Translate

पाऊलवाटा

आजच्या आधुनिक काळात पाऊलवाटांचे असणारे अनन्य साधारण महत्व लयाला गेले आहे. साधे उदाहरण पहा.

आपण विचारतो अमुक अमुक माणूस कुठे राहतो? समोरचा माणूस म्हणतो. अमुक अमुक रस्त्याने जा. पुढे गेल्यावर प्रमुख तमुक रस्ता लागेल. पाऊलवाटांची जागा रस्त्याने घेतले आहे.

तेच पूर्वी विचारले जायचे.ओ पाव्हणं..दत्ता तिटकारे यांच्या घराकडे जाण्यासाठी वाट कुठून आहे ओ ? तमुक तमुक वाट कुठे जाते हो ?

याबाबत आशा भोसले यांचे ही वाट दूर जाते. स्वप्नातल्या गावा  हे गीत आठवत असेलच..किंवा रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या हे भावगीत आपणा सर्वांच्या स्मरणात आहेच.

त्याप्रमाणेच ही पायवाट दूर जाते, स्वप्नातल्या गावा 

यावरून पूर्वी पायवाटना किती महत्त्व होते हे लक्षात येते.

पूर्वी सर्व सर्व ग्रामीण भागाचे दैनंदिन जीवन हे पायवाटांशी निगडित होते. पायवाट ह्या त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता.

मला लहानपणापासून माझ्या गावाकडील असलेल्या पाऊलवाटां विषयी खुप प्रेम आहे. मी जरी आता त्या पाऊलवाटाने जात नसलो तरी मनाने मात्र सतत त्या पाऊलवाटाने जात असतो.

पुर्वी लोक पाऊलवाटांनेच प्रवास करत असत. प्रत्येक पाऊलवाटांचे रहस्य अगदी वेगळे असे. रानात जाणाऱ्या पाऊलवाटा, शाळेत जाणारी पायवाट, शेताकडे जाणा-या पायवाटा,बाजारला जाणाऱ्या पायवाटा,गुरांना चरावयास घेऊन जाणाऱ्या पायवाटा,शेजारच्या गावांना जोडलेल्या पायवाटा, गावातील वाड्यावस्त्यांकडे जाणाऱ्या पायवाटा, रानात  व जंगलात जाणाऱ्या पाऊलवाटा,ओढ्याच्या कडेने जाणारी पाऊलवाट असे गावाकडे कितीतरी पाऊलवाटांचे प्रकार पहायला मिळतील.

प्रत्येक पाऊलवाटेचे वैशिष्ट्य हे ठरलेले असे. सरपण आणण्यासाठी स्रिया जेव्हा सकाळी घराबाहेर पडत तेव्हा याच पाऊलवाटेने अगदी चालता चालता चटणी भाकरी खात खात जात असत. 

काही कामानिमित्त बाहेर गावी पाऊलवाटेने बाजाराला अथवा इतर कामासाठी एस.टी ने प्रवास करायचा असेल तेव्हा लोक बाजरीची भाकरी, लसणाची चटणी किंवा तव्यावरची वाटोळी भजी रूमालात बांधून घेऊन जात असत.

तेच शेतातील पाऊलवाटेने घरधन्याला पितळीत भात, त्यामध्ये तांब्या त्यात मसुराची आमटी किंवा दुसरे एखादे कोरड्यास (कालवण) कांदा त्यावर भाकरी फडक्यात बांधून डोक्यावर घेऊन व दुसऱ्या हातात पाण्याने भरलेली कळशी घरधनीण घेऊन जात असे.

रानात गुरे चारण्यासाठी जात असलेल्या गुराख्याच्या कमरेला चटणी भाकरीचे गाठोडे बांधलेले असे. प्रत्येक पाऊलवाटेने जातांना मनात एक वेगळेच नाते तयार झालेले असे.रानात जाताना, शाळेत जाताना, शेताकडे जातांना,बाजाराला जाताना, गुरांकडे जातांना,माहेरी अथवा सासरी जातांना, लग्नकार्यासाठी जाताना,मयतीला जाताना जेव्हा जेव्हा या पाऊलवाटांनी जाऊ तेव्हा अगदी वेगळीच हुरहुर वाटत असे.

शाळेत जातांना आम्हाला त्यावेळी दररोज पाच किलोमीटर दुर असलेल्या गावी शाळेत जावे लागायचे.हमरस्त्याने जातांना जशी वेगवेगळी स्टेशने लागतात. अगदी तशीच स्टेशने पाऊलवाटेने पण असायचीच बरं का ? परंतु ही काही वांची नावे नाहीत हं. शाळेत जाताना  गोठणी, शिंबारटाक, खिंड, सटवाय, कनीर, किंवा बहिरी ठकीचे घर, वाजदरी, खोब-या आंबा, खोल वहाळ असे थांबे असत.

शाळेत जातांना खिंडीतुन पुढे शिरगावला न जाता डाव्या बाजुला आंब्याच्या शेजारून दोन दगडांमधुन जाणाऱ्या पाऊलवाटेनेच जायचो व यायचो. ही वाट अगदी डोंगरांच्या पोटाखालुन जात असे. ही वाट अगदीच नागमोडी व वळणावळणाची व दगडधोंड्यातुन जाणारी होती. तेथे असणाऱ्या उंबराच्या झाडाखाली दगडात कोरलेल्या चौकोनी टाकात हमखास पाणी असायचे व त्याशेजारीच पाण्याचा झरा होता. हे पाणी साधारण एप्रिल पर्यंत असायचे. आम्ही हे पाणी अगदी उपडे पडून प्यायचो. या पाण्याची चव अद्यापही विसरलो नाही.

मला तेव्हा खूप आवडायची ती म्हणजे ओढ्याकडेने जाणारी पायवाट.ही काळी असते.ओढ्याच्या कडेला छोटी लव्हाळी व रानफुले वाऱ्याच्या झुळके बरोबर डोलत असतात.बेडकाचे डराव डराव ओरडणे चालू असते. हे ऐकत असतानाच पाण्यातील रान कोंबडी पक पक पक ओरडत असते.ओढ्याचे खळखळणारे पाणी,पान कोंबडीचा व बेडकांचा आवाज,आणि रान फुलांचा सुगंध यांनी मनमोहून जायचे. मी अगदी रमतगमत शेताकडे चाललेला असायचो.

ओढ्याच्या कडेला असलेल्या झाडावर खंड्या म्हणजेच धीवर  पक्षी पाण्यात सळसळणाऱ्या माशांकडे अगदी शिकार पडण्याच्या नादात एकाग्र नजर रोखून बसलेला असतो. त्यावेळी अपसुकच लहानपणी असलेल्या कवितेच्या ओळी गुणगुणाव्याशा वाटायच्या.

तळ्याकाठी गाती लाटा, लाटांमध्ये उभे झाड !

झाडावर धीवराची, हाले चोच लाल जाड !!

पावसाळ्यात सगळ्यात अवघड वाट म्हणजे गव्हाळीची वाट. ही वाट पाऊस पडल्यावर अतिशय चिकट असायची. चालताना अगदी बेताने चालावे लागे. चालताना थोडी जरी चूक झाली तरी दोन्ही पाय सटकून बुडावर पडलोच म्हणून समजा.मुंबईवरून गावाला येणारी मुले या पायवाटेने चालताना हमखास पडायची.

शेताच्या बांधावरून चालताना बांधाच्या दोन्ही बाजूला गुडघ्या इतके उंच हिरवेगार गवत डोलत असते. आणि मधून काळी कसदार वाट अगदी चित्रासारखी दिसत असायची. दोन्ही बाजूला भाताची शेती फुलोऱ्यात असते. फुलोऱ्याचा मंद सुवास नाकात तोंडात दरवळत राहतो. या दरवळीचा आनंद लुटत असताना.गवतावर असलेले दवबिंदू उन्हाचे किरण पडल्यावर अगदीच चमकत राहतात. हे दवबिंदू अगदीच मोत्यासारखे दिसतात. त्यामधून इंद्रधनु सारखे रंग तरळत असतात. हे सर्व निसर्गाचे वैभव पहात आम्ही मार्गस्थ व्हायचो.

आम्ही लहान असताना बांधावरच्या या वाटेवर दोन्ही बाजूचे गवत एकत्र करून त्याची गाठ बांधायचो.आणि दूर उभे राहून गंमत पहायचो. एखादा बेसावध माणूस तिथून जाताना बरोबर पाय अडकून पडायचा.

काही वाटा या कोणताच पर्याय शिल्लक नसल्यामुळे ओढ्यातून जायच्या.ओढ्यातून जात असताना चप्पल हातात घेऊन पाण्यातून चालावे लागे. पाण्यातून चालताना डुबुक डुबुक आवाज व लाटांच्या लहरी दिसत राहायच्या.

जून महिन्यात पेरणी केल्यावर हुशार शेतकरी शेताच्या बाजूला काटेरी कुंपण घालायचा. परंतु शेतातून जाणारी ही वाट अतिशय बेरकी. कितीही कुंपण असले तरी एखाद्या मांजराला ज्याप्रमाणे घरातून अनेक वेळा बाहेर काढल्यावरही ते पुन्हा घरात येत राहते त्याप्रमाणे ही पाऊलवाट कितीही कुंपण घातले तरी त्यामधून जाणार म्हणजे जाणारच. शेवटी शेतकरी ही हार समजून एके दिवशी तोही त्या वाटेने जात राहतो. अशी ही पाऊलवाट.

या पाऊलवाटा जेवढ्या हव्याहव्याशा आणि सुंदर वाटतात तेवढ्याच त्या कधीकधी नकोश्या वाटायच्या. डोक्यावर एखादे गाठोडे घेऊन जात असताना ही वाट संपता संपत नसायची.

गावाला अनेक वाड्यावस्त्या असल्यामुळे गावाला अनेक पाऊलवाटांचे जाळे निर्माण झालेले असते. वडाच्या वाडीकडे जाताना खतारी,आराशीचा खडक,टाक्याची गोटी,नावठिका असे थांबे असत.(शेतांची नावे) तसेच पुढे जाताना गव्हाळी, चोहंड ,व डोंगराच्या अंगा खाद्यावरून वरच्या वाटेने जाताना वनस्पत्या, आघाडी, मोरटाकं, बेडंखिंड हे थांबे असत.

गावातुन रस्त्याने व नंतर शेताच्या शेजारून, बांधावरून, ओढ्यातुन कळाम मेहर व नर्ह्याकडुन पुढे जावळेवाडीकडे जाणारी वाट चालताना निसर्गाचा आस्वाद घेत फारच छान वाटायचे.

तळेघरला बाजारला डोक्यावर हिरड्याचे गाठोडे घेऊन जाताना खरी कसोटी लागायची.साधारण चारेक किलोमिटर उभा डोंगर चढायचा. त्यात डोक्यावर ओझे. सोमाण्याचा घाट, दिवस्या उंबर, बोरीचा धस चढुन गेल्यावर पुढे माचीत ओझी उतरायची. घटकाभर विश्रांती घेऊन परत डोंगर चढायचा.

भुमीर, धायटावणा, ना-याचा माळ चढुन मुख्य माळात आल्यावर थंडगार वा-याची झुळुक लागायची. घामाने भिजलेले अंग सुकुन जायचे. तेथे जवळच फडावर हिरडे घालायचे.त्याचे पाच दहा रूपये यायचे. हे पैसे पाहून कोन आनंद व्हायचा. बाजारात जाऊन केव्हा एकदा बर्फाची गारेगार खाऊ असे व्हायचे.

दिवस मावळतीकडे आल्यावर रानात शिकारीला जात असू. अंगावर घोंगडी व हातात काठी, शिकारीचे जाळे (वाघुर) घेऊन आम्ही पायवाटांनी रानात जाऊन जाळे लावून शिकार येण्याची वाट पहात असू.साधारण साडे आठ ते नऊ वाजे पर्यंत आम्ही रानात थांबून नंतर घरी येई. अंधारात चालताना या पाऊलवाटांनी कधीही दगा दिला नाही.

एखाद्याचे जनावर जर घरी आले नाही तर आम्ही पाच सात जण रात्री रानात जात असू. सर्व वाटा पिंजून जनावर सापडुन घरी घेऊनच येत असू. एवढ्या त्या वाटा आमच्या मनात अगदी घर करून होत्या.

गावी असताना रानातील,शेतातील,गावाजवळील असंख्य पाऊलवाटा अनवाणी नेहमी तुडवायचो.सतत त्यावर वावर असायचा.त्यांचे व आपले एक मैत्रीचे जणू नातेच तयार झाले होते.या पाऊलावाटा आयुष्याचा दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक होत्या.

काही वाटा अगदीच भेसुर वाटायच्या.तेथे भुते असतात.असा एक मतप्रवाह असायचा.त्यांच्या गोष्टी लोक तिखटमीठ लावून सांगायचे. तेथून जाताना रात्रीचे सोडा दिवसा भिती वाटायची. खिंडीतली वाट,खालच्या माचीतली वाट, ढगाखालची वाट, धायटावण्याची वाट, आडाकडची वाट, ही काही उदाहरणे.

रानात गेल्यावर तहान लागली की या वाटाच पाण्यापर्यंत घेऊन यायच्या. देवकड्यामधले पाणी, कोटमाचे पाणी, पळसावण्याचे पाणी, धोधानीच्या चोहंडीतील पाणी, मोरटाक्याचे पाणी अतिशय मधुर चव. देवकड्यामधील पाणी आणि धोदाणी तील चोंडीतील पाणी अगदी मे महिन्यातही अतिशय थंड बर्फासारखे असायचे. पाणी पिताना दातांना ठणक लागायचा.

शालेय जीवनात या पाऊलवाटा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होऊन गेल्या होत्या. शाळेत जाताना, रानात हिरडे गोळा करताना, सरपण आणताना, आंबे, जांभळे, करवंदे खाताना, शिकारीस जाताना, शेतावार जाताना,बाजाराला जाताना रोज या पाऊलवाटांचा सहयोग असायचा.पण याच पाऊलवाटा आता दुर्मिळ झाल्या आहेत. ज्या पाऊलवाटांनी आपल्यावर प्रेम केले, आपल्या जीवनाचा घटक झाल्या त्याच पाऊलवाटांना आज आपण या दुनियेच्या बाजारात गेल्यावर विसरलो. हे मात्र नक्की.आता केव्हातरी या पाऊलवाटांनी चालावेसे वाटते. 

सगळ्या पाऊलवाटा पुन्हा एकदा तुडवाव्या वाटतात. परंतु नोकरीच्या निमित्ताने पोटापाण्यासाठी आपले गाव सोडून दूर शहरात राहत असल्यामुळे योग मात्र केव्हा येईल हे सांगता येत नाही.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)








प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे

प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे 

img src="..." alt=" प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे ">
महादेव गोपाळे हे कळमोडी गावचे सुपुत्र. अवघ्या जगप्रसिद्ध  रांगोळीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना आजपर्यंत विविध पुरस्काराने गौरवले आहे.

प्रारंभिक जीवन 

महादेव गोपाळे हे कळमोडी गावचे रहिवासी. लहानपणापासून त्यांना उपजतच कलेची आवड होती. तिसरी चौथीला असताना ते मातीचे गणपती, मातीचे बैल,मातीची भांडीकुंडी बनवायचे आणि यातूनच कलेचा जन्म झाला.

महादेव यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच म्हणावी लागेल. शेतकरी कुटुंब असल्या मुळे अपसुकच जनावरे आली.छोट्या महादेव यांना शाळेबरोबर दुपारनंतर गुरे राखण्याचे काम करावे लागायचे.शेतीची कामे करावी लागत. हे करत असताना महादेव यांची उपजत असलेले कला बाहेर डोकावत असे. शेणाच्या गोवऱ्या करताना सुद्धा त्या सुंदरच झाल्या पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असे.

कळमोडी गाव हे अतिशय ग्रामीण व दुर्गम भागातील गाव. त्यावेळी चालायला नीट रस्ते नव्हते. गाड्या तर दूरची गोष्ट. राजगुरुनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले गाव. त्यावेळेस एसटीचे सोय सुद्धा नव्हती.पायीच प्रवास करावा लागत असे. 

त्यांना तिसरी चौथीला असताना एक शिक्षक होते त्यांना चित्र काढण्याचा छंद होता.उपजतच कलेची आवड असलेल्या महादेव गोपाळे यांना हे शिक्षक म्हणजे दुधात साखर. त्यांच्याकडून थोडेफार शिकायला मिळाले.

कलेची जोपासना 

छोटा महादेव कागदावर चित्र काढू लागला. या चित्राला रंग दिले तर हे चित्र खूपच उठावदार होईल व सुंदर सुद्धा. परंतु त्यावेळी रंग कुठे होते? परंतु छोटा महादेव खूपच उत्साही मुलगा होता. त्याने कोळसा पाण्यात घासून  काळा रंग तयार केला. 

रानभेंडीतील फुलातील मागच्या बोंडातील पिवळा द्रव काढून तो पिवळा रंग म्हणून वापर केला.घेवड्याच्या पानाच्या रसापासून हिरवा रंग तयार केला.

गेरूपासून तांबडा रंग तयार केला. पूर्वी गावाला लोक निळ पावडर वापरत असत. त्यापासून निळा रंग तयार केला.आणि त्याने काढलेल्या चित्राला रंग भरले.आणि हे चित्र इतके उठावदार झाले की महादेव स्वतःवर खुश झाला. गावातील सर्व लोकांना हे चित्र खूप आवडले. अशाप्रकारे महादेव यांच्या कलेचा जन्म झाला.

पुढील शिक्षण

त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण कळमोडी या गावी झाले.पुढील शिक्षणासाठी त्यांना वाडा या गावात जावे लागले. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर विद्यालय वाडा या शाळेतील इयत्ता नववीला दाखल झाले.वाडा ही खेड तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठी बाजारपेठ होती.

वाडा या गावात शिक्षणासाठी प्रवेश घेतला परंतु राहण्याची सोय नव्हती.त्यामुळे गोपाळे यांना वाडा ते कळमोडी असा 14 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागे. दररोज शाळेत व शाळा सुटल्यानंतर घरी यावे लागे. उन्हाळ्यामध्ये पायाला चटके बसत. परंतु चप्पल नसल्यामुळे झाडाची पाने तळपायाला बांधून प्रवास करावा लागे. त्या काळात सर्व लोकांची अशीच सर्वसाधारण परिस्थिती असायची.

पावसाळ्यात तर त्यांचे खूप हाल होत असत. दिवसभर त्यांचे कपडे ओले असायचे.ते सांगतात या आजन वयात एकदा त्यांनी पैसे नसतानाही मिसळ व पाव खाल्ले. त्याबद्दल त्यांना हॉटेल मालकाकडून मार मिळाला.

कशासाठी? पोटासाठी

वाडा गावात त्यांनी आठवी आणि नववी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परंतु घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्यामुळे  कुटुंबाला हातभार लावला पाहिजे या जाणिवेतून त्यांनी मुंबई गाठली. मुंबईला गेल्यावर दूध केंद्रात पहाटे उठून दूध पोचवण्याचे काम केले. आणि रात्रपाळी दहावी केली.

दहावी झाल्यानंतर रोजी रोटी साठी काहीतरी केले पाहिजे, गावाकडील असलेल्या आई-वडिलांना मदत केली पाहिजे त्यामुळे काहीतरी पर्यायी नोकरी करणे अतिशय आवश्यक होते. त्याचवेळी प्रसिद्ध चित्रकार श्रीकांत घोंगडे यांच्याशी त्यांची ओळख झाली.आणि महादेव यांची लहानपणी असलेल्या कलेला चालना मिळाली. घोंगडे यांनी त्यांना कलेबद्दल खूप काही शिकवले.

अपमानाचे शल्य 

मुंबईमध्ये चाळीत राहत असताना एकदा ते एका चाळीतील खोलीमध्ये खिडकीतून टीव्ही पाहत असताना मालकाने ते पाहिले आणि त्यांच्या कानशिलात लगावली. त्यावेळी दूरदर्शन हे एकच वाहिनी होती. झालेला अपमान गिळून टाकण्याशिवाय गोपाळ यांच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. गरिबीचे ते एक विदारक चित्रच होते.

कलेला वाव मिळाला.

त्यावेळी सिनेमांची पोस्टर ही हाताने बनवली जात व रंगवली जात. 1980 साली ते सिनेमांची पोस्टरचे पेंटिंग व कलर काम करू लागले. त्यावेळी त्यांना तुटपुंजा मोबदला मिळायचा.

बाळकृष्ण आर्ट दादर व श्रीकांत धोंगडे यांचे चित्रपट पोस्टर बनविन्या साठी असिस्टंट म्हणुन काम केलं.रांगोळी व पोस्टर पेंटींग करण्यासाठी स्वित्सर्झलॅंन्ड येथे प्रात्याक्षिक केलं

चित्रपट पोस्टर,माफीचा साक्षीदार,अरे संसार संसार,देवता,सुन माझी लक्ष्मी,चटक चांदणी,शापीत,भालु,राघु मैना,लक्ष्मीची पाऊले अशा अनेक चित्रपटांचे पोस्टर बनविन्याची कामे केली..हिरो, हमजोली, तोहफा, हिम्मतवाला, अशा अनेक हिंदी चित्रपटांचे पोस्टर बनवले.

हे पोस्टर बनवत असताना त्यांच्या हिताचिंतकाने त्यांना रेल्वेमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याचे सांगितले. रेल्वे मध्ये तांत्रिक विभागात भरती निघाली होती.गोपाळे यांनी अर्ज दाखल केला.आणि काही कालावधीतच त्यांना नोकरीवर हजर होण्याचा आदेश आला.आणि अशा तऱ्हेने पोटापाण्याचा विषय संपला.

रांगोळीतील कलेतील चंचू प्रवेश 

तो काळ मुंबईतील अनेक शहरांत रंगावली प्रदर्शन भरण्याचा होता. घाटकोपरमधील भाजी गल्लीत दर वर्षी "प्रवीण वैद्य" हे रांगोळी प्रदर्शन भरवीत असत. त्याने महादेव इतके प्रभावित झाले की, दररोज कामावरून घरी आल्यावर ते रांगोळी काढू लागले व नंतर त्यात निष्णांत बनले.

रेखाटलेल्या रांगोळी चित्रांचे नमुने त्यांनी वैद्य यांना दाखविले.त्यांनीही महादेव यांच्या रांगोळी चित्रांची प्रशंसा केली आणि त्यांना प्रदर्शनामध्ये संधी दिली.रांगोळीच्या विविध कला त्यांनी आत्मसात केल्या. 

त्यांना रांगोळी काढण्यासाठी आमंत्रित करण्यात येऊ लागले. मुंबईमध्ये हळूहळू त्यांचे नाव नावारुपाला आले. त्यांनी प्रसिद्ध रमाधाम खोपोली येथे बाळासाहेब,व मीनाताई ठाकरे यांची रांगोळी काढली आहे.


या संधीचे सोने करत महादेव यांनी आपल्या आयुष्यात यशाचे रंग भरले. रांगोळीचा सराव आणि गुरुस्थानी असलेल्या वैद्य यांचे मार्गदर्शन घेऊन स्वत:ची अशी वेगळी शैली महादेव यांनी निर्माण केली. 

महाराष्ट्रभर रांगोळी प्रदर्शनात सहभाग घेऊन अनेक बक्षिसे पटकावली.रांगोळीतून साकारणारे पोर्ट्रेट इतके हुबेहुब वाटे की, ती व्यक्तीच आपल्यासमोर प्रत्यक्ष आहे इतके सजीव.गोपाळे हे रांगोळी चित्रात अक्षरश: जीव ओततात,

याबद्दल त्यांची रांगोळी चित्रे पाहणार्‍या कुणाचेही दुमत होऊ शकत नाही.पोर्ट्रेट ही त्यांची खासियत असली, तरी त्यांच्या सामाजिक जाणिवा इतक्या प्रगल्भ आहेत की, त्या त्यांच्या रांगोळी चित्रांतूनही उमटतात. कला हे माध्यम समाजप्रबोधनासाठी प्रभावी ठरू शकते, म्हणून गोपाळे यांनी पोर्ट्रेटबरोबरच समाजदर्शन व सामाजिक संदेश देणार्‍या रांगोळ्या रेखाटल्या. 

हुंडाबंदी, दारूबंदी, गुटखाबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, बालमजुरी, 26/11 दहशतवादी हल्ला, एस.टी. डेपो, रेल्वे स्थानक यांची, तसेच अनेक सामाजिक, राजकीय व कलाक्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची रांगोळी चित्रे त्यांनी रेखाटली

नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथील दिनांक 24 ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित समूह चित्र प्रदर्शनात चित्रकार महादेव गोपाळे यांनी काढलेली व्यक्तिचित्रे खूप गाजली. 

त्यांनी राजकीय पुढारी,गायक, चित्रपट सृष्टीतील कलावंत यांची व्यक्तिचित्रे आता पर्यंत अनेक काढली आहेत. पण या प्रदर्शनात प्रदर्शित संत गाडगेबाबा, भीमसेन जोशी, राष्ट्रपती अब्दुल कलाम, भाऊराव पाटील,रतन टाटा यांची व्यक्तिचित्रे त्यांनी  कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक  रंगविली. 

ही चित्रे पाहण्यासाठी चित्र रसिकांनी खूप गर्दी केली आणि त्यांचे कौतुक केले. त्यांत कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक माध्यमाचा वापर करून या चित्रांतून व्यक्ती, स्थान यांसोबतच अलंकरण, पेहराव यांचाही त्यांचा विशेष अभ्यास त्यांनी दाखविला.

वारकरी व्यक्तिचित्र ,तसेच चुलीवर घावणे बनविण्यात व्यस्त  असणार्‍या स्त्री चित्रात याचा प्रत्यय येतो. त्यांनी बिंदू आणि तिरप्या रेषांच्यासाहाय्याने वेगवान फटकाऱ्यांनी काढलेली ही चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 

त्यांची रंगावली चित्रे पुस्तकात प्रसिद्ध आहेत.अशी विविध प्रकारची व्यक्तिचित्रे त्यांच्यातील समर्थ कलावंताची साक्ष देतात असे वाटते .असे त्यांच्या विषयी उद्गार प्रसिद्ध चित्रकार आणि क्युरेटर ज्यांनी चाळीसहून अधिक विविध बाल आणि तरुण  चित्रकारांची चित्र प्रदर्शने आयोजित केले आहेत.

चुलीवर घावणे बनविण्यात व्यस्त असणार्‍या स्त्री चित्रास त्यांना एस.पी. मेमोरियल ट्रस्ट, मुंबई पुरस्कृत थोर चित्रकार डॉ. एस.एम. पंडित यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेला पुरस्कार देण्यात आला. 

त्यांच्या कार्याची दखल जगाने सुद्धा घेतले आहे. रांगोळी कलेत सतत ४० कार्य केल्यामुळे भारत वल्ड रेकॉड केलं आहे. गिनीज वल्ड सहभाग प्रमाण प्रत्र व मेडल मिळाले. हा बहुमान त्यांचा नसून सर्व महाराष्ट्राचा आहे.

श्री गोपाळे यांची गाव असलेल्या कळमोडी येथे दरवर्षी श्रीरामनवमीच्या दिवशी यात्रा भरते.श्री रामाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर खूप मोठी श्रीरामाची रांगोळी काढली जाते.

यासाठी दोन दिवस आधीच तयारी करावी लागते. अगदी परिसर स्वच्छ करण्यापासूनची ते रांगोळी काढेपर्यंत ची सर्व तयारी महादेव गोपाळे यांनी करावी लागते. ते आनंदाने हे सर्व प्रत्येक वर्षी करत असतात. त्यांच्या गावावर त्यांचे निस्सीम प्रेम आहे. श्री रामावर भक्ती आहे.

अपमानाची परतफेड 

त्यांना ज्या हॉटेल आत मिसळ साठी पैसे दिले नाही म्हणून मार खावा लागला त्याच हॉटेल मालकाने प्रसिद्ध रांगोळी कार म्हणून त्यांचा त्याच हॉटेलमध्ये सत्कार केला.

तसेच ज्या खोली मालकाने त्यांना दूरदर्शन पाहण्यापासून रोखले व कानशिलात मारली त्याच महादेव गोपाळे यांची मुलाखत पुढे दूरदर्शनवर समाजाला पाहायला मिळाली. हा नियतीचा न्यायच म्हणावा लागेल.

श्री गोपाळे यांनी त्यांच्या आईच्या स्मृतिप्रतीर्थ शिवाजीनगर पुणे येथे बालगंधर्व रंग मंदिरात त्यांच्या पेंटिंग प्रदर्शन भरवले होते. यामध्ये गोपाळे साहेबांच्या संपूर्ण कला प्रवासाचा पेंटिंगच्या सहाय्यानेआढावा घेण्यात आला होता.यातून त्यांच्या आई विषयीची श्रद्धा दिसून येते.

परमेश्वराचा वरदहस्त

महाराष्ट्राच्या अतिशय दुर्गम अशा खेडेगावात कलेची कोणतेही पार्श्वभूमी नसताना श्री महादेव गोपाळे यांना परमेश्वराने कलेची उपजत देणगी दिली आहे. परमेश्वराचा वरद हस्त असल्यामुळेच ते हे सर्व काही करू शकले. हे नाकारता येत नाही.

भारताच्या राष्ट्रपतींनी घेतली होती दखल.

देहू येथे भरलेल्या रांगोळी प्रदर्शनामध्ये महादेव गोपाळे यांनी साकारलेल्या रांगोळीचे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी उत्स्फूर्त दात देऊन गोपाळे यांचे कौतुक केले होते.

महादेव गोपाळे रेल्वे सेवेमधून सेवानिवृत्त झाले आहेत. भावी पिढीतील होतकरू तरुणांना ती मार्गदर्शन करत असतात. राजगुरुनगर मध्ये ते थोड्याच दिवसात प्रत्येक महिन्याला नियमित कार्यशाळा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळा घेतल्यावर होतकरू तरुण-तरुणींना यामुळे वाव मिळणार आहे. त्यांच्या कलेला प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे यांच्या निमित्ताने परिसस्पर्श लाभेल यातील मात्र शंका नाही.

श्री गोपाळे म्हणतात मी जरी सेवानिवृत्त झालो असलो. तरी माझ्यातील कला अद्यापही निवृत्त झालेली नाही.कलेचा गोडवा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कलेच्या माध्यमातून आनंद द्विगुणीत होत आहे ही परमेश्वराचीच कृपा म्हणावी लागेल.

पत्नी सौ. मंगल यांचा यशात सिंहाचा वाटा 

या सर्व जीवन प्रवासामध्ये त्यांच्या पत्नी सौ. मंगल यांनी त्यांना उत्तम प्रकारे साथ दिली. व सतत प्रोत्साहन दिले, त्यामुळेच हा प्रवास करू शकलो म्हणूनच त्यांच्या या यशात त्यांच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे असेही ते कृतज्ञते पूर्वक म्हणतात.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)



छत्री, इरले, रेनकोट व गम बुट


जून महिना सुरू होताच आकाशात ढग जमायला सुरुवात व्हायची. त्याच दरम्यान जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा देखील सुरू व्हायच्या. नवीन वर्ग, नवीन कपडे, नवीन वह्या पुस्तके या आनंदात सर्व विद्यार्थी असायचे.

हळूहळू पाऊस सुरू व्हायला सुरुवात व्हायची. आणि मग आठवण यायची ती छत्रीची. नवीन छत्री घेण्यासाठी एकच हट्ट करायचे, छत्री घेतली नाही म्हणून रुसवे फुगवे व्हायचे. काही लोक पावसाळा संपल्यावर व्यवस्थित बांधून ठेवलेल्या छत्र्या झटकून बाहेर काढायचे. व वापरायला सुरुवात करायचे. 

तर काहीजणांच्या गलथान पणामुळे म्हणा किंवा छत्र्या व्यवस्थित न ठेवल्यामुळे तुटून, मोडून, फाटून जायच्या. काहींचा दांडा मोडलेला असायचा, तर काहींच्या तारा तुटलेल्या असायच्या, काहींचा खटका आत गेलेला असायचा, तर काहींचे कापड छत्रीच्या तळाशी फाटलेले असायचे.

पंचक्रोशीतील मोठ्या गावात बाजाराच्या दिवशी गल्लीत एका रस्त्याच्या कडेला झाडाखाली जुन्या छत्र्या दुरुस्तीचे दुकान थाटलेले असायचे. एका मोठ्या पोत्यावर अनेक जुन्या छत्र्या, नवीन दांडे, नवीन व जुन्या छत्रीच्या तारा, क्लिपा, घोडे (छत्री उघडण्याचे बटण ),चकत्या, छोटे खिळे, बारीक तारेचे गुंडाळे, त्याच बरोबर छोटया ब्याटऱ्या, ब्लब,असे विविध जुन्या व नव्या वस्तू हरीने मांडलेल्या असत.

छत्री दुरुस्ती करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडालेली असे. तेथे अनेक लोक ताटकळत आपली छत्री दुरुस्त होण्याची वाट पाहत उभे राहात असत.

कुणाच्या छत्रीचा दांडा मोडलेला असे, तर कुणाच्या छत्रीच्या तारा मोडलेल्या असत. कुणाच्या छत्रीचा घोडा आत गेलेला असायचा तर कुणाच्या छत्रीचे कापड छत्रीच्या मुळाशी फाटलेले असायचे. छत्री दुरुस्त करणारा कारागीर सफाईदारपणे व एकाग्रतेने छत्र्या दुरुस्त करायचा.

कुणाच्या छत्रीच्या एक दोन तारा कांडाळलेल्या असायच्या. कारागीर हळूच त्या मोडलेल्या तारा काढायचा. आणि त्या ठिकाणी नवीन तारा बसवायचा. काही छत्र्या उघडण्याचा घोडा छत्रीच्या दांड्यामध्ये गेलेला असायचा. कारागीर सफाईदारपणे त्याच्याकडील हत्यारांच्या सहाय्याने मोडलेला घोडा बाहेर काढायचा आणि छत्रीला नवीन घोडा बसवायचा.

कधी कधी छत्रीचे कापड तळाच्या भागात फाटलेले असायचे. छत्रीचे कापड छत्री पासून वेगळे करून बाहेर काढले जायचे. कात्रीच्या सहाय्याने फाटलेले कापड कापून त्या ठिकाणी नवीन कापड बसवून काळ्या धाग्याने व्यवस्थितपणे शिवले जायचे. कधी कधी छत्रीचे मूळ कापड, व नवीन दिलेल्या कापडाचा जोड यामध्ये जमीन आसमानाचा फरक असायचा. त्यामुळे ही छत्री वापरायला मुले का कू करायची.

काही लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे जुन्या छत्र्यांना नवीन दांडे बसवायचे, तर कधी जुनेच दुरुस्त करून घ्यायचे.

छत्री दुरुस्त केल्यावर एक दोनदा उघड झाप करून छत्री बरोबर नीट केली आहे ना... याची कारागीर खात्री करून घ्यायचा. व गिर्‍हाईकाच्या हातात द्यायचा. चार दोन रुपये मिळालेला मोबदला पत्र्याच्या छोट्या पेटी टाकायचा. त्या चिल्लर नाण्यांचा खळखन आवाज यायचा.

त्यावेळी तिथे अनेक संवाद व्हायचे. खालीलपैकी एक संवाद 

मुलगा :- बाबा, मला नवीन छत्री पाहिजे. 

सगळे मुलांकडे नवीन छत्री आहेत. मीच जुनी छत्री रिपेअर करून का वापरायची?

बाबा  :- आता आपली छत्री घेण्या इतकी ऐपत नाही बाळा.आता हीच वापर. पुढच्या वर्षी बघू . 

मुलगा :- मी नाही मग शाळेत जाणार.. मला नको ही छत्री जुनी आहे. शिवाय तिला ठिगळ दिले आहे.

तेथील एक माणूस :- बाळा, बाबांचं ऐकावं जरा.. परिस्थिती कठीण आहे. ते म्हणतात ना पुढल्या वर्षी नवीन घेऊ मग वापर वर्षभर ही.

बाकीचे तिथे असणारे सुद्धा मुलाला समजायचे.

त्यावेळी छत्री म्हणजे एक मांजरपाट काळ्या कापडाची सिंगल तारांची छत्री असे. पावसाने भिजल्यावर ही छत्री खूप जड व्हायची. ती वाळायची सुद्धा लवकर नाही.

त्यानंतरच्या काळात डबल तारांच्या टेरीकोट छत्र्या बाजारात आल्या. या छत्र्यांना खटक्याची छत्री सुद्धा म्हणत असत. ही छत्री वापरायला खूपच सुलभ होती. शिवाय पावसाने भिजूनही जड देखील होत नसे. पाऊस उघडल्यावर झटकन वाळत असे.परंतु ही छत्री सिंगल छत्रीपेक्षा महाग असायची.

हळूहळू साध्या छत्र्या लोक वापरीनासे झाले. आणि मग ह्या छत्र्या बाजारातून हद्दपार झाल्या.

त्यावेळी नवीन छत्री घेतली की ती हरवायची जास्त भीती असे. नवीन छत्री व रंगीत कलरने स्वतःचे नाव व पत्ता टाकायची पद्धत होती. छत्रीवर नाव टाकायचे पेंटर पाच रुपये घ्यायचा. 

पाऊस चालू झाल्यावर छत्री घेऊन दुसरीकडे जायचे. व एखाद्याच्या किंवा पाहुण्यांच्या घरी गेल्यावर त्याच्या दरवाजा जवळ छत्री लटकावयाची. आणि आत जायचे.

घरी जायच्या वेळी पाऊस उघडलेला असायचा. त्यामुळे छत्री घ्यायचे ध्यानातच राहायचे नाही. तसेच पुढे जायचे. अर्धा किलोमीटर चालून गेल्यावर पावसाची सर यायची. आणि मग त्यावेळी छत्रीची आठवण व्हायची. पुन्हा पाहुण्यांच्या घरी जायची वेळ यायची.

कधी कधी छत्री एस टी मध्ये, आगगाडी मध्ये, हॉटेलात विसरली जायची. घरी आल्यावर खूप पश्चाताप व्हायचा. खूप हळूहळू व्हायची. परंतु ईलाज नसायचा. 

मुंबई वाले चाकरमानी पावसाळ्यात गावाला यायचे तेव्हा त्यांच्याकडे छोटी बंदूक छत्री असायची. ही छत्री घडी घालून पिशवीत ठेवता येण्याजोगी होती. परंतु अतिशय नाजूक.. या छत्रीचे आम्हा मुलांना खूप आकर्षण वाटायचे. परंतु गावाकडे खूपच पाऊस असल्यामुळे व वेडेवाकडे जोरदार वारे वाहत असल्यामुळे या छत्रीचा टिकाऊ लागणार नाही हे माहीत असल्यामुळे या छत्र्या बाजारात विक्रीस नसत. असंत फक्त मोठ्या आणि लांब छत्र्या. या छत्रीचा खटका दाबताच छत्री आपोआप उघडायची. याचा उपयोग आम्ही मांजर घाबरवण्यासाठी करायचो.

छत्र्या हरवू नयेत, किंवा त्या हरवल्या की सापडाव्यात किंवा त्या चोरून नेऊ नयेत म्हणून छत्रीवर नाव टाकण्याची पद्धत होती. वेगवेगळ्या रंगांमध्ये छत्रीच्या कापडावर स्वतःचे संपूर्ण नाव व पत्ता लिहिण्याची पद्धत होती. त्यावेळी मोबाईल नंबर नव्हते नाहीतर ते सुद्धा लिहिले असते. छत्रीवर नाव टाकण्याचे पेंटर पाच रुपये घ्यायचा.

इरले:

त्यावेळी पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतातील काम करण्यासाठी इरल्यांची सुद्धा खूपच गरज भासायची. इरली ही बांबूच्या छोट्या छोट्या काड्या पासून पासून तयार करत असत. त्यासाठी प्रत्येक गावात कारागीर असत. अगदी सकाळी सकाळी त्यांचा इरले बनवण्याचा उद्योग चालू आहे. 

त्यावेळी पायली दोन पायली धान्य देऊन कारागीर लोकांना इरली करून देत असे. इरल्याचा बांबू पासून साठा बनवल्यावर त्यावर वाळलेली पळसाची पाने हरीने लावून दोरीने सुबक घराघरांच्या नक्षीदारपणे बांधली जात असे. नवीन इरली दिसायला अतिशय सुंदर असत. ही इरली अतिशय उबदार असत. परंतु खूपच जड असत.

दरवर्षी कोकणातील लोक पळसाच्या पानाचे पुडके इरल्याला लावण्यासाठी विकायला घेऊन यायचे.

पुढे काळ बदलला, लोक इरल्याच्या साठ्याला पळसाच्या पाना ऐवजी कागद बांधू लागली. त्यामुळे इरली ही वापरायला सुलभ व हालकी वाटू लागली. परंतु त्यामध्ये उबदार पण नव्हता. 

घोंगडी 

त्या वेळी लोक शेतीची कामे करण्यासाठी पावसाळ्यात घोंगडीचा सर्रास उपयोग करत असत. व आताही करतात परंतु प्रमाण फार कमी झाले आहे. प्रत्येकाकडे घोंगडी ही असायचीच.शक्यतो घोंगडी ही गुरे राखणाऱ्या गुराख्यांकडे असायची. घोंगडी चा उपयोग पाहुण्यांना बसण्यासाठी सुद्धा व्हायचा.घोंगडीवर बसल्यावर खूपच उबदार वाटायचे. पूर्व लोक झोपण्यासाठी घोंगडी खाली आंतरत्व त्यावर झोपत असत. आरोग्य शास्त्र सांगतं, घोंगडीवर सहा महिने झोपल्यावर डायबिटीस आपोआप कमी होतो.

रेनकोट:

पावसाळ्यात रेनकोट सुद्धा तुरळक लोकांकडेच असायचा. त्या काळात रेनकोट ही ओबडधोबड होते. 

नंतरच्या काळात रेनकोटच्या अनेक व्हरायटी बाजारात उपलब्ध झाल्या. वेगवेगळ्या रंगीत रेनकोटांनी बाजारपेठ 

फुलून जायची. वेगवेगळ्या रंगाच्या छत्र्या देखील बाजारात आलेले असायच्या.

नवीन छत्री घेतली की कारण नसताना घराबाहेर फिरून यायची हुक्की यायची.उद्देश हाच असायचा की आपण घेतलेली नवीन छत्री.. आपल्या मित्रांना दाखवता येईल.

रेनकोटचे तर विचारूच नका. घरामध्ये बसलो असता बाहेर पावसाची एखादी जोरदार सर आली की. रेनकोट घालून बाहेर फिरायला जायची तयारी करायची. रेनकोट घालून बाहेर जाणार तोच पाऊस उघडलेला असायचा. 

कधी कधी रेनकोट न घालताच बाहेर गेलो की पावसाची एकच जोरदार सर यायची. पूर्ण पाऊस अंगावर घेताना रेनकोटची आठवण यायची. परंतु रेनकोट आणायला आपण विसरलो आहोत हे आठवून स्वतःचे स्वतःला वाईट वाटायचे.

चप्पल:

पावसाळ्यात चेपल्यांचे तर विचारूच नका. चेपल्या जर चामड्याच्या असतील. तर वाळता वाळायच्या नाहीत. त्यासाठी लोक पावसाळ्यापूर्वी प्लॅस्टिकच्या किंवा बाटाच्या चेपल्या घेत असत.काही लोक अगदीच अनभिज्ञ असत. पावसाळा आल्यावरच मग त्यांना चेपल्यांची आठवण होई. परंतु काही लोक अगदीच भरभर गाळातून चालत जाताना एक वेगळाच फटफट आवाज येत असे. त्यांना पाण्याचा आणि गाळाचा अंदाज येत नसे आणि पाठीमागून गाळ त्यांच्या अंगावर अगदी डोक्यापर्यंत उडायचा. हे घरी गेल्यावर कपडे काढून  बघितल्यावरच कळत असे. किंवा पाठीमागून चालणारा एखादा माणूस सांगायचा.तेव्हा कळायचे.

गमबूट

काही लोक पावसाळ्यात काळ्या रंगाचे पायाच्या पोटऱ्यापर्यंत असलेले गमबूट किंवा बाटाचे बूट वापरत. बूट हे काळे, पिवळे,तपकिरी,लाल रंगाचे असे. परंतु गमबुट मात्र काळ्या रंगाचे असायचे.गमबुट हे रानात, गवतातून किंवा गुरांकडे जाताना वापरत असत.परंतु गम बूट हे वापरायला जरा कटकटीचे होते.गम बूट घातल्यावर जोरात चालता येत नसे.

एकदा तर एकाच्या गमबुटात साप वेटोळे घालून बसलेला होता. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे हा गमबूट घालायला गेला. तर त्याच्या पायाला काहीतरी गिळगिळीत लागले. बूट उलटे करून आपटले तर त्यातून साप बाहेर पडला..तर असे हे गमबुट.

रामदास तळपे

भारतीय गुप्तहेर अजित डोवाल....


img src="..." alt=" भारतीय गुप्तहेर अजित डोवाल ">

अजित डोवाल हे भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर  आहेत.भारताच्या रॉ आणि एकूणच गुप्तचर संघटनेच्या गेली 50 वर्षाच्या इतिहासाचे ते साक्षीदार आहेत.त्यांनी सिक्कीम, मिझोराम मध्ये पाकिस्तान मध्ये आणि लंडन मध्ये देशासाठी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत.

या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे परदेशातील गुप्त माहिती गोळा करणे, दहशतवादविरोधी कार्य करणे, आणि भारतीय धोरणकर्त्यांना सल्ला देणे.

रॉची स्थापना 1968 मध्ये झाली.1962 च्या चीन-भारत युद्ध आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान गुप्तचर अपयशामुळे या संस्थेची आवश्यकता भासली.

रॉ ही भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे.ती गुप्तचर माहिती गोळा करणे, दहशतवाद रोखणे, आणि परदेशी संबंध सुधारणे यांसारख्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये व्यस्त आहे. 

रॉ ही भारतीय गुप्तचर संघटना श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी निर्माण केली. रॉ ही संघटना त्यावेळी पाकिस्तान व बाहेरची उपद्रवी राष्ट्र काय करतात याची इंत्यभूत माहिती घेऊन त्यावर पुढील योग्य ते निर्णय काय घेतले पाहिजेत याचा आराखडा तयार करत असत. त्यासाठी या संघटनेला योग्य ती आर्थिक मदत केली जात असे.

परंतु पुढील काळात इंदिराजींचे सरकार जाऊन मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले. त्यांचा असा समज होता की रॉ ही संघटना इंदिरा गांधी यांनी विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार केली आहे. त्यामुळे त्यांनी रॉ या संघटनेचे पंख छाटून त्यांचा निधी कमी केला.जवळजवळ रॉ ही संघटना बंदच पडली.

त्यामुळे रॉ या संघटनेचे कामकाज ठप्प झाले. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये चीनच्या मदतीने अण्वस्त्र बनवण्याचा कार्यक्रम सुरू होता. मोरारजी देसाई यांनी जर या संघटनेचे पंख छाटले नसते आणि या संघटनेला आर्थिक बळ दिले असते किंवा हा कार्यक्रम पुढे तसाच राबवला असता तर पाकिस्तानचा अवस्त्र बनवण्याचा कार्यक्रम भारताने हाणून पाडला असता.व आज जे काही पाकिस्तान कडे अवस्त्र आहे ते नसते.

अजित डोवाल यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. ते पाकिस्तान मध्ये गुप्त माहिती मिळवण्यासाठी गेले होते, तेव्हा तेथे अनेक गोष्टी घडायच्या. काही प्रसंग त्यांच्या जीवावर बेतणारेही झाले.

पाकिस्तान मध्ये असताना त्यांना एका माणसाने बरोबर ओळखलं होतं. आणि ते चांगलेच फसले होते. सन 1981 ते 1987 अशी सहा वर्ष अजित डोवाल हे पाकिस्तान मध्ये अधिकृतरित्या होते. भारताच्या रॉ ह्या गुप्तचर संघटनेसाठी काम करीत होते. 

परंतु त्या आधी 1977 साली गुप्तचर संघटनेसाठी गुप्तहेर म्हणून काम करीत असताना पाकिस्तान मधील रावळपिंडी या शहरा जवळील "कहूता" या गावी पाकिस्तान अवस्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यासाठी पाकिस्तानने E. R. L. इंजिनीयर रिसर्च लॅब संस्था स्थापन केली होती.आणि याचीच माहिती मिळवण्यासाठी अजित डोवाल सक्रिय होते. त्यासाठी अजित डोवल यांना वेगवेगळे वेश परिधान करावे लागत असत. व सतत वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत असे. व फिरावे लागत असे. त्यासाठी त्यांनी मुस्लिम वेश परिधान केला होता.

एकदा लाहोर मध्ये असताना एका मशिदीमध्ये त्यांच्या कामासाठी ते गेले होते. मशिदी मधून बाहेर येताना त्यांना असे जाणवले की बाहेर एका कट्ट्यावर बसलेला एक मुस्लिम मौलवी एकसारखा माझ्याकडे पाहत आहे व मला सतत निरखत आहे.अजित डोवल यांना थोडंसं अस्वस्थ वाटलं. तेवढ्यात त्या मौलवीने डोवाल यांना जवळ बोलावलं.आणि विचारलं तुम्ही मुस्लिम नाहीत तर तुम्ही हिंदू आहात. यावर अजित डोवाल म्हणाले मी हिंदू नाही मी मुस्लिम आहे.

त्यावर तो मुस्लिम मौलवी म्हणाला..

तुम्ही खोटं सांगता. तुम्ही खरोखर हिंदूच आहात.

तो मुस्लिम मौलवी दोवाल यांना म्हणाला तुम्ही माझ्याबरोबर चला, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय.

अजित डोवाल हे अतिशय हिमती व्यक्तिमत्व होते. म्हणून तर त्यांना भारताने या कामगिरीवर पाठवलं होतं.

अजित डोवाल त्या मुस्लिम मौलवी बरोबर चालू लागले. कारण त्याशिवाय त्यांचे पुढे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता.

लाहोर मधील चार-पाच गल्ल्या चालून झाल्यावर एका छोट्याशा चाळीमध्ये खोली असलेल्या घरात ते दोघे गेले.

ते दोघे जमिनीवर बसले कारण तेथे त्यांच्याकडे खुर्ची नव्हती. मौलवी डोवल यांना म्हणाले. तुम्ही मुस्लिम नसून हिंदू आहात हे मी लगेच ओळखले कारण तुमच्या कानाच्या पाळीला छोटेसे छिद्र आहे.आणि ते केवळ हिंदूंचेच असते.

अजित डोवाल हे अतिशय हुशार होते. ते म्हणाले आमच्याकडे काही भागात कानाला छिद्र असते. पूर्वी मी हिंदूच होतो परंतु नंतर मुस्लिम बनलो आहे.

यावर तो मौलवी म्हणाला नाही... अजूनही तुम्ही हिंदूच आहात..

अजित डोवाल यांना शेवटी मान्य करावेच लागले. ते म्हणाले होय अजूनही मी हिंदू आहे. परंतु तुम्हाला कसं कळलं?

यावर तो मौलवी म्हणाला.. मीही हिंदूच आहे. असे म्हणून ते रडू लागले.

माझं संपूर्ण कुटुंब या पाकिस्तानी लोकांनी मारून टाकलं. मी कसातरी त्यांच्या तावडीतून वाचलो.आणि पर्याय नसल्यामुळे मी मुस्लिम वेश धारण करून मौलवी बनलो.आता वेगवेगळ्या मशीदी पुढे बसून मी माझा उदरनिर्वाह करत आहे.ज्यावेळी तुझ्यासारखे मुस्लिम वेश धारण करणारे लोक भेटतात.तेव्हा मी त्यांना बरोबर ओळखतो.आणि मला खूप आनंद होतो.

त्या मौलवीने त्याची छोटीशी पत्र्याची पेटी उघडली आणि आत मध्ये असलेला भगवान शंकराचा व दुर्गादेवीचा छोटा फोटो मला दाखवला.मी भक्ती भावाने त्या फोटोला वंदन केले.

त्या मौलवीने सांगितले. मी अजूनही गुप्तपणे माझा धर्म बदललेला नाही. मी अजूनही या देवांची रोज पूजा करत आहे. त्याने डोवल यांना सांगितले. तू लवकरात लवकर या कानाची छिद्रे बुजवून टाक. कारण दुसरे कुणी जर ओळखलं तर तू चांगलाच अडचणीत येशील. असे म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

डोवाल यांनी मी कोण आहे हे त्या मौलवीला सांगू शकले नाहीत. कारण त्यांना तशी परवानगी नव्हती.

पुढे अनेक वर्ष पाकिस्तान मध्ये राहिले त्यांना त्या माणसाला खूप काही मदत करावी असे वाटायचे. परंतु त्यांना त्यासाठी काहीही करता आले नाही. याबद्दल त्यांना वाईट वाटते.

डोवाल यांना गुप्तहेराची कामगिरी बजावत असताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागल्या. परंतु देशासाठी त्यांनी हे सर्व सहन केले.

 लेखक :- रामदास तळपे 

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण शोध आणि बोध

परवाच वैष्णवी हगवणे या नवविवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. सध्या मीडियावाले ही एकच बातमी फिरवून फिरवून काथ्याकुट करत आहेत.

खरंतर मीडियावाल्यांनी यावर समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. परंतु ते न करता ते केवळ त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

वैष्णवी कस्पटे यांची श्री. सुशील हगवणे यांच्याबरोबर कुठेतरी भेट झाली. एकमेकांना इंस्टाग्राम वर चॅटिंग करू लागले. त्यानंतर ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले.

त्यानंतर हगवणे यांनी वैष्णवी हिला लग्नाची मागणी घातली परंतु वैष्णवीच्या घरच्यांनी या लग्नाला नकार दिला. परंतु कसपटे यांनी एक दिवस वैष्णवीच्या घरी येऊन वैष्णवीला घेऊन जाण्यासाठी तयार केले. व वैष्णवी जाण्यास तयार झाली. हे पाहून तिच्या वडिलांनी निर्णय घेतला की आपण हे लग्न लावू, असे पळून जाऊ नका.

त्यानंतर कसपटे यांनी रीतसर वैष्णवी चे लग्न सुशील हगवणे या तरुणाबरोबर लावून दिले. लग्नाला तिला हुंडा म्हणून अत्यंत महागडी अशी फॉर्च्यूनर गाडी आणि 51 तोळे सोने भेट दिली.

लग्नानंतर चांदीची भांडी वेळोवेळी रोख रक्कम सुद्धा दिलेली आहे.असे कस्पटे यांच्या मुलाखती मधून ऐकायला मिळाले.

वेळोवेळी हगवणे यांनी वैष्णवीला वेठीस धरून कस्पटे यांच्याकडून एक प्रकारे खंडणीच वसूल केली. वैष्णवी त्यांच्या लेखी एक सोन्याचे अंडे देणारे कोंबडीच होती.

त्यानंतर हगवणे यांनी वैष्णवीच्या वडिलांकडे व्यवसायासाठी एक कोटी रुपये रकमेची मागणी केली.त्यासाठी वैष्णवीला वेळोवेळी मानसिक, शारीरिक त्रास दिला,मारहाण केली. त्यानंतर वैष्णवीने आत्महत्या केली.असेही कस्पटे यांनी मुलाखतीत सांगितले.

वैष्णवी हगवणे या मुलीचा स्वभाव शांत होता. त्यामुळे तिच्या स्वभावाचा फायदा घेऊन हागवणे कुटुंब आणि तिच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार केले.

मुलाचे वडील राजेंद्र हगवणे यांची जवळजवळ शंभर कोटी रुपयांची प्रॉपर्टी असतानाही त्यांना पैशाची किती हाव होती हे या प्रकरणांमधून स्पष्ट होते. हे एक विकृत मानसिकताच म्हणावी लागेल.

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांची चांगली व्हावे अशी प्रामाणिक इच्छा असते.त्या पोटी त्यांना मनाला मुरड घालून त्यांच्या भल्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात.

या प्रकरणाला न्याय तर मिळेलच परंतु काही शक्ती मीडियाचा गैरवापर करून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी नाहक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. 

कुणीही नेते मंडळींनी किंवा प्रतिष्ठित व्यक्तींनी एखाद्याच्या लग्नाला जाणे हा थोडाच गुन्हा आहे? म्हणे काय तर अजितदादांनी फॉर्च्युनर गाडीची चावी मुलाच्या हातात दिली. अजित दादांनी हुंड्या साठी समर्थन दिले. म्हणून त्यांचा राजीनामा मागत आहेत. हुंडाबळी कायदा असताना अजित दादां सारखा खासदार, आमदार, विविध मंत्री पदे भूषवणारा नेता हुंड्याला समर्थन देणे शक्य तरी आहे का? 

वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी तमाम महाराष्ट्राची मागणी आहे.

एखाद्याला न्याय मिळणे ऐवजी हे प्रकरणाचे राजकीय भांडवल कसे करता येईल व त्याचा फायदा कसा घेता येईल. हे राजकीय लोक एखाद्याच्या काठीने साप मारून बरोबर आपली पोळी भाजून घेत आहेत. व नहाक एखाद्याला बदनाम करत आहेत. 

मीडियाला याबाबत काहीही देणे घेणे नाही. आठ दिवस ही बातमी फिरवून फिरवून नको त्यांच्या मुलाखती घेऊन लोकांच्या पचनी पाडायची व आपला टीआरपी वाढवायचा एवढेच त्यांचे काम आहे. समाज प्रबोधन करण्याचे त्यांना काही गरज राहिलेली नाही. अशावेळी मीडियाने तज्ञ लोकांच्या मुलाखती घेऊन समाजाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.

असेच एक दुसरे उदाहरण माझे एक मित्र मिलिटरी मध्ये होते. ते मिलिटरी मधून रिटायर झाल्यानंतर घरी शेती करू लागले. वीस एकर शेतीमध्ये ते बटाट्याचे उत्पादन घेत होते. अतिशय प्रगतशील असे शेतकरी शिवाय मिलिटरी मॅन. भागात त्यांचा एक दरारा होता. 

त्यांची मुलगी लॉ कॉलेजला शिकायला होती. कॉलेजला शिकत असताना तिचे एका टुकार व कोणतेही काम करत नसलेल्या मुलावर प्रेम जडले. व करील तर या मुलाशीच लग्न करेल अशी तिने मनाशी खूनगाठ बांधली.वडील आपल्या लग्नाला मान्यता देणार नाहीत हे जाणून एक दिवशी घरी चिठ्ठी ठेवून मुलगी घरातील एक लाख रुपये व काही सोन्याचे दागिने घेऊन या टोकर मुलाबरोबर पसार झाली.

दुसऱ्या दिवशी चिठ्ठी वाचून मिलिट्री मॅन असलेल्या मित्राला जबरदस्त धक्का बसला. त्यांच्या मते आता माझी सर्व प्रतिष्ठा धुळीला मिळाली. यावर चर्चा चर्वण झाले.अनेकांनी त्यांना सल्ला दिला. मुलगी कुठे असेल तिथून घेऊन या आणि मुलीचे रीतसर त्या मुलाबरोबर लग्न लावून द्या.

शेवटी हाच निर्णय घेऊन मुलाच्या घरी जाऊन आम्ही लग्न लावून देतो मुलगा कुठे आहे त्याला घेऊन या. असे मुलीच्या कडच्यानी सांगितले. मुलाला आणि मुलीला मदत करणारे मित्रांनी मुलास आणि मुलीस घरी बोलावून घेतले.

रीतसर लग्नाची बोलणी झाली. मुलीला घरी आणण्यात आले. सर्व नातेवाईकांनी आणि वडिलांनी मुलीला खूप समजावले परंतु मुलीचे एकच म्हणणे. करील तर त्याच्याशी लग्न करेल नाहीतर नाही. सर्व उपाय खुंटले.

आणि मुलीचे जमिनीवरील हक्क सोड पत्र घेऊन तिचा मोठ्या समारंभात लग्नविधी लावून दिला.

मुलगी नांदायला सासरी आली. नव्याचे नऊ दिवस संपले. जवळ असलेले सर्व पैसे संपले.शेवटी दागिने ही गहाण ठेवले व मौज मजा केली. मुलगा काहीच काम करीत नसल्यामुळे पैशाचा स्त्रोत हा तसा नव्हताच. शिवाय सासर कडे ज्यांची परिस्थिती ही बेताचीच असल्यामुळे चैन करणे यांना काही परवडेना.मुलीच्या वडिलांनी लग्न झाल्या झाल्या मुलीबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकल्यामुळे मुलीला वडिलांकडे सुद्धा मदत मागता येईना.

मुलगा कोणतेही काम करत नव्हता, त्यामुळे पैसा नाही. मुलाला दारूचे व्यसन लागले. संध्याकाळी घरात भांडणे होऊ लागली. मुलीला अक्षरशः मजुरी करण्याची वेळ आली. नवरा मुलीकडे मजुरी केलेल्या पैशांची सुद्धा मागणी करायचा.अशी बिकट अवस्था मुलीची झाली.

समाजात अशा या घटना सतत घडत असतात. तर मुख्य मुद्दा हे सर्व कशामुळे झाले.आज आपण मुला-मुलींना संपूर्ण स्वातंत्र्य देतो.प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे. रात्री दोन दोन वाजेपर्यंत चॅटिंग करणे, रील पाहणे, इंस्टाग्राम,फेसबुकचा सर्रास वापर करताना तरुणाई दिसत आहे. आणि ती बघून त्यावर आपले मत ठरवत आहेत. 

कोणताही अनुभव नसताना निर्णय घेण्याची स्वातंत्र्य ते आई-वडिलांकडे मागत आहेत.आई-वडिलांच्या अनुभवाला केराची टोपली दाखवत आहेत. आणि आपणच कसे हुशार आणि अनुभवी आहेत हे सिद्ध करताना दिसत आहेत.

काही काही मुले / मुली तर आई-वडिलांना, तुम्हाला काय कळतंय यातलं. तुम्ही गप्प बसा. अशी वाक्य त्यांच्या तोंडावर फेकतांना दिसत आहेत.

समाजाची दुसरी बाजू तर अतिशय विदारक आहे. स्वतःला सुशिक्षित आणि हाय प्रोफाईल म्हणून घेणारे काही काही आई-वडील मुलींच्या लग्नाचे वय संपून देखील प्रतिष्ठेच्या बडेजवा पाई चांगली चांगली स्थळे हातची घालवत आहेत. या पायी मुलीचे वय केव्हाच उलटून गेलेले असते. याची ते पर्व देखील करत नाहीत. 

पूर्वी लोक म्हणायचे, मुलीचे लग्न योग्य वेळी होणे हे केव्हाही चांगले. त्या काळात फार फार तर 24 च्या आत मुलीचे लग्न केले जाई.

परंतु आता शिक्षणाचे कारण सांगून किंवा सेटल होण्याची कारण सांगून 32- 35 पर्यंत लग्न केले जात नाही. यातून हे लोक निसर्ग नियम तोडत आहेत हे स्पष्ट आहे.

आज समाजाला संस्काराची गरज आहे, परंतु आजच्या या आधुनिक सोयी सुविधा ब्रह्मराक्षस बनून आपल्याच छाताडावर बसले आहेत. श्रीराम श्रीकृष्ण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हिंदुस्थानात आज आपल्याकडील असgलेल्या संस्कारांचा ऱ्हास होऊन एक विदारक चित्र समाजात निर्माण झाले आहे.

रामदास तळपे 


विठ्ठल भगत देवाचा पुजारी


img src="..." alt=" विठ्ठल भगत">

गावात सगळ्यात जास्त भोळा भाबडा स्वभाव कुणाचा होता किंवा असेल तर तो म्हणजे विठ्ठल भगत...

विठ्ठल भगत म्हणजे आमच्या काळभैरव तथा वनदेवाचा पुजारी. सर्व गाव त्याला इठल्या आज्या या नावाने हाक मारायचे..विठ्ठल भगत म्हणजे आख्या गावाचा आजा....

विठ्ठल भगताला ओळखत नाही असा एकही माणुस सापडायचा नाही.

गावात सगळ्यांचा आवडता देवाचा पुजारी कोण असेल तर तो म्हणजे विठ्ठल भगत..नव्हे तो देवाचाही सर्वात आवडता पुजारी होता.

विठ्ठल भगत म्हणजे एक ठेंगणा ठुसका बांधा..काळा सावळा वर्ण,धोतर व पैरण व टोपी असा पेहराव. ही कपडे एखाद्या कार्यक्रमालाच हं...नाहीतर सदानकदा कमरेला टाँवेल व अंगात बंडी असे.

श्री.काळभैरव देव तसे अतिशय कडक देवस्थान.देवाच्या भोवती व सबंध पांढरीत (गावच्या हद्दीत) नाना प्रकारचे देव.. कोणत्या देवाला शेंदूर लावायचा आणि कोणत्या देवाला नुसतीच तेल लावायचे हे विठ्ठल भगत लिलया करायचा.

आघुटीची साथ व दिवाळीच्या साथीला पांढरील सर्व देवांना ( पाच पंचवीस देव ) शेंदूर व काही देवांना तेल लावायचे.नैवद्य दाखवायचा हे अतिशय अवघड काम विठ्ठल भगताला करावे लागे.देवाच्या बाहेर आंब्याच्या बनात पंधरा वीस देव प्रत्येकाला कोणता नैवेद्य  व कोठे ठेवायचा हे विठ्ठल भगतच जाणो.

देवाला सकाळ संध्याकाळी दिवा लावायचा. तेही त्याच  ठराविक वेळेला. त्यात कधीही बदल झाला नाही.टायमिंग म्हणजे टायमिंग.दर गुरूवारी व रविवारी देवाकडे खुप गर्दी असे. सकाळी भल्या पहाटे नदीवर जाऊन पाणी आणने. देवावर जलाभिषेक करून तिळाच्या तेलाचे देवाला माजणे करणे,भक्तांनी अणलेले तेल,आगरबत्ती,धुप लगामी लावुन ठेवणे.त्यांचे नारळ फोडुन अर्धा नारळ परत भक्ताकडे देणे.आंगारा देणे इत्यादी कामे विठ्ठल भक्ताला करावे लागत.

शिवाय सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे देवाला प्रसाद लावणे.

चाफ्याच्या कळ्या देवाच्या अंगाखांद्यावर ठेवून व पाण्याचा  देवावर हलकासा सपकारा मारून विठ्ठल भगत प्रसाद मागायला देवाच्य गाभाऱ्या बाहेर बसे.अनेकांची अनेक प्रकारची गा-हाणी असत.

उजवी डावी चाले. कधीकधी देव पटकन उजवी किंवा डावी कळी सोडे.. कधीकधी देव लहान मुलासारखा हट्टी होई तेव्हा.. 

विठ्ठल भगत लहान मुलाला समजावतात तसे देवाला अर्जव करे...सोड...बाबा..सोड कोणतीही एक कळी सोड.

गरीब माणुसय, लय लांबुन आलाय तो.असे नको करू?

 दे त्याला कळी...नको टाईम लावू..सोड...सोड...सोड बरं..बाबा सोड ..

असे म्हणून परत परत देवावर पाण्याचा सबकारा मारला जाई..विठ्ठल भगत घामाघुम होई .आर्धातास होऊनही कधीकधी देव काय कळी सोडायचाच नाही.

मग विठ्ठल भगत आलेल्या भक्ताला सांगायचा पिपरीला (गावाचे नाव) प्रसाद चालू असतील. तु बाबा पुढच्या रविवारी ये.असे मोठ्या निराशेने सांगे.तर कधीकधी देव पटापट कळ्या सोडायचा..

मला तेव्हा विठ्ठल भगताचे खुप अप्रूप वाटे.देव विठ्ठल भगताचे ऐकतो. आणि ते खरेही होते. वास्तव सत्य ..देवाचा सर्वात प्रिय भक्त कोण असे तर तो म्हणजे विठ्ठल भगत.त्यांच्या नंतर गावाने दुसरा पुजारी नेमला तरीही विठ्ठल भगत दररोज न चुकता देव दर्शनाला जात असे.

विठ्ठल भगताचे दुसरे आवडते काम म्हणजे गुरे संभाळणे..हे करत असतांना त्याला अनेक लोक भेटत.लोक विठ्ठल भगताची आस्थेने विचारपुस करत.विठ्ठल भगतही लोकांशी अत्यंत आदबीने बोले..आहो. जाहो करत असे.

 मला विठ्ठल भगत मास्तर म्हणत असे...कधी आले..कस काय बरं आहे का? माझ्या जवळ सुख दुःखाच्या गोष्टी मोठ्या विश्वासाने सांगत असे.मीही गाडी थांबवुन आस्थेने विचारपुस करत असे.

यात्रेला...साथीला,देव बसताना,देव पारधी जाताना विठ्ठल भगताची मोठी कसरत असे...अनेकांच्या अंगात वारे येई.विठ्ठल भगताचा लटकाप होई..सर्वांना ओवाळले जाई. तेव्हा कोठे वारे शांत होई. देवाची पुजा करताना डाव्या हातात घंटी व उजव्या हातात धुपात्र घेऊन जेव्हा तो पुजा करत असे तेव्हा त्याचे संपुर्ण शरीर लटलट हाले.

गावाने जवळजवळ 42 लाख रुपये खर्चून श्री काळभैरवनाथाची नवीन मंदिर बांधले.मंदिराच्या जिर्णोद्धार होता त्या दिवशी मंदिराच्या कळसावरून चिल्लर रूपया, दोन पाच दहा रूपयाची नाणी सोडायची होती. 

मी जमलेल्या भक्त भाविकांकडुन नाणी गोळा केली.त्यावेळी शेजारीच उभे असलेल्या विठ्ठल भगताकडे नाण्यांचे तबक दिले.व माझ्या शिवाय कोणाकडेही देऊ नको असे बजावले. आणि एक जणाला मंदिरावर चढवायला आम्ही दोघा तिघांनी मदत केली. त्या दरम्यान माझा भाऊ अनिल तळपे याने ते तबक विठ्ठल भगताकडुन अजुन नाणी गोळा करण्यासाठी घेतले. एक.माणुस वर मंदिरावर चढल्यावर त्याच्या कडे तबक द्यायचे होते म्हणुन मी विठ्ठल भगताकडे तबकाची मागणी केली. आधीच उशिर झाला होता..विठ्ठल भगत अतिशय घाबरला.त्याच्या तोंडुन शब्द फुटैना..अंग थरथरू लागले.तेवढयात भावाने तबक माझ्याकडे दिले. मी ते वर दिले.

मी विठ्ठल भगताला विचारले येवढा का घाबरलाय? त्याचे उत्तर मास्तर 

तुम्ही माझ्याकडे मोठ्या विश्वासाने तबक दिले.अन मी दुसरीकडे दिले. पैशाचे काम..कुणी लांबवले असते तर? केवढे महागात पडले असते. शिवाय देवाच्या कामात खोळंबा झाला असता.तर? असा हा विठ्ठल भगत.

मी लहान असताना माझी आजी नेहमी म्हणायची. बाळ मोठा झाला की तीन थराचे घडीव  दगडी जोत्याचे पाच खण कौलारु घर बांध. 

मी सन 2014 साली माझ्या आजीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. घर बांधत असताना आमच्याच गावातील विलास बांगरने अतिशय सुंदर दगडाचे जोते बनवले. हे काम जवळजवळ सहा महिने चालू होते. विठ्ठल भगताने जेव्हा ते जोते पाहीले तेव्हा त्याला खुप आनंद झालेला मी पाहिला.

मास्तर या जोत्याला तुम्ही पितळाच्या कड्या बसवा. लय चांगलं दिसेल. जोत्याला कड्या बसवतात हे माझ्या गावीही नव्हते.

पडत्या फळाची आज्ञा समजुन मी दोन हजार रूपयांच्या पितळी कड्या आणल्या. विलासने जेव्हा त्या कड्या बसवल्या तेव्हा ते जोते खुपच आकर्षक दिसू लागले. 

तात्काळ विठ्ठल भगताला बोलावून आणले. त्याने जेव्हा त्या जोत्याला लावलेल्या कड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसले ते अद्यापही माझ्या मनात कायम आहे.

मी जेव्हा गावी जातो. आणि जेव्हा माझे लक्ष त्या कड्यांकडे जाते तेव्हा मला प्राकर्षाने विठ्ठल भगताची आठवण येते.व मी मनोमन त्या थोर माणसाला वंदन करतो.

विठ्ठल भगताकडे खुप गायी असायच्या. वासरे असायची. गो-हे असायचे. कायम बैल, गो-ह्यांची खरेदी विक्री व्हायची. अनेक लोक बैल पाहण्यासाठी विठ्ठल भगताकडे येत असत.

विठ्ठल भगताच्या काळात तीन वेळा मंदिर बांधले. त्याने तीनही वेळचा जिर्णोद्धार होताना पाहिला.

मंदिराचे काम लांबले. गावाजवळचे पैसे संपले. तसतसे विठ्ठल भगताला काळजी वाटू लगाली. मला भेटल्यावर मास्तर देवाचे तेवढे काम होयला पाहिजे होते. लय लांबले.

इठल्या आज्या अजुन पंधरा वीस लाख रूपये लागतील. तेव्हा होईल.

त्याला हजार दोन हजार रुपये सुद्धा कळत नव्हते त्याला पंधरा-वीस लाख म्हणजे काय हे कसे समजणार ? मग मी समजावून सांगे.

त्यावर त्याच्या चेहऱ्यावर मोठी विष्षणता पसरे. अगदी.चिंतातुर होई.

मग मीच म्हणे ! 

होईल देवाचे काम. देवालाच काळजी. आपण प्रयत्न करायचा तो बुद्धी देईलच ना..होणार काम.

मग मी त्याला देणग्या गोळा करण्यासाठीचे नियोजन सांगे.तेव्हा हळुहळु त्याच्या चेह-यावर समाधानाची लकाकी दिसे.

श्रावण /भाद्रपद महिन्यात अनेक गाया /म्हशी व्यायच्या. लोक गाया म्हशींचे कोवळे दुध देवाला नैवेद्यासाठी घेऊन देवळात येत. मंदिरामध्ये कोवळे दुध व गुळ तांदळाची खीर शिजवली जाई. ही गरम वाफाळलेली खीर चाफ्याच्या पानावर खाताना स्वर्गीय पक्वान्न खाल्याचा आनंद होत असे. विठ्ठल भगत आग्रहाने खीर वाढे.अशी खीर दुसरीकडे मिळणार नाही..अप्रातिम चव.

सन 1997 च्या एप्रिल महिन्यात मी सुमारे महिना दिड महिना आजारी होतो. माझा तपास करण्यासाठी विठ्ठल भगत दररोज सकाळ किंवा संध्याकाळ देवाचा अंगारा घेऊन न चुकता येऊन विचारपुस करून जात असे.

मंदिराचे येवढे मोठे व सुंदर काम होऊनही विठ्ठल भगताचे मन थोडे खट्टूच होते. 

मी त्याला सहजच विचारले..इठल्या आज्या.

मग कसे काय झालय मंदिराचे काम?

मास्तर मंदिराचे काम भागात चांगलं झालय.मंदिराचे कळशी काम अन या भिंतीला व खाली जमीनीला लावलेल्या लाद्या बघुन मी पार दिपुन गोलो..माझ्या सपनातबी असं मंदिर होईल असा विचार नव्हता केला...

पण मास्तर आपल्या बाबाला (देवाला) सागवानी गाभारा पाहिजे होता. तेच एक राहिलय.

विठ्ठल भगताच्या तिव्र इच्छा शक्तीमुळे देवाने त्याचे गा-हाने ऐकले. कारण आम्ही देवाचा लोखंडी व स्टीलचा गाभारा करण्याचे काम एका कॉन्ट्रॅक्टरला दिले होते. त्यासाठी त्याला 50 हजार रुपये दिले होते. परंतु वर्ष होऊनही काम काही होत नव्हते. शेवटी तो कॉन्ट्रॅक्टर बोलला. मला काही तुमचे काम करता येणार नाही. तुम्ही दुसरीकडून करून घ्या.

एकदा असेच बसलो असता श्री.नामदेव हुरसाळे म्हणाले..वाळदचे श्री.जालिंदर पोखरकर सागाची लाकडं देतात.पाहिजे तेवढी..पण त्यांच्या रानातुन आपल्याला ती तोडावी लागतील.

काय अश्चर्य पहा..हेच गाभाऱ्याचे काम स्टील (लोखंडी) करायचे होते...हे काम आम्ही काँन्ट्रेक्टरला ठरवून पण दिले होते..परंतु हे काम देवालाच मान्य  नव्हते ...कारण तेथे काहीतरी व्यत्यय आला..व हे काम बारगळले.

सागवानाचा विषय झाल्यावर क्षणाचाही विलंब न करता ग्रामस्थांनी घेतला.व लगेच सागवानी लाकडे तोडायला ग्रामस्थ गेले. ही सर्व लाकडे श्री.दत्तू सुतार यांच्या दारात टाकली. हे काम ७५०००/- हजाराला ठरवून दिले. 

हे काम देखील वर्षभर चालले.नक्षीकाम करण्यासाठीच्या लाकडाना तोटा आला. परत काम बंद पडले..पुन्हा लोकांनी उचल खाल्ली.परत लाकडे तोडली.व ही सर्व लाकडे मंचर येथे कापायला नेली. परत ४२०००/-रूपये खर्च आला..हेही काम सुमारे वर्षे भर चालले.अतिशय सुंदर असा सागवानी गाभारा तयार झाला. मंदिरात नेऊन बसवला.
रूबाबदार गाभारा पाहून मन प्रसन्न झाले..रूखरूख एकाच गोष्टीची वाटते ती म्हणजे हा देव्हारा पहायला आता विठ्ठल भगत हयात नाही.

विठ्ठल भगताने गावात कधीच कोणाशी भांडण केले नाही..की कोणाला शिव्या दिल्या नाहीत.कधीच कुणाबद्दल वाईट बोललेलं मी त्याला पाहिले नाही..किंवा कुणाबद्दल अढी बाळगली नाही.किंवा कधीच कोणाचे पैसे बुडवले नाहीत.अथवा मागीतलेही नाहीत.

विठ्ठल भगत हे अतिशय साधेभोळे व्यक्तिमत्त्व होते.लोकही विठ्ठल भगताच्या वाटेला गेले नाहीत.

गावात कुणाचे भांडण झाले अथवा कुणी एखाद्याला मोठमोठयाने बोलले तर विठ्ठल भगताचे अंग लटलट कापायचे. असे हे व्यक्तिमत्त्व.

विठ्ठल भगताने जी देवाची/गावाची सेवा केली आहे ते गाव कधी विसरू शकणार नाही.येवढे मात्र खरे...

✍️ माझा हा लेख मूळतः StoryMirror, Marathishrushti आणि Pratilipi वर देखील प्रकाशित झाला आहे. लेखक: रामदास तळपे

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

🙏🙏💐💐


 

 

विठू नांगरे कलंदर माणूस

img src="..." alt=" विठू नांगरे ">
विठू नांगरे हा आमच्या भागातील असा अवलिया होता की त्याला कोणते काम जमत नाही. असे कधी झाले नाही.

1975 ते सन 2000 पर्यंत आमच्या भागात नाट्यरूपी भारुड मंडळे जोमात होती. त्या काळात गावातील ठराविक घरामध्ये श्रावण महिन्यात धार्मिक ग्रंथांची पारायणे चालत असत. चैत्र आणि वैशाख महिन्यात सत्यनारायणाच्या महापूजा होत. 

प्रत्येक गावात यात्रा,जत्रा आणि उरूस असत. त्यामुळे धार्मिक वातावरणाबरोबर सांस्कृतिक वातावरण सुद्धा तयार झाले होते. 

त्यावेळी वेगवेगळ्या लोककलांना समाजाकडून प्रोत्साहन मिळत असे. या सर्व वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे नातेवाईक गण गोत्र, मित्र,आप्तेष्ट यांचा एकमेकांकडे नेहमी राबता असे. 

परंतु काहीही म्हणा, त्यावेळी धार्मिक वातावरणाने लोक भारलेले होते. रामायण, महाभारतातील कथा, नवनाथ भक्तिसार मधील कथा विविध पुराणातील कथा यांनी समाजावर एक वेगळेच गारुड तयार केले होते. या कथांना कुठेतरी प्रत्यक्ष नाट्यरूपाने समाजासमोर आणले पाहिजे या उद्देशाने अनेक गावा गावांमध्ये नाट्यरूपी भारुड मंडळ उदयास आली.

वांजळे, वरचे भोमाळे, पाभे, धामणगाव, टोकावडे, मंदोशी, पोखरी, पवळेवाडी, देवतोरणे, नायफड  सारेवाडी, नाव्हाचीवाडी, गोहे अशा अनेक गावांमध्ये नाट्यरूपी भारुड मंडळे उदयाला आली. अनेक कलाकार उदयाला आले. 

त्यात सर्वश्रेष्ठ कलाकार म्हणजे विठू नांगरे. या काळात या नाट्यरूपी भारुड मंडळांना समाजाकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकाश्रय मिळाला.

विठू नांगरे यांचे कोणत्याही प्रकारचे शिक्षण झाले नव्हते. तरीही त्यांच्या रामायण महाभारतातील कथा आणि पुराणातील कथा तोंडपाठ होत्या. 

विठू नांगरे यांच्या मोरोशी गावात नाट्यरूपी भारुड नव्हते. तरी ही विठू नांगरे भागातील कोणत्याही नाट्यरूपी भारुड मंडळात कोणत्याही प्रकारचे पात्र साकारत असे. मग तो राजा असो अथवा प्रधान, देव असो वा दानव किंवा स्त्री पात्र कोणतेही पात्र विठू नांगरे लिलया करत असे. विठू नांगरेच्या कोणत्याही भूमीकेला समाज प्रचंड दात देत असे.

भारुडातील प्रसंगानुसार विठू नांगरे स्त्री भूमिका करत असे. नऊवारी लुगडे चापून चोपून नेसलेला व तशाच रंगाची चोळी परिधान केलेला विठू नांगरे कधी स्त्री प्रमाणे भासत असे. 

डोक्यावर चुंबळ, त्यावर पेटते निखारे आणि त्याच्यावर भाताचे पातेले एवढे सर्व डोक्यावर घेऊन विठू नांगरे गाण्याच्या आणि संगीताच्या तालावर नाचत असे. नाचता नाचता डोक्यावरचा भात शिजला जाई. तो पाबेतो त्याने कधीही डोक्याला हात लावलेले नसे. शिजलेला भात पाहून लोक अचंबित होत असत. विठू नांगरे यांना जमलेल्या प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळत असे.

पुराणा मध्ये अनेक कथा असत. त्यानुसार भारुडात वगनाट्य होत असे. त्यापैकी गरुडाची आई विनता व सर्पाची आई कद्रू या दोन सवतींची कथा पुराणा मध्ये आहे. विनताचे सत्य असूनही कद्रुने कशी खोटेपणाने पैज जिंकली. व विनताचा छळ केला हे वगनाट्य खूपच त्यावेळी लोकप्रिय झाले होते. 

विठू नांगरे विनताचे पात्र करायचा. ते पात्र इतके प्रभावी होते की लोक अक्षरशः रडायचे. स्रिया डोळ्याला पदर लावून मुसमुसून रडायच्या. हीच विठू नांगरे यांच्या कलेची पावती होती.

दरवर्षी शिमग्याला विठू नांगरे मरीआईच्या देव्हाऱ्याचे सोंग घेऊन भागातील गावांमध्ये जात असे. मरीआईच्या भक्ताप्रमाणे कपडे परिधान करून स्वतःलाच चाबकाचे फटकारे मरत असे. लोक याही कलेला प्रचंड दात देत असत. व त्याला योग्य ती बिदागी देत असे.

विठू नांगरे यांचा सर्वात प्रभावी कार्यक्रम तो म्हणजे मोर नाचवणे. विठू नांगरे यांनी लाकडांच्या बांबूपासून मोर तयार केला होता. त्याला एक लोखंडी चोच तयार केली होती. त्यावर निळसर कपडे व पाठीमागे खरोखरच्या मोरांचा पिसारा मोराचे पिसे लावून तयार केला होता. अगदी खरोखरच्या मोराप्रमाणे. त्यामध्ये विठू नांगरे प्रवेश करून वेगवेगळ्या प्रकारे सनई चौघडांसमोर नाचत असे. 

त्यावेळी विशेषता लग्नामध्ये, यात्रांच्या मिरवणुकीमध्ये विठू नांगरे यांच्या मोराला प्रचंड मागणी होती. लहान थोर, आबाल वृद्ध स्त्रिया विठू नांगरे यांच्या मोराचा नाच पाहून आनंदित होत असत. विठू नांगरे यांच्या मोराला जुन्नर, आंबेगाव खेड आणि मावळ या चारही तालुक्यांमध्ये प्रचंड मागणी होती. मोर नाचवावा तर विठू नांगरे यांनीच असे लोक त्यावेळी म्हणत असत. वेगवेगळ्या भारुडामध्ये सुद्धा मोर नाचवला जाई.

विठू नांगरे यांना जसे धार्मिक कार्यक्रमां मध्ये भाग घ्यायला आवडे. तसेच त्यांना कुस्तीची सुद्धा प्रचंड आवड होती. विठू नांगरे यांना कुस्तीचे कोणतेही डाव येत नसत. तरीही ते विविध यात्रांच्या आखाड्यामध्ये कुस्तीमध्ये भाग घेत असत. 

विठू नांगरे यांनी कुस्ती खेळताना कधीही लंगोट किंवा काच्या याचा उपयोग केला नाही. कारण विठू नांगरे हे मुळातच पैलवान नव्हते. त्यांच्याजवळ लंगोट आणि काच्या असणार कसा. त्यामुळे विठू नांगरे हे चड्डीवरच कुस्ती खेळत असत. कुस्ती खेळताना एकदा का विठू नांगरे यांनी भुई धरली की समोरचा पैलवान कितीही ताकदीचा व डावपेचाचा असला तरी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा विठू नांगरे त्याला पलटी होत नसे. आखाड्यात नुसताच फुफाटा उधळत राही. 

नाट्यरूपी भारुड मंडळात स्त्री पात्र करताना रडविणारे विठू नांगरे कुस्ती खेळताना मात्र लोकांना प्रचंड हसवत असत. शेवटी ही कुस्ती सोडवली जाई. सोडवलेल्या कुस्तीला थोडेफार का होईना इनाम विठू नांगरे यांना मिळत असे. 

कधीही पैलवानकी न केलेल्या विठू नांगरे यांच्या कुस्तीची नेहमीच चर्चा होई. अजूनही एखादी कुस्ती पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ चालली की लोक विठू नांगरे यांच्या कुस्तीची आठवण काढतात.

विठू नांगरे यांना नाट्यरूपी भारुड मंडळात पात्र काम करायची आवड होती तशीच पावसाळ्यात नदीला आलेल्या पुरामध्ये मासे पकडण्याची सुद्धा खूप आवड होती. 

नदीला मोठा पूर आल्यावर बांबू पासून बनवलेल्या येंडी मधून विठू नांगरे खूप मासे पकडत असत. पावसाळ्यात जेव्हा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येई. त्यावेळी आम्ही मासे पकडण्यासाठी नदीवर जात असू. त्यावेळी विठू नांगरे यांची हमखास आमची भेट होत असे.

प्रचंड गरिबी, जगण्यासाठी केलेली धडपड, अशाही परिस्थितीत आपल्या मधील कलेला वाव देत मनाला विरंगुळा देऊन विठू नांगरे आपल्या फाटलेल्या संसाराला ठिगळे लाऊ बघे. त्यावेळी सर्वच लोक गरीब होते. परंतु गरीब असूनही आपापले छंद जोपासून होते.

आजही समाजात यात्रांच्या हंगामात, शिमग्यात, लग्न कार्यामध्ये विठू नांगरे यांचे आजही जुने जाणते लोक नाव काढतात. व त्यांच्या केलेल्या कलेच्या कामाच्या स्मृतींना उजाळा देतात. 

पेटी मास्तर धर्माबुवा वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)




 



.

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम


माझ्या काकाला मुलगी पाहायला आम्ही दोघेच सुरुवातीला गेलो होतो. पण जाताना आजीने व आईने सांगितले होते. काकी व्यवस्थित पहा बरं. कशी आहे. काय आहे. घर कसंय. माणसं कशीय. सारं निट पहा बरं.

काका आणि मी स्प्लेंडरवरून जात असतानाच वाटेत अवकाळी पाऊस लागला. एका टपरीवजा हॉटेलात आश्रय मिळाला. एक बेवडा तिथेच दारू ढोसत होता.आम्ही दुर्लक्ष केले. काकांनी विचारले " चहा घ्यायचा का"? मीही हो म्हणालो.

त्या बेवड्याने जरासं पुढं जात कोपऱ्यावर लघुशंका केली. ते हॉटेल चालवणारी महिला. दुसरीकडे तोंड करत शिव्या देऊ लागली. याचा राग येऊन बेवडा तिच्या अंगावर धावून आला. पण त्याच्या हाताचा धक्का मला लागल्याने चहा सांडला. काकाला राग आला पण नविन गाव असल्याने तोंडातल्या शिव्या गिळून व रागाने उगारलेला हात खाली घेऊन. "अहो काका जरा नीट चाला की चहा सांडला ना पोराचा"!

पण त्या बेवड्यानं उलट काकांनाही शिव्या द्यायला चालू केल्या. काकांनी इकडे तिकडे पाहिले. त्या बाईनेही मुकसंमती देत खुणावले. मग काय पहलवान काकानं चांगलाच बडवला. पण त्यात त्या बिचाऱ्याचा दात मात्र पडला.

त्या बेवड्याच्या तोंडाला रक्त येत आहे हे पाहूनच मी घाबरलो. जवळच एक दात पडलेला दिसला. पण त्याच्या तोंडातली तर वरच्या दातांची अख्खी फळीच गायब होती. म्हणजे बाकीचे दात घशात गेले की काय ? असे वाटल्याने मी त्या बाईला म्हटलं " आजी इथं एकच दात आहे. पण बाबांचे तर चार दात गायब आहेत ? "ते व्हय ते मागल्या बारीला पाडलेत एक जणानं असेच."

गर्दी व्हायच्या आत आम्ही तिथून पळ काढला.

नाव व पत्ता विचारत विचारत शेवटी मुलीच्या घरी आलो. घरी कुणीच दिसत नव्हतं. दारात एक नांदुर्गीच झाड होतं. त्या झाडाखालीच एक खुप थकलेली म्हातारी बसली होती. बहुतेक तिला ऐकायला आणि दिसायला पण कमी येत होतं.

"घरी कुणी नाही का आजी?" पण आजीला रेंज काय मिळेना.

शेवटी दाराचा आवाज आला. तो मोठा वाडा होता. त्या आवाजामुळे आम्ही सावध झालो. काकांनी घरी कोणी आहे का ? हे विचारलं.

परकर पोलक्यातली मुलगी बहुतेक शेणानं सारवत होती. काहीसं केसांनाही शेण लागलं होतं.

तिनं काकांना विचारलं "कोण हवंय तुम्हाला?"

तिच्या प्रश्नानं काकाच गोंधळून गेले. " ते...ते... आम्ही मंदोशी वरून आलोत"

हं मग .. मंदोशी.. अय्या मंदोशी म्हणत तिनं खाडकन दरवाजा लावून घेतला.

आम्हाला कांहीच समजले नाही. आम्ही तसेच दारात उभे होतो. बहुतेक त्या वाडयाला दुसराही एक दरवाजा होता. जो पाठीमागच्या बाजूला होता.जो त्यांच्या शेतात जायचा शेतही वाडयाजवळच होते.

क्षणात तिने जत्राच भरवली. शेतात काम करणारी मजुर पण आम्हाला बघायला आली. या की या... काय खबर नाय कळीवलं नाय.. आसं अचानक यायचं आस्तं व्हय वं पावणं.

त्यांनी बसायला घोंगडी अंथरली. मी आणि काका घोंगडीवर बसलो. त्या माणसांनी चहुबाजूंनी आम्हाला घेरलं होतं. मला तर स्वतःला जंगलात असून जंगली लोकांनी आम्हाला चहुबाजूंनी घेरल्यासारखंच वाटायला लागले. आणि जोराचा ओरडलो " काका वाचवा !

याला असं काय झालं म्हणून सगळे पुन्हा माझ्याकडे पाहू लागले. काय नाही.. काय नाही... टि.व्ही जास्त बघतो ना आणि त्यातल्या त्यात भुताच्या मालिका बघायची हौस. त्यामुळे सगळीकडे त्याला....

असं असं... टिव्ही लावायची का बाळा. वय गं काके लाव. ये थांबय चिवे मी लावणारे. म्हणत जि.प. शाळेच्या गणवेशात भांडणारे बहिण भावंडं. काकीनं म्हणजेच आमच्या काकांच्या सासूबाईनं धपाटं देऊन दोघे पळविली.

बारका टिव्ही टिपावर ठेवला होता. त्याखाली पोत्याला पोतं शिवून टिप झाकला होता. टिव्ही चालू केला Black and White खरखर आवाज करत होता.

कुणीतरी आठवण करून दिली " ये आंटीना हालीव रं म्हादया"

म्हाद्या आधीच अँटीनाच्या पोलवर चढला होता. आणि अँटीना हलवत " आलंय का चितार म्हणत ओरडत होता.

नाही... नाही... आलं... गेलं....नाही... नाही... आलं... गेलं.... आलं आलं आलं... असं लहानगी पोरं ताला सुरात ओरडत होती. मीही त्यांच्यात सामिल होऊन योगदान दिले होते. हळूहळू मीही मिसळून गेलो.

कांही चित्र दिसते ना दिसते तोच लाईटच गेली. सारे प्रयत्न निष्फळ ठरले.

मुलगी नविन धुतलेला ड्रेस घालून आली. मध्येच कुणीतरी म्हातारी म्हणते " आगं तायडे साडी घालाव लागती वं... ?

ये आजे नाय माझ्याकं साडी.. आन मला नाय आवडत साडी घालाया... 

तु उठ बर हितून पईली.. जा तुज्या घरी.... ढंगरी.?

आता काका आणि मी चांगलेच घाबरलो.

ये तायडे आसं म्हणत नसत्याती, म्हाताऱ्या माणसास्नी... पिकलं पान हाय !

आजी बिनलाज्यावानी आमच्याकडे बघून हसती.

ती नवरी मुलगी म्हणते - " हयॅ ह्यॅ म्हणं पिकलं पान... गळून बी पडना एकदाचं...!

आता आजी थयाथया करू लागली. नवरीच्याच आईनं व शेजारच्या बाईनं आजीची समजूत काढत बाहेर नेलं.

बाहेरच्या नादुर्गीच्या झाडाखालच्या म्हातारी जवळ आजीला बसवलं.

समजावणीच्या सुरात नवरीची आई आजीला म्हणते " तुमी बी अत्याबाय पोरीच्या नादी लागतयासा अजून कळती नाय ती.

काय गं पारे म्हण... कळती नाय आज लगीन केलं तर वरसात पोरं व्हत्याल की, आन मग कळती नाय! लय ऐकूनी घेतलं मी बी. अं लय नगं तोरा दावू. असंच व्हतं. बग असलाच म्हातारडा नवरा भेटंन. सराप हाय मपल्या म्हातारीचा.'

काय बाय करावं अत्याबायला आवं आसलं वंगाळ नगा बोलू वं... पावणं आल्यात दारात ते काय म्हणतली...

आल्यात म्हंजी काय म्या आमंतरण दिलं व्हतं वय यायचं.. त्यांच ती आल्याती... त्यांचं ती जात्याली.

दुर्लक्ष करून नवरीच्या आईनं आजीला बाहेर सोडलं.

आणि वाड्याचं दार लावून आमच्या समोर येऊन बसली. काकांला दबक्या आवाजात म्हणाली "चकारली मातारी, खुळ बसलंया.. मातारपणात नवरा गेला... ल्योक गेला. आमीच संभाळतो तिला. काय वं लागतंया माताऱ्या माणसाला. कोरभर भाकर तुकडा तर आपुन कुतऱ्यालाबी टाकतूया.

माणसाला दिला तर तेवढंच पुण्य लागतंया.. लै बाय बेकार अस्तो मातारपणाचा जल्म. देव लवकर बी नेत नाय वं असल्याला. तरणीबांड जवान माणसांनाच काय व्हया लागलं की ती मरत्याती कायनु बायनू कारनांनी.. आन ही आसली आमच्या मढ्यावर सोडत्याती.

तिचा एकटीचाच पट्टा चालू व्हता. तेवढयात मोठ्ठा कर्कश आवाज झाला. सगळेच दचकून गेले. लाईट आली होती. व टिव्हीला मुंग्या आल्याने आवाज येत होता.

काकानं मुलगी पाहिली त्यांना पसंदही पडली. ते दोघंही बराचवेळ एकमेकांना चोरून बघायचे. मी खिशातल्या डायरीत माझं लिखानकाम करत होतो.

जेवणं झाली. बेसन वड्या. दही ताक वाढताना नवरीची आई पुन्हा म्हणाल्या " आदी कळवली असतं तर मटान केलं असतं.

आमची जेवणं झाली. "तायडे, पावण्याला हात पुसाय दी की"

पण लाजाळू काकानं नाही राहूद्या घेतो. म्हणत बसूनच पाठीमागचा टॉवेल ओढला. आणि जेवढया घरातल्या होत्या  नव्हत्या तेवढ्या गुंडाळून कोंबून ठेवण्यात आलेल्या साड्या  त्याच्या अंगावर. खरकाट्या ताटात एकूणच वाड्याभर पसरल्या.

सारवासारव करीत पुन्हा म्हणाल्या " आमच्या तायडीला गोदडी शिवायचा लई नाद हाय" बसून म्हणून काय ऱ्हात नाही.. काय बाय करतच असती.

निघण्याची वेळ आली. पण माझं लिखाण काम चालूच व्हतं. काका म्हणाले - " काय रं राम काय लिहतोस मगापास्न"

काय नाही. तुम्हाला नाही दाखवणार.''

माझं निरीक्षण चालूच होतं आणि टिप्पणही मी माझ्या डायरीत नोंदवत होतो. भिंतीवरती फॅमिली फोटो लावलेला होता. त्यात नवरी मुलगी तिच्या दोन वेण्या आणि गावकडची लहान मुलांना बोटभर डोळयाला काजळ लावायची पद्धत. मी काकाला म्हणालो " काका ती नवरी आहे काय ?"

नवरीचीच आई मध्ये बोलली " व्हय बाळा तुझ्या एवढी व्हती ना तवा जत्रात काढला व्हता फोटू. मी तायडी आणि तायडीचा बाप. येईलच एवढयात फाट्यावर गेला आसंल मुतारा ढोसायला."

आणि मग माझं आणि काकांचं दोघांचंबी एकाचवेळी लक्ष गेलं फोटोकडे.

अरे हा तर मघाचाच " बेवडा "

तेवढयात कानावर आवाज आला. ये म्हातारे झाडाखली काय बसलीस.

आजी - तुहया पोरीनं हाकलून लावलंय मला. सजनीनं.... नवरा कराय निघालीय झिप्री...

कुठाय ती... तायडे S S S

तायडी म्हणजेच नवरीनं दार उघडले. तो बेवडा आत आला.

दार लावून काय बसलीस माझ्या आजीला बाहेर काढून... तुझ्या मायला तुझ्या...

खरकाटी भांडी न्हाणीत ठेवत झटकन तीची आई मध्ये येत म्हणते "आवं आवं असं पोरीला मारू नगासा' पाव्हण्यापुढं ग्वांड दिसतं का ते...

पाव्हणं .... कुठाय पाव्हणं....

सगळी आम्हाला शोधत होती... आणि आम्ही खुष्कीच्या मार्गाने म्हणजे वाड्याच्या मागच्या दारानं वावरा वावरानं पळत होतो.

कसंबसं घरी आलो. संध्याकाळी घरचे सर्वजण जेवायला बसलो होतो. आमचं खटल्याचं घर वडिल धरून पाचजण भावंडाचं. त्यांची मुलं म्हणजे कसा भरलेला वाडा.

सर्वात लहान चुलताच लग्नाचा राहिल्याने सगळी धावपळ होती. शोधाशोध होती.

आजीनं मला विचारलं . " मग राम कशीय नवीन काकू.. मी छान म्हटलं. "

घर कसंय - वाडा हाय मोठ्ठा एवढा दोन्ही हातानं दाखवत.

आत कसाय रं वाडा. मग मी जेवता जेवता उठलो. खिशातली डायरी काढली अन् वाचू लागलो.

दारात नांदुर्गीचं झाड त्याखाली म्हातारी

सतरा कोंबड्या

37 पिल्लं

एक रेडकू

5 कुत्र्याची पिल्लं

दोन गाई

दोन बैलजोडी

घरात टिप

टिपावर पोत्यांचं कव्हर

बारका ONIDA TV

जुना फॅन

कपाट

03 पितळी ताटं

0 4 जर्मन ताटं

मोठा स्टिलचा तांब्या

चेंबलेला जग

धान्याची दीड पोती

1 घोंगडी

वाड्याभर चिंध्या

2 पातेली

तेवढयात काकांनी डायरी हिसकावून घेतली. हे ल्हेत व्हतास व्हय रं.

आता तुम्हीच सांगा एखाद स्थळ (बायको) बघायला गेल्यावर काय काय गोष्टी करायच्या.


आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...