श्री.एकनाथ गणपत लांघी साहेब

काही लोक असे असतात...करणार तर काहीच नाही.पण असे काही सांगत सुटणार की, मी खुप काही करतो.असे लोक समाजात खुप असतात.
असेच एक अबोल परंतू समाजशील व्यक्तिमत्व श्री. एकनाथ लांघी साहेब.
एकनाथ लांघी हे डेहणे सोळशेवाडीचे. त्यांचे वडील मुंबई येथे नोकरीसाठी असुनही त्यांच्या नशिबी मुंबईला राहण्याचे योग आले नाहीत. संपूर्ण आयुष्याचा पुर्वार्ध हा गावीच गेला.
मराठी शाळेत सातवी पर्यंत शिक्षण झाले. आणि त्याच वर्षी म्हणजे 1979 साली नवीनच सुरु झालेल्या डेहणे येथील हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत नाव दाखल केले. अतिशय प्रतिकूल परिस्थिती, शाळेला स्वतंत्र इमारत नसल्यामुळे आठवीचा वर्ग हा कधी गोठ्यात तर कधी मंदिरात भरायचा. जुने शिक्षक हे पात्रता धारक नसल्यामुळे त्यांचेच इंग्रजी कच्चे असल्यामुळे त्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. इयत्ता आठवीत गेल्यावर एबीसीडी पासून सुरुवात करावी लागली.
सन 1981-82 मध्ये शिवाजी विद्यालय डेहणे या शाळेचा निकाल 90 % लागला. श्री एकनाथ लांघी सर चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले.
लांघी सरांनी महात्मा गांधी विद्यालय मंचर येथे इयत्ता अकरावीला प्रवेश घेतला. त्यानंतर ते तिथून बी.ए. झाले. त्या काळात पश्चिम भागात बीए होणारे ते पहिलेच विद्यार्थ्या असावेत.
सन 1985 मध्ये शासनाने खडू फळा योजना, ऑपरेशन ब्लॅक बोर्ड इत्यादी योजना राबवून इयत्ता दहावी पेक्षा जास्त शिक्षण असलेल्या तरुणांना प्राथमिक शिक्षक होण्याची संधी दिली. त्यावेळी दहावी उत्तीर्ण झालेले अनेक तरुण शाळा मास्तर झाले. त्यामध्ये बीए उत्तीर्ण असलेले श्री एकनाथ लांघी गेली होते. त्यावेळी त्यांना दूर शहरात कोणतीही मोठी नोकरी लागली असती. परंतु त्यांनी ग्रामीण भागात नोकरी करून आपल्याच भागातील मुलांना उच्चशिक्षित करायचे.असा निश्चय केला होता. आणि यातूनच ते शाळा मास्तर झाले.
त्यांना पहिली नेमणूक मिळाली मोरोशी ता. खेड येथे.तेथील शाळेचा पट हा जेमतेमच होता.परंतू श्री.लांघी सर उच्च शिक्षण झालेले शिक्षक असल्यामुळे शाळेचा दर्जा निश्चितच वरचढ होता. लांघी सरांची शिकवण्याची पद्धत आणि अनुभव यामुळे सन 1986 साली मुलांचा पट तिपटीने वाढला. तालुक्यात त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीची दखल घेतली गेली. शाळेचे कामकाज करून ते त्यावेळी असलेल्या तालुका मास्तर कार्यालयात काम करायचे.
त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे मोरोशी शाळेचा पट वाढत होता. नवीन पाचवीचा वर्ग सुरु करण्याचा त्यांनी विचार केला. त्यासाठी ग्रामस्थांनी त्यांना सर्वतोपारी सहकार्य केले. या सर्वांच्या मदतीने मोरोशी येथे पाचवीचा वर्ग सुरू झाला. शाळेत अजून दोन शिक्षकांची भर पडली.
सन 1994 च्या दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी शासनाने केंद्र शाळांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. लांघी सरांच्या मनात मोरोशी येथे केंद्रशाळा व्हावी. असे वाटत होते. परंतु पुढील वर्गासाठी तिथे वर्ग शाळा नव्हत्या. त्यामुळे हे स्वप्नच राहणार होते. मंदोशी तालुका खेड येथे केंद्र शाळा होणार जवळपास निश्चित झाली होते. परंतु गावचे कलुषीत राजकारण व गावकऱ्यांची उदासीनता ही बाब लांघी सरांच्या लक्षात आली. त्यांनी मोरोशी गावच्या ग्रामस्थांची मीटिंग घेऊन हे सर्व सविस्तर त्यांना सांगितले. व आपल्या गावात कोणत्याही परिस्थितीत केंद्र शाळा झाली पाहिजे. यासाठी तुम्ही सहकार्य करा अशी विनंती केली.
ग्रामस्थांनाही हे सर्व मनावर घेतले. समस्त नोकरदार वर्गानी मोठमोठ्या देणग्या दिल्या. ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढली. कोकणात जाऊन लाकडे आणली. आणि ग्रामस्थांच्या स्वखर्चाने, स्व निधीतून अगदी सुंदर अशी शाळेची इमारत उभी राहिली. मोरोशी येथे केंद्र शाळा होण्यासाठी तत्कालीन पुणे जिल्हा परिषद सदस्य कै.श्री.नाना भिकाजी कषाळे यांनी सहकार्य केले.
आणि सन 1995 मध्ये मोरोशी या शाळेला केंद्र शाळेचा दर्जा मिळाला. प्रारंभी एक शिक्षक असलेल्या या शाळेवर केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक,व चार प्राथमिक शिक्षक असा मोठा स्टाफ नेमला गेला. ही सर्व किमया श्री.एकनाथ लांघी सरांनी करून दाखवले होती. त्यांच्या शाळेचा दर्जा हा हायस्कूल पेक्षा कितीतरी पटीने उजवा होता. हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत गेल्यावर इतर मुलांच्या तुलनेत मोरोशी शाळेची मुले शिक्षणाच्या बाबतीत निवडून पडायची. हे सर्व श्रेय श्री.लांघी सरांना द्यावे लागेल.
मुलांना शैक्षणिक ज्ञानार्जनाचे काम करत असताना त्याने देखील पुढे बीएड व त्यानंतर एम एड केले. हे सर्व झाल्यावर पुढे त्यांना पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख या पदावर बढती मिळाली.या संधीचे श्री लांघी सरांनी सोने केले. त्यांची मुले आज मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
शैक्षणिक काम करत असताना श्री लांघी सर समाजातही लहान मोठी सामाजिक कार्य करत राहिले. त्यांना धार्मिक कामाची आवड असल्यामुळे तसेच त्यांना भजनाची देखील आवड असल्यामुळे त्यांच्या संकल्पनेतून व सोळशेवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने भजन स्पर्धांचे आयोजन केले गेले. या भजन स्पर्धा प्रत्येक वर्षी याप्रमाणे सलग दहा वर्ष आयोजित करण्यात येत होत्या.त्यामध्ये मोफत चष्मे वाटप, समाज उपयोगी वस्तूंचे वाटप, गावच्या सभा मंडपाचे काम अशी भरपूर कामे लांघी सरांच्या संकल्पनेतून व ग्रामस्थांच्या सहकार्याने केली गेली.
लांघी सर हे सढळ हाताने मदत करणारे सदृहस्थ आहेत. त्यांनी अनेकांना आर्थिक मदत देखील केली आहे. अनेकानी त्यांचे पैसे बुडवले. मदत केलेले लोक त्यांच्याशी कृतघ्नपणे वागले. एकदा त्यांनी ही सल मला बोलून दाखवली. परंतु त्यांच्याबद्दल त्यांनी एकही वाईट चकार शब्द काढला नाही.
परंतु जवळचे लोक परके झाले याबद्दल त्यांच्या मनात नेहमी एक प्रकारची सल राहिली. लोक असे का करतात? हे एक गुडच म्हणावे लागेल.
लांघी सरांचा स्वभाव अतिशय मितभाषी असल्यामुळे त्यांनी कधीही कुणाला आपण करीत असलेल्या कामाची माहिती दिली नाही. अथवा कधी कुणापाशी बोलले देखील नाहीत.एकदा सहजच त्यांच्याबरोबर गप्पा मारण्याचा योग आला.त्यावेळी त्यांच्याकडून ही माहिती मिळाली. समाजात असे अनेक लोक असतात.करतात थोडे परंतु देखावा मात्र अफलातून करतात. आणि जे प्रत्यक्ष काम करतात ते मात्र कुठेतरी सांदी कोपऱ्यात असतात. परंतु जे चांगले काम करतात परमेश्वर त्यांची नक्कीच दखल घेतो. हे मात्र तितकेच खरे... आज त्यांच्या सुविद्य पत्नी डेहणे गावच्या सरपंच आहेत. ही त्यांच्या कामाची पावतीच म्हणावी लागेल.
रामदास तळपे