रोज संध्याकाळी कुस्त्यांची खडाखडी झडू लागली. वेगवेगळे डाव,प्रति डाव आंबेकर गुरुजी शिकवू लागले. आणि याचाच परिणाम श्री कुशाबा आंबेकर,कै.शंकर हुरसाळे ड्रायव्हर,श्री हरिभाऊ हुरसाळे असे नामांकित मल्ल तयार झाले. त्यांनी एकेकाळी मंदोषी गावचे नाव तीनही तालुक्यात पोहचवले.
कुशाबा आंबेकर यांच्या कुस्तीच्या काळात मी खूप लहान असल्यामुळे असे काही आठवत नाही. परंतु हरिभाऊ हुरसाळे यांची कुस्ती मी अगदी सुरुवातीपासून ते शेवटच्या काळापर्यंत पाहिली.
सन 1985 ते सन 1992 दरम्यान कुस्तीच्या क्षेत्रात मंदोशी गावचे नाव गाजवले ते खऱ्या अर्थाने श्री हरिभाऊ हुरसाळे यांनी.
घरची अतिशय साधारण परिस्थिती.चटणी भाकरी,वरण-भात असा त्यावेळी हरिभाऊ चा आहार असायचा.
ओढ्यावर आंघोळ करायची.तेथेच जोर बैठका काढायच्या. शेतातील मांडवात झोपायचे.शेतीची कामे करायची. संध्याकाळी एकर गुरुजींच्या तालमीत डाव प्रतिडाव विकायचे.कोणताही वेगळा खुराक हरिभाऊ ला कधीच मिळाला नाही.
सन 1985 साली रेवड्यावर कुस्त्यांची सुरुवात करणारे श्री हरिभाऊ हा हा म्हणता नामांकित मल्ल म्हणून उदयास येऊ लागला.
हरिभाऊ कडे अनेक वेगवेगळे डाव होते. एकदा शेंदुर्लीच्या आखाड्यात कुस्त्यांची जोरदार रणधुमाळी चालू होती. आखाडा मद्यापर्यंतही गेला नव्हता.हरिभाऊला वीस रुपयावर धरण्यात आले. आणि लागलीच आंबोलीचा एक पैलवान हरिभाऊ वर उठून आला. या पैलवानाने आंबोलीच्या आखाड्यात त्या काळात पाच हजार रुपयांची कुस्ती निकाली केली होती. हे हरिभाऊला माहित होते.
हरिभाऊ त्याला म्हटला सुद्धा.
अरे बाबा, तू पाच हजार रुपयाची निकाली कुस्ती केली आहे. आणि खुशाल वीस रुपयांवर उठून आला आहेस. कशाला खेळतोस उगाच?
हे ऐकून त्या पैलवानाला चेव आला. तो म्हटला खेळायची आहे का बोल.?
हे ऐकून हरिभाऊ निरुत्तर झाला. शेवटी एकदाची कुस्ती लागली.
दोन्ही पैलवान आखाड्यात आले. देवाचे नाव घेऊन एकमेकांच्या हातात धूळ माती दिली. आणि खडाखडी ला सुरुवात झाली. आणि काय आश्चर्य.अर्ध्या मिनिटाच्या आत. हरिभाऊ ने गोफण मीठी घातली आणि लांग मारून दार मागे ढकलतात तसे आंबोलीच्या पैलवानाला ढकलले. एखादे धूड पैलवान आखाड्याच्या मैदानातील धुळीत धाडकन कोसळला. त्याला काही कळले सुद्धा नाही. आपण कसा पडलो.
क्षणार्धात प्रेक्षकांकडून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. म दोशीचे लोक नाचू लागले. बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पडला. वीस रुपयाच्या कुस्तीवर त्यावेळी हरिभाऊला नऊशे रुपये बक्षीस मिळाले होते.
हरिभाऊ हा मोठ्या मनाचा माणूस. हा त्या पडलेल्या पैलवानाजवळ जवळ गेला आणि त्याला म्हणाला. अरे बाबा मला तुझ्याशी कुस्ती खेळायची का नव्हती तर तू आंबोलीच्या आखाड्यात पाच हजार रुपयाची कुस्ती केली होती. किरकोळ 20 रुपयावर तू उठून आला होता. हे तुला शोभते का. तो पैलवान म्हणाला. मी कुस्ती खेळायला तयार नव्हतो. बाकीच्या मित्रांनी भारीस घातले. आणि सगळी इज्जत घालून बसलो. पुढे हरिभाऊ या पैलवानाच्या लग्नाला देखील गेला होता.
पुढे हरिभाऊ चे नाव खेड,आंबेगाव,मावळ या तीन ही तालुक्यात दुमदुमू लागले. शेवटची मानाची कुस्ती हे हरिभाऊ वर होऊ लागली.
एकदा शंकर ड्रायव्हर, हरिभाऊ, महादू मोहन व सुरेश आंबेकर हे अगदी सकाळीच बोरघरच्या ता. आंबेगाव आखाड्यासाठी पायी पायी निघाले. दहा वाजता निघालेले हेगडी दुपारी एक वाजता बोरकर ला पोहोचते. शंकर ड्रायव्हरच्या ओळखी होत्या. त्यामुळे तेथे चहापाणी झाला. गप्पा टप्पा झाल्या.
दुपारी आखाड्यास सुरुवात झाली. आखाडा अगदी भरात येऊ लागला. हळूहळू आखाड्याला रंग चढू लागला. त्या भागात हरिभाऊ सारखाच एक नामांकित पैलवान होता. कोकणेवाडी हे त्याचे गाव. हा पैलवान तिकडच्या भागातील सगळ्यांचा लाडका होता.
आणि अशा या परिस्थितीत हरिभाऊ या पैलवानावर उठून गेला. एकदाची कुस्ती जाहीर झाली. हरिभाऊ कपडे बदलण्यासाठी परत आला. दोन-तीन जण हरिभाऊ ला म्हणाले. कशाला गेला मारायला. बरगड्या मोडून घ्यायच्या आहेत का ?
हरिभाऊ ने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. एकदाचा जंग चढवला. काळभैरवनाथाचे नाव घेतले. आणि कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात सज्ज झाला.
समोरचा पहिला पैलवान ही तितक्याच ताकदीचा होता. सुरुवातीला खूपच खडाखडी झाली.एकमेकाच्या ताकदीचा अंदाज पाहण्यातच दोन मिनिटे गेली. त्यानंतर डाव प्रति डाव होऊ लागले. हरिभाऊ ने सर्व डाव वापरून पाहिले. परंतु यश काही येईना.
समोरच्या पैलवानाने ही त्याच्याकडचे डाव वापरून पाहिले. तोडिस होऊ लागली. याने डाव काढायचा. आणि त्याने तो डाव फोडायचा. त्याने डाव काढायचा आणि याने डाव तोडायचा.
आखाड्यात भयान शांतता पसरली होती. लोक कौतुकाने अशी ही नामांकित कुस्ती पाहत होते कुस्ती सोडवायची देखील गावच्या पंचांना आठवण झाली नाही. एवढी ही कुस्ती प्रेक्षणीय आणि रंगतदार होत चालली होती.
आणि अशातच हरिभाऊ ने समोरच्या पैलवानाच्या डाव्या पायाच्या कवळ्याला हात घातला व वर ओढला. आणि दुसऱ्या पायाने त्या पैलवानाच्या उजव्या पायाला टाप मारली. आणि हा हा म्हणता समोरचा पैलवान धाडकन उताणा झाला. हरिभाऊ ने समोरच्या पैलवानाला दिवसा चांदण्या मोजायला लावल्या.
आखाड्यात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. हरिभाऊ त्या तालुक्यात अगदी नवखा पहिल्यांदाच कुस्ती खेळण्यासाठी गेला असतानाही आंबेगावकरांनी अकराशे रुपयांची बक्षिसांची खैरात हरिभाऊ वर केली होती.
अनेक गावच्या आखाड्यातून हरिभाऊने चांदीच्या ढाली, चांदीच्या अंगठ्या, कोंबडे, बकरे,घड्याळ, स्वयंपाकाची भांडी रोख बक्षिसे, रोख इनाम अशी कितीतरी बक्षिसे मिळवली होती.
एकदा तर हरिभाऊ ने कमालच केली. राजपूरच्या आखाड्यात हरिभाऊने नऊ मनगटी घड्याळे एकाच वेळी जिंकली होती.
एकदा असेच हरिभाऊ, महादू मोहन व सुरेश आंबेकर हे आंबेगाव तालुक्यातील राजेवाडीच्या आखाड्यासाठी गेले होते. त्यावेळी हरिभाऊ ला 8 9 भांडी मिळाली होती. आखाडा फुटल्यावर हे सर्वजण डागोबाच्या मंदिरा कडून मंदोशी कडे रानातून खाली चालले होते.
जांभूळ दरडीच्या वर त्यांच्या मागे भूत लागले. सुरेश आंबेकर च्या डोक्यावर भांडी होती. तिघेही जण अक्षरशा पळत होते. एक मोठा दगड हरिभाऊ च्या दिशेने खाली आला. हरिभाऊला वाटले आता आपण या दगडाखाली जाणार परंतु काय आश्चर्य. हा दगड हरिभाऊ जवळ येऊन थांबला. अशा परिस्थितीत ते दम टाकायला.
श्री विष्णू रोकडे यांच्या घराजवळ आले. विष्णू रोकडे हे नुकतेच जेवण करून बसले होते. त्यांनी या सर्वांची अस्थेने चौकशी केली. सर्वांना पिण्यासाठी पाणी दिले. हरिभाऊने त्यांच्या घरातील सर्वांना रेवड्या दिल्या. आणि पुढे घरी आले.
हरिभाऊ च्या घराचे काम चालू होते. सुतारांनी दगड फोडायचे काम हाती घेतले होते. त्यादिवशी घोटवडीचा आखाडा होता. हरिभाऊ ला सुद्धा घोटवडीच्या आखाड्यासाठी जायचे होते. परंतु सुतार काही जाऊ देत नव्हते. त्यांचे एकच म्हणणं हा दगड फोडल्याशिवाय जायचं नाही.
शेवटी एकदाचा दगड फोडला गेला. त्यावेळी मंदोशीतच एक वाजले होते. आखाडा हाती लागतो की नाही. हे शंका हरिभाऊ ला भेडसावत होती. अगदी पळतच हरिभाऊ घोटवडीच्या आखाड्यासाठी निघाला होता.
पायी प्रवास करून अडीच वाजता हरिभाऊ घोटवडीला पोहोचला. तोपर्यंत महादू मोहन, सुरेश आंबेकर हे आधीच पोचले होते. कुस्त्यांचे इनाम वीस रुपयांवर गेले होते.
हळूहळू आखाड्याला रंग चढू लागला. आणि अखेर धंद्रीबुवानी एकदाची हरिभाऊ ची कुस्ती लावली. समोरचा पैलवान हा शंकर ड्रायव्हरचा होणारा साडू होता. हे हरिभाऊला माहीतच नव्हते. म्हणजेच साडू साडू मध्ये कुस्ती लागली होती. समोरचा पहिला नाही अगदीच नवखा नव्हता.
परंतु हाताला हात भिडवल्याबरोबर अगदी दहा सेकंदातच हरिभाऊ ने समोरच्या पैलवानावर पट भरला. आणि असा काही पैलवानाला उचलून खाली टाकला की त्या धुराळ्यातच पैलवान कुठल्या कुठे हरवला. आखाड्यात नुसताच धुराळा दिसू लागला. अरे खाली पडलेला पैलवान कुठाय?
लोक बोलू लागले. आंबेकर गुरुजी सुद्धा या आखाड्यासाठी आले होते. आपण शिक्षक आहोत हेच ते विसरले होते. आणि आखाड्यात अक्षरशः नाचत होते. कारण शेवटी आंबेकर गुरुजी हे हरिभाऊ चे गुरु होते.
आंबेकर गुरुजी व हरिभाऊच्या कर्तुत्वामुळे तीनही तालुक्यात मान सन्मान,प्रतिष्ठा, ईनाम, बक्षिसे मिळवून दिली.
सन 1992 रोजी हरिभाऊ चे लग्न झाल्यानंतर कुस्त्या खेळणे बंद केले. व एका नामांकित पैलवानाचा खेळ पाहण्यास लोक मुकले. आजही जुन्या आठवणी निघाल्या की हरिभाऊ च्या कुस्त्यांची आठवण नक्कीच येते. आणि मग जुन्या आठवणीत रममान होते.
कोणताही आखाडा झाल्यावर सर्व पैलवान मंडळी घरी आल्यावर जेवण खान झाल्यावर हुरसाळे वस्तीतील सर्व लोक गप्पा मारण्यासाठी आंबेकरांच्या अंगणात बसत असत.
तेथे कुस्त्यांच्या गप्पा चालत. पैलवान मंडळी सर्वांना रेवड्या वाटत. कुस्त्यांच्या गप्पा अगदी चवी चवीने चघळल्या जात. हास्यविनोद होत असत. परंतु काळ बदलला. पूर्वीसारखे आखाडेही आता होत नाहीत.आणि पूर्वीसारखे अंगणात बसून कोण गप्पाही मारत नाही.
रामदास तळपे.