शाई व पेन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शाई व पेन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शाई व पेन

शाळेत असताना ज्या साहित्याची खूपच मदत झाली आणि प्रसंगी त्रास खूपच झाला अश्या गोष्टी म्हणजे शाई व शाईपेन. अक्षर चांगलं येतं या गैरसमजातून तसेच हुशार विद्यार्थी वापरतात म्हणून खरं तर याचा वापर करायचो आम्ही. शेवट पर्यंत अक्षर सुधारले नाही हा भाग वेगळा.

साधारण पाचवी पासून पाचवीलाच पुजलेला हा शाई पेन आता फारसा दिसत नाही, परंतु ८० च्या दशकात याची खूप चलती होती.

त्यावेळी पन्नास पैश्याची निब व २-३ रुपयचा शाईपेन दुकानात मिळे. त्यावेळेस किराणा दुकान म्हणजे लोकल मॉलच. किराणा कापड शालोपयोगी वस्तू इतकंच काय लग्नाचं वाण सामान व मयताचं सामान ते ही ऊधारीवर सहज उपलब्ध होणारं हक्काच ठिकाण म्हणजे किराणा दुकान. 

त्यामुळे वह्या कंपास पुस्तके शाईपेन, बॉल (पॉईंट) पेन, शाई, रिफीलच्या चाराण्याच्या कांड्या, जॉटर रिफील किराणा दुकानात सहज उपलब्ध होत असे. 

स्टेशनरीचे स्वतंत्र दुकान असते हे माहित नव्हते आम्हा बालकांना.

एकदा घरी शाईची अख्खी बाटली वडिलांनी आणलेली, पण आमच्या कुशल हाताळणीमुळे महिनाभर सुद्धा टिकली नाही. 😅 नेमकी कोणी फोडली याचा शोधही लागला नाही. परिणाम एकच झाला. किराणा दुकानदाराला पाच पैसे देऊन पेनात शाई भरुन घेण्याची उज्वल परंपरा पुन्हा सुरु झाली.

शाई पेन वापरायची हौस व अक्कल यामध्ये काहीतरी अंतर असते किंवा असावे हे आम्हास अर्थातच मान्य नव्हते. सर सांगतात म्हणून आम्ही शाईपेन वापरायचो.

वडिलांनी निब असणारे शाई पेन आणून दिले की निब रुळावी (नवीन सुनेला जसे सासरचे रुळवतात) त्याहून अधिक मायेने आम्ही त्या निबला रुळवायचो.त्या निबला उमटवण्यासाठी तिच्यावर अत्याचारही खूप करायचो.

म्हणून आम्ही दिसेल त्या वहीवर लेखनाचा सराव करायचो. आपले संपुर्ण नाव वहीच्या समोरील पृष्ठांवर तर लिहायचोच. पण मध्ये शेवटीही टाकायचो.

शाईपेन त्यावेळचे तांत्रिकदृष्टया परिपूर्ण नसत. म्हणजे शाई भरताना व प्रत्यक्षात लिहिताना शाई पेनाशी फारकत व आमच्याशी जवळीक साधण्याचा हमखास प्रयत्न करायची. त्यामुळे अंगठा तर्जनी व मध्यमा यापैकी कोणत्या तरी वा सर्वच बोटाबरोबर हमखास व रोजच रंगपंचमी खेळे.

त्यावेळेस शाई एकतर साधारणतः निळी (सर्व छटा मिळून) व काळी या दोनच रंगात उपलब्ध असे. सुटया स्वरूपात हिरवी लाल जांभळी शाई अजिबात मिळत नसे. 

ती कमतरता नंतर विविध रंगांच्या स्केचपेनने भरून काढली.पण लोचा असा की ते रंगीत स्केच एकटे यायला घाबरत क्रेयॉन कांड्या असोत की स्केच पेन पूर्ण सेटच खरेदी करावा लागे. ज्यासाठी घरचे अनुदान देताना नेहमी खळखळ करत.

आमचे स्केच पेनचे खेळ म्हणजे खोलून आतली रिफील चेक करणे सुकली आहे असे वाटल्यास पाणी टाकणे. ते करताना हात गिरबडून घेणे. 

अंदाज चुकून पाणी जास्त टाकले गेले मूळ शाई खालून वाहून गेल्यावर तोच गिरबडलेला हात कपाळावर मारून घेणे.

स्केचपेन मध्ये कांडी टाकून त्याचे बॉल पेन मध्ये रुपांतर करणे. यात रिफील कांडी थोडी कट करावी लागत असे. नेमकी कट झालेली नसेल तर लिहिताना कांडीचे टोक आत गायब होई मग त्यावर उपाय काय तर नळीच्या मागच्या टोकाला कागदाचा बारीक बोळा टाकून कांडीचे कायम बाहेर राहील अशी व्यवस्था करायची. 

पण बऱ्याचदा मागची बाजू हवाबंद होऊन कांडी काम करायचे थांबवी मग बाहेर काढून मागून फूक मारून पुन्हा तिला लिहायला तयार करावं लागे. अशा बऱ्याच गमती जमती सुरु असत.

त्यावेळच्या वह्या ह्या शाईपेन वापराकरिता अजिबात सुसह्य नसत. त्यांचे शाईशी व निबशी काय वाकडे होते देव जाणे. पण कागदाचा धागा वा तशाच प्रकारचा भाग हमखास निबमध्ये अडके. त्यामुळे शब्द कागदावर कसेतरी उमटत किंवा कॅलोग्राफी प्रमाणे उमटत. 

त्यातही एखाद्याच शब्दास ठळक रूप देत. बऱ्याचदा टायटल साधे तर इतर लिखान बोल्ड स्वरूपात येई. काही वेळा पुढील सगळेच काही शब्द बोल्ड तर काही सामान्य उमटत. 

आम्ही निबची साफसफाई जमेल तशी करायचो पण त्या नादात निबच्या दोन टोकांपैकी एक हमखास तुटे. व ते वहीवर अक्षरे उमटवण्यास असहकार्य करी. तरीही बळजबरी केल्यास उरलेले दुसरे टोक ही मोडे व आमचा खोळंबा होई. 

सर डिक्टेशन देताना लिहिण्याची कितीही भारी Acting केली तरी सरांच्या बाकामधल्या राऊंडला ती उघडकीस येऊन एखादा रट्टा चुकी नसतानाही बसे. कारण सरांचा आमच्यापेक्षा निबवर जास्त भरोसा.

तूच काहीतरी उद्योग (आताच्या भाषेत उंगल्या) केले असणार म्हणून निब मोडली असा पुराव्याशिवाय सर निष्कर्ष काढून मोकळे होत. 

पण घरी जाताना खिशात पैसे नसल्याने व दुकानदार आम्हास ऊधार द्यायला तयार नसल्याने तसेच घरी यावे लागे. 

दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना निब घेऊन शाळेत गेलो तरी गृहपाठ अपूर्ण म्हणून पुन्हा उत्तरपूजा ठरलेली.

खराब क्वॉलीटीमुळे वहीवर एकाच पृष्ठांवर लिहिले की ते पाठीमागे स्पष्ट उमटे. त्यामुळे Affidavit प्रमाणे एकाच पृष्ठावर लिहिण्याचा प्रसंग वारंवार येई . . 

ह्या शाई पेनाची निब मुद्दामच उघडी ठेवून जर पुढील बाकावरील विद्यार्थी मागे टेकला तर त्याचा मांजरपाटाचा शर्ट हमखास रंगे त्यावरून पुन्हा भांडणे मारामाऱ्या होत असत. 

अशा गंमती जमती होत असल्यतरी शाई पेनाने लिहायची आवड होती निदान दहावीपर्यंत तरी. नंतर बॉलपेन व जेलपेन यांचा जमाना आला. शाईपेनाचे अस्तित्व धोक्यात आले. पण जुन्या आठवणी अजूनही ताज्याच आहेत 

विवेक देशमुख


सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस