संजय नाईकरे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशान
माझा एक एक पुत्र जगी लाख जागी उभा
त्यांचं तेज केसरिया रवी न्याहाळितो आभा !
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारापाटी कमान या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक संजय नाईकरे यांच्या कवितांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आज अरण्यषष्ठीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. या प्रकाशन समारंभासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सांगली जिल्ह्यातील गुरुवर्य प्रा. भगवानराव यादव व मुंबई येथील ज्येष्ठ कवी रावसाहेब ठाणगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
चासकमान धरणाच्या जलाशयामध्ये बुडालेल्या कर्मवीर विद्यालय, वाडा या शाळेत सुमारे बेचाळीस वर्षांपूर्वी सेवेत असलेले प्रा. भगवान यादव हे संजय नाईकरे यांचे आवडते गुरुवर्य. गुरु शिष्याचे हे नाते काळाच्या प्रदीर्घ ओघातही कसे टिकवून ठेवता येते आहे.याची प्रचिती आभा या काव्यसंग्रहामध्ये अनुभवावयास मिळते.
अशाच चार गुरुजनांच्याबद्दलच्या कृतज्ञता पर कवितांचा ही या संग्रहात समावेश आहे. योगायोगाने आज या चार गुरुजनांचा वाढदिवस देखील होता. त्यानिमित्ताचे औचित्य साधून संजय नाईकरे यांनी आपल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले.
ज्येष्ठ कवीवर्य साहेबराव ठाणगे, सुप्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे व प्रा.भगवान यादव व अन्य बारा मान्यवरांनी मखमली कापडात गुलाब पाकळ्यांनी सुशोभित केलेल्या आभा काव्यसंग्रहाचे पंचायत समिती खेड येथील राजा शिवछत्रपती सभागृहामध्ये शानदार सोहळ्यात प्रकाशन केले.
यावेळी संजय नाईकरे यांनी चारशे वर्षांपूर्वीची लाकडी समई,शेत पेरणीची शंभर वर्षे जुन्या काळातील पाभारीची ज्वारी बाजरी हरभरा शेंगदाणा पिकांची वेगवेगळी लाकडी चाडी, शंभर वर्षे जुन्या काळातील बैलांच्या गळ्यातील अस्सल चामड्याच्या घुंगूरमाळा, बैलांच्या गळ्यातील कांस्य धातुचे साखळी गोफ आणि बाजरीच्या कणसांनी भरलेल्या हिरव्या ताटांची केलेली प्रतिकात्मक पूजा आणि सजावट हे आजच्या समारंभातील एक आगळं वेगळं आकर्षण वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
पीक पेरणी व पाऊस शेती यांवर आधारित कविता सादर करण्यासाठी राज्यभरातील सुमारे शंभर हून अधिक कवी व कवयित्री यांनी हजेरी लावली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.एक भाकरी तीन चुली चे प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांनी या काव्यसंग्रहाला अभिप्राय दिला असून डॉ राजेश बनकर यांनी शुभसंदेश दिला आहे.
आदर्श शिक्षिका वैशाली मुके यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.तर मुखपृठ संकल्पना विश्वराज नाईकरे यांनी साकारली आहे.संजय नाईकरे यांच्या 'आभा' आणि 'नवं पीक नवी आशा' या कवितांनी सभागृह जिंकून घेतले. गुरू म्हणून जे भाग्य मला ईश्वराने दिले, लक्ष लक्ष कोंदणाचे आज अर्पितो चांदणे दिव्य प्रभावळ कवितेतील ओळींना ही सभागृहाने भरभरून प्रतिसाद दिला.
अमेरिकेतील फ्लोरिडा,टेक्सास आणि ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातून या पुस्तकाला शंभराहून अधिक प्रतींची प्रकाशन पूर्व मागणी आलेली आहे या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे,आमचा दादा लाखात एक व देवमाणूस या लोकप्रिय मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते दत्ता उबाळे अविनाश कोहिणकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी लक्ष्मण वाळुंज (काहूर कार), तुषार वाटेकर (सभापती),नंदकुमार मांदळे(कवी) तुकाराम बोंबले राजेंद्र सांडभोर), भाऊराव आढाव (कवी),सदाशिव अमराळे (पत्रकार) बी के कदम (माजी पंचायत समिती सदस्य),प्रतिभा जोशी (पिंपरी चिंचवड),बाबासाहेब गायकवाड कवी, मधुकर गिलबिले लेखक व ग्रामीण संस्कृती चे सिद्धहस्त लेखक रामदास तळपे आणि मोठ्या संख्येने रसिक राजगुरुनगरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संतोष गाढवे यांनी केले तर स्नेहल भोर यांनी प्रभावी सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची उंची वाढवली.कवी बाबाजी शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.