बैलपोळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बैलपोळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बैलपोळा

बैलपोळा 

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रत्येक खेडेगावात बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज अनेक जण नोकरीच्या धंद्याच्या निमित्ताने आपल्या गावापासून दूर शहरात कार्यरत आहेत. परंतु जेव्हा बैलपोळा असतो तेव्हा प्रत्येक जनाच्या मनात लहानपणाच्या आठवणी ताज्या होतात.

माझ्याही मनात बैल पोळा या सणाविषयी अनेक आठवणी ताज्या आहेत. पूर्वी एक महिन्यापूर्वी पासूनच बैलपोळा सणाची तयारी सुरू होत असे. 

भाद्रपद महिना संपलेला असे. शेती भाती निसर्गाच्या व पावसाच्या कृपेमुळे उत्तम रीतीने वाढलेली असे.या महिन्यात शेतकऱ्यांना बरीच मोकळीक असते.पूर्वी प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाकडे बैल जोडी असे. अपवादात्मक परिस्थितीत चार-दोन कुटुंबाकडे बैलजोडी नसायची. श्रावण व भाद्रपद महिन्यात दुपारी जेवण झाले की शेतकरी आपापले बैल घेऊन रानात चारायला घेऊन जायचे. माळावर बैल मस्त चरायचे. काहीजण विशिष्ट प्रकारचे लाकूड तोडून त्यापासून बैलपोळ्याला बैलांना सजवण्यासाठी चौरे बनवायचे. यासाठी खूप दिवस लागायचे.

बैल पोळ्याचा दिवस उजाडायचा.शेतकरी वर्ग सकाळी बैलांना रानात चारायला घेऊन जायचे. सकाळी अकरापर्यंत बैल घरी आणायचे.जेवण केल्यावर गावातील शेतकरी बैलांना नदीवर किंवा ओढ्यावर बैल धुण्यासाठी घेऊन जायचे. आम्ही लहान मुले सुद्धा त्यांच्याबरोबर नदीवर जायचो.

नदीवर गेल्यावर बैलांना छान पैकी घासून-पुसून आंघोळ घातली जायची. गावातील बऱ्याच बैलजोड्या नदीवर आलेल्या असत. त्यांच्याबरोबर गावातील लहान मुले सुद्धा आलेली असत. बैलांना आंघोळ घातल्यावर बैलांच्या शेपटीला धरून नदीतील मोठ्या डोहातून नदीच्या पलीकडे जाण्याची मज्जा खूपच न्यारीअसे.नदीच्या मध्यभागी गेल्यावर घाबरल्यासारखे होई.परंतु काहीही झाले तरी बैलाची शेपटी सोडायची नाही हे आधीच सांगितलेले असे.पलीकडे गेल्यावर खूप आनंद व्हायचा. त्यानंतर परत एकदा बैलाच्या शेपटीला धरून अलीकडे यायचो. बैलांना छानआंघोळ घातल्यामुळे बैल खूप स्वच्छ आणि सुंदर दिसायचे. 

त्यानंतर आमचा ताफा घरी यायचा. बैल पोळा सणाच्या आधी बाजारातून बैल सजवण्यासाठी साहित्य आणले जाई. 

पूर्वी बैलांच्या शिंगांना लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बेगडे असत.ही बेगडं प्लॅस्टिकची असत.पुढील काळात बेगडांच्या ऐवजी बैलांच्या शिंगांना लावण्यासाठी विशिष्ट प्रकारचे तेल व सोनेरी एकत्र कालवून ती बैलांच्या शिंगांना लावली जाऊ लागली.ही सोनेरी कित्येक दिवस बैलांच्या शिंगांना असायची.

त्याच प्रमाणे चौरे,विविध रंगीबेरंगी गोंडे,बैलांच्या कपाळाला लावण्यासाठी विविध प्रकारची आरशांची.काचांची बाशिंगे मोठ्या हौसेने लोक बाजारातून विकत आणत.काही श्रीमंत शेतकरी बैलांना झुली विकत आणत. या झुली घातल्यावर बैल खूपच सुंदर व रुबाबदार दिसत. विविध प्रकारच्या विविध रंगांच्या मण्यांच्या माळा,म्होरक्या,बैलांच्या नाकात घालण्यासाठी वेसनी, सुंदर आवाजाच्या घंटा, घुंगुरमाळा, बैलांना सजवण्यासाठी विविध प्रकारचे लाल हिरवा निळा पिवळा असे रंग बाजारातुन विकत आणले जाई. हे सर्व साहित्य बैलपोळ्याच्या आधीच बाजारातून विकत आणलेले असे.

नदीवरून बैल आणल्यावर थोडावेळ विश्रांती घेतली जाई. आणि दुपारी तीनच्या दरम्यान बैलांना सजवण्याची लगबग सुरू होई.मोठी माणसे मन लावून बैल सजवण्यासाठी मग्न होत. कुणी बैलांच्या शिंगांना बेगडं लावत. तर कुणी विशिष्ट तेलात सोनेरी कालवून ती बैलांच्या शिंगांना लावत असे.कुणी चौरांना वेगवेगळे रंग लावून ते बैलांच्या शिगांमध्ये अडकवले जात. विविध प्रकारचे गोंडे,बाशिंगे बैलांच्या कपाळावर बांधले जाई,  वेगवेगळ्या रंगांमध्ये हात बुडवून हाताचे पंजे बैलाच्या अंगावर उमटवले जात.

रंग उरला की घरातील पाळीव कुत्र्या- मांंजरांना कोंबड्या चितड्यांना रंग लावला जाई.बाजारातून आणलेल्या घुंगुरमाळा किंवा वेगवेगळ्या रंगाच्या मण्यांच्या माळा बैलाच्या गळ्यात बांधल्या जात.बैलांच्या गळ्यातील घंटा आणि त्याचा आवाज आजही ही माझ्या कानात रुंजी घालतो असा मला आजही भास होतो.

बैलांची मिरवणूक ताशा वादन  




काही श्रीमंत शेतकरी बैलाच्या पाठीवर खूप सुंदर रंगाच्या झुली घालत.त्यामुळे बैल अतिशय सुंदर व रुबाबदार दिसत. त्यानंतर बैलांची गावातील ग्रामदैवताकडे जाण्यासाठी मिरवणूक काढली जाई,काही ठिकाणी ढोल लेझीम तर काही ठिकाणी सनई, चौघडा, धोटा, ताशा, हलगी व संबळ इत्यादी वाद्यांच्या गजरात गावातील सर्व बैलांची मिरवणूक संपूर्ण गावाला वेढा मारून ग्रामदैवताकडे जात असे. त्यावेळचा तो आनंद आजही जसाच्या तसा आठवतो. 

मदिराकडे गेल्यानंतर देवाचे दर्शन घेऊन देवाला नारळ फोडून नारळाची शेरणी सर्वांना वाटली जाई. आणि परत लोक आपापले बैल घेऊन घरी येत. तोपर्यंत रात्र झालेली असे. घरी आल्यावर बैलांचे पाय घरातील सुवासिनी स्रिया धूऊन काढत. बैलाची हळद ,कुंकू ,धूप आणि दीप यासह पूजा केली जाई. बैलांना त्यादिवशी पुरणपोळ्यांचा नैवद्य दाखवला जाई.

 थोडक्यात बैलांना पुरणपोळ्यांचे सुग्रास जेवण दिले जाई. आणि नंतरच घरातील लोक जेवण करत. एकमेकांना आग्रहाने घरी सार,पोळी खाण्यासाठी आमंत्रित केले जाई.लोकही आवडीने एकमेकांच्या घरात पुरणपोळी किंवा सार भात खाण्यासाठी जात असत.गावातील काही ठराविक स्त्रियांच्या हातच्या साराची चव अजूनही काही लोकांच्या स्मरणात असेल. त्याकाळात गावात काही स्त्रिया काही विशिष्ट पदार्थ अशा काही बनवायच्या की ज्याने तो पदार्थ खाल्ला असेल ती चव तो कधीही विसरू शकत नाही.

नायफड या गावातही बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे ग्रामदैवत मुक्ताबाई च्या मंदिराजवळ संपूर्ण गाव व वाड्या वस्त्यांच्या बैलांची मिरवणूक काढली जाई.वेगवेगळ्या गावांचे ताफे आणले जायचे. हे ताफे म्हणजे ताशा, सनई, डफ इत्यादी वाद्य वाजवली जात. 

हे ताफे बघण्यासाठी पश्चिम भागातील सर्व गावचे लोक खच्चून गर्दी करायचे. त्यांच्या स्पर्धा लागत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाद्यकाम चालू असे. त्यानंतर लोक घरी जाताना कोणता ताफा भारी होता.याबाबत चर्चा चर्वन करूत करत घरी जायचे. त्यावेळी ना गाड्या होत्या ना मोटर सायकल, ना सायकल. सर्व लोक पायी यायचे आणि गप्पा मारत घरी जायचे. 

आता प्रत्येक गावात  गाय ,गावठी गाया इत्यादी पाळीव प्राणी खूपच कमी झाले आहेत.आणि बैल पोळ्याचे महत्व सुद्धा. 

आता लोकांना बैलपोळा कधी येतो आणि कधी जातो हेसुद्धा समजत नाही.पूर्वी कधी कुणी बैल आणला,कुणी गाय आणली  तर  सर्वांना खूप आनंद व्हायचा. 

मी लहानपणी दुसरीला असेल.श्रावण महिना होता.आम्ही सर्व मुले शाळेत होतो. वेळ साधरण दुपारनंतर साडेचारची असेल, गुरुजी पाढे शिकवत होते आणि अचानक कुणीतरी शाळेत सांगायला आले की की रामदासच्या घरी गाय आणली आहे. मला खूप आनंद झाला.

काही मुलांनी गाय पाहण्यासाठी  गुरुजींची  परवानगी मागितली.कारण मी तेव्हा खूपच लहान होतो.गुरुजीं सह आम्ही मुले आमच्या वडिलांनी नवीन आणलेली गाय पाहण्यासाठी गेलो.  तर काय  अंगणात पांढरीशुभ्र  गाय उभी होती,  तिच्याबरोबर छोटे वासरू होते. चार-पाच लोक उभे होते.आई  गाईची पुजा करून औक्षण करीत होती.तेवढ्यात आम्ही तेथे गेलो.

माणसे गप्पा मारत होती.सर्वांना माझ्या हस्ते गुळ वाटप करण्यात आला.गुळ वाटल्यावर बाकीची मुले शाळेत गेली.मी तेथेच थांबलो. त्यानंतर मोठ्या माणसांना चहापाणी झाला घरातील सर्वांना त्यावेळी खूपच आनंद झाला होता,तेव्हाचा आनंद आता कशातच मोजता येणार नाही.काळ बदलला. समाज बदलला."कालाय तस्मै नमः". दुसरं काय?



सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस