श्रावण महिना चालू आहे. कामानिमित्त आपण दूर शहरात राहत आहोत. परंतु आजही कधी कधी गावाकडील भारलेल्या दिवसांची आठवण येते. आणि मन भूतकाळात रमून जातं.
श्रावण महिना चालू झालेला असायचा. अनेक गावांमधून धार्मिक लोक वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांचे पारायण करायचे. कुणी राम विजय, कुणी पांडव प्रताप, कुणी नवनाथ तर कोणी हरी विजय भक्ती विजय इत्यादी ग्रंथांचे पारायण करायचे.रोज संध्याकाळी प्रत्येक अध्यायाचे पारायण होईल. लोक पारायण ऐकायला गर्दी करत.
पारायण संपल्यानंतर ग्रंथांची समाप्ती होत असे. आमच्या घरीही श्री नवनाथ ग्रंथांचे पारायण होत असे. त्यावेळी भागातील शिरगाव येथे असलेले प्रसिद्ध ब्राह्मण डीगु तात्या हे अनेकांना माहीत असतील.डीगु तात्या हे एकटेच मारुतीच्या मंदिरात राहायचे. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या वर असल्यामुळे त्यांना खाली काही दिसत नव्हते.असे असतानाही ते स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचे.
शिरगाव येथील किंवा पंचक्रोशीतील लोक इतर कामात मदत करायचे. शिरगाव येथे दूध घातल्यावर लोक मारुतीच्या मंदिरात डीगू तात्या यांच्याकडे गांजा ओढत बसत असत.
डीगु तात्यांना दिसत नसले तरी त्यांना श्री सत्य नारायणाचे सर्व अध्याय तोंडपाठ येत असत. ते सर्व प्रकारचे अभिषेक करत.अभिषेकाचे सर्व मंत्र त्यांना तोंडपाठ असत.
उंच शिडशिडीत बांधा, डोक्यावर बारीक केलेले पांढरे केस, लफेबाज धोतर, शिरगावात असतील तर अंगात बंडी किंवा बनियन घालत नसत. फक्त धोतर हाच त्यांचा वेश होता. परंतु बाहेर जर कधी जाणे झाले तर मात्र ते पेरण घालत असत.
सर्व भाग डिगू ब्राह्मणाला तात्या म्हणत असत. सर्व भाग त्यांची काळजी घेई. श्री सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी पारायण समाप्तीच्या वेळी डीगु तात्या यांना आठ दिवस आधीच आमंत्रण दिलेले असे. कधी कधी एकाच वेळी अनेक पूजा असत. भागातील सर्व लोकांना डीगू तात्या हेच ब्राह्मण पूजेसाठी हवे असत. परंतु सर्व ठिकाणी डीगू तात्यांना ते शक्य होत नसे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होत असे.
सत्यनारायण पूजा
पारायण समाप्तीच्या दिवशी एक वेगळाच उत्साह प्रत्येकामध्ये ओसंडून वाहत असे. कुणी नदीचे पाणी आणायला जात असे, तर कुणी केळीचे खुंट आणायला जात असत. बेल आणायला अगदी नायफड किंवा खरोशी येथे जात असत. काहीजण पूजेचा बाजार आणण्यासाठी डेहणे येथे जात असत.
घरातील मुली चाफ्याची, मोगऱ्याची, झेंडूची फुले आणून त्याच्या माळा बनवत असत. सर्व घर अगदी उत्साहाने फुलून गेलेले असे.
पूजेच्या दिवशी अगदी सकाळी सकाळी लोक नदीचे पाणी घेऊन येताना डीगू तात्याला घेऊन येत असत. घरी आल्यावर यजमान असलेला माणूस डीगु तात्यांची सर्वतोपरी काळजी घ्यायचा.
गांजा आणि चिलीम यांची तजवीज केलेली असे. डीगू तात्या कधीही एकटे गांजा ओढत नसत. प्रत्येक गावात गांजा ओढणारे दोन तीन जण असतच. मग ते लोक आणि डिगू तात्या यांचा गांजा ओढण्याचा कार्यक्रम चालू होई.
पूजेच्या वेळी मात्र काहीही दिसत नसलेले डिगू तात्या पूजेची उत्तम मांडणी करत असत. त्यांनी पूजेची मांडणी केलेली पाहून लोकांना पूजेचे सार्थक केल्याचे समाधान मिळे.
पूजा सुरू झाल्यावर डीगु तात्यांच्या मुखातून संस्कृत मधले मंत्र अगदी स्पष्टपणे फाड फाड बाहेर पडत. गणपती पूजन, दीप पूजन, घंटा पूजन व शंक पूजन केल्यावर मुख्य पूजेला सुरुवात होत असे. नवग्रहाचे मंत्रोपचार, कुलदेवतेचे मंत्रोपचार, ग्रामदेवता,ग्रहदेवता यांचे मंत्रोपचाराने घरचे वातावरण प्रसन्न होई.
त्यानंतर श्री. सत्यनारायण महापूजा सुरू होई. नवीन कपडे घातलेले यजमान आणि त्यांची अर्धांगी पूजा करण्यासाठी बसत. दिगू तात्या त्यांच्याकडून काही मंत्र वदवून घेत असत. त्यांच्या मागे मंत्र म्हणताना यजमानांची तारांबळ होत असे.
महापूजा झाल्यानंतर डिगू तात्या श्री सत्यनारायणाचे अध्याय वाचण्यासाठी सुरुवात करत. सर्व अध्याय त्यांना तोंडपाठ असल्यामुळे ते बिन पोथीचे अध्याय धडाधड तोंडपाठ म्हणत.
तीन अध्याय वाचल्यावर डिगू तात्या पूजेसाठी आलेल्या लोकांना बुक्का लावण्यासाठी सांगत असत. कुणीतरी लहान मुलगा पोथी ऐकण्यासाठी आलेल्या लोकांना बुक्का लावत असे. बुक्का लावत असलेल्या पोराला आपण फार मोठे काम करत आहोत. याचे समाधान वाटत असे.
डिगू तात्यांना सर्व देवांच्या आरत्या तोंडपाठ असत. आरती झाल्यावर श्री.सत्यनारायणाचा प्रसाद सर्वांना वाटला जाई. त्यानंतर लोकांच्या जेवणासाठी पंगती बसत असत.
पूजेचे काम झाल्यावर डिगू तात्या हास्य उश्य करत. एका कोपऱ्यात जाऊन बसत असत. त्यानंतर त्यांना जेवायला वाढले जाई. घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक असे. तर बाहेर आलेल्या लोकांसाठी आमटी भात व शाकभाजी हे जेवण असे. लोक दोन दोन तीन तीन वाढ्या भात खात असत. पूजेचे जेवण हे अप्रतिमच असे. भात आमटी व शाकबाजी यांची आजही मला आठवण येते
जेवणावेळी संपल्यानंतर तेथेच अंगणात भजनाला सुरुवात होई. इकडे दिगू तात्या आणि दोन-चार जण यांचा गांजा ओढण्याचा कार्यक्रम सुरू होई.
त्या काळात भागातील लोक डिगू तात्या यांना देवाचा दर्जा देत होते. सर्व लोक डिगू तात्यांची आत्मीयतेने काळजी घेत असत. त्यांना सर्वतोपरी मदत करत असत. काही लोक दररोज जाऊन त्यांच्या चरणाचे दर्शन घेत असत. डिगू तात्या इतका मानसन्मान भागात कुणालाच मिळाला नसेल.
डिगू तात्या यांना दिसत नसले तरी भागातील सर्व लोकना ते ओळखत असत. लोकांच्या नुसत्या आवाजावरून ते नावानिशी बोलायचे. इतकी डीगु तात्या कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना कोणताच गर्व,अभिमान नव्हता. ते सर्वांशी अगदी प्रेमाने बोलत असत. कधीही ते कुणाचा राग करत नसत. किंवा त्यांना कधी कुणी रागावलेले देखील पाहिले नाही.जेवणाबाबत देखील त्यांची काहीच तक्रार नसायची.देईल ते खायचे.अर्थात हे कुठे बाहेर पूजेसाठी गेले तर.अन्यथा ते स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचे.
दगडू भराडी
डिगू तात्या प्रामाणेच शिरगाव येथे दगडू भराडी हे अनेकांना माहीत असतील. कमी उंचीचे, कृश शरीर असलेले अगदीच किडकिडीत असे हे दगडू भराडी होते. अगदी जुना असा पांढरा पायजमा, त्यावर कोणत्याही रंगाचे शर्ट, डोक्यात मळकट परंतु धुतलेली टोपी, काखामध्ये पिशवी व उजव्या हातात डमरू आणि पायात वहाणा असा त्यांचा वेश होता.
दगडू भराडी हे शिरगांव येथे अगदी गवताच्या झोपडीत बायको आणि मुलींसह राहत असत. त्यांना तीन मुली होत्या. परिस्थिती अगदी गरिबीची होती. केवळ ते लोकांच्या आधारावर जगत होते. शिरगाव येथील लोकांनी त्यांना खूप आधार दिला होता. त्यांनी शेळ्या आणि कोंबड्या पाळलेले होत्या. त्यावर त्यांची गुजराण चालू होती.
भागातील प्रत्येक गावात जाण्यासाठी दगडू भराडी यांचे वार ठरलेले असत. अगदी सकाळी सकाळी दगडू भराडी गावात येत असत.गावात गेल्यावर प्रत्येकाच्या दारात जाऊन ते खंडोबाचे किंवा देवीचे गाणे म्हणत असत. त्यासोबत ते डमरू वाजवत. गाणी म्हणून झाल्यावर सौभाग्यवती स्त्रिया त्यांना सुपातून थोडे तांदूळ देत असत. तांदूळ पिशवीत घेऊन दगडू भराडी पुढच्या घराच्या दारात जात असत.
गावात लग्नकार्य झाल्यावर भरड घालण्याचे काम दगडू भराडी करत असत. त्यासाठीची सर्व तयारी दगडू भराडी करत असत. भरड घालण्याची मांडणी ही सत्यनारायणाच्या पूजेसारखीच असे. परंतु थोडी वेगळी पद्धत होती. भरडा साठी पूजेवर जसे जोडीने बसायचे असते. तसेच भरड घालण्यासाठी देखील.
भराड घालण्याचे काम सुरू झाल्यावर दगडू भराडी भोरगिरी पासून ते राजगुरुनगर पर्यंत असलेल्या गावातील देवांना गाण्यांमधून भराडा साठी आमंत्रण देत असत. त्यावेळी कोणत्या गावात कोणता देव आहे हे आम्हाला कळे.
त्या काळात प्रत्येक गावात प्रचंड माणुसकी होती. एकमेकांचा एकमेकांना आधार होता. लोक प्रत्येकाचा आदर करायचे. अनाथ आणि एकाकी असलेल्या लोकांना अगदी कुटुंबातील असल्यासारखे मदत करायचे. त्यावेळी पैसा नव्हता. परंतु माणुसकी ठासून भरलेली होती. त्यामुळे पैसा नसतानाही लोक आनंदाने जगत होती. कुणीही कशाचीही काळजी करत नव्हते.
रामदास तळपे