पूर्वी सात जूनला शाळा सुरू व्हायच्या. आकाशात ढग काळे काळे ढगही घोगवायला सुरुवात व्हायची. तोपर्यंत पश्चिम भागातील सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या असायच्या. पेरण्या झाल्यावर सात आठ दिवसात नियमित पावसाला सुरुवात व्हायची. प्रसंगी खूप पाऊस पडायचा. नदीच्या पलीकडे जायला उतार व्हायचा नाही.गुरेढोरे घरातच बांधून ठेवावी लागायची.
चार-पाच दिवस सतत धुवाधार पाऊस पडायचा. ओढे नाले दुथडी भरुन वहायचे. नदी नाल्यांना पूर यायचा. सारा गाव ओढ्याला किंवा नदीला आलेला पूर पाहायला जायचे.
पुरामध्ये रानातून झाडाचे मोठेच्या मोठे ओंडके वाहून यायचे. वाहून आलेले कोंडके क्षणात गायब व्हायचे. तर थोड्याच वेळात परत दूरवर वाहत गेलेली दिसायचे. हे पाहताना मोठी गंमत वाटायची.
अशातच गावातील एखादा पट्टीचा पोहणारा अंगातील कपडे काढायचा. त्याला जोडी कधीतरी आणखी एखादा असायचा. त्यांना एवढ्या मोठ्या पुरात उडी घेऊ नको असे जुने जाणते लोक सांगायचे. परंतु पोहणारे ऐकेल तर शपथ ! त्याला आणखी चेव यायचा.
आणि अशा पुरतच तो उडी मारायचा. क्षणात दिसेनासा व्हायचा.पाहणाऱ्याच्या ह्रदयाचे ठोके चुकायचे. एकच थरकाप व्हायचा. लोक श्वास रोखून पाहू लागायचे. काहीजण देवाला हात जोडायचे.
आणि इतक्यात पोहणा-याचे दूरवर छोटेसे डोके दिसायचे. बघणाऱ्यांच्या जीवात जीव यायचा. पोहणारा पलीकडे जायचा. थोडावेळ थांबून परत पुरामध्ये उडी मारून अलीकडे यायचा. बरेच जण त्याचे कौतुक करायचे. त्यावेळी हिंदकेसरी पुरस्कार मिळाल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायचे.
थोडा पाऊस वाढल्यावर अनेक जणांच्या शेतामध्ये नदी ओढे नाल्यांनी चढणीचे मासे वर चढायचे. ते मासे शेतात दूरवर लांब जायचे. लोक मासे पकडण्यासाठी येंडी घेऊन नदीच्या काठाला इकडून तिकडे फिरताना दिसायचे, उगाचच एकमेकांना किती मासे पकडले आहेत असे विचारायचे. अजूनही मोठा पाऊस झाला तर लोक मासे पकडायला नदीवर जातात.
हे सर्व करत असताना भाताची रोपे भात लावणी करायला तयार असतात. मग सुरू होते अवनी. अवनीच्या कालावधीत संपूर्ण गावात कुणीच माणूस दिसत नाही. सर्वजण शेतात भाताची आवणी करायला गेलेले असतात.
भातशेतीची आवणी झाल्यावर काही लोक नाचणी व सव्याची अवनी करायचे. आता नाचणी आणि सावा पीक घेताना कोणी दिसत नाही.
बऱ्याच शेतकऱ्यांचे अवणीचे कामे बऱ्यापैकी झालेले असते.
अशातच येतो श्रावण महिना. श्रावण महिन्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी.
नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. स्त्रियांना दिवसभर उपवास असतो. त्या दिवशी अनेक स्रिया ज्वारी किंवा बाजरीच्या लाह्या व राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू गुळाचा पाक घालून करतात. हे लाडू आता करतात की नाही माहीत नाही परंतु हे लाडू फारच स्वादिष्ट असतात, एवढे मात्र खरे..
पंचमी झाल्यावर अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे उरकली असायची.पावसाचा जोरही बर्यापैकी कमी झालेला असायचा. लोकांना गुरा ढोरा शिवाय काम नसायचे. सकाळी गवत कापून आनायचे.जेवण झाल्यावर कोणाच्या तरी येथे पत्त्यांचा डाव मांडून मेंढीकोट खेळत बसायचे, व दुपारी गुरे चारण्यासाठी रानात किंवा माळावर जायचे. एवढाच उद्योग असायचा.
प्रत्येक गावात दोन-तीन जण हमखास त्यांच्या घरात नागपंचमी झाल्यावर धार्मिक ग्रंथ लावायचे. त्याकाळात नवनाथ,पांडवप्रताप, हरिविजय, रामविजय इत्यादी ग्रंथ सुरू करायचे.
त्याकाळात करमणुकीची साधने नव्हती, गावात कुणाकडेही टीव्ही नव्हता, एखाद दोघांकडे फक्त रेडिओ असायचा. त्या रेडिओला एव्हरेडी कंपनीचे सेल असायचे. सेल संपल्यावर जवळजवळ रेडिओ बंद असायचा. घराच्या सर्व भिंती राखेने सारवल्या जायच्या. घरातील खालची जमीन शेणाने मस्तपैकी सारवून घेतली जायची, यासाठी शेजारीपाजारी बाया मदत करायच्या.
त्यानंतर बाहेर ओटीवर चौरंग मांडला जायचा. रेशमी कापडात धार्मिक ग्रंथ ठेवला जायचा. शेजारी समई मांडलेली असायची. उदबत्त्या लावल्या जायच्या, संध्याकाळी जेवण झाल्यानंतर अनेक बाया व पुरुष ग्रंथ ऐकण्यासाठी जमायचे. एक जण वाचायला असायचा तर दुसरा ग्रंथांचा अर्थ समजावून सांगायचा, नवनाथ ग्रंथात नाथांच्या अनेक सुरस कथा देहभान विसरून ऐकल्या जायाच्या. त्यांच्याप्रमाणे मंत्र म्हणून आपल्यालाही नाथा सारखे करता येईल काय ? यासाठी आम्ही काहीजण त्यांच्यासारखे प्रयत्न करायचो.
प्रत्येक ग्रंथ वाचल्यावर पुढे काय होणार याची प्रचंड उत्सुकता वाटायची. रामायण ग्रंथ ऐकायला खूप मजा यायची. आमच्याकडे श्री सुदाम बारवेकर मंदोशी हे ग्रंथ फार सुंदर व तारस्वरात वाचायचे.
आम्ही पण ग्रंथ वाचायचो पण प्रत्येकाला श्री सुदाम बारवेकर यांच्यासारखा ग्रंथ आपल्यालाही वाचायला यायला पाहिजे असे वाटायचे. अध्याय सांगायला आमच्याकडे श्री लक्ष्मण मोहन महाराज मंदोशी हे वेगळे संदर्भ देऊन ग्रंथांचे अर्थ सांगायचे.
आम्हाला या दोघांचा फार अभिमान वाटायचा. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे या जोडी सारखी ही त्यांची जोडी होती. गावातील अनेक बायामाणसे ग्रंथ ऐकायला येताना प्रसाद घेऊन यायच्या.
ग्रंथांचे पारायण संपल्यावर दररोज संध्याकाळी सर्वांना प्रसाद वाटला जायचा. प्रत्येक ग्रंथांमध्ये साधारण 40 अध्याय असायचे.
हा कार्यक्रम जवळजवळ महिनाभर चालायचा. त्यामुळे चांगल्या प्रकारची करमणूक व्हायची. त्यानिमित्त लोक एकत्र यायचे. एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीव व्हायची. लोक एकमेकांना मदत करायचे. एकमेकांबद्दल प्रत्येकाला आपुलकी व प्रेम असायचे.
एखाद्याच्या घरात कुठलाही सणवार किंवा काही विशिष्ट पदार्थ केला तर हमखास चार-पाच घरात हा पदार्थ दिला जायचा.
श्रावण महिना संपल्यानंतर ग्रंथांची समाप्ती असे. समाप्तीच्या दिवशी बाजारातून समाप्तीचा बाजार आणला जाई.
अनेक नातेवाईकांना पै पाहुण्यांना ग्रंथाच्या समाप्तीची आमंत्रण दिले जात. गावातील सर्व वाड्या-वस्त्यातील प्रत्येक घराला समाप्तीचे आमंत्रण दिले जाई.
सकाळपासून घरात मोठे धार्मिक वातावरण असे. चाफ्याची फुले व रानातील वेगवेगळी फुले आणून मुली त्यांच्या माळा बनवत. घरातील जमीन स्वच्छ सारवली जाई. नदीवरून कळशीत पाणी आणले जाई, खरोशी वरून बेल आणला जाई. शिरगाव वरून दिगू तात्या या ब्राह्मणाला आणले जाई.
गावातील सर्व जण समाप्तीच्या सार्वजनिक स्वयंपाकाला हातभार लावत. आमटी, भात व शाक भाजी हा जेवणाचा मेनू असे. संध्याकाळी शेवटचा ग्रंथ वाचून ग्रंथाची समाप्ती होई. त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा.
पोथी वाचल्यावर आरती वगैरे झाल्यावर लोकांना प्रसाद वाटला जाई. त्यानंतर जेवणाच्या पंगती बसत. त्यावेळची आमटी भात व शाकभाजीची चव अजूनही विसरता येण्यासारखी नाही.जेवण झाल्यानंतर आलेल्या पाहुण्यांना बिडी काडी पानसुपारी दिली जाई. आणि त्यानंतर भजनाचा कार्यक्रम सुरू होई.
अलंकापुरीने भजनाची सुरुवात होत असे. रात्री दोन वाजेपर्यंत भजन चालायचे. भजना वाल्यांना दोन वेळा चहा पाणी व्हायचे. तोपर्यंत लहान मुले झोपी गेलेली असत.
असाच एकदा मी झोपी गेलेलो असताना स्वप्नात देव व राक्षसांचे तुंबळ युद्ध पहात असताना आईने अचानक मला जागे केले. तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. समाप्तीला आलेले पाहुणेरावळे
एव्हाना निघून गेले होते. वडीलही शिक्षक असल्याने शाळेला निघून गेले होते. घरात आई आणि मीच असल्याने सर्व घर खायला उठले आहे असा भास होत होता.
रामदास तळपे