धुओली गावचा कायापालट
खेड तालुक्यातील पश्चिम भागात धुओली गाव छोटे असल्यामुळे शक्यतो मोठी यात्रा तेव्हा भरत नसे. परंतू दत्त जयंतीचा उत्सव मोठया उत्सहात पार पडायचा. सा-या भागाला या छोटया यात्रेचे आकर्षण असायचे. याचे प्रमुख कारण म्हणजे भागात यात्रेचा हंगाम साधारण मार्च नंतर असायचा.आणि दत्तजयंती डिसेंबर महिन्यात असायची.
धुओली गावातील कार्यकर्ते अत्यंत नेटकेपणाने कार्यक्रमाचे नियोजन करायचे. दत्तजयंती निमित्ताने दोन दिवस क्रिकेटच्या भव्य स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. रात्री मोठया भव्य पडद्यावर मराठी चित्रपट असायचे. त्यामुळे या यात्रेचे आम्हाला प्रचंड आकर्षण आसायचे.
धुओली गावचे मुंबईकर पुणेकर व इतर ठिकाणी असलेले गावकरी झाडुन यात्रेनिमित्त हजर असायचे. गावात एक नवचैतन्य यायचे. क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक नामांकित संघ दाखल व्हायचे. गाव गर्दीने फुलुन जायचे. परंतु कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ भांडण तंटा न होता मोठ्या शांततेत क्रिकेटचे सामने रंगायचे.
दुस-या दिवशी सेमी फायनल व फायनलचे सामने व्हायचे. बक्षिसाची रक्कम अतिशय तुटपुंजी असायची.परतु बक्षिसाची पर्वा न करता गावाच्या नावाने खेळायचे व आलाच नंबर तर गावाचे नाव रोशन होइल.ह्या एकच विचारांनी प्रत्येकजण प्रेरित व्हायचा.
तेव्हा स्वतापेक्षा गावाला जास्त किंमत होती.गावाभिमाण प्रत्येकाच्या नसानसात संचारलेला असायचा.आम्हीही मग टिमची जमवाजमव करायचो.परंतु अनेक नामांकित संघापुढे आमची डाळ शिजायची नाही.आम्ही नाराज व्हायचो,हाताश व्हायचो.परंतू हे फक्त थोडावेळापुतं चित्र असायचं.नंतर काही वेळाने हारलेले संघ आमच्या सोबतीला यायचे आणि आमचे दुख: हालके व्हायचे.
संध्याकाळी गावात यात्रेच्या निमित्ताने पुरण पोळ्यांचे जेवण असायचे. मी माझा मित्र श्री सुनिल वाघमारे याचा मावसभाऊ श्री राजू जठार यांच्या घरी जेवायचो.तेथुनच एखादी गोधडी घेऊन मंदिराच्या पटांगणात जायचो. तेथे पटांगण गर्दीने खच्चून फुलून गेलेले असायचे.आम्ही पण जिथे जागा मिळेल तेथे बसायचो.
समोर एक भव्य असा पांढरा पडदा लावलेला असायचा.त्या समोरच २०-२५ फुटावर मशिन असायची त्या मशिनचा फ्लँश पडद्यावर पडायचा.व हळूहळू चित्र दिसायचे.
याच पटांगणात धुमधडाका,आली अंगावर,संत ज्ञानेश्वर ,संत सखू असे अनेक चित्रपट पाहिले आहेत.
त्यानंतर धुओली गावच्या कार्यकर्त्यांनी नंतर चैत्र महिन्यात भैरवनाथाची यात्रा भरवण्याची धाडसी परंपरा सुरू केली.व पहिल्याच यात्रेला त्यांनी त्याकाळातील अत्यंत नामांकित असे कानसे माळवाडीचा भारूडाचा कार्यक्रम ठेवला.तेव्हा ते भारूड आंबेगाव व जुन्नर अत्यंत गाजलेले होते. त्यावेळी दुरदर्शनवर त्यांचा कार्यक्रम झाला होता.व हे भारूड प्रथमच खेड तालुक्यात धुओलीकरांनी आणले होते.
त्यामुळे पश्चिम भागातील संपुर्ण समाज धुओली मध्ये भारूड पाहण्यासाठी आपापल्या गोधड्या घेऊन हजर होता. प्रचंड गर्दीने पटांगण भरून गेले होते,दाटीवाटीने लोक बसले होते. धुओली गावात "न भुतो,न भविष्यती " असा समाज जमला होता.
प्रचंड समाजापुढे गाव खुजा दिसत होता.प्रत्येक घरातील पुरणपोळ्या कधीच संपल्या होत्या.नंतर प्रत्येक घरातील गावकरी पाहुण्यांना नुसताच डाळभात वाढत होते.
एव्हाना देवाच्या पालखीचा कार्यक्रम सुरू होऊन संपला देखील होता. परंतु भारुडाची गाडी अद्याप आलेली नव्हती.
भारूडाची गाडी यायला खुप उशिर झाला होता.तरीही समाज एकाजागी स्थीर होता. आणि एकदाचे भारूड आले. अर्ध्या तासात स्टेज उभा राहून भारूड सुरू झाले. अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी सादर केला. लोक भान हरपून भारुडाचा कार्यक्रम पाहू लागले. हास्याचे फवारे उडू लागले.
धुओली गावात पूर्वी खूप गट तट होते.नंतर खुप मोठी क्रांती झाली.गाव एकत्र आला.अनेक योजना राबवल्या . मंदिराचे काम सभामंडप व इतर कामे यात कै.श्री सुभाष जठार हवालदार साहेब यांचा सिंहाचा वाटा होता. गावक-यांनी त्यांच्या सन्मानार्थ त्यांची आठवण म्हणुन भव्य कमान बांधली आहे.
गावात श्री पांडुरंग जठार (मा.सरपंच ), श्री शरद जठार (उप सरपंच),सामाजीक कामाची आवड असणारे श्री संजय जठार उद्योजक, श्री हरिदास जठार,उद्योजक,श्री.भिमाजी जठार व इतर अशा अनेक तरूण कार्यकर्त्यांची फौज तयार झाली. श्री पोपट कोरडे यांचे गावासाठी सतत योगदान राहिले आहे.
पश्चिम भागातील एक आदर्श नेतृत्व म्हणून शरद जठार यांचा उल्लेख करावा लागेल. ते उपसरपंच असताना त्यांनी गावात अनेक विकासाची कामे खेचून आणली. विकासाच्या बाबतीत आज पश्चिम भागात गावाने आघाडी घेतली आहे ही नक्कीच समाधानाची बाब आहे.
धुओली इथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. अतिशय नेटका कार्यक्रम केला जातो. पुणे मुंबई राजगुरुनगर येथे असलेले सर्व लोक सप्ताहाच्या कार्यक्रमाला गावाला येतात. अतिशय आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते.
धुओली गावच्या कै.सुभाष जठार व इतर कार्यकर्त्यांनी मंदोशी व शिरगावच्या ग्रामस्थांना एकत्र आणून सुळ्याच्या महादेवाच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला. अतिशय उंच डोंगरावर असलेले हे मंदिर. या मंदिराचा कायापालट करण्याचे काम हे धुओली गावच्या कार्यकर्त्यांचे आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुणे मुंबई चाकण खेड किंवा इतर बाहेरगावी राहणा-या धुओलीकरांचे गावावर प्रचंड प्रेम आहे.आणि ते असलेच पाहिजे. कारण काळाच्या ओघात गावाचे गावपण रितीभाती व जुन्या परंपरा टिकवून ठेवणे हे आपल्याच हातात आहे.