सच्चा मित्र काशिनाथ जढर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सच्चा मित्र काशिनाथ जढर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल.

काशिनाथ हे आमच्या सबंध गावातील आदर्शवत व्यक्तीमत्व होते. गावात पुर्वी काशिनाथच्या शब्दाला खुप मान होता.व त्याच्या विषयी लोकांना आदर होता.

गावात कोणाचेही, कसलेही काम असो. लोक सल्ला घेण्यासाठीअथवा मदतीसाठी काशिनाथकडे धाव घेत. काशिनाथही त्यांना कधीच नाही म्हणत नसे.

गावात रात्री कोणत्यांना कोणत्या कारणास्तव मिटींग असे. एकेकजण बैठकीला येऊ लागे. परंतू अद्याप काशिनाथ आलेला नसे. लोक व जेष्ठ मंडळी काशिनाथची वाट पहात. प्रसंगी जेष्ठ मंडळी त्याला मिटिंगला येण्यासाठी एखाद्याला बोलवायला पिटाळत.

काशिनाथला मिटिंगला बोलावण्यासाठी मी कित्येक वेळा त्याच्या घरी गेलेलो आहे. त्यावेळी मला मोठे झाल्यावर गावात काशिनाथसारखे व्यक्तीमत्व व्हावे असे वाटत असे.

त्यावेळी मी दहावीत असेल. तेव्हा मी लहान मुलांमध्ये व माझ्या समकक्ष मुलांमध्ये खेळत व बागडत असे. एके दिवशी काशिनाथ मला येऊन म्हणाला रामभाऊ तु आता मोठा झालाय. मोठ्या माणसांमध्ये येऊन बसत जा. लहान पोरासोरांत खेळणे कमी कर. त्याचा हा सल्ला मी तात्काळ आमलात आणला.

मी जेव्हा आकरावीला राजगुरूनगरला प्रवेश घेतला तेव्हा मला काँलेजला जाण्यासाठी व्ववस्थीत असे कपडे नव्हते. हे जेव्हा काशिनाथच्या लक्षात आले तेव्हा तात्काळ त्याने त्याचा नविन ड्रेस मला देऊन टाकला.

गावात दुध डेअरी व्हावी, अशी तेव्हा अनेकांची इच्छा होती. त्यासाठी सगळ्यात मोठे योगदान काशिनाथचे होते. 

त्यावेळी काशिनाथच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण ग्रामस्थ धुओली येथे तत्कालीन सोसायटी मँनेजर श्री.चिंतामण जठार यांचे घरी गेलो. तेथे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रत्येक सभासद ११ रूपये या प्रमाणे शेअर्स जमा केले.

अनेकांचे शेअर्स काशिनाथने स्वतः भरले, व श्री.काळभैरवनाथ दुध उत्पादक संस्थेची मुहार्तमेढ तेथेच रोवली गेली. 

सर्व ग्रामस्थांची इच्छा अशी होती की या डेअरीचे चेअरमनपद काशिनाथने स्विकारावे...परंतू काशिनाथने या पदासाठी नम्रपणे नकार दिला. पुढे महिनाभरातच श्री.काळभैरवनाथ डेअरी सुरू झाली. याचे संपुर्ण श्रेय काशिनाथ कडेच जाते.

काशिनाथ मुळे गावगाड्याच्या मुख्य प्रवाहात मी ओढला गेलो. आणि सामाजिक, राजकीय कार्याचा भाग बनलो. काशिनाथचा प्रत्येक सल्ला हा अभ्यासपुर्वक असे व तो भविष्यात तंतोतंत खरा ठरायचा.

गावात कोणाचे लग्न जमवायचे असो, लग्नाचे नियोजन असो, गावातील भांडण तंटा मिटवायचा असो, रूसवा फुगवा काढायचा असो, कोणाला मोठ्या दवाखान्यात न्यायचे असो,किंवा कोणतेही काम असो, काशिनाथ स्वतःच्या कामावर पाणी सोडून ही लोकांची कामे आवडीने करायचा. अद्यापही ही त्याची परंपरा चालू आहे.

पुर्वी लोक सशाची, डुकरांची शिकार करायचे. डुकराची पारध कोणत्या रानात करायची. वाघुरी (जाळे) कोठे लावायच्या. पारध कोठून काढायची याचे संपुर्ण नियोजन काशिनाथ लिलया करायचा. 

त्याचप्रमाणे उन्हाळ्यात सकाळी लवकर रानाजवळ असलेल्या शेतात जाऊन काशिनाथ तेथे ससा येत असल्याचा माग काढे. सशाच्या लहान मोठ्या लेंड्यावरून ससा किती मोठा आहे याचा अचुक अंदाज काढे. 

त्याप्रमाणे संध्याकाळी दिवस बुडाल्यावर आम्ही त्याच्या बरोबर वाघुरी, करंड्या व घोंगड्या घेऊन रानातली वाट चालू लागायचो. वाघुरी कोठे मांडायच्या याचे संपुर्ण नियोजन काशिनाथ कडे असे. वाघुरी मांडून झाल्यावर प्रत्येकजण लहान झुडपाच्या जवळ घोंगडी पांघरूण बसायचा.

ससा आल्यावर वाघुरीच्या दिशेने ससा कसा पळवायचा व वाघुरीत पाडायचा हे काशिनाथ अचुक अंदाज व तितकीच चपळता दाखवत लिलया करायाचा.

पुर्वी मी काशिनाथ बरोबर मोहरी (कड्या कपारीत असलेले मधमाशांचे पोळे) काढण्यासाठी पहाटेच जायचो. पहाटे रानात जाताना एक वेगळाच गारवा व रानातील झाडांचा फुलांचा सुंगध दरवळत रहायचा. व मन मन प्रसन्न होऊन प्रफुल्लीत व्हायचे.

कोवळ्या उन्हाच्या तिरपेच्या सहाय्याने मधमाशी कोठे जाते हे तो अचुक ओळखायचा. व बरोबर आम्ही तेथे पोहचायचो.

एकदा आम्ही काशिनाथच्या मार्गदर्शना खाली व त्याच्या नियोजनानुसार झाडावरील आग्या मोहळ अगदी सुरक्षित पणे काढले होते.

एकदा असेच संध्याकाळी मी, काशिनाथ व धोंडू विष्णू तळपे सशाच्या शिकारीला गेलो. वाघुरी लावून सशाची वाट पाहत बसलो. रात्र असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. आणि अचानक वाघुरीच्या करंड्या पडल्याचा आवाज झाला. वाघुरीत ससा पडला म्हणून काशिनाथ व धोंडू वाघुरीच्या दिशेने धावले. वाघुरीतला ससा काशिनाथ पकडणार तेवढ्यात वाघुरीत पडलेले रान मांजर जोरात त्याच्या अंगावर फिसकारले. तसाच काशिनाथ मागे सरला. 

अरे! रामभाऊ बॅटरी आण. वाघुरीत दुसरेच काहीतरी आहे. मी बॅटरी घेऊन गेलो तर वाघुरीत रानमांजर होते. त्याला वाघरीतून काढायचे कसे हा प्रश्न होता. तेवढ्यात धोंडू एक मोठा दगड घेऊन आला. आणि मांजराच्या डोक्यात टाकला. मांजर जागच्या जागी गप्पगार झाले. आणि हेच मांजर आम्ही कंबळ वाघ (कातकरी) यांना दिले.

लेव्ही बसलेय याचा फायदा घेऊन भाताची चोरटी ने-आण करणाऱ्यांची काशिनाथने एकदा अशीच पाचावर धारण बसविली.

होमगार्डचे खाकी कपडे घालून मी, धोंडू तळपे, अशोक सुतार, मारुती तळपे आणि काशिनाथ जढर नेहमीसारखे शिकारीला गेलो होतो. 

सावज हेरण्यासाठी काशिनाथ हातातील पॉवरबाज बॅटरी रानात चारीकडं फेकीत होता. त्या प्रकाशझोतात पोत्यांनी शिगोशिग भरलेली एक बैलगाडी आली. चोरटा भात व्यापार करणाऱ्या त्या गाडीतील व्यापाऱ्यांना वाटलं आपल्यावर ही पोलिसांची धाड आली. त्यांनी बैलांची मुस्कटं वळती केली आणि मागचा पुढचा विचार न करता दात ओठ खात बैल पिटाळायला सुरुवात केली.

क्षणात एक भयानक आवाज त्या शांत रानात उठला. दहा-वीस हात खोल असलेल्या एका दरीत बैल गाडीसह कोसळले होते. आम्ही दरडीत उतरून अगोदर जुपन्या ढिल्या करून बैलांना मोकळं केलं. 

सगळ्यांच्या मदतीनं गाडी दरडीबाहेर काढली. इकडं तिकडं विखुरलेली भाताची पोती पुन्हा गाडीत चढविली. बैलांना पाणी पाजून हुशार केलं. आम्हा शिकाऱ्यांचा तांडा घेऊन काशिनाथ गाडीत चढला. कासरे आपल्या हातात धरीत त्यानं ती भरलेली बैलगाडी सरळ गावात आणली.

बैल कुणाचे आहेत हे आम्ही ओळखलं होतं. त्या चोरट्याच्या दारात सरळ गाडी लावून काशिनाथने ललकारी दिली‚ अबे ओ बब्या बाहेर ये ! शिकार आव्या है रे! बबनराव बाहेर आला आणि आपली बैलं आणि गाडी बघताना त्याचा चेहरा खेटरानं मालिश केल्यासारखा झाला.

आयुष्यात मी काशिनाथ बरोबर खुप फिरलो कधी पायी तर कधी मोटारसायकवर तर कधी कारने.

एकदा आम्ही हिरडे गोळा करण्यासाठी पायीपायी पाभे, भोमाळे, खरपुड मार्गे तांबडेवाडीला गेलो. तेथे आम्ही पोहचलो २.३० वा. नंतर आम्हाला खुप भुक लागली. आता काय करायचे, असा विचार आला. आम्ही डोंगरावर होतो.

काशिनाथ म्हणाला काळजी करू नको. एक काम करू. 

खाली गाव आहे. तेथे लग्न आहे. कारण स्पिकरवरून लग्नाच्या गाण्यांचा, व आहेर पुकारल्याचा आवाज योतोय.

आपण खाली गावात जाऊ.

मी म्हटले अरे! तो अनोळखी गाव आपली तेथे ओळख ना पाळख कशाला तेथे जायचे त्या पेक्षा आपण घरी जाऊया.

काशिनाथ म्हणाला. 

नाही आपण जाऊच. त्याच्या पुढे काय बोलनार ? गेलो.

मला वाटते ते औंढे गाव असावे. तेथे गेलो तर सर्व लोक अनोळखी. कुणीच आमच्या ओळखीचे दिसेना. शिवाय लग्नाला अजुन खुप वेळ होता. तेव्हा लग्न झाल्यावर जेवण असायचे. 

आता काय करायचे. असा प्रश्न निर्माण झाला. इतक्यात आम्हाला आमच्याच गावातील श्री.शांताराम मोहन भेटले. ते आम्हाला पाहून अश्चर्यचकित झाले. ते त्यांच्या बहिनीच्या मुलीच्या लग्नाला आले होते. त्यांना सर्व हकिकत सांगीतल्यावर त्यांनी आम्हाला लगीनघरात नेऊन जेवायला वाढले. आम्ही भात आमटी व शाकभाजी व बुंदीवर ताव मारला. 

जेवण केल्यावर मग मात्र आम्ही परत घरच्या ओढीने चालू लागलो. 

काशिनाथ जढर एके दिवशी माझ्या कडे

आला व मला म्हणाला. रामभाऊ आज रात्री माझ्या बरोबर झोपायला रानात आमच्या गोठ्यावर यावे लागेल मी विचारले का रे ? 

तो म्हणाला अरे दादा व वहिनी लग्नाला गेले आहेत. ते येनार नाहीत व गोठ्यावर गायी बैल व म्हशी आहेत. तेव्हा जावं लागेल. मी त्याला होकार दिला.

रात्री आम्ही दोघे रानातील गोठ्यावर झोपायला गेलो. रात्री तेथे शांत झोप लागली. सकाळी अगदी पहाटेच जाग आली. नंतर झोप काही येईना.

चला बाहेर लगवीला जाऊ असा विचार करून काशिनाथला उठवले. आम्ही बाहेर आलो. नुकतेच उजाडत होते. गार वारा सुटला होता.

आमच्या गोठ्याच्या पुढे एक मोठा कडयासारखा डोंगर होता. तेथुन गावात येण्यासाठी पाउलवाट होती. ती वाट वळणावळणाची होती.आम्ही तेथेच लगवीला उभे होतो. 

मी अचानक वर समोर असलेल्या कड्याकडे पाहिले. तेथील पाउलवाटेने एक नउवारी लुगडे नेसलेली व डोक्यावर गाठोडे असलेली बाई चालली होती. मी काशिनाथला दाखविले.

तो म्हणाला अरे! ही तर चिंधाबाई आहे. आमच्या गावातील एक बाई जवळच असलेल्या नायफड या गावात दिली होती.आम्हाला वाटले तिच आहे. 

काशिनाथ म्हणाला 

अरे! ही इतक्या सकाळी कशाला आली असेल ? 

ही उठली असेल तरी कधी ? आणि निघाली असेल कधी ? 

कारण नायफड ते आमचे मंदोशी गाव सुमारे ५ कि.मी. असेल. 

शिवाय रानातून व डोंगरातून येणारी वाट.असे आम्ही बोलत होतो. चिंधाबाई वळणवळणाने असलेल्या पाउलवाटेने चालत होती. ती ज्या वळणावर आली, तेथे मोठे झाड होते. तेथे जवळच मोठा दगड होता.

आम्ही पहात असताना अचानक त्या झाडाचा कडकड आवाज झाला आणि झाड उन्मळून त्या बाईच्या अंगावर पडले. त्या बरोबर ते झाड व तो मोठा दगड खाली घरंगळत आला. एकच मोठा आवाज झाला. चिंधाबाईचे काय झाले असेल या विचारांनी आम्ही सुन्न झालो.

नंतर लगेचच गावात जाउन ही खबर लोकांना दिली. सर्व जण घटना घडली तेथे आलो. तर त्या ठिकाणी झाड, चिंधाबाई व दगड या पैकी काहीही दिसले नाही. लोकांनी आम्हांला वेडयात काढले. तुम्हाला भास झाला असेल असे म्हणून निघुन गेले.

परंतु एक कळले नाही. एकाच वेळी दोघांना कसा भास झाला. नव्हे ते भुतच होते याची पक्की खात्री झाली.

विशेष म्हणजे चिंधाबाई अजुनही हयात आहे

काशिनाथच्या कामाचे मुल्यमापन करायचे झाल्यास योग्य नियोजन, अचुक अंदाज, योग्य मार्गदर्शन, सतत दुस-याला मदत करण्याची भावना,कार्यतत्परता,अजातशत्रू इत्यादी गुण त्याच्याकडे होते व आजही आहेत.

परंतु येवढा गुणसंपन्न माणुस असुनही काशिनाथ नियतीच्या फेऱ्यात अडकला. मद्याच्या नशेत हरवून बसला. कोणत्याही प्रकारजी त्याच्यावर जबाबदारी नसताना, कोणताही दबाव, कर्ज, नसताना काशिनाथ नशेच्या आहारी गेलाय. हा नियतीचाच भोग म्हणावा लागेल.

खुपदा सांगुनही त्याच्यावर काहीच फरक पडत नाही. गावात अनेक गट-तट झाले परंतु काशिनाथ बद्दल सर्वांनाच आस्था व अपुलकी राहीली. कोणच त्याला वाईट बोलू शकले नाही. मग तो कोणत्याही गटात असो. गावातील सर्वांनाच वाटते की काशिनाथचे व्यसन सुटुन त्याने पुर्वी प्रमाणेच कार्य करत रहावे. व आपला भविष्यकाळ उज्वल करावा. अद्यापही वेळ गेलेली नाही हेच या लेखातुन सांगण्याचा मुख्य उद्देश.

रामदास तळपे 

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस