साधारण 1976 चे ते साल असावे. दुष्काळात शासनाने रोजगार हमीची कामे काढून लोकांच्या हाताला काम दिले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता भुकेच्या विवंचनेतून बाहेर पडली होती. हळू हळू परिस्थिती पूर्वपदावर येत होती. तत्कालीन देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा देऊनही सत्तर टक्के लोकांची गरीबी होती तशीच होती.
शेती मध्ये आधुनिकता नव्हती. संकरित बी बियाणे तो पर्यंत विकसित झाले नव्हते. त्यामुळे कमी उत्पन्न शेतीतून मिळत असे.
नुकत्याच सहकाराच्या माध्यमातून दूध डेअरी काढल्या होत्या. त्यामुळे शेत कऱ्याच्या घरी थोडा फार दुग्ध व्यवसाय चालत होता. म्हणून तरी जीवनावश्यक वस्तू बाजारात जाऊन घेता येत होत्या.
घरामध्ये खाती तोंड वाढत असल्यामुळे कुटुंब प्रमुखाला तारेवरची कसरत करावी लागत होती. जशी ही स्थिती सगळी कडे होती तशीच आमच्या ही घरी होती.
आमच्या घरात आमचे आजोबा कुटुंब प्रमुख होते. घरामध्ये दोन बैल दोन म्हशी, एक शेळी, एक कुत्रे, एक मांजर असा मुक्या जनावरांचा तांडा होता.
आम्ही तीन भावंड, आजोबा, आजी, आई, वडील असा आमचा परिवार आनंदाने तर नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी जीवन जगत होता.
घरातील म्हशी गाभण असल्यामुळे घरात दूध हे नावाला सुद्धा पहाण्यास मिळत नव्हते. आणि मग दूध नसले की घरात पैसा आपले तोंड लपवून ठेवत असे. त्यामुळे घर चालवताना खूप आर्थिक ओढाताण होत असे.
वसंत ऋतूच्या आगमनाने रानातील आंब्याची झाडे मोहरली होती. त्यावर्षी आंबे भरपूर होणार हीच भविष्यवाणी वर्तवली जात होती. सामायिक रानात आमची चार आंब्याची झाडं होती. सगळ्या झाडांना आंबे लगडलेले होते.
ही चार ही झाडे भावकी मिळून होती. एके दिवशी भावकीतील चार, पाच माणसं त्या थोराड आंब्याखाली जमा झाली. आंबा पाडाला लागल्याने त्याला उतरवण्याचे काम त्या दिवशी होणार होते.
झाडा वर एक माणूस तर खाली एक माणूस अशी जोडी जोडी तयार झाली वर चढणाऱ्या माणसाकडे एक खोडी होती. आंब्याच्या झाडाच्या शेंड्यावरील आंबे तो त्या खोडीत घेत होता. त्यातील एक एक आंबा खाली असणाऱ्या माणसाकडे झेलण्यासाठी देत होता. पोत्याच्या घडी मध्ये एक एक आंबा उतरवला जात होता.
झाडाखाली मोठी आंब्याची रास लागली. सगळ्या भावकीला समान वाटा देण्यात आला. हे आंबे मोजण्यासाठी आजोबांच्या वयाची तीन माणसं बसली होती. सुरवातीला धान्य किंवा इतर वस्तू मोजताना लाभ असे बोलण्याची पद्धत होती. नंतर दोन, तीन असे मोठ्याने बोलले जायचे. यामुळे वाटे होत असताना कोणतीही गडबड होत नव्हती.
प्रत्येकाने पोत्यात भरून आंबे घरी आणले घरात मोकळ्या जागेत पेंढ्याच्या थरात ते पिकवण्यासाठी ठेवले.
आंबा पिकल्या नंतर खूप गोड लागत होता. साधारण एक आंबा अर्धा किलोच्या वजनाचा असेल. तो पिकण्यासाठी सहा ते सात दिवस लागले.
सात, आठ दिवसानंतर पिकलेले आंबे बाहेर काढले. आंब्यांच्या सुगंधाने संपूर्ण घर दरवळून गेले होते.
इकडे घरातील जीवनावश्यक वस्तू संपल्या होत्या. येणाऱ्या बाजाराची वाट पहावी लागली होती. गुळ, घासलेट, कपड्याचा साबण, गोडेतेल, अशा सर्व सामान गरजेचे होते. घरात दूध नसल्याने दुधाचा पगार मिळण्याची शक्यता नव्हती.
त्या वेळी आजोबांनी आईला आणि मला सांगितले. जर ही आंब्याची पाटी तुम्ही बाजारात जाऊन विकली तर गरजेपुरता बाजार येऊ शकतो.
तसे पाहिले तर बाजाराचे ठिकाण म्हणजे खेड तालुक्याच्या पश्चिम भागाची मोठी बाजारपेठ म्हणजेच वाडा गाव. त्यावेळी गाड्यांची कोणतीही साधने नव्हती. पायी जाणे हाच पर्याय.
त्यासाठी दोन तास पायी चालत जावे लागणार होते. शिवाय ते आंबे डोक्यावर घेऊन जावे लागणार होते. आजच्या काळात माणसाला रिकामे एवढे अंतर पायी चालता येत नाही. तेव्हा ते डोक्यावर सामान घेऊन जावे लागणार होते.
शनिवारचा दिवस बाजाराचा असल्याने आईने शेण ,पाणी, लवकर उरकले. मी सुद्धा तिच्या बरोबर जाण्यास तयार झालो. माझे त्यावेळी वय साधारण दहा वर्षाचे असेल.
आईने एका पाटीत पन्नास साठ आंबे मावतील तेवढे घेतले. तर माझ्याकडे पंचवीसेक आंबे एका खताच्या गोनीत भरून दिले.
अंगात शाळेचा एकच सदरा जो धुवून तोच घालायचा असा आणि ठिगळ लावलेली खाकी चड्डी अशा पेहरावात आईआणि मी दोघे मायलेक आंबे विकायला बाजाराला निघालो होतो. निघालो होतो.
बाजाराला जाण्यासाठी काही सासुर वाशीणी स्रिया रस्त्याने चालल्या होत्या. त्यापैकी आईची खास मैत्रीण आईला गप्पा मारण्यासाठी भेटली होती. आईच्या डोक्यावर तीस ते चाळीस किलोचे ओझे तर माझ्या कडे खताच्या गोनीत असलेल्या आंब्याचे वजन साधारण दहा एक किलो होते.
आई आणि तिच्या संसाराच्या गप्पा रंगात आल्या होत्या. म्हणतात ना प्रवास बोलण्याच्या नादात कधी पूर्ण होतो ते कळत नाही. अगदी तसेच होत होते. आईची ती मैत्रीण सासूचे गाऱ्हाणे आईला सांगत होती. पण आई मात्र आमच्या आजी बद्दल काहीच सांगत नव्हती. त्यांच्या गप्पा मी तलीन होऊन ऐकत चाललो होतो.
परंतु त्या डोक्यावरच्या गोणीने मला चालणे असह्य केले होते. कितीही केले तरे माझे खेळण्याचे ते वय, परंतु संसाराचे ओझे वाहण्यासाठी मला तिथे जुंपले होते. मी या खांद्यावरून त्या खांद्यावर ते ओझे रागाने ठेवत होतो. गोनीतले ते निर्जीव आंबे सर्व सहन करत होते.
रस्त्यांमध्ये एक विसाव्याचा आंबा होता. त्याला गर्द सावली होती. बाजाराला निघालेला आणि बाजार करून आलेला वाटसरू तिथे विसावा घेत असायचा. आम्ही सुद्धा काही काळ तेथे विसावा घेतला.
मग मजल दरमजल करत वाड्याच्या बाजारात पोहचलो. एक रिकामी जागा पाहून आईने बरोबर आणलेली पाटी त्यामधील आंबे पोत्यावर पसरवले. माझ्याकडील आंब्याची अवस्था दयनीय झाली होती. आंब्याचे ओझे सतत खालीवर केल्यामुळे ते आंबे अगदीच बिलबिलीत झाले होते.
पिवळे धमक आंबे पाहून गिऱ्हाईक येत तर होते. पण भाव ऐकून पुढे जात होते. आईच्या लक्षात आले होते,भाव थोडा जास्तच आपण सांगत आहोत. मग काही वेळाने थोडा भाव कमी केला.काही वेळातच आईकडील सारे आंबे विकले गेले. मात्र माझ्या कडील आंबे पाहून गिऱ्हाईक नाक मुरडत पुढे निघून जात होते.
आई मला सतत बडबड करत होती.
तू जर बरोबर ओझे एकसारखे डोक्यावर आणले असते तर हे आंबे सुद्धा चांगल्या भावाने विकले गेले असते. माझी चूक मला कळली होती. आई बोलत असताना मी काही वेळा रडत होतो. परंतु माझे दुःख मी आईला सांगू शकत नव्हतो.
नंतर इकडचे तिकडचे करत आईने ते आंबे अर्ध्या भावात विकले.
आम्ही दोघे ही मायलेक भुकेने अगदीच व्याकुळ झालो होतो. आमच्या कडे घरचा सगळा बाजार येईल एवढे पैसे आले होते. बरोबर आम्ही घरातून भाकरी आणली होती.
अहमद शेठच्या हॉटेल मध्ये भुकेच्या भरात चार भाकरी मिसळ बरोबर कुठे फस्त झाल्या याचा पत्ताच लागला नाही.
मिसळ खाऊन आम्ही तृप्त होऊन बाहेर पडलो. पुढे जाऊन आईने चिमणभाईच्या दुकानात जाऊन सगळा बाजार केला. आणि तो बाजार आम्ही आल्या रस्त्याने परत गावाला घेऊन निघालो.
परंतु येताना पेक्षा घरी जातानाचा आनंद हा खूप मोठा होता. टिचभर पोटासाठी आपण आयुष्यात आज किती मेहनत करतो. पण त्याहीपेक्षा घरातील सगळीच माणसं रात्रदिवस अपार कष्टातून आपल्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने फुलवत असतात याची मला कल्पना आली.
गावाकडे शालेय जीवन जगत असताना अनेक ज्ञात, अज्ञात मोठ्या माणसांचे, गावकऱ्यांचे,आई वडिलांचे, नातेवाईकांचे आणि गुरुजनांचे संस्कार माझ्यावर घडले. अनेक जीवाचे जिवलग मित्र मिळाले. त्यांच्या या आशीर्वादानंमुळे आज मी जो काही आहे तो केवळ या लोकांनी केलेल्या संस्कारामुळे आणि त्यांचे आशीर्वादामुळे.
आज जरी शहरात नोकरी धंद्यानिमित्त असलो तरी अजूनही गावाला आणि भागाला विसरलेलो नाही. आज जरी सुखाचा घास खात असलो तरी शालेय जीवनातील बाजरीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा याची चव अजूनही जिभेवर रेंगळत आहे.
उन्हाळ्यात मित्रांबरोबर रानात जाणे, गुरे सांभाळणे, झाडाच्या कैऱ्या पाडून मिठाबरोबर खाणे, विहिरीवर मनमूराद पोहणे, पंचक्रोशीतील यात्रांना जाणे संध्याकाळी जेवण झाल्यावर काळ्याक भिन्न रात्री अंथरुणावर पडून आजीच्या गोष्टी ऐकणे यासारखा आविट आनंद मिळाल्याचे भाग्य मला लाभले की जे आजही विसरू शकत नाही.
आज मात्र खेडेगावांची परिस्थिती वेगळी आहे, पूर्वीचे दिवस आता राहिले नाहीत. माणसे सुद्धा अबोल झाली आहेत. अगदी दगड गोट्यासारखी. काळाचा महिमा दुसरं काय ?
लेखक :- बाळासाहेब मेदगे, औदर