मत्स्य शेती कशी करावी सविस्तर मार्गदर्शन. (Fish farming in Marathi,)
जर तुम्ही कमी गुंतवणुकीत जास्त उत्पन्न देणारा शेती व्यवसाय शोधत असाल, तर मत्स्य शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. या लेखात नवशिक्यांसाठी संपूर्ण माहिती दिली आहे.
परिचय
भारत हा कृषिप्रधान देश असून शेतीबरोबरच मत्स्य शेती हा एक अत्यंत लाभदायक व्यवसाय ठरत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मत्स्य शेती हा उत्पन्नाचा महत्त्वाचा पर्याय बनला आहे.
योग्य नियोजन, प्रशिक्षण आणि पाण्याचे व्यवस्थापन केल्यास मत्स्य शेतीतून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवता येते. परंतु त्यासाठी योग्य पद्धतीने मत्स्यपालन मार्गदर्शन आवश्यक आहे.मत्स्य शेती म्हणजे काय? (what is Fish farming?)
मत्स्य शेती म्हणजे तलाव, जलाशय किंवा कृत्रिम टाक्यांमध्ये नियंत्रित पद्धतीने मासे पाळून त्यांचा व्यावसायिक उपयोग करणे. ही शेती केवळ अन्न पुरवतेच असे नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करते आणि बेरोजगारी कमी करण्यात मदत करते.
मत्स्य शेतीसाठी आवश्यक गोष्टी (Requirements for fish farming)
1. योग्य ठिकाणाची निवड
मत्स्य शेती ही शक्यतो तलावामध्ये केली जाते. यासाठी पाच ते दहा गुंठे क्षेत्र किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रामध्ये तलाव बनवला जातो. तरच मत्स्य शेती फायदेशीर होते.
तलावातील पाण्याची खोली साधारण १.५ ते २ मीटर इतकी असावी.
पाणी गोड, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त असावे. त्यासाठी पाण्याचे नैसर्गिक स्रोत जवळपास असणे आवश्यक असते. उदा. नदी, विहीर किंवा कुपनलिका त्यामुळे वेळोवेळी तलावातील पाणी बदलणे किंवा पाणी भरणे सोयीचे होते. तलावातील पाण्याचे क्षेत्र मोठे असेल तर शक्यतो पाणी बदलावे लागत नाही.
मत्स्य शेती जेथे करणार असाल तिथे वाहतुकीसाठी रस्ता जवळ असणे फायद्याचे ठरते.
2. पाण्याची गुणवत्ता
सर्वात महत्त्वाचे म्हणजे माशांच्या वाढीसाठी पाण्यामध्ये Ph मूल्य ७–८.५, ऑक्सिजनचे प्रमाण पुरेसे असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पाण्याचे तापमान २५–३२°C दरम्यान असावे. उन्हाळ्यामध्ये तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यासाठी तलावामध्ये ठिकठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था करावी लागते.
पाण्याची नियमित तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे वेळीच खबरदारी घेतली तर मासे निरोगी राहतात.
3. मत्स्य जातींची निवड
भारतामध्ये खालील प्रमुख जाती व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर मानल्या जातात. महाराष्ट्र मध्ये एकंदर हवामानाचा अभ्यास केला असता खालील प्रमाणे माशांच्या जाती आपल्याकडे चांगल्या वाढतात हे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मत्स्य शेती करताना खालील जातींचा विचार करणे आवश्यक आहे.
रोहू, कटला, मृगल, कॉमन कार्प, ग्रास कार्प, चिलापिया
एकाच तलावात वेगवेगळ्या जातींचे मासे पाळल्यास अधिक उत्पादन मिळते.
मत्स्य शेतीची पद्धत
1. तलावात मासे पाळणे तयारी.
मत्स्य शेती करण्यासाठी पाच ते दहा गुंठे कमीत कमी तलावाची निर्मिती करणे आवश्यक असते. त्यासाठी सपाट जमिनीवर दोन ते अडीच मीटर इतकी खोली असलेला आयताकृती किंवा चौरस आकाराचा तलाव निर्माण करणे आवश्यक आहे.
त्यानंतर त्याचे व्यवस्थित पिचिंग करून त्यावर उत्तम प्रतीचा प्लास्टिक कागद तज्ञ असलेल्या व्यक्तींकडून अंथरून घ्यावा लागतो. कुठेही पाणी लिकेज होणार नाही याची सर्वात महत्त्वाची काळजी घेणे आवश्यक असते. तलावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उतरायची व्यवस्था करणे हे सुद्धा आवश्यक असते.
पाण्यात चुना टाकून रोगाणू नष्ट करणे आवश्यक (प्रति हेक्टर २००–२५० किलो).
तलाव पूर्ण तयार झाल्यावर १५–२० दिवसांनी त्यामध्ये पाणी भरा. त्यानंतर योग्य पद्धतीने तलावामध्ये हळुवार पद्धतीने माशांचे बीज (पिल्ले) सोडावीत.
2. मत्स्य पिल्ले सोडणे
प्रति हेक्टर ८,००० ते १०,००० पिल्ले सोडावीत. माशांचे बीज पाण्यात सोडताना बीज जास्त होणार नाही किंवा कमी पडणार नाही याची तंतोतंत दक्षता घेणे अत्यंत आवश्यक असते.
सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पिल्ले सोडल्यास तापमान अनुकूल राहते. सकाळी आणि दुपारनंतर पाण्यामध्ये पुरेसा ऑक्सिजन असतो. त्यामुळे शक्यतो बीज सकाळीच तलावात सोडणे आवश्यक असते.
👉🏻हे ही वाचा खेकडा पालन संपूर्ण माहिती
पिल्ल्यांना सोडण्यापूर्वी त्यांना तलावाच्या पाण्यात अनुकूलन द्या.
3. खाद्य व्यवस्थापन
माशांसाठी संतुलित आहार अत्यावश्यक आहे. आहारात पुढील घटक असावेत:
तांदळाची भूसी, भुईमूग पेंड, मका पावडर, सोयाबीन पेंड. किंवा अनेक कंपन्यांची तयार खाद्य मिळते. त्याचा देखील उपयोग सुरुवातीला करावा.
दररोज माशांच्या वजनाच्या ३–५% प्रमाणात खाद्य द्यावे. माशांना खाद्य देताना अगदी मापातच त्यांना खाद्य देणे अपेक्षित असते. जास्त खाद्य टाकल्यास ते वाया जाते आणि पाण्याच्या तळाशी जाऊन बसते. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी सुटू शकते. आणि नाहक पैसे खर्च होतात.
खाद्य टाकताना खाद्य हे शक्यतो सकाळी तलावाच्या दोन किंवा तीन ठिकाणी पाण्याच्या पृष्ठभागावर किंवा जाळीदार खाद्य पिंजऱ्यात टाकावे.
4. पाण्याचे व्यवस्थापन
दर १५ दिवसांनी २०–३०% पाणी बदलावे. कारण माशांनी अन्न खाल्ल्यावर त्यांची विस्टा मोठ्या प्रमाणात तयार होते आणि पाण्याला दुर्गंध सुटतो. त्यामुळे पाणी बदलणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे ऑक्सिजन कमी झाल्यास एअर पंप किंवा पाणी हालचाल यंत्र वापरावे.पाण्यात गवत किंवा शेवाळ वाढू देऊ नये.
5. रोग नियंत्रण
माशांमध्ये परजीवी, बुरशी किंवा जीवाणूजन्य रोग होऊ शकतात. त्याचप्रमाणे माशांना डोळ्यांचा आजार हा जास्त होतो. त्याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे नियमित पाण्याची तपासणी करा. रोग आढळल्यास त्वरित पशुवैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्या.
चुना आणि पोटॅशियम परमॅंगनेट यांचे प्रमाणीत वापर रोग नियंत्रणास मदत करतात. त्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.
माशांना बाहेरील बेडूक, साप आणि आकाशात उडणारे पक्षी यांच्यापासून सतत धोका असतो. त्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक असते.
मत्स्य शेतीसाठी सरकारी योजना (Government schemes for fish farming)
भारतीय सरकार व राज्य शासन मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवतात:
1. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना
मत्स्य पालनासाठी अनुदान आणि कर्ज सुविधा.
मत्स्य प्रक्रिया केंद्र व कोल्ड स्टोरेजसाठी मदत.
2. राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ
प्रशिक्षण, उपकरणे आणि मार्केटिंगसाठी सहाय्य.
3. कृषी व मत्स्य विभागाकडून अनुदान योजना
तलाव निर्मिती व मत्स्य पिल्ले खरेदीसाठी २५%–५०% पर्यंत अनुदान मिळते. त्यासाठी सरकारी योजनेचा फायदा अवश्य घ्यावा. शासन दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करून ठेवते. परंतु त्याचा फायदा न घेतल्यामुळे सदरची तरतूद इतर ठिकाणी खर्च होते.
मत्स्य शेतीतील खर्च व नफा
प्रारंभिक गुंतवणूक: तलाव निर्मिती, पिल्ले, खाद्य आणि साधनसामग्रीसाठी साधारण ५०,००० ते १.५ लाख रुपये. जास्तीत जास्त पाच लाख रुपये इतका खर्च येतो.
वार्षिक उत्पन्न: एका हेक्टर तलावातून सरासरी ३–५ टन मासे मिळतात.
बाजारभावानुसार भरपूर उत्पन्न प्रति वर्ष होऊ शकते.
त्यासाठी स्थानिक बाजारपेठ, किरकोळ विक्रेते, होलसेल विक्रेते, व्यापारी तालुक्याचे ठिकाण, मोठमोठी हॉटेल्स, ढाबे यांच्याशी संपर्क ठेवला तर मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते आणि आर्थिक फायदा होतो.
अशा प्रकारे योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास मत्स्य शेती अत्यंत लाभदायक ठरते. परंतु त्यासाठी योग्य प्रकारे प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक असते.
आपल्याला जर माशांबद्दल कोणतीच माहिती नसेल आणि मत्स्य व्यवसाय जर करत असाल तर ते पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखे आहे.
त्यामुळे प्रथम सर्व अभ्यास करून मत्स्य व्यवसाय केला तर त्यासारखा नफा कुठेच नाही.
वरील माहिती अनुभव व उपलब्ध स्रोतांवर आधारित आहे. प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्थानिक मत्स्य विभागाचा सल्ला घ्यावा.मत्स्य शेतीतील काही टिप्स
प्रशिक्षण घेणे आवश्यक (स्थानिक मत्स्य विभागाकडून).
पाण्याचे परीक्षण दर महिन्याला करावे.
सेंद्रिय खाद्य व नैसर्गिक पद्धती वापरल्यास गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते.
स्थानिक बाजारपेठ व ऑनलाइन विक्रीचा वापर करा.
निष्कर्ष
मत्स्य शेती हा केवळ एक व्यवसाय नव्हे, तर ग्रामीण विकास आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग आहे.
अल्प गुंतवणुकीत अधिक नफा मिळवण्यासाठी ही शेती उत्तम पर्याय ठरू शकते. योग्य प्रशिक्षण, पाण्याची काळजी आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेतल्यास मत्स्यपालनात यश निश्चित मिळते.
👉 “जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग शोधत असाल, तर मत्स्य शेती नक्कीच सुरू करा.”
हा लेख ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान या वेबसाईटसाठी माहिती, अनुभव आणि विविध स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आला आहे.
ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान (Rural culture & modern technology)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा