शिरगावचे एसटी स्टँड :
शिरगाव येथिल एस टी स्टँड हे १९७२ साली बांधले असावे असा माझा अंदाज आहे. हे एस. टी. स्टँड म्हणजे मोठे भेंडीचे झाड व त्यावर असनारा छोटासा ओबडधोबड पार. हेच तेव्हाचे एस टी स्टँड होते. परंतु ते कसेही असले तरी शिरगाव, मंदोशी, मोरोशी, टोकावडे व भोरगीरी या गावांचे आवडते ठिकाण होते.
मला तर हे ठिकाण खुपच आवडायचे. शिरगाव एस.टी स्टँड हे पहाटे पासुनच गजबजलेले असायचे. तेव्हा डेहणे आदिवासी संस्थेची २२०६ या क्रमांकाची दुधगाडी होती.दुधगाडी भल्या पहाटेपासुनच शिरगावच्या स्टँडवर दुधाची रिकामी कँन्स व बर्फाच्या लादया टाकुन पुढे जायची.
थोड्याच वेळात मंदोशी व मोरोशी वरून दुधवाल्यांची दुध घालाण्यासाठी एकच गर्दी व्हायची. डेहणे गावचे कै.नावजी वनघरे हे तेव्हा दुध घ्यायला असायचे. दुध घातल्यावर पाराच्या अवतीभवती उभे राहून दुधवाले अनेक सुखदुखे एकमेकांना सांगायाचे. ते याच स्टँडवर
गजबजलेले एसटी स्टँड :
सकाळी सात वाजता भोरगीरी वरून खेडला जाण्यासाठी एस टी यायची. ज्या कोणाला वाडा, डेहणे व खेड येथे जायचे असेल तर प्रवासी या स्टँडवर अर्धा तास अधीच हजर असत. शनिवारी तर या स्टँडला यात्रेचे स्वरूप यायचे.
शनिवारी सकाळी शाळा असायाची. शनीवारी वाडयाचा बाजारही असायचा. त्यामुळे शालेय विद्यार्थी बाजारकरी व दुधवाले यांनी एस टी स्टँड फुलून जायचे. सकाळी सात वाजता खेडला जाणारी एस टी असायची. त्यानंतर १० वाजता यायची परेल भोरगीरी. ती गेल्यावर १२ वाजता असायची तळेगाव टोकावडे. त्यानंतर राजगुरूनगर भोरगीरी ही ३ वाजता असायची.
त्यानतर ८ वाजता राजगुरूनगर- भोरगीरी ही मुक्काम एस टी असायची. शिवाय दुधगाडीने प्रवास करणारेही असायचे. त्यामुळे या स्टँडवर दिवसभर प्रवासी बसुन असायचे.
या स्टँडवर असणारे भेंडीचे झाड व त्यावर असणारा ओबडधोबड पार व पारालाच रस्त्यांची खडी दाबनारा दगडी रूळ ही या पाराचाच अविभाज्य घटक होता. या पाराखाली कित्येक तास एस टी ची वाट पहात प्रवासी बसायचे.
कधी एस टी वेळेवर यायची तर कधी उशिरा तर कधी यायची पण नाही. मी सुध्दा या स्टँडवर कित्येक वेळा व कित्येक तास एस टी ची वाट पाहण्यात घालवले आहेत. एस टी स्टँडवरून लांबुन येताना पाहिली किंवा आवाज ऐकला तरी खुप आनंद व्हायचा .
पुर्वी डांबरी रस्ते नव्हते. खडी व मातीचे रस्ते असायाचे. लांबुन प्रचंड धुळीचे ढग सोबत घेऊन एस टी यायची व या स्टँडवर थांबायची. आणि आम्हा प्रवाश्यांना घेऊन पुढे जायची. या स्टँडवर कधीच कंटाळा यायचा नाही. सतत येथे वर्दळ असायची.
नामदेव केदारी यांचे रेशनिंग दुकान :
स्टॅन्ड पासून जवळच नामदेव केदारी यांचे रेशनिंग दुकान होते. रेशन घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी व्हायची. विशेषतः दिवाळीच्या वेळी ज्यादा रेशन घेण्यासाठी खूप लोक जमायचे. तेथे गहू, पामतेल, साखर आणि रॉकेल मिळत असे.मंदिरात डिगुतात्या ब्राम्हण राहायचे. त्यांना बहुदा निट दिसायचे नाही. डिगू तात्या एकटेच मंदिरात राहायचे. अजुबाजूच्या गावात श्री सत्यनारायण पुजा करायाचे. त्यांना न्यायला व आणून सोडायला लागायाचे. तर ह्या मंदिरात या डिगुतात्या बरोबर गांजा ओढण्या साठी आजुबाजुच्या गावातील ठराविक लोकांचा मंदिरात दिवसभर राबता असायचा.
डीगु तात्या हे एकटेच मारुतीच्या मंदिरात राहायचे. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या वर असल्यामुळे त्यांना खाली काही दिसत नव्हते. असे असतानाही ते स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचे. त्यांना गावातील महिला दररोज पाणी आणून देत असत.
शिरगाव येथील किंवा पंचक्रोशीतील लोक इतर कामात त्यांना मदत करायचे. शिरगाव येथे दूध घातल्यावर लोक मारुतीच्या मंदिरात डीगू तात्या यांच्याकडे गांजा ओढत बसत असत.
डीगु तात्यांना दिसत नसले तरी त्यांना श्री सत्यनारायणाचे सर्व अध्याय तोंडपाठ येत असत. ते सर्व प्रकारचे अभिषेक करत. अभिषेकाचे सर्व संस्कृत मंत्र, ऋचा, वेदपठण त्यांना तोंडपाठ असत.
उंच शिडशिडीत बांधा, डोक्यावर बारीक केलेले पांढरे केस, लफ्फेबाज धोतर, शिरगावात असतील तर अंगात बंडी किंवा बनियन घालत नसत. फक्त धोतर हाच त्यांचा वेश होता. परंतु बाहेर जर कधी जाणे झाले तर मात्र ते पेरण घालत असत.
सर्व भाग डिगू ब्राह्मणाला तात्या म्हणत असत. सर्व भाग त्यांची काळजी घेई. श्री सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी पारायण समाप्तीच्या वेळी डीगु तात्या यांना आठ दिवस आधीच आमंत्रण दिलेले असे. कधी कधी एकाच वेळी अनेक पूजा असत. भागातील सर्व लोकांना डीगू तात्या हेच ब्राह्मण पूजेसाठी हवे असत. परंतु सर्व ठिकाणी डीगू तात्यांना ते शक्य होत नसे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होत असे.
कुशाबा ठोसर प्रसिद्ध व्यापारी :
शेजारीच कुशाबा ठोसर यांचे हाँटेल कम किराणा मालाचे दुकान होते. बेसन लाडू, रेवडी, लाल शेंगोळी, साखरेच्या गोळ्या व त्या काळातील साठे बिस्किट तेव्हा फेमस होते. आम्ही त्यांच्याकडून कळीचे लाडू घेतल्यावर खिंडीमधील जानुबाईच्या मंदिराच्या शेजारील छोट्या कट्ट्यावर बसून खात असू.
कुशाबा ठोसर हे शरीरयष्टीने अतिशय मजबूत होते. भक्कम व भारदस्त असल्यामुळे त्यांची एक वेगळी छाप पडत असे. गावातील इतर लोकांपेक्षा त्यांची बोलण्याची लकब व्यापारी स्टाईलची होती. पांढरे शुभ्र निळ दिलेले धोतर व गंड्या पट्ट्याची बॉडी, या बॉडीला चार-पाच खिसे असायचे. व ते कायम मोठ्या लाकडाच्या आराम खुर्चीवर पहुडलेले असायचे. त्यांचा रुबाब भारदस्त असायचा.
रोज डेअरीला अर्धा लिटर दुध घालणाराची सुद्धा तेथे उधारी असायाची. दररोज सकाळी उधारी किराणा सामान घेण्यासाठी कुशाबा ठोसर यांच्या दुकानावर लोकांची गर्दी जमा होत असे. काही लोक बाजूलाच त्यांच्या दुकानातून घेतलेल्या संभाजी विड्या ओढत असत. एक रुपयाला दहा विड्या यायच्या.
मारुतीच्या मंदिरात भिंतीत असणारी टीव्ही :
मारुतीची मंदिरे ही प्रामुख्याने दक्षिणमुखी असतात. परंतु शिरगावचे मंदिर हे उत्तराभिमुख आहे. मंदिरात मारुती रायाची अत्यंत सुबक अशी मूर्ती आहे. याच मंदिरात प्रसिद्ध ब्राह्मण डीगु तात्या राहायचे.
शिरगाव येथील रंगीत टीव्ही:
१९८८ साली शिरगावला जिल्हा परिषदेच्या वतीने रंगीत टिव्ही संच मिळाला. तेव्हा नुकतीच रामायण मालीका सुरू झाली होती. शनिवारी व रविवारी मराठी व हिंदी चित्रपट असायचे.
हा टिव्ही मारूतीच्या मंदिरातील समोरच्या भिंतीला भगदाड पाडुन त्यात बसवलेला होता.समोरच्या जमिनीवर बसुन आम्ही टीव्ही मालीका व चित्रपट पहायचो. शनिवारी व रविवारी तसेच रामायण व महाभारत मालीका पहायला मंदोशी गावठाण जावळेवाडी,मोहणवाडी व हुरसाळे वाडीतील संपुर्ण तरूणाई लोटायची.
रामायण आणि महाभारत मालिका पाहायला सकाळी पावणे नऊला मारुतीच्या मंदिरासमोर प्रचंड गर्दी व्हायची. दोन तीनशे प्रेक्षक मालिका पाहायला जमत असत.
शनिवार आणि रविवारी सुद्धा आम्ही दुपारी साडेपाच वाजता शिरगाव येथे टीव्ही पाहण्यासाठी निघत असु. तिथे आल्यावर मारुतीच्या मंदिरासमोर आधीच लोक टीव्ही पाहण्यासाठी बसलेले असत. सर्व पटांगण गर्दीने फुलून जात असे.
संध्याकाळी पावणे नऊ वाजता पिक्चर संपल्यावर कुशाबा ठोसर यांच्या दुकानातून कळीचे लाडू घेऊन आम्ही घरी जायचो.
शिरगावचा भंडारा:
पुर्वी शिरगावला यात्रा भरत नसे. छोटासा भंडारा भरत असे. खूप सकाळी सकाळी भंडाऱ्याचे जेवण असायचे. शिरगावचे लोक सकाळी सात वाजताच भंडाऱ्याची जेवण करून घरी निघून जायचे.
शिरगावची पहिलीच यात्रा :
सन १९८९ साली गावातील प्रमुख लोक श्री.पांडुरंग लांघी श्री धोंडिभाऊ लांघी, कै.हरिभाऊ शिर्के,श्री नारायण कदम, श्री रामचंद्र शिर्के व इतर ग्रामस्थ यांनी गावात प्रथमच ग्रामदैवत जानकादेवीची यात्रा गुरुवार दिनांक 20 एप्रिल 1989 रोजी भरवली. रात्री देवतोरणे येथील भारूडाचा कार्यक्रम ठेवला.
त्या काळात देवतोरणीचे भारुड अतिशय प्रसिद्ध होते. ते भारूड पाहण्यासाठी भागातुन त्यावेळी "न भुतो ;न भविष्यती"अशी गर्दी उसळली.अशी प्रचंड गर्दी पुन्हा होणे नाही. त्या भारूडातला कलाकार स्री आणि पुरूष असे दोन्ही आवाज काढुन गाणे म्हणायचा. त्याने म्हणलेले मी जालवंती मी फुलावंती,व थांब थांब पोरी बाप गेला दुरी हे अजूनही अनेकांच्या स्मरणात असेल.
मारुती मंदिर व पटांगण :
डिगुतात्याच्या मृत्यूनंतर मारूती मंदिरात दररोज गांजा ओढण्यासाठीं येणारे भाविक कधी लुप्त झाले हे गावक-यांना देखील कळले नाही.भिमाशंकर रस्ता झाल्याने एस टी स्टँडवर असणारा पारही आज शेवटच्या घटका मोजताना दिसतोय. आजही कधी तेथे गेल्यावर स्टँडच्या पाराची आवस्था पाहुन जुन्या स्मृती दाटुन येतात व मन विषण्ण होते. व आपणही या पाराचे काही देणे लागतो या जाणिवेतुन काहीतरी करावे असे वाटते परंतू त्यात गावचाही सहभाग असला पाहिजे हा विचार मनात येऊन मुळ विचारच नष्ट होतो.
शाळा :
मारुती मंदिराच्या डाव्या बाजूला अगदी शेजारीच चौथीपर्यंत शाळा होती. तेथे सखाराम घोटकर गुरुजी हे शिक्षक होते. त्यानंतर आत्माराम कावळे गुरुजी हे शिक्षक देखील त्यानंतर होते. ते पाराच्या खाली नामदेव केदारी यांच्या घराशेजारी राहत असत.
पाभे गावचे मारुती जफरे गुरुजी हे सुद्धा खूप वर्ष शिरगाव मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर कुंवर गुरुजी, वाघ गुरुजी, संदीप जाधव गुरुजी, माणिक बाजारे गुरुजी हे सर्व शिक्षक शिरगाव या ठिकाणी होते.
निजामचे आब्बा :
पूर्वी मंदोशी येथे एका मुसलमानाचे छोटेसे किराणा मालाचे दुकान होते. या दुकानाला कोणतेही नाव नव्हते. सर्व लोक निजामच्या अब्बाचे दुकान असेच म्हणायचे.
परंतु मंदोशी येथील दूध संकलन केंद्र बंद झाल्याने हे दूध संकलन केंद्र शिरगाव येथे स्थलांतरित झाले. पंचक्रोशीतील लोक शिरगाव येथे दुध घालू लागले. दर पंधरा दिवसांनी दुधाचे पैसे लोकांना मिळू लागले. काळाची पुढची पावले ओळखुन निजामच्या आब्बांनी मंदोशी येथून शिरगावला दुकान स्थलांतर केले. व तेथे दुकान टाकले.
हळूहळू दुधाचा व्यवसाय वाढू लागला जनावरांनी जास्त दुध देण्यासाठी लोकांना पेंडीची गरज भासू लागली. आणि ही उणिव आब्बांनी भरून काढली.उधारीवर आब्बा लोकांना किराणा सामान व पेंड पुरवू लागले. लोकही प्रामाणिकपणे दुधाचा पगार झाल्यावर आब्बाची उधारी मिटवू लागले. आब्बांनी उधार माल दिला नाही असा माणुस शोधूनही सापडायचा नाही.
अब्बा दरवर्षी आपण जसे आषाढी कार्तिकी वारीला पंढरपूर आळंदीला जातो तसे अब्बा वर्षातून एकदा हाजी मलंग गडावर जात असत. त्यांची हाजीमालंगची वारी कधीही चुकली नाही.
परंतु एकदा काही अपरिहार्य कारणामुळे खूप इच्छा असूनही हाजी मलंग गडावर जाऊ शकले नाही.
त्यादिवशी आबा आपल्या दुकानात बसून होते. मीही त्या दिवशी कॉलेजवरून लवकरच घरी येत होतो. दुपारी दोनच्या दरम्यान मी एसटीतून उतरून घरी चाललो होतो.
मी अब्बाच्या दुकानाच्या समोरून जात असताना त्यांनी मला हाक मारली. राम अरे ये, घडीभर वस. पाणी पिऊन जा. मलाही अब्बाचा आग्रह मोडवेना. मी त्यांच्या दुकानातील लाकडी फळीवर बसलो. त्यांनी मला माठातील थंडगार पाणी दिले.
दारात फकीराचे आगमन:
पाणी पिल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना अचानक तिथे उंच शिडशिडीत, शेलाटी बांधा असलेला व भरदार दाढी मिशा असलेला फकीर तेथे आला. त्याच्या एका हातात धुपात्र व एका हातात मोरांच्या पिसाचा कुंचला होता. फकीराने आमच्या दोघांच्या डोक्यावरून आळीपाळीने कुंचला फिरवला.अब्बानी त्याच्या झोळीत दोन तीन रुपयाची चिल्लर नाणी टाकली.
फकीर हिंदीत बोलला देखो मेरे पास दो कांच का क्रिस्टल बॉल है! मुझे पच्चीस रुपये दो और काच दो क्रिस्टल बॉल ले लो! मुझे हाजी मलंग को जाना है.
यावर आब्बा म्हणाले.
मी खेळायचे बॉल घेऊन काय करू. याचा मला काय उपयोग.
नको मला, हे दुसरं कोणालाही द्या.
परंतु फकीर ऐकायला तयार नव्हता. फकीर म्हणाला ठीक है! वीस रुपये दो और ले लो! मुझे जाना बहुत जरुरी है!
अब्बाच्या मनात एक विचार चमकून गेला. आपली तर हाजी मलंगची वारी चुकलीच आहे आणि हा बिचारा चालला आहे तर जाऊ दे, आपले वीस रुपये कारणी लागतील. असे म्हणून त्यांनी गल्ल्यातून वीस रुपये काढून फकीराला दिले. व ते दोन क्रिस्टल बॉल ठेवून घेतले.
काचेच्या क्रिस्टल मधील हाजीमलंग:
आब्बाने ते काचेचे दोन क्रिस्टल बॉल घेऊन त्यातील एक बॉल न्याहाळत असताना त्या काचेच्या क्रिस्टल बॉल मध्ये हाजी मलंगचा डोंगर दिसला. आणि तिथून माणसे चालताना दिसली.
आबा विस्मय चिकित होऊन ओरडले राम अरे, बघ. या बॉल मध्ये टीव्ही लागलाय. हाजी मलंगचा डोंगर बघ,तिथून चालणारी माणसे बघ. मीही त्या बॉल मध्ये काय आहे बघू लागलो.
तर काय आश्चर्य. त्या बॉल मध्ये हाजी मलंगचा डोंगर दिसत असून माणसे तेथून चाललेली होती. चालताना माणसांची नुसती रीघ लागली होती.
मग आम्ही दुसरा बॉल पाहिला. त्या बॉल मध्ये हाजी मलंग बाबाचे मस्जिद किंवा मंदिरांमधील दृश्य दिसत होते. लोक तिथे दर्शन घेत होते. आम्ही हे दृश्य पाहून खूपच आश्चर्यचकित झालो.
आब्बा मला म्हणाले, राम,अरे जा, तो फकीर कुठे आहे बघ बरं? मी तात्काळ बाहेर जाऊन फकीराचा शोध घेऊ लागलो. संपूर्ण शिरगाव पायाखाली घातले. परंतु मला कुठेच फकीर दिसला नाही. मी निराश होऊन परत आब्बाच्या दुकानात आलो. आणि आबांना सांगितले. फकीर काही मला भेटला नाही.
त्यानंतर आम्ही पुन्हा पुन्हा त्या दोन्ही बॉल मध्ये आलटून पालटून पाहिले. परंतु मघाशी जे दृश्य आम्ही पहिले होते ते कधीच लुप्त झाले होते. आणि सामान्य बॉलमध्ये जे दिसते तेच आम्हाला दिसू लागले.
पुन्हा परत काही डोंगर,चालणारी माणसे, हाजी मलंगबाबाचे मंदिर, त्यामध्ये दर्शन घेत असणारी माणसे मला परत दिसलीच नाहीत.
त्यानंतर अब्बा रोज क्रिस्टल च्या बॉल मध्ये पाहायचे. परंतु त्यानंतर त्यांना कधीच आम्ही पाहिलेले दृश्य दिसले नाही. अब्बा बोलले राम,अरे! तो फकीर म्हणजे हाजी मलंग बाबाच असला पाहिजे. मला हाजी मलंगला जायला जमले नाही ना, म्हणून हाजी मलंग बाबाच मला भेटायला आले होते. परंतु मला त्यांना साधी पाणी सुद्धा देता आले नाही. केवढे माझी दुर्दैव. विशेष म्हणजे निजामच्या अब्बानी दिलेला त्यातील एक क्रिस्टल बॉल अजूनही माझ्याकडे आहे.
दगडू भराडी:
शिरगाव मध्ये त्यावेळी दगडू भराडी हे राहत असत. त्यांची अतिशय किडकिडित शरीरयष्टी होती. त्यांचा वेश म्हणजे घोट्यापर्यंत पांढरा लेंगा आणि पांढरे शर्ट व टोपी त्यावर मफलर गुंडाळलेली असे.
शेजारच्या पंचक्रोशीतील गावामध्ये जाऊन डमरू वाजवून खंडोबाची व देवीची गाणी घरोघरी जाऊन ते म्हणत असत. त्याबद्दल स्रिया त्यांना पसाभर तांदूळ देत असत.
त्याचप्रमाणे लग्नकार्यात भराड घालण्याचे ही ते काम करत असत. त्याबद्दल त्यांना काही रुपये मिळत असत. यावरच त्यांचा चरितार्थ चालवत असे.
दर गुरुवारी ते अगदी सकाळी, सकाळी आमच्या गावात येत असत. दर घरी विविध गाणी म्हणत असत. गाणी म्हणताना ते अतिशय सुंदर डमरू वाजवायचे. ते जर एखाद्या वेळी आले नाहीत तर चुकल्या चुकल्यासारखे वाटायचे. त्यांचे
मोठे मोठे डोळे घाली मिशावर ताव हे खंडोबाचे गाणे खूपच आवडायचे.
लग्नकार्याच्या वेळी त्यांना खूपच मागणी होती. लग्नकार्य झाल्यावर ते अतिशय सुंदर पद्धतीने भराड घालायचे. भराड घालताना ते भोरगिरी पासून राजगुरुनगर पर्यंत सर्व देवांना गाण्याच्या रूपातून भरडाला येण्याची विनंती करायचे.
त्यांच्या निधनानंतर ते कुटुंब कुठे गेले माहित नाही.
किसन लांघी:
किसन लांघी ही पूर्वी पश्चिम भागातील कोतवाल होते. त्यांना भागात खूपच मान होता. त्यांच्या स्नुषा कल्पना खंडू लांघी या सरपंच आहेत.
विमलताई शिर्के:
विमलताई शिर्के ह्या नव्याने निर्माण झालेल्या शिरगाव मंदोशी ग्रामपंचायत प्रथम सरपंच होत्या. त्या जवळजवळ दोन पंचवार्षिक म्हणजेच दहा वर्षे सरपंच होत्या. आम्ही यात्रेला किंवा इतर वेळेस त्यांच्याच घरात जेवायला जात असू.
धर्मा ठोसर :
शिरगाव मध्ये धर्मा ठोसर यांचे घर कोटेश्वर दूध संस्थे शेजारी होते. त्यांना बरेच मंत्र तंत्र येत होते. त्यांच्या अंगात वारेही येत होते. पंचक्रोशी मध्ये घरांचे भूमिपूजन सत्यनारायणाच्या महापूजा, इत्यादी आणि कार्यक्रम देखील ते करायचे. कुणी आजारी पडले की लोक धर्मा ठोसर यांच्याकडे जात असत.
एखाद्या पूजेच्या किंवा इतर कार्यक्रमाला त्यांना आमंत्रित केले की त्यांना नेहमी उरकतं घ्या.. असे सांगावे लागे. त्यांनी एकदा मंत्र म्हणायला सुरुवात केली की, प्रदीर्घकाळ ते संस्कृत मधले मंत्र म्हणत असत. लोक अगदी कंटाळून जात.
एकदा ते एका कार्यक्रमाला मंदोशी येथे आले असता त्यांच्या अंगात देवाचे वारे आले होते. आणि आमच्या गावातील बनाजी अंभवणे यांच्याही अंगात देवाचे वारे आले होते. तेव्हा बनाजी आंबवणे यांच्या देवाने धर्मा ठोसर यांच्या देवाला म्हणजे त्यांना कुंपणामध्ये उचलून फेकून दिले होते. तेव्हापासून त्यांनी मंदोशी गावातील लोकांशी वैर पत्करले होते.
ह.भ.प.सागर महाराज शिर्के :
शिरगाव येथील अतिशय तरुण कीर्तनकार सागर महाराज शिर्के हे त्यांच्या प्रवचन आणि कीर्तन या साठी सबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. अतिशय सुंदर असे ते कीर्तन करतात. त्यांच्या कीर्तनामध्ये विविध दृष्टांत देऊन ते भाविकांना खिळवून ठेवतात. इतका त्यांच्या वाणी मध्ये गोडवा आहे.
त्यांची अनेक कीर्तने झी टीव्हीवर आपण पाहिलीच असतील.
गोट्या कातकरी :
शिरगाव मध्ये विठ्ठलवाडी येथील गोटया कातकरी हे अतिशय प्रसिद्ध आहेत. ते अनेक आजारावर उदा. सर्पदंश, कावीळ, विंचू दंश झाडपाल्याचे औषधे देतात.
माझ्या मुलाला एकदा कावीळ झाली होती. काविळीच्या आजाराने पूर्णतः तो जर्जर झाला होता. चार-पाच दिवस त्याने अन्नाचा कण ही घेतला नव्हता. जवळ जवळ बेशुद्धच होता.
त्याला गोट्या कातकऱ्याकडे नेले असता त्यांनी मुलाला औषध दिले. आणि पाचच मिनिटांनी मुलाने डोळे उघडले. आणि खायला मागितले. जेवायला दिल्यानंतर तासाभरात त्याला तरतरी आली व दोन दिवसातच तो व्यवस्थित झाला. अजूनही गोट्या कातकरी हयात असून औषध देत असतात. गोट्या कातकरी म्हणजे एक दैवी वरदानच आहे.
बाळू शिर्के :
बाळू शिर्के हे त्यावेळी भागात अतिशय हुशार विद्यार्थी होते. दहावीला त्यांचा शिवाजी विद्यालयामध्ये दुसरा क्रमांक आला होता.
त्यानंतर त्यांनी इंजीनियरिंग चा डिप्लोमा केला.अहमदनगर फोर्जिंग या कंपनीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होते. परंतु दुर्दैवाने कंपनी बंद पडली.
आता ते भीमाशंकर येथे भीमाशंकर संस्थान येथे कार्यरत आहेत.
नारायण कदम:
नारायण कदम हे शिरगावचे रहिवासी असून ते रेशनिंग दुकान चालवतात. शिवाय ते खादी ग्रामोद्योग महामंडळाचे संचालक देखील आहेत. शिरगावच्या जडणघडणीमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
पांडुरंग लांघी:
पांडुरंग लांघी हे सुद्धा शिरगावचे असून शिरगाव विविध कार्यकारी संस्थेचे ते चेअरमन होते. त्यांच्याकडे यापूर्वी रेशन दुकान होते.आता त्यांचे मोरोशी फाट्यावर राजगुरुनगर भीमाशंकर या रस्त्यावर हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये चहा कॉफी, मिसळ, वडापाव, भेळ प्रसिद्ध आहे.
हॉटेल उद्योजक विशाल शिर्के :
विशाल शिर्के यांचे देखील शिरगाव फाट्यावर हॉटेल असून तेथे राईस प्लेट, पोहे, शिरा, उपवासाची खिचडी, चहा, वडा इत्यादींची सोय आहे.
मनोहर शिर्के:
मनोहर शिर्के यांचे देखील शिरगाव फाट्या जवळ हॉटेल आहे. त्यांचा वडापाव पंचक्रोशीत खूपच प्रसिद्ध आहे. वडापाव खाण्यासाठी लोकांची दिवसभर सतत गर्दी असते. शिवाय चहा सुद्धा खूपच प्रसिद्ध आहे.
उतरणीचा काळ :
परंतु काळाच्या ओघात राजगुरुनगर भिमाशंकर रस्ता झाल्याने एस टी स्टँडवर असलेल्या पाराचे महत्त्व लयाला गेले. पुर्वी मंदोशीला जाण्यासाठी शिरगावातुन रस्ता होता.
नविन रस्ता गावाच्या बाहेरून झाल्याने गावातील संपर्क जवळ जवळ बंदच झाला. अनेकांकडे टिव्ही आले. गावागावात दुकाने झाली. त्यामुळे लोकांची वर्दळ आपोआपच कमी झाली. कै.कुशाबा ठोसर यांच्या मृत्यू नंतर त्यांचे हाँटेल कम किराणा दुकान काळाच्या ओघात लुप्त झाले.
एस टी स्टँडवर असलेला पार, मारूती मंदिरात असणारा डिगुतात्या,कुशाबा ठोसर व त्यांचे दुकान, डमरू वाजवणारा दगडू भराडी, नामदेव केदारी यांचे रेशनिंग दुकान, दूधवाल्या गवळ्यांचे आवडते ठिकाण म्हणजेच निजामच्या आब्बाचे दुकान,
मंदोशीला शिरगावातून जाणारा रस्ता, मारूती मंदिराच्या भिंतीमध्ये असणारी रंगीत टिव्ही व ते पाहण्यासाठी होणारी गर्दी हे आता काहीच शिल्लक राहिले नाही.
एकेकाळी हे सर्व त्या गावचे वैभव होते. गावची शान होते. परंतु काळाच्या ओघात हे सर्व नष्ट झाले. प्रत्येकाचा जसा बहराचा काळ असतो तसा उतरणीचाही असतो. आता राहील्या फक्त आठवणी.या आठवणीच आपल्याला साथ देतात जगायची उमेद देतात.
लेखक :- रामदास तळपे