मंदोशी गावचा पार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मंदोशी गावचा पार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंदोशी गावचा पार

                      
 मंदोशी गावचा पार

आमच्या मंदोशी गावचा अभिमान व गावाचे वैभव म्हणजे गोठणी वरचा पार आणि त्यावर असलेले वडाचे व पिपरीचे झाड. गोठणी वरील पारावरच्या  कितीतरी आठवणी गावच्या प्रत्येकाच्या ह्रदयातअगदी ताज्या आहेत.
 
गावचा पार साधारणपणे सन १९०२ साली ग्रामस्थांनी बांधला होता. हे भुमी अभिलेख कार्यालय खेड मधिल जुन्या दस्तऐवजा वरून स्पष्ट होते.
गोठणीवरील पार जरी ओबडधोबड असला तरी त्यावर असलेले वड व पिंपरीचे डेरेदार वृक्ष गावची एक शान म्हणुन उभे होते. वड व पिंपरीच्या झाडावर अनेक पक्षी घरटे करून असायचे. सतत या पक्षांचा किलबिलाट कानावर ऐकू यायचा.

या गोठनी वरील पारावर आमच्या गावच्या यात्रेच्या बैठका व्हायच्या. गावात नेहमीच दोन गट असायचे.या पारावर, ग्रामस्थांचे यात्रेच्या बैठकीत कितीतरी वादविवाद व्हायचे. परंतु ते कधीच विकोपाला जात नसत. हे वाद फक्त पारावरच चालत.

पारावरील बैठकांमध्ये गावच्या यात्रेला भव्य करमणुकीचे कार्यक्रम आणन्याबाबत चर्चा व्हायच्या. गावच्या यात्रेची वर्गणी ठरायची.लोक यात्रेसाठी भरघोस देणग्या द्यायचे. मा.रघुवीर खेडकर, मा.पांडुरंग मुळे, मा.शंकरराव कोकाटे, मा.भिका भिमा, मा.गणपत व्ही.माने, मा.मालती इनामदार, मा.लता सुरेखा पुणेकर असे कितीतरी नामवंत तमाशे गावच्या यात्रेसाठी आणले गेले आहेत.यासाठी या पारावर यात्रेचे संपूर्ण नियोजन होत असे.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता भारूड किंवा तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम या पारावर व्हायचा.आहुप्याचा तमाशा, भिवेगावचा तमाशा,उगलेवाडीचा तमाशा, जावळेवाडी चा तमाशा व कितीतरी प्रसादिक भारूडांचे खेळ आम्ही बर्फाची गारीगार खात पहायचो.या पाराच्या परिसरात लोकांची तुफान गर्दी असायची.तमाशा किंवा भारूडांच्या हजेरीचा कार्यक्रम पहायला गावचे व पंचक्रोशीतील लोक तुफान गर्दी करायचे.लाल बर्फाची गारीगार खात कार्यक्रम पहायचा.ही मोठी वेगळीच मजा असायची.

रेवडया व लाल शेंगुळ्या, लाडु, भेळेची दुकाने, काचेच्या बांगडयांची दुकाने,कलिंगड,द्राक्षे ,विविध खेळण्यांची दुकाने यात्रेच्या दुसऱ्या दिवशी या परावरील गोठणीवर असायची.
      
यात्रेला आलेल्या पाहुण्या रावळ्यांना,बायाबापड्यांना व लहान मुलांना रेवड्या,खाऊ,खेळणी,बर्फाची गारेगार व बायकांना बांगडया भरण्यासाठी गोठणीवर खुप गर्दी व्हायची.अर्थात हे सर्व यात्रेच्या दुसऱ्या दिवशीचे चित्र असायाचं.

गोठनी वरील पारावरील वड आणि पिपरीची तांबडी व चाँकलेटी रंगाची गोड,तुरट फळे खाण्यासाठी गावातील आम्ही मुले दिवसभर पारावर असायचो. दिवसभर एकच गोंगाट व्हायचा.

गोठणीवरील पारावर दरवर्षी  घिसाडी यायचा.त्याचा मोठा लाकडी भाता लावायचा. गावातील व पंचक्रोशीतील शेतकरी नवीन कोयते,विळे,पहारी,खटारगाडीच्या लोखंडी धावा बनवून घेत.घिसाड्याचा मुक्काम आठ दिवस गोठणीवर असायचा.

गावातील कुणाचा बैल बडवायचा असेल तर  या गोठणीवर कै.किसन चांभार बैल बडवायचा. कुणाच्या बैलाच्या पायात काटा भरला असेल तर काटे काढायचा.त्यासाठी बरेच लोक त्यांना मदत करण्यासाठी जमत.

या गोठनीवरील पाराजवळ उन्हाळ्यात अनेक गाई, गुरे-वासरे वड व पिंपरीच्या झाडांच्या सावलीत बसायाची व रवंथ करायची.

गोठनीवरील मैदानात मुले सुट्टीत दिवसभर क्रिकेट खेळायची. व शेजारीच असलेल्या गाव डोहात पोहायचो.गावडोहात पोह ण्याची मजा वेगळीच होती.या गोठणीवर मी सायकल चालवायला शिकलो. कितीतरी वेळा पडलो.गुडघे,कोपर फुटले.परंतु सायकल चालवायला शिकलोच.

गावात लग्नाला आहेर व रूखवत घेऊन आलेल्या बायका या पारावर बसायच्या व गावात आल्याची वर्दी द्यायच्या.नंतर वाजंत्री गोठणीवर येऊन लग्नाचे आहेर वाजवत गाजवत लग्नमंडपा पर्यत घेऊन जात असत

या गोठणीवरून पुढे शिरगावला ओढ्यातुन जावे लागत असे.तेव्हा पुल नव्हता.दगडांचा आडवा बांध होता.व मध्ये एक मोठा दगडी चीरा होता. याला उतार म्हणत.चि-यावरून पाणी गेले तर कुणी पलीकडे जात नसत.

पावसाळ्यात रात्रीच्या वेळी या उतारावरून व गोठणीवरून जाताना खुप भिती वाटे.पाण्याचा खळखळ आवाज व रातकिड्यांची किरकिर अजुनच भेसुरता वाढवी. त्यातच समोर असलेल्या पारावरील वड व पिंपरीचे झाड पाहून खुपच भयानक वाटे.अंगावर काटा येई.परंतू दुसऱ्या दिवशी मात्र तेथून जाताना अजीबात भिती वाटत नसे.

भीमाशंकर रस्ता रिवायडींग  व उड्डाण पुल झाल्यावर गोठणीची बरीचशी जागा  गेली. आणि गोठणीचे अस्तित्व संपुष्टात आले.यात्रेचे व इतर सर्व कार्यक्रम जागे अभावी दुसरीकडे हलवले गेले.व गोठणी वरचे पुर्वीचे वैभव लयाला गेले 

 गोठणीचे अस्तित्व संपल्यावर नियतीला पारावरील झाडांचे अस्तित्व मान्य नव्हती किंवा काय म्हणून 2020 च्या वादळात शेवटची आठवण असणारी वड व पिपरीचे झाडेहीं मुळापासून कोसळली.एकेकाळचे गोठण आणि पार यांचे अस्तित्व काळाच्या ओघात लुप्त झाले.आणि मन सुन्न झाले.नकळत लहानपणापासून ते आतापर्यंतच्या या पारावरील व गोठणीवरील सर्व आठवणी तरळुन गेल्या आणि नकळत डोळे पानावले. कंठ दाटून आला.

बायको व मुले म्हाणाली पप्पा काय झाले तुम्हाला रडायला.?परंतू त्यांना यातलं काय कळनार? गावची शेवटची आठवण नष्ट झाली.कालाय तस्मैय नम: काळाचा महिमा दुसरं काय? 



सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस