धर्माबुवा तळपे म्हणजे जुन्या काळातील भजनसम्राट. जबरदस्त दैवी आवाज व तितकेच हार्मोनिअमची मधुर सुरावट. धर्माबुवांना ओळखत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.
धर्माबुवा तळपे हे माझे चुलत चुलते. त्यांचे वडील माझे चुलत अजोबा कै.बुधाजी तळपे हे एक अष्टपैलू,शांत व अतिशय संयमी आणि लोकांच्या मदतीला धाऊन जाणारं व्यक्तिमत्व होते. त्यांना धार्मिक कार्याची आवड होती.श्रावण महिन्यात लोक नवनाथ, रामविजय, हरिविजय असे ग्रंथ (अध्याय) लावायचे. हे अध्याय प्राकृत भाषेत ओविबध्द असत. ह्या अध्यायांचे मराठीत अचूक वर्णन बुधाजी तळपे करायचे.
शिवाय गावाच्या तमाशात काम करायचे. जाते,पाटे व वरवंटे टाकणे, घराची दगडी जोती घडवणे, सुतारकाम, वनदेवाची पूजाअर्चा अशी सर्व कामे करायचे.
शिरगाव व मंदोशी गावाच्या खिंडीतील जानका देवीचे मंदिर हे बुधाजी व त्यांचे बंधू ठकू तळपे यांनी बांधले आहे. यावरून त्यांच्या कार्याची प्रचीती येते.
त्यावेळी गावात एकविचार असायचा. सर्व गाव एकविचाराने रहायचा. सर्वजनिक निर्णय घेतले जायचे.
त्यावेळी गावचा तमाशा होता. त्यात एक उणीव होती. तमाशात पेटी वाजावणारा कुणी नव्हता. जेष्ठ गाव कारभारी विष्णु हुरसळे यांनी गावाच्या वतीने बुधाजी तळपे यांना गळ घातली.
बुधा तात्या तुझ्या मुलाला, धर्माला पेटी वाजायला शिकबू. पेटी शिकवायचा खर्च गाव करील.
बुधा तळपे यांनी तात्काळ या गोष्टीला संमती दिली.अशा प्रकारे धर्माबुवांचा पेटी शिकण्याचा मार्ग मोकळा झाला.
खास पेटी शिकवण्यासाठी सावळा खांडी ता.मावळ येथून पेटीमास्तर बोलावला. वर्षभरात त्याने सुरावटीचे सर्व ज्ञान धर्माबुवानां दिले. पेटीमास्तरची एक वर्षांची फी गावाने वर्गणी काढून भरली.
त्यावेळी पेटीमास्तरला खूप मानसन्मान व प्रतिष्ठा होती. पायपेटीची क्रेझ होती. सन 1974 साली गावाने वर्गणी काढून रुपये 5000/- जमवले. हे पैसे तमाशा सम्राट कै.शंकरराव कोकाटे यांना देऊन त्यांच्याकडून सेकंड हँड पायपेटी विकत घेतली.
अप्रतिम सुरावट, पातळ किनार असलेला परंतु पहाडी आवाज यामुळे अल्पावधीत धर्माबुवांचे नाव सर्वत्र दुम्दुमु लागले. अतिशय स्वच्छ असे पांढरेशुभ्र धोतर, पैरण, टोपी व गळ्यात असलेली मफलर असा स्वच्छ व रुबाबदार वेशातील धर्माबुवा अजूनच भारदस्त वाटायचे.
परंतु दुर्दैव असे की लवकरच तमाशा बंद पडला. पेटी वाजवणे आपसूक बंद पडले. अधून मधून कधीतरी पेटी उघडून साफ सूफ करुन भाता हालऊन काळ्या, पांढऱ्या सुरांची छेडछाड करायची.आणि पेटी ठेऊन द्यायची. एवढंच काम उरलं.
काही दिवसांनी पावसाळ्यातील दमट हवामना मूळे व पेटी न वाजावल्यामूळे पेटीमधील लाकूड फुगले. नंतर पेटीचा भाता कामातून गेला.
प्रयत्न करूनही सुंदर सुरावट असलेली पायपेटी वाजेचना. शेवटी ही पायपेटी नामशेष झाली. याचे सर्वात जास्त दुःख धर्माबुवांना झाले. अनेक वेळा त्यांनी ही पायपेटी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कधीच यश आले नाही. पायपेटी दुरुस्त करायला न्यावी तर येणारा खर्च कोण करणार? गावानेही दुर्लक्ष केले.
गावात नेहमीच भजने होत. धर्माबुवा देखील भजनाला असत. परंतु पेटी नसल्यामूळे भजनला काही रंगत येत नसे. याची नेहमीच त्यांना हुरहूर वाटे. धर्माबुवांची ही खिन्नता त्यांचे जावई भिकाजी गवारी साहेब यांनी अचूक ओळखली. ते तेव्हा बारामतीला दुग्धविभागात नोकरी करत होते. त्यांनी तिकडून अतिशय सुंदर व कर्णमधुर अशी हार्मोनियम (पेटी) आणून त्यांच्या हवाली केली.
ज्यावेळी ही पेटी वाजवायला सुरू केली तेव्हा मी स्वतः तेथे हजर होतो. अतिशय सुंदर सुरावट व त्यात धर्माबुवाचा गोड आवाज साखर जशी दुधात विरघळते तसा पेटीच्या सुरात एक झाला आणि ते संगीत ऐकून मी मंत्रमुग्ध झालो.
गावात एक जुना तबला होता. मी त्याला नवीन पान बसवून दुरुस्त करून आणला. श्री.दिगाबर उगले यांच्याकडे डग्गा होताच.
अल्पावधीत मंदोशी गावचे भजन उदयास आले. श्री.धर्मा तळपे (हार्मोनियम), श्री. दिगंबर उगले व कै.बाळू सुतार (तबला व डग्गा) कै.विष्णू पांडू तळपे (चकवा) कै.मारुती जढर (टाळ) श्री.देवराम कृष्णा तळपे (घुन्गुर काठी) हौसाबाई, देवईबाई, गंगूबाई तळपे या सर्वांच्या साथीने अल्पावधीत नामांकित भजन झाले.
हे भजन पुढे प्रचंड लोकप्रिय झाले. गणपती व नवरात्री आणि यात्रा सीझनमध्ये तर एवढी मागणी वाढली की हे भजन सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तीनही शिफ्ट मध्ये चालू असायचे. या भजनाने गावचे नाव यशो शिखरावर नेले.
याचवेळी मंदोशी शाळेचे भजन सुध्दा उदयास येत होते. तेथेही धर्माबुवांनी मुलांकडून सर्व तयारी करुन घेतली. व याच शाळेच्या भजनाचा तालुका व जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक आला. याचे संपूर्ण श्रेय धर्माबुवांना द्यावे लागेल.
धर्माबुवांचे अलंका पुरी s s s पुण्य भूमी पवित्र....
ऐकून अंगावर रोमांच उभे राहत.
त्यांच्या भजनातील काही अभंग व गवळणी अजूनही मला जसेच्या तशा आठवतात.
रूप पहाता लोचनी,
धरिला पंढरीचा चोर,
येइ शामसुंदरा
पंढरीचा विट्ठल कुणी पहिला
जय जय शंभू तू महादेवा
हरी जय जय राम जय जय राम,
इंद्र पडली भगा, चंद्र झाला काळा,
पांडुरंग उभा वाळबंटी,
नंदाच्या हरिने बाई रस्ता बंद केला,
डोळे मोडीत राधा चाले,
हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा,
कृष्णा मजकडे पाहू नको रे,
नको वाजवू श्रीहरी मुरली रे,
तुझ्या मुरलीने कौतुक केले,
गाया चरितो पेंद्या वनाला
असे कितीतरी अभंग व गवळणी धर्मा बुवानी आपल्या मधुर वाणीने व पेटीच्या अफलातून सुरावटीने अजरामर केले. आजही कधी या अभंग किंवा गौळणी आठवल्या की गुणगुणल्या शिवाय मन शांत होत नाही. ही केवळ धर्माबुवांची कृपाच म्हणावी लागेल.
अशा या कलेच्या क्षेत्रात अजरामर ठसा उमटवलेल्या धर्मा बुवांचा गावाने यथोचित असा सत्कार करुन त्यांच्या कलेच्या ऋणातून मुक्त झाले पाहिजे. असे नेहमीच वाटते.
आज धर्माबुवा वयोवृद्ध झाले आहेत. त्याना ऐकायला येत नाही.यात्रेला गावाने नामांकित भजन आणले होते. हे भजन संपे पर्यंत ऐकायला येत नसताना देखील धर्माबुवा तेथे बसून होते.या वरून त्यांची संगीत साधना कळून येते.
आंबेगाव, खेड व मावळ तालुक्यात जुने लोक त्याना पेटीमास्तर या नावानेच ओळखतात. अजूनही त्यांच्या भजनाचा विषय निघाला की लोक भरभरून बोलतात. त्यांचे कौतुक करतात. असा पेटीमास्तर पुन्हा होणार नाही असे बोलतात.
त्यांच्याकडून मी व माझा चुलत भाऊ, त्यांचा मुलगा कै.मारुती आम्ही दोघांनी पेटी शिकण्याचा खुप प्रयत्न केला. परंतु त्यांच्या कडक स्वभावामूळे आम्हाला ते शक्य झाले नाही.
आता धर्माबुवांचे वय 83 च्या पुढे गेले आहे. त्यांना ऐकायला येत नाही. तरीही गावात यात्रेनिमित्त आम्ही नामांकित भजने आणतो, त्यावेळी धर्मबुवा हे ऐकायला येत नसूनही तेथे बसून असतात. यावरून त्यांची भजनावरील निष्ठा कळून येते.
रामदास तळपे