Translate

मंदोशी गाव


मंदोशी गाव हे १९९० पर्यत पुर्णपणे दुर्लक्षित असलेले गाव होते.हे गाव  तालुक्यातीलच लोकांना माहित नव्हते.तर बाकीच्यांचे काय घेऊन बसता.

१९९० साली कै.नारायणराव पवार साहेब यांच्या आमदारकीच्या काळात तळेगाव ते तळेघर हा रस्ता मंजूर होऊन लगेचच काम सुरू झाले.गावात पहिल्यांदाच अवाढव्य रस्ता बनवनारा बुलडोझर दाखल झाला. पुर्वी १९७२ च्या दुष्काळात शिरगाव ते तळेघर हा रस्ता मनुष्यबळावर झाला होता.परंतू तो अनेक ठिकाणी नादुरूस्त होता.प्रचंड मोठ्या लोखंडी चेनचा हा बुलडोझर एखाद्या राक्षसासारखा काम करत होता व रस्ता बनवत होता.

शिरगाव, खिंड, शिंबारटाक, मोहनवाडी, घुबाडकपरा, पायर, सोमाना, बोरीचा धस, वरचीमाची, भुमीर, उगलेवाडी फाटा, धायटावना, ना-याचा माळ, मार्गे तळेघर असा जुना मार्ग होता. बोरीचा धस हा मोठा चढ होता. नविन मार्गात बदल केलेला होता. बुलडोझर रस्ता तयार करताना रस्त्यावर येणारी मोठमोठी झाडे एका झटक्यात बाजुला फेकत होता. लोक दररोज काम पहायला जात होते....

संपुर्ण रस्ता सुरूवातीला खडीचा बनवण्यात आला होता.१९९५-९६ ला पहिल्यांदा डांबरीकरण करण्यात आले.

तत्पुर्वी मोहणवाडीच्या पुढे आताचा जो उड्डाणपुल आहे. त्या पुढे ओढ्यावर पुर्व पश्चिम असा छोटा पुल होता. वर संपुर्ण डबर अंथरलेले होते. पुलाखाली पाणी जाण्यासाठी पाच मोठया सिमेंटच्या नळ्या होत्या. पावसाळ्यात अनेक वेळा महापुर आल्यावर पुलावरून पाणी जायचे.व वहातुक बंद व्हायची. पुर आल्यावर खालच्या पुलावर बसुन अनेकांनी विशिष्ट प्रकारे छत्री उघडुन मासे पकडले आहेत.

या पुलाने १९९० साली प्रचंड पुर आला असताना तत्कालीन शेतकरी कै.नारायण हुरसाळे यांच्या बैलाचा बळी घेतला होता.पुरामध्ये बैल पुरात वाहुन जात असताना या सिमेंटच्या नळीतुन वाहून जात असताना एक नळीतच आडकला व तेथेच गतप्राण झाला.कित्येक महिने त्याचा सांगाडा तसाच नळीत होता.

हाच तो मंदोशीचा सुप्रसिद्ध धबधबा 

हा छोटा पुल होण्याआधी या ओढ्यावर पुर्व पश्चिम असा दगडाचा एक बांध होता.मध्यभागी एक उंच दगडी चीरा होता.यालाच लोक उतार म्हणत असत.या चि-यावरून पाणी गेल्यावर लोक पलीकडे जात -येत नसत.

मोहनवाडीमध्ये आता जे शांताबाई वाघमारे यांचे घर आहे तेथे श्री.लक्ष्मण मोहन यांची गवताची पडाळ होती.व कै.शांताराम वाघमारे यांचे शेतात सन १९८५ मध्ये इलेक्ट्रिक नळ होता. या नळावर इलेक्ट्रिक पंप बसवला होता.बटन दाबल्यावर प्रचंड वेगाने पाणी यायचे.सतत लाइट जाणे व सतत होणारे बिघाड या मुळे कंटाळून  इलैक्ट्रिक मोटार काढून १९९१ मध्ये साधा हापसा बसवन्यात आला.

त्याही पुर्वी जिल्हा लोकल बोर्ड असताना १९५६ मध्ये आता जो मोहनवाडीच्या उड्डाणपुलावरून पुढे गावठ्यावर रस्ता झाला आहे.त्यापुढे बोर्डाची विहीर होती.ऐन उन्हाळ्यात सुद्धा आम्ही दिवसभर त्या विहीरीवर पोहत असायचो.

समोरच एक छोटा दगडाचा गणपती होता.आम्ही बादलीने गणपतीवर पाणी घालायचो.त्यापुढेच दुसरी एक विहीर होती.या विहीरीला चिखाळीची विहीर असे नाव होते.

ही विहीर बोर्डाच्या विहीरीपेक्षा लहान होती.ही विहीर सन १९८१ साली मंजूर होऊन सन १९८२ साली बांधकाम पुर्ण झाले होते. कै.बाबुराव गुंजाळ व कै.बारकू बेलदार यांनी ही विहीर बांधली होती.या विहीरीवर पोहण्यासाठी व कपडे धुण्यासाठी दिवसभर गर्दी असायची.

हुरसाळे वस्ती येथील विहीरही मला वाटते १९८१ च्या आसपासची असावी.ही विहीर स्वतः हुरसाळेवस्तीने स्ववर्गणी, मांडव खणन्या, व पै..पै..जमा करून बांधलेली आहे शिवाय जनावराना पाणी पिण्यासाठी प्रचंड मोठी लोखंडी काठवठ.होती. या वरून पुर्वी लोक कसे एकविचाराने राहत असत हे दिसुन येते.

मंदोशी गावच्या (सर्व वाड्या वस्त्या) माध्यमातुन या उड्डाण पुलाच्या बाजुला वड व नांदरूकीच्या झाडाभोवती पार बांधला होता.याला गोठण म्हणत असत.

या पारावर गावच्या यात्रेच्या मिटिंग होत.व यात्रेनंतर दुस-या दिवशी हजेरीचा कार्यक्रम होत असे. जनावराच्या पायात काटा भरला तर कै.किसन चांभार याच ठिकाणी काटा काढायचा. 

क्रिकेट सुरपारंब्या, तिसका, कब्बडी, विटीदांडू गोटया हे खेळ याच मैदानावर होत..शिवाय याच ठिकाणी गावडोह होता येथे सुद्धा पोहणे व्हायचे. वडाची लाल पिकलेली फळे व नांदरूकीची छोटी गोड फळे खायला मुलांची झुंबड व्हायची. काही मुले नांदरूकिची पिकलेली फळे दोऱ्यामधे वोवून गळ्यात घालत असत व नंतर काही वेळाने खाऊन टाकत.

पुर्वी गावात आंघोळीचा डोह हे ठिकाण खुपच प्रसिद्ध व सर्वांचे आवडते ठिकाण होते.सकाळ पासुन ते संध्याकाळ पर्यंत तेथे कुणीतरी आंघोळी साठी असायचेच. आम्ही दिवसभर पोहण्यासाठी तेथे असायचो.दिवसभरात सहा सात वेळा पोहणे व्हायचे.माणुस गावात जर सापडला नाही तर अंघोळीच्या डोहावर १००% असायचा. अंघोळीच्या डोहावर स्रीया चुकुनही येत नसत.

वर उल्लेख केलेली सर्व ठिकाणे हुरसाळे वाडीची विहीर वगळता आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत. आता त्यांची नामो निशानीही शिल्लक राहीलेली नाही.

सन जुन १९९१ रोजी मंदोशी येथे पाचवीचा वर्ग सुरू झाला..आणि अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडली गेली. आज अनेक विद्यार्थी चांगले जीवण जगत आहेत.

गावात पुर्वी १९५५ साली जीवण शिक्षण मंदिर मंदोशी शाळा मंजूर झाली तेव्हा जिल्हा लोकल बोर्ड होता.

गावातील पहिले शिक्षक कै.श्री देवजी विरणक हे होते.त्यांना वर्षाला गाव मुले शिकवण्याच्या मोबादल्यात धान्य देत असे.नंतर जिल्हा लोकल बोर्ड बरखास्त होऊन  १९६२ जिल्हा परिषद आली. गुरूजींना महीन्याला पगार सुरू झाला. त्यामुळे गावाने गुरूजींना धान्य देणे बंद झाले.

त्यानंतर कै दिवाणे.गुरूजी १९६५ ते १९७१ श्री गे.मा तनपुरे गुरूजी १९७१ ते जुलै १९८६ पर्यंत..श्री.रोडे गुरूजी १९७७ श्री.पंढरीनाथ भागीत गुरूजी जुलै १९८६ ते सन २००७ श्री.सुनील हांडे गुरूजी श्री.शिवराम सुपे गुरूजी, कै.मुक्ता मदगे गुरूजी. श्री.संजय नाईकरे गुरूजी, कै.मारूती मोरमारे मुख्याध्यापक श्री.शंकरराव विरणक मुख्याध्यापक श्री.चौधरी, श्री राजू मदगे, श्री कु-हाडे श्री.मनोज केंगल, श्री माळी गुरूजी. श्री गवळी केंद्रप्रमुख अशा अनेकांनी विद्यार्थी घडवले.

हुरसाळेवाडी व जावळेवाडी येथे १९८२ साली शाळा सुरू झाल्या. जावळेवाडी येथे के.पांडुरंग आसवले गुरूजी तर हुरसाळेवाडी येथे श्री.विठ्ठल मोरमारे गुरूजी हे प्रथम शिक्षक लाभले. जावळेवाडी येथे श्री.रामदास तिटकारे गुरूजी श्री.सुनील देवरे. श्री.रविकिरण डोंगरे यांची पहीलीच नियुक्ती जावळेवाडी येथे होती.  त्यांच्याच काळात विद्यार्थी ख-या अर्थाने घडले.

पुर्वी मंदोशी गावठाणातील शाळा ही दगड मातीची होती.दरवर्षी शाळेला रंग दिला जाई.प्रत्येक विद्यार्थ्यांमागे दहा पैसे वर्गणी काढली जाई. खाली लाल वर पिवळा व मध्ये निळ्या रंगाची पट्टी मारली जाई. गुरूजी फक्त पिवळा मातीचा रंग व पुडीमध्ये निळ पावडर डेहण्यावरून आणत.

लाल रंग आणायला तीसरी चौथीतील मोठी मुले श्री केशव हुरसाळे यांच्या घराच्या बाजूला त्यांच्या शेतातील लाल माती आणत व तीच माती भीजवून कापडाच्या बोळ्याने भिंतीला रंग दिला जाई.मुलींना शेण व पाणी आणुन द्यायचे. त्या खालील जमीन सारवायच्या.शाळा एकदम नवी कोरी दिसे.

१९८१ साली मंदोशी गावात पहिल्यांदा हापसा आला.सन १९८५ साली आंगणवाडी आली. ही आंगणवाडी गावच्या चावडीत भरत असे.नंतर आंगणवाडीला स्वतंत्र इमारत आली. सुरूवातीलाआंगणवाडी सेवीका सौ.सुंदरबाई बांगर तर मदतनीस कै.नर्मदाबाई वाघमारे ह्या होत्या. जावळेवाडीला सुरूवातीला बालवाडी होती.

श्री काळभैरवनाथ मंदिर 

पुर्वी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर हे साधारण १९४२ साली बांधले.त्याआधी साधे मंदिर होते,आज जे मंदिराचे दगडी जोते आहे ते सन १९४२ सालचे आहे. हे जोत्याचे व दगडी बांधकाम गीरवली येथील कै.काशीनाथ गवंडी याने केले व लाकडी बांधकाम तसेच लाकडी मखर मंदोशी गावचे सुतार कै.सखाराम बारवेकर यांनी केले. हे मंदिर कौलाचे होते. खाली शहाबादी मोठी फरशी होती.

सन १९८४-८५ मध्ये पुन्हा मंदिराचे बांधकाम करण्यात आले. हे मंदीर पुर्वीच्याच पायावर बांधण्यात आले.हे मंदीराचे वैशिष्ट्य असे होते की ते पुर्णता: घडीव दगडामध्ये व सागवाणी लाकडामध्ये बांधले होते. खाली काळी पांढरी उच्च प्रतीची लादी बसवण्यात आली होती. जाळीच्या डिझाइन होत्या. बाहेर सुंदर गच्ची व लाकडामध्ये जाळ्या बसवण्यात आल्या होत्या

त्यानंतर पुन्हा मंदिराचे बांधकाम २०१४ साली करणेत आले.व सन २०१८ ला जिर्णोद्धार झाला.

देवाच्या मुर्ती या आठराव्या शतकातील इतक्या जुन्या आहेत.या मुर्तीपुर्वी...छोट्या छोटया दगडी चारपाच शाळुंका होत्या.त्या अजुनही आहेत.

खुप पुर्वी या शाळुंकाचीच पुजा व्हायची. त्यामुळे हे देवस्थान जागृत देवस्थान असल्याचे सिद्ध होते. याच देवाचे मुख्य ठिकाण खरबाच्या माळावर आहे. तेथे पुर्वी साधे छोटे मंदिर होते. नंतर सन १९९५ मध्ये नवीन मंदीर बांधले आहे. 

हारतुरे, दंडवते,पालखी, नवरात्र (देव बसणे, पाचवी व नववी माळ, देव उठणे) देव पारधी जाणे, देव पारधीवरून येणे व श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी, रविवार हे मुख्य कार्यक्रम असतात. या वेळी दुरवरून लोक उपस्थित असतात.

पुर्वी जावळेवाडीकडे जाताना पिपाळ डहाळ येथे शिवराम मोहन यांनी त्यांच्या शेतावर मोट बसवली होती. ह्या मोटेचे दगडी बांधकाम हे रसुल गुलाब धोंडफोडे या गवंड्याने केले आहे.

येथे पुर्वी बटाट्याचे पीक घेतले जाई.पुर्वी मंदोशी, शिरगाव, टोकावडे, कारकुडी, भिवेगाव व भोरगीरी अशी संयुक्त ग्रामपंचायत होती.सन १९८३ मध्ये कै. बाळासाहेब दगडू तळपे हे पहिल्यांदा सरपंच झाले तर १९८५ ते १९९० पर्यंत कै.शंकरराव राघुजी हुरसाळे हे उपसरपंच होते. शिवाय कै.किसन देहू तळपे नंतर, कै.सिताराम दारकू तळपे हे ४० गावांशी सलग्न असलेल्या डेहणे आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे डायरेक्टर होते.

गावात १९७८ साली लाईट आली.गावात पहिल्यांदा १९७६ साली कै.सिताराम दुलाजी तळपे यांनी सायकल घेतली.तर पहीला रेडिओ श्री सहदेव जढर यांचा होता.आता सध्या जे वर गावठान आहे तेथे आंबेकर,मुठे,जढर,आंबवणे,तळपे दिघे,विरणक ही कुटुंबे रहायची परंतू १९३२ साली आलेल्या प्लेगच्या साथीत अनेक कुटुंबे विस्थापीत झाली.

गावाला शिरगाव, टोकावडे, कारकुडी, तळेघर, नायफड,वांजाळे व धुओली अशा सात गावांची हद्द लाभलेली असुन मंदोशी गावच्या हद्दीत श्री काळभैरवनाथ ग्रामदैवत, मारुती मंदीर, मुक्तार, वेताळ, वीर, कळमजा, दे..आई. सुळ्याचा महादेव कनीरबाबा. कोकाटवीर. भुमीर. खरबाचा मुख्य देव अशी देवस्थाने लाभली आहेत..

मंदोशी गाव हे निसर्गरम्य ठिकाण असुन आंबे, करवंदे, जांभळे, तोरणे, आंभेळी अशी अनेक फळे सिझनेबल उपलब्ध असतात.


पावसाळ्यात हिरवागार निसर्ग,खळाळते पाणी, डोंगरद-या,व निसर्गत:तयार झालेले धबधबे यामुळे पर्यटकांची महाराष्ट्रातुन गर्दी होते.नयनरम्य निसर्गसौंदर्यानं नटलेलं, धबधब्यांसाठी सुप्रसिद्ध मंदोशी, अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा अनमोल ठेवा, 

चारही बाजुंनी डोंगरांनी वेढलेलं, सहयाद्रीच्या कुशीत वसलेलं, भिमाशंकर जवळील हे छोटंसं गाव धबधब्यांसाठी प्रसिध्द आहे. याठिकाणी सुंदर फेसाळणारे छोटे, मोठे अनेक धबधबे आहेत. तरारलेली भात शेती, सर्वदूर पसरलेली हिरवळ, झुळझुळ वाहणारे पांढरेशुभ्र झरे, डोंगराच्या पायथ्याशी तुडुंब भरून वाहणारे ओढे, अधूनमधून पसरणारी धुक्याची चादर या सर्व निसर्गसौंदर्यानं डोळ्यांसोबतच मनही तृप्त होतं.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

  
 








 


गावाकडचे साधेभोळे लोक

खुप दिवसातुन गावाला दोन तीन दिवस राहण्याचा योग आला होता. सकाळी अंघोळ झाल्यावर चहा घेत असतानाच मित्र काशिनाथ आला. त्याला चहा दिला.
चहा पित असतानाच तो म्हणाला. 
आज काय काम आहे का तुला?
काम नसेल तर चल रानात जाऊया. मध कुठे भेटते का पाहू. 
रानात हे शब्द उच्चारताच मी लगेचच होकार दिला.
माझ्याकडे पाण्याची कापडी पिशवी आहे त्यामध्ये पाणी थंड राहते. मी ती घेऊन येतो. असे म्हणून तो घरी गेला. तो पर्यत मी भाजी चपाती खाल्ली. थोड्याच वेळात तो आलाच. त्याच्या कमरेला आकडी व कोयता पहाताच मला लहानपणाच्या आठवणी जागृत झाल्या.

प्रत्येकाच्या घरी आकडी व कोयता असायचाच. आकडी म्हणजे एक चामड्याचा पट्टा असुन तो दोन्ही बाजूनी निमुळता असतो. त्याच्या मधोमध कोयता आडकवण्यासाठी लाकडी घोड्याच्या मुंडक्याचा आकार असलेला आकडा असतो. चामडी पट्याच्या एका टोकाला चामडी गुंडी व दुसऱ्या बाजुला गुंडी अडकवण्यासाठी चामड्याचीच काजी असते.(शर्टाचे बटन लावतात तसे) तर प्रत्येकाच्या घरी असणारी आकडी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

एवढयात आकडी पुराणातुन काशिनाथने "चल निघायचे ना"? या शब्दाने जागे केले.

चला निघुया. असे म्हणुन आम्ही जंगलाच्या दिशेने रवाना झालो. जाता जाता अजुन एक बालमित्र आम्हाला येऊन मिळाला. इतक्या वर्षातुन जंगलातील त्या पायवाटेने जाताना काल परवाच या वाटेने गेलो आहे असा भास झाला. लहान पणाच्या आठवणी एकदमच ताज्या झाल्या. संपुर्ण बालपण एका क्षणात तरूळून गेले. संपुर्ण रानावनातील पायवाटा अजुनही जशाच्या तशा आठवतात. रानातील प्रत्येक भागाला नावे असत.
त्यापैकी वानवळा दाखल काही. खतारी, हारहार गोट्या, आघाडी, मोरंटाक, देवकडा, देवमाची, तुरूकमाची, गाठ्या, कोटम, आसानमाची, भातलवान, खरबाचा माळ, काचळाचा माळ, धोधानी, माल्याचा कपरा, धवलीचा दरा, धोकटी, टिवई, मटमाळ, हेलग्याचं डोकं, आसानदरा, घुडीदांड, आड, देवमाची
कोल्हया, आंघोळीचा डोह, कळाममिहीर, पिपाळडहाळ, कुतार टेप, व्हळखचार,
वाक्षपत, शिंबारटाक, नावठिके, वडाचीवाडी, गव्हाळी, बेडखिंड, चिखाळी, आरतीचा मोढा, सावताची माची अशी अनेक ठिकाणाला अनेक नावे.

रानातल्या प्रत्येक आंब्याला नावे असत. प्रत्येक आंब्याची एक वेगळीच चव वेगळीच खासीयत असायची. काळ्या आंबा, शिप्या आंबा, मोकाशा, आरती, केसम्या, वरावट्या, गाडग्या, गोड्याआंबा, कोयती,भद्या अशी कितीतरी नावे सांगता येतील. 
या आंब्यांची चव अजुनही कित्येकांच्या स्मरणात असेल.

लहानपणी हे आंबे पाडाला लागल्यावर आम्ही या आंब्यांच्या अजुबाजूलाअढी घालायचो. अढी म्हणजे जमीनीत खड्डा खोदुन त्यामध्ये थोडा पालापाचोळा टाकायचा. त्यावर आंबे ठेवायचे. परत त्यावर पालापाचोळा मग परत त्यावर आंबे अशा प्रकारचे तीन चार थर लावले जात.हे सर्व झाल्यावर माती टाकून एक सारखे करून खुणेसाठी छोटा दगड ठेवायचा. 

पाच सहा दिवसानी जाऊन अढी उकरायची. एव्हाना आंबे पिकून मस्त सुगंध दरवळायचा. तेथेच बसुन एकाएका आंब्याचा स्वाद घ्यायचा. 
प्रत्येकालाच आंब्यावर जाता यायचे नाही. काही आंबे चढायला अवघड असायचे. आंब्याच्या उंच शेंड्यामध्ये पिवळेधमक पाड असायचे. मग काय! प्रत्येक जन दगड गोळा करायचा. आणि पाडाच्या दिशेने दगड मारले जायचे..ज्याच्या दगडाने आंबा पडेल त्याचा पाड हे समीकरण असायचे. कधीकधी मीच आंबा पाडला म्हणून दोन जनांमध्ये भांडणे व्हायची. मारामारी व्हायची. परंतू थोड्याच वेळाने पुन्हा गोडी व्हायची. ज्याला आंबे मिळाले नाहीत त्याला प्रत्येकजण दोन तीन आंबे द्यायचा. खुपच आंबे मिळाले तर शर्ट काढून त्यामध्ये आंबे घरी आणायचे.
पहाटेच्या थंडगार वा-याच्या झुळकेने प्रत्येक आंब्याखाली टपाटप आंब्याचे पाड पडायचे. अगदी उजाडताच आम्ही पिशवी घेऊन पाडाचे आंबे गोळा करायला जायचो. दररोज पाच पन्नास आंबे सहज मिळायचे.

अशाच आठवणीमध्ये रानातुन जात होतो. मध्येच एखादा ससा आम्हाला पाहिल्यावर वायू वेगाने पळताना दिसे. ठिकठिकाणी वनविभागाने लहान मोठी तळी खोदलेली आहेत. 

एका मोठ्या तळ्यात कातक-यांची तीन चार पोरं मासे पकडताना दिसली. काशिनाथने दम दिल्यावर बिचारी तळ्यातुन बाहेर निघाली. तेव्हा मी म्हणालो अरे! पकडा मासे..चालुद्या तुमचे काम. परंतू शंका मनात असल्याने ती मुले तळ्याच्या पाळीवरच उभी राहीली. आम्ही खुप पुढे आल्यावर परत तळ्यात शिरली.
जाताना प्रत्येक परिसर पाहिल्यावर अनेक आठवणी मेंदुच्या गाठोड्यातुन बाहेर येत होत्या.

अरे! येथे तर आपण पोते घेऊन जनावरांचे वाळलेले शेण गोळा करायचो.
येथे आपण गुरे सांभाळायचो..
येथल्या या झाडाखाली पाच सात मित्र भारूड (नाटक) करायचो.
येथे आपण क्रिकेट, विटीदांडू, गोट्या खेळायचो, खेकडे पकडायचो, सरपण गोळा करायचो. सर्व बालपण एका मागून एक असे स्मरत होते. स्वप्नगत आठवणी तरुळून जात होत्या.

रानातुन जात असताना काशिनाथची सावध नजर प्रत्येक झाडावर मधमाशाचे पोळे (मोहळ) आहे का हे शोधत होती.
एव्हाना एक दोन मोहळे त्यांनी पाहीली होती. पण ती अतीशय लहान असल्यामुळे त्याने दुर्लक्ष केले. असेच पुढे पुढे जात असताना एक गर्द पाने असलेल्या आंब्यावर मोहळ असेल या शक्यतेने त्याने निरखुन पाहिले. आणि त्याच्या मनासारखे झाले. आंब्यावर बरेच मोठे मोहळ होते. लगेच झाडावर सरसर चढत तो झाडावार गेला आणि अगदी पाच दहा मिनिटात मधाचे पोळे घेऊन खाली आला.
अगदी एकही मधमाशी न चावता त्याने मोहळ काढले होते. 
दुसऱ्या मित्राने तो पर्यंत चांद्याची पाने आणली होती.(चांदा हे एक झाड आहे.पुर्वी लग्नकार्य,पुजा ईत्यादीची जेवणे या चांद्याच्या पानावर चार पाच पाने लावुन पत्रावळी म्हणुन करत असत.) चांद्याच्या पानावर मध खाल्ली.
थोडावेळ गप्पा टप्पा झाल्या. आणि आम्ही रानातील जे सर्वात चांगल्या चवीचे आंबे होते त्या आंब्याकडे जायला निघालो. प्रत्येक आंब्याखाली गेल्यावर अनेक आठवणी दाटून आल्या. प्रत्येक आंबा, प्रत्येक ठराविक ठिकाण जणू मला विचारत होते.
अरे काय राम कसे काय..बरं आहे ना..? लहानपणीआमच्या आंगाखांद्यावर खेळलास.
दररोज न चुकता यायचास. 
आता पुर्ण विसरलास आम्हाला.?
इतकी माया पतळ झाली का रे.?
आम्ही तुला नेहमी आनंद दिला..आमची एकमेव इच्छा तु आम्हाला नेहमी भेटावेस..आमच्या आंगाखांद्यावर खेळावे...पण तु गेला मायावी दुनियेत...काय मिळाले तुला तेथे? तुलाच माहीत.येत जा अधुन मधून..बरं वाटतं. असा उगाचच भास झाला...नव्हे अगदी खरं होतं.

पुर्वी प्रमाणे आंब्याच्या शेंड्यामधील गुल्लर (पिवळेधम्मकआंबे) दगडाने पाडायची इच्छा झाली. प्रयत्न करून पाहीला. दगड शेंड्यापर्यंत गेलाच नाही. हाताला एक प्रचंड कळ आली. वेदना जाणवू लागली. आणि हा प्रयत्न बंद झाला. 
काशिनाथ झाडावर गेला व प्रत्येक फांदी हालवू लागला. त्या हेलकाव्यामुळे पाड खाली पडू लागले. आम्ही एका ठिकाणी ढिग केला. पुर्वी प्रमाणेच आंब्यांची चव चाखायला मिळाली. अगदी पुर्वी सारखीच जशीच्या तशी. काहीच बदल नाही..मन अगदी तृप्त झाले.

आंबे खाऊन झाल्यावर कापडी पिशवीतील थंडगार पाणी प्यायलो. आणि आब्याच्या झाडाखालीच रेंगाळलो. गार वा-याच्या झुळकेने केव्हा डुलकी लागली कळलेच नाही.
कुणाच्या तरी बडबडीने जाग आली 

दुपार केव्हाच टळून गेली होती आणि उन्हे उतरणीला लागली होती. पहातो तर शेजारील गावचे पाच सात जण थोड्या अंतरावर दिसले. आम्ही सर्वजण उठलो. जाऊन पहातो तर तेथे त्यांच्या शेतात रूढी परंपरेने दरवर्षी त्यांच्या देवाला बोकड देण्याचा कार्यक्रम होता.
पुर्वी ते आम्हा सगळ्यांना जेवणाचे आमंत्रण द्यायचे. आम्हीही न चुकता हजर असायचो. आम्हाला पाहुन त्यांना खुप आनंद झाला. 
आता जेवल्याशिवाय तुम्हाला जाऊ दिले जाणार नाही. असा गोड दम दिला.आमचा अगदी नाईलाज झाला.
ठिक आहे. तो पर्यत आम्ही रानात फिरून येतो. असे म्हणून आम्ही रानात नुसतेच फिरत राहीलो.

एका ठिकाणी एक कोलारू घर दिसले. आम्ही तिकडे गेलो. अंगणात मांडवाखाली एक म्हातारा घोंगडीवर बसुन टोपले विनत होता. बाजुलाच बांबुच्या काड्या पडल्या होत्या. त्याच्या डोक्याचा पटका व अंगातील बंडी पाहुन अजुन जुन्या आठवणी चाळवल्या.
आम्हाला बघुन त्याने रामराम केला.
या कुठलं पाव्हणं म्हणायचं? ओळख सांगीतल्यावर त्यांच्या डोळ्यात आश्रू तरळले..तेथूनच त्यांनी म्हातारीला आवाज दिला.
आगं पाणी घेऊन ये.पाहुणे आलेत.
कपाळाला भले मोठे कुंकू. नाकात बांगडीच्या आकाराची सोन्याची नथ. अंगात चोळी, मांडवकर लुगडे असलेली म्हातारी पाण्याचे तांबे भरून घेऊन आली.

पाणी पिल्यावर म्हतारा म्हणाला अगं! ओळखलेस का ? याला.
म्हतारीची नजर कमी झाली होती.ती अगदी निरखुन पाहु लागली...
म्हातारा म्हणाला. अगं हा मास्तरचा राम हाये.
आग बाय. तु सखुचा राम.केवढा मोठा झालास असे म्हणुन माझे मुके घेऊ लागली.

मी जेव्हा लहान होतो तेव्हा ती आम्हाला दररोज एक छोटे पातेलेभर दुध द्यायची. हरभरे, मसुरा, उडिद द्यायची. 
प्रत्येक कार्यक्रम असल्यावर मी त्यांच्याकडे जेवायला जायचो. वडिल त्यांना वेळोवेळी अर्थीक मदत करायचे. त्यांची मुले माझ्या वडिलांच्या हाताखाली शिकली. 
एक मंत्रालयात तर एकजण शिक्षक  आहे. त्यामुळे आमचे एक घनिष्ट नाते होते.

माझे वडील गेल्यावर आईला आधार म्हणून ती आमच्या घरी पंधरा दिवस राहीली होती. आम्हाला प्रचंड आधार देण्याचे काम तेव्हा तिने केले होते. मला देखील खुप गहिवरल्या सारखे झाले. तिच्या पदरात डोके खुपसुन मन मोकळे करावेसे वाटले.
इथे काय करता? जायचे लेकांकडे शहरात मी म्हणालो.
न्हाय बा..जो पर्यंत हातपाय हालतात तो पर्यंत या मातीचीच शेवा करणार.हीतच मरणारं. 
मी पांडुरंगाला रोज म्हणतुय पांडुरंगा मरण आले तर इथेच येउदे याच मातीत. बाकी कुठ जायची इच्छा नाही..अपेक्षा नाही. बास इतकचं.

नको नको म्हणताना म्हातारीने दुध व गुळ घालून शेवाया बनवल्या. 
खुप वर्षांनी स्टीलच्या पितळीत वाफाळलेल्या शेवाया खाताना अजूनच आठवणी चाळवल्या. अगदी पुर्वीचीच चव, तसेच प्रेम माझ्या भाग्याला आले होते.

थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या माझ्या आईच्या आठवणीने म्हतारीच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या. अरे पोरा येत जा. अधुन मधुन.
या जीवनात हाये काय ? आज हाये अन उद्या न्हाय.एकमेकांशी चांगल राहणे, वागणे. आन बोलणे बाकी सर्व फुकाट हाये..
या वाक्यात म्हतारीने जागतीक दर्जाचे तत्वज्ञान सांगीतले. जे कोणत्याच शाळेत, शिकवले नाही.

परत यायच्या बोलीवर जड अंतकरणाने आम्ही तेथुन निघालो ते तडक जेवण बनवणा-या माणसांकडे. एव्हाना सर्व विधी उरकत आला होता. 
सुर्य मावळतीकडे जाउन बराच वेळ झाला होता. तो पर्यत इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. एकेक करून बरेच लोक जमा झाले होते.
प्रत्येकाच्या हातात पितळी किंवा ताट होते. काहीजण येत होते. सर्व विधी झाल्यावार जेवणाच्या पंगती बसल्या आम्हालाही ताटे दिली. भात वाढला. त्यावर मटणाचा रस्सा. आणि बचकभर मटनाचे खडे.
जेवण सुरू झाले. आग्रह करून वाढण्यात आले..जेवण झाल्यावर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तो पर्यंत मिट्ट काळोख झाला होता. आम्ही मोबाइलच्या उजेडात घराकडे चाललो होतो. परंतु पायवाटा अजुनही जशा तेव्हा होत्या  तशाच आजही तशाच ओळखीच्या भासत होत्या.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)
  
 

शरदराव जठार एक समाजसेवक

समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला पाठिंबा देऊन त्याच्या मागे उभे राहून त्याला सतत प्रेरणा देणे हे प्रत्येकाचे काम आहे. यामुळे निश्चितच चांगले कार्यकर्ते घडुन भागाचा विकास, लोकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होत असते.

असेच आपल्या भागात श्री शरद जठार यांचे सामाजिक काम पाहून प्रत्येकाला एक नविन उर्जा प्राप्त होत असते. 

एक संवाद

श्री.शरद जठार यांचा तसा माझा फारसा परिचय नव्हता. फक्त ते धुओली गावचे उपसरपंच आहेत. व भोसरी येथे राहतात. एवढेच माहीती होते. एकदा आँफिसमध्ये काम करत असताना एक शिक्षक काही कामानिमित्त आँफिसमध्ये आले व बोलता बोलता त्यांनी साहेब तुम्ही जुन्नर तालुक्यातील  का? असे विचारले.

मी म्हणालो. 

मी खेड तालुक्यातील मंदोशी गावचा आहे. वाडा गावच्या पश्चिम भागात माझे गाव आहे.

ते म्हणाले. धुओली गाव पण तिकडे आहे का? 

मी -  हो.

तर ते म्हणाले तुम्हाला ते शरद जठार माहीत असतील ? 

मी - हो. माहित आहेत.

ते - अहो त्यांच्यामुळे आमचा पेशंट वाचला आमच्या पेशंटला यशवंतराव चव्हाण मेमोरियल हाँस्पिटलला (वाय.सी.एम) अँडमीट करून घेत नव्हते. सर्व प्रयत्न करून पाहिले पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

कुणीतरी श्री. शरद जठार यांचा फोन नंबर दिला. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांना फोन केला. आणि पुढच्या दहाच मिनीटात आमचा पेशंट अँडमिट करून घेतला. 

पुढे तो सुखरूप बरा झाला. इथेच आमची चर्चा संपली. 

भागाविषयी असलेली तळमळ 

पुढे एकदा काहीतरी कामानिमित्त शरद जठार यांना फोन केला होता. त्यांनी मला त्यांच्या नायफड पंचायत समिती गण या ग्रूपमध्ये सामाविष्ट केले. 

पुढे त्या ग्रूपच्या माध्यमातून श्री शरद यांचे सामाजीक कामाचे एकेक पैलू उलगडत गेले. व त्यांच्या विषयी आदर वाटू लागला.

ते करीत असलेले काम पश्चिम भागाच्या दृष्टीने अतिशय मोलाचे आहे. सामाजिक काम करत असताना अनेकांचे स्वार्थ त्यात आडवे येतात. त्यामुळे सामाजिक कामाला गती मिळत नाही. त्यासाठी सर्व लोकांनी सामाजीक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सशर्त पाठिंबा दिला पाहिजे व प्रसंगी त्यासाठी रस्त्यावर उतरायची तयारीही ठेवली पाहिजे.

मझ्या मते पश्चिम भागात जर सामाजिक कार्यकर्त्यांची फौज असेल तर सर्व शासकिय योजना वैयक्तिक लाभाच्या योजना व इतर कामे चांगल्या प्रकारे राबवल्या जातील. 

नेत्यांशी असलेले संबंध व मानवाधिकार अध्यक्ष 

श्री शरद जठार यांच्याकडे ग्रामपंचायतचे नेतृत्व होते. आता मानव अधिकार तालुका अध्यक्ष पद आहे. जिल्हास्तरावर अनेक राजकिय व सामाजीक प्रमुख व्यक्तीबरोबर त्यांचे चांगले सबंध आहेत. या माध्यमातून ते चांगले काम करत आहेत. ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. 

कोव्हीड १९ कोरोना काळातील कार्य 

भागातील कोरोनाचा संसर्ग असलेल्या व्यक्तीला रक्तातील प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याचे कामसुद्धा त्यांनी केले आहे. तर रात्री अपरात्री भागातील मयत झालेल्या कोरोना पेशंटला रात्री दोन वाजता स्मशानभुमीत P.P.P. किट घालून अग्नीडाग सुद्धा त्यांनी दिला आहे. 

कामाचे नियोजन

आपआपसातील वादविवाद, मतभेद विसरून चांगले काम करणा-या व्यक्तीला नक्कीच पाठिंबा दिला पाहिजे. पश्चिम भागाला आज व्यसनमुक्ती केंद्राची गरज आहे. 

छोटे व्यवसाय मार्गदर्शन केंद्र व  मेळावे. व्यसनाधिन लोकांसाठी प्रबोधनकार यांची व्याख्याने आयोजीत करणे अशी अनेक कामे होणे अपेक्षित आहे.

सर्व भागातील सरंपंच, ग्रामसेवक, कृषिसेवक, तलाठी, आरोग्य सेविका, शिक्षक प्रतिनीधी, पशुधन पर्यवेक्षक यांचा मेळावा आयोजीत करून सर्वसामान्यां पर्यत सरकारी योजना कशा राबवता येतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

आतापर्यंत त्यांनी केलेले कार्य 

आजही पैशाने न होणारी कामे शरद जठार यांच्या शब्दाने होतात. हे ही महत्त्वाचे आहे. त्यांनी केलेल्या कामाची माहीती समाजातील प्रत्येक माणसापर्यंत पोहचली पाहीजे त्यांच्या कामाची दखल सर्वांनी घ्यावी यासाठी मी त्यांच्या काही सहका-यांकडून त्यांच्या विषयी माहीती मिळवली. त्या माहीतीवर थोडासा प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो.

केलेली सुरवात

भोसरीसारख्या ठिकाणी शिक्षण घेत असताना सकाळी काॅलेज  व दुपार नंतर  STD बुथवर 500 रूपये महिना पगारावर काम केले.

नंतर प्रायव्हेट कंपनीत करत असताना भरपुर असा मित्र परिवार जमवला. व त्यांचेशी चांगले सबंध ठेवले. नंतर माॅ साहेब ग्रुपची स्थापना केली व तिथुन पुढे सामाजिक कार्याची आवड निर्माण होत गेली. 

Whats up ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असताना भोसरी सारख्या ठिकाणी असलेले विविध भागातील नगरसेवक, आमदार लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. 

त्यांनी  दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आपल्याला मिळत असलेला मित्र परिवार व लोक प्रतिनिधी यांच्या सहकार्याच्या जोरावर धुओली गावात व पश्चिम भागात काम करण्यास सुरुवात केली. 

पश्चिम भागातील तरुण सहकारी, मा.पंचायत समिती सदस्य, मा.जिल्हा परिषद सदस्य, मा.आमदार या लोक प्रतिनिधींच्या सहकार्याच्या जोरावर पश्चिम भागात चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळत आहे.  

उपसरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्यानंतर पहिला ध्वजारोहण गावातील जेष्ठ नागरिकाच्या हस्ते केला.

गावातील असणारा वादविवाद मिटवले.

गावातील विविध चांगल्या कामांची प्रशासनाने दखल घेत, गावाला जिल्हा परिषद गटात संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार प्रथम क्रमांक मिळाला गावात विविध विकास कामे मार्गी लावली.

वाढदिवसाचा खर्च टाळून गावातील गरजू महिलांना साड्या वाटप केल्या.

गावातील एका गरीब कुटुंबाला दरवर्षी दिवाळीला मिठाई व कपडे करण्यात येतात. 

नायफड पंचायत समिती गण ग्रुपच्या माध्यमातून मित्र परिवाराच्या सहकार्याने कोरोना काळात रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

मा.आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् च्या माध्यमातून पश्चिम भागात जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले

नायफड पंचायत समिती गण ग्रुपच्या माध्यमातून अपघात ग्रस्त तरुण राजु लांघी या तरुणाला पैसे व धान्य वाटप करण्यास मदत..

पुणे या ठिकाणी असलेले यशवंतराव चव्हाण हाॅस्पिटल (YCM) या ठिकाणी आपल्या पश्चिम भागातील नागरिकांचा कुठल्या ना कुठल्या कामासाठी संपर्क येतो तेव्हा त्यांना अ‍ॅडमिट करण्यापासून तर ते डब्याची व्यवस्था करणे, 

वेळ प्रसंगी घरून डब्बा देणे, 

त्यांचे बिल कमी करणे 

रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देणे, 

काही नागरिकांचा वेळ व पैशाची बचत व्हावी, नागरिकांच्या नातेवाईकांचे जन्म व मृत्यू दाखले अगदी घर पोहच करणे, 

अगदी अ‍ॅडमिट असलेल्या पेशंटला वेळो वेळी फोन करून चौकशी करणे, 

त्यांना धीर देणे. रात्री अपरात्री फोन आला तर त्या ठिकाणी जाऊन मदत करणे 

कोरोना काळात मयत झालेल्या आपल्या भागातील पाॅझिटीव पेशंटच्या नातेवाईक यांना रात्री दोन- तीन वाजता स्वता: त्या ठिकाणी उपस्थित अंत्यविधी करण्यास मदत करणे

आगदी कोरोना काळात वैयक्तिक लक्ष घालुन गावातील लोकांना अर्सेनिक गोळ्यांचे वाटप केले 

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या महापुरात पुरग्रस्त भागाला खेड तालुका पश्चिम भागातुन 500 किलो तांदुळ जमा करून पुरगरस्तांना पश्चिम भागाच्या वतीने मदत पोहचवली 

धुवोली/ वांजाळे संयुक्त ग्रामपंचायत ग्रामस्तरीय कोरोना समितीच्या वतीने  कोरोना विषयी नियोजन करण्यात येऊन  गावात सॅनिटाईजर, मास्क चे वाटप करण्यात आले. 

तसेच भविष्यात गावात कोणी रुग्ण पाॅझिटीव आला, तर त्याच्यासाठी ग्रामपंचायतचा असलेला हाॅल रिकामा करुन त्या ठिकाणी विलगीकरण (Corantine) करण्याची व्यवस्था करण्यात आली. यामुळे गावात लोक सुरक्षित राहातील आणि प्रशासनाचा ताण देखील कमी होईल असे नियोजन केले होते. जेणेकरून प्रशासनाचा ताण नक्कीच कमी होईल. हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य म्हणावा लागेल.

त्यांच्या कार्याची घेतलेली दखल 

शरद जठार यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

मानवाधिकार मीडीया फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शरद जठार करत असलेले हे सामाजिक काम खरोखरच उल्लेखनीय आहे. हे नाकारून चालनार नाही. त्यांच्या या सामाजीक कामाची सर्वांनी दखल घेऊन त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.

पश्चिम भागात चासकमान धरण क्षेत्रात नदीवर बुडीत क्षेत्रात बंधारे बांधल्यामुळे पाण्याची उपलब्धता होऊन शेतीला पाणी मिळेल व सध्या उन्हाळ्यात ज्या पड जमिनी आहेत. त्या बागायती होतील. आणि शेतकऱ्यांना चांगला रोजगार मिळेल.

त्याचप्रमाणे पश्चिम भागात पर्यटनाच्या सोयी सुविधा झाल्या तर तरुणांना चांगला रोजगार मिळेल. 

पश्चिम भागात आरोग्याच्या सोयी सुविधा असल्या तरी त्या प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे.

शासकीय निधी योग्य मार्गाने खर्च झाला पाहिजे. त्यामुळे विकासाच्या सोई सुविधा  उपलब्ध होतील.

पश्चिम भागात दळणवळणाच्या सुविधा चांगल्या प्रकारे झाल्या पाहिजेत. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल.

अशा अनेक सोयी सुविधा मिळवण्यासाठी शरद जठर आणि त्यांचे मित्र परिवार अविश्रांत प्रयत्न करताना दिसत आहेत. 

शब्दांकन :- रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

 


उतावळा नवरा

 

एक दिवस सकाळीच मला माझा मुंबईला नोकरी करत असलेला एक मित्र आँफिसमध्ये भेटायला आला.रामदास एक आनंदाची बातमी आहे. पहिल्यांदा ती तुलाच सांगायची आहे म्हणून सकाळी सकाळी तुझ्याकडे आलोय.

बोल काय आनंदाची बातमी आहे? मी म्हणालो.

काल मी अमुक गावाला लग्नासाठी मुलगी पहायला गेलो होतो. एक नंबर… जबरदस्तच आहे पोरगी. डोळ्यापुढुन तिचा चेहरा जाता जात नाही. येत्या मंगळवारी ठरवूनच टाकायचे आहे.असे म्हणत पाकिटातून त्याने आयकार्ड साईज रंगीत फोटो मला पहायला दिला.

आनंदाची गोष्ट आहे फक्त गडबड करु नकोस. जरा दमाने घे..मी म्हणालो. 

गडबड करु नकोस काय म्हणतोस? उलट मी तर म्हणतोय येत्या मंगळवारी साखरपुडा उरकुनच टाकायचा.मित्र म्हणाला.

केव्हा एकदा लग्न होतय असे मला झाले आहे. तु सुट्टी काढ आपण सर्व नियोजन या आठवड्यात करून टाकू. 

त्याच गावचा माझा एक मित्र आहे त्याच्याकडून काही माहिती मिळाते का ते पाहू.मी त्याला म्हणालो.

काही माहिती घ्यायची गरज नाही आमच्या जुन्या पाहुण्यां पैकीच आहे गेलं वर्ष दिड वर्ष तिचे वडील लग्नासाठी माझ्या वडिलांच्या मागे लागले आहेत. मित्र म्हणाला.

पाच दहा मिनिटे अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मुलीचा फोटो माझ्या हतातच होता.आणि तेवढ्यात माझा तो दुसरा मित्र आला जो माझी टु व्हिलर न्यायचा.

मी त्याला माझ्या टेबलाजवळ बोलवून घेतले आणि फोटो त्याच्या समोर धरून विचारले.या मुलीला ओळखतोस? 

त्याने खिसे चापचायला सुरुवात केली.आणि मला म्हणाला. कधी खिशातून पडला कोणास ठाऊक ? दे की रामदास प्लिज..

मला घटनेचा पुर्ण अंदाज आला होता मी त्याला गप्प बसवायचा प्रयत्न करत होतो आणि तो पुढेच बोलत होता.

मी त्याला दरडाऊन म्हणालो उगाच काहीतरी बोलू नकोस हा फोटो तुझ्या कडील नाही आणि या मुलीचा आणि तुझा काही संबंध नाही.

अरे, काल खूप मोठा प्रॉब्लेम झाला. मी तिची वाट पहात थांबलो होतो पण ती आलीच नाही खुप उशीराने तिच्या चुलत बहीणीने येऊन मला सांगितले की तिला पहायला तमुक गावचे पाहुणे आले आहेत. सगळा पचका झाला ना राव माझा. नाही तर काल आम्ही पुर्ण नियोजन केले होते.( हे सांगत सांगत त्याने पाकीटातून त्या मुलीचा फोटो काढला) माझा तर माझ्याकडे आहे मग हा कुठला?

 हा..हा...आठवले गेल्या महिन्यात माझ्याकडील फोटो हरवला होता तो तुला सापडला असेल..हो.ना.? अशीच काही मिनिटे चर्चा चालली.

तिच्या सोबत लग्न करायला उत्सुक असलेला मित्र काय समजायचे ते समजून गेला. आणी काही न बोलता तिथून निघून गेला.

यालाच म्हणतात " उतावळा नवरा.आणि गुडघ्याला बाशिंग...

 

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...