साधारण जुनचा शेवटचा किंवा जुलै महिन्याचा पहिला आठवडा असतो. सर्वदुर भरपुर पाऊस पडत असतो. ओढे-नाले व नदी नाले दुथडी भरून वाहत असतात. भाताची रोपे तरारून वर आलेली असतात. सगळीकडे हिरावेगार गवत उगवलेले असते.
पूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांकडे गुरे असायची. सुट्टीच्या दिवसात दुपारी आम्ही पोरं गुरे चारण्यासाठी रानात घेऊन जायचो. प्रत्येकाकडे पावसाने भिजू नये म्हणुन प्लँस्टिक कागद व घोंगडीचा घोंगता घेऊन जायचो.कमरेला रूमालात किंवा फडक्यात बांधलेली लसणाची चटणी व भाकरी असायची.
गुरे चारत चारत ओढ्या नाल्यातुन रानाकडे जायचो.सा-या गावातील मुले गुरांकडे असायची.

प्रत्येकाच्या घरात दहा पंधरा गावठी गाई असायच्या. बैल असायचे.आम्ही गावातील सारी पोरं गुरांना घेऊन उंच माळावर रानात जीथे मोठ्या प्रमाणात सपाट जागा असते तिथे घेऊन जायचो. उन्हाळ्यात गुरांची खुप आबाळ व्हायची मनासारखा चारापाणी मिळायचा नाही.परंतु आता पावसाळ्यात सर्वदुर जिकडे तिकडे हिरावेगार लुसलुशित गवत असायचे गुरे शांतपणे चरत राहायची.अधुन मधुन पाऊसाच्या सरी कोसळत राहायच्या.
पावसाने उघडीप दिली असेल तर माळावर मुलांचे खेळ सुरु व्हायचे. लंगडी, आबादबी, काळी शाई निळे पाणी, दगड की माती, तिसका (एक फुटभर आकाराची काठी असायची तिची एकबाजू तिसकट असते. ती जमीनीत जोरात बाणासारखी घुसवित पुढे जायचे,) नाटक, भारूड, तमाशा व आंधळी कोशिंबीर असे नानाविध खेळ असायचे.
जोरदार पावसाची सर पडुन गेल्यावर उतारावरून येणा-या पाण्याला आम्ही दगड मातीचा बांध घालायचो.ते करताना अंगावरील कपडे गाळाने भरून जायची.पण त्याचे कोणालाही सोयारसुतक नसायचे. पाणी आडवने हे एकच उद्दिष्ट असायचे.
मगाशी ज्या ठिकाणी काहीच पाणी नसायचे तिथे गुडघाभर खुप मोठा आडवलेल्या पाण्याचा फुगारा तयार व्हायचा.नंतर एकजण हळुच बांध घातलेला मध्यभागी असलेला दगड काढायचा .एव्हाना शांत असलेले पाणी बांध फोडल्याने हरणाच्या वेगाने उसळ्या घेऊन वहायचे.ते पहाण्यात प्रचंड गम्मत वाटायची.खुप आनंद व्हायचा.असा आनंद पुन्हा होणे नाही.
असे खेळ खेळत असताना दुपार व्हायची. सर्वाना भुका लागायच्या. मग सर्व गुराखी मुले आपआपल्या मित्रांबरोबर माळावरील सपाट मोठ्या दगडावर बसुन आपापली शिदोरी काढायचे. प्रत्येकाकडे भाकरी कांदा लसणाची चटणी, बोंबील वाकटीची चटणी किंवा खारामाश्याचा तुकडा इत्यादी काहीबाही असायचे. एकमेकांना देवानघेवान व्हायची. जेवण झाल्यावर तेथेच असणारे झ-याचे पाणी प्यायचे.
दुपारनंतर गुरे ब-यापैकी जोगावलेली असायची. सगळ्यांना (गुरांनादेखील ) घराची ओढ लागायची.कधी कधी एखाद्याचे जनावर चरता चरता कळप सोडून लांब जायचे. ते सापडायचे नाही. मग सर्वजण शोधमोहिमेवर जायचे आणि जनावर शोधून आणायचे. ज्याचे जनावर हरवले होते त्याचा जीव भांड्यात पडायचा.
संध्याकाळी कालावणाची सोय म्हणुन माळावरील खेकडे पकडायचे. हळंदे व पंधे (जमिनीत असणारी रुचकार कंदमुळे) खणायची. चैताची रानभाजी (वनस्पतीचा कोवळा लुसलुशित ताना याची भाजी अप्रतीम असते.) त्याचप्रमाणे कुर्डूची भाजी, कर्टुली, चिचुर्डी अशा अनेक भाज्या गुरे सांभाळताना घेऊन यायचो.
गवतामध्ये असलेली मेकी तुम्हाला माहीतचअसतील. कच्चे मेकांची चव आणि पिकलेल्या मेकांची चव अतिशय अप्रतिम असते. ज्यांनी खाल्ली आहेत त्यांनाच माहीत.
आळंबी (मशरूम) यालाच ग्रामीण भागात सतार असेही म्हणतात. हे रानात उगवते. ही आळंबी वाळलेल्या पळसाच्या पानात चवीपुरते मीठ घालून त्याची पुडी करून चुलीतल्या आहारात पुरून ठेवतात. व थोड्यावेळाने भाजल्यावर सोडुन खातात.अप्रतीम चव. शब्दात वर्णन करणे कठिण.
तर अशा या रानभाज्या घेऊन घेऊन आम्ही घरी यायचो.असा तो काळ होता.आता जनावरे राहिली नाहीत. रानात जाणे नाही. रानभाज्या मिळत नाहीत.व पुर्वीचा आनंद सर्वकाही असुनही मिळत नाही.ही प्रत्येकाची शोकांतिकाच म्हणावी लागेल.
रामदास तळपे
गवतातली मेकी