलेला प्लॅन.
कुटुंबाची वाढती जबाबदारी असणाऱ्यांसाठी उपयुक्त.

प्रीमियम सुरुवातीला कमी असतो.
आज १ कोटी रुपये मोठी रक्कम वाटत असली तरी २०-२५ वर्षांनंतर त्याचे मूल्य कमी असेल. तर महागाई (Inflation Protection) लक्षात घेऊन तयार केलेला प्लॅन असल्याने भविष्यातील आर्थिक गरजा सुरक्षित राहतात.

Decreasing Term Plan

या प्लॅनमध्ये विमा संरक्षण दरवर्षी कमी होत जाते.
मुख्यतः होम लोन, कार लोन, बिझनेस लोन यासाठी वापरला जातो.
उरलेल्या कर्जाइतकेच कव्हर राहते.
प्रीमियम तुलनेने कमी असतो.

Whole Life Term Plan

या योजनेत विमा संरक्षण 99 किंवा 100 वर्षांपर्यंत मिळते.
आयुष्यभरासाठी कुटुंबाला आर्थिक सुरक्षा.
वारसा (Legacy Planning) साठी उपयुक्त. 
दीर्घकालीन संरक्षण हवे असणाऱ्यांसाठी योग्य.
थोडक्यात सांगायचं तर,

कमी खर्चात जास्त संरक्षण → Regular Term Plan

संरक्षण + परतावा → TROP

वाढती गरज → Increasing Term

कर्ज सुरक्षा → Decreasing Term

आयुष्यभर कव्हर → Whole Life Term

टर्म इन्शुरन्स कोण घेऊ शकतो?

वय: साधारण 18 ते 65 वर्षे

नोकरी करणारे, व्यावसायिक, शेतकरी, स्वयंरोजगार

कुटुंबाची आर्थिक जबाबदारी असलेली कोणतीही व्यक्ती

योग्य टर्म इन्शुरन्स कसा निवडावा?

1. कव्हर किती असावे?

वार्षिक उत्पन्नाच्या 10 ते 15 पट कव्हर घ्यावे.

2. पॉलिसी कालावधी

निवृत्तीपर्यंत किंवा आर्थिक जबाबदारी संपेपर्यंत.

3. Claim Settlement Ratio

Claim Settlement Ratio म्हणजे विमा कंपनीने दाखल झालेल्या दाव्यांपैकी किती टक्के दावे यशस्वीरीत्या निकाली काढले आहेत याचे प्रमाण.

कंपनीचा दावा निवारण दर जास्त असावा.

4. विश्वासार्ह विमा कंपनी

भारतामध्ये खालील कंपन्या प्रसिद्ध आहेत:

Life Insurance Corporation of India (LIC)

HDFC Life Insurance

ICICI Prudential Life Insurance

SBI Life Insurance

The New India Insurance Company

ऑनलाइन की ऑफलाइन टर्म इन्शुरन्स? 

ऑनलाइन टर्म इन्शुरन्स

प्रीमियम तुलनेने कमी
पूर्ण पारदर्शकता
थेट कंपनीकडून खरेदी

ऑफलाइन टर्म इन्शुरन्स

एजंट मार्गदर्शन
कागदपत्र सहाय्य
प्रीमियम जास्त
प्रथमच विमा घेणाऱ्यांसाठी एजंट मार्गदर्शन उपयुक्त ठरू शकते, तर अनुभवी ग्राहकांसाठी ऑनलाइन पर्याय फायदेशीर ठरतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1. टर्म इन्शुरन्स आणि LIC एकच आहे का?

नाही. LIC ही कंपनी आहे, टर्म इन्शुरन्स हा विम्याचा प्रकार आहे.

Q2. टर्म इन्शुरन्स किती वयात घ्यावा?

लवकर घेतल्यास प्रीमियम कमी लागतो, त्यामुळे 20–30 वयात सर्वोत्तम.

Q3. पॉलिसी बंद झाली तर काय होते?

प्रीमियम थांबल्यास कव्हर संपते, कोणताही फायदा मिळत नाही. 

👉🏻हे ही वाचा द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आरोग्य विमा

निष्कर्ष

टर्म इन्शुरन्स म्हणजे कुटुंबासाठी आर्थिक कवच. कमी खर्चात मोठे संरक्षण देणारी ही योजना प्रत्येक कमावत्या व्यक्तीसाठी अत्यावश्यक आहे. 

बचत किंवा गुंतवणुकीपेक्षा आधी संरक्षण महत्त्वाचे आहे, आणि त्यासाठी टर्म इन्शुरन्स हा सर्वोत्तम पर्याय आहे."आजच तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी योग्य टर्म प्लॅन निवडा आणि निश्चिंत व्हा."

सूचना: वरील माहिती ही सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी संबंधित विमा कंपनीच्या अटी व शर्ती नीट वाचाव्यात किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा.

ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान


जमीन खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासाव्यात? | 7/12, NA, टायटल क्लिअर मार्गदर्शक

जमीन खरेदी करताना कोणत्या गोष्टी सर्वप्रथम विचारात घ्याव्या?

जमीन खरेदी करणे ही आयुष्यातील मोठी आर्थिक गुंतवणूक असते.

img src="..." alt=" जमीन खरेदी" माहिती>
घर, शेती, व्यवसाय किंवा गुंतवणूक कोणत्याही कारणासाठी जमीन घेताना कायदेशीर प्रक्रिया, प्रत्यक्ष स्थिती आणि भविष्यातील उपयोगिता यांचा नीट विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. 

चुकीची माहिती, अती घाई किंवा तोंडी व्यवहारांमुळे पुढे आर्थिक नुकसान, कोर्टकेस किंवा मालकी वाद निर्माण होऊ शकतात.

अनेक प्रकारच्या जमिनी विक्रीस उपलब्ध असतात. काही जमिनीची विक्री करण्यास परवानगी नसते. उदा. आदिवासी समाजाची जमीन.

काही जमिनी विक्री करायची असेल तर शासनाची परवानगी घेणे बंधनकारक असते.

काही जमिनींचे वाटप पत्र झालेले नसते. कधीकधी जमिनीच्या सातबारावर कुळाचे नाव देखील असते. कलम 43 आणि कलम 63 नुसार 'कुळ कायद्या' अंतर्गत त्या प्रतिबंधित असतात, ज्यांची विक्री करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी लागते

काही जमिनी या देवस्थान मालकीच्या, इनामी, शासनाने दिलेल्या असतात. त्यावर वहीवाटदारांची नावे असतात. अशा जमिनी सुद्धा विक्री करताना शासनाची परवानगी घ्यावी लागते.

काही जमिनी ह्या अनेक कारणामुळे किंवा वाद विवादामुळे अडचणीच्या ठरतात. त्यामुळे अशा जमिनी विकत घेतल्यावर त्या नावावर होत तर नाहीतच. परंतु वेगळ्याने न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागते.

त्यामुळे अनावश्यक मनस्ताप, आर्थिक हानी व वेळेचा अपव्यय होतो.

त्यासाठी खाली दिलेला मार्गदर्शक तुम्हाला सुरक्षित, योग्य आणि दूरदृष्टीने निर्णय घेण्यास मदत करेल.

मार्गदर्शक बाबी

1) जमिनीचा कायदेशीर दर्जा (Legal Status) तपासा

जमीन खरेदीतील पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी.

7/12 उतारा आणि फेरफार नीट तपासा

धारकाचे नाव, क्षेत्रफळ, जमिनीचा प्रकार (जमाबंदी/बागायत/बिनबागायत) स्पष्ट असावा.

जमीन शेती, NA (बिगरशेती), निवासी किंवा व्यावसायिक कोणत्या प्रकारात येते ते निश्चित करा.

जमीन सरकारी आरक्षण, DP प्लॅन, टाउन प्लॅनिंग अंतर्गत नाही ना हे तपासा.

बँकेचे कर्ज/तारण (Mortgage) असल्यास नोंद दिसते ती आधी निकाली काढली आहे का ते पाहा.

जमीन केवळ NA असून चालत नाही, तर ती जमीन कोणत्या झोन मध्ये येते (उदा. Yellow Zone - निवासी, Green Zone - शेती, Industrial Zone) हे पाहणे आवश्यक आहे. 

👉🏻हे ही वाचा स्मार्ट शेती म्हणजे काय? फायदे

टीप: कागदपत्रांतील नोंदी अद्ययावत नसतील तर पुढील प्रक्रिया अडकू शकते.

2) मालकी हक्क स्पष्ट आहे का? (Clear Title)

जमिनीचे Title Clear असणे अनिवार्य आहे.

जमीन एकाच मालकाची की सह-मालकीची आहे?

विक्री करणाऱ्याला कायदेशीर अधिकार (Right to Sell) आहे का?

मागील ३० वर्षांचा Title Search Report केल्यास लपलेले वाद उघड होतात. त्यामुळे जमीन घेण्यापूर्वी सर्च रिपोर्ट काढून त्याचे सविस्तर वाचन करणे अत्यंत आवश्यक असते. एखाद्या तज्ञ वकिलाकडून सर्च रिपोर्ट काढून घ्यावा.

वारस हक्क असल्यास सर्व वारसांची संमती/Power of Attorney तपासा.

3) जमिनीचे मोजमाप व सीमांकन (Measurement & Demarcation)

जमिनीच्या कागदपत्रावरील आणि प्रत्यक्षातील मोजमाप कित्येकदा वेगळे असतें. यामध्ये मोठी तफावत असू शकते. त्यासाठी जमिनीची मोजणी करून घेणे केव्हाही चांगले.

तलाठी/सर्व्हे ऑफिस कडून अधिकृत मोजणी करून घ्या.

सीमांकन खांब स्पष्ट आहेत का?

प्लॉटची लांबी-रुंदी, रस्ता प्रवेश (Approach Road) नीट तपासा.

4) जमिनीवर बोजा, वाद किंवा हक्क आहेत का? (Encumbrance Check)

जमिनीवर कोणताही बोजा नसणे अत्यंत महत्त्वाचे.

Encumbrance Certificate (EC/ECU) तपासा.

कोर्टकेस, कौटुंबिक वाद, भाडेकरार, गहाण यांची नोंद नाही ना?

ग्रामपंचायत/तहसील पातळीवर चौकशी केल्यास वास्तव चित्र कळते.

5) NA, NOC आणि आवश्यक परवानग्या.

बांधकाम किंवा प्रकल्पासाठी जमीन घेत असल्यास:

जमीन NA (Non-Agricultural) आहे का? नसेल तर NA करण्याची शक्यता तपासा.

ग्रामपंचायत/नगरपरिषद NOC, बांधकाम परवानगी.

पर्यावरण, वन, जलस्रोत नियम लागू होतात का ते पाहा.

6) लोकेशन आणि आजूबाजूचा परिसर (Location & Surroundings)

जमिनीची किंमत प्रामुख्याने लोकेशनवर अवलंबून असते.

मुख्य रस्ता, शाळा, रुग्णालय, बाजारपेठ यांचे अंतर.

भविष्यातील विकास प्रकल्प (रिंग रोड, औद्योगिक क्षेत्र, मेट्रो/हायवे).

पाणी, वीज, ड्रेनेज, नाले यांची सुविधा.

7) मातीची गुणवत्ता आणि पाणी उपलब्धता (Soil & Water)

विशेषतः शेती जमिनीसाठी:

मातीचा प्रकार – काळी, लाल, वाळूयुक्त इ.

पाण्याचा स्रोत – विहीर, बोअरवेल, शेततळे, नदी. धरण क्षेत्र 

पाण्याची पातळी व TDS तपासल्यास भविष्यातील अडचणी टळतात.

8) रस्ता आणि प्रवेश हक्क (Right of Way)

“रस्ता आहे का?” हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा.

जमीन मुख्य रस्त्याला लागून आहे का?

खाजगी रस्ता असल्यास Right of Way करार लेखी आहे का?

भविष्यात रस्ता बंद/वादग्रस्त होण्याचा धोका तर नाही?

केवळ रस्ता असून चालत नाही, तर तो 'नकाशावरचा रस्ता' आहे की केवळ वहिवाटीचा रस्ता आहे, हे पाहणे गरजेचे असते. नकाशावर रस्ता नसेल तर भविष्यात शेजारी तो बंद करू शकतात.

9) तज्ञांचा सल्ला घ्या (Expert Assistance)

तज्ञांचा सल्ला ही खर्च नाही तर सुरक्षितता आहे.

प्रॉपर्टी वकील – कागदपत्रे व कायदेशीर पडताळणी

सर्व्हेअर/इंजिनिअर – मोजणी, सीमांकन

रिअल इस्टेट कन्सल्टंट – बाजारभाव व लोकेशन मार्गदर्शन

10) खरेदीवेळी आवश्यक दस्तऐवज (Documents During Sale)

खरेदी करताना खालील कागदपत्रे नक्की घ्या:

विक्रीपत्र (Sale Deed)

7/12 उतारा, फेरफार नोंद

NA आदेश (लागू असल्यास)

फॉर्म 8-A

टॅक्स पावत्या

Index-II

स्टॅम्प ड्यूटी व रजिस्ट्रेशन पावती

सर्च रिपोर्ट मागील 30 वर्षाचा.

11) भविष्यातील किंमतीचा अंदाज (Future Value)

गुंतवणूक म्हणून जमीन घेत असल्यास:

परिसरातील चालू बाजारभाव

मागील ५–१० वर्षांची किंमत वाढ

प्रस्तावित सरकारी योजना/प्रकल्प

थोडक्यात उदाहरण (Case Insight)

कमी किमतीत जमीन घेण्याच्या मोहात एका खरेदीदाराने DP आरक्षण तपासले नाही. नंतर जमीन सरकारी आरक्षित असल्याचे समजले. आता ना बांधकाम करता येईना, ना विक्री शक्य. 

योग्य तपासणी केली असती तर हा तोटा टाळता आला असता. त्यासाठी

7/12 व EC तपासणी आधी तोंडी  व्यवहार करू नका.

अनलीगल सर्व्हे, दलाल आणि एजंट यांच्यावर अवलंबून राहू नका.

रजिस्ट्रेशन व स्टॅम्प कर वाचवण्याचा प्रयत्न करू नका.

मोजणी व सीमांकन घाईत निर्णय घेऊ नका.

जमीन खरेदीविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

(हे Google Featured Snippet साठी फार महत्त्वाचे आहेत)

❓ FAQ 1: जमीन खरेदी करताना सर्वात आधी काय तपासावे?

उत्तर:

जमीन खरेदी करताना सर्वप्रथम 7/12 उतारा, फेरफार नोंद आणि मालकी हक्क स्पष्ट आहे का ते तपासावे.

❓ FAQ 2: 7/12 उताऱ्यात कोणत्या नोंदी धोकादायक असतात?

उत्तर:

बँक कर्ज, कोर्ट केस, तारण, सरकारी आरक्षण, सह-मालकी यासंबंधी नोंदी धोकादायक ठरू शकतात.

❓ FAQ 3: शेतकरी नसताना शेती जमीन खरेदी करता येते का?

उत्तर:

महाराष्ट्रात साधारणपणे शेतकरी नसताना शेती जमीन खरेदी करता येत नाही, त्यासाठी विशेष परवानगी लागते.

❓ FAQ 4: NA नसलेल्या जमिनीवर बांधकाम करता येते का?

उत्तर:

नाही. NA (Non-Agricultural) परवानगीशिवाय बांधकाम केल्यास दंड व कारवाई होऊ शकते.

❓ FAQ 5: जमीन खरेदी करताना वकील आवश्यक आहे का?

उत्तर:

होय. प्रॉपर्टी वकील कागदपत्रे, टायटल क्लिअरन्स आणि कायदेशीर धोके तपासून भविष्यातील नुकसान टाळतो.

❓ FAQ 6: जमिनीला रस्ता नसेल तर काय अडचण येते?

उत्तर:

रस्ता नसल्यास बांधकाम, विक्री व कर्ज मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे Right of Way असणे आवश्यक

निष्कर्ष

जमीन खरेदी म्हणजे फक्त किंमत कमी असणे नव्हे; तर कायदेशीरदृष्ट्या स्वच्छ, प्रत्यक्षात योग्य आणि भविष्यात उपयोगी अशी जमीन निवडणे होय. वर दिलेल्या प्रत्येक टप्प्यावर काळजी घेतल्यास तुम्ही चुकीचे निर्णय टाळू शकता आणि तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवू शकता.

हा लेख उपयुक्त वाटल्यास शेअर करा.

जमीन, शेती, कायदे व ग्रामीण विषयांवरील असेच मार्गदर्शक वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटवर नियमित भेट द्या.

✍️ रामदास तळपे

ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान 


औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी? संपूर्ण मार्गदर्शन

औषधी वनस्पतींची लागवड माहितीची प्रस्तावना medicinal plants cultivation in Marathi

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे नैसर्गिक औषधांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

img src="..." alt=" औषधी वनस्पती लागवड">
आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी औषधपद्धतींमध्ये औषधी वनस्पतींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. 

अनेक मोठमोठ्या देशी आणि विदेशी कंपन्या आयुर्वेदिक क्षेत्रात आपले उत्पादन वाढवत आहेत. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात कच्चामाल लागतो.

त्या दृष्टीने ही एक मोठी संधी समजून शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती करण्या ऐवजी औषधी वनस्पती लागवडीकडे वळले पाहिजे. ही आता काळाची गरज उरलेली आहे. 

शेतकऱ्यांसाठी औषधी वनस्पतींची लागवड हा कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा आणि दीर्घकालीन फायदेशीर व्यवसाय ठरत आहे. 

योग्य नियोजन, बाजारपेठेची माहिती आणि शास्त्रीय पद्धतीने लागवड केल्यास हा व्यवसाय ग्रामीण भागात मोठे आर्थिक स्थैर्य देऊ शकतो.

प्राथमिक तयारी 

कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आधी त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती छोट्या छोट्या बारकाव्यांसह असने अत्यंत आवश्यक असते.

कुणीतरी सल्ला दिला म्हणून एखादा व्यवसाय करायचा तर तो व्यवसाय कधीच यशस्वी होत नाही. आपण जो व्यवसाय करणार आहात त्या विषयाची आवड असणे अपेक्षित असते, त्यासाठी मेहनत जिद्द केल्याशिवाय गत्यंतर नसते. 

औषधी वनस्पती लागवडी बाबत प्राथमिक माहिती अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी योग्य प्रशिक्षण किंवा आवश्यक ती माहिती त्याचप्रमाणे कच्चामाल विकत घेणाऱ्या कंपन्या, एजंट यांची पुरेपूर माहिती घेऊनच या व्यवसायात उतरावे. 

औषधी वनस्पती लागवडीपूर्वी खरेदीदाराशी करार (Contract Farming) केल्यास धोका कमी होतो.

औषधी वनस्पती म्हणजे काय?

ज्या वनस्पतींचा उपयोग औषधनिर्मिती, आरोग्य सुधारणा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जातो, त्यांना औषधी वनस्पती म्हणतात. भारतात हजारो वर्षांपासून आयुर्वेदात या वनस्पतींचा वापर केला जात आहे.

महाराष्ट्रात प्रामुख्याने लागवड होणाऱ्या औषधी वनस्पती

खालील वनस्पती शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत:

तुळस  सर्दी, खोकला, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

अश्वगंधा  तणाव कमी करण्यासाठी, शक्तिवर्धक

कोरफड (Aloe Vera)  त्वचारोग, सौंदर्यप्रसाधने

सफेद मूसळी – आयुर्वेदिक टॉनिक

शतावरी – महिलांसाठी उपयुक्त

सदाफुली – मधुमेह व कर्करोग संशोधनात वापर

औषधी वनस्पती लागवडीसाठी योग्य जमीन व हवामान

औषधी वनस्पतींची लागवड करताना खालील बाबी महत्त्वाच्या असतात:

जमीन: 

मध्यम ते हलकी, चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.

सामू pH मूल्य: 6.5 ते 7.5 दरम्यान असावे.

हवामान: 

उष्ण व कोरडे हवामान अधिक योग्य

पाणी: 

जास्त पाणी लागत नाही, यासाठी ठिबक सिंचन द्वारे पाण्याची व्यवस्था करावी. पाण्याची सुद्धा एक प्रकारे बचत होते.

ठिबक सिंचनासोबत 'मल्चिंग' (Mulching) तंत्राचा उल्लेख केल्यास पाण्याचे बाष्पीभवन थांबते आणि तण कमी होते, 

जमीन तयारी कशी करावी?

सुरुवातीला एक प्रयोग म्हणून दहा ते वीस गुंठे मध्ये हा प्रयोग करून पहावा. यासाठी 2 ते 3 वेळा खोल नांगरट करावी.

त्यामध्ये आवश्यकतेनुसार शेणखत किंवा गांडूळ खत मिसळावे. किंवा सेंद्रिय खत मिळाले तर उत्तम.

माती भुसभुशीत करून वाफे किंवा सरी तयार कराव्यात.

रासायनिक खतांचा वापर टाळावा. शक्यतो करूच नये.

औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड पद्धत

औषधी वनस्पतींची लागवड दोन प्रकारे केली जाते:

1️⃣ बियाण्यांद्वारे

तुळस, सदाफुली, इसबगोल

कमी खर्च, पण उगवण दर कमी असू शकतो.

2️⃣ रोपांद्वारे

अश्वगंधा, कोरफड, शतावरी आणि बऱ्याच औषधी वनस्पतींची रोपे रोपवाटिकेमध्ये मिळतात. थोडेसे पैसे खर्च होतात परंतु त्यांचे उत्पादन अधिक आणि दर्जेदार मिळते.

पाणी व्यवस्थापन

सुरुवातीला हलके पाणी द्यावे.

पावसाळ्यात अतिरिक्त पाण्याचा निचरा आवश्यक आहे. ठिबक सिंचन केल्यास खर्च कमी होतो.पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. 

यासाठी सुरुवातीला कमी खर्चात शेडनेटची व्यवस्था केली तर वनस्पतीची जोमाने वाढ होते. आणि उष्ण हवामान, पावसाचे पाणी, रोगराई यापासून रोपांचा बचाव होतो. 

रोग व कीड नियंत्रण

औषधी वनस्पती सेंद्रिय पद्धतीने वाढवणे फायदेशीर ठरते.

नीम अर्क फवारणी

दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा, बायोपेस्टिसाइड्स यासाठी जवळच्या कृषी अधिकारी किंवा कृषी सेवा केंद्रातील तज्ञ लोकांचा सल्ला घ्यावा.

रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा.

काढणी (Harvesting) कधी करावी?

वनस्पती पूर्ण वाढ झाल्यावर काढणी करावी.

पानं, मुळे, साले, फुले वेगवेगळ्या टप्प्यावर काढतात.

योग्य वेळेवर काढणी केल्यास औषधी गुणधर्म टिकून राहतात.

साठवण व प्रक्रिया

सावलीत वाळवणे,ओलावा टाळणे,

स्वच्छ पॅकिंग,

गरज असल्यास प्राथमिक प्रक्रिया (कटिंग, ग्राइंडिंग)

बाजारपेठ व विक्री

औषधी वनस्पतींसाठी बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे:

आयुर्वेदिक औषध कंपन्या

औषधी वनस्पती खरेदी केंद्र

औषध उत्पादक सहकारी संस्था

ऑनलाइन मार्केटिंग (B2B)

लागवडीपूर्वी खरेदीदाराशी करार (Contract Farming) केल्यास धोका कमी होतो.

शासकीय योजना व प्रशिक्षण

कृषी विभागामार्फत अनुदान
राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (NMPB)
कृषी विज्ञान केंद्र (KVK) प्रशिक्षण

सेंद्रिय शेतीसाठी विशेष योजना

'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना' (MGNREGA) अंतर्गत सुद्धा फळबाग आणि औषधी वनस्पती लागवडीला अनुदान मिळते.

औषधी वनस्पती लागवडीचे फायदे

कमी खर्चात जास्त नफा

पाण्याची कमी गरज

सेंद्रिय शेतीला चालना

निर्यात संधी

शाश्वत व पर्यावरणपूरक शेती.

औषधी रोपे घेण्यासाठी खालील मान्यता प्राप्त नर्सरी मधून रोपे घ्यावीत किंवा स्थानिक रोपवाटिकेमध्ये औषधी वनस्पतीची रोपे मिळत असल्यास तेथून घ्यावीत.

आयुर्वेदिक वनस्पती विक्री / नर्सरी सप्लायर्स

– Jeevak Medicinal Plants Nursery – औषधी वनस्पती नर्सरी, अमरावती

– MediPlant Medicinal Plants Nursery – औषधी वनस्पती नर्सरी, पंचगणी

– Sanjay Nursery – मोठी नर्सरी, पुणे (वनस्पती किंवा अर्पण)

– Nature India Nursery – नेटिव/हर्बल वनस्पती नर्सरी, नाशिक

– Pansare Nursery – विविध वनस्पती नर्सरी, अहमदनगर

– Sahyadri Rose Garden & Nursery – नर्सरी, सह्याद्री (वनस्पती उपलब्ध असू शकतात)

औषधी वनस्पती/हर्बल रॉ मटेरियल खरेदी करणाऱ्या बाजारपेठेतील कंपन्या.

खाली औषधी वनस्पती विक्री/सप्लाय किंवा खरेदी करणाऱ्या कंपन्यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत जे तुम्हाला शेतीनंतर थेट विक्रीसाठी उपयुक्त ठरू शकतात.

(हे संपर्क साधण्यासाठी सुरूवातीस कॉल/WhatsApp करावे, कारण काही क्रमांक ऑनलाइन निर्देशिकेतून मिळाले आहेत) 

खाली महाराष्ट्रातील औषधी/हर्बल वनस्पती संबंधित कंपन्या, विक्रेते, उत्पादक आणि सप्लायर्स यांची सूची दिलेली आहे. जे औषधी वनस्पती शेती नंतर थेट विक्री/व्यवसायासाठी उपयोगी ठरू शकतात. 

काही ठिकाणी स्वतः वनस्पती घेतात किंवा आयुर्वेदिक हर्बल उत्पादन करतात  संपर्क करून तुम्ही बिझनेस याबद्दल विचारू शकता. 

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती / हर्बल कंपन्या व व्यापार संपर्क

– Shriniwasa Ayurvedic Private Limited – आयुर्वेदिक औषध निर्माता, नाशिक

– K.K. Herbal Industries – हर्बल औषध निर्माता, लिंबगाव

– Vishwachaitanya Ayurvediya Rasashala – आयुर्वेदिक उत्पादक, बारामती

– Archana's Herbal Products – हर्बल उत्पादने, अहील्यानगर

– Ayurleaf Herbals – हर्बल उत्पादन निर्माता, मुंबई

– Mahima Herbals – हर्बल व घाऊक विक्रेते, वाशी, नवी मुंबई

– S. A. Herbal Bioactives LLP – हर्बल उत्पादक, नवी मुंबई

– Novem forse natural lifestyle Private Limited – आयुर्वेदिक/हर्बल निर्माते, पिंपरी-चिंचवड

– LASKY HERBAL – हर्बल उत्पादक, मुंबई

– BIOBAXY TECHNOLOGIES INDIA – औषधी/फार्मा कंपनी, मुंबई

– Global Merchants – औषधी/हर्बल उत्पादन निर्माता, नवी मुंबई

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती विकत घेणारे काही व्यक्ती/खरेदीदार

सरकारी/स्थानिक सूचीप्रमाणे काही मध्यम व्यापारी/खरेदीदार आहेत:

एम. राविंद्र अनकार, Keshav Nagar, DP Road, Anjangaon Surji, Dist-Amravati – 📱 9881156026

Vinarghy Pharmaceuticals, Motala, Dist-Buldhana – 📱 9518943929

Sanajy Tipare, Pan Market, Anjangaon Surji – 📱 9552610627

Dharme Aromatic & Medicinal Estates, Akot, Dist-Akola – 📱 9822229589

सूचना: वरील संपर्क माहिती सार्वजनिक स्रोतांवर आधारित आहे. व्यवहार करण्यापूर्वी स्वतः खात्री करून घ्यावी.

उपयोग कसा करावा?

कॉल/व्हॉट्सॲप करून आधी मिनिमम ऑर्डर विचारावी.

डीलरशी करार / सप्लाय करार (Contract) करणे फायदेशीर असतो.

उत्पादन गुणवत्ता / सर्टिफिकेशन विचारून घेणे.

👉🏻 वाचा सविस्तर शेडनेट हाऊस शेती संपूर्ण माहिती

आयुर्वेदिक शेतीच्या दृष्टीने पडलेले काही प्रश्न FAQ 

Q1. औषधी वनस्पती लागवडीत नफा किती मिळतो?

➡️ योग्य नियोजन केल्यास प्रति एकर 1 ते 3 लाखांपर्यंत नफा शक्य.

Q2. कोणती औषधी वनस्पती नवशिक्यांसाठी सोपी आहे?

➡️ तुळस, सदाफुली, कोरफड.

Q3. औषधी वनस्पती लागवडीसाठी सरकारी अनुदान मिळते का?

➡️ होय, NMPB व कृषी विभागामार्फत.

निष्कर्ष

औषधी वनस्पतींची लागवड ही आजच्या काळातील भविष्यकालीन शेती आहे. योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती घेतल्यास शेतकरी या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवू शकतो. पारंपरिक शेतीला पूरक ठरणारा हा व्यवसाय ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती मजबूत करू शकतो.

ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान


किसन चांभार व्यक्तिचित्र

किसन चांभार साधे व्यक्तिमत्व 

किसन शिंदे (चांभार) हे खेड तालुक्यातील धुओली गावचे रहिवासी. परंतु ते आमच्या गावातील इतर बलुतेदारांपैकी एक बलूतेदार होते. कारण पूर्वी ग्रामीण बलुतेदारी व्यवस्था होती. 

सारा गाव त्यांना किसन नाना असेच म्हणत असत. म्हणून किसन चांभार हे साऱ्या गावाचे नाना होते.

img src="..." alt=" किसन चांभार व्यक्तिचित्र ">
किसन चांभार म्हणजे मध्यम आकाराचा बांधा, गौर वर्ण असूनही रापलेला चेहरा, मळकट धोतर व नेहरू शर्ट. डोक्यावर मळलेली गांधी टोपी, काखामध्ये साहित्याची चामडी पिशवी, चांभार असूनही कायमच अनवाणी असा किसन चांभार यांचा वेश होता.

किसन चांभार गावचा सदस्य 

किसन चांभार हे जरी धुओली गावचे रहिवासी असले तरी आमच्या गावचे आणि त्याचे नाते घट्ट विणीसारखे होते. गावच्या प्रत्येक सण समारंभ, सुखदुःखात जेवणावळीच्या कार्यक्रमामध्ये त्याचा सहभाग असे. आमच्या गावात फार पूर्वीपासून शिवाशिवीला थारा नव्हता. कोणताही भेदभाव केला जात नसे.  

किसन चांभार यांचा सारा गाव एकेरी उल्लेख किसननाना असेच करीत असत. ते आमच्या गावात आठवड्यातून दोन दिवस वहाणा शिवण्यासाठी येत असत. त्यांचे बैठकीचे स्थान म्हणजे आमच्या गावातील कृष्णाजीचे अंगण. 

बलुतेदारी पद्धत कामकाज

साधारण अकरा, साडेअकरा वाजता किसन चांभार गावात प्रवेश करत असे. आणि कृष्णाजीच्या अंगणात बसून प्रथम तंबाखू मळत राही. तंबाखू मळून झाल्यावर तंबाखूचा विडा तोंडात कोंबून तो त्यांची चामड्याची पिशवी बाहेर काढी.

प्रथम चामड्याच्या तुटक्या वहाणा पुढे मांडत असे. त्यानंतर चामड्याचा दोरा बंडल, आळ, सुई, हातोडा, चामडे मऊ करण्यासाठीचा लाकडी गोटा, आरी आणि रापी ही मुख्य हत्यारे असायची.

त्याचप्रमाणे लाकडाचे पाणी ठेवण्याचे छोटे कुंड पुढे मांडत असे. हे सर्व मांडून मगच धंद्याला सुरुवात करी. त्याच्याकडे बारीक वादी, चामड्याचा धागा, वहाणाना ठोकावयाचे नाल, खिळे, व चुका अशा अनेक वस्तू असायच्या.

हळूहळू तेथे अनेक लोक जमत. काही लोकांच्या वहाणा सांधायच्या असत, काहींच्या वहाणांचे अंगठे तुटलेले असत. तर काहींच्या नवीन वाहनांना नाल लावायचा असे. 

वहाणा सांधायच्या पूर्वी किसन चांभार वाहन लाकडाच्या पाणी भरलेल्या कुंडात नरम करायला ठेवत असे. त्यानंतर मग हळूहळू काम करी.

चांभाराचे दुकान गप्पांची मैफल 

लोक चांभाराच्या भोवती बसून गप्पा मारत असत. अनेक बिनकामाचे लोक सुद्धा तिथे बसून गप्पा मारायचे काम करत. चांभाराच्या पुढे बसून गप्पा मारणे हा त्यावेळी रिकामटेकड्यांचा मोठा उद्योग होता. 

काहीजण काहीच न बोलता चांभार कसे काम करतो हे मन लावून पाहत असत. किसन नाना मात्र खाली मान घालून आपले काम करत राही.

किसन चांभार यांच्या अंगात एक विलक्षण कला होती. जोडे बनवावे ते किसन चांभार यांनीच. 

बैलाचा काटा काढण्याचा प्रसंग

पावसाळ्याच्या सुरुवातीला रानामध्ये एखाद्या बैलाच्या पायाच्या खुरामध्ये काटा रुतुन बसे. बैल लंगडत चालू लागे. बैलाच्या ऐवजी आपल्यालाच काटा भरला आहे असे वाटून बैलाचा धनी चिंताग्रस्त होई.

दुसऱ्या दिवशी सकाळीच किसन चांभार यांना बैलाच्या पायातील काटा काढण्याचे निमंत्रण मिळे. त्यानुसार बैल घेऊन चार-पाच जण गावातील गोठणीवर जात असत. फास लावून बैलाला जमिनीवर आडवे केली जाई. चार-पाच जण बैलाला धरून ठेवत.

आणि मग किसन चांभार आपल्या हत्यारांनिशी बैलाच्या पायाच्या खुरात कोठे काटा रुतून बसला आहे. हे आपल्या चाणक्य नजरेने पाहून घेई.

आणि मग हळूच त्याच्याकडील असलेल्या सुईने काटा हळुवार पद्धतीने हलवत राही. आणि नंतर त्याच्याकडील पकडीने अलगद खुरातून काटा उपसून बाहेर काढत. काटा बाहेर निघाल्यावर आम्ही बैलाला सोडून देत असू.

काटा निघाल्यावर बैल आपला खुर जमिनीवर टेकवत राही. आणि काटा निघाल्याची खात्री पटल्यावर तो बैल डोळ्यातील घळघळणाऱ्या अश्रुसह  अत्यंत कृतज्ञतेने आमच्याकडे पाहत राही. 

किसन चांभार शेतकऱ्यांचा हितचिंतक 

पूर्वी गावाकडे चांभार नुसत्या चपला शिवायचे काम करत नव्हते तर बैलांच्या औताच्या जुपन्या, चाबूक, मोटेची पखाल, गावच्या फुटलेल्या ढोलाला चामडे बसवणे, लहान मुलांचा डफ, तान्ह्या मुलाच्या गळ्यातील वादी, बैलाच्या गळ्यातील चामड्याची घुंगरमाळ अशी अनेक कामे चांभाराकडे असत.

त्याशिवाय बैलाच्या खुरातील काटा काढणे, बैल बडवणे ही कामे देखील चांभाराला करावी लागत.

पूर्वीची चपला सांधण्याची पद्धत  

आता जसे चप्पल शिवण्यासाठी धागा असतो तसा पूर्वी हा धागा नव्हता. चांभार चामड्याचा अगदी बारीक धागा काढत असत. आणि त्यानेच चपला शिवत असत. 

चामड्याच्या चपला जास्त दिवस टिकाव्यात म्हणून चपलांना सोल लावणे हा प्रकार रूढ झाला. यालाच लोक विमान सोल असे म्हणत. या सोलचे मात्र गिऱ्हाईकांना पैसे द्यावे लागत असत. सोल लावल्यावर चामड्याच्या चपला वर्षानुवर्ष टिकत.

चामड्यांच्या वस्तूची विक्री -अर्थार्जण

लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या गळ्यात वादी बांधण्याची पद्धत होती. या वादीला मध्यभागी चामड्याच्या अत्यंत छोट्या पिशवीत काही मांत्रिक वस्तू असत. 

ही वादी घातल्यावर बाळाला दृष्ट लागत नाही असा एक समज होता. या वादीचा चांभाराला सव्वा रुपया व शेरभर तांदूळ मिळत असे.

शिवाय ढोलाला चामडे बसवण्याचे, नवीन वाहना, नवीन चाबूक, नवीन जुपन्या, नाल, घुंगुरमाळा या वस्तूंचे चांभाराला पैसे द्यावे लागत असत.

एक हृदयस्पर्शी आठवण

त्यावेळेस शेतामध्ये आम्ही गहू पेरला होता. शेतीला पाणी भरण्यासाठी आमच्याकडे पाण्यावरील मोटर पंप होता. एके दिवशी आम्ही शेताला पाणी भरण्यासाठी गेलो असता पाईपचा पाण्यामध्ये असलेला फुटबॉल सारखा पाणी सोडायचा. त्यामुळे शेतात पाणी येत नव्हते.

आम्ही पाईप खोलून खात्री केली तर फुटबॉलची चामड्याची थाळी तुटली होती. बाहेर काढल्यावर तिचे दोन तुकडे झाले. आता काय करायचे याचा आम्ही विचार करत होतो. 

कारण नवीन थाळी आणायची तर तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार होते. व जाऊन येऊन सर्व खर्च साधारण 60-70 रुपये होणार होता. शिवाय दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्यामुळे त्या दिवशी लाईट नसणार होती. आणि आमचा गहू तर उन्हामुळे मलुल होऊन पडला होता. कसल्याही परिस्थितीत आजच पाणी देणे आवश्यक होते. 

आम्ही विचार करत बसलो होतो तेवढ्यात किसन चांभार तिकडून चालत जाताना दिसले. माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला. त्यांना मी जवळ बोलावले. आणि विचारले. 

किसन नाना ! तुझ्याकडे चामडे आहे काय?

त्यांनी विचारले कशासाठी? त्यावर मी म्हटले मोटर पंप चालू करण्यासाठी. त्यावर ते म्हणाले. 

"काय पोरा ? गंमत करतो माझी." चपला शिवायच माझं काम. आणि माझ्या चामड्याने तुझी मोटर कशी चालू व्हायची?

यावर माझ्या चुलत्यानेही मला वेड्यात काढलं आणि म्हटले.

जाऊ दे त्याला, त्याचे काम करू दे. कशाला त्याचा खोळंबा करतो. आपला आधीच झाला आहे.

परंतु मी दृढनिश्चयने पुन्हा त्याला म्हटले. तुझ्याकडे चामडे आहे का बोल?

त्यावर तो म्हणाला आहे की.

मग मी तात्काळ घरी जाऊन एक पत्र्याचा मोठा डबा आणला. थाळीच्या सारखा सेम टू सेम मापाचा गोल पत्रा त्याच्या कात्रीने त्याच्याकडूनच कापून घेतला. आणि ती पत्र्याची थाळी मध्यभागी ठेवून वरून चामड्याने ती थाळी त्याच्याकडून शिवून घेतली.

आता ती थाळी मोटर पंपाच्या थाळीसारखीच हुबेहूब दिसत होती. तरीही बाकीच्या लोकांना शंका होती. त्यानंतर आम्ही फुटबॉलवर ती थाळी बसवून नट लाऊन फिट केली. आणि फुटबॉल सह पाईप पाण्यात सोडला. पाणी भरले आणि मोटर चालू केली.

आणि काय आश्चर्य. मोटर पंपाने डायरेक्ट शेतामध्ये पाणी फेकले. सर्वांचेच चेहरे आश्चर्याने उजळून निघाले. आणि अशा तऱ्हेने आमचा तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा हेलपट वाचला. शिवाय दिवसभर आणि रात्रभर आम्ही आळीपाळीने मोटर चालू करून आमची शिवार पाण्याने ओले चिंब केले.

किसन चांभाराला विचारले. किसन नाना तू आमचा मोटर पंप चालू केला.

बोल!तुला किती पैसे देऊ?

त्यावर तू नेहमीप्रमाणे चपला शिवून देण्याच्या थाटात बोलला. 

पोरा! तुझ्याकडून लय नाही पण दहा रुपये घेईल.

मी त्याला मुद्दामहून पन्नास रुपयाची नोट दिली. त्यावर तो उतरला. पोरा! माझ्याकडे सुट्टे नाहीत ना.

अरे! राहू दे नाना, हे तुला बक्षीस समज. आमचे महत्त्वाचे काम केल्याबद्दल एक मात्र कर. तू जर या पैशाची दारू प्यायला तर गाठ माझ्याशी आहे.

नाही रे पोरा! ही नोट मी खरचणार नाही. जपून ठेवील.

गावात जाऊन त्याने मी रामभाऊची मोटर चालू केली. अशी जाहिरात देखील केली. पण लोकांनी मोटर पंपचा आणि चांभाराचा काय संबंध? यावरून त्यालाच वेड्यात काढले.

गावात कोणताही कार्यक्रम असला की किसन चांभाराला निमंत्रण नाही असे कधी व्हायचे नाही.

किसन चांभार स्वभाव वैशिष्ट्ये 

किसन चांभार हे कधीच कुणाच्या अध्यात मध्यात पडत नसत. आपण भले आणि आपले काम भले असे त्यांचे काम होते. बोलायला थोडे फटकळ परंतु स्वभावाने प्रेमळ होते. ते आपल्या वयापेक्षा लहान लोकांना अधिकारवाणीने बोलायचे तर मोठ्या मानसांशी अतिशय सलगीने बोलायचे.

काही लोकांच्या चपला अनेक वेळा दुरुस्त करूनही त्या परत परत दुरुस्त कराव्या लागत. चपला इतक्या झिजलेल्या आणि तुटलेल्या असत की त्या कशा दुरुस्त कराव्या हा किसन चांभाराला मोठा प्रश्न पडे. अशावेळी तो सरळ सरळ चपला बाहेर भिरकावून देत असे.

परंतु थोड्याच वेळात समोरच्याच्या अत्यंत गरीब परिस्थितीची जाणीव होऊन अत्यंत मायेने,फेकलेल्या चपला तो परत कुणाला तरी आणायला सांगायचा. आणि दुरुस्त करून त्या माणसाला किंवा त्या बाईला द्यायचा.

माझ्या आयुष्यात मी त्याला कधीच चपला घातल्याचे पाहिले नाही. चांभार असूनही आणि उत्तम कलाकार असूनही तो चपला का घालत नसावा याचा मला अनेकदा प्रश्न पडत असे.

👉🏻 हेही वाचा बबन न्हावी व्यक्तिचित्र

काळाचा ओघात अमुलाग्र बदल 

सन 1990 च्या दशकात चामड्याच्या वाहनांना टक्कर देण्यासाठी बाजारात स्लीपर नावाचा प्रकार आला. त्यावेळी अल्फा आणि पॅरागॉन या चपला खूपच लोकप्रिय झाल्या आणि चामड्याच्या चपलांचे महत्त्व हळूहळू कमी झाले. त्यानंतर प्लॅस्टिकच्या चपलांनी आणि प्लॅस्टिकच्या बुटानी बाजारपेठ पदाक्रांत केली आणि चामड्याच्या चपला बूट हद्दपार झाले. 

ट्रॅक्टर आल्यानंतर बैलांचे देखील महत्त्व कमी झाले. त्यामुळे जुपन्या, चाबूक, बैलाच्या गळ्यातील घुंगरू माळा यांचे महत्त्व कमी झाले. पाण्यावरची मोटर पंप इंजिन आल्यावर मोटांच्या पखालीचे महत्व देखील कमी झाले. शिवाय आधुनिक काळात लहान मुलाला चामड्याची वादी बनवणे हेही बंद झाले.

परंतु काहीही म्हणा बलुतेदारांचे आणि गावाचे नाते अगदी घट्ट होते. परंतु बलुतेदारी केव्हाच लयाला गेली. आता बलुतेदार हा शब्दही नवीन पिढीला समजणार नाही.

काळ बदलतो, व्यवस्था बदलतात; पण किसन चांभारसारखी माणसे काळाच्या पुढेही उभी राहतात आठवणीत, अनुभवात आणि माणुसकीत.”


रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

 

 


 

 



आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...