साठे बिस्किट्सचा समग्र इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
साठे बिस्किट्सचा समग्र इतिहास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

साठे बिस्कीटचा समग्र इतिहास

साठे बिस्किटे पूर्वी आपण खाल्ली असतीलच. प्रत्येक दुकानात साठे बिस्किटे ही विक्रीसाठी असायची. अतिशय चविष्ट अशी बिस्किटे 1990 पर्यंत अस्तित्वात होती. या बिस्किट महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाली होती.

साठे बिस्किटाची कंपनी महाराष्ट्रीयन गणपतराव साठे नावाच्या माणसाची होती. हे अनेक जणांना माहितही नसेल.

1940 च्या सुमारास महाराष्ट्र मध्ये बऱ्यापैकी बिस्किटांना मागणी होती. त्यावेळी विदेशी कंपन्यांची बिस्किटे पाय रोवून उभी होती.अशावेळी गणपतराव साठे यांच्या मातोश्रींनी स्वतःच्या घरी बिस्किटे तयार करायला सुरुवात केली.

ही बिस्किटे त्यांचा मुलगा गणपतराव साठे हे सायकलवर घरोघरी जाऊन विकायची. बिस्किटांची चव ही जिभेवर रेंगळणारी असल्यामुळे लवकरच ती लोकांच्या पसंतीस उतरली उतरली.

लवकरच गणपतराव साठे यांनी आपल्या बिस्किटांचा छोटा कारखाना पुण्यातील भवानी पेठेत दहा बाय दहाच्या खोलीमध्ये सुरू केला.

त्यावेळी साठी बिस्किटांना लोकांकडून प्रचंड मागणी वाढू लागली आणि हळूहळू फॅक्टरी चा व्याप वाढू लागला. व कंपनी जोरात सुरू झाली.आर्थिक उत्पन्नाचे उच्चांक गाठले गेले.

सन 1945 मध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धात भारतामध्ये भीषण साखर टंचाई निर्माण झाली. त्यामुळे बेकरीवर एक प्रकारचे संकट निर्माण झाले. याच वेळेस आता पाकिस्तानात परंतु त्यावेळी भारतात असलेल्या सिंध प्रांतात साखरेचा प्रचंड मोठा साठा पडून आहे हे गणपतराव साठे यांना माहीत झाले.

तेव्हा त्यांनी सिंध प्रांतात जाऊन दहा हजार स्केअर फुटाची जागा विकत घेऊन हा साठा विकत घेतला. व तेथे साठे ड्रिंकिंग चॉकलेट कंपनी या नावाची कंपनी सुरू केली. तेथेही कंपनी आपले पाय रोवत असताना सन 1947 मध्ये भारत देशाची फाळणी झाली. व सिंध प्रांत पाकिस्तान मध्ये गेला. त्यामुळे गणपतरावांना ही कंपनी चालवणे मोठ्या जिकरीचे ठरले.

परंतु सुदैवाने पाकिस्तान मधल्या एका गृहस्थाची E morator या नावाची बेकरी पुण्यामध्ये होती.ही इमोराटर बेकरी गणपतरावने घेतली व त्यांची सिंध मध्ये असलेली साठे ड्रिंकिंग चॉकलेट कंपनी या ग्रहस्थाला दिली.अशाप्रकारे तडजोड करण्यात आली.आजही पाकिस्तान मध्ये ही बिस्किट कंपनी " सिंध चॉकलेट्स वर्क्स " या नावाने प्रसिद्ध आहे. परंतु या चॉकलेटची मुहूर्तमेढ साठे नावाच्या माणसाने रोवली होती. ती कंपनी आजही दिमाखाने उभी आहे.

परंतु बेकरीमध्ये गणपतरावांचे मन काही रमले नाही. त्यांनी पुण्याजवळ असलेल्या विश्रांतवाडी येथे 27 एकर जमीन घेतली. व तेथे बिस्किट कंपनीचा कारखाना थाटला.

साठे बिस्किट्स कंपनीची स्थापना: 

सन 1949 मध्ये साठे बिस्किट कंपनीची स्थापना केली. आणि साठी बिस्किट या नावाची कंपनी रजिस्टर केली. त्यावेळी इंग्रजी नावांना प्रचंड क्रेझ असताना देखील गणपतराव साठे यांनी त्यांच्या आडनावाचा ब्रँड विकसित केला.आणि बिस्कीट कंपनीला साठे हे नाव दिले

दिनांक 10 एप्रिल 1949 रोजी गणपतरावांनी विश्रांतवाडी येथे नवीन असलेल्या कारखान्यात बिस्किटांचे उत्पादन करायला सुरुवात केली.

त्याचवेळी सन 1953 मध्ये गणपतराव साठे यांनी दोन रेस्टॉरंट भागीदारीमध्ये चालवायला घेतली होती. परंतु या रेस्टॉरंटला अपेक्षित यश लाभले नाही. त्यामुळे ती रेस्टॉरंट लवकरच बंद करावी लागली. परंतु साठे बिस्किटांचा खप मात्र जोरात चालू होता.

यशाचे शिखर:

1960 आणि 1980 च्या दशकापर्यंत,साठे बिस्किट अँड चॉकलेट कंपनीने आपले कार्य विस्तारले आणि प्रीमियम दर्जाची बिस्किटे आणि चॉकलेटच्या विस्तृत श्रेणीसाठी ती प्रसिद्ध झाली. त्यांची उत्पादने भारतीय घरां घरामध्ये एक प्रमुख घटक होती. आणि या साठे ब्रँडने बाजारपेठेत लक्षणीय वाटा मिळवला होता.साठे बिस्किटांनी पार्ले आणि ब्रिटानिया सारख्या बहुराष्ट्रीय दर्जाच्या ब्रँडनाही मागे टाकले होते.

साठे बिस्कीट कंपनीचे यश हे त्या काळात इतके घवघवीत होते की,अतिशय अत्यल्प भांडवल असलेल्या स्थानिक कंपनीने प्रचंड भांडवल असलेल्या पार्ले जी आणि ब्रिटानिया कंपनीला मागे टाकले. साठे बिस्किट ही भारतात सर्व राज्यांत पोहोचली होतीच. परंतु भारता बाहेरील मस्कत, गल्फ, दुबई, इराण आणि आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती.

साठे बिस्कीटच्या एका पुड्यामध्ये 16 आयताकृती बिस्किटे असायची. एका पुड्याची किंमत 1 रुपया 60 पैसे अशी होती. या बिस्किटाचा पुडा फोडल्यावर खमंग आणि खरपूस असा सुवास दरवळायचा. कधी एकदा बिस्किट खाईल असे वाटायचे.

ही बिस्किटे पत्र्याच्या चौकोनी डब्यातून निर्यात व्हायची. एका डब्यामध्ये 15 किलो धान्य मावायचे. रिकामा डबा दुकानदाराकडून दहा रुपयाला लोक विकत घेत असत. व त्यामध्ये लोक धान्य भरून ठेवत असत. या डब्याचा फायदा म्हणजे डब्याला गोल मोठे झाकण होते. त्यामुळे धान्य साठवणे अतिशय सोपे जायचे.

त्यावेळेस माल्टेक्स, मिल्क चॉकलेट, व ड्रिंक्स चॉकलेट आणि साठे बिस्किट्स लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. साठे पिकनिक बिस्किटे ही त्यानंतर फेमस झाली, तसेच प्राण्यांच्या आकाराची व पक्ष्यांच्या आकाराची अगदी छोटी छोटी बिस्किटे यांनी तर उच्चांक गाठला होता.

दूरदर्शनवरील जाहिराती :

त्यावेळेस  दूरदर्शनवर साठे बिस्किटांची एक अतिशय लोकप्रिय जाहिरात दाखवत असत. त्या जाहिरातीमध्ये एका एका स्त्रीच्या घरात त्या स्त्रीचे पती त्यांच्या कार्यालयातील तीन-चार मित्र अचानक घेऊन येतात. त्यावेळी ती पाहुण्यांना चहा करते. परंतु खायला काय द्यायचे असा तिला प्रश्न पडतो. तेवढ्यात तिला समोरच्या बरणीतील साठे बिस्किटे दिसतात.आणि ही बिस्किटे ती चहा बरोबर पाहुण्यांना नेऊन देते.अशी ती जाहिरात होती. आणि त्याखाली स्लोगन वाक्य होतं. 

"The owner of house wife."

त्याचप्रमाणे हातात हात घालून फेर धरून नाचणारी मुले आपण दूरदर्शनच्या जाहिराती मध्ये पाहिले असतीलच. आणि त्यानंतर एक स्लोगन वाक्य होते.

"आनंदाने नाचण्याजोगे काहीतरी, साठे बिस्किट"

कारखाना व कारखान्या शेजारील परिसर :

विश्रांतवाडीच्या पुलाजवळ आलो की, बिस्किट व चॉकलेटचा खरपूस सुवास नाका तोंडात दरवळायचा.

विश्रांतवाडी पुणे येथील 27 एकर जागेमध्ये असा हा साठे बिस्कीट अँड चॉकलेटचा भव्य कारखाना उभा होता. त्या ठिकाणी अनेक कामगार कामाला होते.तीनही शिफ्ट मध्ये काम चालायचे. सकाळी आणि दुपारी मोठा भोंगा वाजायचा.

कामगारांसाठी कंपनीने घरे बांधून दिली होती. कारखान्याच्या दोन्ही बाजूला भव्य अशी मैदानी होती. त्या ठिकाणी मुले क्रिकेट खेळायची.

शालेय सहलींचे आयोजन :

त्यावेळेस अनेक शाळांच्या सहली साठी बिस्कीट कारखाना पाहण्यासाठी जात असे. साठे बिस्किट्स कंपनीमधील कर्मचारी शालेय मुलांना संपूर्ण कारखाना फिरवून दाखवत असत. शिवाय त्यांना खाण्यासाठी बिस्कीट पुढे आणि चॉकलेट्स देत असत. महाराष्ट्रातील अनेक शालेय सहली साठी बिस्कीट आणि चॉकलेट्स  कंपनीला भेट देत असत.

साठे बिस्कीट कंपनी बस स्टॉप : 

साठे बिस्कीट कारखान्या जवळच बस स्टॉप होता. या बस स्टॉप ला "साठे बिस्कीट कंपनी" असे नाव होते. अजूनही हा बस स्टॉप अस्तित्वात आहे.

घसरणीला कारणीभूत घटक :

साठे बिस्किट अँड चॉकलेट कंपनीच्या घसरणीला आणि बाजारातून गायब होण्यास अनेक घटक कारणीभूत होते:

ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलणे: 

80 च्या दशकात भारतामध्ये अमुलाग्र बदल झाले. वाढत्या शहरीकरणामुळे आणि उच्च शिक्षणामुळे पण एक पर्याय उपलब्ध झाली. त्यामुळे 80 च्या दशकात भारतात आधुनिकरण व्हायला सुरुवात झाली. त्याचवेळी खाद्यपदार्थाचे अनेक ब्रँड विकसित झाले. आणि जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली. 

80 च्या दशकाच्या उत्तरार्धात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बिस्किटांचे आणि चॉकलेटचे बहुविध ब्रँड बाजारात आणले. त्यामुळे आरोग्यदायी स्नॅक्स आणि बहुराष्ट्रीय ब्रँड्सकडे ग्राहकांच्या पसंतींमध्ये लक्षणीय बदल झाला. साठे यांच्या पारंपारिक ब्रँडला बदलत्या ट्रेंडशी जुळवून घेण्यात अडचण आली. 

1990 नंतर उदारीकरण आणि बाजारात परदेशी कंपन्यांचीअचानक घुसखोरी झाली.त्यांनी अनेक प्रकारचे नवनवीन बिस्किट आणि चॉकलेटचे ब्रँड बाजारात आणले. त्यामुळे साठे बिस्कीट कंपनीची परिस्थिती आणखी बिकट झाली.  

नावीन्यपूर्णतेचा अभाव: 

बाहेरच्या देशातील कंपन्यांच्या उत्पादन श्रेणीशी जुळवून घेण्यात आणि नावीन्यपूर्ण ब्रँड विकसित करण्यात साठे बिस्कीट कंपनी अयशस्वी झाली. 

इतर कंपन्यांनी नवीन फ्लेवर्स आणि कथितपणे आरोग्यदायी पर्याय सादर केले, तर साठे त्यांच्या जुन्या पारंपारिक पाककृतींवरच विसंबून राहिले.  

विपणन आणि वितरण: 

प्रभावी विपणन आणि वितरण धोरणाचा अभाव यामुळे बदलत्या बाजारपेठेत स्पर्धा करण्याच्या ब्रँडच्या क्षमतेत आणखी अडथळा निर्माण झाला.  

आर्थिक घटक: 

आर्थिक मंदी आणि चलनवाढीमुळे साठे सारख्या लहान, स्थानिक ब्रँडना स्पर्धात्मक राहणे आव्हानात्मक बनले.

आर्थिक मंदी:

या सर्व कारणामुळे साठे बिस्कीट कंपनी कर्जाच्या खाईत लोटली गेली. आणि कंपनीला 3.50 कोटी रुपयाचे कर्ज झाले.

कंपनी बंद पडण्यामागची प्रमुख कारणे:

आर्थिक अडचणी आणि कायदेशीर वाद :

साठे बिस्किट कंपनीला दीर्घकाळापासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.कंपनीवर विविध प्रकारचे कायदेशीर वाद आणि खटले सुरू होते, ज्यात बँकांकडून कर्ज वसुली आणि इतर कायदेशीर खटले यांचा समावेश होता.

2003 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राविरुद्धचा एक खटला समोर आला होता. कंपनीने 'वन टाइम सेटलमेंट' (OTS) साठी अर्ज केला होता.

व्यवस्थापनातील अंतर्गत कलह: 

१९९७ मध्ये कंपनीच्या व्यवस्थापनात मोठे अंतर्गत कलह निर्माण झाले होते. दोघे भाऊ असलेल्या कंपनीच्या मालकांमध्ये कारखाना चालवण्यावरून वाद सुरू होते.यामुळे कंपनीच्या कामकाजावर परिणाम झाला.

उत्पादन थांबवले: 

साठे बिस्किट आणि चॉकलेट कंपनीने सन १९९६ त्यांचे उत्पादन पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला.

कर आणि मूल्यांकनाचे वाद: 

कंपनीवर उत्पादन शुल्क (Excise Duty) न भरल्याबद्दल किंवा चुकीच्या पद्धतीने भरल्याबद्दल अनेक कायदेशीर दावे होते. तसेच, कंपनीच्या मालमत्तेच्या मूल्यांकनावरूनही (valuation of land and building) वाद होते.

Business of standard : मधील बातमी.

बिझनेस ऑफ स्टॅंडर्ड या इंग्रजी वृत्तपत्राच्याच्या 1 मे 1997 च्या अंकात खालील प्रमाणे एक बातमी प्रसिद्ध झाली होती.त्या बातमीचे मराठीत भाषांतर खालील प्रमाणे उद्भूत करण्यात येत आले आहे.

पुण्यातील बिस्किट आणि चॉकलेट उत्पादक कंपनी, साठे बिस्किट्स अँड चॉकलेट कंपनी लिमिटेड, कारखान्याच्या नियंत्रणासाठी दोघा सख्ख्या भावामध्ये भांडण सुरू असल्याने, बोर्ड रूममध्ये मोठ्या वादाचा सामना करत आहे. 

सतत तोट्यात असलेल्या या कंपनीची एक असाधारण मिटिंग बैठक 23 मे 1997 रोजी बोलावण्यात आली आहे.

ही मिटिंग श्री.व्ही.जी. साठे यांना अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावरून काढून टाकण्यासाठी आहे.

बैठकीतील ठरावात कंपनीच्या संचालक मंडळातून श्री. व्ही.जी. साठे यांना पूर्णपणे काढून टाकण्याची मागणी केली जाईल.

तसेच श्री.व्ही.जी. साठे यांना देण्यात आलेले सर्व अधिकार तात्काळ काढून घेण्याच्या ठरावावरही विचार केला जाईल. 

श्री.व्ही.जी. साठे यांच्यावरील मुख्य आरोप असा आहे की त्यांनी दोन्ही पक्षांमध्ये स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारानुसार (MOU) श्री.पी.सी.परमार यांच्या नेतृत्वाखालील शहर बांधकाम व्यावसायिकांच्या गटाला २५ लाख रुपयांचे इक्विटी शेअर्स वाटप केले आहेत.

कंपनी कायदा १९५६ च्या कलम १७३(२) अंतर्गत शेअरहोल्डर्सना जारी केलेल्या स्पष्टीकरणात्मक निवेदनात कंपनीचे संचालक श्री.एम.जी. साठे यांनी बैठक बोलावली आहे. त्यांनी म्हटले आहे की, श्री.व्ही.जी.साठे आणि परमार यांनी स्वाक्षरी केलेला सामंजस्य करार (MOU) हा कंपनीच्या संचालक मंडळाला तसेच कंपनीला अंधारात ठेवून फसवणूक, गैरप्रकार,चुकीचे सादरीकरण, कंपनीचा विश्वासघात, बनावटगिरी करण्याचा स्पष्ट कट आहे. हा करार काही गुप्त हेतूने करण्यात आला आहे आणि कंपनीला बंधनकारक नाही.

बिल्डर आणि श्री. व्ही.जी. साठे यांच्यात स्वाक्षरी झालेला सामंजस्य करार मुंबई, महाराष्ट्रातील कंपनी रजिस्ट्रारकडे दाखल केलेला नाही, किंवा कंपनी कायद्यानुसार आवश्यकतेनुसार कंपनीला दिलेल्या फायदेशीर आणि उघड मालकीबद्दलची सूचना किंवा कंपनीकडे दाखल केलेला नाही, असे श्री. एम.जी. साठे म्हणाले.

कंपनीचे पूर्वी व्यवस्थापकीय संचालक असलेले श्री.एम.जी. साठे यांना कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद स्वीकारण्याची ऑफर दिली आहे जी बैठकीच्या आयटम क्रमांक २ मध्ये समाविष्ट आहे

ज्या कंपनीला बीआयएफआरकडे पाठवण्यात आले आहे, तिला पुनरुज्जीवनासाठी २.५ कोटी रुपयांच्या रोख रकमेची आवश्यकता असल्याचे श्री. एम.जी. साठे म्हणाले.

कंपनीला ३.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला आहे.

म्हणून औद्योगिक आणि वित्तीय पुनर्बांधणी मंडळाकडे (BIFR) पाठविण्यात आले आहे.

तथापि, कंपनीचा कारखाना २७ एकर जमिनीवर आहे, ज्याची बाजारभाव किंमत अंदाजे ३० कोटी रुपये आहे.

त्यामुळे, अनेक बिल्डर्स कंपनी ताब्यात घेण्याच्या विचारात असल्याचे म्हटले जात आहे. इक्विटी शेअर्सचे कोणतेही नवीन वाटप बिल्डर्सच्या बाजूने शिल्लक झुकू शकते. बिल्डर्सनी कंपनी ताब्यात घेतल्याने त्यांच्या हिताचे नुकसान होईल अशी भीती शेअरहोल्डर्स आणि कर्मचाऱ्यांना आहे.

या बातमीवरून दोघा सख्ख्या भावांचे कंपनी ताब्यात घेण्यासाठी किती टोकाचा संघर्ष होता हे या बातमीवरून लक्षात येते.

बिस्किट आणि चॉकलेट कंपनीचा वारसा.

जरी साठे बिस्किट अँड चॉकलेट कंपनी आज बहुतेक विसरली गेली असली तरी, त्यांनी मागे सोडलेला वारसा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हा ब्रँड व्यावसायिक जगताची गतिमानता आणि नशीब किती लवकर बदलू शकते याचे उदाहरण देतो. अनेक माजी ग्राहकांना साठे यांच्या गोड पदार्थांच्या आठवणी आहेत, ज्या आता जुन्या आठवणी म्हणून जतन केल्या आहेत.

आधुनिक ब्रँडसाठी धडे:

साठे बिस्किट अँड चॉकलेट कंपनीची कहाणी आधुनिक ब्रँडसाठी एक सावधानता देणारी गोष्ट आहे.

सतत विकसित होणाऱ्या बाजारपेठेत, जुळवून घेण्याची क्षमता महत्त्वाची आहे. बदलत्या ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ब्रँडना त्यांच्या ऑफरिंग्जचे स्वरूप सतत नवीन बनवावे लागते. 

मार्केटिंगचे महत्त्व: 

ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी मार्केटिंग आणि वितरण धोरणे अमलात आणि अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे काळाच्या प्रवाहात सतत बदलत राहणे हेही तितकेच  महत्त्वाचे आहे. 

लेखक :- रामदास तळपे.

  





सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस