आमच्या बैलांची गोष्ट. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आमच्या बैलांची गोष्ट. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आमच्या बैलांची गोष्ट

आज खेडे गावामध्ये ट्रॅक्टरला अनन्य साधारण महत्त्व आले आहे. शेतीची सर्व कामे आज ट्रॅक्टरने केले जातात. परंतु पूर्वी गावात प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल जोडी असायचीच. काही मोठ्या शेतकऱ्यांकडे तर चार चार बैल जोड्या असायच्या. 

त्यावेळी सर्व लोक शेतीवर अवलंबून असायचे. पुणे मुंबईला असलेले गावचे लोक सुद्धा अवनी, येटाळणी व इतर शेतीच्या कामासाठी मुद्दामहुन सुट्टी काढून गावाला यायचे. व गावच्या भावाला मदतीचा हात द्यायचे.  

त्यावेळी प्रत्येक कुटुंबाकडे बैल जोडी असायची आणि ज्याच्याकडे नसायची त्या कुटुंबाला आपल्याकडे काही नसले तरी चालेल परंतु बैल जोडी असायलाच पाहिजे. हे त्यावेळी प्रत्येकाचे स्वप्न होते. 

पूर्वी गावामध्ये प्रत्येकाकडे आठ-दहा गावठी गाया असायच्या. बैल असायचे. काही काही लोकांकडे तर पंधरा-वीस गायी असायच्या. गावात जनावर नाही असा एकही माणूस आढळत नव्हता.

आमच्याकडे देखील पूर्वी बैल जोडी नव्हती. आपल्या घरी बैल जोडी असायला पाहिजे हे आमच्या नानाचे स्वप्न होते. परंतु घरी 18 विश्व दारिद्र्य असल्यामुळे बैल जोडी घेता येत नव्हती. त्यावेळी माझी आजी आणि माझा चुलता धोंडू तळपे हे बैल नसल्यामुळे कुडवण्याने शेती करायचे.

सन 1973 च्या जानेवारी महिन्यात माझे वडील शिक्षक म्हणून रुजू झाले. आणि हळूहळू घरच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत चालली. प्रथम आपल्याला शेतीसाठी बैल पाहिजेत या विचाराने वडिलांनी आमच्या गावातीलच श्री विष्णू गोमा तळपे यांच्याकडून राजा नावाचा गोऱ्हा विकत घेतला. हा राजा बैल पावणे सहाशे रुपयाला विकत घेतला होता.

विष्णू गोमा तळपे  यांना बैलांची मोठी हौस होती व अजूनही आहे. त्यांच्या गाईला गोऱ्हा झाला की विष्णू तळपे यांना खूप आनंद होत असे. मग ते त्या वासराची खूप काळजी घेत. नेहमीच ते जनावरां साठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करत. ऐन उन्हाळ्यात जेव्हा हिरवा चारा वाळून जाई तेव्हा ते अगदी कडे कपारीतून जिथे हिरवे गवत आहे तिथून ते आपल्या जनावरांसाठी आणत असत. उन्हाळ्यात देखील हिरवे गवत पाहून लोक चकित होत.

वासरू थोडे मोठे झाल्यावर त्यांची मुले दगडू दादा, धोंडू व मारती त्या गोऱ्ह्याला दुसऱ्या बैलाबरोबर कढवानाला जुंपत असत. कडवानावर थोडा जड दगड ठेवला जाई. सुरुवातीला गोऱ्हा इकडे तिकडे पळण्याचा खूप प्रयत्न करायचा. कढवान व दगड उलटे पालटे व्हायचे. कधी कधी हाता पायाला मार लागायचा. परंतु बैलाला शिकवायची प्रतिज्ञाच या तिघांनी केलेली असायची. 

दररोज दुपारनंतर या तिघांचे बैलाला शिकवण्याचे काम सुरू होत असे.  

तर आमच्या वडिलांनी विष्णू गोमा तळपे यांच्याकडून राजा हा गोऱ्हा विकत घेतला होता. त्यावेळी मंचर येथे बैलांचा मोठा बाजार भरत असे. मंचर येथे जाऊन वडिलांनी व नानांनी पारा नावाचा बैल विकत आणला. हा बैल आठशे रुपयाला आणला होता. या बैलाला आम्ही पाखऱ्या असे म्हणत असू.

राजा आणि पाखऱ्या या बैलांची जोडी काही जमली नाही कारण राजा हा गोऱ्हा होता तर पाखऱ्या हा मोठा बैल. त्यामुळे शेतीची नांगरणी करताना अडचण येत असे. मग आमच्या वडिलांनी आणि नानांनी राजा बैल म्हसा येथे रुपये 600 ला विकला.

नवीन बैल घेण्यासाठी खूप प्रयत्न करूनही बैल मिळाला नाही. त्यामुळे मग वडिलांनी आमचे आजोबा (आईचे वडील) लुमा ठोकळ यांच्याकडून हिरा नावाचा बैल विकत घेतला. हिरा व पाखऱ्या या बैलांची जोडी छान जमली. परंतु पुढे प्रॉब्लेम असा झाला की हिरा बैलाचा पुढचा पाय आपोआपच सांध्यातून निखळत असे. व थोडे प्रयत्न केल्यावर तो परत बसायचा.

दुसऱ्याच वर्षी वडिलांनी व नानाने ही बैल जोडी विकण्याचे ठरवले. त्यावेळी बैलांना खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था केली व बैल तयार केले. म्हशाच्या बैल बाजाराला बैल घेऊन जायच्या आधी मंचर वरून आठशे रुपयाला आणलेला पाखऱ्या बैल आमच्याच गावातील चिंधु धोंडू तळपे व सिताराम दुलाजी तळपे यांनी तेराशे रुपयाला विकत घेतला. व म्हसा येथे सोळाशे रुपयाला विकला. 

गावातच बैल विकला गेल्यामुळे दुसरा बैल विकण्याचे रद्द केले व त्यालाच दुसरा जोडी बैल घेण्याचे ठरवले. डेहणे येथे  धोंडीभाऊ सुतार हे बैल विकणार आहेत हे कळल्यावर आमच्या वडिलांनी त्यांच्याकडून थैमण्या या नावाचा बैल विकत आणला. थैमण्या हा माझा अत्यंत आवडता बैल होता. थैमण्या हा रंगाने काळा होता आणि ठिकठिकाणी पांढरे मोठमोठे ठिपके त्यावर होते.

थैमण्या हा खूपच गरीब बैल होता. मी त्याच्या पोटाखालून जात येत असे. परंतु हा बैल खूपच वयस्कर होता. त्यामुळे पुढच्या वर्षी हे दोन्ही बैल विकण्यात आले.

थैमण्या हा म्हसा येथे अठराशे रुपयाला विकला. आणि दुसरा बैल हिरा हा शिरगावच्या किसन लांघी कोतवाल यांना 1200 रुपयाला विकला.

दोन्ही बैल विकल्यामुळे बैल जोडी विकत घेणे अतिशय आवश्यक होते.

त्यानंतर आमच्या वडिलांनी आणि नानाने म्हसा येथून नारायण जठार धुओली यांच्याकडून बैल जोडी विकत घेतली. एका बैलाचे नाव गुलब्या तर दुसऱ्या बैलाचे नाव पैठण्या असे होते. हे दोन्ही बैल तांबूस रंगाचे होते. त्यातील गुलब्या हा बैल लहान मुलांवर धावत असे. तर पैठण्या हा अतिशय गरीब बैल होता.

ही बैल जोडी आमच्या नानाने जवळजवळ दोन-तीन वर्ष वापरली. परंतु गुलब्या बैल हा लहान मुलावर धावत असल्यामुळे गुलब्या बैल विकण्याचा निर्णय घेतला. व म्हशाच्या यात्रेमध्ये हा बैल विकला.

त्यानंतर आमच्या वडिलांनी गावातीलच मोतीराम मोहन यांच्याकडून हौशा नावाचा बैल विकत घेतला. हा बैल रंगाने काळा होता.

ही बैल जोडी सुद्धा आमच्या नानाने जवळजवळ दोन वर्ष वापरली. त्यानंतर हे दोन्ही बैल म्हशाच्या बाजारात विकण्यात आले. 

आणि मग म्हशाच्या बाजारातूनच पंधराशे रुपयाला बबन्या नावाचा बैल विकत घेतला. व दुसरा पुतळा नावाचा बैल वांजळे गावच्या लक्ष्मण सोळसे यांच्याकडून सोळाशे रुपयाला विकत घेतला. आमच्या गोठ्यात ही बैलजोडी दीर्घकाळ राहिली. बबन्या बैलावर आमच्या घरातील सगळेच खूप प्रेम करायचे. बबन्या बैलाला देखील घरच्या माणसांचा खूपच लळा लागला होता.

आमच्या घराचे वेगळी झाल्यानंतर पुतळा बैल आमच्याकडे आला व बबन्या बैल आमच्या नानाकडे गेला पुढे काही दिवसांनी आमच्या नानांनी हा बैल म्हसा येथील बाजारात तीन हजार रुपयाला विकला. त्यावेळी सर्वात जास्त दुःख आम्हाला झाले होते.

बबन्या व पुतळा ही बैल जोडी सुद्धा खूप वर्ष आमच्याकडे होती. पुतळा बैल विकून डेहणे येथील श्री नामदेव कशाळे यांच्याकडून पक्षा नावाचा बैल एकवीसशे रुपयाला विकत घेतला. ही आमची शेवटचीच बैल जोडी असावी.

त्यानंतर वडिलांनी डेहणे येथील हरिश्चंद्र कोरडे यांच्याकडून मच्या आणि जेल्या नावाचे दोन खिल्लारी बैल ( गाड्याचे) केवळ हौसे खातर विकत घेतले होते. ते केवळ गाड्याचे बैल होते. सन 1989 साली माझ्या नानाने आमच्या चुलत भावाच्या (गोटयाभाई) लग्नाला खटार गाडीला हे बैल जुपले. व त्यामध्ये लग्नाचे नवरदेवा सह वऱ्हाड बसवले. शिरगावच्या खिंडीमध्ये वऱ्हाड गेल्यावर बैल जे उधळले की ज्याला म्हणतात ते.

खटार गाडी मधील सर्व वऱ्हाडाच्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी खटार गाडीतून उड्या मारल्या. व आपला जीव वाचवला. नंतर ही खटार गाडी सटवाई मंदिराच्या पुढे जाऊन लोकांनी पकडली.

त्यानंतर मच्या हा बैल आमच्याच गावातील गंगाराम हुरसाळे यांना विकला व जेल्या बैल आमच्याच गावातील जयराम आंबेकर गुरुजी यांना विकला.

सन 1992 रोजी वडिलांचे निधन झाल्यावर परत मात्र कधीही बैल घेतले नाही किंवा घेण्याचा प्रसंग आला नाही.

वेगळे झाल्यावर आमच्या नानांनी बरेच बैल घेतले व विकले.

त्यावेळी बैल म्हणजे शेतकऱ्यांचा जीव की प्राण होता. आता जसे लोक गाड्या, मोटरसायकली घेतात तसेच त्यावेळी लोक बैल घ्यायचे. एकच बैल ते सतत वापरत नसत. हा बैल विकून लगेच दुसरा घ्यायचा. तो विकून लगेच तिसरा घ्यायचा असे रहाटगाडगे सतत चालू असायचे.

बैलाच्या शिंगांना त्यावेळी विशेष महत्त्व होते. बैलांची शिंगे टोकदार असली पाहिजेत. बैलाला जास्त कांबळ (गळ्याखालचा भाग) नसली पाहिजे. वशिंद, बैलाचे दात, बैलाची चाल इत्यादी सर्व पारख करूनच बैल विकत घेतले जात असत.

गावात एखाद्या माणसाने बैल विकत घेतल्यावर गावातील अनेक लोकांची तिथे गर्दी जमत असे. काही जण त्यावेळी बैलांमध्ये आनेक उणीवा काढत असत. बैलाच्या किमतीवरून सुद्धा चर्चा झडत.

दरवर्षी कोकणा मधून बैलाची शिंगे फोडण्यासाठी माणूस येत असे. तो बैलाची शिंगे टोकदार बनवून देत असे. अनेक लोक त्याच्याकडून बैलाची शिंगे टोकदार करून घेत असत.

एखाद्या छोट्या झाडाला बैल बांधला जाई दोन-चार जण बैलाचे मुंडके घट्ट पकडत. त्यानंतर हा शिंगे टोकदार करणारा माणूस त्याच्याकडील कानशीने बैलाची शिंगे लाकडासारखी घोळत राही. त्यामधून खूप रक्त येत असे. मला हा प्रकार अजिबात आवडत नसायचा.

बैलाची शिंगे टोकदार झाल्यावर त्यावर लोक वेगवेगळे झाडपाल्याचे औषध बैलाच्या शिंगाला चोळायचे. परंतु दोन-चार दिवसातच बैलाच्या शिंगांच्या जखमा बर्‍या व्हायच्या. त्यानंतर बैल मात्र मोठे रुबाबदार व डौलदार दिसायचे.

बैलाची शिंगे जशी टोकदार करत तसेच बैल बडवण्याचा कार्यक्रम सुद्धा अतिशय आघोरी होता.

बैलाची वय त्याच्या दातावरून ठरत असे. दुस,चौसा, गोरा, भादवा असे प्रकार होते. त्यावेळी खिल्लारी बैल हे अतिशय महाग असायचे. त्यामुळे हे बैल लोक विकत घेत नसत. गावठी बैलच अनेक लोकांकडे असायचे.

त्यावेळी गावातील ठराविक लोकांकडे बैलगाड्या असायच्या. या बैलगाड्यातून लोक शेतीसाठी शेणखत वाहने, जनावरांसाठी पेंढा, वाळलेल्या गवताच्या पेंढ्या, सरपण, भाताची पोती, पाण्याची पिंपे, यात्रा, लग्न व देवदर्शन इत्यादी कामासाठी बैलगाडीचा स्तरास उपयोग होत असे. लग्नाचा नवरदेव वऱ्हाड बैलगाडीतून जात असे. त्यासाठी बैल गाडी अतिशय छान सजवली जायची. बैलाच्या अंगावर झोली बांधल्या जात.

आमच्या वडिलांनी सुद्धा भिवेगावच्या पांडुरंग वनघरे यांच्याकडून बैलगाडी विकत आणली होती. या बैलगाडी मध्ये मी रात्री अंगणात झोपत असे. ही बैलगाडी चालवण्याचा आनंद सुद्धा मी अनेक वेळा घ्यायचो.

मी लहान असताना माझे आजोबा आईचे वडील लुमा ठोकळ यांनी दुधासाठी एक गाय दिली होती. या गायीचे नाव सारंगी असे होते. सारंगी गाय खूपच गरीब होती. व ती चांगले दूधही देत असे. ही गाय खूप वर्ष आमच्याकडे होती.

परंतु त्यावेळी जनावरांना खरकुताची साथ यायची. जनावरांच्या पायातील खुरामध्ये छोटे छोटे किडे पाडायचे. त्यावेळी आता सारखी औषधी उपलब्ध नसायची. आमची आजी व मी रानातून कुंभा या वनस्पतीची पाने आणत असू. ती दगडावर वाटून त्याचा रस व लगदा गायीच्या पायाच्या खुरामध्ये घालत असू.

परंतु थोड्याच दिवसात पावसाळा सुरू झाला. व खरकुत या आजाराने जास्त जोर धरला. आम्ही सकाळी पाहायचं त्यावेळी गोठ्यामध्ये सगळीकडे खरकुताचे किडे दिसायचे. आणि अशातच एके दिवशी आमची गाय आम्हाला सोडून गेली.

त्यानंतर आमच्या वडिलांनी डेहणे येथील श्री तुकाराम कोरडे यांच्याकडून एक गाय विकत आणली.

त्यावेळी मी दुसरीला होतो. श्रावण महिना होता. आम्ही सर्व मुले शाळेत होतो. वेळ साधरण दुपारनंतर साडेचारची असेल, गुरुजी पाढे शिकवत होते आणि अचानक कुणीतरी शाळेत सांगायला आले की की आमच्या घरी गाय आणली आहे. मला खूप आनंद झाला.

काही मुलांनी गाय पाहण्यासाठी गुरुजींची परवानगी मागितली. तनपुरे गुरुजीं सह आम्ही मुले आमच्या वडिलांनी नवीन आणलेली गाय पाहण्यासाठी गेलो. तर काय अंगणात पांढरीशुभ्र गाय उभी होती, तिच्याबरोबर छोटे वासरू होते. चार-पाच लोक उभे होते. आई गाईची पुजा करून औक्षण करीत होती. तेवढ्यात आम्ही तेथे गेलो.

माणसे गप्पा मारत होती. सर्वांना माझ्या हस्ते गुळ वाटप करण्यात आला. गुळ वाटल्यावर बाकीची मुले शाळेत गेली. मी तेथेच थांबलो. त्यानंतर मोठ्या माणसांना चहापाणी झाला घरातील सर्वांना त्यावेळी खूपच आनंद झाला होता. घरात दूध दूभते आले होते.

त्यावेळी गावात "चाहूर"  हा एक परावलीचा शब्द होता. चाहूर म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात गावातील सर्व बैल जोड्या घेऊन त्या शेतकऱ्याच्या शेताची दुरुस्ती करावयाची. त्या बदल्यात तो शेतकरी दोन वेळचे जेवण व ठराविक रक्कम द्यायचा. यालाच चाहूर असे म्हणत असत.

कुणाचा पावसाळ्यात बांध गेला असेल. कुणाच्या शेतात जास्त माती धुवून आलेली असेल. किंवा कोणाला नवीन भाताची खाचरे तयार करायची असतील. तर अगदी सकाळी सकाळी आपापली बैल घेऊन अशा शेतकऱ्यांच्या शेतात घेऊन जावयाचे.

संध्याकाळपर्यंत शेतीची कामे करायची. वीस बावीस बैल जोड्या असत. चाहूल असेल त्या दिवशी घरातील बाया माणसाची खूपच धावपळ असे. दिवसभर त्यांना खूप काम असायचे. 

शेतातील माणसांना दुपारचे जेवण म्हणजे नाचणीच्या किंवा तांदळाच्या भाकरी, मसुराची आमटी, कांद्याच्या फोडी, पापड हा बेत असायचा. त्यासाठी शेजारच्या बाया मदतीला यायच्या.

भल्या पहाटेपासून स्वयंपाकाची तयारी करावी लागायची. तेव्हा कुठे दुपारचे जेवण तयार व्हायचे.

दुपारी गर्द झाडीच्या छायेत जेवण झाल्यानंतर थंडगार पाणी पिऊन लोक वामकुक्षी घेत असत. तर सावलीमध्ये बांधलेल्या बैलांना वैरण काडी केली जात असे.

दोन-चार अति उत्साही लोक जवळच्याच रानात जाऊन आंब्यावर चढून पिवळे धमक पाड घेऊन येत असत. पाटी दोन पाट्या पिवळे धमक पाड खाण्यासाठी लोक त्यावर तुटून पडत.

आंबे खाऊन झाल्यावर पुन्हा शेतीचे काम सुरू होई.

संध्याकाळी पुरणपोळीचे जेवण असे. लोक चावडीच्या दारात बसून गप्पा मारत असत व जेवणाची वाट पाहत असत. जेवणाचे एकदा बोलावणे आले की लोक सार पोळीवर तुटून पडत. एक एक माणूस पाच पाच सहा पोळ्या खात असे. 

त्यावेळी कोणताही कार्यक्रम असो जेवण म्हणजे पुरणपोळी हा सर्रास लोकप्रिय प्रकार होता. मुलगी बघण्याचा कार्यक्रम, पाहुणे आल्यावर, शेतीच्या कामानिमित्त, यात्रा, सण व उत्सव, लग्न कार्य या सर्वांसाठी पुरणपोळी हा बेत ठरलेला असे.

आता मात्र पुरणपोळ्या हा प्रकार बंद होत चालला आहे. त्यावेळी चाहूर हा प्रकार अतिशय लोकप्रिय होता. अख्या गावाची औते एकच शेतकऱ्याकडे जात असत. एकच शेतकऱ्याच्या शेतामध्ये 25, 30 बैल जोड्या पाहून बैलांचा बाजार भरला आहे की काय असे वाटत असे. चाहूर हा एकमेकांना मदत करण्यासाठीचा प्रकार होता. परंतु आता चाहूर हा शब्द मदत करणे सोडाच परंतु ऐकायला देखील मिळत नाही. आताच्या पिढीला त्याचा शब्दही समजणार नाही.

परंतु त्यानंतर मात्र काळ बदलला पुरणपोळीची जागा चिकन,मटण आणि दारूने घेतली. दिवसाढवळ्या सुद्धा दारू पिऊन मगच शेतीच्या कामाला लोक सुरुवात करू लागले.

चाहूर या शब्दासारखाच दुसरा प्रकार म्हणजे "इर्जिक" होय. या प्रकारामध्ये गावातील ठराविक लोक एखाद्या शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी मदत करत असत. त्या बदल्यात तो शेतकरी मदत करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन वेळचे जेवण देत असे. संध्याकाळचा स्वयंपाक मात्र पुरणपोळीचा असे. थोडक्यात इर्जिक प्रकार म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला विनामोबदला केलेली मदत.

आता तर हे सर्वच बंद झाले आहे. कारण कुणाकडेच बैल नाहीत. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.

रामदास तळपे 


सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस