डेहणे गाव हे पश्चिम भागातील दळणवळणाचे पुर्वी पासुनचे महत्त्वाचे केंद्र आहे. माझे माध्यमिक शिक्षण तेथेच झाले.
गावात प्रवेश करणाऱ्या पायवाटा:
डेहणे गावात प्रवेश करण्यासाठी पूर्वी अनेक पाउलवाटा होत्या. खरोशी, धामणगाव,एकलहरेकरांची पाउलवाट,ही डोंगरु तिटकारे गुरुजींच्या घरासमोरून बैलगाटातून येत असे.
नायफड कडून येणारे लोक थेट रस्त्याने येत असत.
पश्चिम भागातुन येणाऱ्या लोकांची पाऊलवाट ही जानोबा मंदिराच्या पाठीमागून येत असे.
शेंदुर्लीवरून येणारे लोक मारुती लांघी फेटेवाले यांच्या शेताच्या कडेकडेने वांजुळडोहा कडून डेहणे गावात प्रवेश करीत असत.
खामकरवाडी,कुडे व घोटवडीकर हे बक्षा आंब्या कडून भीमा नदी ओलांडून डेहणे गावात प्रवेश करीत असत.
एकलहरे,आंबेकरवाडी,बांगरवाडीकरांची पाऊलवाट ही आमईकडून नदी ओलांडून आता जी बाजार समिती आहे तेथून गावात प्रवेश करीत असे.
अशा डेहणे गावात प्रवेश करणा-या ब-याच पाऊलवाटा होत्या.
आता गावोगावी रस्ते झाल्याने व प्रत्येकाकडे मोटारसायकल,चारचाकी आल्याने जवळ जवळ पाउलवाटा काळाच्या ओघात लुप्त झाल्या.आता फार क्वचितच त्यांचा उपयोग होत असेल.
गावात मुख्य रस्त्याने प्रवेश केल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजुला शांताराम कोरडे यांची गिरणी,त्या शेजारी सिताराम कोरडे यांचे टेलरचे अतिशय छोटे दुकान होते.
सिताराम टेलर
सीताराम टेलरच्या दुकानात शाळेतील बरीचशी मुले उसवलेली कपडे शिवणे, रफु करणे, तर काही उगाचच शाळेला दांडी मारून वेळ घालवत बसायची. शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ते टाईमपास करण्याचे आवडते ठिकाण होते.
सितारामच्या शेजारी बांबळे पंक्चर कम लाईट लाउडस्पिकर मंडप डेकोरेशवचे दुकान होते. शाळेतील मुले सायकल पंक्चर काढण्यासाठी कायम त्यांच्या जवळ घोळक्याने उभी असायची.
शेजारीच उबाळे यांच्या पडवीला डाँक्टर शितोळे यांचा दवाखाना होता. हे डाँक्टर महाशय कोणताही पेशंट असुद्या. त्याला दोन इंजेक्शन दोन दंडांना देणारच हा नियमच होता.बोर्डावर मोठ्या अक्षरात डाँ.शितोळे यांचा दवाखाना व त्याखाली छोट्या अक्षरात R.M.P.असे लिहीलेले होते.आम्ही R.M.P. चा Longfarm रोगी मारण्यात पटाईत असा मराठीत अर्थ काढला होता.
त्यांच्या शेजारी उबाळे यांचे हाँटेल होते व आताही आहे.उबाळे बंधू गणपतीचे डेकोरेशन फार सुंदर करायचे.उबाळे यांचे हाँटेलात भजी व कुंदा फारच फेमस होता.
उबाळे हाँटेलच्या शेजारीच श्री.शिंदे यांचे व्ही.डी.ओ. थिएटर होते. बाहेर काळ्या बोर्डवर रंगीत खडूंनी मोठ्या अक्षरात चित्रपटाचे नाव व छोट्या अक्षरात कलाकारांची नावे अशी जाहिरात असायची.विद्यार्थी तेव्हा शाळा बुडवून पिक्चर पाहण्यासाठी तेथे जात असत.
शेजारीच इन्नूसभाई तांबोळी व कै.विठ्ठल कहाणे यांचे किराणा मालाचे दुकान होते. श्री.वनराज कहाणे यांचेकडे ६०८ टेंपो होता.
त्यांचे शेजारी कै.कैलास (बाळासाहेब) सावंत यांचे टेलरचे दूकान होते.
त्या शेजारी श्री.दत्ताशेठ बाजीराव कोरडे यांचे किराणा दुकान होते.या दुकानात विशेष गर्दी असायची. मला आठवते त्या वेळेस रामायण व महाभारत मालिका टिव्हीवर लागायच्या.मालीकेतील अनेक देवांचे पासपोर्ट साइजचे फोटो याच दुकानातुन चार-आठआणे देऊन पोरं घ्यायची व वहीमध्ये संग्रह करायची.
याच वेळी अमीरखान व माधुरी दिक्षित यांचा दिल सिनेमा हिट झाला होता.अमीर माधुरी यांचे छोटे फोटो याच दुकानातुन शाळेचे विद्यार्थी घ्यायचे व इस्रीच्या सहाय्याने शाळेच्या गणवेशातील पांढऱ्या शर्टाच्या मागील बाजुला व पुढे खिशावर ते चित्र उमटवयाचे. त्यामुळे अनेकांनी शिक्षकांच्या हातातील छड्यांचा प्रसाद खाल्ला आहे.
कोरडे यांच्या दुकानाच्या शेजारी शाळा व सरकारी दवाखान्याकडे जाणारा रस्ता व त्या शेजारीच कै.गणपत भोपळे यांची भात व पिठाची गिरणी होती. त्या गिरणीवर कै.नावजी वनघरे व कै.सदाशिव देशमुख (सदुमामा) कामाला होते. त्या शेजारी मुलांचे वसतीगृह व श्री. शंकर सोळशे यांचे दुकान होते.
भोपळे यांचे पुढच्या बाजुला श्री.अंकुश भोकटे यांचे टेलरचे दुकान होते. शेजारी डेहणे आदिवासी संस्थेचे कार्यालय होते. त्यांच्या बाजुला दक्षिणेस कै.बाबुराव कौदरे यांच्या इमारतीत पाचवी ते सातवी पर्यत शाळेचे वर्ग भरत.
पश्चिमेकडे उजव्या बाजुला सरकारी दवाखाना व पुढे शिवाजी विद्यालयाचे आठवी ते दहावी पर्यतचे वर्ग होते. त्याच्या खाली तालुका मास्तर पगार विभाग डेहणे यांचे कार्यालय होते.व उजव्या बाजुला शाळेचीच इमारत होती. त्यात दहावी "ब" चा वर्ग भरायचा.
त्या शेजारी श्री.जानोबा महाराजांचे जुने कौलारू मंदिर होते. मंदिरावर इंदिरा गांधी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज यांची अतिशय सुंदर अशी भिती चित्रे होती.
मंदिरासमोर दिपमाळ व भव्य असा आयताकृती स्टेजसारखा मोठा पार होता. पाराच्या दोन्ही बाजुज्या कोप-यावर उंच अशी झाडे होती. दक्षिणेस दगडी रांजन होता. याच पारावर गावच्या यात्रेचे कार्यक्रम होत असत.
समोरच भव्य अशी दगडी भिंतीची, कौलारू मराठी शाळा होती. त्या शेजारी मराठी शाळेच्या शिक्षकांसाठी सरकारी निवासस्थान होते. शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात सकाळी प्रार्थना व्हायची. संध्याकाळी हाँलीबाँल खेळत.
कै.बाजीराव कोरडे यांचे दुकानापासुन रस्त्या पलीकडे कै. सखाराम सावंत यांचे हाँटेल त्या शेजारी रशिदशेठ तांबोळी यांचे किराना दुकान (त्यांचे काही काळ हाँटेलही होते.) त्या शेजारी प्रसिद्ध असे अब्बासभाई तांबोळी यांचे जनसेवा हाँटेल होते.या होटेलात तर्री फार प्रसिद्ध असायची.
गावातील स्रीया कधीकधी आमच्याकडे आठ आणे व स्टिल तांब्या देऊन आब्बासशेठच्या येथुन तर्री आणायला पाठवायच्या. आब्बासशेठ हे सतत चहा पित असायचे.
या हाँटेल शेजारी आणखी एक V.D.O. थिएटर व बाजीराव कोरडे यांचे दुकान होते.एकदा शाँर्टसर्किटमध्ये हे दुकान जळुन खाक झाले होते.
डेहणे गावात श्री शांताराम शेंडे यांचा गणपती फार मोठा व आकर्षक डेकोरेशन असायचे. डेकोरेशन खुपच सुंदर असायचे. दहा दिवस नाच,गाणी अगदी धमाल असायची.
खाली सुतारआळी यांचाही सार्वजनिक गणपती असायचा.अतिशय सुंदर नियोजन असायचे. गणपती काळात विवीध कार्यक्रम,मराठी सिनेमे अशी रेलचेल असायची.
आब्बास शेठच्या हाँटेल समोर मोठा चौक व पुढे मोठा ध्वजाचा उंच लोखंडी खांब होता. या खांबाला वळसा मारूनच एस. टी. आब्बासभाईच्या हाँटेलच्या दारात धुरळा उडवीत थांबायची.
ध्वजाच्या खांबाच्या समोरच दुध डेअरी, शिवाजी विद्यालथाचे कार्यालय व अंगणवाडी होती. त्याशेजारी जनावरांचा दवाखाना आहे.तर जवळच असलेल्या गोडावुनच्या प्रांगणात डेहणे आदिवासी संस्थेची वार्षिक सभा असे.
सभा संपल्यावार भेळ लाडू खाण्यासाठी आम्ही तेथे जात असू.
आता जे वाढाणे यांचे हाँटेल आहे. त्या जागेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक होती. व मारूतीच्या मंदिरासमोर ग्रामपंचायत व पोष्ट आँफिस होते.
मारूतीच्या मंदिराच्या पुर्वेला खाली बैलगाड्यांचा घाट होता. यात्रेला तेथे अनेक तालुक्यातुन नामांकित बैलगाडे यायचे. प्रचंड गर्दी असायची.
बैलगाड्यांच्या शर्यती व्हायच्या.गाड्यांच्या शर्यती पहायला संपुर्ण पश्चिम भाग लोटायचा.संध्याकाळी जानोबा महारांजांच्या पारावर इनाम वाटप केला जायचा. रात्री तमाशा किंवा भारूडाचा कार्यक्रम व्हायचा.
शांताराम शेंडे यांच्या घरा शेजारी धरमरायाचे छप्पर व भिंती नसलेले देऊळ होते.धरमरायाच्या यात्रेला येथील जागा शेणाने सारवून छानपैकी स्वच्छता केली जायची. सकाळी लोक मांडव डहाळे आणायचे. पुजा झाल्यावर नारळ फोडण्यासाठी तोबा गर्दी व्हायची. लहान मुलांच्या कुस्त्या व्हायच्या. त्यानंतर विवीध गावच्या भजनांचा कार्यक्रम असायचा.
धरमरायाच्या देवळा शेजारी मुस्लीम बांधवांचे चीरे होते.त्यांना वर्षातुन एकदा पांढरा चुना लावलेला असे.
याच मंदिराच्या उत्तरेला कातकरी लोकांची चाळ आहे. तेथे सकाळी डेअरीला दुध घालायला आलेले काही लोक दारू पिण्यासाठी तेथे जात असत.
सोळशेवाडी यांचे ढोल व लेझीम पथक त्यावेळी फार प्रसिद्ध होते. शिवाय त्यांचे भजन मंडळही प्रसिद्ध होते. श्री.दत्ता लांघी साहेब, श्री.एकनाथ लांघी साहेब, कै.बुधाजी खाडे, कै,चिंधू खाडे, श्री.जगदिश कशाळे साहेब, श्री.दगडू लांघी. श्री.दत्ता खाडे सरपंच यांनी खुप वर्षे भजन स्पर्धा भरविल्या होत्या. व त्यास प्रचंड प्रतिसाद लाभला..
त्यावेळी श्री.सुरेश तिटकारे सर, श्री.मनोहर कोरडे,श्री.वनराज कहाणे सर, श्री.नामदेव वाजे गुरूजी श्रीहरी तरूण मंडळाची स्थापना करून मारूती मंदिराचा जिर्णोद्धार केला व तेथे दररोज सायंकाळी हरिपाठ सुरू केला.
त्यावेळी डेहणे आदिवासी दुध उत्पादक संस्था ही 25 गावांशी संलग्न होती. संस्थेची २२०६ क्रमांक असलेली दुधगाडी अनेकांच्या स्मरणात असेल. दुध संकलनाचे काम कै.नावजी वनघरे,चाहू वायाळ हे करायचे.
गावात कै.नानासाहेब कशाळे हे बरेच वर्षे सरपंच होते.शिवाय ते सन १९९२ ते १९९७ या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य देखील होते. तसेच ह.भ.प. धोंडूबाबा कोरडे हे सुद्धा सन १९६२ ते १९६७ या कालावधीत पंचायत समिती सदस्य होते.
शिवाय श्री.रामदास माठे हे सुद्धा पंचायत समिती सदस्य व सभापती होते.
त्याशिवाय दादाभाऊ कोरडे सरपंच, बी.के.कशाळे (आदिवासी सेवक), मारूती लांघी (फेटेवाले) कावळे पाटील, श्री.नामदेव कशाळे चेअरमन, कै.श्रीपत वाजे,भोकटे गुरूजी, कै.डोंगरू तिटकारे गुरुजी व सखाराम सावंत इत्यादी मंडळींना भागातुन एक प्रतिष्ठेचे वलय होते.
तर व्यापर क्षेत्रात आब्बास शेठ, रशीद शेठ, कै.बाजीराव कोरडे, कै.विठ्ठल कहाणे,कै.भिकाशेठ उबाळे.श्री.शांताराम कोरडे गिरणीवाले,श्री.सितारामशेठ कोरडे. कै.गणपत भोपळे व्यापार क्षेत्रात प्रसिद्ध होते.
कै.नाना भिकाजी कशाळे, कै.सखाराम सावंत, कै.चिमाजी आप्पा कोरडे, श्री.सितारामशेठ कोरडे,यांचे नामांकित बैलगाडे प्रसिद्ध होते.
शिवाय कै.बापू गायकवाड, कै.वंसत व श्री.नारायण गायकवाड हे प्रसिद्ध डफडे वादक होते.
कै.लक्ष्मण सुतार यांच्या दारात शेतीची लाकडी औजारे तयार व दुरूस्ती साठी अनेक गावच्या लोकांची वर्दळ असायची.
शेतीच्या कामासाठी विळे, कोयते, फाळ, साखळ्या, वसू,फास, पहार, फावडे, टिकाव शेवटन्यासाठी,धार लावण्यासाठी कै.वामण लोहार यांच्या दारात खुपच वर्दळ असायची.
याशिवाय अगदी सकाळी लवकर उठून आब्बास शेठ,उबाळे बंधू यांना मदत करणारे कै.विष्णू शेंडे हेही अनेकांच्या स्मरणात असतील.
डेहणे गावच्या जडण घडणी मध्ये या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचा सिंहाचा वाटा होता. त्याचप्रमाणे भागाचा देखील हेही तितकेच खरे..
आता मात्र या धकाधकीच्च्या व धावपळीच्या युगात पायी चालायला वेळ नाही.यात्रा उरूस भारूड,तमाशे पहायला वेळ नाही.
इतकेच कशाला पाहुणे रावळे नातेवाईक यांना भेटायला किंवा त्यांच्या बरोबर बोलायला वेळ नाही.तसा आपण खरा आनंद कधीच गमावला आहे हे मात्र तितकेच खरं आहे.