मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होताच, आकाशात ढग जमू लागतात. काही ठिकाणी वळवाचा पाऊस पडतो.
दररोजच सकाळी सकाळी आकाशात ढग जमू लागतात. आणि दुपारी हे सर्व गायब होतात. पावसाचा थेंबही पडात नाही. दररोज रेडिओवर पाऊस अंदमानात आला आहे, समुद्रामधील वाऱ्यामुळे तिकडेच अडकला आहे अशा बातम्या येतात.
चिंतू हुरसाळे:अशातच रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्र सुरू होते. आमच्या गावातील लोक चिंतू हुरसाळे यांच्याकडे जाऊन पेरणीचा मुहूर्त कधी आहे. हे पाहण्यासाठी गर्दी करतात.
चिंतू बुवा लाकडी संदुकात ठेवलेले पंचांग काढतात. आणि बाहेर येऊन घोंगडी वर बसलेल्या गावकऱ्यांच्या समोर बसून पंचांगाचे एक एक पान उलटेपालटे करतात. जमलेल्या पैकी काही लोक पंचांगावर सुट्ट्या नाण्याची चिल्लर ठेवतात. आणि उत्सुकतेने मुहूर्त कधी आहे हे ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहतात.
चिंतू बुवा पेरणीचा मुहूर्त सांगतात. हा मुहूर्त साधारण तीन ते पाच जून चा असतो. तेथे अनेक चर्चा झाडतात. पाऊस नाही मग पेरणी करायची तरी कशी? अनेक प्रकारच्या चर्चा होतात.
परंतु चिंतूबुवाचा मुहर्त योग्य मानून जरी पावसाचा पत्ता नसला तरी त्यांनी सांगितलेल्या मुहूर्तावर धुळवाफेत सारा गाव पेरणी करून मोकळा होतो.
धुळवाफेत पेरणी करूनही आठ दिवस उलटून गेलेले असतात. तरीही पाऊस पडात नाही.अशावेळी अनेक लोक चिंताग्रस्त व्हायचे.
परंतु त्यानंतर हळूहळू पावसाला सुरुवात होते. भाताची रोपे म्हणजेच दाढ तरारून वर येते. पावसाचा जोर वाढू लागतो. भात खाचरामध्ये पाणी पाणीच पाणी होते. रात्रभर पाऊस पडत राहतो. घरातील मोठी माणसे म्हणतात.
दाढीच्या भोवतीने पोहळी काढायला पाहिजे होती. आता सगळी दाढ पाण्याने गाडून गेली असेल.
पोहळी काढणे :
भाताचे रोप असलेल्या दाढी मध्ये पाणी साचते. त्यामुळे भाताच्या रोपांची वाढ होत नाही. हे पाणी भातरोप असलेल्या दाढीमध्ये येऊ नये म्हणून संपूर्ण रोपाच्या भोवतीने फावड्याच्या सहाय्याने मातीचा वीतभर उंचीचा मातीचा बांध घालतात. त्यामुळे बाहेरचे पाणी आत येत नाही यालाच पोहळी काढणे असे म्हणतात.
खत मारणे :
भाताच्या रोपाची वाढ जलद व्हावी या साठी लोक युरिया खताचा वापर करतात. प्रामुख्याने भात रोपांना युरिया खत मारले जाते. युरिया खत हे साखरेसारखे असते. लहान असताना मी साखर समजून युरिया खत खाल्ले होते. परंतु तोंडात कडू चव आणि तोंडात चिकट झाल्याने कितीही थुंकले तरी कडूपणा आणि चिकटपणा जाता जात नव्हता.
खत मारल्यावर आपले भातरोपाची किती वाढ झाली आहे. हे काही शेतकरी दररोज सकाळी शेतात जाऊन पाहत असतात. कारण रोपे मोठी झाल्याशिवाय अवनी करता येत नाही.
दररोज पाऊस पडतच असतो. ओढून आले भरून वाहू लागतात. शेतीचे दोन प्रकार असतात.
रानव्याची खाचरे :
रानव्याची खाचरे ही डोंगराच्या उतारावर असतात. ही जमीन निचऱ्याची असते. खूप पाऊस पडला तरच याच्यात पाणी येते. पाऊस नसल्यावर या खाचरामध्ये पाण्याचा थेंबही साठत नाही. त्यामुळे खूप पावसाची वाट पहावी लागते. काही लोक जेथे पाणी असेल तेथून पाट काढीत आपल्या शेतात आणतात.
या पाटा वरून शेजारच्या शेतकऱ्यांच्या मारामाऱ्या होतात. दरवर्षी हे ठरलेलेच असतं. परंतु आता गावाकडे बरीचशी शेती ही पडीकच असते. शेती करायला कुणाला वेळच मिळत नाही. सर्व लोक नोकरीसाठी दूर शहरात जाऊन राहिले आहेत. शेती करणारे लोक कधीच वर गेले आहेत.
रानव्याच्या खाचरांमध्ये हळवी भाते लावतात. हळवे म्हणजे लवकर येणारे पीक. ही पिके साधारण बैलपोळा ते दसऱ्यापर्यंत काढायला येतात. त्यांना फार पाणी लागत नाही. शिवाय पाऊसही नंतर कमी कमी होतो.
भाताच्या हळव्या जाती : इंद्रायणी, फुले समृद्धी, पार्वती, इत्यादी.
झोळाची खाचरे:
भात शेतीचा दुसरा प्रकार म्हणजे झोळाची खाचरे. या खाचरांमध्ये पाऊस पडल्यावर लगेचच खाचरामध्ये पाणी साचायला सुरुवात होते. हे पाणी खाचरामध्येच साचून राहते. शिवाय डोंगरावरून येणारे पाणी खाचरा,खाचरांमधून या भागातून वाहत जाते. यालाच झोळाची खाचरे म्हणतात.
झोळाच्या खाचरांची लावणी लवकर सुरू होते. कारण त्यामध्ये पाणी असते. त्या तुलनेत रानवेच्या खाचरामध्ये पाणी नसल्यामुळे पाणी साचण्याची वाट पहावी लागते. ज्याची रानवेची जमीन आहे असे शेतकरी झोळांच्या शेती वाल्यांना मदत करतात.
झोळांच्या शेतीमध्ये खूप उशीर पर्यंत पाणी साचून राहते. त्यामुळे तेथे गरी भाते म्हणजेच जास्त दिवस असलेली भातशेती केली जाते. ही भात शेती दिवाळी नंतरही अगदी हिरवीगार असते. भात काढणीला खूप दिवस लागतात.
या शेतीमध्ये गरा कोळंब, खडक्या, जीर तांबडा रायभोग, कमोद इत्यादी पिके घेतली जातात. हा तांदूळ अतिशय सुवासिक आणि खाण्यासाठी उत्तम मानला जातो.
आवणीची लगबग :
धुवाधार पाऊस पडत असतो.भातरोपे तरारून वर आलेली असतात. जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन जाते. भातखाचरे पाण्याने फुल्ल भरून वाहू लागतात. आणि मग आवणी करण्यासाठी शेतक-यांची एकच धावपळ होते.सर्वांचे एकच लक्ष असते. लवकरात लवकर आपली आवणी संपवणे.
काही शेतकऱ्यांना थोडी भातशेती असते. त्यांची लवकरच आवणी होते. परंतु ब-याच शेतक-यांची शेती जास्त असते. मणुष्यबळ कमीअसते. अनेकांकडे चिखलणी करण्यासाठी बैल नसतात. त्यांची या मोसमात खुपच ओढातान होते. या शेतकऱ्यांना मनुष्य बळ व औत काठीसाठी वाट पहावी लागते.
ज्यांना थोडी शेती असते. त्यांची आवणी लवकर होते असे शेतकरी एकत्र येतात. अनेक गावांमध्ये गरजु शेतकरी असतात.हे गरजू शेतकरी ज्यांची आवणी झाली आहे या शेतक-याकडे येतात. (पश्चिम भागातील अनेक शेतक-यांना प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना किती जमीन आहे. व ती कोठे कोठे आहे याची इंत्यभुत माहिती असते.)
गरजू शेतक-यांची संपुर्ण आवणी करून देण्यासाठी विशिष्ट रक्कम देण्याचे ठरवले जाते.त्यास "डफा" किंवा "खोती" देणे असे शब्द आहेत.
मोडा पाळणे :
पुर्वी भागातील मुत्सुद्धी पुर्वजानी जशी शासकीय सुट्टी असते तशी शेतकऱ्यांना सुद्धा आठवडयातुन एकदा सुट्टीची योजना केलेली असते. यालाच "मोडा "असे म्हणतात. प्रत्येक गावचा मोडा हा मंगळवार किंवा रविवारी असतो.त्या दिवशी शेतीची कोणतीच कामे शेतकरी करत नाहीत. मोडा हा ग्रामदैवताच्या नावाने पळाला जातो.
आवणी करताना खुपच मजा येते. कधी जोरदार तर कधी रिमझिम पाऊस पडत असतो. भात खाचरात गुडघाभर पाणी असते. भात खाचरातील रोपे विशिष्ट पण सोप्या पध्दतीने काढली जातात त्याला दाढ खणने असे म्हणतात. छोटया रोपांची अगदी छोटी गड्डी बांधतात त्याला "मुठ "असे म्हणतात. असे अनेक मुठ एकत्रित केल्यावर या सर्वांना "आवान" असे म्हटले जाते.
दाढ खणणे :
प्रथमतः दाढ खणल्यावर त्याचे मुठ जेथे भातरोपे लावायची आहेत त्या ठिकाणी घेऊन जातात.भात रोपे लावायच्या आधी त्या खाचरात बैलांच्या सहाय्याने (यालाच औत म्हणतात) गाळ केला जातो, मगच आवणी केली जाते.
गाळ करणे :
आवणी करताना पाऊस पडत असतो. सर्वजण भिजुन गेलेले असतात. प्रत्येकाकडे ईरणे किंवा प्ल्यास्टिक कागद असतो. खुपच मोठा पाऊस आलातर अंगावर ईरणे व कागद घेतात. अन्यथा इरणे व कागद बांधावर ठेवतात. दुपारचे जेवण भाकरी मसुराची किंवा काळ्या वटाण्याची आमटी, लसणाची चटणी, कांदा व भात असे जेवण असते. सर्व शेतकरी पावसात बांधावर एकत्रित बसुन जेवतात.जेवण झाल्यावर पुरूष मंडळींना तंबाखू व विडीकाडी दिली जाते.व थोडयावेळाने परत कामाला सुरूवात केली जाते.
मुठ :
आवणी करणा-या माणसांना मुठ पुरवणे खुपच आनंदाचे काम असते. दहा पंधरा मुठ दोन्ही हातात धरून पाण्यावरून ओढत नेऊन आवणी करणा-या माणसांपर्यत विशिष्ट पद्धतीने फेकने ही एक कलाच असते.काम करताना अजीबात श्रम होत नाही. परंतु भर पावसात मुठांचे ओझे या शेतातून त्या शेतात वाहून नेण्याचे काम खूपच जिगरी असते. मोठ्यांचे ओझे घेऊन कधी पाय घसरून पडू हे सांगता येत नाही.
भात लावणी :
भात लावण्यासाठी खूप माणसे एकत्र आलेली असतात पोटरी भर पाण्यात भात लावायचे काम चालू राहते. गप्पागोष्टी करत भात लावणीचे काम सुरू राहते.
भल्लर :
खूप मोठे शेती असेल तर अगदी 50 ते 60 माणसे भात लावणी करत असतात. एक माणूस बांधावर उभे राहून ढोल वाजवीत असतो. दुसरा माणूस भलरीची गाणी म्हणत असतो. आणि त्या पाठोपाठ भात लावणारे स्त्री, पुरुष भलरी ची गाणी म्हणत असतात. अगदीच धुंद वातावरण असते. गाण्याच्या तालासुरात लावणीचे काम वेगाने सुरू राहते. पावसाच्या सरी अधून मधून पडत असतात.
गरम पाण्याची अंघोळ :
सकाळपासून काम करून अंग चिंबून गेलेले असते. परंतु थंडी मात्र वाजत नाही. काम संपल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यावर गरम गरम पाण्याने आंघोळ करणे,अगदी स्वर्गीय आनंदाची प्राप्ती करून देते.
काही लोक संध्याकाळी आपल्या बैलांना सुद्धा गरम पाण्याची आंघोळ घालत असत. कारण बैलांना सुद्धा दिवसभर काम करून थकवा येत असेल.
गावाकडचे विलोभणीय दृश्य :
ग्रामीण भागात खुप पाऊस पडतो.त्यामुळे त्या ठिकाणी मुख्यत्वे भातपीक घेतले जाते. ग्रामीण भागातील शेती ही चढ उताराची असल्याने छोटे छोटे दगड लावून बांध घालून प्लाँट केले जातात. हे प्लाँट कमीत कमी दोन गुंठे व जास्तीत जास्त वीस गुंठयापेक्षा जास्त मोठे असतात.याला 'खाचर' असे म्हटले जाते.
उताराच्या जमीनीवरील पाणी वाहुन जाण्यासाठी प्रत्येक खाचराला विशिष्ट प्रकारे दगड लावले जातात. त्यावरून पाणी वाहून जाते.
हे एकप्रकारे छोटे छोटे धबधबेच असतात. याला "प-ह्या" म्हणतात.ज्या वेळी पाऊस पडतो. तेव्हा भातखाचरे भातलागवड केली असल्याने हिरवीगार दिसतात.व त्या खाचरांच्या प-ह्या वरून खाली कोसळणारे पाणी हे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते. स्वर्गीय सुखाचा भास होतो.
जिकडे तिकडे हिरवेगार व पांढरेशुभ्र झरे, ओढे-नाले, प-ह्ये नदी धबधबे भात खाचरातुन वाहणारे पाणी, हिरवेगार डोंगर हिरवीगार राने याची निसर्ग मुक्त उधळन करीत असतो. हे पाहून मन प्रसन्न होते.प्रफुल्लीत होते.पश्चिम भागातील जीर,रायभोग,खडक्या,इंद्रायणी तांदुळ फार प्रसिद्ध आहेत. मोठ्या प्रमाणावर या तांदळांची खरेदी केली जाते.
खाज कुहे :
जवळजवळ महिनाभर लोक सतत शेतात काम करत असत. त्यामुळे सतत पाण्यात राहिल्यामुळे पायांना कुहे होत. पायाच्या बोटांमधल्या बेचांगळ्यात प्रचंड खाज यायची.
अनेक लोक संध्याकाळी बीटेक्स मलम पायांना चोळायचे. काहीजण चुलीमध्ये पायाची बोटे शेकवायचे.
काही लोक अगदी आघोरी प्रकार करायचे. प्रत्येक पायाचे बोट घेऊन त्याला दोऱ्याने खालपासून वरपर्यंत करकचून आवळीत व राहण्याचे. व सुईने वरच्या भागाला टोचायचे. त्या त्यामधून काळे कुळकुळीत रक्त बाहेर पडायचे. हे केल्यावर मात्र पायाच्या बोटांची खाज कमी व्हायची.
सण समारंभ व वृत्तवैकल्ये :
आवनी झाल्यावर मग मात्र बऱ्याच लोकांना काही काम नसायचे. दररोज शेतात जाऊन आपली भात शेती कशी आहे याची पाहणी करत बसायचे. व दुपारी गुरे सोडून रानात न्यायची.
अवनी झाल्यानंतर श्रावण महिना सुरू होऊन नागपंचमी, तिसरा श्रावणी सोमवार, रक्षाबंधन इत्यादी सण तसेच प्रवचन, कीर्तन, भजने, व्रत वैकल्ये, ग्रंथांची पारायणे, यामध्ये लोक रममान व्हायचे. अशी गावाकडे मजा असायची.
लेखक :- रामदास तळपे
थंड ही हवा, धुंद गारवा
हा पाऊस, रिमझिम बरसे
रेशीम धारा, या रुणझुणती
जल थेंबाचे, उधळीत मोती
पानफुले नाचती गंध फुले भोवती
झुलती जलांचे आरसे
हिरवी शेते, हिरवी राने
आवती भवती, हिरवी कवने
नटली बघा ही धरा, झोक तिचा साजरा
नवरी नवेली ही दिसे
गीत :- वंदना विटणकर :- गायिका पुष्प पागधरे