मुलगी पाहण्याचा कार्यक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुलगी पाहण्याचा कार्यक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम


माझ्या काकाला मुलगी पाहायला आम्ही दोघेच सुरुवातीला गेलो होतो. पण जाताना आजीने व आईने सांगितले होते. काकी व्यवस्थित पहा बरं. कशी आहे. काय आहे. घर कसंय. माणसं कशीय. सारं निट पहा बरं.

काका आणि मी स्प्लेंडरवरून जात असतानाच वाटेत अवकाळी पाऊस लागला. एका टपरीवजा हॉटेलात आश्रय मिळाला. एक बेवडा तिथेच दारू ढोसत होता.आम्ही दुर्लक्ष केले. काकांनी विचारले " चहा घ्यायचा का"? मीही हो म्हणालो.

त्या बेवड्याने जरासं पुढं जात कोपऱ्यावर लघुशंका केली. ते हॉटेल चालवणारी महिला. दुसरीकडे तोंड करत शिव्या देऊ लागली. याचा राग येऊन बेवडा तिच्या अंगावर धावून आला. पण त्याच्या हाताचा धक्का मला लागल्याने चहा सांडला. काकाला राग आला पण नविन गाव असल्याने तोंडातल्या शिव्या गिळून व रागाने उगारलेला हात खाली घेऊन. "अहो काका जरा नीट चाला की चहा सांडला ना पोराचा"!

पण त्या बेवड्यानं उलट काकांनाही शिव्या द्यायला चालू केल्या. काकांनी इकडे तिकडे पाहिले. त्या बाईनेही मुकसंमती देत खुणावले. मग काय पहलवान काकानं चांगलाच बडवला. पण त्यात त्या बिचाऱ्याचा दात मात्र पडला.

त्या बेवड्याच्या तोंडाला रक्त येत आहे हे पाहूनच मी घाबरलो. जवळच एक दात पडलेला दिसला. पण त्याच्या तोंडातली तर वरच्या दातांची अख्खी फळीच गायब होती. म्हणजे बाकीचे दात घशात गेले की काय ? असे वाटल्याने मी त्या बाईला म्हटलं " आजी इथं एकच दात आहे. पण बाबांचे तर चार दात गायब आहेत ? "ते व्हय ते मागल्या बारीला पाडलेत एक जणानं असेच."

गर्दी व्हायच्या आत आम्ही तिथून पळ काढला.

नाव व पत्ता विचारत विचारत शेवटी मुलीच्या घरी आलो. घरी कुणीच दिसत नव्हतं. दारात एक नांदुर्गीच झाड होतं. त्या झाडाखालीच एक खुप थकलेली म्हातारी बसली होती. बहुतेक तिला ऐकायला आणि दिसायला पण कमी येत होतं.

"घरी कुणी नाही का आजी?" पण आजीला रेंज काय मिळेना.

शेवटी दाराचा आवाज आला. तो मोठा वाडा होता. त्या आवाजामुळे आम्ही सावध झालो. काकांनी घरी कोणी आहे का ? हे विचारलं.

परकर पोलक्यातली मुलगी बहुतेक शेणानं सारवत होती. काहीसं केसांनाही शेण लागलं होतं.

तिनं काकांना विचारलं "कोण हवंय तुम्हाला?"

तिच्या प्रश्नानं काकाच गोंधळून गेले. " ते...ते... आम्ही मंदोशी वरून आलोत"

हं मग .. मंदोशी.. अय्या मंदोशी म्हणत तिनं खाडकन दरवाजा लावून घेतला.

आम्हाला कांहीच समजले नाही. आम्ही तसेच दारात उभे होतो. बहुतेक त्या वाडयाला दुसराही एक दरवाजा होता. जो पाठीमागच्या बाजूला होता.जो त्यांच्या शेतात जायचा शेतही वाडयाजवळच होते.

क्षणात तिने जत्राच भरवली. शेतात काम करणारी मजुर पण आम्हाला बघायला आली. या की या... काय खबर नाय कळीवलं नाय.. आसं अचानक यायचं आस्तं व्हय वं पावणं.

त्यांनी बसायला घोंगडी अंथरली. मी आणि काका घोंगडीवर बसलो. त्या माणसांनी चहुबाजूंनी आम्हाला घेरलं होतं. मला तर स्वतःला जंगलात असून जंगली लोकांनी आम्हाला चहुबाजूंनी घेरल्यासारखंच वाटायला लागले. आणि जोराचा ओरडलो " काका वाचवा !

याला असं काय झालं म्हणून सगळे पुन्हा माझ्याकडे पाहू लागले. काय नाही.. काय नाही... टि.व्ही जास्त बघतो ना आणि त्यातल्या त्यात भुताच्या मालिका बघायची हौस. त्यामुळे सगळीकडे त्याला....

असं असं... टिव्ही लावायची का बाळा. वय गं काके लाव. ये थांबय चिवे मी लावणारे. म्हणत जि.प. शाळेच्या गणवेशात भांडणारे बहिण भावंडं. काकीनं म्हणजेच आमच्या काकांच्या सासूबाईनं धपाटं देऊन दोघे पळविली.

बारका टिव्ही टिपावर ठेवला होता. त्याखाली पोत्याला पोतं शिवून टिप झाकला होता. टिव्ही चालू केला Black and White खरखर आवाज करत होता.

कुणीतरी आठवण करून दिली " ये आंटीना हालीव रं म्हादया"

म्हाद्या आधीच अँटीनाच्या पोलवर चढला होता. आणि अँटीना हलवत " आलंय का चितार म्हणत ओरडत होता.

नाही... नाही... आलं... गेलं....नाही... नाही... आलं... गेलं.... आलं आलं आलं... असं लहानगी पोरं ताला सुरात ओरडत होती. मीही त्यांच्यात सामिल होऊन योगदान दिले होते. हळूहळू मीही मिसळून गेलो.

कांही चित्र दिसते ना दिसते तोच लाईटच गेली. सारे प्रयत्न निष्फळ ठरले.

मुलगी नविन धुतलेला ड्रेस घालून आली. मध्येच कुणीतरी म्हातारी म्हणते " आगं तायडे साडी घालाव लागती वं... ?

ये आजे नाय माझ्याकं साडी.. आन मला नाय आवडत साडी घालाया... 

तु उठ बर हितून पईली.. जा तुज्या घरी.... ढंगरी.?

आता काका आणि मी चांगलेच घाबरलो.

ये तायडे आसं म्हणत नसत्याती, म्हाताऱ्या माणसास्नी... पिकलं पान हाय !

आजी बिनलाज्यावानी आमच्याकडे बघून हसती.

ती नवरी मुलगी म्हणते - " हयॅ ह्यॅ म्हणं पिकलं पान... गळून बी पडना एकदाचं...!

आता आजी थयाथया करू लागली. नवरीच्याच आईनं व शेजारच्या बाईनं आजीची समजूत काढत बाहेर नेलं.

बाहेरच्या नादुर्गीच्या झाडाखालच्या म्हातारी जवळ आजीला बसवलं.

समजावणीच्या सुरात नवरीची आई आजीला म्हणते " तुमी बी अत्याबाय पोरीच्या नादी लागतयासा अजून कळती नाय ती.

काय गं पारे म्हण... कळती नाय आज लगीन केलं तर वरसात पोरं व्हत्याल की, आन मग कळती नाय! लय ऐकूनी घेतलं मी बी. अं लय नगं तोरा दावू. असंच व्हतं. बग असलाच म्हातारडा नवरा भेटंन. सराप हाय मपल्या म्हातारीचा.'

काय बाय करावं अत्याबायला आवं आसलं वंगाळ नगा बोलू वं... पावणं आल्यात दारात ते काय म्हणतली...

आल्यात म्हंजी काय म्या आमंतरण दिलं व्हतं वय यायचं.. त्यांच ती आल्याती... त्यांचं ती जात्याली.

दुर्लक्ष करून नवरीच्या आईनं आजीला बाहेर सोडलं.

आणि वाड्याचं दार लावून आमच्या समोर येऊन बसली. काकांला दबक्या आवाजात म्हणाली "चकारली मातारी, खुळ बसलंया.. मातारपणात नवरा गेला... ल्योक गेला. आमीच संभाळतो तिला. काय वं लागतंया माताऱ्या माणसाला. कोरभर भाकर तुकडा तर आपुन कुतऱ्यालाबी टाकतूया.

माणसाला दिला तर तेवढंच पुण्य लागतंया.. लै बाय बेकार अस्तो मातारपणाचा जल्म. देव लवकर बी नेत नाय वं असल्याला. तरणीबांड जवान माणसांनाच काय व्हया लागलं की ती मरत्याती कायनु बायनू कारनांनी.. आन ही आसली आमच्या मढ्यावर सोडत्याती.

तिचा एकटीचाच पट्टा चालू व्हता. तेवढयात मोठ्ठा कर्कश आवाज झाला. सगळेच दचकून गेले. लाईट आली होती. व टिव्हीला मुंग्या आल्याने आवाज येत होता.

काकानं मुलगी पाहिली त्यांना पसंदही पडली. ते दोघंही बराचवेळ एकमेकांना चोरून बघायचे. मी खिशातल्या डायरीत माझं लिखानकाम करत होतो.

जेवणं झाली. बेसन वड्या. दही ताक वाढताना नवरीची आई पुन्हा म्हणाल्या " आदी कळवली असतं तर मटान केलं असतं.

आमची जेवणं झाली. "तायडे, पावण्याला हात पुसाय दी की"

पण लाजाळू काकानं नाही राहूद्या घेतो. म्हणत बसूनच पाठीमागचा टॉवेल ओढला. आणि जेवढया घरातल्या होत्या  नव्हत्या तेवढ्या गुंडाळून कोंबून ठेवण्यात आलेल्या साड्या  त्याच्या अंगावर. खरकाट्या ताटात एकूणच वाड्याभर पसरल्या.

सारवासारव करीत पुन्हा म्हणाल्या " आमच्या तायडीला गोदडी शिवायचा लई नाद हाय" बसून म्हणून काय ऱ्हात नाही.. काय बाय करतच असती.

निघण्याची वेळ आली. पण माझं लिखाण काम चालूच व्हतं. काका म्हणाले - " काय रं राम काय लिहतोस मगापास्न"

काय नाही. तुम्हाला नाही दाखवणार.''

माझं निरीक्षण चालूच होतं आणि टिप्पणही मी माझ्या डायरीत नोंदवत होतो. भिंतीवरती फॅमिली फोटो लावलेला होता. त्यात नवरी मुलगी तिच्या दोन वेण्या आणि गावकडची लहान मुलांना बोटभर डोळयाला काजळ लावायची पद्धत. मी काकाला म्हणालो " काका ती नवरी आहे काय ?"

नवरीचीच आई मध्ये बोलली " व्हय बाळा तुझ्या एवढी व्हती ना तवा जत्रात काढला व्हता फोटू. मी तायडी आणि तायडीचा बाप. येईलच एवढयात फाट्यावर गेला आसंल मुतारा ढोसायला."

आणि मग माझं आणि काकांचं दोघांचंबी एकाचवेळी लक्ष गेलं फोटोकडे.

अरे हा तर मघाचाच " बेवडा "

तेवढयात कानावर आवाज आला. ये म्हातारे झाडाखली काय बसलीस.

आजी - तुहया पोरीनं हाकलून लावलंय मला. सजनीनं.... नवरा कराय निघालीय झिप्री...

कुठाय ती... तायडे S S S

तायडी म्हणजेच नवरीनं दार उघडले. तो बेवडा आत आला.

दार लावून काय बसलीस माझ्या आजीला बाहेर काढून... तुझ्या मायला तुझ्या...

खरकाटी भांडी न्हाणीत ठेवत झटकन तीची आई मध्ये येत म्हणते "आवं आवं असं पोरीला मारू नगासा' पाव्हण्यापुढं ग्वांड दिसतं का ते...

पाव्हणं .... कुठाय पाव्हणं....

सगळी आम्हाला शोधत होती... आणि आम्ही खुष्कीच्या मार्गाने म्हणजे वाड्याच्या मागच्या दारानं वावरा वावरानं पळत होतो.

कसंबसं घरी आलो. संध्याकाळी घरचे सर्वजण जेवायला बसलो होतो. आमचं खटल्याचं घर वडिल धरून पाचजण भावंडाचं. त्यांची मुलं म्हणजे कसा भरलेला वाडा.

सर्वात लहान चुलताच लग्नाचा राहिल्याने सगळी धावपळ होती. शोधाशोध होती.

आजीनं मला विचारलं . " मग राम कशीय नवीन काकू.. मी छान म्हटलं. "

घर कसंय - वाडा हाय मोठ्ठा एवढा दोन्ही हातानं दाखवत.

आत कसाय रं वाडा. मग मी जेवता जेवता उठलो. खिशातली डायरी काढली अन् वाचू लागलो.

दारात नांदुर्गीचं झाड त्याखाली म्हातारी

सतरा कोंबड्या

37 पिल्लं

एक रेडकू

5 कुत्र्याची पिल्लं

दोन गाई

दोन बैलजोडी

घरात टिप

टिपावर पोत्यांचं कव्हर

बारका ONIDA TV

जुना फॅन

कपाट

03 पितळी ताटं

0 4 जर्मन ताटं

मोठा स्टिलचा तांब्या

चेंबलेला जग

धान्याची दीड पोती

1 घोंगडी

वाड्याभर चिंध्या

2 पातेली

तेवढयात काकांनी डायरी हिसकावून घेतली. हे ल्हेत व्हतास व्हय रं.

आता तुम्हीच सांगा एखाद स्थळ (बायको) बघायला गेल्यावर काय काय गोष्टी करायच्या.


सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस