अशोक सुतार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अशोक सुतार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अशोक सुतार

अशोक सुतार', हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला कलंदर माणुस. अशोक माझ्या पेक्षा चार वर्षांनी मोठा.शिवाय माझ्या शेजारीच लागुन त्याचे घर आहे. त्यामुळे त्याला मी  लहानपणापासून अतिशय जवळून ओळखतो.

अशोक हा लहानपणा पासून कुशाग्र बुद्धी असलेला, अत्यंत  हुशार मुलगा होता.त्याचा चौथी पर्यत कायम पहिला क्रमांक यायचा.त्याचे वडील लोहारकाम व सुतारकाम करायचे.शिवाय मामा टेलरिंग काम करायचे.त्यामुळे अशोक या तीनही कलांमध्ये लहानपणापासून पारंगत होता.

कब्बडी, कुस्ती व क्रिकेट मध्ये अशोकचा हात कुणी धरू शकत नव्हते. 

त्यावेळी भागात सर्व गावांमध्ये चौथी पर्यंतच शाळा असल्यामुळे पश्चिम भागातील मुलांना पुढील शिक्षणासाठी डेहणे येथे जावे लागत असे.तेव्हा गावातील सर्व शाळकरी मुलांना protection (संरक्षण) पुरवण्याचे काम अशोक करायचा. गावातील एखाद्या मुलाशी कुणी बाहेरच्या गावच्या मुलाने मारामारी केली.. व अशोकला नंतर कळले तर अशोक त्या मुलाला चांगलाच चोप देत असे.त्यामुळे आमच्या गावातील मुलांमुलीकडे वाकड्या नजरेने कुणी पहात नसे. एवढा अशोकचा त्यावेळी वचक होता.

अशोकला खालच्या वर्गातील मुले अशोकदादा' म्हणत असत. अशोक वरच्या वर्गात असल्याने परिक्षेच्या वेळी त्याच्या पुढे मागे खालच्या वर्गातील गावातील कुणीतरी मुलगा/मुलगीचा क्रमांक यायचा.तेव्हा अशोक पर्यवेक्षक बाहेर गेल्यावर पटकन त्या मुला /मुलीला तेवढ्या वेळात उत्तरे सांगायचा. 

तो काळ क्रिकेट या खेळाने भारलेला काळ होता.प्रत्येकाच्या मनात क्रिकेट या खेळाने "गारूड" केलं  होतं. सुनिल गावस्कर, रवी शास्री,कपीलदेव,व्यंकटेश प्रसाद, संजय मांजरेकर यांचा सुवर्णकाळ होता.अशोकच्या मामाकडे तेव्हा रेडिओ असायचा. त्याकाळी टि.व्ही.नव्हता. तेव्हा वन डे मँच हा प्रकार नसायचा.टेस्ट मँच खेळली जायची. ही मँच तीन दिवस चालायची.गावातील सर्व तरूण पोरं अशोकच्या दारात  काँमेंट्री ऐकायला जमत असत.यातुनच गावात क्रिकेटचे बीज रोवले गेले.

अशोकचे मामा बाळू सुतार हे लाकडाची छान बँट बनवून द्यायचे.

श्री. नामदेव शंकर तळपे यांच्या नेतृत्वाखाली श्री. काळभैरवनाथ क्रिकेट संघाची स्थापना झाली.अशोक सुतार डावखुरा फलंदाज सेहवाग सारखी स्फोटक फलंदाजी करायचा.त्याला उत्तम साथ (The wall) श्री.चंद्रकांत वाघमारे (बत्या) करायचा.तेव्हा सामने हे आँल आऊट असयचे.ही जोडी लवकर आऊट होत नसे.जोडीला श्री.चिमण जढर उत्कृष्ट बँट्समन व बाँलर,धोनी सारखा हेलीकँप्टर शाँट्स मारायचा..व धावगती वेगाने पुढे न्यायचा परंतू लवकर बाद व्हायचा. श्री.वामन जढर, श्री.मारूती आंबवणे (विकेट किपर) श्री.सोपान तळपे व कैलास सुतार (कुडे गाव) मध्यमगती गोलंदाज श्री.किसन आंभवणे कै.अहिलू (गोट्याभाई) श्री.कांताराम तळपे हे ब-यापैकी खेळाडू होते.तर श्री.नामदेव तळपे,मध्यम गती गोलंदाजी करत असे, श्री.धोंडू विष्णू तळपे हा शोएब अख्तर सारखी सुपरफास्ट गोलंदाजी करायचा.भलेभले फलंदाज त्याला भ्यायचे. तर चीमन जढर फास्टर गोलंदाजी करायचा.सोपान तळपे हा ही मध्यमगती गोलंदाज होता.

परंतू अशोक सुतार हा एकमेव असा फलंदाज होता की संपुर्ण मँच फिरवायचा.आणि मंदोशीचा विजय सुकर करायचा.त्या

 काळात सन १९८४ ते १९८८ मध्ये घोटवडी येथे तृतीय क्रमांक,डेहणे येथे चतुर्थ क्रमांक टोकावडे येथे तृतीय क्रमांक तर  कारकुडी येथे द्वितीय क्रमांक मंदोशी संघाने पटकावला होता.या चारही क्रिकेट स्पर्धा मध्ये अशोक सुतारने कमालीची बँटींग करून संघाला सामने जिंकून दिले होते. त्यामुळे गावातील सर्व ज्यांना क्रिकेट मधले ओ की ठो कळत नाही अशा सर्व अबालवृद्ध व माता भगीनींना संघाबद्दल प्रचंड अभिमान वाटायचा.गावातील लोक कौतुक करायचे.बाहेरगावी सामणे असले की गावचे लोक सामने पहायला पोरांबरोबर जात असत.

सन १९८५ साली मंदोशी गावाने श्री.नामदेव तळपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नावठिका (मंदोशी) येथे फेब्रुवारी महिन्यात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. तेव्हा जवळजवळ १४ संघ दाखल झाले होते.या स्पर्धा तीन दिवस चालल्या होत्या. तेव्हा तेथे कै.देवराम तळपे यांनी बेसन लाडू व भजीचे दुकान लावलेले मला चांगले आठवते.शिवाय बर्फाच्या गारेगारी विकणारे पाच सहा सायकल स्वार दाखल होतेच.

स्पर्धेमध्ये व्यत्यय निर्माण करणाऱ्या टोकावडे गावच्या एक जणाला श्री.लक्ष्मण बाळू हुरसाळे यांनी चोप दिल्याने प्रचंड दहशत निर्माण झाली होती.त्या धसक्यानेच पुढील स्पर्धा सुरळीतपणे पार पडल्या होत्या. 

टोकावडे व कारकुडी संघाला हरवुन..मंदोशीचा संघ सेमी फायनल मध्ये गेला होता.नंतर सेमी फायनल मध्ये खरोशी संघाला धुळ चारली होती.प्रथम क्रमांक डेहणे दुसरा क्रमांक मंदोशी तीसरा क्रमांक तेरूंगण तर चौथा क्रमांक खरोशीचा आला होता.

खरोशी संघा बरोबर प्रथम गोलंदाजी करताना मंदोशी संघाने टिच्चून गोलंदाजी केली होती.श्री.धोंडू तळपे २ षटकात १५ धावा देऊन तब्बल तीन फलंदाज बाद केले होते.श्री. चीमन जढर यांनी दोन षटकात १६ धावा देऊन  दोन फलंदाज बाद केले होते.श्री,नामदेव तळपे यांनी दोन षटकात १४ धावा देऊन दोन फलंदाज बाद केले होते.तर श्री.सोपान तळपे यांनी दोन षटकात १९ धावा देऊन १ फलंदाज बाद केला होता. अशा प्रकारे आठ षटकांच्या या खेळात आवांतर धावासह ७३ धावा व ८ फलंदाज बाद झाले होते.

तर फलंदाजी करताना अशोक सुतार याने शेवट पर्यंत आउट न होता..३४ धावा केल्या होत्या. श्री.चंद्रकांत वाघमारे याने २१ धावा करून तो सातव्या षटकात बाद झाला होता.त्या नंतर आलेल्या श्री.चीमन जढर यांनी एका षटकात दोन षटकार व एक चौकाराच्या सहाय्याने १९ धावा करून मंदोशी संघाला दुसरा क्रमांक मिळवून दिला होता.या वेळी  मंदोशी ग्रामस्थांनी प्रचंड जल्लोष केला होता.

(या स्पर्धेची स्कोअर वही अजूनही मी जपुन ठेवलेली आहे.)*

विशेष म्हणजे अशोक सुतार हा उत्कृष्ट कुस्तीपटू देखील होता. लांग,बांगडी,पट,ढुंगनी,उपट ह्या डावात तो तरबेज असायचा. सलामीला खेळताना डोळ्याची पात लवते न लवते तोच लांग मारून प्रतिस्पर्धी पैलवान जमीनीवर उताना पडलेला दिसे.

अशोक सुतारची कुस्ती दोन मिनिटाच्या आत चितपट होत असे.प्रतिस्पर्धी पैलवानाला देखील आपण इतक्या लगेच कसे चितपट झालो हा भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असे. आखाड्यात एकच जल्लोष पहायला मिळे.अशोक वर बक्षिसांची खैरात होई.अनेक पदके, सन्मानचिन्ह,वस्तू रोख रक्कम त्याला मिळाली.भागात एक नावाजलेला पैलवान म्हणुन त्याची गणना होऊ लागली,मंदोशी गावचे नाव अधीच श्री.बारकू तळपे, कै.खेमा तळपे कै.हरिभाऊ आंबवणे, श्री,विष्णू पांडू तळपे, श्री.विष्णू गोमा तळपे,श्री.कुशाबा आंबेकर,श्री.होनाजी मोसे, श्री,हरिभाऊ हुरसाळे यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते.त्या ध्वजाला पताका लावण्याचे काम अशोकने केले..गावचे नाव उज्वल केले.अतिशय सन्मानाची व प्रतिष्ठेची शेवटची कुस्ती त्याच्यावर लावली जायची.व तोही या संधीचे सोने करत असे.त्यावेळी त्याला गावातील/ भागातील लोकांचे अलोट प्रेम मिळाले,अमाप प्रसिद्धी मिळाली.

अशोकच्या नशिबाने त्याला लहान वयातच हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळाली..असे असतानाही यात्रेच्या हंगामात त्याची कुस्ती बहरतच होती. क्रिकेटच्या खेळात त्याची बँट तळपतच होती..त्यावेळी तो प्रसिद्धीच्या व लोकप्रियतेच्या शिखरावर होता.त्याच्या पुढे आम्ही तेव्हा पालापाचोळा होतो..    

से असतानाही त्याने कधीच माज केला नाही.गर्व,अभिमान बाळगला नाही..नाहीतर थोड्याशा प्रसिद्धीने अर्ध्या हाळकुंडाने पिवळे होणारे कितीतरी जण समाजात असतात.

एकदा गावात जातीयवादाची केस झाली होती.पुणे ग्रामीण चे एस.पी.साहेब गावात आले होते.त्यांनी दोनही पार्ट्यांना एकत्र बोलावुन घेतले..हे प्रकरण मिटवण्यासाठी अशोकने अत्यंत महत्वपुर्ण भुमीका बजावली होती.तेव्हा स्वतः एस.पी. साहेबांनी त्याचे अभिनंदन  केले होते.

परंतू नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.मुबईला गेल्यावर वाईट मित्रांच्या संगतीमीळे अशोक नशेच्या आहारी गेला...पुढे त्याची कंपनीही गुजरातला गेली..कंपनीने अनेक जणांना थोडेफार पैसे देऊन घरी पाठवले.त्यात अशोकही होता.

घरी आल्यावर अशोक घरे बांधण्याची कामे करू लागला. उत्तम कामामुळे त्याला घराची कामे मिळू लागली.त्याचे तेथेही नाव झाले.परंतू येथेही दारूने त्याचा पिच्छा सोडला नाही.दारू पासुन परावृत्त करण्यासाठी खुप लोकांनी प्रयत्न केले.परंतु तो बधला नाही.पुढे तो पुर्णपणे व्यसनाधीन झाला.लोक त्याला काम देईनात.मदत करीनात. या मुळे घरी सर्वांची उपासमार होऊ लागली.शेवटी त्याच्या पत्नीने ऊदरनिर्वाहासाठी राजगुरूनगर गाठले.अशोकही तिकडे गेला.मी त्याला खुप समजावून सांगीतले.त्याला मी दहा- बारा हजार रूपायाची हत्यारे विकत घेऊन दिली..काही दिवस त्याने चांगले काम केले..परंतू थोड्या दिवसातच तो पुन्हा दारू पिऊ लागला यामुळे त्याचे जवळचे नातेवाईक मित्र त्याला सोडून गेले. त्याला लोक टाळू लागले.ओळखीचा जो भेटेल त्याच्याकडे तो पैसे मागु लागला.लोक त्याला अर्थीक मदत करायला कचरू लागले.त्याची सर्व प्रतिष्ठा धुळीला मिळाली..

आता कधीतरी अशोक दिसतो..हाडाची काडे झालेला अशोक...झोकांड्या खात रस्त्याने चाललेला अशोक...मळकी जीर्ण झालेली कपडे घातलेला अशोक ....तो बोलताना येणारा.प्रचंड उग्र दर्प..

त्याला पाहून मन सुन्न होते..काळीज चिरते.अगदीच गलबलून येते..मदत करायची इच्छा असुनही मदत करता येत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल...😥😥


सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस