ग्रामिण भागात पुर्वी आणि आताही अघुट या शब्दाला फार महत्त्व आहे.अघुट म्हणजे काय याचे महत्त्व नविन पिढीला समजणे अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळेच ग्रामिण भागातील संस्कृती तरूण पिढीला समजेल व त्याची माहिती होईल.
पुर्वी जुन महिन्याच्या पहिल्या आठवडयात आकाशात ढग जमायला लागायचे.तुरळक ठिकाणी विजा चमकायच्या सोसाटयाचा वारा वाहायचा व वळवाचा पाऊस पडायचा. आणि पावसाळ्याचे वेध लागायचे.
ग्रामिण भागातील सर्व शेतकरी बांधवांची एकच धावपळ उडायची. अनेक कामे समोर "आ " वासुन उभी राहायची. सर्वजण अघुट आली आता सगळी कामे उरकली पाहिजेत या एकाच विचारांनी हबकुन जायची. सर्व बायका पोरं उन्हाळ्यात रानात साठवुन ठेवलेल्या सरपणाच्या मोळ्या आणल्या जायच्या.प्रत्येक सरपणाचे कोयत्याने छोटे छोटे तुकडे केले जायचे. त्याला फाटी म्हणतात.फाटयांचे प्रत्येकाच्या घरासमोर ढिग लागायचे. पाच सहा फाटी एकत्र केली जायची त्याला कवळी असे म्हणतात.
लहानमुले या सरपणाच्या कवळ्या घरात ओटीवर नेऊन ठेवायची .घराच्या माळ्यावर कुणितरी मोठं माणुस किंवा स्त्री असते. तिच्या हातात एकजण सरपण द्यायला असतात माळ्यावरील व्यक्ती अगदी व्यवस्थित माळ्यावर सरपण रचुन ठेवते.
याच पध्दतीने गुरांना खाण्यासाठीचा पेंढा ,वाळलेले गवत याला "पयान"असाही शब्द आहे.चुल पेटवण्यासाठी गव-या व डवणा यांची माळ्यावर साठवणूक केली जाते..गोव-या साठवताना अनेकांना विंचू चावायचे. एकच आरडाओरडा व्हायचा.विंचु उतारणाराकडे पेशंट नेला जायचा.व एका झटक्यात खांद्यापर्यंत गेलेला विंचुचे विष जीथे विंचु चावला आहे तीथे येऊन फुणफुण करायचा.
तसेच धावत पळत जाऊन इतर कामे केली जायची.कारण पाऊस कधी कोसळेल काहीच शाश्वती नसते..याच वेळी शेतात कोणते भात (तांदळाची साळ)पेरायची याचे नियोजन केले जाते.
भाताचे अनेक प्रकार असतात. उदा. खडक्या, कोळंबा, रायभोग, कमवत्या (कमोद) जीर ,तांबडा रायभोग,तामकुडा असे अनेक अस्सल भाताचे वाण त्यावेळी प्रसिद्ध होते.या पैकी जसा जमिनीचा पोत तसी वाणाची निवड केली जाते.आता या पैकी बरेच वाण काळाच्या ओघात इतिहास जमा झाले.
एखादा मुहूर्त पाहुन भाताची पेर केली जाते.यासाठी संपुर्ण गावात सकाळपासून एकच लगबग सुरू असते. शेतात शेताची भाजणी केलेल्या ठिकाणी त्याला दाढ म्हणतात.भात पेरले जाते.त्याला रोमठा म्हणतात.त्यावर कुळव फिरवला म्हणजे झाली पेरणी.
अशा प्रकारे शेतीची कामे झाल्यावर संसारपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी पुर्वी आठवडा बाजाराच्या ठिकाणी प्रचंड झुंबड उडायची शेतकरी आपल्याकडे असणारा वाळलेला हिरडा ,मध तांदुळ व खुरासणी विकुन पावसाळ्यात चार महिने पुरेल असे मीठ मिरची कांदा लसुण बाजरी तेल मुलांना शाळेचा गणवेश,दप्तर, छत्री व पाठ्यपुस्तके वह्या व घरातील मोठ्या मानसांना घोंगडयांची मोठया प्रमाणात खरेदी केली जायची.आजही काही प्रमाणात हे चालू आहे.
पुर्वी गावाकडे गवताची घरे असायची त्याला केंबळाची किंवा कुहीटीची घरे असे म्हणतात.गुरांना बांधन्यासाठी जी जागा असते त्याला सोपा किंवा पडाळ म्हणतात. तर ही घरे व पडाळी विशिष्ट लांब गवतांनी शेकारली जायची.
प्रत्येक गावात घरे शाकारणारे दोन तीन जण असायचे त्यांना त्या काळी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जायचा. तर या केंबळांची घरे किंवा पडाळी कितीही मोठा पाऊस झाला तरी अजिबात गळायची नाहीत हे विशेष होते.
पावसाळ्यात शेतीची कामे करताना भिजुन जाऊ नये म्हणुन गावातील कारागीराकडुन मेसाच्या बांबुपासुन व पळसाच्या पानापासुन सुंदर इरणे तयार करण्यासाठी त्याच्या जवळ गर्दी व्हायची. तो त्याचे काम सराइतपणे करायचा व बाकीचे उगाचच गप्पा चघळत राहायाचे.
गुरे संभाळणारे गुराखी पाऊसाने भिजू नये व थंडी वाजू नये म्हणुन घोगडी व प्ल्यँस्टिक कागद यांचा घोंगता करण्यासाठी लोखंडी व तो सुटुन जाऊ नये यासाठी जाड तार वापरतात त्याला "तीळस " असे म्हणतात.तर ही तीळस अतिशय नक्षीदार बनवुन घेण्यासाठी ज्याला ती बनवता येते त्याला मस्का लावावा लागे.असा तो काळ होता,
उन्हाळ्यानंतर व पावसाळ्यापुर्वी म्हणजेच दिवसभर आकाशात ढग घोंगावतात.विजा चमकतात, ढग गडगडतात. काही ठिकाणी पाउस पडलेला असतो.काही ठिकाणी हिरवेगार गवत नुकतेच उगवत असते व शेतकरी माणसे व जनावरे यांच्या अन्न ,वस्र व निवा-याची पुढिल तीन चार महिन्यांची सोय करण्यासाठी जे या हंगामात कष्ट घेतो यालाच अघुट असे म्हणतात.