Translate

पेटीमास्तर धर्माबुवा तळपे

img src="..." alt=" पेटी मास्तर धर्मा बुवा ">
धर्माबुवा तळपे म्हणजे जुन्या काळातील भजनसम्राट. जबरदस्त दैवी आवाज व तितकेच हार्मोनिअम ची मधुर सुरावट. धर्माबुवांना ओळखत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.

img src="..." alt=" भजन">
धर्माबुवा तळपे हे माझे चुलत चुलते. त्यांचे वडील माझे चुलत अजोबा कै.बुधाजी तळपे हे एक अष्टपैलू,शांत व अतिशय संयमी आणि लोकांच्या मदतीला धाऊन जाणारं व्यक्तिमत्व होते. त्यांना धार्मिक कार्याची आवड होती.

श्रावण महिन्यात लोक नवनाथ, रामविजय, हरिविजय असे ग्रंथ (अध्याय) लावायचे. हे अध्याय प्राकृत भाषेत ओविबध्द असत. ह्या अध्यायांचे मराठीत अचूक वर्णन बुधाजी तळपे करायचे. 

शिवाय गावाच्या तमाशात काम करायचे. जाते,पाटे व वरवंटे टाकणे, घराची दगडी जोती घडवणे, सुतारकाम, वनदेवाची पूजाअर्चा अशी सर्व कामे करायचे. 

शिरगाव व मंदोशी गावाच्या खिंडीतील जानका देवीचे मंदिर हे बुधाजी व त्यांचे बंधू ठकू तळपे यांनी बांधले आहे. यावरून त्यांच्या कार्याची प्रचीती येते. 

त्यावेळी गावात एकविचार असायचा. सर्व गाव एकविचाराने रहायचा. सर्वजनिक निर्णय घेतले जायचे. 

त्यावेळी गावचा तमाशा होता. त्यात एक उणीव होती. तमाशात पेटी वाजावणारा कुणी नव्हता. जेष्ठ गाव कारभारी विष्णु हुरसळे यांनी गावाच्या वतीने बुधाजी तळपे यांना गळ घातली. 

बुधा तात्या तुझ्या मुलाला, धर्माला पेटी वाजायला शिकबू. पेटी शिकवायचा खर्च गाव करील. 

बुधा तळपे यांनी तात्काळ या गोष्टीला संमती दिली.अशा प्रकारे धर्माबुवांचा पेटी शिकण्याचा मार्ग मोकळा झाला.

खास पेटी शिकवण्यासाठी सावळा खांडी ता.मावळ येथून पेटीमास्तर बोलावला. वर्षभरात त्याने सुरावटीचे सर्व ज्ञान धर्माबुवानां दिले. पेटीमास्तरची एक वर्षांची फी गावाने वर्गणी काढून भरली. 

त्यावेळी पेटीमास्तरला खूप मानसन्मान व प्रतिष्ठा होती. पायपेटीची क्रेझ होती. सन 1974 साली गावाने वर्गणी काढून रुपये 5000/- जमवले. हे पैसे तमाशा सम्राट कै.शंकरराव कोकाटे यांना देऊन त्यांच्याकडून सेकंड हँड पायपेटी विकत घेतली. 

अप्रतिम सुरावट, पातळ किनार असलेला परंतु पहाडी आवाज यामुळे अल्पावधीत धर्माबुवांचे नाव सर्वत्र दुम्दुमु लागले. अतिशय स्वच्छ असे पांढरेशुभ्र धोतर, पैरण, टोपी व गळ्यात असलेली मफलर असा स्वच्छ व रुबाबदार वेशातील धर्माबुवा अजूनच भारदस्त वाटायचे. 

परंतु दुर्दैव असे की लवकरच तमाशा बंद पडला. पेटी वाजवणे आपसूक बंद पडले. अधून मधून कधीतरी पेटी उघडून साफ सूफ करुन भाता हालऊन काळ्या, पांढऱ्या सुरांची छेडछाड करायची.आणि पेटी ठेऊन द्यायची. एवढंच काम उरलं.

काही दिवसांनी पावसाळ्यातील दमट हवामना मूळे व पेटी न वाजावल्यामूळे पेटीमधील लाकूड फुगले. नंतर पेटीचा भाता कामातून गेला. 

प्रयत्न करूनही सुंदर सुरावट असलेली पायपेटी वाजेचना. शेवटी ही पायपेटी नामशेष झाली. याचे सर्वात जास्त दुःख धर्माबुवांना झाले. अनेक वेळा त्यांनी ही पायपेटी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कधीच यश आले नाही. पायपेटी दुरुस्त करायला न्यावी तर येणारा खर्च कोण करणार?  गावानेही दुर्लक्ष केले.

गावात नेहमीच भजने होत. धर्माबुवा देखील भजनाला असत. परंतु पेटी नसल्यामूळे भजनला काही रंगत येत नसे. याची नेहमीच त्यांना हुरहूर वाटे. धर्माबुवांची ही खिन्नता त्यांचे जावई भिकाजी गवारी साहेब यांनी अचूक ओळखली. ते तेव्हा बारामतीला दुग्धविभागात नोकरी करत होते. त्यांनी तिकडून अतिशय सुंदर व कर्णमधुर अशी हार्मोनियम (पेटी) आणून त्यांच्या हवाली केली. 

ज्यावेळी ही पेटी वाजवायला सुरू केली तेव्हा मी स्वतः तेथे हजर होतो. अतिशय सुंदर सुरावट व त्यात धर्माबुवाचा गोड आवाज साखर जशी दुधात विरघळते तसा पेटीच्या सुरात एक झाला आणि ते संगीत ऐकून मी मंत्रमुग्ध झालो. 

गावात एक जुना तबला होता. मी त्याला नवीन पान बसवून दुरुस्त करून आणला. श्री.दिगाबर उगले यांच्याकडे डग्गा होताच. 

अल्पावधीत मंदोशी गावचे भजन उदयास आले. श्री.धर्मा तळपे (हार्मोनियम), श्री. दिगंबर उगले व कै.बाळू सुतार (तबला व डग्गा) कै.विष्णू पांडू तळपे (चकवा) कै.मारुती जढर (टाळ) श्री.देवराम कृष्णा तळपे (घुन्गुर काठी) हौसाबाई, देवईबाई, गंगूबाई तळपे या सर्वांच्या साथीने अल्पावधीत नामांकित भजन झाले.

हे भजन पुढे प्रचंड लोकप्रिय झाले. गणपती व नवरात्री आणि यात्रा सीझनमध्ये तर एवढी मागणी वाढली की हे भजन सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तीनही शिफ्ट मध्ये चालू असायचे. या भजनाने गावचे नाव यशो शिखरावर नेले. 

याचवेळी मंदोशी शाळेचे भजन सुध्दा उदयास येत होते. तेथेही धर्माबुवांनी मुलांकडून सर्व तयारी करुन घेतली. व याच शाळेच्या भजनाचा तालुका व जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक आला. याचे संपूर्ण श्रेय धर्माबुवांना द्यावे लागेल. 

धर्माबुवांचे अलंका पुरी s s s पुण्य भूमी पवित्र.... 

ऐकून अंगावर रोमांच उभे राहत.

त्यांच्या भजनातील काही अभंग व गवळणी अजूनही मला जसेच्या तशा आठवतात.  

रूप पहाता लोचनी,

धरिला पंढरीचा चोर,

येइ शामसुंदरा 

पंढरीचा विट्ठल कुणी पहिला 

जय जय शंभू तू महादेवा 

हरी जय जय राम जय जय राम,

इंद्र पडली भगा, चंद्र झाला काळा,

पांडुरंग उभा वाळबंटी, 

नंदाच्या हरिने बाई रस्ता बंद केला,

डोळे मोडीत राधा चाले,

हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा, 

कृष्णा मजकडे पाहू नको रे,

नको वाजवू श्रीहरी मुरली रे,

तुझ्या मुरलीने कौतुक केले,

गाया चरितो पेंद्या वनाला

असे कितीतरी अभंग व गवळणी धर्मा बुवानी आपल्या मधुर वाणीने व पेटीच्या अफलातून सुरावटीने अजरामर केले. आजही कधी या अभंग किंवा गौळणी आठवल्या की गुणगुणल्या शिवाय मन शांत होत नाही. ही केवळ धर्माबुवांची कृपाच म्हणावी लागेल. 

अशा या कलेच्या क्षेत्रात अजरामर ठसा उमटवलेल्या धर्मा बुवांचा गावाने यथोचित असा सत्कार करुन त्यांच्या कलेच्या ऋणातून मुक्त झाले पाहिजे. असे नेहमीच वाटते. 

आज धर्माबुवा वयोवृद्ध झाले आहेत. त्याना ऐकायला येत नाही.यात्रेला गावाने नामांकित भजन आणले होते. हे भजन संपे पर्यंत ऐकायला येत नसताना देखील धर्माबुवा तेथे बसून होते.या वरून त्यांची संगीत साधना कळून येते.

आंबेगाव, खेड व मावळ तालुक्यात जुने लोक त्याना पेटीमास्तर या नावानेच ओळखतात. अजूनही त्यांच्या भजनाचा विषय निघाला की लोक भरभरून बोलतात. त्यांचे कौतुक करतात. असा पेटीमास्तर पुन्हा होणार नाही असे बोलतात. 

त्यांच्याकडून मी व माझा चुलत भाऊ, त्यांचा मुलगा कै.मारुती आम्ही दोघांनी पेटी शिकण्याचा खुप प्रयत्न केला. परंतु त्यांच्या कडक स्वभावामूळे आम्हाला ते शक्य झाले नाही.

आता धर्माबुवांचे वय 83 च्या पुढे गेले आहे. त्यांना ऐकायला येत नाही. तरीही गावात यात्रेनिमित्त आम्ही नामांकित भजने आणतो, त्यावेळी धर्मबुवा हे ऐकायला येत नसूनही तेथे बसून असतात. यावरून त्यांची भजनावरील निष्ठा कळून येते.

✍️ माझा हा लेख मूळतः StoryMirror, Marathishrushti आणि Pratilipi वर देखील प्रकाशित झाला आहे. लेखक: रामदास तळपे

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)


भाजीवाली ताई

भाजीवाल्या ताईशी माझी ओळख व्हायला

img src="..." alt=" भाजीवाली ताई ">
तसे दोनचार वर्षे सहज झाली असावीत. मी तीला ताई म्हणतो कारण ती मला पहील्यांदा भेटलो तेव्हा दादा म्हणाली.

बाजारात माझ्या मित्राचे दुकान आहे. त्या दुकानाच्या पायरीजवळ ती भाजी विकायला बसते. मी मित्राकडे दोन तीन दिवसाआड जायचो. 

रसरशीत हिरव्या भाज्या घेउन ही तिथे बसलेली. साहजिकच भाजी तिच्याकडून घेण्याची सवय लागली. नेहमीच्या ओळखीने एक नातेही निर्माण झाले. 

बारीक अंगकाठी, रापलेला चेहरा, पण नेहमी हसतमुख. प्रत्येक वाक्यात दादा म्हणायची सवय. 

नंतर मित्राने त्याच रोडवर थोडे पुढे  

दुकान घेतले पण जाण्यायेण्याचा रस्ता तोच राहीला. कधीतरी मित्राला भेटून रस्त्यावरून मोटरसायकलने घाईघाईने निघालो की ताईची हाक ठरलेली..

दादा...ओ..दादा आज भाजी नको का? 

मग मी निमुटपणे भाजी घ्यायला थांबतो.

बर दे अर्धा किलो. 

काय दादा अर्धा किलो भाजी पुरते तरी का घरात? एक किलो तरी घ्या.

ताई..चार जण तर आहेत. अर्धाकिलो पुरेल.

असू द्या दादा. एक किलो स्वस्त पडते म्हणून एक किलो घ्यायलाच लावते.

बर..भाजीचे भावही एकदम रास्त, आणि मोजणेही अघळपघळ.

एकदा तर अर्धा किलो कोबी घरी जाऊन बायकोला दिला तर ती म्हणाली कोणी दिला? पाऊण किलोच्या वरतीच आहे. दोनचार भाज्या एकदम घेतल्या तर पाच दहा रूपये स्वतःहून कमी घेणार. शिवाय निघतांना तिच्याजवळ असलेले मुठभर बोरे किंवा चारपाच आवळे पिशवीत टाकणार..

हे वैनीला द्या माझ्याकडून मला आश्चर्य वाटते एवढा दिलदारपणा एवढ्या गरीबीतही ही ठेवते कसा?

एकदा भरदुपारी तीन साडेतीन वाजता मी एस् टी स्टँडजवळ उभा होतो, तेवढ्यात डोक्यावर टोपली आणि हातात एक गोणपाटाची थैली (ज्यात तराजू व वजन असावेत) घेउन ताई चाललेली दिसली. 

मी हाक मारली.

ताई इकडे कुठे ?

दादा घरी चालले. वाडीत.

म्हणजे तू वाडीत राहते? आणि मग येते किती वाजता?

वेळ तर माहीत नाही दादा. पण सकाळी सकाळीच शेतात जाऊन भाजी आणते. मग जी एसटी मिळेल तिने इथे येते. भाजी संपत आली की पुन्हा घरी.

बापरे! मग स्वयंपाक कधी करते?

मीच करते ना दादा. दोन्ही येळा. सकाळी लवकर उठून भाजी भाकरी करते, मग शेतातून भाजी घेते. आता इथून घरी गेल्यावर पुन्हा स्वयंपाक. 

चला. येऊ मी?

मला काय वाटले कुणास ठाऊक. म्हटले थांब ताई. उन किती आहे. थंडगार उसाचा रस घे.

नको दादा. गाडी निघून जाईल.

काही निघणार नाही, ये.

म्हणून मी शेजारीच असलेल्या रसवंतीकडे निघालो 

तेवढयात तिने पुन्हा हाक मारली.

दादा?..

काय गं ताई?

रस महाग असतो. त्यापेक्षा चहाचं पिऊ.

काही फार फरक पडत नाही, आणि पैसे मी देतोय ना..

नको दादा. चहाच पिऊ.

बरं..चहा पिऊ..

आम्ही शेजारच्या हॉटेलमध्ये शिरलो. तिने हॉटेलच्या बाकावर टोपली पिशवी ठेवली. टोपलीत काही भाजी उरलेली असावी कारण त्यावर ओले गोणपाट पसरून ठेवलेले. तिने पदराने घाम पुसला आणि तिथल्या माठातले तांब्याभर पाणी एका दमात घटाघटा प्यायली.

मी चहावाल्याला म्हणालो, एक स्पेशल चहा दे.

दादा तुम्ही नाही घेत?

नाही. आत्ताच जेवण झाले.

असू द्या दादा. तुम्हीही घ्या. उन्हातान्हाचे फिरतात.

मी मनात म्हटले, तुझ्या कष्टापुढे माझे श्रम काहीच नाही.

चहा घेण्याची इच्छा नव्हती. पण तिचे मन मोडवेना. मीही चहा घेतला.

तिने अगदी शांतपणे चवीचवीने चहा घेतला. पुन्हा आपली टोपली उचलली. पुन्हा थांबली. टोपलीतून एक हातभर लांबीची काकडी काढली. 

मला देत म्हणाली घ्या दादा.

नको गं मला कशाला?"

असू द्या. उन्हाळ्याची चांगली असते. 

पोर आली असतील ना सुट्टीची घरी द्या त्यांना.

त्यापेक्षा तुझ्या मुलांना दे.

ते खातात. त्यांची फिकीर नाही. घ्या लवकर, माझी गाडी निघून जाईल.

मी नाईलाजाने काकडी घेतली. तिने टोपली डोक्यावर घेतली. पुन्हा तोंडावरचा घाम पुसला. 

येते दादा. म्हणत निघाली.

मी हातातल्या काकडीकडे आणि लगबगीने जाणाऱ्या तिच्या कृश कायेकडे बघत राहीलो. 

गरीबीतही आनंदी राहणारे आणि उदार असणारे लोक आपल्याला बरेच शिकवून जातात...

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

माणुसकीचा झरा दत्ता आंबेकर

img src="..." alt=" दत्ता आंबेकर">
मंदोशी गावचे दत्ता आंबेकर हे नोकरीच्या निमित्ताने मुंबईला आले. परंतु गावासाठी काहीतरी केले पाहिजे उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती मुंबईला असूनही गावाच्या ओढीने सतत त्यांचे गावाला जाणे येणे होते. डोक्यात सतत विचार चक्र फिरत होते. गावासाठी काहीतरी भव्य दिव्य करायचे. 

वाडीत देवी आईचे खूप जागृत असे देवस्थान आहे. हे देवस्थान मंदोशी हुरसाळेवाडी टोकावडे रस्त्यावर हुरसाळेवाडी जवळ रस्त्याच्या बाजूला पिंपरीच्या झाडाखाली होते. तेथे फक्त देवी होती. परंतु मंदिर नव्हते.

पूर्वी गावात अनेक साथीचे रोग यायचे. लहान मुले आजारी पडायची. त्यावेळी लोक या देवीला नवस करायचे. सबंध गाव वर्षातून एकदा या देवीचा उत्सव साजरा करायचे. सबंध गावातील स्त्री पुरुष लहान मुले या उत्सवात सहभागी व्हायचे. मोठा कार्यक्रम व्हायचा. त्यानिमित्ताने लोक एकत्र यायचे. हुरसाळे वस्तीला यात्रेचे स्वरूप यायचे. 

देआई:

त्यानिमित्ताने लोकांच्या भेटीगाठी व्हायच्या. लोक चार सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना सांगून दुःख हलके करायचे. एकमेकांना मदत व्हायची. 

परंतु पुढे काळ बदलला. साथीचे आजार कमी झाले. लोक देवीकडे यायचे कमी झाले. गावाने ही नंतर देवीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. 

अचानक दत्ता आंबेकर यांच्या मनात विचार आला. देवीला मागचे गत वैभव दोन दिले तर? त्या निमित्ताने लोक पुन्हा एकत्र येतील. एक दिवसाचे का होईना वाडीला यात्रेचे स्वरूप येईल. वाडी लोकांच्या आगमनाने गजबज होऊन जाईल. यासाठी काय केले पाहिजे? वेगाने विचारचक्र फिरू लागले. 

त्यांच्या मनात विचार आला. हे आपले एकट्याचे काम नाही. यासाठी अजून काही लोकांची मदत मिळाली तर आणि तरच हे काम तडीस जाईल. चांगल्या कामाला सुरुवात केली तर लगेच केली पाहिजे. नाहीतर उगाचच फाटे फुटत राहतात असा विचार करून त्यांनी लगेचच त्यांची कल्पना त्यांचे बालमित्र श्री भगवान हुरसाळे यांना बोलवून दाखवली. त्यांना ही कल्पना फारच आवडली. 

त्यानंतर त्यांनी वस्तीतील नामांकित पहिलवान श्री अंकुश हुरसाळे यांना ही कल्पना सांगितली. विचारविनिमय झाला. यासाठी पिंपरीच्या झाडाखाली असलेले देवी आईच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर? 

मंदिर बांधायचे म्हणजे सोपे काम नाही. पैशाचा प्रश्न तर होताच परंतु गावातील लोकांमध्ये त्यावेळेस मोठ्या प्रमाणात हेवेदावे होते. त्यांची परवानगी आवश्यक होती. चांगल्या कामाला विरोध करणारी माणसे गावात खूप असायची. 

त्याचप्रमाणे देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा म्हणजे त्यासाठी ग्रामदैवत काळभैरवनाथ देवाचा कौल घेणे आवश्यक होते. लोक एकत्र करायची होती. अशी अनेक आव्हाने त्यांच्या समोर उभी होती. 

यासाठी त्यांनी वस्तीतील सर्व तरुण एकत्र केले. मीटिंग आयोजित केली. मीटिंगमध्ये हा विषय चर्चेला आला. विशेष म्हणजे सर्व तरुण मित्रांनी यासाठी होकार दर्शविला. 

दत्ता आंबेकर म्हणाले 

मित्रांनो ! हे काम करायचे असेल तर आपापसातील हेवेदावे, भांडण तंटे याला लगाम लावावा लागेल. 

कोणत्याही मोठेपणासाठी काम न करता एक दिलाने काम केले पुढे नेता येईल. आपण सर्व आपल्या आई वडिलांना सांगायला पाहिजे. वस्तीमध्ये एक भव्य चांगले काम आम्ही करायला घेतले आहे. यासाठी जेणेकरून मंदिर बांधकामास खीळ बसेल असे होता कामा नये. 

सर्वांना हा विचार पटला. आणि सर्वजण पुढील कामासाठी लागले. 

गावातील देवादिकाची जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे गोविंदराव हुरसाळे. त्यांच्याकडे सर्वजण गेले. 

देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. यासाठी पुढे काय करावे लागेल हे त्यांना विचारले. 

त्यांनी सांगितले. आपले ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थान यांस कडे कौल लावावा लागेल. देवाने कौल दिला तर  आपल्याला करता येईल अन्यथा नाही. 

देवाने जर कौल नाही दिला तर? ही भीती मनात आली. तरीही गोविंदराव हुरसाळे यांना घेऊन दत्ता आंबेकर व अजून एक दोन जण एका रविवारी काळभैरवनाथ मंदिराकडे गेले. पुजाऱ्याने देवाला कौल लावला आणि आश्चर्य म्हणजे मंदिर जीर्णोद्धार करायचा कौल मिळाला. 

सर्वांना खूप आनंद झाला. मंदिराचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पुढचे आव्हान होते. गावकऱ्यांची संमती यासाठी गावात मीटिंग घेतली. सबंध गाववाडे वस्तीतील लोक मिटींगला उपस्थित होते. देआई मंदिर जिर्णोदराचा दत्ता आंबेकर विषय मांडला. अनेक चर्चा झाल्या. काही लोकांनी या कामासाठी खुप विरोध केला. 

तर काही लोकांनी तरुण पोरं करतात ही अतिशय चांगली बाब आहे. असा निष्कर्ष नोंदवला. काहीही झाले आणि कितीही विरोध झाला तरी मंदिर बांधायचे. कारण देवाने कौल दिला होता. तेव्हा मागे हटून चालणार नव्हते. 

परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मंदिर बांधकामासाठी लागणारा पैसा. आमच्याकडे तर साधे शंभर रुपये सुद्धा नव्हते. आणि आम्ही मंदिर बांधकाम करायला निघालो होतो. आजही विचार केला तर हे आठवून अंगावर रोमांच उभे राहतात. 

मंदिर बांधकामासाठी त्यांनी वाडीत मिटींग घेऊन प्रत्येक तरुणामागे दरमहा रुपये दहा वर्गणी ठरवली. दर महिन्याला दहा रुपये वर्गणी जमा व्हायची.

मंदिर बांधकामासाठी वस्तीतील प्रत्येक घरटी वर्गणी जमा केली. 

हातात पैसा आला. दत्ता आंबेकर, अंकुश हुरसाळे,व श्री भगवान हुरसाळे यांनी सुट्टीच्या दिवशी मंदिर कसे बांधायचे. यासाठी मुंबईतील छोटी छोटी मंदिरे पाहून घेतली. बरेच दिवसानंतर त्यांना हवे तसे मंदिर मिळाले. 

लगेच दत्ता आंबेकर गावाला आले. वस्तीतील लोकांची मीटिंग घेतली. आणि मंदिर बांधकाम करण्यासाठी कारागिराची चाचपणी केली. 

नंतर असे लक्षात आले की आपल्याच गावातील श्री दूंदाजी बांगर यांना काम दिले तर? त्यांनी मंदिराची यापूर्वी कामे केली होती. लगेचच त्यांना बोलवून घेतले. आणि त्यांना मंदिराचे काम देण्यात आले. 

सर्व विधिवत पूजा करून मंदिर बांध कामासाठी सुरुवात झाली. दर आठवड्या ला सुट्टीच्या दिवशी मुंबईवरून येऊन मंदिरासाठी काय हवे काय नको ते पाहू लागले. अल्पावधीतच सुंदर असे देखणे छोटे खाणी मंदिर पाहून सर्वाना विशेष आनंद झाला.

वस्तीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सर्व तरुणांचा उत्साह द्विगुणीत होत होता. विरोध करणारे लोकही आता सहभागी होऊन खांद्याला खांदा लावून काम करत होते. 

वस्तीतील रुसवे फुगवे, किरकोळ भांडणे कधीच बंद पडली होती. त्याचेही समाधान वाटत होते. शेवटी एकदा मंदिर तयार झाल्यावर जीर्णोद्धाराचा छानसा कार्यक्रम करावा असे ठरले. 

सर्वजण कामाला लागले. पहिल्याच वर्षी मंदिराचा जीर्णोद्धार व महापूजा ठेवण्यात आली. 

सन 2010 साली अनेक तरुण कार्यकर्ते यांना येऊन मिळाले. आणि आपण अजून काहीतरी भव्यदिव्य केले पाहिजे असा विचार पुढे आला. 

यासाठी अधिकृत असे मंडळ रजिस्टर करणे आवश्यक आहे. अशी भूमिका काही लोकांनी मांडली. 

आणि अल्पवधीत देआई प्रतिष्ठान मंडळाची स्थापना झाली. शासन दरबारी त्यांचे रजिस्ट्रेशन झाले. सर्व तरुण मंडळांनी दत्ता आंबेकर यांची अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड केली. अशाप्रकारे सामाजिक कार्य करण्यास एक प्रकारे चालना मिळाली. 

सन 2013 साली देवीचा भव्य दिव्य कार्यक्रम करायचा असे सर्वानुमते ठरले. यासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या जमा झाल्या. 

गावच्या यात्रेच्या धरतीवर कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले. अनेक तरुणांच्या संकल्पनेतून देवीस हारतुरे, मोफत सर्व रोग निदान, मोफत चष्मे वाटप शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शब्दकोश वाटप, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम इत्यादींचे आयोजन करण्याचे एकमताने ठरले. 

असा भव्य दिव्य कार्यक्रम यापूर्वी कधी झाला नव्हता. या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची कसरत सर्वांना करायला लागणार होती. 

श्री बंडूशेठ सिताराम हुरसाळे यांनी महाप्रसादाची जबाबदारी उचलली. श्री एकनाथ आंबेकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना शब्दकोश वाटप करण्याची जबाबदारी उचलली. थोडाफार भार हलका झाला. श्री गणेश हुरसाळे सर, श्री अंकुश हुरसाळे श्री भगवान हुरसाळे आणि दत्ता आंबेकर यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी उचलली. 

मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2013 रोजी भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

गावातील विघ्नसंतोषी लोकांनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. गावात चुकीच्या पद्धतीने प्रचार केला. मंडळातील काही मुलांना चुकीच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु एकानेही दाद दिली नाही. एकी भक्कमपनाने उभी राहिली. 

मोठ्या प्रमाणात लोक कार्यक्रमासाठी हजर होते. "न भूतो न भविष्यती" अशी लोकांची गर्दी झाली. उत्तम प्रकारे कार्यक्रम यशस्वी झाला. नवा हुरूप आला. 

त्यानंतर भविष्यात मंडळाने विविध प्रकारे सामाजिक कामे कार्यक्रमाच्या माध्यमातून हाती घेतली. 

मोफत रोग निदान, मोफत फळझाडांचे वाटप, मोफत चष्मे वाटप, शालेय विद्यार्थ्यांसाठी संगणकाचे वाटप, 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी गावातील सर्व शाळेतील मुलांना खाऊचे वाटप, मोफत वह्या व गणवेश वाटप, किर्तन, प्रवचन व भजनांचे आयोजन केले गेले. 

सन 1998 पासून आज अखेर पर्यंत त्यांचे हे काम अविरतपणे चालू आहे.

वाडीतील लग्नकार्य, पूजा व इतर धार्मिक कार्यक्रमासाठी अन्नदानाचे कार्य केले जाते. यासाठी वस्तीमध्ये भांडी नव्हती. इकडून तिकडून कार्यक्रमासाठी भांडी गोळा करावी लागायची. हे त्यांच्या लक्षात आल्यावर वस्तीसाठी सर्व प्रकारचे भांडी विकत घ्यायचे असे ठरले. 

मुंबईमधील भांड्यांची विविध दुकाने श्री मनीष हुरसाळे आणि दत्ता आंबेकर यांनी पायाखाली घातली. आणि एक दिवस जेवणासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी विकत घेतली. 

दत्ता आंबेकर हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढे आहेत. गावातील किंवा भागातील अनेक लोकांचे सुखदुःखासाठी ते सतत धावून येतात.

दत्ता आंबेकर हे माझ्यापेक्षा तीन-चार वर्ष वयाने मोठे.

त्यावेळी डेहणे येथे शालेय मुलांच्या बीट पातळीवर स्पर्धा होत्या. पश्चिम भागातील सर्व विद्यार्थी डेहणे येथे क्रीडा स्पर्धांना गेले होते. त्यामध्ये मी पण होतो.

क्रीडा स्पर्धा संपल्यावर घरी येताना रस्त्यामध्ये मी पडलो. माझ्या पायाला बरेच खरचटले होते, थोडेफार रक्तही येत होते. त्यावेळी साधारण मी दुसरीला असेल.

दत्ता आंबेकर यांनी मला वांजळ्यापासून मंदोशी पर्यंत उचलून आणले होते. इतका हा प्रेमळ माणूस. लहानपणापासूनच त्यांच्या अंगी सामाजिक बांधिलकी, प्रेम, जिव्हाळा,आपुलकी इत्यादी गुण असल्यामुळे मुंबईसारख्या मायावी नगरीत ते तरुण गेले.

मुंबईसारख्या नगरीत सुरुवातीला त्यांनी अनेक छोटी मोठी कामे केली. ही कामे करूनही कपडे घेण्यासाठी ही त्यांच्याकडे पैसे नसत.

परंतु परमेश्वर कृपेमुळे त्यांना भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये नोकरी मिळाली आणि त्यांच्या आयुष्याचे सोने झाले.

एकदा आम्ही गावकरी आमच्या गावच्या मंदिराच्या जिर्णोदरासाठी देणग्या गोळा करण्यासाठी मुंबईला गेलो होतो. तेथे सर्वांची श्रेयस गार्डनमध्ये मीटिंग झाली.

मीटिंग साधारण सायंकाळी सात वाजता संपली. त्यानंतर सर्व ग्रामस्थांना दत्ता आंबेकर यांच्या घरी जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

तेथे जेवायला बसल्यावर त्यांच्या पत्नीने मला म्हटले.

रामदास ! अरे, कसं काय बरा आहेस ना? असे विचारले. 

दत्ता आंबेकर व  माझ्यासकट जेवायला बसलेले सर्व आश्चर्यचकित झाले. कारण मी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेलो होतो. ओळख पण नव्हती.

परंतु त्यांच्या पत्नीने नंतर खुलासा केला. की शाळेमध्ये आम्ही एकाच वर्गात होतो. नंतर लक्षात आले की आम्ही पाचवी ते सातवी पर्यंत एकाच वर्गात होतो. आणि योगायोगाने त्या आमच्या पत्नीच्या नातेवाईकही लागत होत्या.

तर... असे हे दत्ता आंबेकर यांचे कुटुंब. सामाजिक बांधिलकी जपणारे..

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)


पैलवान हरिभाऊ


img src="..." alt=" पैलवान हरिभाऊ ">
सन 1985 साली कुस्ती क्षेत्राची जाणकार व नामांकित मल्ल श्री. जयराम आंबेकर गुरुजी यांनी हुरसाळेवाडी येथे छोटी तालीमच उघडली होती. 

रोज संध्याकाळी ते स्वतः हुसळेवाडी येथील तरुणांना कुस्तीचे धडे देऊ लागले. त्यामुळे सहजिकच तरुणांना कुस्त्यांचे आकर्षण वाटू लागले. 

रोज संध्याकाळी कुस्त्यांची खडाखडी झडू लागली. वेगवेगळे डाव, प्रति डाव आंबेकर गुरुजी शिकवू लागले. 

आणि याचाच परिणाम श्री कुशाबा आंबेकर,कै.शंकर हुरसाळे ड्रायव्हर,श्री हरिभाऊ हुरसाळे असे नामांकित मल्ल तयार झाले. त्यांनी एकेकाळी मंदोषी गावचे नाव तीनही तालुक्यात पोहचवले.

कुशाबा आंबेकर यांच्या कुस्तीच्या काळात मी खूप लहान असल्यामुळे असे काही आठवत नाही. परंतु हरिभाऊ हुरसाळे यांची कुस्ती मी अगदी सुरुवातीपासून ते शेवटच्या काळापर्यंत पाहिली.

सन 1985 ते सन 1992 दरम्यान कुस्तीच्या क्षेत्रात मंदोशी गावचे नाव गाजवले ते खऱ्या अर्थाने श्री हरिभाऊ हुरसाळे यांनी.

घरची अतिशय साधारण परिस्थिती. चटणी भाकरी, वरण-भात असा त्यावेळी हरिभाऊचा आहार असायचा.

ओढ्यावर आंघोळ करायची. तेथेच जोर बैठका काढायच्या. शेतातील मांडवात झोपायचे. शेतीची कामे करायची. संध्याकाळी एकर गुरुजींच्या तालमीत डाव प्रतिडाव विकायचे. कोणताही वेगळा खुराक हरिभाऊ ला कधीच मिळाला नाही.

सन 1985 साली रेवड्यावर कुस्त्यांची सुरुवात करणारे श्री हरिभाऊ हा.. हा म्हणता नामांकित मल्ल म्हणून उदयास येऊ लागला.

हरिभाऊकडे अनेक वेगवेगळे डाव होते. एकदा शेंदुर्लीच्या आखाड्यात कुस्त्यांची जोरदार रणधुमाळी चालू होती. 

आखाडा मद्यापर्यंतही गेला नव्हता. हरिभाऊला वीस रुपयावर धरण्यात आले. आणि लागलीच आंबोलीचा एक पैलवान हरिभाऊवर उठून आला. 

या पैलवानाने आंबोलीच्या आखाड्यात त्या काळात पाच हजार रुपयांची कुस्ती निकाली केली होती. हे हरिभाऊला माहित होते. 

हरिभाऊ त्याला म्हटला सुद्धा. 

अरे बाबा, तू पाच हजार रुपयाची निकाली कुस्ती केली आहे. आणि खुशाल वीस रुपयांवर उठून आला आहेस. कशाला खेळतोस उगाच?

हे ऐकून त्या पैलवानाला चेव आला. तो म्हटला.

खेळायची आहे का बोल.? 

हे ऐकून हरिभाऊ निरुत्तर झाला. शेवटी एकदाची कुस्ती लागली.

दोन्ही पैलवान आखाड्यात आले. देवाचे नाव घेऊन एकमेकांच्या हातात धूळ माती दिली. आणि खडाखडीला सुरुवात झाली. आणि काय आश्चर्य. 

अर्ध्या मिनिटाच्या आत हरिभाऊने गोफण मीठी घातली आणि लांग मारून दार मागे ढकलतात तसे आंबोलीच्या पैलवानाला ढकलले. 

एखादे धूड पडावे तसे हा आंबोलीचा पैलवान आखाड्याच्या मैदानातील धुळीत धाडकन कोसळला. त्याला काही कळले सुद्धा नाही. आपण कसे पडलो.

क्षणार्धात प्रेक्षकांकडून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. म दोशीचे लोक नाचू लागले. बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पडला. वीस रुपयाच्या कुस्तीवर त्यावेळी हरिभाऊला नऊशे रुपये बक्षीस मिळाले होते. 

हरिभाऊ हा मोठ्या मनाचा माणूस. हा त्या पडलेल्या पैलवानाजवळ जवळ गेला आणि त्याला म्हणाला. अरे बाबा मला तुझ्याशी कुस्ती खेळायची का नव्हती तर तू आंबोलीच्या आखाड्यात पाच हजार रुपयाची कुस्ती केली होती. किरकोळ 20 रुपयावर तू उठून आला होता. हे तुला शोभते का. तो पैलवान म्हणाला. मी कुस्ती खेळायला तयार नव्हतो. बाकीच्या मित्रांनी भारीस घातले. आणि सगळी इज्जत घालून बसलो. पुढे हरिभाऊ या पैलवानाच्या लग्नाला देखील गेला होता. 

हरिभाऊचे नाव खेड, आंबेगाव, मावळ या तीनही तालुक्यात दुमदुमू लागले. शेवटची मानाची कुस्ती ही हरिभाऊवर होऊ लागली.

एकदा शंकर ड्रायव्हर, हरिभाऊ, महादू मोहन व सुरेश आंबेकर हे अगदी सकाळीच बोरघरच्या ता. आंबेगाव आखाड्यासाठी पायी पायी निघाले. दहा वाजता निघालेले हेगडी दुपारी एक वाजता बोरघरला पोहोचले. शंकर ड्रायव्हरच्या ओळखी होत्या. त्यामुळे तेथे चहापाणी झाला. गप्पा टप्पा झाल्या.

दुपारी आखाड्यास सुरुवात झाली. आखाडा अगदी भरात येऊ लागला. हळूहळू आखाड्याला रंग चढू लागला. त्या भागात हरिभाऊ सारखाच एक नामांकित पैलवान होता. कोकणेवाडी हे त्याचे गाव. हा पैलवान तिकडच्या भागातील सगळ्यांचा लाडका होता. 

आणि अशा या परिस्थितीत हरिभाऊ या पैलवानावर उठून गेला. एकदाची कुस्ती जाहीर झाली. 

हरिभाऊ कपडे बदलण्यासाठी परत आला. दोन-तीन जण हरिभाऊला म्हणाले. कशाला गेला मारायला. बरगड्या मोडून घ्यायच्या आहेत का ?

हरिभाऊने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. एकदाचा जांग चढवला. काळभैरवनाथाचे नाव घेतले. आणि कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात सज्ज झाला.

समोरचा पहिला पैलवानही तितक्याच ताकदीचा होता. सुरुवातीला खूपच खडाखडी झाली. एकमेकाच्या ताकदीचा अंदाज पाहण्यातच दोन मिनिटे गेली. त्यानंतर डाव प्रति डाव होऊ लागले. हरिभाऊने सर्व डाव वापरून पाहिले. परंतु यश काही येईना. 

समोरच्या पैलवानाने ही त्याच्याकडचे डाव वापरून पाहिले. तोडिस होऊ लागली. याने डाव काढायचा. आणि त्याने तो डाव फोडायचा. त्याने डाव काढायचा आणि याने डाव तोडायचा. 

आखाड्यात भयान शांतता पसरली होती. लोक कौतुकाने अशी ही नामांकित कुस्ती पाहत होते कुस्ती सोडवायची देखील गावच्या पंचांना आठवण झाली नाही. एवढी ही कुस्ती प्रेक्षणीय आणि रंगतदार होत चालली होती.

आणि अशातच हरिभाऊने समोरच्या पैलवानाच्या डाव्या पायाच्या कवळ्याला हात घातला व वर ओढला. आणि दुसऱ्या पायाने त्या पैलवानाच्या उजव्या पायाला टाप मारली. आणि हा हा म्हणता समोरचा पैलवान धाडकन उताणा झाला. हरिभाऊ ने समोरच्या पैलवानाला दिवसा चांदण्या मोजायला लावल्या.

आखाड्यात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. हरिभाऊ त्या तालुक्यात अगदी नवखा पहिल्यांदाच कुस्ती खेळण्यासाठी गेला असतानाही आंबेगावकरांनी अकराशे रुपयांची बक्षिसांची खैरात हरिभाऊ वर केली होती.

अनेक गावच्या आखाड्यातून हरिभाऊने चांदीच्या ढाली, चांदीच्या अंगठ्या, कोंबडे, बकरे,घड्याळ, स्वयंपाकाची भांडी रोख बक्षिसे, रोख इनाम अशी कितीतरी बक्षिसे मिळवली होती.

एकदा तर हरिभाऊ ने कमालच केली. राजपूरच्या आखाड्यात हरिभाऊने नऊ मनगटी घड्याळे एकाच वेळी जिंकली होती.

एकदा असेच हरिभाऊ, महादू मोहन व सुरेश आंबेकर हे आंबेगाव तालुक्यातील राजेवाडीच्या आखाड्यासाठी गेले होते. त्यावेळी हरिभाऊ ला 8 9 भांडी मिळाली होती. आखाडा फुटल्यावर हे सर्वजण डागोबाच्या मंदिरा कडून मंदोशी कडे रानातून खाली चालले होते.

जांभूळ दरडीच्या वर त्यांच्या मागे भूत लागले. सुरेश आंबेकर च्या डोक्यावर भांडी होती. तिघेही जण अक्षरशा पळत होते. एक मोठा दगड हरिभाऊ च्या दिशेने खाली आला. हरिभाऊला वाटले आता आपण या दगडाखाली जाणार परंतु काय आश्चर्य. हा दगड हरिभाऊ जवळ येऊन थांबला. अशा परिस्थितीत ते दम टाकायला. 

श्री विष्णू रोकडे यांच्या घराजवळ आले. विष्णू रोकडे हे नुकतेच जेवण करून बसले होते. त्यांनी या सर्वांची अस्थेने चौकशी केली. सर्वांना पिण्यासाठी पाणी दिले. हरिभाऊने त्यांच्या घरातील सर्वांना रेवड्या दिल्या. आणि पुढे घरी आले.

हरिभाऊ च्या घराचे काम चालू होते. सुतारांनी दगड फोडायचे काम हाती घेतले होते. त्यादिवशी घोटवडीचा आखाडा होता. हरिभाऊ ला सुद्धा घोटवडीच्या आखाड्यासाठी जायचे होते. परंतु सुतार काही जाऊ देत नव्हते. त्यांचे एकच म्हणणं हा दगड फोडल्याशिवाय जायचं नाही. 

शेवटी एकदाचा दगड फोडला गेला. त्यावेळी मंदोशीतच एक वाजले होते. आखाडा हाती लागतो की नाही. हे शंका हरिभाऊ ला भेडसावत होती. अगदी पळतच हरिभाऊ घोटवडीच्या आखाड्यासाठी निघाला होता. 

पायी प्रवास करून अडीच वाजता हरिभाऊ घोटवडीला पोहोचला. तोपर्यंत महादू मोहन, सुरेश आंबेकर हे आधीच पोचले होते. कुस्त्यांचे इनाम वीस रुपयांवर गेले होते.

हळूहळू आखाड्याला रंग चढू लागला. आणि अखेर धंद्रे बुवांनी एकदाची हरिभाऊची कुस्ती लावली. समोरचा पैलवान हा हरिभाऊचा भाऊ शंकर ड्रायव्हरचा होणारा साडू होता. हे हरिभाऊला माहीतच नव्हते. म्हणजेच साडू साडू मध्ये कुस्ती लागली होती. समोरचा पहिलानही अगदीच नवखा नव्हता. 

परंतु हाताला हात भिडवल्याबरोबर अगदी दहा सेकंदातच हरिभाऊने समोरच्या पैलवानावर पट भरला. आणि असा काही पैलवानाला उचलून खाली टाकला की त्या धुराळ्यातच पैलवान कुठल्या कुठे हरवला. आखाड्यात नुसताच धुराळा दिसू लागला. अरे... खाली पडलेला पैलवान कुठाय? 

लोक बोलू लागले. आंबेकर गुरुजी सुद्धा या आखाड्यासाठी आले होते. आपण शिक्षक आहोत हेच ते विसरले होते. आणि आखाड्यात अक्षरशः नाचत होते. कारण शेवटी आंबेकर गुरुजी हे हरिभाऊचे गुरु होते. 

आंबेकर गुरुजी व हरिभाऊच्या कर्तुत्वामुळे तीनही तालुक्यात मान सन्मान, प्रतिष्ठा, ईनाम, बक्षिसे मिळवून दिली.

सन 1992 रोजी हरिभाऊचे लग्न झाल्यानंतर कुस्त्या खेळणे बंद केले. व एका नामांकित पैलवानाचा खेळ पाहण्यास लोक मुकले. आजही जुन्या आठवणी निघाल्या की हरिभाऊच्या कुस्त्यांची आठवण नक्कीच येते. आणि मग जुन्या आठवणीत रममान होते.

कोणताही आखाडा झाल्यावर सर्व पैलवान मंडळी घरी आल्यावर जेवण खान झाल्यावर हुरसाळे वस्तीतील सर्व लोक गप्पा मारण्यासाठी आंबेकरांच्या अंगणात बसत असत. 

तेथे कुस्त्यांच्या गप्पा चालत. पैलवान मंडळी सर्वांना रेवड्या वाटत. कुस्त्यांच्या गप्पा अगदी चवी चवीने चघळल्या जात. हास्यविनोद होत असत. परंतु काळ बदलला. पूर्वीसारखे आखाडेही आता होत नाहीत.आणि पूर्वीसारखे अंगणात बसून कोण गप्पाही मारत नाही.

काशिनाथ जढर व्यक्तीचित्र या लिंकवर क्लिक करा आणि वाचा

✍️ माझा हा लेख मूळतः StoryMirror, Marathishrushti आणि Pratilipi वर देखील प्रकाशित झाला आहे. लेखक: रामदास तळपे

रामदास तळपे.(ग्रामीण संस्कृती)

गावठ्यावरची म्हातारी


img src="..." alt=" गावठ्यावरची म्हातारी ">
गावठ्यावरची म्हातारी आमच्या गावापासून जवळच असलेल्या गावठ्या वरच्या शेतात अर्धे कौलारू व अर्धे गवत असलेल्या छपरात राहायची. तिच्याकडे गाया म्हशी, शेळ्या आणि बैल देखील होते. 

दररोज डेअरीला ती दूध घालायची. तांब्याभर दुध आम्हाला आणून द्यायची. तापवून जाडसर खरपूस झालेल्या दुधाबरोबर चपाती व भात खाताना चव म्हणजे काय याची प्रचिती यायची.

मी साधारण एक वर्षाचा होतो तेव्हा चव दार व रुचकर असे तामकुड्याचे तांदूळ गावठ्यावरच्या म्हातारीने आम्हाला दिले होते. दररोज थोडासा भात घालून बाळाला दुधाबरोबर खायला घाल असा सल्ला देखील माझ्या आईला दिला होता.

ती जर कधी बाजाराला गेली तर न चुकता आमच्या घरी येत असे.साठे बिस्कीटचा पुडा, किंवा गोडी शेव आम्हाला देत असे. माझ्याच वयाचा तिचा मुलगा विठ्ठल शिक्षणासाठी आश्रम शाळेत शिकायला होता.  तो दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी येई. ती तिचा मुलगा विठ्ठल माझ्यामध्ये पाहत असे. त्यामुळे तिचा जीव माझ्यावर विशेष होता.

दसऱ्या, दिवाळीच्या दिवसात माझी आई मला जवळच शेतात राहणाऱ्या गावठ्या वरच्या म्हातारीकडे मला पाठवायची. गावठ्यावरचे अंतर माझ्या घरापासून थोडे दूर होते. मी माझ्या मित्राला घेऊन पाय वाटेने रमत गमत म्हातारीच्या घरी जायचो. दारातच म्हातारी तिथे काही बाई काम करताना दिसायची.

तिथे गेल्यावर म्हातारी दुधात गूळ टाकून केलेल्या वाफाळलेल्या शेवया मला द्यायची. वाफाळलेल्या शेवया हा तिचा फेवरेट पदार्थ होता. या वाफाळलेल्या शेवयांमध्ये प्रेम, आपुलकीची गोडी ठासून भरलेली होती.

मी घरी जाताना निघालो की, ती मोठा डांगर भोपळा, हातभर लांब अशी काकडी, घोसाळी, दोडके, भुईमुगाच्या शेंगा असे काही बाही गाठोड्यात बांधून द्यायची. 

जाताना तोंडावरून हात फिरवायची आणि कडाकडा बोटे मोडायची. माझे वडील लहानपणीच गेल्यामुळे आम्ही तेव्हा अगदी अनाथ झालो होतो. माझी आई तीन मुलांचा सांभाळ कशी करणार याची जाणीव होऊन ती तीळ तीळ तुटायची. 

कसं होणार. लेकरांचं. बा. परमेस्वरा तूच बघ रे बाबा ! यांचं. असं म्हणायची. 

तेव्हा माझ्याही मनात कालवा कालव व्हायची. तिची घालमेल पाहून मलाही गलबलून यायचं.

हिवाळ्याच्या दिवसांत क्रिकेट खेळून आम्ही दुपारचे विहिरीवर पोहून परतू लागलो की बाजार घेऊन आलेली म्हातारी मला वाटेवर दिसायची. मला बघून ती आपोआप रस्त्याच्या कडेला थांबायची. सोबतीच्या मित्रांना सोडून मी हळूच रस्त्याच्या कडेला म्हातारीकडं जायचो.

मी तिची विचारपूस करतो आहे, तेवढ्यात तिच्या डोकीवरची पाटी खाली यायची. मांड्यांवर पाटी तोलून धरून म्हातारी चवळीच्या कोवळ्या शेंगा बचकभर माझ्या ओंजळीत ठेवताना म्हणायची‚ 

आता मोठा झालास बाबा तु 

कदी माझ्या घराकडे पाय वाकडं व्हत नाईत तुझ. घे. 

तिनं दिलेल्या चवळीच्या शेंगा भर रस्त्यावरून खात जाताना मला कशाचंच भान उरायचं नाही. वाटायचं‚ या म्हातारीचं आणि आपलं कसलं तरी गुंतवा झालेलं नातं आहे. कसलं ते काही कळायचं नाही.

गावठ्या वरच्या म्हातारीला तीन मुले होती. पैकी दोन मुलांची लग्न झाली होती. विठ्ठल हा सगळ्यात धाकटा माझ्या वयाचा. विठ्ठल या शेंडेफळात म्हातारीचा जीव गुंतलेला असायचा. आपल्या विठ्ठलनं चांगली कापडं घालावी. बुकं वाचावी‚ लई मोट्ट व्हावं असं म्हातारीला वाटायचं. त्यासाठी ती उरात गावरान माया भरून जिवाचा आटापिटा करायची.

तिचा नवरा दामूबाबाला सुगावा लागणार नाही अशा बेताने डोक्यावरच्या पाटीत चार-एक पायली भात भरून घेऊन ती माझ्या आईकडं येऊन म्हणायची‚ 

सखू वाईच नड हाय. इठ्ठलला पैकं होवं. एवढं भात घे नी शंभर रुपये द्ये. तिचं ते‚ पोराच्या काळजीने व्याकुळ झालेले बोल ऐकले की मी कुठंतरी खोलवर गलबलून उठायचो.

माझे वडील लवकरच गेल्यामुळे आम्हाला तिने खूपच मानसिक आधार दिला होता. पंधरा दिवस ती आमच्या घरात राहिली देखील होती.

मावशी पैसे घेऊन जा. भात कशाला त्याबद्दल? इठ्ठल काही परका नाही. माझी जशी तीन आहेत तसाच तो चौथा.आई म्हातारीला स्त्रीपणाचा आधार देऊ बघायची.

तसं कसं ? तुझाबी सौंसार हाय.घरात कर्तं मानूस न्हाई. 

ह्ये भात घानवट ऱ्हाऊ दे तंवर.. तुमच्याकडं. 

खूप पावसाळे वाहून जाताना बघितलेली म्हातारी‚ वनवासातल्या कुंतीसारखी शहाणपणाचं बोलायची.

गावठ्यावरच्या म्हातारीकडे दरवर्षी अश्विन महिन्यातल्या  तिसऱ्या मंगळवारी वरसुबाईचा नैवेद्य असायचा. त्यासाठी भात आमटी, शाकबाजी व बुंदीचे जेवण असायचे.

शेणसारवण केलेली पाटी घेऊन गावठ्या वरची म्हातारी वरसुबाईच्या जेवणाचं आमंत्रण द्यायला आमच्या घरी यायची. माझ्या आईशी ती नेहमी खास मनाच्या कप्प्यातलं बोलायची. अंगणात उभी राहून ती आईला हाक घालायची‚ 

सखू..जरा भाहेर ये.

आई बाहेर गेली की त्या दोघींच्या अंगणातच गप्पा जमून जायच्या. म्हातारी वरसुबाईच्या निवदाचं आवतन’ द्यायला आलो आहोत हे विसरायची. आपल्या विठ्ठलच शिक्षान’ कसं करावं याचा सल्ला विचारताना म्हातारी आपली शेतीवाडी घर शेकारणी सारं सारं विसरलेली असायची. 

आई तिला घरात नेऊन चहा द्यायची. 

येते ग सखू म्हणत म्हातारी माझ्या घरासमोरच्या अंगणा पर्यंत जायची आणि पुन्हा परतायची. 

बघितलासा सखू ध्यानातच ऱ्हात नाई‚ लेकरांस्नी वरसुबाईच्या निवदाला गावठ्यावर लावून दे सांच्याला.

वरसूबाईचं देऊळ दीड-एक मैलावर असल्यामुळं माझी भावंडं जायला कुरकुरायची. मी एखादा जोडीदार घेऊन‚ आंब्याच्या डेरेदार झाडांच्या राईतून वरसु बाईच्या देवळाजवळ यायचो. 

वडाच्या पानांच्या पत्रावळीवरचा आमटीभात शाकभाजी व बुंदीचा निवद घोंगडीवर बसून खाताना कसली तरी आगळीच चव तोंडात रेंगाळू लागायची.

मी लग्न झाल्यावर पत्नीसह गावठ्या वरच्या म्हातारीला भेटायला गेलो. घरातील एका अंधाऱ्या खोलीत म्हातारी लोखंडी खाटावर गोधडी पांघरून आजारपणामुळे निपचित पडली होती. 

मी बायकोसह म्हातारीच्या अंधाऱ्या घरात गेलो. मी आलोय हे कळताच म्हातारी अंथरुणात उठून बसली. आम्ही दोघांनी तिला नमस्कार केला. मी तिच्या खाटेवरच टेकलो. म्हातारी आपल्या विठ्ठल कडं बघत क्षीण आवाजात म्हणाली‚ 

जोडप्यानं आल्यात. त्वांड गॉड कर बाबा त्येचं.

विठ्ठलने आमच्या हातांवर साखरेचे चमचे पालथे केले. ब्येस क्येलंस ल्येका मास्तरच नाव राकलंस. माझे वडील शिक्षक असल्याने ती वडिलांना मास्तर म्हणायची.

विठ्ठल फोन मधून तु लिव्हलेलं वाचून दावतो.

जेवणाच्या खोलीकडं बघत‚ म्हातारी सुनांना उद्देशून म्हणाली‚ 

अगं! सवाशीन आली. कुनीतरी कुकू लावा की गं तिच्या कपाळाला.

म्हातारीचं बोलणं ऐकताना माझं काळीज चिरल्यासारखं झालं.

गावठ्यावरच्या म्हातारीच्या घराबाहेर पडताच मी बायकोला म्हणालो‚ बघितलंस‚अशी माणसं भेटायची नाहीत इथून पुढं.

थोड्याच दिवसांत माझ्या मोबाईलवर मेसेज आला.  

प्रिय रामदास,

तुझी गावठ्यावरची म्हातारी गेली. तुझं नाव काढलं तिनं जाताना. 

तुझा विठ्ठल....

आजही मी गावी जातो. गावी गेल्यावर गावठ्यावरच्या म्हातारीची तीव्रतेने आठवण येते. आणि नकळत मी गावठ्या वरची वाट चालू लागतो. दुरूनच म्हातारीचे घर दिसते. म्हातारी आपल्यात नाही हे मनाला पटतच नाही. 

म्हातारी आपल्यात आहे असा भास होतो. का? काय माहित? परंतु म्हातारीच्या घराकडे जायला पावले जड होतात. मग मी तिथूनच म्हातारीच्या घराच्या दिशेने म्हातारीला नमस्कार करतो आणि मागे फिरतो.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

बालपणीचे दिवस

साधारण 1976 चे ते साल असावे. दुष्काळात  शासनाने रोजगार हमीची कामे काढून लोकांच्या हाताला काम दिले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता भुकेच्या विवंचनेतून बाहेर पडली होती. हळू हळू परिस्थिती पूर्वपदावर येत होती. तत्कालीन देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा देऊनही  सत्तर टक्के लोकांची गरीबी होती तशीच होती. 

शेती मध्ये आधुनिकता नव्हती. संकरित बी बियाणे तो पर्यंत विकसित झाले नव्हते. त्यामुळे कमी उत्पन्न शेतीतून मिळत असे.

नुकत्याच सहकाराच्या माध्यमातून दूध डेअरी काढल्या होत्या. त्यामुळे शेत कऱ्याच्या घरी थोडा फार दुग्ध व्यवसाय चालत होता. म्हणून तरी जीवनावश्यक वस्तू बाजारात जाऊन घेता येत होत्या. 

घरामध्ये खाती तोंड वाढत असल्यामुळे कुटुंब प्रमुखाला तारेवरची कसरत करावी लागत होती. जशी ही स्थिती सगळी कडे होती तशीच आमच्या ही घरी होती.

आमच्या घरात आमचे आजोबा कुटुंब प्रमुख होते. घरामध्ये दोन बैल दोन म्हशी, एक शेळी, एक कुत्रे, एक मांजर असा मुक्या जनावरांचा तांडा होता. 

आम्ही तीन भावंड, आजोबा, आजी, आई, वडील असा आमचा परिवार आनंदाने तर नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी जीवन जगत होता. 

घरातील म्हशी गाभण असल्यामुळे घरात दूध हे नावाला सुद्धा पहाण्यास मिळत नव्हते. आणि मग दूध नसले की घरात पैसा आपले तोंड लपवून ठेवत असे. त्यामुळे घर चालवताना खूप आर्थिक ओढाताण होत असे.

वसंत ऋतूच्या आगमनाने रानातील आंब्याची झाडे मोहरली होती. त्यावर्षी आंबे भरपूर होणार हीच भविष्यवाणी वर्तवली जात होती. सामायिक रानात आमची चार आंब्याची झाडं होती. सगळ्या झाडांना आंबे लगडलेले होते. 

ही चार ही झाडे भावकी मिळून होती. एके दिवशी भावकीतील चार, पाच माणसं त्या थोराड आंब्याखाली जमा झाली. आंबा पाडाला लागल्याने त्याला उतरवण्याचे काम त्या दिवशी होणार होते. 

झाडा वर एक माणूस तर खाली एक माणूस अशी जोडी जोडी तयार झाली वर चढणाऱ्या माणसाकडे एक खोडी होती. आंब्याच्या झाडाच्या शेंड्यावरील आंबे तो त्या खोडीत घेत होता. त्यातील एक एक आंबा खाली असणाऱ्या माणसाकडे झेलण्यासाठी देत होता. पोत्याच्या घडी मध्ये एक एक आंबा उतरवला जात होता. 

झाडाखाली मोठी आंब्याची रास लागली. सगळ्या भावकीला समान वाटा देण्यात आला. हे आंबे मोजण्यासाठी आजोबांच्या वयाची तीन माणसं बसली होती. सुरवातीला धान्य किंवा इतर वस्तू मोजताना लाभ असे बोलण्याची पद्धत होती. नंतर दोन, तीन असे मोठ्याने बोलले जायचे. यामुळे वाटे होत असताना कोणतीही गडबड होत नव्हती. 

प्रत्येकाने पोत्यात भरून आंबे घरी आणले घरात मोकळ्या जागेत पेंढ्याच्या थरात ते पिकवण्यासाठी ठेवले.

आंबा पिकल्या नंतर खूप गोड लागत होता. साधारण एक आंबा अर्धा किलोच्या वजनाचा असेल. तो पिकण्यासाठी सहा ते सात दिवस लागले.

सात, आठ दिवसानंतर पिकलेले आंबे बाहेर काढले. आंब्यांच्या सुगंधाने संपूर्ण घर दरवळून गेले होते. 

इकडे घरातील जीवनावश्यक वस्तू संपल्या होत्या. येणाऱ्या बाजाराची वाट पहावी लागली होती. गुळ, घासलेट, कपड्याचा साबण, गोडेतेल, अशा सर्व सामान गरजेचे होते. घरात दूध नसल्याने दुधाचा पगार मिळण्याची शक्यता नव्हती. 

त्या वेळी आजोबांनी आईला आणि मला सांगितले. जर ही आंब्याची पाटी तुम्ही बाजारात जाऊन विकली तर गरजेपुरता बाजार येऊ शकतो. 

तसे पाहिले तर बाजाराचे ठिकाण म्हणजे खेड तालुक्याच्या पश्चिम भागाची मोठी बाजारपेठ म्हणजेच वाडा गाव. त्यावेळी गाड्यांची कोणतीही साधने नव्हती. पायी जाणे हाच पर्याय. 

त्यासाठी दोन तास पायी चालत जावे लागणार होते. शिवाय ते आंबे डोक्यावर घेऊन जावे लागणार होते. आजच्या काळात माणसाला रिकामे एवढे अंतर पायी चालता येत नाही. तेव्हा ते डोक्यावर सामान घेऊन जावे लागणार होते.

शनिवारचा दिवस बाजाराचा असल्याने आईने शेण ,पाणी, लवकर उरकले. मी सुद्धा तिच्या बरोबर जाण्यास तयार झालो. माझे त्यावेळी वय साधारण दहा वर्षाचे असेल.

आईने एका पाटीत पन्नास साठ आंबे मावतील तेवढे घेतले. तर माझ्याकडे पंचवीसेक आंबे एका खताच्या गोनीत भरून दिले.

अंगात शाळेचा एकच सदरा जो धुवून तोच घालायचा असा आणि ठिगळ लावलेली खाकी चड्डी अशा पेहरावात आईआणि मी दोघे मायलेक आंबे विकायला बाजाराला निघालो होतो. निघालो होतो.

बाजाराला जाण्यासाठी काही सासुर वाशीणी स्रिया रस्त्याने चालल्या होत्या. त्यापैकी आईची खास मैत्रीण आईला गप्पा मारण्यासाठी भेटली होती. आईच्या डोक्यावर तीस ते चाळीस किलोचे ओझे तर माझ्या कडे खताच्या गोनीत असलेल्या आंब्याचे वजन साधारण दहा एक किलो होते.

आई आणि तिच्या संसाराच्या गप्पा रंगात आल्या होत्या. म्हणतात ना प्रवास बोलण्याच्या नादात कधी पूर्ण होतो ते कळत नाही. अगदी तसेच होत होते. आईची ती मैत्रीण सासूचे गाऱ्हाणे आईला सांगत होती. पण आई मात्र आमच्या आजी बद्दल काहीच सांगत नव्हती. त्यांच्या गप्पा मी तलीन होऊन ऐकत चाललो होतो.

परंतु त्या डोक्यावरच्या गोणीने मला चालणे असह्य केले होते. कितीही केले तरे माझे खेळण्याचे ते वय, परंतु संसाराचे ओझे वाहण्यासाठी मला तिथे जुंपले होते. मी या खांद्यावरून त्या खांद्यावर ते ओझे रागाने ठेवत होतो. गोनीतले ते निर्जीव आंबे सर्व सहन करत होते. 

रस्त्यांमध्ये एक विसाव्याचा आंबा होता. त्याला गर्द सावली होती. बाजाराला निघालेला आणि बाजार करून आलेला वाटसरू तिथे विसावा घेत असायचा. आम्ही सुद्धा काही काळ तेथे विसावा घेतला. 

मग मजल दरमजल करत वाड्याच्या बाजारात पोहचलो. एक रिकामी जागा पाहून आईने बरोबर आणलेली पाटी त्यामधील आंबे पोत्यावर पसरवले. माझ्याकडील आंब्याची अवस्था दयनीय झाली होती. आंब्याचे ओझे सतत खालीवर केल्यामुळे ते आंबे अगदीच बिलबिलीत झाले होते. 

पिवळे धमक आंबे पाहून गिऱ्हाईक येत तर होते. पण भाव ऐकून पुढे जात होते. आईच्या लक्षात आले होते,भाव थोडा  जास्तच आपण सांगत आहोत. मग काही वेळाने थोडा भाव कमी केला.

काही वेळातच आईकडील सारे आंबे  विकले गेले. मात्र माझ्या कडील आंबे पाहून गिऱ्हाईक नाक मुरडत पुढे निघून जात होते.

आई मला सतत बडबड करत होती.

तू जर बरोबर ओझे एकसारखे डोक्यावर आणले असते तर हे आंबे सुद्धा चांगल्या भावाने विकले गेले असते. माझी चूक मला कळली होती. आई बोलत असताना मी काही वेळा रडत होतो. परंतु माझे दुःख मी आईला सांगू शकत नव्हतो. 

नंतर इकडचे तिकडचे करत आईने ते आंबे अर्ध्या भावात विकले.

आम्ही दोघे ही मायलेक भुकेने अगदीच व्याकुळ झालो होतो. आमच्या कडे घरचा सगळा बाजार येईल एवढे पैसे आले होते. बरोबर आम्ही घरातून भाकरी आणली होती.

अहमद शेठच्या हॉटेल मध्ये भुकेच्या भरात चार भाकरी मिसळ बरोबर कुठे फस्त झाल्या याचा पत्ताच लागला नाही. 

मिसळ खाऊन आम्ही तृप्त होऊन बाहेर  पडलो. पुढे जाऊन आईने चिमणभाईच्या दुकानात जाऊन सगळा बाजार केला. आणि तो बाजार आम्ही आल्या रस्त्याने परत गावाला घेऊन निघालो. 

परंतु येताना पेक्षा घरी जातानाचा आनंद हा खूप मोठा होता. टिचभर पोटासाठी आपण आयुष्यात आज किती मेहनत करतो. पण त्याहीपेक्षा घरातील सगळीच माणसं रात्रदिवस अपार कष्टातून आपल्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने फुलवत असतात याची मला कल्पना आली.

गावाकडे शालेय जीवन जगत असताना अनेक ज्ञात, अज्ञात मोठ्या माणसांचे, गावकऱ्यांचे,आई वडिलांचे, नातेवाईकांचे आणि गुरुजनांचे संस्कार माझ्यावर घडले. अनेक जीवाचे जिवलग मित्र मिळाले. त्यांच्या या आशीर्वादानंमुळे आज मी जो काही आहे तो केवळ या लोकांनी केलेल्या संस्कारामुळे आणि त्यांचे आशीर्वादामुळे.

आज जरी शहरात नोकरी धंद्यानिमित्त असलो तरी अजूनही गावाला आणि भागाला विसरलेलो नाही. आज जरी सुखाचा घास खात असलो तरी शालेय जीवनातील बाजरीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा याची चव अजूनही जिभेवर रेंगळत आहे.

उन्हाळ्यात मित्रांबरोबर रानात जाणे, गुरे सांभाळणे, झाडाच्या कैऱ्या पाडून मिठाबरोबर खाणे, विहिरीवर मनमूराद पोहणे, पंचक्रोशीतील यात्रांना जाणे संध्याकाळी जेवण झाल्यावर काळ्याक भिन्न रात्री अंथरुणावर पडून आजीच्या गोष्टी ऐकणे यासारखा आविट आनंद मिळाल्याचे भाग्य मला लाभले की जे आजही विसरू शकत नाही.

आज मात्र खेडेगावांची परिस्थिती वेगळी आहे, पूर्वीचे दिवस आता राहिले नाहीत. माणसे सुद्धा अबोल झाली आहेत. अगदी दगड गोट्यासारखी. काळाचा महिमा दुसरं काय ?

लेखक :- बाळासाहेब मेदगे, औदर




भात शेतीची आवणी /लावणी

पेरणी पूर्वीचे दिवस 

मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होताच, आकाशात ढग जमू लागतात. काही ठिकाणी वळवाचा पाऊस पडतो.

दररोजच सकाळी सकाळी आकाशात ढग जमू लागतात. आणि दुपारी हे सर्व गायब होतात. पावसाचा थेंबही पडात नाही. दररोज रेडिओवर पाऊस अंदमानात आला आहे, समुद्रामधील वाऱ्यामुळे तिकडेच अडकला आहे अशा बातम्या येतात.

पंचांग पाहून पेरणी करण्याची पद्धत 

चिंतू हुरसाळे: 

अशातच रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्र सुरू होते. आमच्या गावातील लोक चिंतू हुरसाळे यांच्याकडे जाऊन पेरणीचा मुहूर्त कधी आहे. हे पाहण्यासाठी गर्दी करतात.

चिंतू बुवा लाकडी संदुकात ठेवलेले पंचांग काढतात. आणि बाहेर येऊन घोंगडी वर बसलेल्या गावकऱ्यांच्या समोर बसून  पंचांगाचे एक एक पान उलटेपालटे करतात. 

जमलेल्या पैकी काही लोक पंचांगावर सुट्ट्या नाण्याची चिल्लर ठेवतात. आणि उत्सुकतेने मुहूर्त कधी आहे हे ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहतात.

चिंतू बुवा पेरणीचा मुहूर्त सांगतात. हा मुहूर्त साधारण तीन ते पाच जून चा असतो. तेथे अनेक चर्चा झाडतात. पाऊस नाही मग पेरणी करायची तरी कशी? अनेक प्रकारच्या चर्चा होतात. 

परंतु चिंतूबुवाचा मुहर्त योग्य मानून जरी पावसाचा पत्ता नसला तरी त्यांनी सांगितलेल्या मुहूर्तावर धुळवाफेत सारा गाव पेरणी करून मोकळा होतो.

पावसाची प्रतीक्षा

धुळवाफेत पेरणी करूनही आठ दिवस उलटून गेलेले असतात. तरीही पाऊस पडात नाही.अशावेळी अनेक लोक चिंताग्रस्त व्हायचे.

आणि पावसाला सुरुवात होते 

परंतु त्यानंतर हळूहळू पावसाला सुरुवात होते. भाताची रोपे म्हणजेच दाढ तरारून वर येते. पावसाचा जोर वाढू लागतो. भात खाचरामध्ये पाणी पाणीच पाणी होते. रात्रभर पाऊस पडत राहतो. घरातील  मोठी माणसे म्हणतात. 

दाढीच्या भोवतीने पोहळी काढायला पाहिजे होती. आता सगळी दाढ पाण्याने गाडून गेली असेल.

पोहळी काढणे : 

भाताचे रोप असलेल्या दाढी मध्ये पाणी साचते. त्यामुळे भाताच्या रोपांची वाढ होत नाही. हे पाणी भातरोप असलेल्या दाढीमध्ये येऊ नये म्हणून संपूर्ण रोपाच्या भोवतीने फावड्याच्या सहाय्याने मातीचा वीतभर उंचीचा मातीचा बांध घालतात. त्यामुळे बाहेरचे पाणी आत येत नाही  यालाच पोहळी काढणे असे म्हणतात. 

 रोपांना खत देणे :

भाताच्या रोपाची वाढ जलद व्हावी या साठी लोक युरिया खताचा वापर करतात. प्रामुख्याने भात रोपांना युरिया खत मारले जाते. 

युरिया खत हे साखरेसारखे असते. लहान असताना मी साखर समजून युरिया खत खाल्ले होते. परंतु तोंडात कडू चव आणि तोंडात चिकट झाल्याने कितीही थुंकले तरी कडूपणा आणि चिकटपणा जाता जात नव्हता.

खत मारल्यावर आपले भातरोपाची किती वाढ झाली आहे. हे काही शेतकरी दररोज सकाळी शेतात जाऊन पाहत असतात. कारण रोपे मोठी झाल्याशिवाय अवनी करता येत नाही.

दररोज पाऊस पडतच असतो. ओढून आले भरून वाहू लागतात. शेतीचे दोन प्रकार असतात.

रानव्याची खाचरे :

रानव्याची खाचरे ही डोंगराच्या उतारावर असतात. ही जमीन निचऱ्याची असते. खूप पाऊस पडला तरच याच्यात पाणी येते. पाऊस नसल्यावर या खाचरामध्ये पाण्याचा थेंबही साठत नाही. 

पाण्याचा पाट काढणे 

त्यामुळे खूप पावसाची वाट पहावी लागते. काही लोक जेथे पाणी असेल तेथून पाट काढीत आपल्या शेतात आणतात.

या पाटा वरून शेजारच्या शेतकऱ्यांच्या मारामाऱ्या होतात. दरवर्षी हे ठरलेलेच असतं. परंतु आता गावाकडे बरीचशी शेती ही पडीकच असते. 

शेती करायला कुणाला वेळच मिळत नाही. सर्व लोक नोकरीसाठी दूर शहरात जाऊन राहिले आहेत. शेती करणारे लोक कधीच वर गेले आहेत.

रानव्याच्या खाचरांमध्ये हळवी भाते  लावतात. हळवे म्हणजे लवकर येणारे पीक. ही पिके साधारण बैलपोळा ते दसऱ्यापर्यंत काढायला येतात. त्यांना फार पाणी लागत नाही. शिवाय पाऊसही नंतर कमी कमी होतो.

भाताच्या हळव्या जाती : इंद्रायणी, फुले समृद्धी, पार्वती, इत्यादी.

झोळाची खाचरे:

भात शेतीचा दुसरा प्रकार म्हणजे झोळाची खाचरे. या खाचरांमध्ये पाऊस पडल्यावर लगेचच खाचरामध्ये पाणी साचायला सुरुवात होते. 

हे पाणी खाचरामध्येच साचून राहते. शिवाय डोंगरावरून येणारे पाणी खाचरा,खाचरांमधून या भागातून वाहत जाते. यालाच झोळाची खाचरे म्हणतात.

झोळाच्या खाचरांची लावणी लवकर सुरू होते. कारण त्यामध्ये पाणी असते. त्या तुलनेत रानवेच्या खाचरामध्ये पाणी नसल्यामुळे पाणी साचण्याची वाट पहावी लागते. ज्याची रानवेची जमीन आहे असे शेतकरी झोळांच्या शेती वाल्यांना मदत करतात. 

झोळांच्या शेतीमध्ये खूप उशीर पर्यंत पाणी साचून राहते. त्यामुळे तेथे गरी भाते म्हणजेच जास्त दिवस असलेली भातशेती केली जाते. ही भात शेती दिवाळी नंतरही अगदी हिरवीगार असते. भात काढणीला खूप दिवस लागतात.

या शेतीमध्ये गरा कोळंब, खडक्या, जीर तांबडा रायभोग, कमोद इत्यादी पिके घेतली जातात. हा तांदूळ अतिशय सुवासिक आणि खाण्यासाठी उत्तम मानला जातो.

आवणीची लगबग :

धुवाधार पाऊस पडत असतो.भातरोपे तरारून वर आलेली असतात. जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन जाते. भातखाचरे पाण्याने फुल्ल भरून वाहू लागतात. आणि मग आवणी करण्यासाठी शेतक-यांची एकच धावपळ होते.सर्वांचे एकच लक्ष असते. लवकरात लवकर आपली आवणी संपवणे. 

काही शेतकऱ्यांना थोडी भातशेती असते. त्यांची लवकरच आवणी होते. परंतु ब-याच शेतक-यांची शेती जास्त असते. मणुष्यबळ कमीअसते. 

अनेकांकडे चिखलणी करण्यासाठी बैल नसतात. त्यांची या मोसमात खुपच ओढातान होते. या शेतकऱ्यांना मनुष्य बळ व औत काठीसाठी वाट पहावी लागते.

ज्यांना थोडी शेती असते. त्यांची आवणी लवकर होते असे शेतकरी एकत्र येतात. अनेक गावांमध्ये गरजु शेतकरी असतात.हे गरजू शेतकरी ज्यांची आवणी झाली आहे या शेतक-याकडे येतात. 

(पश्चिम भागातील अनेक शेतक-यांना प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना किती जमीन आहे. व ती कोठे कोठे आहे याची इंत्यभुत माहिती असते.) 

गरजू शेतक-यांची संपुर्ण आवणी करून देण्यासाठी विशिष्ट रक्कम देण्याचे ठरवले जाते.त्यास "डफा" किंवा "खोती" देणे असे शब्द आहेत.

मोडा पाळणे :

पुर्वी भागातील मुत्सुद्धी पुर्वजानी जशी शासकीय सुट्टी असते तशी शेतकऱ्यांना सुद्धा आठवडयातुन एकदा सुट्टीची योजना केलेली असते. यालाच "मोडा "असे म्हणतात. 

प्रत्येक गावचा मोडा हा मंगळवार किंवा रविवारी असतो. त्या दिवशी शेतीची कोणतीच कामे शेतकरी करत नाहीत. मोडा हा ग्रामदैवताच्या नावाने पळाला जातो.

काम करताना येणारी मजा 

आवणी करताना खुपच मजा येते. कधी जोरदार तर कधी रिमझिम पाऊस पडत असतो. भात खाचरात गुडघाभर पाणी असते. 

भात खाचरातील रोपे विशिष्ट पण सोप्या पध्दतीने काढली जातात त्याला दाढ खणने असे म्हणतात. छोटया रोपांची अगदी छोटी गड्डी बांधतात त्याला "मुठ "असे म्हणतात. असे अनेक मुठ एकत्रित केल्यावर या सर्वांना "आवान" असे म्हटले जाते.

दाढ खणणे :

प्रथमतः दाढ खणल्यावर त्याचे मुठ जेथे भातरोपे लावायची आहेत त्या ठिकाणी घेऊन जातात.

भात रोपे लावायच्या आधी त्या खाचरात बैलांच्या सहाय्याने (यालाच औत म्हणतात) गाळ केला जातो, मगच आवणी केली जाते.

गाळ करणे :

आवणी करताना पाऊस पडत असतो. सर्वजण भिजुन गेलेले असतात. प्रत्येकाकडे ईरणे किंवा प्ल्यास्टिक कागद असतो. 

खुपच मोठा पाऊस आलातर अंगावर ईरणे व कागद घेतात. अन्यथा इरणे व कागद बांधावर ठेवतात. 

दुपारचे जेवण भाकरी मसुराची किंवा काळ्या वटाण्याची आमटी, लसणाची चटणी, कांदा व भात असे जेवण असते. सर्व शेतकरी पावसात बांधावर एकत्रित बसुन जेवतात.

जेवण झाल्यावर पुरूष मंडळींना तंबाखू व विडीकाडी दिली जाते.व थोडयावेळाने परत कामाला सुरूवात केली जाते.

मुठ :

आवणी करणा-या माणसांना मुठ पुरवणे खुपच आनंदाचे काम असते. दहा पंधरा मुठ दोन्ही हातात धरून पाण्यावरून ओढत नेऊन आवणी करणा-या माणसांपर्यत विशिष्ट पद्धतीने फेकने ही एक कलाच असते.

काम करताना अजीबात श्रम होत नाही. परंतु भर पावसात मुठांचे ओझे या शेतातून त्या शेतात वाहून नेण्याचे काम खूपच जिगरी असते. मोठ्यांचे ओझे घेऊन कधी पाय घसरून पडू हे सांगता येत नाही.

भात लावणी :

भात लावण्यासाठी खूप माणसे एकत्र आलेली असतात पोटरी भर पाण्यात भात लावायचे काम चालू राहते. गप्पागोष्टी करत भात लावणीचे काम सुरू राहते.

भल्लर :

खूप मोठे शेती असेल तर अगदी 50 ते 60 माणसे भात लावणी करत असतात. एक माणूस बांधावर उभे राहून ढोल वाजवीत असतो. 

दुसरा माणूस भलरीची गाणी म्हणत असतो. आणि त्या पाठोपाठ भात लावणारे स्त्री, पुरुष भलरी ची गाणी म्हणत असतात. 

अगदीच धुंद वातावरण असते. गाण्याच्या तालासुरात लावणीचे काम वेगाने सुरू राहते. पावसाच्या सरी अधून मधून पडत असतात.

गरम पाण्याची अंघोळ :

सकाळपासून काम करून अंग चिंबून गेलेले असते. परंतु थंडी मात्र वाजत नाही. काम संपल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यावर गरम गरम पाण्याने आंघोळ करणे,अगदी स्वर्गीय आनंदाची प्राप्ती करून देते. 

काही लोक संध्याकाळी आपल्या बैलांना सुद्धा गरम पाण्याची आंघोळ घालत असत. कारण बैलांना सुद्धा दिवसभर काम करून थकवा येत असेल.

गावाकडचे विलोभणीय दृश्य :

ग्रामीण भागात खुप पाऊस पडतो.त्यामुळे त्या ठिकाणी मुख्यत्वे भातपीक घेतले जाते. ग्रामीण भागातील शेती ही चढ उताराची असल्याने छोटे छोटे दगड लावून बांध घालून प्लाँट केले जातात. 

हे प्लाँट कमीत कमी दोन गुंठे व जास्तीत जास्त वीस गुंठयापेक्षा जास्त मोठे असतात.याला 'खाचर' असे म्हटले जाते. 

उताराच्या जमीनीवरील पाणी वाहुन जाण्यासाठी प्रत्येक खाचराला विशिष्ट प्रकारे दगड लावले जातात. त्यावरून पाणी वाहून जाते.

हे एकप्रकारे छोटे छोटे धबधबेच असतात. याला "प-ह्या" म्हणतात.ज्या वेळी पाऊस पडतो. तेव्हा भातखाचरे भातलागवड केली असल्याने हिरवीगार दिसतात.व त्या खाचरांच्या प-ह्या वरून खाली कोसळणारे पाणी हे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते. स्वर्गीय सुखाचा भास होतो.

जिकडे तिकडे हिरवेगार व पांढरेशुभ्र झरे, ओढे-नाले, प-ह्ये नदी धबधबे भात खाचरातुन वाहणारे पाणी, हिरवेगार डोंगर हिरवीगार राने याची निसर्ग मुक्त उधळन करीत असतो. 

हे पाहून मन प्रसन्न होते.प्रफुल्लीत होते.पश्चिम भागातील जीर,रायभोग,खडक्या,इंद्रायणी तांदुळ फार प्रसिद्ध आहेत. मोठ्या प्रमाणावर या तांदळांची खरेदी केली जाते.

खाज कुहे :

जवळजवळ महिनाभर लोक सतत शेतात काम करत असत. त्यामुळे सतत पाण्यात राहिल्यामुळे पायांना कुहे होत. पायाच्या बोटांमधल्या बेचांगळ्यात प्रचंड खाज यायची. 

अनेक लोक संध्याकाळी बीटेक्स मलम पायांना चोळायचे. काहीजण चुलीमध्ये पायाची बोटे शेकवायचे. 

काही लोक अगदी आघोरी प्रकार करायचे. प्रत्येक पायाचे बोट घेऊन त्याला दोऱ्याने खालपासून वरपर्यंत करकचून आवळीत व राहण्याचे. व सुईने वरच्या भागाला टोचायचे. त्या त्यामधून काळे कुळकुळीत रक्त बाहेर पडायचे. हे केल्यावर मात्र पायाच्या बोटांची खाज कमी व्हायची.

सण समारंभ व वृत्तवैकल्ये :

आवनी झाल्यावर मग मात्र बऱ्याच लोकांना काही काम नसायचे. दररोज शेतात जाऊन आपली भात शेती कशी आहे याची पाहणी करत बसायचे. व दुपारी गुरे सोडून रानात न्यायची.

अवनी झाल्यानंतर श्रावण महिना सुरू होऊन नागपंचमी, तिसरा श्रावणी सोमवार, रक्षाबंधन इत्यादी सण तसेच प्रवचन, कीर्तन, भजने, व्रत वैकल्ये, ग्रंथांची पारायणे, यामध्ये लोक रममान व्हायचे. अशी गावाकडे मजा असायची. 

रामदास तळपे ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान

थंड ही हवा, धुंद गारवा 

हा पाऊस, रिमझिम बरसे 

रेशीम धारा, या रुणझुणती 

जल थेंबाचे, उधळीत मोती 

पानफुले नाचती गंध फुले भोवती 

झुलती जलांचे आरसे 

हिरवी शेते, हिरवी राने 

आवती भवती, हिरवी कवने 

नटली बघा ही धरा, झोक तिचा साजरा 

नवरी नवेली ही दिसे 

गीत :- वंदना विटणकर :- गायिका पुष्प पागधरे 















 




गावाकडचे गुराखी

बाळासाहेब मेदगे यांचा लेख 

श्यामला नुकतच दहावं वर्ष लागलं होतं. त्या काळात शिक्षणा पेक्षा घरातील गुरढोर सांभाळण्यासाठी अशा वयात आलेल्या मुलांना गुरांकडे पाठवलं जायचं.

img src="..." alt=" गावाकडचा गुराखी ">
आजू बाजूच्या बऱ्या पैकी परिस्थिती असलेली मुले गावातील शाळेत जात होती. परंतु श्याम सारखी चार ते पाच पोर आपली गुर भली आणि आपण भले असेच जीवन जगत होती. 

दिवस उगवला की श्यामचा दिवस चालू होई. सकाळची साखर झोप त्याला घेता येत नसे. पहाटे पासून घरात एकच कामांची गडबड चालू होत होती. गुरांच्या धारा काढणे, त्यांना अंबवन, जात्यावर दळण विहिरीवरून पाणी आणणे, ही सगळी कामे त्याच्या व्यतिरिक्त केली जात होती.

सकाळी झोपेतून उठल्यावर श्याम कसे बसे तोंड धुवून चहा घेत असे आणि गुरे सोडून रानात चरायला घेऊन जात असे. त्याच्या बरोबर खालच्या आळीतील महादू, शेजारचा रामू, वरच्या आळीतील जगू,आणि गावातील अशी दोन तीन पोर मिळून सगळे जन रानात आप आपली गुरे घेऊन जात असत. 

उन्हाळ्यातील लगीनघाई संपली होती. उन्हाळ्यात गुरे दिवसभर रानातून घरी आपोआप येत होती. फक्त पाणी पाजन्यासाठी ओढ्यावर घेऊन जावं लागत असे.

वैशाखा मध्ये तर श्यामने लग्नाच्या वराती, यात्रा, यांचा खूप आनंद घेतला होता.

मृग नक्षत्र पर्जन्य राजाला घेऊनच आले होते.शेतातील ढेकळे पावसाच्या पाण्याने पूर्ण विरघळून लोण्यागत झाली होती. रानातील शेवटच्या घटका मोजत असलेलं वाळलेले गवत मृतप्राय अवस्थेतून पुनर्जन्म घेऊन धरणीवर अवतरले होते. सगळी वसुंधरा हिरवाईची चादर घेऊन नव्या नवरी सारखी अवतरली होती. गेली आठ महिने हिरव्या चाऱ्या पासून गुरे दूर होती ती आता मात्र हिरवा चारा खाऊन जोगवत होती.

अजून मात्र साथ झाली नव्हती. साथ म्हणजे ज्या वेळी ही साथ होत होई तेव्हा पासून प्रत्येकाने आपली गुरे ही आपल्या रानातच चारावी असा खाक्या पंचायतीचा होत होता.

दुसऱ्या दिवशी साथ होती. गावदेवी म्हणजेच मरीआईला कोंबडं कापले. इडापिडा टळू दे असा नवस घरातले बोलले होते.

साथ झाली तसे सगळे गुराखी आपली गुरे रानात चारू लागले होते. प्रत्येकाचे रान सुध्दा हाकेच्या अंतरावर होते. एखाद्याला काही लागले तर दुसरा मदत करत होता. रानाच्या बाजूने डोंगर रांगेतून आलेला मोठा झरा वहात होता. या झऱ्याच्या वाहणाऱ्या पाण्यातून मधुर संगीताचा आनंद ही गुराखी मंडळी घेत होती.

त्या दिवशी एक तास अगोदर खूप जोरात पाऊस येऊन गेला. गुरे प्रत्येकाच्या रानात त्यांच्याच नादात चरत होती. 

श्याम, जगू, महादू या मंडळींनी एक बेत आखला.या गुराख्यांनी झऱ्यात प्रवेश केला. प्रत्येकाला मोठी मोठी चार- पाच खेकडे भेटली. त्यांनी रानातील वाळलेल्या टनटणीची लाकडे जमा केली. त्याला आग लावून त्या मध्ये पकडलेली खेकडे भाजली. प्रचंड ताकदीचा हा रानमेवा यांनी फस्त केला.

श्रावण जसा चालू झाला तसा हिंदू धर्माच्या सणाना प्रारंभ झाला. रान भाज्या श्रावणातील प्रत्येक सोमवारच्या उपवासाला मिळू लागल्या. प्रत्येक सणासुदीला घरात गोड धोड पदार्थ बनत असत. ते सर्व पदार्थ ही सगळी गुराखी मंडळी रानात एकमेकांना देत असायची.

घरातील शिळी भाकरी जरी असली तरी रानात तिची चव न्यारीच लागत होती.

एकमेकांची भाजी भाकरी एकत्र करून गोकुळातल्या काल्याची आठवण करून देत होते. 

कृष्ण जन्मात कृष्णा बरोबर असणारे सगळे सवंगडी अशीच घरातील शिदोरी वृंदावनात आणत होते.आणि जीवनातील प्रमोच्च आनंद घेत होते. श्रावणात प्रत्येकाच्या घरी धार्मिक ग्रंथांची पारायणे होत होती.

एकमेकांना ते पौराणिक कथा ऐकवत असत. विशेष करून हरिविजय ग्रंथाचा या मंडळींना अभिमान वाटत होता. कारण कृष्ण हा सगळीकडे भरून उरला आहे याची जाणीव सगळ्यांना झाली होती.

श्रावणातल्या इंद्रधनुष्याचा,आणि उन पावसाचा खेळ या मंडळींनी जवळून पाहिला होता.भाद्रपद मध्ये गूरानी बाळसे धरले होते.अमावस्येला बैल पोळा साजरा करून बैलांप्रती कृतज्ञता राखली होती. दिवाळी आली तेव्हा गुरांच्या शिंगांना तेल लावून वसुबारस अगदी आनंदात साजरी केली होती. दिवाळीतील कामांची लगबग आणि घरातील करंजी, लाडू, शंकर पाळी यांचे सुंदर समीकरण होत असे.

गावाच्या बाजूला असणारा घनदाट डोंगर, व पडीत रानातून वाढलेली झाडे त्यामुळे वाघ जनावरांसाठी धोक्याची घंटा ठरा यचा. या वाघापासून गुरांचे रक्षण व्हावे म्हणून रानामध्ये वाघबारस साजरी करण्याची पूर्वंजा पासून प्रथा चालत आलेली होती. त्या प्रथेला अनुसरून त्या दिवशी रानात वाघ बारस करण्याचे ठरले होते.

प्रत्येकाने काही तरी घरातून आणायचे होते. कोणी तांदूळ, कोणी दूध, कोणी साखर. 

खिर बनवण्यासाठी लागणारी भांडी सुध्दा कोणी आणायची ही सर्व कामे ठरलेली होती. प्रत्येकाच्या घरातून सगळी मंडळी जेवणासाठी आली होती. 

अस्सल म्हशीच्या दुधातील खिर सुंदरच बनली होती. सगळ्यांनी तृप्तीचा ढेकर दिला होता. व सगळे जन पुढील वर्षाच्या वाघ बारसेच्या प्रतीक्षेत हरवून बसले होते.

दिवाळी जावून काही दिवस झाले. प्रत्येक शेतकऱ्याचा भुईमूग काढण्याचा हंगाम चालू झाला होता. या मंडळींचा एक नित्य नेम ठरला होता. रोज कोणाच्या तरी शेतातून भुईमुगाचे डहाळे आणून त्याला छान पैकी भाजून त्यावर ताव मारायचा असा नित्यक्रम चालूच असायचा. 

म्हणता म्हणता हिवाळा सुरू झाला. बाहेर थंडी मी म्हणत होती. शेतकरी मंडळींनी रब्बी पिकांची तयारी चालू केली होती. कोणी हरभरा, ज्वारी, गहू, बटाटा, कांदा, अशी काही विहिरीच्या पाण्यावर तर काही पहाटे पडणाऱ्या दवावर अशा पिकांची लागवड केली होती. हिवाळा ऋतू म्हणजे या पिकांना वरदानच ठरत होता.

रानाच्या बाजूला असणारा हरभरा चांगलाच पोसला होता. ज्वारी सुध्दा भरपूर कणसे घेऊन बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. त्या काळात बियाणे हे घरचेच असे त्यामुळे कोणत्याही पिकाची खात्री देता येत होती. 

हिवाळ्यात हिवाळाच अनुभवयास मिळत होता. निसर्ग सुध्दा व्यवस्थित साथ देत होता. 

हरभऱ्यामध्ये दाणे भरू लागले होते. त्यावेळी या गुराखी मंडळींनी एक शक्कल लढवली.ज्याच्या शेतात चांगला हरभरा असेल त्याच्या शेतातून गुपचुप तो आणायचा आणि मोठी शेकोटी करून त्यावर तो भाजायचा आणि मग सगळे आजू बाजूला बसून त्याचा चवीचवीने उपभोग घ्यायचा असा कार्यक्रम हप्त्यातून एकदा ठरलेला असायचा.

हरभरा खावून झाला की मग मात्र यांची नजर शेतातील ज्वारी कडे जायची. ज्वारी सुध्दा हूर्ड्यावर आलेली असायची. मग ते हुरडा पार्टी करायचे. ज्वारीचं ते भलेमोठे कणीस त्यांचा अंतरात्मा शांत करत होते. असे गुण्या गोविंदाचे दिवस हे गुराखी  अनुभवत होते.

एकदाचा तो प्रसंग त्यांच्या आयुष्यात कायम सल कोरून गेला होता. महाराष्ट्र शासनाने गाव तिथे वीज असावी असे धोरण जाहीर केले होते. तालुक्याच्या गावातून इतर ठिकाणी असलेल्या गावांना वीज जोडणी करण्याचा प्रयत्न केला जात होता. 

एक मुख्य वाहिनी व तिला उप वाहिन्या करून गावातून लाईट पोहचवण्यासाठी प्रयत्न होऊ लागले होते.

अशीच एक मुख्य वाहिनी या गुराखी मंडळीच्या रानातून पश्चिम दिशेच्या गावांना गेली होती. लोखंडी पोल उभे करून त्या मधून विद्युत तारेचे जाळे सगळीकडे पहावयास मिळत होते.

गुराखी म्हंटले की झाडावर चढने, विहिरीत, ओढ्यात पोहणे, हे आलेच त्या मध्ये ही मंडळी तरबेज असायची.

या गुराख्यामधला जगू मोठा चपळ होता. नजर हटे पर्यंत तो कोणतेही काम करत होता. 

असाच एक दिवस दुपारचे साडे तीन वाजले होते. गुरे रानात चरत होती. सगळी गुराखी मंडळी त्या लोखंडी पोल जवळ आली. 

जगूने सगळ्यांना सांगितले 

बघा, मी एका क्षणात या लोखंडी पोलवर चढुन त्याला असलेल्या तारेला लोंबकळुन दाखवतो.

याच्या पूर्वी त्याने एकांतात असे केले होते, त्यामुळे त्याला त्याचा आत्मविश्वास होता. 

बाकीचे सगळे त्याच्या कडे पहातच राहिले. श्याम जरा संशयानेच त्याच्याकडे पहात होता. या विजेच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह असतो याची त्या बिचाऱ्याला काहीच कल्पना नव्हती. आणि इतर गुराख्यांना सुद्धा.

जगू एका क्षणात त्या लोखंडी पोलवर चढला आणि काही वेळेतच त्या तारेला लोंबकळत आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करणार होता. 

जसा त्याने तारेला स्पर्श केला तोच त्या वेळी मुख्य वाहिनीतून खूप मोठा विद्युत प्रवाह जात होता. त्याचा आघात एवढा भयंकर होता की त्याला खूप दूरवर फेकले गेले.

त्याचे सगळे शरीर काळे निळे पडले होते. सगळे त्याच्या कडे धावत गेले. घरी निरोप पाठवून त्याला लगेच घरी आणले. 

त्याला ताबडतोब उपचाराची गरज होती. त्यावेळी दळणवळणाची कोणतीच सोय नव्हती. घरातील बैलगाडी जुंपली आणि त्यावर जागुला टाकून बाजार पेठेच्या गावात हलवण्यात आले. 

तिथे गेल्या नंतर त्याची चौकशी डॉक्टरने केली. शरीराकडे पाहून डॉक्टर हैराण झाले. कारण तो विद्युत प्रवाह सगळ्या शरीरात पसरला होता. 

डॉक्टर ने उपचार चालू केले खरे, परंतु त्यांनाच खात्री देता येत नव्हती की जगू वाचेल का? दोन तासाच्या अथक प्रयत्नातून सुध्दा जगू मध्ये कोणताच बदल दिसत नव्हता.

काही काळ गेला असेल तेंव्हा डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. दुसऱ्या दिवशी जगुचे पार्थिव गावात आणले. 

त्या दिवशी कोणत्याही गुरांख्यानी गुरे सोडली नाही. कोणीही अन्न पाण्याला शिवले नाही. आपल्यातला एक साथीदार गेला याचे त्यांना खुप दुःख झाले होते. 

मागील काही घडामोडी सगळ्या चित्रपट रूपाने त्यांना दिसत होत्या. जगू गेला परंतु एक गुरांख्यांचे जीवन सगळ्या मानव जातीला लक्षात राहील असेच जगला हे मात्र श्याम विसरायला तयार नव्हता.

लेखक :- बाळासाहेब मेदगे, औदर

संपर्क:-  90045 64645





आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...