मंदोशी गावचे बारवेकर सुतार

पूर्वीपासून सुतार हा ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक राहिला आहे. शेती, शेतकरी आणि सुतार हे समीकरणच म्हणावे लागेल.

आमच्या मंदोशी गावात बारवेकर सुतार खुप पूर्वीपासून म्हणजे सण 1846 पासुन वास्तव्य करून आहेत.आता सध्या त्यांची सहावी पिढी कार्यरत आहे.

सखाराम बारवेकर हे जुन्या लोकांना आठवतात. ते गावच्या शेतकऱ्यांना शेतीची औजारे बनउन देत. त्या बदल्यात त्यांना धान्यच्या स्वरूपात मोबदला मिळे. त्यालाच बलुते असे म्हटले जाई.

पावसाळा सुरु होण्या पूर्वी लोक सुताराकडून नांगर, हळस,जुकाड,रूमने, पेटारी, पाभर, लोड, कुळव अशा अनेक वस्तू सुताराकडून बनउन घेत असत. त्यामुळे मे, आणि जुन महिनात सुटरांच्या दारात लोकांचो सकाळ पासुन ते संध्याकाळ पर्यंत वर्दळ असे.

वरील दोन महिने सोडले तर सुताराला काही काम नसे. मंदोशी गाव मोठा असल्यामुळे सुताराला खंडी दोन खंडी धान्य जमा होई. एखाद्या मोठ्या तालेवार शेतकऱ्यांइतके ते धान्य असे. 

बरेचसे धान्य सुतार वाड्याच्या बाजारात विकत असे.शिवाय उर्वरित काळात सुतार घरांची बांधकामे करत असे.त्यामुळे सुताराला या कामाच्या मोबदल्यात पैसे मिळत असे. त्यामुळे त्याकाळात सुतार हा समाज साधन कुटुंब म्हणून ओळखला जात असे.

आमच्या गावावर बारवेकर सुतार घराचे खुप उपकार आहेत. पूर्वी प्रत्येक गावात ग्रामदेवतेची मंदिरे असत. पण ही मंदिरे अगदी साधी गवती छप्पराची असत. सन 1925 साली श्री. कालभैरवनाथ मंदिर दगडी चौथरा, डबरी वंधकाम व वर कौले असे बांधकाम करायचे ग्रामस्थानी ठरवले. त्यावेळी सखाराम सुतारांनी हे काम तीन थरांचा दगडी चौथारा त्यावर दगडी बांधकाम असे अतिशय सुंदर बांधकाम केले. 

हे मंदिर मला स्पष्ट आठवते. त्यानंतर हेच मंदिर पुन्हा सन 1983 साली नव्याने बांधण्यात आले. पूर्वीचे मंदिर ओबढघोबड डबरात होते. परंतू सखाराम सुतार यांचे नातू दत्तात्रय बारवेकर, सुदाम बारवेकर  व सोपान बारवेकर यांनी संपूर्ण दगडी काम हे घडीव स्वरूपात करण्याचे ठरवले. 

दगड घडवण्याचे काम हे तीन बंधू जवळजवळ दोन वर्ष करीत होते. पूर्वीचा मूळ चौथरा तसाच ठेवून घडीव दगडी बांधकामात पुढे सुसज्ज अशा गच्चीसह अतिशय सुंदर असे बांधकाम त्यांनी 1985 मध्ये पूर्ण केले.

हे बांधकाम पश्चिम भागात पाहण्यासारखे होते. त्यावेळी असे बांधकाम कुठेच नव्हते. ही आमच्या गावच्या सुतारांची अप्रतिम कला होती.

त्यानंतर पुन्हा सन 2014 मध्ये मंदिराचे बांधकाम करण्याचे ठरवले. व त्याप्रमाणे बांधकाम झाले देखील. परंतु आजही सखाराम सुतार यांनी बांधलेला मूळ चौथरा व दत्तात्रेय सुदाम व सोपान बारवेकर यांनी घडीव दगडाच्या बांधलेल्या भिंती तशाच ठेवून वर कळसाचे काम करण्यात आले आहे. म्हणजेच मंदिराचा चौथारा व दगडी भिंती आजही ऐतिहासिक वास्तुकलेची साक्ष देतात. ही कला सखाराम सुतार आणि त्यांच्या नातवांची आहे.

सन 2014 मध्ये बांधलेले हे काम सुद्धा गावाने बारवेकर कुटुंबांना देण्याची तयारी दर्शवली होती. त्याप्रमाणे बैठका सुद्धा घेण्यात आल्या. परंतु बारवेकर कुटुंब हे गावापासून खूपच अलिप्त राहिल्याने त्यांना हे काम मिळाले नाही.

सखाराम सुतार यांचे पुत्र कै.श्री विष्णू बारवेकर हे सुद्धा उत्तम पद्धतीने काम करायचे. विष्णू बारवेकर हा माणूस अतिशय साधा होता. मध्यम व सडपातळ  बांधा, साधी राहणी, धोतर,पैरण, गळ्यात उपरणे व टोपी असा त्यांचा वेश होता. त्यांनी सुद्धा गावची खूप सेवा केली.

विष्णू बारवेकर यांना कोऱ्या नोटा जमवण्याचा छंद होता. त्या काळात एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये, वीस रुपये व 100 रुपये अशा त्या नोटा होत्या. विष्णू बारवेकर नोटांना कधीही घडी घालत नसत. या  कोऱ्या नोटा कागदी पिशवी अतिशय काळजीपूर्वक ठेवत. कुणाकडे कोरी नोट दिसली की ती हक्काने मागून घेत असत. मी त्यांना अनेक वेळा कोऱ्या नोटा दिलेल्या होत्या.

मी कधीकधी जाताना त्यांना दिसलो की ते माझी फार अस्थेंने माझी विचारपूस करत. मला घराकडे बोलवत. पेटीत जपून ठेवलेली कागदी पिशवी माझ्यापुढे आणून ठेवत व सोडून त्यातील कोऱ्या नोटा बाहेर काढत व माझ्याकडे देत असत.

रामजी! एवढ्या नोटा मोज बघू. किती आहेत मला सांग?

मी त्यांच्या सर्व नोटा मोजून त्याचा हिशोब त्यांना सांगत असे. या सर्व कोऱ्या नोटा काळजीपूर्वक पिशवीत ठेवून ती पिशवी पेटीत ठेवून देत असत.

विष्णू बारवेकर हे एकदा पाऊस सुरू झाला की शक्यतो घराच्या बाहेर निघत नसत. चिखलातून तर ते कधीच जात नसत. त्यांना पाण्या पावसाची चिखलाची खूप भीती वाटे. कधी कधी मी त्यांना दिसलो की ते मला हमखास बोलवून घेत असत.ख्याली खुशाली विचारत असत. माझ्याबरोबर भरपूर गप्पा मारत. त्यामुळे त्यांचे आणि माझे संबंध खूप चांगले होते. माझ्यावर तर त्यांचा खूपच विश्वास असायचा.

विष्णू बारवेकर यांचा मुलगा म्हणजे श्री सुदाम बारवेकर. सुदाम बारवेकर हे माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे मित्र होते. सुदाम बारवेकर म्हणजे अतिशय कलाकार माणूस. त्यांच्या उमेदीच्या काळात माझ्या वडिलांनी सागाचा पलंग, सागाचे कपाट,टेबल व खुर्ची, सागाच्या पेट्या, लिहिण्याचा स्टूल, बसण्याचा स्टूल असे अनेक साहित्य बनवून घेतले होते.

सुदाम बारवेकर म्हणजे कलाकारित परफेक्ट माणूस. गावची बलुतेदारी करून त्यांनी या कलाक्षेत्रात त्या काळात खूपच सुंदर सुंदर अशी घरे बांधली, लाकडी फर्निचरच्या वस्तू बनवल्या. मंदिराची सुंदर अशी बांधकामे केली.

सुदाम बारवेकर यांचा आवाज हा अतिशय दैवी म्हणावा लागेल. श्रावण महिन्यात त्या काळात लोक श्री.नवनाथ, भक्ती विजय, राम विजय,पांडव प्रताप या अध्ययांचे पारायण करत. हे अध्याय वाचावे तर सुदाम बारवेकर यांनीच. 

सुदाम बारवेकर यांनी एकदा का अध्ययांच्या ओव्या वाचायला सुरुवात केली की एखादे उत्तम सुरावट असलेले  गाणे जसे आपण ऐकतो तसे लोक मन लावून ऐकत असत. सुदाम बारवेकर अध्याय वाचायला असतील तर अध्याय ऐकण्यासाठी लोकांची त्या काळात प्रचंड गर्दी होत असे.

सुदाम बारवेकर हे लग्नातील मंगलाष्टका सुद्धा अतिशय भारदस्त आवाजात म्हणत असत. त्यांच्या या मंगलाष्टका ऐकल्यावर अंगातून रोमांच उभे राहत. 

लोक विचारत कुठला माणूस आहे हा? त्यावर बाकीचे काही लोक सांगत, मंदोशीचे सुदाम बारवेकर आहेत ते.

त्यावर लोक म्हणत. काय सुंदर आवाज आहे या माणसाचा..

सुदाम बारवेकर हे  भजनात उत्तम अभंग सुद्धा म्हणायचे. काही काळ त्यांनी व धर्मा बुधाजी तळपे आणि चंद्रकांत मोहन यांनी मंदोशी गावचे नाव खेड आंबेगाव,जुन्नर आणि मावळ या  तालुक्यामध्ये अजरामर केले.

सुदाम बारवेकर यांनी भजनामध्ये पंडित भीमसेन जोशी, अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे यांची गायकी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे लोकप्रिय अभंग स्वतः म्हणून ते अभंग मंदोशी गावच्या भजनात लोकप्रिय केले.

सुदाम बारवेकर हे 1995 ते 2000 या काळात शिरगाव मंदोशी या ग्रामपंचायतचे सदस्य देखील होते. 

सुदाम बारवेकर यांचा भाचा श्री.कैलास सुतार हे कुडे खुर्द या गावचे. ते सुद्धा काही काळ मंदोशीला असत. कैलास सुतार हे अतिशय उत्तम कलाकार होते. परंतु त्यांना त्याप्रमाणे साथ न मिळाल्यामुळे त्यांची कला विशेष बहरली  नाही. कैलास सुतार यांना आधुनिकतेची खूपच आवड होती. आणि त्याप्रमाणे कला जोपासली पाहिजे अशी त्यांची इच्छा असायची. परंतु आमचे गाव पडले अतिशय दुर्गम असे खेडेगाव. कैलासच्या नवीन कल्पनांचे खेडवळ लोक टिंगल, टवाळी करत.

कैलास सुतार यांनी मंदोशी गावच्या यात्रेत आलेल्या तमाशामध्ये दिवाना या चित्रपटातील गाणी फक्त पुरुष गायकांचा आवाज एडिट  करून व स्त्री कलाकाराचा आवाज व म्युझिक तसेच ठेवून स्वतःच्या आवाजात म्हणून सादर केली. त्यामुळे तमाशातील लोक सुद्धा अचिंबित झाले. ही किमया फक्त कैलास स्वतःच करू जाणे. 

1990 च्या दशकात अतिशय खेडेगाव असलेल्या दुर्गम भागात राहून सुद्धा एडिटिंगची कल्पना वास्तवात कैलास सुतार कसा करू शकला हे कोडेच आहे. ही त्यांच्या बुद्धीची किमयाच म्हणावी लागेल.

सुदाम बारवेकर यांच्याकडे त्या काळात लाऊड स्पीकर होता. सुदाम बारवेकर यांच्या घरावर दोन बाजूला दोन मोठी लाऊड स्पीकरची कर्ण कायमस्वरूपी लावलेली असत. 

रोज सकाळी सहा वाजता स्पीकरवर अभंग वाणी,श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले लोकप्रिय अभंग, लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे यांच्या आजारावर गायकीने लोकप्रिय झालेले अभंग त्या काळात आम्ही ऐकत असु. तर संध्याकाळी सहा वाजता बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन स्पीकरवर ऐकायला मिळे. त्यामुळे अनेक लोकांना भक्तिमार्गाची गोडी लागली.

त्या काळात भाताची पिठाची गिरणी गावात नसल्यामुळे आम्हा सर्व लोकांना धुओली किंवा डेहणे येथे जावे लागे. डोक्यावर भाताची किंवा दळणाची ओझी घेऊन आम्ही धुओली किंवा डेहणे जात असू.परंतू लवकरच श्री.सुदाम वारवेकर यांनी त्यांच्या घरात भाताची व पिठाची गिरणी सुरू केली. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या मिटली.

पुढे श्री सुदाम बारवेकर गावापासून का काय माहित ? परंतु अलिप्त राहू लागले. गावच्या कोणत्याच कार्यक्रमात ते भाग घेत नाहीत.

आजही त्यांच्या आजोबांनी, वडिलांनी त्यांनी आणि त्यांच्या बंधूंनी केलेले कार्य गाव विसरलेला नाही. त्यांची कला आजही कलेच्या माध्यमातून चिरंतन टिकून आह

रामदास तळपे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस