झळा 1972 च्या दुष्काळाच्या
साल होते १९७२ जुन महिना आला. परंतु पावसाचे कोणतेही चिन्ह दिसेना.ना ढगांचा गडगडाट ना विजांचा चमचमाट.रोज लोकांचे आकाशाकडे डोळे लागायचे.आज पाऊस पडेल उद्या पडेल या आशेवर लोक स्वतःशीच समजुत घालायचे.देवाची करूणा भाकायचे.परंतू पर्जन्यदेवतेला काही पाझर फुटत नव्हता.
अशातच जून गेला.नंतर जुलै सुध्दा गेला.लोकांची उरली सुरली पेरणीची आशा पुर्णत: मावळली.आँगष्ट सुद्धा कोरडाच गेला.अन्नधान्यचं पिकलं नाही.म्हणजेच चाराही नाही.त्यामुळे जनावरे चारा पाण्यापासुन तडफडून मरू लागली.
त्यावेळी प्रत्येक कुटुंबाकडे २० ते २५ जनावरे असायची. जवावरांचा मृत्यू उघड्या डोळ्यांनी लोकांना पहावत नव्हता. अनेकांनी त्यांची सर्व जनावरे रानमळ्यात व जंगलात सोडून दिली. तोपर्यंत सप्टेबर आला.एकामागुन एक दिवस जात होते. लोकांनी पावसाची आशा सोडून दिली होती.आता इथून पुढे कसे जगायचे या विवंचनेत सर्वजण होते.
आणि अशातच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडू लागला. ओढ्या नाल्यांना पाणी आले. परंतु त्याचा आता काहीच उपयोग नव्हता. प्रत्येकाचा घरातील अन्नसाठा संपत आलेला होता. काही लोक झाडपाला व कंदमुळे खाऊन जगत होते. काही लोक जंगलातील कंद मुळावर गुजराण करू लागले.
मा. यशवंतरावजी चव्हाण साहेब

त्यावेळी शासनाने अमेरिकेकडून आणि रशिया कडून धान्याची आयात केली. शासनाला चांगले धान्य लोकांना पुरवणे शक्य नव्हते. फक्त लोक जागवायचे होते. त्यासाठी निकृष्ट प्रकारचे धान्य मागवले गेले. ते धान्य तेथील लोक डुकरांना आणि गुरांना खायला घालत. ते धान्य म्हणजे तांबडा मिलो. तांबडा तांदूळ व किडकी ज्वारी व ओलसर दमट गहू. हे ते धान्य होते.
या धान्यामध्ये अनेक बियाणाची भेसळ असायची.आज सगळीकडे गावाच्या बाजूला जे काँग्रेस गवत उगवलेले असते ते ह्या तांबड्या मिलो बरोबर व किडक्या ज्वारी बरोबर आलेले बियाणे आहे.
1972 च्या आधी काँग्रेस गवत नव्हते. त्यावेळेस तत्कालीन आमदार मा. शरद पवार साहेब यांनी लोकांना मोफत धान्य देण्यापेक्षा त्यांच्या हाताला काहीतरी काम द्या. त्यांना रोजगार द्या.व आठवड्याला धान्य द्या.अशी सूचना केली. मंत्रिमंडळाने ही सूचना तात्काळ उचलून धरली.
शासनाने रोजगार हमी योजना ही योजना नव्याने अस्तित्वात आणली. त्यानुसार प्रत्येक दुष्काळी भागात कामे सुरू केली. कच्चे रस्ते बांधणे, विविध प्रकारची तळी, तलाव, सार्वजनिक विहिरींचे खोदकाम, छोटे बंधारे इत्यादी कामे सुरू केली. त्यामुळे दुष्काळी भागातील लोकांना रोजगार मिळू लागला. लोक दररोज कामाला जाऊ लागले .
परंतू हा रोजगार अतिशय तुटपुंजा होता.त्यावेळी प्रती दिवस मजुरी होती एक रुपया 20 पैसे. आठवड्याला प्रत्येक कुटुंबाला चार किलो धान्य दिले जाई. लोक पोटाला चिमटा घेऊन अन्न आणि पाणी वाचवत होते.आपल्या मुलाबाळांना जगवत होते.अर्धपोटी राहात होते.काही स्त्रिया आपल्या महिन्या-दोन महिन्यांच्या लहान बाळांना घेऊन रोजगार हमीच्या कामावर जात होत्या.झाडाखाली लहान मुलांना ठेवून रोजगार हमीचे काम करत होत्या.असा तो काळ होता.
यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि तालुके या दुष्काळाच्या छायेखाली होते. रेशनिंगच्या दुकानात दोन दिवसांनी रेशन मिळणार आहे हे लोकांना कळाल्यावर रेशनिंगच्या दुकानासमोर दोन दिवस आधीच लोक गोधड्या घेऊन तेथे नंबर लावून झोपत असत. इतकी भयानक परिस्थिती त्यावेळेस उद्भवली होती.
त्यावेळेस फक्त जमीनदार लोकांची परिस्थिती चांगली होती. त्यांना 1972च्या दुष्काळाच्या कोणत्याच झळा जाणवल्या नाहीत. त्यावेळी काळाबाजार करणारे व सावकार हे मालामाल झाले. तर सामान्य जनता दुष्काळात भरडली गेली.
काही ठिकाणी अर्धवट दळलेले निकृष्ट प्रतीचे गहू व मका यामध्ये गुळ व तेल घालून जाडेभरडे पीठ (सुकडी) पुरवली जाई. या सुकडी वर अनेक मुलांची गुजराण झालेली आहे. हे विसरता येणार नाही.
त्यावेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री मा.यशवंतराव चव्हाण साहेब हे दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी खेड तालुक्यात येणार आहेत. ही बातमी काही दुष्काळी भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कळली.त्यानुसार त्यांनी रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या लोकांच्या बैठका घेतल्या.
त्यांची एकच मागणी होती रोजगार वाढवून द्या. धान्याचा पुरवठा वाढवा. रोजगाराच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून द्या.तगाई माफ करा. इत्यादी मागण्यासाठी सर्वांनी अमुक अमुक दिवशी खेड तालुक्यात माननीय चव्हाण साहेब दौरा करनार आहेत. त्यांची गाडी खेडला अडवून त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊ. त्यासाठी उपस्थित रहा.असे सांगीतले.
त्याकाळात गाड्यांची कोणत्याही प्रकारची सोय नव्हती. एवढ्या लांबून लोक कसे येणार ही शंका होती. त्यावेळी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एस.पी) मा.श्रीनिवासन साहेब हे होते व मा. श्री विर्क साहेब हे उपाधीक्षक (डी.वाय.एस.पी) होते विर्क साहेब हे नंतर महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक झाले.
खेड तालुक्यातील लोक चव्हाण साहेबांची गाडी अडवणार आहेत हे त्यांना कळले. त्यांनी या ठराविक कामगार कार्यकर्त्यांना बोलावून घेतले.आणि त्यांना सांगितले तुमच्या मागण्यांचे निवेदन आमच्याकडे द्या.आम्ही तुमची निवेदन साहेबांना देतो.परंतु कार्यकर्ते हे ठाम होते. ते म्हणाले की आम्हीच निवेदन देणार. त्यावर त्यांनी सांगितले ठीक आहे. उद्या काही कमी जास्त झाले,जमावाचा उद्रेक झाला, दंगल धोपे झाले तर तुम्हाला जबाबदार धरू.कार्यकर्त्यांना वाटले जमुन जमुन असे किती लोक जमणार? फार फार तर दहा वीस लोक जमतील.असा त्यांचा अंदाज होता.
ठरल्याप्रमाणे चव्हाण साहेब यायच्या दोन तास आधी दुष्काळावर काम करणारे दहा वीस कार्यकर्ते ठरलेल्या ठिकाणी जमा झाले. त्यावेळी काही काँग्रेसचे कार्यकर्ते हारतुरे व ढोल-लेझीम याच्या पथकासह चव्हाण साहेबांचे स्वागत करण्यासाठी थोडे पुढच्या बाजुला जमले होते.कदाचित त्यांना दुष्काळाचे काहीही देणे-घेणे नसावे.
तासाभरात चारही दिशांकडून दुष्काळग्रस्त कामगारांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. त्यात स्त्रियांचे प्रमाण प्रचंड होते. एका तासात काय नियोजन करावे हे पोलिसांना सुचेनाच. श्रीनिवासन व विर्क साहेब कार्यकर्त्यांच्या पुढे येऊन आता काही गंभीर परिस्थिती उद्भवली तर तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल असे सांगून निघून गेले. कार्यकर्त्यांनाही काय करावे हे सूचना.एवढे दुष्काळग्रस्त कामगार या ठिकाणी येथील हे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. हे पाहून सर्वजण अवाक् झाले.पोलीस यंत्रणेला काय करावे काहीच सुचेना.
एवढ्यात चव्हाण साहेबांची गाडी त्या ठिकाणी आली. प्रचंड जमाव जमलेला होता. स्त्रियांनी चव्हाण साहेबांच्या गाडीकडे झेप घेतली.जमाव प्रक्षुब्ध होतो की काय असे वाटले.आणि अशातच एका कामगार कार्यकर्त्यांनी चव्हाण साहेब जिंदाबाद ही घोषणा दिली.आणि काय आश्चर्य प्रक्षुब्ध झालेला जमाव शांत झाला.
चव्हाण साहेब गाडीतून बाहेर आले. कार्यकर्त्यांनी त्यांचे निवेदन चव्हाण साहेबांकडे दिले.चव्हाण साहेबांनी निवेदन वाचल्यावर कामगारांना सांगितले.
मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करीत आहे. परंतु या सर्व गोष्टीसाठी कमीत कमी आठ दिवस लागतील.असे म्हणून चव्हाण साहेब गाडीत बसले आणि ते हार-तुरे न स्वीकारता पुढील दुष्काळी दौरा करण्यासाठी दावडी, वाफगाव भागाकडे रवाना झाले..
चव्हाण साहेबांनी बऱ्याचशा मागण्या मान्य केल्या.त्यावेळी तगाई हा प्रकार होता.शासनातर्फे जनावरांना चारा दिला जाई. व ठराविक दिवसांनी त्याचे पैसे शासनाकडे भरणा करावे लागत. तगाईची नोंद सात बारावर केली जात असे.
त्यावेळी पाळीव जनावरांसाठी छावण्या ही संकल्पनाच त्याकाळात उदयाला आली नव्हती. खोल खोल विहिरी खोदुन भूगर्भातल्या बँकेत पाण्याचे साठी काही प्रमाणात जादा कष्ट घेऊन उपलब्ध होते. त्यामुळे त्याकाळात बऱ्याचशा विहिरींची कामे झाली.विहिरीवर नंतर मोटा बसवण्यात आल्या. थोडक्यात जरी दुष्काळ पडला होता तरी भूगर्भात पाण्याचे साठे भरपूर होते.
त्यावेळी आठवड्याला चार किलो बेचव निकृष्ट दर्जाचे धन्य मिळत असे. घरात खाणारी तोंडे जास्त असत मग अशावेळी त्या धान्यात काही रानातील भाजीपाला कंदमुळे घालून गिरगिटा बनवला जाई.व ते अन्न बळे बळे पोटात ढकलले जाई. फक्त कसेतरी जगायचे हा एकमेव उद्देश होता.
त्यावेळी आपला देश विकसनशील असल्यामुळे दुष्काळग्रस्तांसाठी जास्त निधी खर्च करणे शक्य नव्हते. 1972 च्या दुष्काळाच्या झळा अनेक लोकांनी सोसल्या व अनुभवल्या त्या काळातील लोकांना विचारले की अजूनही त्यांच्या अंगावर काटा येतो. डोळे पाण्याने डबडबले जातात.
परंतु आता काळ बदलला. भारत विकासाच्या मार्गावर आहे. आपल्या भागात एमआयडीसी आहे काही ठिकाणी रोजगार उपलब्ध आहे. त्यामुळे शक्यतो खाण्यापिण्याची आबाळ होत नाही. परंतु पूर्वी रोजगाराचे कोणतेच साधन उपलब्ध नव्हते. आज खाण्या पिण्या व्यतिरिक्त दुसऱ्याच गरजा महत्वाच्या वाटतात.1972 च्या दुष्काळात पोटाला अन्न आणि पिण्यासाठी पाणी हीच एकमेव गरज होती. आणि सरकार ती पुरवू शकत नव्हते.