पुणे नाशिक रस्त्यावर पुण्यापासून अवघ्या चाळीस किलोमीटरवर असलेले राजगुरुनगर हे गाव म्हणजेच पूर्वीचे खेड अतिशय जुने आणि ऐतिहासिक असे गाव आहे.
गावामध्ये हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंचा वाडा, दिलावर खानाचा दर्गा, दिलावर खानाने बांधलेले त्या काळातील धरण, अगदी पुरतन असलेले सिद्धेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर, आणि गावठाण पासून दोन किलोमीटर असलेल्या तूकईवाडी येथील पुरातन असे तुकाई देवीचे मंदिर हे पुरातन बाबींची साक्ष देतात.त्याचप्रमाणे छत्रपती शाहू आणि ताराबाई यांची लढाई हीदेखील खेड येथे झाली होती.
नव्याने उदयास आलेल्या खेड म्हणजेच राजगुरुनगर येथे आता अनेक सोयी सुविधा झाल्या आहेत. त्यापैकी राजगुरुनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, अतिरिक्त सत्र न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, क्रीडा संकुल, विधी कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, पंचायत समिती, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस स्टेशन, वनविभाग, विविध राष्ट्रीयकृत व सहकारी बँका, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, इलेक्ट्रिसिटी बोर्ड, अशी अनेक कार्यालय राजगुरुनगर मध्ये आहेत.
राजगुरुनगर येथून जवळच असलेल्या चाकण येथे एमआयडीसी कार्यरत असून आशियातील सर्वात मोठे हब आहे. शिवाय विशेष औद्योगिक केंद्र हे सुद्धा राजगुरुनगर जवळ आहे.
राजगुरुनगरचा झपाट्याने विस्तार होत असून विविध मॉल्स, इलेक्ट्रिक मशिनरी, बांधकामाशी निगडित वस्तू, ट्रॅक्टर तसेच विविध कृषी क्षेत्राशी निगडित उत्पादित वस्तू यांचे विक्री केंद्र म्हणून राजगुरुनगर चा उल्लेख करावा लागेल.
राजगुरुनगरचा झपाट्याने विस्तार होत असताना देखील राजगुरुनगर हे राहण्यासाठी उत्तम कोणताही गजबजाट नसलेले अतिशय शांत असे शहर आहे.
पुरातन सिद्धेश्वर मंदिर :
राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि पवित्र शिव मंदिर आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठी वसलेले असून, मंदिरासमोर एक सुंदर भागीरथी कुंड (पुष्करणी) आहे. सिद्धेश्वर मंदिर सन 1725 रोजी बांधले आहे, तर भागीरथी कुंडाचे बांधकाम 12 ऑक्टोबर 1735 रोजी पूर्ण झाले.
राजगुरुनगरचे सिद्धेश्वर मंदिर हे उत्तरमुखी असून, त्यात नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह यांचा समावेश आहे.
शिव मंदिर पूर्णतः दगडाचे आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला भव्य अशा दोन दिपमाळा आहेत. मंदिराच्या समोरच भव्य दगडाचा नंदी असून समोर मारुती मंदिर आहे.
सिद्धेश्वर मंदिराचा इतिहास रंजक आहे आणि या मंदिराचा संबंध नाथ संप्रदायाच्या नवनाथ झुंडी मार्गाशी देखील आहे. मंदिराच्या परिसरात विविध देवतांची मंदिरे आहेत.
पुष्करणी (कुंड):
राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात एक प्राचीन पुष्करणी (कुंड) आहे, ज्याला भागीरथी कुंड असेही म्हटले जाते. या पुष्करणीबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:हे कुंड १२ महिने पाण्याने भरलेले असते.
हे कुंड ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण ते अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात बांधले गेले असावे असा अंदाज आहे अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक मंदिरे आणि पुष्करणी बांधल्या आहेत.
या कुंडाला पायऱ्या आहेत, ज्यामुळे पाण्याच्या पातळीपर्यंत सहज पोहोचता येते. पुष्करणी म्हणजे विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या असलेली विहीर.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या या मंदिर परिसर आणि पुष्करणीला दिव्यांनी सजवले जाते, ज्यामुळे एक सुंदर आणि भक्तिमय वातावरण तयार होते.
पुष्करणी हे केवळ पाण्याच्या स्त्रोताचेच नाही, तर ते प्राचीन स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि धार्मिक विधींसाठी देखील वापरले जाते.
दीपमाळ :
सिद्धेश्वर मंदिराच्या समोरच डाव्या बाजूला अतिभव्य अशा दोन दीपमाळा आहेत. पैकी एक दीपमाळ सांडभोरांची आहे. या दीपमाळा पूर्णपणे दगडामध्ये बांधण्यात आलेल्या आहेत. या दीपमाळ साधारण 25 ते 30 फूट इतक्या उंच आहेत.राजगुरुनगर, खेड येथील तुकाई माता मंदिर हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि प्राचीन देवस्थान आहे.
तुकाई माता मंदिर:
वास्तुशैली:
हे मंदिर हेमाडपंती शैलीत बांधलेले आहे, जी प्राचीन मराठी स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हेमाडपंती शैलीची मंदिरे त्यांच्या मजबूत दगडी बांधकामासाठी आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामांसाठी ओळखली जातात.
गाभारा आणि मूर्ती:
मंदिराच्या गाभाऱ्यात तुकाई मातेची मूर्ती आहे. याशिवाय, गाभाऱ्यातील देवळ्यांमध्ये गणेश आणि नागाच्या मूर्ती देखील पाहायला मिळतात.
बाह्य भाग:
मंदिराचा बाह्य भाग प्रशस्त असून, चारही बाजूंनी दगडांनी वेष्टित भिंती आहेत. हे मंदिर पूर्णतः दगडी बांधकामाचे आहे, जे त्याची प्राचीनता आणि टिकाऊपणा दर्शवते.
कळस:
मंदिराचा कळस हा मराठेकालीन असावा असे मानले जाते. या कळसावर विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, जे मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात.
दीपमाळ आणि इतर मंदिरे:
मंदिराच्या प्रांगणात दीपमाळ आणि तुळशी वृंदावन पाहायला मिळते. तसेच, परिसरात इतर काही देवतांची छोटी मंदिरे देखील आहेत, ज्यात काळभैरवाचे मंदिर देखील समाविष्ट आहे.
इतिहास:
काही लोककथांनुसार, तुळजापूरच्या श्री भवानी मातेची ही मोठी बहीण असून, ती सिंहगडाच्या रामकड्यावरून हिरुबाई कोंडे देशमुख नावाच्या भक्तासाठी खेड येथे येत असताना कोंढणपूरला स्थिरावली.
नवरात्र उत्सव:
नवरात्रीच्या काळात मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. या काळात देवीचा विशेष साजशृंगार केला जातो, जो अतिशय आकर्षक असतो.
स्थानिक श्रद्धास्थान:
तुकाई माता हे राजगुरुनगर, खेड आणि परिसरातील भाविकांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. 'तुकाई' हे नाव 'तुक्क' म्हणजे 'शुक्र' या द्रविड शब्दावरून आले असावे, कारण शुक्रवार हा देवीच्या उपासनेचा महत्त्वाचा वार मानला जातो.
हे मंदिर महाराष्ट्राच्या प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक भाग आहे आणि इतिहास तसेच स्थापत्यकलेमध्ये रस असलेल्यांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
दिलावर खान दर्गा :
दिलावर खान दर्गा राजगुरुनगर येथे आहे. येथे एक ऐतिहासिक दर्गा आणि मशीद आहे, जे एका मोठ्या तटबंदीने वेढलेल्या परिसरात आहे.
ऐतिहासिक माहिती:
हा दर्गा आणि मशीद इसवी सन 1613 मध्ये निजामाचा सरदार असलेल्या दिलावर खान सरदाराने बांधली होती.
या ठिकाणी दिलावर खान यांची कबर देखील आहे.
दर्ग्याच्या अगदी जवळच मशीद आहे, ही मशीद दिलावर खानने बांधली होती.
येथील शिलालेखावर इसवी सन 1613- 14 मध्ये दिलावर खानच्या मुलाचा (रैहान) मृत्यू झाला असल्याचे नमूद आहे.
ही वास्तू निजामशाही राजवटीतील स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, ज्यात कमळाच्या आकाराची नक्षीकाम आणि कमानीदार प्रवेशद्वारे आहेत.
वर्तमान स्थिती आणि महत्त्व:
दिलावर खान दर्गा आणि मशीद ही "राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक" म्हणून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) च्या ताब्यात आहे.
सध्या मशिदीची अवस्था पडझडीची झाली असून ती अंशतः जीर्ण अवस्थेत आहे, परंतु दर्गा अजूनही कार्यान्वित आहे.
राजगुरुनगरमधील हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे.
या ठिकाणी मुसलमान समाज खूप मोठा उरूस साजरा करतात. यासाठी मोठमोठे कव्वालीचे कार्यक्रम आयोजित करतात. या उरसाला मोठ्या प्रमाणात मुसलमान आणि हिंदू उपस्थिती लावतात.
राजगुरुनगर मध्ये पुरातन असे श्रीराम मंदिर, विष्णू मंदिर, लिखिते गणपती मंदिर, चिमण्या गणपती मंदिर, आणि केदारेश्वर मंदिर ही अगदीच पुरातन मंदिरे आहेत.
केदारेश्वर मंदिर:
केदारेश्वर येथे भीमा नदीवर असलेला बंधारा आणि त्यामध्ये विस्तीर्ण असलेला पाण्याचा अथांग सागर हे दृश्य अतिशय रमणीय आहे. अनेक लोक संध्याकाळी केदारेश्वरला जातात. केदारेश्वर हे अतिशय पुरातन असे शिव मंदिर आहे.हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारक :
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ रोजी पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) येथे झाला.
त्यांनी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या संघटनेत काम केले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि सुखदेव थापर यांच्यासोबत त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र लढा दिला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी ब्रिटिश पोलिस अधिकारी सँडर्सवर हल्ला केला.राजगुरूंना २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासोबत लाहोरमध्ये फाशी देण्यात आले. त्यांनी वयाच्या अवघ्या २२-२३ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ खेड गावाचे नाव बदलून राजगुरुनगर असे ठेवण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी प्राणाचे बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यवीर शिवराम हरी राजगुरू यांच्या भीमा नदीच्या काठावर असलेल्या वाड्याला सन 2004 मध्ये राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. राजगुरू वाडा हे शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थान आहे.
हे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र बनावे यासाठी विकसित केले जात असून, त्याचा उद्देश राजगुरूंच्या बलिदानाची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे.
यामध्ये त्यांच्या जन्मखोलीचा जीर्णोद्धार, वाचनालय, उपहारगृह, नदी परिसर सुधारणा आणि विविध सुविधांचा समावेश करण्यात आलेला आहे.
मशीद :
राजगुरुनगर येथे मारुती मंदिरा शेजारी वाडा रोड, येथे एक मशिद आहे ही मशीद अगदीच प्राचीन असून दिलावर खानाने ती बांधली आहे.
त्याचप्रमाणे दुसरी मशीद ही बाजारपेठेत आहे.
आणि तिसरी मशीद एक कुंभार आळी येथे आहे.
जैन मंदिर :
वेशीतून आत गेल्यावर बाजारपेठेमध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूला भव्य असे जैन मंदिर आहे. त्यामध्ये भगवान वर्धमान महावीरांची अतिशय प्रसन्न अशी मूर्ती पाहावयास मिळते.
त्याचप्रमाणे कचेरी रोडला जाताना डाव्या बाजूला कासवा यांच्या बिल्डिंग समोर भव्य असे जैन स्मारक असून तेथे धर्मार्थ दवाखाना आहे. तिथे गरीब लोकांसाठी स्वस्तात उपचार केले जातात.
तेल गिरणी:
पूर्वी राजगुरुनगर हे खाद्य तेलासाठी प्रसिद्ध होते. अनेक तेल गिरण्या राजगुरुनगर मध्ये होत्या. इतिहासात याच्या नोंदी आढळतात. अजूनही तीन-चार तेल गिरणी कार्यरत आहेत.
कासवा बंधू यांची टूरिंग टॉकीज:
पूर्वी राजगुरुनगर मध्ये कासवा बंधू यांची वाडा रोड शेजारी श्री सिद्धेश्वर टुरींग टॉकीज होती. जी आता बंद आहे.
सिद्धेश्वर टॉकीज हे राजगुरुनगरची शान होती. कासवा यांनी हे थिएटर 1961 साली सुरू केले होते. केबल आणि त्यानंतर आलेल्या डिश मुळे लोक घरातच चित्रपट पाहणे पसंत करू लागल्यामुळे हे थिएटर 2001 साली बंद करावे लागले.
राजगुरुनगर मध्ये आता बऱ्याच सुधारणा होताना दिसत आहेत.
जिल्हा सत्र न्यायालय:
आता राजगुरुनगर येथे जिल्हा सत्र न्यायालय सुरू करण्यात आले आहे. खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर या तालुक्यातील कोर्ट केसेस येथे चालतात. तेथे नेहमीच वर्दळ पाहायला मिळते.
विधी महाविद्यालय :
भविष्यातील गरज ओळखून येथे राजगुरुनगर पासून दोन किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक रस्त्याच्या कडेला तत्कालीन आमदार दिलीप मोहिते यांचे अथक परिश्रमातून विधी महाविद्यालय सुरू केले आहे. तिथे अनेक विद्यार्थी न्यायालयीन शिक्षण घेत आहेत.
राजगुरुनगर येथील चांडोली जवळ भव्य इमारतीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (I. T. I.) महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालय:
पूर्वी महा विद्यालयीन शिक्षणासाठी पुणे येथे जावे लागायचे. शिक्षणाची गरज ओळखून तात्कालीन आमदार साहेबरावजी बुट्टे पाटील यांनी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. आणि शासनाकडे महाविद्यालयाची मागणी केली. तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांचे काळात मान्यता देण्यात आली.
आज या महाविद्यालयाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
येथे विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचे वर्ग आहेत.
शिवाय व्यावसायिक शिक्षण सुद्धा या महा विद्यालयामार्फत दिली जाते. पुणे नाशिक महामार्गावर सिद्धेश्वर मंदिराजवळ हे महाविद्यालय आहे. महाविद्यालयासमोर असलेल्या प्रांगणात महाविद्यालयाचे संस्थापक स्वर्गीय साहेबरावजी बुट्टे पाटील यांचा पूर्ण कृती पुतळा आहे.
महात्मा गांधी विद्यालय :
राजगुरुनगर शहरात खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे महात्मा गांधी विद्यालय आणि आदिवासी शिक्षण संस्थेचे हुतात्मा राजगुरू विद्यालय अशी दोन विद्यालय आहेत.
शिवाय तिथेच नर्सरी ते चौथीपर्यंतचे शिक्षण हे मराठी, सेमी आणि इंग्रजी माध्यमातून दिले जाते. महात्मा गांधी विद्यालयाचे भव्य अशी इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण याच्यासह अद्यायावत सुविधा उपलब्ध आहेत.
हुतात्मा राजगुरू विद्यालय हे मराठी माध्यमाचे विद्यालय आहे.
क्रीडा संकुल :
राजगुरुनगर पासून दोन किलोमीटर अंतरावर तिन्हेवाडी जवळ प्रशस्त असे क्रीडा संकुल आहे. तेथे सातत्याने विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते. अनेक लोक संध्याकाळी हलका व्यायाम करण्यासाठी आणि फिरायला जाण्या साठी क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर जात असतात.
खाऊ गल्ली :
हॉटेल विजयश्री:
राजगुरुनगर वाडा रोड एल.आय.सी. कार्यालयासमोर विजयश्री हॉटेल येथे प्रसिद्ध मिसळ आणि कढी वडा प्रसिद्ध आहे. त्यासमोरच नंदू पोखरकर यांचे हॉटेल सुद्धा मिसळ आणि भेळ साठी प्रसिद्ध आहे.
तृप्ती समोसे :
राजगुरुनगर शहरात वर्धमान महावीर जैन स्मारकाजवळ मोठे यांचे अध्यायावत जागेमध्ये चविष्ट असे समोसे मिळतात. हे समोसे घेण्यासाठी संध्याकाळी पाच ते सात या वेळेत लोकांची खूपच गर्दी असते.
हॉटेल दत्त भुवन :
राजगुरुनगर शहरात वेशीच्या आत मध्ये उजव्या बाजूला हॉटेल दत्त भुवन प्रसिद्ध आहे तेथे स्पेशल चहा, कांदा आणि बटाटा भजी, खाजा खूपच प्रसिद्ध आहे. तेथे खवय्यांची अगदी सकाळी खूप गर्दी असते.
हॉटेल गुडलक :
राजगुरुनगर जवळील स्टॅन्ड जवळ असलेले हॉटेल गुडलक येथील मटण आणि चिकन बिर्याणी खूपच लोकप्रिय आहे.
नगरपरिषदे जवळील रावळ यांचे हॉटेल :
राजगुरुनगर येथील नगर परिषदे जवळ रावळ यांच्या हॉटेल मध्ये कांदा भजी आणि मिसळ अतिशय लोकप्रिय आहे. रोज सकाळी येथे खवव्यांची गर्दी पाहायला मिळते.
रविवारी सकाळी येथे भाजी बाजार भरतो. भाजी घेण्यासाठी आलेली अनेक लोक रावळ यांच्या हॉटेलमध्ये गर्दी कमी होण्याची वाट पहात असतात.
हॉटेल कृष्णाई:
पंचायत समिती जवळ असलेल्या चौकात बाबा राक्षे यांच्या इमारतीमध्ये असलेले हॉटेल कृष्णाई हे साउथ इंडियन डिशेस साठी खूपच लोकप्रिय आहे.
त्या ठिकाणी इडली सांबर, वडा सांबर, मसाले डोसा, कांदा उत्तपा, उपीट, पुरी भाजी असे विविध पदार्थ उपलब्ध असतात. तिथे सुद्धा दररोज खूपच गर्दी पाहायला मिळते.
जैन मिठाई :
राजगुरुनगर येथील तिन्हेवाडी रस्त्यावर अगदी लगतच आवटे प्लाझा जवळ प्रसिद्ध अशी ताजी मिठाई उपलब्ध असते तेथे सुद्धा खूप लोक मिठाई घेण्यासाठी जात असतात.
तेथील पेढा, इमरती, ढोकळा आणि फापडा खूपच प्रसिद्ध आहे. सणासुदीच्या दिवसात आणि इतर दिवशीही येथे मिठाई घेण्यासाठी गर्दी होत असते.
हरी ओम पूजा भांडार :
तिन्हेवाडी रस्त्यावर जेथे सात नळ आहेत त्याच्या समोर श्री. यशवंत जाधव यांचे हरी ओम भांडार आहे. या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, पुस्तके, विविध धार्मिक ग्रंथ, अगरबत्ती, विविध प्रकारचे धूप, रुद्राक्ष व इतर सर्व प्रकारच्या माळा, आयुर्वेदिक औषधे उपलब्ध असतात.
अनेक धार्मिक लोक या वस्तू घेण्यासाठी, आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी तेथे गर्दी करत असतात.
कांदा लसूण संशोधन केंद्र :
हे केंद्र भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या अंतर्गत येते.
येथे कांदा आणि लसूण या पिकांवर संशोधन केले जाते.
नवीन जाती विकसित करणे, बियाणे उत्पादन आणि लागवड तंत्रज्ञान सुधारणे, यांसारखी कामे येथे केली जातात.
शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील आयोजित केले जातात.
राजगुरूनगर (पुणे) येथील केंद्र हे कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (Directorate of Onion and Garlic Research) म्हणून ओळखले जाते.
कृषि उत्पन्न बाजार समिती राजगुरुनगर:
खेड कृषि उत्पन्न बाजार समिती ही पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे स्थित आहे आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. या समितीचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे आणि मध्यस्थ, दलाल यांच्याकडून होणारी फसवणूक टाळणे हा आहे.
शेतकऱ्यांचे हित संरक्षण:
शेतीमाल विक्रीतील गैरप्रकार थांबवून शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा हे सुनिश्चित करणे.
नियमन:
बाजारपेठेत होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे, ज्यामुळे पारदर्शकता आणि न्याय सुनिश्चित होतो.
पारदर्शक व्यवहार:
शेतीमालाची विक्री लिलाव पद्धतीने (open auction) होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळतो.
सुविधा:
शेतकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा (उदा. वजन काटे, गोदामांची सोय) उपलब्ध करून दे
बाजारभाव माहिती:
खेड (राजगुरुनगर) आणि चाकण येथील मुख्य बाजारपेठांमधील शेतीमालाचे (उदा. कांदा, काकडी, टोमॅटो, वांगी, बटाटे, मिरची, आले, इत्यादी) दैनंदिन बाजारभाव उपलब्ध करून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री योग्य दराने करता येते.
मुख्य आणि उप-बाजार आवार:
समितीच्या कार्यक्षेत्रात मुख्य बाजार आवार तसेच उप-बाजार आवार (उदा. चाकण) आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार माल विक्रीसाठी आणता येतो.
व्यवस्थापन:
समितीचे कामकाज हे संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांमार्फत चालते. यावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था आणि राज्य स्तरावर महाराष्ट्र पणन संचालक, पुणे यांचे नियंत्रण असते.
इतर उपक्रम:
समिती शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम आणि सोयी सुविधा पुरवते, ज्यामुळे त्यांना शेतीमाल विक्री प्रक्रियेत मदत मिळते.
बाजार :
राजगुरुनगर मध्ये गढई मैदानावर दर शुक्रवारी खूप मोठा असा भुसार मालाचा आणि भाजीपाल्यांचा बाजार भरतो.
त्याचप्रमाणे नगरपरिषदेजवळ दर रविवारी भाजी बाजार भरत असतो.
विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुविधा :
राजगुरुनगर मध्ये शालेय मुलांना राहण्यासाठी अनेक वस्तीग्रह उपलब्ध आहेत. त्यापैकी महाराष्ट्र शासनाने शालेय आणि महाविद्यालयीन मुलांसाठी आणि मुलींसाठी वसतीग्रहांची सोय केली आहे. तेथे मुलांना जेवण आणि राहण्याची सेवा मोफत पुरविली जाते. शिवाय महिन्याला रोख स्वरूपात भत्ता मिळतो.
आता नवीन सिमेंट काँक्रेट चा रस्ता झाल्यामुळे व अंतर्गत रस्ते झाल्यामुळे राजगुरुनगर मधील वावरण्यास खूपच सुटसुटीत पण आला आहे.
माऊली सेवा प्रतिष्ठान :
राजगुरुनगर मध्ये सामाजिक कार्यकर्ते, तथा समाजसेवक हे श्री.कैलास दुधाळे यांनी समाजापासून वंचित असलेल्या, अंध, अपंग, गरीब लोकांच्या मदतीसाठी कायमच पुढाकार घेत असतात.
त्यांच्या माऊली सेवा प्रतिष्ठानने समाजा पासून वंचित असलेल्या लोकांसाठी आतापर्यंत खूपच महत्त्वपूर्ण काम केले आहे. यासाठी शहरातील अनेक दानशूर व्यक्ती त्यांना मदत करत असतात. परंतु त्यांच्या या उपक्रमासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळाला तर त्यांच्या कार्याला गती येईल. यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
व्याख्यानमालेंचे आयोजन :
राजगुरुनगर मध्ये प्रत्येक वर्षी डॉक्टर काजळे हे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करतात. त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर हे सुद्धा प्रत्येक वर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करत असतात.
अनेक नामवंत व्याख्याते राजगुरुनगर मध्ये येऊन व्याख्यान देतात त्याचा लाभ राजगुरुनगर वासियांना होत असतो.
तरीही राजगुरुनगर मध्ये, नाट्यगृह, गार्डन, वृद्ध लोकांसाठी विश्रांती स्थळ यांची आवश्यकता आहे.
रामदास तळपे