आठवणीतले दिवस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आठवणीतले दिवस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आठवणीतले दिवस बबन न्हावी

बबन न्हावी

बबन न्हावी हे आमच्या गावात केव्हा आले हे मला निटसं आठवत नाही. परंतू त्यांचं कुटुंब कै.देवजी बांगर यांच्या गुरांच्या गोठ्यात रहात होते हे मात्र पक्के आठवते. बबन न्हावी त्यांची पत्नी विमल वाहिनी आणि मुलगा गजानन असा त्यांचा परिवार होता.

त्यावेळी अनेक गावात बलुतेदार असायचे. आमच्या गावात तेव्हा न्हावी नसल्यामुळे केस कापण्यासाठी शेजारच्या गावामध्ये जावे लागायचे. 

त्याचवेळी वाळद येथे राहणारे बबन न्हावी हे आमच्या गावात बलूतेदारीने न्हावी काम करण्यास तयार झाले. कारण ते तिघे भाऊ होते. आणि वाळद गावात दोघेजण आसपासचे काम बलूतेदारीने करत असत. परंतु एक जण मात्र रिकामा बसत असे.

आमच्या गावातील आमचे आजोबा बुधाजी तळपे यांनी बबन दादाला मंदोशीला येऊन बलूतेदारीने काम करण्यासाठी प्रवृत्त केले. आणि ते तयार झाले.

त्यांची राहण्याची व्यवस्था देवजी बांगर यांच्या गुरांच्या गोठ्यात केली. जेव्हा बबनदाचे कुटुंब तेथे रहायला आले त्याच्या आधी देवजी बांगर सोमाना येथील त्यांच्या शेतातील नव्या घरात जनावरांसह वास्तव्यास गेले होते. त्यांनी या गोठ्याची पावसाळ्या पुर्वी कोणतीच डागडुजी केली नव्हती. 

जेव्हा बबन न्हावी तेथे रहायला आले तेव्हा त्यांचे खुप हाल झाले. पश्चिम भागात धुवाधार पडणारा पाऊस, आणि ठिकठिकाणी गळनारा गोठा यामुळे थोडीशीच कोरडी जागा शिल्लक राहायची. सगळीकडे पाणीच पाणी व्हायचे.

अशा या अतिशय गैरसोयीच्या ठिकाणी हे कुटुंब वास्तव्य करत होते. वस्तू, कपडे लत्ता, धान्यधुन्य भिजुन जात होते. 

त्यांचे हे दैन्य कै. बुधाजी तळपे यांना पहावले नाही. त्यांनी बबन न्हावी यांच्या कुटुंबाचे होणारे हाल सविस्तर कै. देवजी बांगर यांना सांगीतले. 

देवजी बांगर यांना हे ऐकुन खुप वाईट वाटले. ते स्वतः बुधाजी तळपे यांच्या बरोबर गावात आले आणि कसलाही विचार न करता व कोणताही मोबदला न घेता बबन न्हावी यांना त्यांचे गावातील सुस्थीतीतील कौलारू घर तात्काळ राहण्यासाठी उपलब्ध करून दिले.

इतका दानशुरपणा आताच्या जमान्यात शक्य नाही.

देवजी बांगर यांच्या जुन्या कौलारू घरात राहायला आल्यावर बबन न्हावी यांच्या बायकोने (विमल वहिनी) छानपैकी घराच्या भिंती शेणामातीने सारवल्या. घरावर कौले असल्यामुळे गळण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय हे घर प्रशस्त असुन आमच्या शेजारीच होते. तर दुस-या बाजुला चिमाजी सुतार यांचे घर होते.

सर्व लोक त्यांना बबनदा म्हणत. तर या बबनदाच्या दारात रोज लोक केस कापण्यासाठी येत असत. त्या ठिकाणी लोकांच्या पुष्कळ गप्पा रंगत. गप्पा मारत असताना बबनदांचा तोंडाचा पट्टा व हातातील वस्तरा किंवा कात्री सफाईदारपणे चालत असे. त्यांच्या गप्पा ऐकायला मोठी मजा वाटे.

त्याकाळी लोक शक्यतो टक्कल किंवा बारीक कटींग करत असत. लोकांच्या डोक्यावर सफासफ फिरणारा वस्तरा किंवा कात्री पाहताना मोठी गम्मत वाटे.

त्याकाळी ग्रामीण भागात ब्लेड हा प्रकारच नव्हता. वस्ता-याची धार पडल्यावर बबनदा जवळच्या कातड्यावर आणि छोट्याश्या सहाणेवर घासुन वस्ता-याला धार लावी. हे ही पहाताना सुद्धा मोठी मौज वाटे.

बबन दादांच्या हजामतीचा इतका वेग होता की बबन दादांनी दोन जणांची हजामत करून तिसऱ्याच्या डोक्यावर पाणी लावे पर्यंत दुसरा न्हावी एक हजामत करत असे.

त्यावेळी पोत्यावर बसून हजामत केली जात असे. बबन दादांना हजामत करताना डोके सारखे इकडून तिकडे केलेले आवडत नसे. तसे केल्यावर ते डोक्याला एकदम जोरदार हिसका द्यायचे. आणि पाठीत जोरदार रट्टा मारायचे.

ते कटिंग करायला बसण्या आधी आम्हा मुलांना नाक शिंकरून येण्यास सांगायचे. 

कितीही नाक शिंकरले तरी कटिंग करताना खाली वाकल्यावर नाकातून शेंबड्याचा गठ्ठ्या खाली येऊ बघायचा कितीही वर ओढण्याचा प्रयत्न केला तरी तो बहाद्दर खाली खालीच जात असे. त्यामुळे नाकात सारखी वळवळ व्हायची. आणि यामुळे शरीराची सारखी हालचाल होत असे. 

आणि हेच बबन दादाला आवडत नसे. मग बबन दादा जोरदार पाठीत रट्टा ओढत असे. बेन पाच मिनिट सुद्धा न्याहार बसत नाही. बसतो का न्याहार ? परत जर हालचाल केली तर अजून रट्टे ओढील.

त्यामुळे बबन दादा कडे हजामत करायला आम्ही खूपच घाबरत असायचो. परंतु लवकरच गजानन कटिंग करायला शिकला आणि आमची एकदाची बबन दादाच्या जाचातून  सुटका झाली. 

लोक बबनदाला भात निघाल्यावर (सुगीच्या दिवसात) धान्यरूपात बलुते देत. हे बलुतं शक्यतो खळ्यावर दिले जात असे. बलुतं जमा करण्याचे काम हे विमल वहिनी करत असे. बलुतं गोळा करताना खुप अंधार पडे. परंतु शिवारातील सर्व पायवाटा विमल वहिनींच्या पायाखालच्या झाल्या होत्या. 

या खळ्यावरून त्या खळ्यावर धान्य गोळा करताना त्या माऊलीला खुप परिश्रम पडे. शिवाय घरचे काम, रानात जाऊन सारपण व वाळलेले शेण जमा करून घरी आणने हे काम विमल वहिनींकडे असे.

विमल वहिनी ही माझ्या आईच्या वयाची असल्यामुळे त्या दोघींची चांगली मैत्री होती. विमल वहिनींचे घर अतिशय टापटिप असे. भांडी स्वच्छ व लखलखीत असत. त्यांचा मुलगा गजानन हा आमच्या सर्व मुलांचा लाडका मित्र होता. त्याच्या बरोबर आम्ही सणावाराला एकमेकांकडे जेवत असू. शिवाय नेहमी कालवणाची देवाणघेवाण चालू असे.

बबनदा शिकले सवरलेले ले होते. पांढराशुभ्र लेंगा, पैरण व गांधी टोपी हा त्यांचा पेहराव होता.

बबनदा यांना नाटकांची खुप आवड होती. त्यांनी पुर्वी अनेक नाटकामध्ये भुमीका केल्या होत्या. शिवाय त्यांना अध्यात्मची देखील खूप आवड होती. 

शिवाय त्यांना पुस्तके वाचनाची सुद्धा प्रचंड आवड होती. त्याकाळात ते मुन्शी प्रेमचंद, बाबा कदम, पु.ल.देशपांडे, हरिवंशराय बच्चन यांची पुस्तके व कविता वाचत असत. त्यांचेकडुन माझे बाबा पुस्तके वाचण्यासाठी आणत असत. त्या पैकी कटी पतंग हे गुलशन नंदा यांचे पुस्तक मला चांगले आठवतेय. परंतू ते हिंदीत असल्यामुळे समजत नसे.

बबनदादा यांच्याकडे तोता मैना, गुलबकावली, अकबर बिरबल, तेनाली राम, अशी अनेक पुस्तके होती. या पुस्तकावर मध्ये सुरस अशा कथा असायच्या. कदाचित तिथूनच वाचनाची गोडी लागले असावी.

बबनदाला धार्मिक आवड सुद्धा होती. मंदोशी सारख्या खेडवळ गावात पहिल्यांदा त्यांच्या घरात हरिपाठ सुरू केला. 

संध्याकाळी सात वाजता गावातील सर्व तरूण मुले हरिपाठासाठी बबनदाच्या घरी जमत. ज्ञानदेव तळपे हे पखवाज वाजवत. बाकीचे टाळ वाजवत. 

आता गावात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह असतो. परंतू हरिभक्तीची मुहर्तमेढ ही बबनदांनी १९७९ साली रोवली आहे हे लोकांच्या ध्यानीमनी सुद्धा नाही.

श्रावण महिन्यात बबनदाच्या घरी हरिविजय,नवनाथ हया ग्रंथाचे पारायण असे. आम्ही ग्रंथाचे पारायण ऐकायला वडिलांबरोबर त्यांच्या घरी जात असू. ग्रंथ वाचण्याचे काम माझे वडील व बबनदा करत. तर त्याचा मराठीत अर्थ कै.बुधाजी तळपे समजून सांगत असत. ग्रंथ समाप्तीला मोठी मजा असे.

विमल वहिनीच्या बहिणीची मुले श्री.रामदास माठे (मा.सभापती पं.स. खेड) कधीतरी येत. परंतू त्यांचे बंधू श्री.लक्ष्मण माठे हे माझा डेहण्याचा मेव्हणा श्री.शंकर वनघरे याच्याबरोबर नेहमी मंदोशीला येत असे. त्यांना जळणासाठी सरपण पुरवण्याचे कामही विमल वहिनी करत असे.

बबनदाचा मुलगा गजानन हा माझ्या पेक्षा दोन वर्ग पुढे होता. मी. राघुजी आंबवणे, कै.मच्छिंद्र तळपे व कै.मारूती तळपे अशी आमची घनिष्ठ मैत्री होती. आम्ही दिवसभर एकत्र असत.

गजानन उत्तम चित्रकार होता. तो खुप छान चित्र काढायचा. विशेशतः गणपती आणि छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज यांचे उत्तम चित्र गजानन काढत असे. 

परंतु त्या काळात आमच्याकडे रंग नसत. गजानन कोळशापासुन काळा रंग, घेवड्याच्या पाना पासुन हिरवा रंग, रानभेंडीच्या फुलाच्या खालची गुठळी फोडून त्यातील पिवळा द्रव रंग म्हणुन वापरायचा. गेरू पासुन लाल रंग तयार करायचा. अर्थात हे सर्व गजाननच करायचा.

दहीहंडी, विटीदांडू, तिसका, चिपा, गोट्या, दडालपी,भारूड (नाटक)ओढ्यावर पोहणे इत्यादी खेळ आम्ही देहभान विसरून करत असत.

शिवाय पावसाळ्यात खुप पाऊस आल्यावर अंगणाततील वाहत जाणारे पाणी छोटा बांध घालुन आम्ही आडवायचो. जास्त पाणी साठल्यावर मधोमध फोडून द्यायचो. हे पाणी भरधाव वेगाने ज्ञानू तळपे यांच्या घरा पुढून पुढे जायचे. हे भरधाव वेगाने वाहत जाणाऱ्या पाण्यामध्येेे कगदाच्या बोटी व होड्या सोडणे आणि पाणी बघत राहणे  या सारखा आनंद नसे.

एकदा बबनदा रात्री प्रवास करत असताना त्यांच्या पायाच्या बोटाला सर्पदंश झाला. काही दिवसातच हळूहळू पायाची बोटे निकामी झाली. तेव्हापासून त्यांच्या एका पायात त्यांनी स्वतः बनवलेले कातडी बुट व एका पायात कोल्हापूरी वाहण असे. हातात काठी, काखेत कातडी बँग (धोपटी) अडकवून प्रवास करत असे.

त्याकाळात संपुर्ण गावचे बलुतं त्यांच्याकडे असल्यामुळे सराईला त्यांना धान्यरूपाने भरपुर बलुतं मिळत असे. काही तांदूळ विकून वर्षभराचा किराणा व कपडालत्ता इत्यादी संसारोपयोगी वस्तूंची ते बेगमी करत असत. 

परंतू सन १९८४ साली बबनदांनी अचानक त्यांच्या मुळगावी म्हणजे वाळद येथे जाण्याचा निर्णय घेतला, हे गजाननने आम्हाला सांगितले तेव्हा मला व राघुजी आंबवणे यांना अतीव दुःख झाले. गावातील सर्व लोकांनी वाळदला न जाण्याचा त्यांना सल्ला दिला. परंतू बबनदाचा निर्णय ठाम होते.

नाईलाजास्तव गावातील बरेच लोक,मी व राघूजी गजानन व त्यांच्या कुटुंबाला सोडवण्यासाठी शिरगाव पर्यंत गेलो होतो. गजाननआम्हाला सोडून जाणार याचे फार दुःख आम्हाला होत होते. 

इतक्यात एस.टी.आली आणि गजानन व त्याच्या कुटुंबाला आमच्या पासुन हिरावून धुरळा उडवीत दुर निघून गेली. राघूजी व मी ओक्साबोक्सी रडू लागलो आणि जड अंतकरणाने घरी परतलो.

गजानन पुढे फार जास्त शिकला नाही. सुरूवातीला राजगुरूनगर येथे केश कर्तनालयात नोकरी केली. 

नंतर त्यांने गावात स्वतःचे केशकर्तनालय उघडले आहे. गजानन आता केव्हातरी भेटतो. आहो जाहो व साहेब, साहेब बोलतो. मला ते आवडत नाही. 

मी त्याच्यामध्ये लहानपणीचा गजानन शोधू लागतो. माझा लहानपणीचा संवगडी. विवीध खेळ खेळणारा गजानन,. सुंदर चित्रे काढणारा गजानन,सणावाराला घरी जेवायला बोलवायला येणारा गजानन, सख्ख्या भावापेक्षा प्रेम करणारा गजानन.

परंतू आता गजानन दिसतो आहो जाहो करणारा. साहेब, साहेब म्हणनारा.त्याला कितीही बोललो तरी तो त्याचा हेका काही सोडत नाही.

गजाननचा मुलगा आता प्रवचन आणि कीर्तन करतो. 

गजाननचा धाकटा भाऊ नवनाथ यांचा मुलगा सुद्धा प्रवचन आणि कीर्तन करतो. नवनाथ देखील चाकण येथे त्यांच्या नाभिक व्यवसायात कार्यरत आहे. नवनाथ सुद्धा कुठल्यातरी नाभिक संघटनेचा पदाधिकारी आहे. आणि विशेष म्हणजे विमल वाहिनी हया नवनाथ कडे असतात.

लेखक :- रामदास तळपे


नवनाथ गायकवाड यांचा लग्न कार्यात फेटे बांधण्याचा व्यवसाय आहे.






सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस