विठू नांगरे कलंदर माणूस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विठू नांगरे कलंदर माणूस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

विठू नांगरे कलंदर माणूस


विठू नांगरे कलंदर माणूस 

विठू नांगरे हा आमच्या भागातील असा अवलिया होता की त्याला कोणते काम जवळ जमत नाही.असे कधी झाले नाही.

1975 ते सन 2000 पर्यंत आमच्या भागात नाट्यरूपी भारुड मंडळे जोमात होती. त्या काळात गावातील ठराविक घरामध्ये श्रावण महिन्यात धार्मिक ग्रंथांची पारायणे चालत असत. चैत्र आणि वैशाख महिन्यात सत्यनारायणाच्या महापूजा होत. प्रत्येक गावात यात्रा,जत्रा आणि उरूस असत. त्यामुळे धार्मिक वातावरणाबरोबर सांस्कृतिक वातावरण सुद्धा तयार झाले होते. त्यामुळे वेगवेगळ्या लोककलांना समाजाकडून प्रोत्साहन मिळत असे. या सर्व वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे नातेवाईक गण गोत्र, मित्र,आप्तेष्ट यांचा एकमेकांकडे नेहमी राबता असे. 

परंतु काहीही म्हणा त्यावेळी धार्मिक वातावरणाने लोक भारलेले होते. रामायण, महाभारतातील कथा, नवनाथ भक्तिसार मधील कथा विविध पुराणातील कथा यांनी समाजावर एक वेगळेच गारुड तयार केले होते. या कथांना कुठेतरी प्रत्यक्ष नाट्यरूपाने समाजासमोर आणले पाहिजे या उद्देशाने अनेक गावागावांमध्ये नाट्यरूपी भारुड मंडळ उदयास आली.वांजळे, वरचे भोमाळे, पाभे,धामणगाव, टोकावडे, मंदोशी,पोखरी, पवळेवाडी, देवतोरणे, नायफडसरेवाडची सारेवाडी,नाव्हाचीवाडी अशा अनेक गावांमध्ये नाट्यरूपी भारुड मंडळे उदयाला आली. अनेक कलाकार उदयाला आले आणि त्यात सर्वश्रेष्ठ कलाकार म्हणजे विठू नांगरे. या काळात या नाट्यरूपी भारुड मंडळांना समाजाकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकाश्रय मिळाला.

विठू नांगरे यांचे कोणतेही प्रकारचे शिक्षण झाले नव्हते. तरीही त्यांच्या रामायण महाभारतातील कथा आणि पुराणातील कथा तोंडपाठ होत्या. विठू नांगरे यांच्या गावात नाट्यरूपी भारुड नव्हते. तर ही विठू नांगरे भागातील कोणत्याही नाट्यरूपी भारुड मंडळात कोणत्याही प्रकारचे पात्र साकारत असे. मग तो राजा असो अथवा प्रधान, देव असो वा दानव किंवा स्त्री पात्र कोणतेही पात्र विठू नांगरे लिलया करत असे. विठू नांगरे च्या कोणत्याही भूमीकेला  समाज प्रचंड दात देत असे.

भारुडातील प्रसंगानुसार विठू नांगरे स्त्री भूमिका करत असे. नऊवारी लुगडे चापून चोपून नेसलेला व तशाच रंगाची चोळी परिधान केलेला विठू नांगरे कधी स्त्री प्रमाणे भासत असे. डोक्यावर चुंबळ, त्यावर पेटते निखारे आणि त्याच्यावर भाताचे पातेले एवढे सर्व डोक्यावर घेऊन विठू नांगरे गाण्याच्या तालावर नाचत असे. नाचता नाचता डोक्यावरचा भात शिजला जाई. तो पाबेतो त्याने कधीही डोक्याला हात लावलेले नसे. शिजलेला भात पाहून लोक अचंबित होत असत. विठू नांगरे यांना जमलेल्या प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळत असे.

पुराणा मध्ये अनेक कथा असत.त्यानुसार भारुडात वगनाट्य होत असे. त्यापैकी गरुडाची आई विनता व सर्पाची आई कद्रू या दोन सवतींची कथा पुराणा मध्ये आहे. विनताचे सत्य असूनही कद्रुने कशी खोटेपणाने पैज जिंकली. व विनताचा छळ केला हे वगनाट्य खूपच त्यावेळी लोकप्रिय झाले होते. विठू नांगरे विनताचे पात्र करायचा. ते पात्र इतके प्रभावी होते की लोक अक्षरशः रडायचे. स्रिया डोळ्याला पदर लावून मुसमुसून रडायच्या. हीच विठू नांगरे यांच्या कलेची पावती होती.

दरवर्षी शिमग्याला विठू नांगरे मरीआईच्या देव्हाऱ्याचे सोंग घेऊन भागातील गावांमध्ये जात असे. व मरीआईच्या भक्ताप्रमाणे कपडे परिधान करून स्वतःलाच चाबकाचे फटकारे मरत असे. लोक याही कलेला प्रचंड दात देत असत. व त्याला योग्य ती बिदागी देत असे.

विठू नांगरे यांचा सर्वात प्रभावी कार्यक्रम तो म्हणजे मोर नाचवणे. विठू नांगरे यांनी लाकडांच्या बांबूपासून मोर तयार केला होता. त्याला एक लोखंडी चोच तयार केली होती. त्यावर निळसर कपडे व पाठीमागे खरोखरच्या मोरांचा पिसारा मोराचे पिसे लावून तयार केला होता. अगदी खरोखरच्या मोराप्रमाणे. त्यामध्ये विठू नांगरे प्रवेश करून वेगवेगळ्या प्रकारे सनई चौघडांसमोर नाचत असे. त्यावेळी विशेषता लग्नामध्ये, यात्रांच्या मिरवणुकीमध्ये विठू नांगरे यांच्या मोराला प्रचंड मागणी होती. लहान थोर, आबाल वृद्ध स्त्रिया विठू नांगरे यांच्या मोराचा नाच पाहून आनंदित होत असत. विठू नांगरे यांच्या मोराला जुन्नर, आंबेगाव खेड आणि मावळ या चारही तालुक्यांमध्ये प्रचंड मागणी होती. मोर नाचवावा तर विठू नांगरे यांनीच असे लोक त्यावेळी म्हणत असत. वेगवेगळ्या भारोनामध्ये सुद्धा मोर नाचवला जाई.

विठू नांगरे यांना जसे धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला आवडे. तसेच त्यांना कुस्तीची सुद्धा प्रचंड आवड होती. विठू नांगरे यांना कुस्तीचे कोणतेही डाव येत नसत तरीही ते विविध यात्रांच्या आखाड्यामध्ये कुस्तीमध्ये भाग घेत असत. विठू नांगरे यांनी कुस्ती खेळताना कधीही लंगोट किंवा काच्या याचा उपयोग केला नाही. कारण विठू नांगरे हे मुळातच पैलवान नव्हते. त्यांच्याजवळ लंगोट आणि काच्या असणार कसा. त्यामुळे विठू नांगरे हे चड्डीवरच कुस्ती खेळत असत. कुस्ती खेळताना एकदा का विठू नांगरे यांनी भुई धरली की समोरचा पैलवान कितीही ताकदीचा व डावपेचाचा असला तरी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा विठू नांगरे त्याला पलटी होत नसे.आखाड्यात नुसताच फुफाटा उधळत राही. नाट्यरूपी भारुड मंडळात स्त्री पात्र  काम करताना रडविणारे विठू नांगरे कुस्ती खेळताना मात्र लोकांना प्रचंड हसवत असत.शेवटी ही कुस्ती सोडवली जाई.सोडवलेल्या कुस्तीला थोडेफार का होईना इनाम विठू नांगरे यांना मिळत असे. कधीही पैलवानकी न केलेल्या विठू नांगरे यांच्या कुस्तीची नेहमीच चर्चा होई.अजूनही एखादी कुस्ती पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ चालली की लोक विठू नांगरे यांच्या कुस्तीची आठवण काढतात.

 विठू नांगरे यांना नाट्यरूपी भारुड मंडळात पात्र काम करायची आवड होती तशीच पावसाळ्यात नदीला आलेल्या पुरामध्ये मासे पकडण्याची सुद्धा खूप आवड होती. नदीला मोठा पूर आल्यावर बांबू पासून बनवलेल्या येंडी मधून विठू नांगरे खूप मासे पकडत असत. पावसाळ्यात जेव्हा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येई. त्यावेळी आम्ही मासे पकडण्यासाठी नदीवर जात असू. त्यावेळी विठू नांगरे यांची हमखास आमची भेट होत असे.

प्रचंड गरिबी,जगण्यासाठी केलेली धडपड,अशाही परिस्थितीत आपल्या मधील कलेला वाव देत मनाला विरंगुळा देऊन विठू नांगरे आपल्या फाटलेल्या संसाराला ठिगळे लाऊ बघे. त्यावेळी सर्वच लोक गरीब होते. परंतु गरीब असूनही आपापले छंद जोपासून होते.

आजही समाजात यात्रांच्या हंगामात, शिमग्यात,लग्न कार्यामध्ये विठू नांगरे यांचे आजही जुने जाणते लोक नाव काढतात. व त्यांच्या केलेल्या कलेच्या कामाच्या स्मृतींना उजाळा देतात. अनेकांना शिवाजी पैलवान सुद्धा माहीत असेल. त्याविषयी सुद्धा दोन शब्द लिहून शिवाजी पैलवान यांना प्रकाशात आणूया. वाचकांचा प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा.


 



.

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस