इरले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इरले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

छत्री, इरले, रेनकोट व गम बुट


जून महिना सुरू होताच आकाशात ढग जमायला सुरुवात व्हायची. त्याच दरम्यान जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा देखील सुरू व्हायच्या. नवीन वर्ग, नवीन कपडे, नवीन वह्या पुस्तके या आनंदात सर्व विद्यार्थी असायचे.

हळूहळू पाऊस सुरू व्हायला सुरुवात व्हायची. आणि मग आठवण यायची ती छत्रीची. नवीन छत्री घेण्यासाठी एकच हट्ट करायचे, छत्री घेतली नाही म्हणून रुसवे फुगवे व्हायचे. काही लोक पावसाळा संपल्यावर व्यवस्थित बांधून ठेवलेल्या छत्र्या झटकून बाहेर काढायचे. व वापरायला सुरुवात करायचे. 

तर काहीजणांच्या गलथान पणामुळे म्हणा किंवा छत्र्या व्यवस्थित न ठेवल्यामुळे तुटून, मोडून, फाटून जायच्या. काहींचा दांडा मोडलेला असायचा, तर काहींच्या तारा तुटलेल्या असायच्या, काहींचा खटका आत गेलेला असायचा, तर काहींचे कापड छत्रीच्या तळाशी फाटलेले असायचे.

पंचक्रोशीतील मोठ्या गावात बाजाराच्या दिवशी गल्लीत एका रस्त्याच्या कडेला झाडाखाली जुन्या छत्र्या दुरुस्तीचे दुकान थाटलेले असायचे. एका मोठ्या पोत्यावर अनेक जुन्या छत्र्या, नवीन दांडे, नवीन व जुन्या छत्रीच्या तारा, क्लिपा, घोडे (छत्री उघडण्याचे बटण ),चकत्या, छोटे खिळे, बारीक तारेचे गुंडाळे, त्याच बरोबर छोटया ब्याटऱ्या, ब्लब,असे विविध जुन्या व नव्या वस्तू हरीने मांडलेल्या असत.

छत्री दुरुस्ती करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडालेली असे. तेथे अनेक लोक ताटकळत आपली छत्री दुरुस्त होण्याची वाट पाहत उभे राहात असत.

कुणाच्या छत्रीचा दांडा मोडलेला असे, तर कुणाच्या छत्रीच्या तारा मोडलेल्या असत. कुणाच्या छत्रीचा घोडा आत गेलेला असायचा तर कुणाच्या छत्रीचे कापड छत्रीच्या मुळाशी फाटलेले असायचे. छत्री दुरुस्त करणारा कारागीर सफाईदारपणे व एकाग्रतेने छत्र्या दुरुस्त करायचा.

कुणाच्या छत्रीच्या एक दोन तारा कांडाळलेल्या असायच्या. कारागीर हळूच त्या मोडलेल्या तारा काढायचा. आणि त्या ठिकाणी नवीन तारा बसवायचा. काही छत्र्या उघडण्याचा घोडा छत्रीच्या दांड्यामध्ये गेलेला असायचा. कारागीर सफाईदारपणे त्याच्याकडील हत्यारांच्या सहाय्याने मोडलेला घोडा बाहेर काढायचा आणि छत्रीला नवीन घोडा बसवायचा.

कधी कधी छत्रीचे कापड तळाच्या भागात फाटलेले असायचे. छत्रीचे कापड छत्री पासून वेगळे करून बाहेर काढले जायचे. कात्रीच्या सहाय्याने फाटलेले कापड कापून त्या ठिकाणी नवीन कापड बसवून काळ्या धाग्याने व्यवस्थितपणे शिवले जायचे. कधी कधी छत्रीचे मूळ कापड, व नवीन दिलेल्या कापडाचा जोड यामध्ये जमीन आसमानाचा फरक असायचा. त्यामुळे ही छत्री वापरायला मुले का कू करायची.

काही लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे जुन्या छत्र्यांना नवीन दांडे बसवायचे, तर कधी जुनेच दुरुस्त करून घ्यायचे.

छत्री दुरुस्त केल्यावर एक दोनदा उघड झाप करून छत्री बरोबर नीट केली आहे ना... याची कारागीर खात्री करून घ्यायचा. व गिर्‍हाईकाच्या हातात द्यायचा. चार दोन रुपये मिळालेला मोबदला पत्र्याच्या छोट्या पेटी टाकायचा. त्या चिल्लर नाण्यांचा खळखन आवाज यायचा.

त्यावेळी तिथे अनेक संवाद व्हायचे. खालीलपैकी एक संवाद 

मुलगा :- बाबा, मला नवीन छत्री पाहिजे. 

सगळे मुलांकडे नवीन छत्री आहेत. मीच जुनी छत्री रिपेअर करून का वापरायची?

बाबा  :- आता आपली छत्री घेण्या इतकी ऐपत नाही बाळा.आता हीच वापर. पुढच्या वर्षी बघू . 

मुलगा :- मी नाही मग शाळेत जाणार.. मला नको ही छत्री जुनी आहे. शिवाय तिला ठिगळ दिले आहे.

तेथील एक माणूस :- बाळा, बाबांचं ऐकावं जरा.. परिस्थिती कठीण आहे. ते म्हणतात ना पुढल्या वर्षी नवीन घेऊ मग वापर वर्षभर ही.

बाकीचे तिथे असणारे सुद्धा मुलाला समजायचे.

त्यावेळी छत्री म्हणजे एक मांजरपाट काळ्या कापडाची सिंगल तारांची छत्री असे. पावसाने भिजल्यावर ही छत्री खूप जड व्हायची. ती वाळायची सुद्धा लवकर नाही.

त्यानंतरच्या काळात डबल तारांच्या टेरीकोट छत्र्या बाजारात आल्या. या छत्र्यांना खटक्याची छत्री सुद्धा म्हणत असत. ही छत्री वापरायला खूपच सुलभ होती. शिवाय पावसाने भिजूनही जड देखील होत नसे. पाऊस उघडल्यावर झटकन वाळत असे.परंतु ही छत्री सिंगल छत्रीपेक्षा महाग असायची.

हळूहळू साध्या छत्र्या लोक वापरीनासे झाले. आणि मग ह्या छत्र्या बाजारातून हद्दपार झाल्या.

त्यावेळी नवीन छत्री घेतली की ती हरवायची जास्त भीती असे. नवीन छत्री व रंगीत कलरने स्वतःचे नाव व पत्ता टाकायची पद्धत होती. छत्रीवर नाव टाकायचे पेंटर पाच रुपये घ्यायचा. 

पाऊस चालू झाल्यावर छत्री घेऊन दुसरीकडे जायचे. व एखाद्याच्या किंवा पाहुण्यांच्या घरी गेल्यावर त्याच्या दरवाजा जवळ छत्री लटकावयाची. आणि आत जायचे.

घरी जायच्या वेळी पाऊस उघडलेला असायचा. त्यामुळे छत्री घ्यायचे ध्यानातच राहायचे नाही. तसेच पुढे जायचे. अर्धा किलोमीटर चालून गेल्यावर पावसाची सर यायची. आणि मग त्यावेळी छत्रीची आठवण व्हायची. पुन्हा पाहुण्यांच्या घरी जायची वेळ यायची.

कधी कधी छत्री एस टी मध्ये, आगगाडी मध्ये, हॉटेलात विसरली जायची. घरी आल्यावर खूप पश्चाताप व्हायचा. खूप हळूहळू व्हायची. परंतु ईलाज नसायचा. 

मुंबई वाले चाकरमानी पावसाळ्यात गावाला यायचे तेव्हा त्यांच्याकडे छोटी बंदूक छत्री असायची. ही छत्री घडी घालून पिशवीत ठेवता येण्याजोगी होती. परंतु अतिशय नाजूक.. या छत्रीचे आम्हा मुलांना खूप आकर्षण वाटायचे. परंतु गावाकडे खूपच पाऊस असल्यामुळे व वेडेवाकडे जोरदार वारे वाहत असल्यामुळे या छत्रीचा टिकाऊ लागणार नाही हे माहीत असल्यामुळे या छत्र्या बाजारात विक्रीस नसत. असंत फक्त मोठ्या आणि लांब छत्र्या. या छत्रीचा खटका दाबताच छत्री आपोआप उघडायची. याचा उपयोग आम्ही मांजर घाबरवण्यासाठी करायचो.

छत्र्या हरवू नयेत, किंवा त्या हरवल्या की सापडाव्यात किंवा त्या चोरून नेऊ नयेत म्हणून छत्रीवर नाव टाकण्याची पद्धत होती. वेगवेगळ्या रंगांमध्ये छत्रीच्या कापडावर स्वतःचे संपूर्ण नाव व पत्ता लिहिण्याची पद्धत होती. त्यावेळी मोबाईल नंबर नव्हते नाहीतर ते सुद्धा लिहिले असते. छत्रीवर नाव टाकण्याचे पेंटर पाच रुपये घ्यायचा.

इरले:

त्यावेळी पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतातील काम करण्यासाठी इरल्यांची सुद्धा खूपच गरज भासायची. इरली ही बांबूच्या छोट्या छोट्या काड्या पासून पासून तयार करत असत. त्यासाठी प्रत्येक गावात कारागीर असत. अगदी सकाळी सकाळी त्यांचा इरले बनवण्याचा उद्योग चालू आहे. 

त्यावेळी पायली दोन पायली धान्य देऊन कारागीर लोकांना इरली करून देत असे. इरल्याचा बांबू पासून साठा बनवल्यावर त्यावर वाळलेली पळसाची पाने हरीने लावून दोरीने सुबक घराघरांच्या नक्षीदारपणे बांधली जात असे. नवीन इरली दिसायला अतिशय सुंदर असत. ही इरली अतिशय उबदार असत. परंतु खूपच जड असत.

दरवर्षी कोकणातील लोक पळसाच्या पानाचे पुडके इरल्याला लावण्यासाठी विकायला घेऊन यायचे.

पुढे काळ बदलला, लोक इरल्याच्या साठ्याला पळसाच्या पाना ऐवजी कागद बांधू लागली. त्यामुळे इरली ही वापरायला सुलभ व हालकी वाटू लागली. परंतु त्यामध्ये उबदार पण नव्हता. 

घोंगडी 

त्या वेळी लोक शेतीची कामे करण्यासाठी पावसाळ्यात घोंगडीचा सर्रास उपयोग करत असत. व आताही करतात परंतु प्रमाण फार कमी झाले आहे. प्रत्येकाकडे घोंगडी ही असायचीच.शक्यतो घोंगडी ही गुरे राखणाऱ्या गुराख्यांकडे असायची. घोंगडी चा उपयोग पाहुण्यांना बसण्यासाठी सुद्धा व्हायचा.घोंगडीवर बसल्यावर खूपच उबदार वाटायचे. पूर्व लोक झोपण्यासाठी घोंगडी खाली आंतरत्व त्यावर झोपत असत. आरोग्य शास्त्र सांगतं, घोंगडीवर सहा महिने झोपल्यावर डायबिटीस आपोआप कमी होतो.

रेनकोट:

पावसाळ्यात रेनकोट सुद्धा तुरळक लोकांकडेच असायचा. त्या काळात रेनकोट ही ओबडधोबड होते. 

नंतरच्या काळात रेनकोटच्या अनेक व्हरायटी बाजारात उपलब्ध झाल्या. वेगवेगळ्या रंगीत रेनकोटांनी बाजारपेठ 

फुलून जायची. वेगवेगळ्या रंगाच्या छत्र्या देखील बाजारात आलेले असायच्या.

नवीन छत्री घेतली की कारण नसताना घराबाहेर फिरून यायची हुक्की यायची.उद्देश हाच असायचा की आपण घेतलेली नवीन छत्री.. आपल्या मित्रांना दाखवता येईल.

रेनकोटचे तर विचारूच नका. घरामध्ये बसलो असता बाहेर पावसाची एखादी जोरदार सर आली की. रेनकोट घालून बाहेर फिरायला जायची तयारी करायची. रेनकोट घालून बाहेर जाणार तोच पाऊस उघडलेला असायचा. 

कधी कधी रेनकोट न घालताच बाहेर गेलो की पावसाची एकच जोरदार सर यायची. पूर्ण पाऊस अंगावर घेताना रेनकोटची आठवण यायची. परंतु रेनकोट आणायला आपण विसरलो आहोत हे आठवून स्वतःचे स्वतःला वाईट वाटायचे.

चप्पल:

पावसाळ्यात चेपल्यांचे तर विचारूच नका. चेपल्या जर चामड्याच्या असतील. तर वाळता वाळायच्या नाहीत. त्यासाठी लोक पावसाळ्यापूर्वी प्लॅस्टिकच्या किंवा बाटाच्या चेपल्या घेत असत.काही लोक अगदीच अनभिज्ञ असत. पावसाळा आल्यावरच मग त्यांना चेपल्यांची आठवण होई. परंतु काही लोक अगदीच भरभर गाळातून चालत जाताना एक वेगळाच फटफट आवाज येत असे. त्यांना पाण्याचा आणि गाळाचा अंदाज येत नसे आणि पाठीमागून गाळ त्यांच्या अंगावर अगदी डोक्यापर्यंत उडायचा. हे घरी गेल्यावर कपडे काढून  बघितल्यावरच कळत असे. किंवा पाठीमागून चालणारा एखादा माणूस सांगायचा.तेव्हा कळायचे.

गमबूट

काही लोक पावसाळ्यात काळ्या रंगाचे पायाच्या पोटऱ्यापर्यंत असलेले गमबूट किंवा बाटाचे बूट वापरत. बूट हे काळे, पिवळे,तपकिरी,लाल रंगाचे असे. परंतु गमबुट मात्र काळ्या रंगाचे असायचे.गमबुट हे रानात, गवतातून किंवा गुरांकडे जाताना वापरत असत.परंतु गम बूट हे वापरायला जरा कटकटीचे होते.गम बूट घातल्यावर जोरात चालता येत नसे.

एकदा तर एकाच्या गमबुटात साप वेटोळे घालून बसलेला होता. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे हा गमबूट घालायला गेला. तर त्याच्या पायाला काहीतरी गिळगिळीत लागले. बूट उलटे करून आपटले तर त्यातून साप बाहेर पडला..तर असे हे गमबुट.

रामदास तळपे

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस