आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले

थोर क्रांतिकारक होनाजी केंगले यांचा जन्म १८३५ साली जांभोरी ता.आंबेगांव जि.पुणे येथै भरपुर शेतीभाती व दुधदुभते असलेल्या सधन अशा कुटुंबात झाला.

घरी दुधदुभते असल्यामुळे होनाजीचे शरिर चांगलेच मजबुत व पिळदार होते.त्यांनी खेड,आंबेगांव, जुन्नर व अकोले भागात अनेक नामांकित कुस्त्या केल्या होत्या. 

त्यामुळे होनाजीचे नाव सगळीकडेच चांगलेच दुमदुमत होते. आणि याचाच रोष त्यांच्या चुलतभावांना होता.

त्यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी सावकारांनी बळकावल्या होत्या. सावकार आदिवासी समाजावर प्रचंड जुलूम जबरदस्ती करत होते.

होनाजीच्या चुलत भावांनी खोट्या गुन्ह्याखाली होनाजीला अटक करायला भाग पाडले. आणि होनाजींच्या मनात तेथेच अन्यायाविरूद्ध लढण्याचे बीज रोवले गेले.

सन १८५६ साली भयानक असा दुष्काळ पडला होता. लोकांनी वेळेवर पेरण्या करूनही पाऊस वेळेवर पडला नाही. सुरूवातीला पावसाचे वातावरण तयार व्हायचे. 

आकाशात काळे ढग जमायचे. आता थोड्याच वेळात जोरदार पाऊस होणार असे वाटायचे. परंतू थोड्याच वेळात भ्रमनिरास व्हायचा. आभाळातील ढग विरळ व्हायचे. पाऊस काही पडायचा नाही. जुन गेला जुलै महिना संपायला आला. परंतू पावसाचा एक टिपुस देखील पडला नाही.

आँगाष्ट महिन्यात तर चक्क कडक ऊन पडू लागले. दिवसामागून दिवस जात होते. पाऊस काही पडत नव्हता. घरातील अन्नधान्य केव्हाच संपले होते. चारापाणी नसल्यामुळे जनावरांनी केव्हाच माना टाकल्या होत्या.

त्यावेळी इंग्रजांचे राज्य असल्यामुळे माणसे जगवण्यासाठी ज्या काही उपाययोजना सरकार करत होते. त्या अत्यंत तुटपुंज्या होत्या.

दुर अरण्यात, रानावनात व डोंगरद-यामध्ये राहणाऱ्या आदिवासी महादेव कोळी, ठाकर समाजाच्या लोकांकडे सरकारचे साफ दुर्लक्ष होते.

गुरे ढोरे तर केव्हाच पशुपक्ष्यांच्या भक्षस्थानी पडली होती. लोक आपल्या कुटुंबाचा जीव मोठ्या मुश्कीलीने जगवत होते.

सुरूवातीला लोक भाताच्या कोंड्यात पिठ घालून भाकरी करून आपल्या कडील धान्य पुरवत. परंतू काही दिवसांनी घरातील धान्य देखील संपले. उपासमार होऊ लागली. लोक जंगलातील कंदमुळे, झाडाची पाने खाऊन दिवस ढकलू लागली. अनेक लहानमुले,म्हातारी माणसे भुकेमुळे मेली.

आदिवासी समाजापुढे कुटुंबातील माणसे जगतील कशी हा मुख्य प्रश्न होता. मुलाबाळांचे उपासमारीमुळे होणारे हाल लोकांना उघड्या डोळ्यांनी पहावत नव्हते. त्यामुळे अनेक लोकांनी आपल्या जमिनी आंबेगांव, घोडेगाव, जुन्नर, राजुर येथील सधन असलेल्या मारवाडी, गुजर, मुसलमान, तेली, ब्राम्हण आणि लिंगायत यांचेकडे गहाण ठेवुन त्याबदल्यात काही पैसे घेऊन धनधान्य खरेदी केले.

ते धान्य काही दिवसच पुरले.नंतर पुन्हा उपासमार सुरू झाली.

उन्हाळा सुरू झाला. जंगलातील अनेक आंब्यांच्या झाडांना मोहर आला. लोकांच्या जगण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. लोक आंबे, करवंदे, आवळे व जांभळे खाऊन आपली भुक भागवू लागली व आजचे मरण उद्यावर ढकलू लागले.

थोड्याच दिवसात जुन महिना सुरू झाला.आकाशात ढग जमू लागले. व नियमित पाऊस पडू लागला.

शेतक-यांना जमीन गहान ठेऊन घेतलेल्या सावकांरानी बी बियाणे दिले.

या वर्षी खुप पाऊस पडला शेते पीकांनी तरारून गेली. शेतकरी खुश झाला.

परंतू पिके निघताच सावकारांच्या झुंडीच्या झुंडी गावागावात येऊन पिकलेले धान्य घेऊन जाऊ लागले. हाता तोंडचा घास सावकारांनी नेला. शिवाय २०० ते ३०० पट कर्जाचे व्याज शेतकऱ्यांच्या माथी मारले.

दरवर्षी सावकार धनधान्य, हिरडा, डिंक, गवताच्या पेंढ्या व फळे घेऊन जाऊ लागले. तरीही त्यांचे कर्ज फिटत नव्हते.

काही दिवसांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीनी सावकांरानी स्वतःच्या नावावर करून घेतल्या. अशा प्रकारे आपल्याच शेतामध्ये आपल्यावरच मजूर म्हणून काम करण्याची नामुष्की आदिवासी व इतर शेतक-यांवर आली होती. या पेक्षा दुष्काळ बरा असे लोक म्हणू लागले.

कष्ट करणारा एक आणि त्याच्या कष्टावर फुकट जगनारा दुसरा असा नवा वर्ग निर्माण झाला. या दुष्टचक्रात सापडल्या मुळे महादेव कोळी जमातीचे दिवसेंदिवस हाल वाढत गेले. 

हा सर्व प्रकार ह्दय पिळवटुन टाकनारा होता. हा आत्याचार हा जुलुम संपुर्ण आदिवासी समाज मोठ्या जुलुमाने सहन करत होता.

हा अत्याचार हा जुलुम होनाजीला सहन होईना. आता सावकारांविरूद्ध काहीतरी करायला हवे. असे होनाजी लोकांना बोलू लागले.

आणि अशातच होनाजीच्या चुलत भावांनी हा सर्व प्रकार जुन्नर येथे जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन सांगीतले. आणि होनाजीला खोट्या गुन्ह्याखाली अटक करायला भाग पाडले. होनाजींच्या मनात तेथेच अन्यायाविरूद्ध लढण्याचे बीज रोवले गेले.

यातुनच क्रांतीची ज्वाला भडकली ती होनाजी केंगले यांच्यात. त्यांना हा तोंड दाबुन बुक्यांचा मार सहन होईना.

होनाजींनी आजुबाजूचे तरूण गोळा केले. त्यांच्यामध्ये क्रांतीची ठिणगी पेटवली. आणि याच ठिणगीचे पुढे मशालीमध्ये रूपांतर झाले.

लोक होनाजीच्या नेतृत्वाखाली बंडामध्ये सामील झाले. समाज यांना 'बंडकरी' म्हणुन ओळखु लागला.

होनाजी आणि त्यांच्या सहका-यांनी प्रथमतः सावकारांच्या वाड्यांवर रात्री हल्ला करून त्यांच्या ताब्यातील बळकावलेल्या जमीनींचे दस्त ताब्यात घेतले. व मिळेल तशी लुट करू लागले. नंतर हे सर्व बळकावलेल्या आदिवासी समाजाच्या जमीनींचे दस्त अक्षरशः जाळून टाकले. मिळालेल्या लुटीतुन बंदुका व दारूगोळा खरेदी केला. व उर्वरीत लुटीतील पैसे गोरगरीब लोकांना वाटू लागले.

होनाजी केंगले यांनी सावकारांच्या कृष्णकृत्याविरूद्ध लोकजागृतीचे हे लोण त्यांनी भिमाशंकर पासुन शिरूर पर्यंत, खेड, आंबेगाव, जुन्नर घोटी, इगतपुरी, राजुर, नाशिकचा काही भाग, कोकणचा कर्जत, खांडस, सरळगाव, टोकावडे, मुरबाड पर्यंत पसरवले. व बंडाचे निशाण फडकवले.

त्यांचे नाव सगळीकडे दुमदुमू लागले. 

याच वेळी इंग्रजाविरूद्ध प्रसिद्ध असा १८५७ चा राष्ट्रीय ऊठाव सुरू झाला होता. देश इंग्रजांविरूद्ध पेटुन उठला होता. 

या उठावामध्ये होनाजीने उडी घेतली. हा उठाव दुर्दैवाने अयशस्वी झाला. अनेक स्वातंत्र्यवीरांना अटक झाली. १० मार्च १८५८ रोजी होनाजीला पकडण्यात आले. होनाजीला अतीदुर अशा अंदमानातील तुरूंगात ठेवले. होनाजीला पुढे १० वर्षाची सक्त मजुरीची काळ्यापाण्याची शिक्षा झाली.

दहा वर्षाची शिक्षा भोगल्यावर एप्रिल १८६८ रोजी होनाजी पुन्हा गावी जांभोरीला आले. गावी आल्यावर सर्वांना आनंद झाला. होनाजी गेल्यावर सुद्धा सावकांराविरूद्ध लढा मंदगतीने का होईना चालूच होता.

होनाजीने पुढे या लढ्याची सुत्रे हाती घेतली. आणि सावकारांविरूद्धचा लढा अधिक तिव्र केला.

होनाजी आणि त्यांच्या सहका-यांनी अहमदनगर, नाशिक, जुन्नर, आंबेगांव, घोडेगाव, ओतुर, येथे छापे टाकले व प्रचंड लुट केली. अत्याचार करणाऱ्या सावकारांची तलावारींनी नाके कापुन त्यांची घरेदारे पेटवुन दिली.

त्यांच्या या भितीने सावकांरानी इंग्रज सरकारचा आश्रय घेतला. होनाजी केंगले व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी सरकारी कुमुक मागवली गेली.

ब्रिटिश सरकारने होन्या भागोजी केंगले मृत किंवा जिवंत पकडण्यासाठी १०,०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्याचे पोस्टर्स मोस्ट वॉन्टेड म्हणून ठिकठिकाणी लावले. आणि त्यांच्या बंडातील इतरांना २०० ते ६०० रुपयांचे इनाम लावले.

पण याचा काहीही परिणाम झाला नाही.

म्हणून १८७४ मध्ये ब्रिटिश सरकारने होनाजीच्या अटकेसाठी कर्नल स्कॉट आणि मिस्टर डब्ल्यूएफ सिंक्लेअरसीएस यांच्या नेतृत्वाखाली १७५ सशस्त्र विशेष पोलिस दल तैनात केले. परंतु विशेष पोलिस दल देखील अयशस्वी झाले. होनाजी त्यांच्या टोळीसह निसटले.

होनाजी कोकणातील नांदगाव येथे येत असल्याची पक्की खबर मेजर एच. डँनियलला मिळाली.

होनाजीना पकडायचे असेल तर फितुरीनेच पकडले पाहिजे हे मेजर डँनियलने ओळखले. आणि त्याने त्याचे काही साध्या वेशातील हेर नांदगावला पाठवले. दिमतीला सैन्य व फौजफाटा होताच.

होनाजी ज्यांच्या घरी जातात त्यांच्या घरातील जनाबाई मेंगाळ नावाच्या स्रीला पैशाचे अमिश दाखवून फितुर केले.

जवळजवळ तीन आठवड्यांनी होनाजी नांदगाव येथे मेंगाळ यांच्या घरी आले. आणि लगेचच ही बातमी जनाबाईने हेरगीरीवर असणाऱ्याला सांगीतली. थोड्याच वेळात तेथील मेंगाळाच्या घराला पोलीसांनी वेढा घातला. व १५ आँगष्ट १८७६ साली नांदगाव येथे होनाजीला पकडण्यात आले.

दुसऱ्या दिवशी ही बातमी वा-यासारखी सर्वदुर पसरली. लोक हळहळले. गरीब लोकांना अतीव दुःख झाले. आपला कैवारी व तारणहार पकडला गेल्याचे दुःख लोकांच्या जिव्हारी लागले.

होनाजीला पकडल्यावर पुण्याला आनले. त्याच्यावर सावकारांना लुटने, गहान खते जाळने, सरकारी मालमत्तेचे नुकसान करने, दरोडा घालने असे आरोप ठेवले.

पुढे हा खटला सहा महिने चालला. व होनाजीला सन १८७६ साली फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली. व ठाणे येथील तुरूंगात फाशी देण्यात आले.

थोर आदिवासी क्रांतिकारक    

होन्या भागोजी केंगले यांचे स्मारक त्यांच्या जन्मभूमीत म्हणजे जांभोरीमध्ये व्हावे, अशी इच्छा तमाम आदिवासी बांधवांची असताना शासनाने हे स्मारक दुर्लक्षितच ठेवले आहे.

या स्मारकासाठी हेमंत काळू केंगले व मारुती धोंडू केंगले व माजी उपआयुक्त लक्ष्मण डामसे यांनी पुढाकार घेऊन २००२ मध्ये कर्ज काढून जांभोरी येथे छोटेसे स्मारक उभारले आहे. शासनाने यामध्ये दुरुस्ती करून भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी होन्या केंगले स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत केंगले यांनी केली आहे. 

सन १८५५ ते १८७६ मध्ये क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या समकालीन असणारा आंबेगाव जांभोरी येथील होन्या भागोजी केंगले हे क्रांतिकारक होते. 

होन्या केंगले यांचे नाव बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील बसस्थानकाला देण्यात यावे अशीही मागणी आहे. या पैकी पंचायत समिती आंबेगांव (घोडेगाव) येथील ध्वजस्तंभावर होनाजी केंगले यांचे नाव कोरण्यात आले आहे.

केंगले यांनी सावकार आणि ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकारांचा बंदोबस्त त्यांनी केला. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र चळवळ उभी केली आणि त्यांच्या अटकेसाठी ब्रिटिशांनी मोठे बक्षीस जाहीर केले होते. 

होनाजी केंगले यांच्या कामामुळे स्थानिक लोकांमध्ये त्यांना आदराचे स्थान होते.आणि आहे. त्यांच्या कार्याची दखल इतिहासाने फारशी घेतली नाही, परंतु त्यांच्या शौर्यामुळे ते आजही स्मरणात आहेत.

रामदास तळपे 

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस