स्वतंत्र पूर्व काळात खेडेगावांना अनन्य साधारण महत्त्व होते. भारतातले प्रत्येक खेडेगाव हे स्वयंपूर्ण होते. गावातल्या गरजा गावातच भागत असत. पूर्वीची समाज व्यवस्था अतिशय श्रेष्ठ व उत्तम दर्जाची होती.
गावागावांमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहायचे. व समाज व्यवस्थेने नेमून दिलेले काम चोख पार पडत असायचे. बलुतीदार पद्धत ही गावचा कणा होती.
प्रत्येक छोट्या गावात सुतार, लोहार, न्हावी, चांभार या समाजाचे लोक असायचेच. त्यांना मुख्य बलुतेदार म्हणायचे. परंतु गावे जर मोठी असतील तर त्यामध्ये पाणभरी कोळी, तेली, तांबोळी, कुंभार,महार, परीट, गुरव व मातंग असे विविध समाजाचे लोक राहत असत. त्यांनाच बारा बलुतेदार असेही म्हणत असत.
शिवाय गावामध्ये कोष्टी, साळी, वाणी, असे अनेक जाती-धर्माचे लोक राहत असत.
बलुतेदारी पद्धत:
बलुतेदारी पद्धत ही एक प्रकारची वस्तुविनिमय प्रणाली होती. यात, बलुतेदार त्यांची कामे करत असत आणि त्या बदल्यात त्यांना शेतकरी धान्याच्या किंवा इतर वस्तूंच्या स्वरूपात मोबदला देत असत. यालाच बलूतेदारीं पद्धत असे म्हटले जाते.
बलुतेदारीचे महत्त्व:
बलुतेदारी पद्धत, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग होती. यामुळे, प्रत्येक व्यक्तीला त्यांची गरज भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवा मिळत होत्या. व गावातल्या गरजा गावातच भागवल्या जात होत्या. प्रत्येक गाव हे स्वयंपूर्ण होते.
या बलुतेदारांमध्ये उच्च जाती सुद्धा अस्तित्वात होत्या. त्यापैकी सुतार आणि सोनार या जाती ब्राह्मणांच्या खालोखाल समजल्या जात असत.ब्रह्मणा नंतर कोण श्रेष्ठ यावरून सोनार आणि सुतारांच्या लढाया झाल्याची उदाहरणे आहेत.
परंतु 1857 मध्ये इंग्रजांचा भारतामध्ये प्रवेश झाला. त्यावेळी अनेक शोध लागत होते. त्यातच इंग्रजांनी भारतात नवनवीन कारखाने सुरू केले. त्यामुळे कामगारांची मोठ्या प्रमाणात बचत झाली.
कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात वस्तू विक्रीला उपलब्ध झाल्या. घाऊक स्वरूपात माल उपलब्ध होऊ लागला. इंग्रज सरकारने नवनवीन नाणी आणि नोटा चलनात आणल्या. त्यामुळे
धान्या ऐवजी पैशाला महत्त्व आले. लोक पैसे देऊन वस्तू विकत घेऊ लागले.
कारखान्यामुळे अनेक व्यवसाय, धंदे बंद पडत चालले. ग्रामीण भागातील बलुतेदार पद्धत ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली व्यवस्था मोडून पडली. अनेक लोक बेरोजगार झाले.
परंतु तरीही अजून काही गावागावांमध्ये बलुतेदारी ही पद्धत अजूनही टिकून आहे हे ही विशेष.
सुतार:
गावात सर्वात जास्त महत्त्व हे जर कुणाला असेल तर ते सुतारांना होते. प्रत्येक गावात शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात होता. आणि या शेतकऱ्यांचा आणि सुतारांचा सर्वात जास्त संपर्क असायचा. तो म्हणजे शेतकऱ्यांची हत्यारे तयार करणे आणि त्यांची दुरुस्ती करणे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना पाभार, कुळव, नांगर, रुमणे, जुगाड, इत्यादी सर्व प्रकारच्या साहित्यांची गरज भासत असे हया सर्व गरजा सुतार पुरवत असत. म्हणून सुतारांना सर्वात जास्त बलूते मिळत असे. हे बलुते धान्य स्वरूपात मिळत असे.
गावच्या लोकसंख्येनुसार धान्यरूपी बलुते मिळत असल्यामुळे सुतार लोक गरजेपुरते धान्य ठेवून उर्वरित धान्य मोठ्या गावातील बाजारपेठेत विकत असत. त्यामुळे त्यांच्याकडे नगदी पैसे सुद्धा उपलब्ध असतात.
गावोगावी अनेक सुतारांना जमिनी होत्या. काही सुतार हे जमीनदार सुद्धा होते. अजूनही काही गावात सुतारांना जमिनी आहेत. या जमिनी त्यांनी सांप्रतच्या काळात विकत घेतलेले होत्या.
शेतकऱ्यांचे अवजारे दुरुस्तीचे काम झाल्यानंतर सुतारांकडे वेळच वेळ असे. त्यावेळी ते नवीन घराचे लाकडी काम, मंदिरांचे लाकडी काम, खटार गाड्या तयार करणे, विविध कला कसुरीच्या वस्तू तयार करणे, लाकडी पेटी, टेबल खुर्च्या, लाकडी कपाट, भिंतीमधील अलमारी, हांडे ठेवायची घडवंची, भांडी ठेवण्याची मांडणी अशा इतरही वस्तू ते बनवून त्याची ते स्वतंत्र मजुरी घेत असत. पूर्वी लोक विविध देवांच्या लाकडांच्या विशेषतः चंदनाच्या सुंदर आणि सुबक मूर्ती सुद्धा बनवत असत.
अनेक सुतार हे सावकारकी सुद्धा करत होते.
जगाची निर्मिती केलेल्या विश्वकर्माला ते आपला देव मानतात. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातील सर्व देवतांच्या ते पूजाअर्चा करतात. विठ्ठलाची ते निसिम भक्त आहेत.
सुतारांची हत्यारे :
सुतारांकडे करवत, वाकस, रंधा, किंकरी, पटाशी, हातोडा, गिरमिट इत्यादी हत्यारे असत.
ब्राह्मणांच्या नंतर सुतार हे सर्वश्रेष्ठ समजत असल्याने प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीच्या माळा असत. त्यावेळी ते कोणताही मांसाहार करत नसत. सुतार यांच्या अनेक उपजाती आहेत. त्यापैकी पांचाळ सुतार ही उपजात प्रसिद्ध आहे.
सुगीच्या दिवसात शेतकऱ्यांकडून सुताराला पोते भर भात व एक भाताचा भारा आणि रब्बी हंगामात जे कडधान्य पिकेल त्यापैकी शेर दोन शेर धान्य बलुते म्हणून द्यावे लागत असे.
सुतारांची घरे ही गावातील इतर घरांपेक्षा छोटी असत. त्यामुळे सुतारांची घरे चटकन ओळखता येत. सन 1970 पर्यंत सुतारांची लग्न घराच्या आड्याखाली होत असत. इतर सर्व प्रथा परंपरा या हिंदू धर्माप्रमाणेच सुरू होत्या.
न्हावी:
सुतारा नंतर बलुतेदारीमध्ये नंबर लागायचा तो न्हव्याचा. न्हावी हे गावातील लोकांचे हजामतीचे काम करत असत. त्याबद्दल त्यांना धान्यरूपात बलुती दिले जाई. सुतारा नंतर सर्वात जास्त बलुते हे न्हव्यांना दिले जात असे. सहा पायल्या भात व सुगीच्या हंगामात दोन शेर कडधान्य देण्यात येत असे.
त्याशिवाय त्यांना लहान मुलांचे जावळ काढणे व लग्नकार्यात नवरदेवाची चूच करणे (दाढी करणे) हा लग्न समारंभातील महत्त्वाचा धार्मिक विधी होता. यासाठी त्यांना पैसे रुपी विडा द्यावा लागत असे. हा विडा प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे असायचा.
शिवाय दशक्रियेच्या वेळी नदीवर भावकीची हजामत करावी लागायची.
त्यासाठी सुद्धा त्यांना पैसे रुपी विडा द्यावा लागायचा.
धोपटी व त्यातील साहित्य :
नाव्ह्याकडे एक चामड्ड्याची पिशवी असायची. त्या पिशवीला धोपटी असे म्हणत. या धोपटीमध्ये न्हाव्याचे साहित्य असायचे. वेगवेगळ्या दोन लोखंडी कात्री, वस्तरे, घोड्यांच्या केसापासून बनवलेला ब्रश, वस्तऱ्यांना धार लावायचा दगड, केसांना आणि दाढीला पाणी लावण्यासाठी छोटी वाटी, साबू, वेगवेगळे कंगावे, छोटा आरसा इत्यादी साहित्य असायचे.
अनेक न्हावी हे सांप्रतकाळात वतनदार देखील होते. इंग्रज काळात त्यांना गावागावांमधून जमिनी वतन म्हणून दिलेल्या होत्या. या जमिनींना नावठिका असे म्हणत. अजूनही काही गावात या जमिनींना नावठिका असेच म्हणले जाते.
त्यावेळी न्हावी देखील मिळालेले बलुते रुपी धान्य स्वतःसाठी ठेवून उर्वरित धान्य ते मोठ्या गावच्या बाजारपेठेत विकत असत. शिवाय त्यांच्याकडे त्यावेळी अनेक सुगंधित तेले असायची. केस काळे करण्याच्या मेहंदी असायची.
गावातील श्रीमंत लोकांसाठी ही सेवा पुरवावी लागे. त्याबद्दल त्यांना वेगळे पैसे द्यावे लागत असत. त्यामुळे न्हावी समाज हा देखील त्यावेळी बऱ्यापैकी श्रीमंत होता. काही न्हावी हे सावकारी देखील करत असत.
अनेकांकडे येण्या जाण्यासाठी घोडे असत. त्यावर बसून ते गावातील वाड्या वस्तीमध्ये हजामतीसाठी जात असत.
जीवा महाला :
शिवाजी महाराजांचे मावळे जिवा महाला व शिवा कशािद हे दोघेही न्हावी होते. छत्रपती शिवाजी महाराजानी प्रताप गडाच्या पायथ्याशी अफझलखानास मारल्यावर खानाच्या 'सय्यद बंडा' या रक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला.
तेव्हा जिवा महालाने दांडपट्टीच्या एका घावात सय्यद बंडाला यम सदनाला पाठवले. व छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले.
संत सेना महाराज न्हावी:
प्रसिद्ध संत सेना महाराज हे न्हावी होते. ते विठ्ठलाचे परमभक्त होते. त्याने अनेक 110 अभंग व गवळणी लिहिलेल्या आहेत. त्यापैकी खालील अभंग.
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
मुंबईस पहिले हेअर कटिंग सलून लोणकर व बडनेरकर यांनी काढले. नंदन कालेलकर हा लंडनला जाऊन केस कापण्याचे आधुनिक तंत्र शिकून आधी मुंबईत आणि मग पुण्यात सलून काढणारा पहिला 'न्हावी' होय.
चांभार :
न्हाव्या नंतर बलुतेदारांमध्ये तिसरा नंबर हा चांभाराचा असे. चांभाराला गावातील लोकांची पायताणे दुरुस्त करण्याचे काम करावे लागे. यामध्ये वहाणा, चेपल्या, बुट इत्यादी दुरुस्ती करण्याचे काम करावे लागे.चांभाराकडे आरी, रापी, वहणा शिवायचा दाभन, चामड्याचा दोरा, कमावलेले चामडे, छोट्या चुका, वाहनाचे चामडे नरम करण्यासाठी ते पाण्यात ठेवावे लागे. त्यासाठी पाणी साठवण्याचे लाकडी छोटे कुंड, लोखंडी स्टॅन्ड इत्यादी साहित्य चांभाराकडे असायचे.
चांभाराचेही वार ठरलेले असायचे. त्या विशिष्ट वारी येऊन पायताणांची दुरुस्ती होत असे.
यासाठी चांभाराला न्हाव्याच्या खालोखाल चार पायली धान्य व सुगीच्या वेळी पसाभर कडधान्य बलुते म्हणून दिले जाई.
शेतकऱ्यांच्या बैलांना बडवण्याचे काम सुद्धा चांभाराला करावे लागे. शिवाय जनावरांच्या पायाच्या खुरातील काटे सुद्धा चांभार काढत असे. त्यासाठी मात्र त्याला काही पैसे द्यावे लागत असत.
काही चांभार लोक नवीन चपला तयार करून ते रोख पैसे घेऊन विकत असत.
संत रोहिदास हे त्यांच्या समाजातील संत विठ्ठलाचे निसिम भक्त होते. त्यांचे अनेक अभंग आजही प्रसिद्ध आहेत.
लोहार :
गावामध्ये लोहराचे एक घर असायचे. त्याच्या दारात मोठा चामड्याचा भाता असायचा. पुढे एक दांडा असायचा. हा दांडा हलवल्यावर भात्याच्या चुली जवळील नळीमधून हवा बाहेर पडायची. व तेथे ठेवलेल्या कोळशा मधून ज्वाला बाहेर पडायच्या.
सुगीच्या दिवसापूर्वी गावातील शेतकऱ्यांच्या कोयते, विळे आणि कुऱ्हाडीना धार लावून देण्याची प्रमुख काम लोहाराला करावे लागत असे.
त्याचप्रमाणे शेतीच्या लोखंडी साखळीला जोड लावून देणे, खटार गाडीच्या धावा बसवून देणे, टिकाव, फावडे, पहारी, कुडावने शेवटण्याचे काम लोहाराला करावे लागत असे.
सुगीच्या दिवसापूर्वी लोहाराच्या दारात शेतकऱ्यांची खूपच वर्दळ असायची.
लोहाराला सुद्धा चार पायली धान्य आणि शेरभर कडधान्य बलुते म्हणून देण्याची पद्धत होती.
खटार गाडीच्या धावा बसवण्याचे काम, तसेच नवीन विळे, कोयते, कुऱ्हाडी बनवून तो स्वतंत्र पैसे घेऊन विकत असे.
लोहार समाजाने भारतीय संस्कृतीत नेहमीच एक महत्त्वाचा घटक म्हणून काम केले आहे. त्यांनी समाजाला आवश्यक असलेल्या अनेक वस्तू तयार केल्या आहेत. भाता,ऐरण, घन, हातोडी, सांडशी, टाकी, छन्नी अशी हत्यारे असायची.
लोहार समाजाने बनवलेल्या वस्तू: विळे, कोयते, कुदळी, पहारी, भांडी, दरवाजे, खिडक्या, इत्यादी.
लोहारांचा सुद्धा देव विश्वकर्माच मानला जातो.
पोटजाती:
लोहार समाजात अनेक पोटजाती आहेत, जसे की गाडी लोहार, पांचाळ, नालबंदी, घिसाडी.
लोहार समाजापुढील आव्हाने:
लोहार समाज महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेला आहे, विशेषतः ग्रामीण भागात.
आधुनिक काळात औद्योगिकीकरणामुळे लोहार समाजाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अनेकजण आता हा व्यवसाय सोडून इतर कामे करत आहेत.
संरक्षण:
लोहार समाजाला त्यांच्या परंपरागत व्यवसायासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मोठमोठ्या गावांमध्ये मात्र परिस्थिती वेगळी असे. तिथे अनेक जमीनदार, श्रीमंत लोक राहायचे. त्यामुळे त्यांना सेवा देण्याची गरज भासायची. त्यासाठी अजून काही बलुतेदार मोठ्या गावांमध्ये असायचे.
कुंभार:
कुंभार समाज फार प्राचीन काळापासून आहे. ऋग्वेदातही त्यांचा उल्लेख आढळतो. अगदी सिंधू संस्कृतीमध्ये अनेक गाडगी, मडकी सापडली. ती कुंभारानीच बनवली होती. याचा अर्थ कुंभार ही जमात किती जुनी आहे याचा बोध होतो.
कुंभार हे सुद्धा 12 बलुतेदारंपैकी एक होते. वर्षाकाठी ते गावातील लोकांना गाडगी, मडकी, संक्रातीची सुगड, बैलपोळ्याला मातीचे बैल,चुली इत्यादी सेवा पुरवत असत. त्याबद्दल त्यांना बलूते म्हणून धान्य देण्याची प्रथा होती.
त्यावेळी गावागावांमध्ये मोठमोठ्या पाणपोई असत. या पाणपोई म्हणजेच मोठमोठे रांजण. हे रांजण गावातील चौकात चौथर्यावर घट्ट पुरलेले असत. गावात येणारे अनोळखी लोक ऐपतीप्रमाणे त्यात नाणी टाकून पाणपोईचे पाणी पीत असत. हे रांजण सुद्धा कुंभारांना पुरवावे लागत.
प्रत्येक मोठया गावामध्ये कुंभार अळी असे. प्रत्येक कुंभाराकडे अनेक गाढवे असत. या गाढवावरून माती वाहण्याचे प्रमुख काम करावे लागे. त्या मातीपासून ते वेगवेगळ्या मातीच्या वस्तू बनवत असत.
त्यावेळी काही गावांमध्ये रस्ते नसत. त्यामुळे बाजाराचे साहित्य गावातील बाजारपेठेपर्यंत आणण्याचे काम कुंभाराची गाढवे करत असत. त्याबद्दल कुंभारांना मजुरी मिळे. शिवाय अनेक कुंभारांच्या वीटभट्टी असत.
त्या वेळच्या विटा ह्या खूपच लहान होत्या. परंतु अद्यापही या विटांचे बांधकाम मजबूत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
अनेक कुंभारांकडे इमारतींसाठी चुना बनवण्याचे घाणे होते. गावाच्या बाहेर हे दगडी घाणे असतात. यामध्ये विशिष्ट प्रकारची वाळू भरडून बारीक करावी लागे. व त्यापासून चुना निघत असे. हा चुना अतिशय पक्का असा होता. अजूनही आपल्याला चुन्याच्या भिंती पाहायला मिळतात.
या चुन्याचा उपयोग इमारती, शेताचे बांध, पाण्यावरच्या मोटांचे थारोळे, विहिरी, इंग्रज काळातील रस्त्यावरील पूल इत्यादींसाठी हा चुना वापरत असत.
त्यावेळी अनेक कुणबी लोक भाद्रपद चतुर्थीला गणपती बसवत. या गणपतीच्या मूर्ती पुरवण्याचे काम सुद्धा कुंभारांना करावे लागे. परंतु त्यावेळी गणपतींना रंग काम करण्याची पद्धत नव्हती. फक्त मूर्ती बनवून त्याची पूजा होत असे. हे गणपती वितभर इतक्या उंचीचे असत.
त्यामुळे बलुतेदारांमध्ये कुंभार सुद्धा बऱ्यापैकी सधन होते.
पोट जाती:
कुंभार समाजात खुंटकटी आणि प्रजापती अशा दोन मुख्य पोटजाती आहेत.
देवता:
कुंभार समाजाच्या काही प्रमुख देवतांमध्ये पांचानेपीर, भवानी, सांगई, सीतला, आणि हर्दिया यांचा समावेश होतो.
संत:
संत गोरा कुंभार हे कुंभार समाजातील एक महत्वाचे संत मानले जातात. ते वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते.
कुंभाराचे लाकडी चाक आपणा सर्वांना माहीतच असेल या चाकावरच कुंभार मातीच्या गोळ्याला विविध आकार देऊन वस्तू बनवत असे.
तेली:
गावातील ह्या तेल्याकडे मोठ्या दगडातील गोल गरगरीत असा दगडी घाणा असायचा. त्या घाण्याच्या कडेकडेने सहा इंच खोल व सहा इंच लांब असा गोल पाट असायचा. त्यावर मोठी दगडी तळी असायची. या पाटामध्ये शेंगदाणे, खुरासनी, सूर्यफुलाच्या बिया, किंवा इतर तेलबिया ठेवून ही दगडाची तळी बैलाच्या सहाय्याने सतत फिरवायची. सतत तळी फिरवल्याने या बिया मधून तेल बाहेर पडायचे.
प्रत्येक शेतकऱ्यांकडे त्यावेळी भुईमूग, खुरसणी, सूर्यफूल, इत्यादी तेलबियाची शेती केली जात असे. त्यामुळे तेली लोकांना वर्षाकाठी धान्यरूपाने बलुते मिळायचे. शिवाय तेल बियांचा हा चोथा तेली लोक पेंड म्हणून विकत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे मिळत असत.
सामाजिक रचना:
तेली समाजात विविध सामाजिक आणि धार्मिक परंपरा आहेत.
संघटना:
तिळवण तेली समाजाच्या पुणे, अकोला आणि इतर ठिकाणी सामाजिक संघटना आहेत. या संघटना समाजाच्या हितसंबंधांचे रक्षण करतात आणि विविध कार्यक्रम, वधू वर मेळावे इत्यादी आयोजित करतात,
विवाह:
तिळवण तेली समाज विवाह आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करतो. ते विवाह जुळवण्यासाठी वधू-वर मेळावे आयोजित करतात.
संत परंपरा:
या समाजात संत कबीर आणि संत संताजी जगनाडे महाराज यांचा प्रभाव आहे.
महापुरुष:
महाराणा प्रताप आणि भामाशाह यांना ते आपले महापुरुष मानतात.
भगवान श्री शनेश्वराची तेली समाज पूजा अर्चा करतात. आजही अनेक मंदिरामध्ये तेली समाज हाच श्री शनेश्वराचा पुजारी आहे.
तांबोळी:
त्यावेळी मोठमोठ्या गावांमध्ये तांबोळी ही जमात सुद्धा बलुतेदार म्हणून अस्तित्वात होती.
त्यावेळी अनेक धार्मिक सण, वृत्तवैकल्य, पूजा, उत्सव, यात्रा, चतुर्मास इत्यादी धार्मिक कार्यासाठी नागिलींच्या पानांची मोठ्या प्रमाणात गरज भासायची. त्याचप्रमाणे अनेक सण समारंभात, लग्नकार्यांत विड्याची पाने खाण्याची प्रथा होती.
त्यासाठी विड्याची पाणी पुरवण्याचे काम हे तांबोळी यांना करावे लागत असे.
यासाठी त्यांना वर्षभरातून एकदा धान्यरूपाने बलुते द्यावे लागत असे.
मोठ्या गावांमध्ये तांबोळी समाजाच्या पानपट्टी देखील असायच्या. शिवाय ते धार्मिक कार्यात, लग्नकार्यात, यात्रा जत्रांमध्ये ताशा वाजवण्याचे काम करत असत. त्यासाठी त्यांना ठराविक पैसे मिळत असत.
तांबोळी समाज हा हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजात पाहायला मिळतो.
पाणभरी कोळी:
पानभरी कोळी हे लोक मोठ्या गावांमध्ये असत. त्यावेळी चौका चौकात अनेक पानपोई असत. या पानपोई मध्ये दररोज ताजे पाणी भरून ठेवण्याचे काम पानभरी कोळी यांना करावे लागे.
शिवाय लग्न कार्यामध्ये संपूर्ण लग्न होईपर्यंत ज्या घरात लग्न आहे तिथे पाणी भरण्याचे काम हे पाणभरी कोळी यांना करावे लागे.
यासाठी वर्षाकाठी त्यांना धान्य स्वरूपात बलुते द्यावी लागत असे.
प्रसिद्ध लोकप्रिय मराठी अभिनेते दादा कोंडके हे याच समाजाचे. ज्यांनी दीर्घकाळ महाराष्ट्र हास्यसागरात बुडवला.
गुरव:
त्या काळात अनेक गावागावांमध्ये शंकरांची मंदिरे होती. शंकराची दररोज पूजा अर्चा करण्याचे काम गुरुवाना करावे लागे. त्याचप्रमाणे मंदिराची संपूर्ण देखभाल करण्याची जबाबदारी ही सुद्धा गुरवाची होती.
त्याचप्रमाणे लग्नकार्यात आलेल्या वऱ्हाडी लोकांसाठी किंवा इतर धार्मिक कार्यक्रमासाठी पानांच्या पत्रावळी तयार करण्याचे काम सुद्धा गुरुवाना करावे लागत असे. त्यासाठी पहाटे उठून रानात जाऊन त्यांना पळसाची, वडाची, किंवा चांद्याची पाने तोडून आणावी लागत असत.
संध्याकाळी लवकर जेवण उरकून गुरवांचे सर्व कुटुंब पत्रावळी तयार करण्यासाठी बसलेले असे.
गुरुवांना सुद्धा अनेक गावागावांमध्ये इंग्रज काळात जमिनी दिलेल्या होत्या. त्यामुळे अनेक गुरव हे शेती सुद्धा करायचे, जनावरे पाळायचे. काही गुरव हे सावकार देखील होते.
संत काशिबा महाराज आराध्य दैवत :
संत श्रेष्ठ काशीबा महाराज गुरव हे गुरव समाजाचे आराध्य दैवत असून काशीबा महाराजांना ते आराध्य दैवत मानतात.
भगवान शंकराचे पुजारी म्हणून गुरव समाजाला मान आहे. शंकराची पूजा गुरुवानीच करावी असे वेदांमध्ये सांगितले आहे.
अनेक गुरव समाजातील लोक गावातील नाटकांमध्ये भाग घेत असत.
महार : (बाबासाहेबांनी धम्मदीक्षा देण्याच्या पूर्वीचे)
पूर्वी प्रत्येक गावात महार समाजाचे लोक राहत असत. ते गावात जर कुणाचा मृत्यू झाला तर त्या माणसाच्या नातेवाईकांना सांगावा देण्याचे काम करत असत.
त्याचप्रमाणे गावातील मेलेले जनावर दूर ओढून नेण्याचे काम ते करत असत.
त्यावेळी हा समाज खूपच उपेक्षित होता.
त्यांना सुद्धा वर्षाकाठी बलूते देण्याची पद्धत होती.
त्यांच्याकडे शेती असल्यामुळे ते शेती करत असत. बैल, म्हशी गाय, गुरे पाळत असत. त्यांना इंग्रज काळात इंग्रजांनी शेतजमिनी सुद्धा दिलेल्या होत्या. त्याला महार वतन, हडकी हाडवळा असे म्हटले जाई.
परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध दीक्षा दिल्याने त्यांनी नवबौद्ध हा धर्म स्वीकारला. आणि हे सर्व बंद केले. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यात सामाजिक सुधारणा झाल्या.
अजूनही उपेक्षित असलेल्या समाजावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कृपा छत्र आढळ आहे. धम्म परिवर्तन करणारे व उपेक्षितांना समाजाच्या बरोबरीने वागायला भाग पाडणारे आंबेडकर हे परमेश्वरच मानले जातात.
मातंग :
त्याशिवाय चर्मकार समाजातील लोकांना मदत करण्याचे काम देखील ते करत असत.
दर महिन्याच्या अमावस्येला त्यांच्या स्त्रिया गावातील घराघरांमध्ये येऊन ताजे अन्न घेऊन जात असत. ही एक धार्मिक प्रथा होती.
त्याशिवाय दसरा आणि दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी प्रत्येक घराघरांमध्ये झाडू देण्याचे काम सुद्धा हे लोक करत असत. त्याबद्दल त्यांना वर्षाकाठी धान्य स्वरूपात बलुते द्यावे लागत असे.
प्रसिद्ध ग्रामीण कथाकार आणि समाज सुधारक प्रसिद्ध शाहीर असे अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे होते. परंतु त्यांनी संपूर्ण वंचित असलेल्या समाजासाठी लढा दिला. आणि वंचित समाज प्रसिद्धीच्या झोतात आणला.
महाराष्ट्र शासनाने त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अण्णाभाऊ साठे महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा एक अंगीकृत उपक्रम आहे. ज्यामध्ये वंचित समाजाला योजनेचा लाभ मिळतो.
त्याशिवाय ते तमाशामध्ये हलगी किंवा डफ वाजवण्याचे काम सुद्धा करत असत
प्रसिद्ध अभिनेत्री उषा चव्हाण या मातंग समाजाच्या आहेत.
परीट :
बलुतेदारां पैकी एक आहे. एकूण बलुते दारांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाच्या बलुते दारांत गणला जातो. ह्या समाजात खंडोबा, मरीआई, येडाबाई, भवानी देवी, भैरोबा, म्हसोबा या दैवतांची पूजा मोठ्या प्रमाणात होते.
परीट हा एक मेहनती बलुतेदार आहे. त्याला वर्षभर काम असायचे. परीट समाज हा आक्रमक क्षत्रिय लढवय्या व रांगडा समाज आहे.
कुस्ती खेळण्यात हा समाज पटाईत होता. धोबीपछाड हा डाव परटानीच शोधला आहे.
घरोघरीचे कपडे गोळा करून त्यांवर बिब्याच्या तेलाने खुणा करून आणि ते धुऊन, इस्त्री करून घरोघर पोचवणे हे परटाचे काम.
विशेषतः कुणब्यांच्या व गावातील इतर लोकांचे घरी, लग्नाच्या व सोयर सुतकाच्या वेळी कपडे धुण्याचे व कपड्यांना इस्त्री करण्याचे काम परीट करीत असे. यासोबतच लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चांदवा (चादरी) धरणे, विहिणींसमोर पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा परटाकडे होती.
संत शिरोमणी स्वच्छतेचे दूत म्हणजेच संत गाडगेबाबा हे परीट समाजाचे होते.
परीट समाजातील मराठी चित्रपट कलाकार:
संध्या शांताराम:
संध्या हया एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या पत्नी होत्या. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा झनक झनक पायल बाजे, पिंजरा येथे चित्रपट प्रसिद्ध आहेत.
सई लोकूर:
सई लोकूर हया एक अभिनेत्री आणि मॉडेल आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तेजस्विनी सरकार:
त्या एक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सायली संजीव:
त्या एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे, आणि त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत.
याशिवाय, अनेक कलाकार या समाजातले आहेत, जे चित्रपटांमध्ये काम करतात, पण त्यांची ओळख परीट समाजातील कलाकार म्हणून फारशी समोर येत नाही.
शहरीकरण आणि यांत्रिक धुलाईच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक परीट व्यवसायावर परिणाम झाला आहे, पण तरीही समाज नवीन बदल स्वीकारून पुढे वाटचाल करत आहे
याशिवाय सोनार, कोष्टी, साळी, रंगारी, जोशी, पटवारी यांनाही बलूते दार म्हणून समजले जात होते. परंतु ते तितकेसे खरे नाही.
बलुतेदारी ही प्रथा भारतीय ग्राम संस्कृतीचा आदर्श कणा होती. त्या काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक प्रकारचे धान्य, फळभाज्या, पालेभाज्या पिकत असत. शेतकरी हे सर्व स्वतःसाठी ठेवून उर्वरित बलुतेदारांना देत असत. व त्या बदल्यात ते विविध प्रकारच्या सेवा त्यांच्याकडून घेत असत.
त्याचप्रमाणे बलूतेदारी करताना काही सेवा ह्या पैसे देऊन करायला लागत असत. त्यामुळे बलुतेदारी आणि पैसे असे दोनही पर्याय बलूतेदाराना उपलब्ध होते.
त्यामुळे दैनंदिन आयुष्य जगायला व चरितार्थ चालायला त्यामुळे मदत होत होती. असा उत्तम समन्वय भारतीय बलुतेदारी पद्धतीमध्ये असल्यामुळे अनेक गावे स्वयंपूर्ण अशी होती. गावातल्या गरजा गावातच भागल्या जात होत्या. सर्व समाजाशी एकमेकाविषयी आपुलकीचे संबंध होते. त्यामध्ये प्रेम, आपुलकी जिव्हाळा होता.
त्यामुळेच बलुतेदारी पद्धत ही शतकानुशतके टिकून राहिली. आजही काही ठिकाणी बलूते दारी पद्धती अस्तित्वात आहे.
लेखक:- रामदास तळपे.