मंदोशी गाव
मंदोशी गाव हे १९९० पर्यत पुर्णपणे दुर्लक्षित असलेले गाव होते.हे गाव तालुक्यातीलच लोकांना माहित नव्हते.तर बाकीच्यांचे काय घेऊन बसता.
१९९० साली कै.नारायणराव पवार साहेब यांच्या आमदारकीच्या काळात तळेगाव ते तळेघर हा रस्ता मंजूर होऊन लगेचच काम सुरू झाले.गावात पहिल्यांदाच अवाढव्य रस्ता बनवनारा बुलडोझर दाखल झाला.पुर्वी १९७२ च्या दुष्काळात शिरगाव ते तळेघर हा रस्ता मनुष्यबळावर झाला होता.परंतू तो अनेक ठिकाणी नादुरूस्त होता.प्रचंड मोठ्या लोखंडी चेनचा हा बुलडोझर एखाद्या राक्षसासारखा काम करत होता व रस्ता बनवत होता.
शिरगाव,खिंड,शिंबारटाक,मोहनवाडी,घुबाडकपरा,पायर,सोमाना,बोरीचा धस,वरचीमाची,भुमीर,उगलेवाडी फाटा,धायटावना,ना-याचा माळ,मार्गे तळेघर असा जुना मार्ग होता.बोरीचा धस हा मोठा चढ होता.नविन मार्गात बदल केलेला होता.बुलडोझर रस्ता तयार करताना रस्त्यावर येणारी मोठमोठी झाडे एका झटक्यात बाजुला फेकत होता.लोक दररोज काम पहायला जात होते....
संपुर्ण रस्ता सुरूवातीला खडीचा बनवण्यात आला होता.१९९५-९६ ला पहिल्यांदा डांबरीकरण करण्यात आले.

तत्पुर्वी मोहणवाडीच्या पुढे आताचा जो उड्डाणपुल आहे.त्या पुढे ओढ्यावर पुर्व पश्चिम असा छोटा पुल होता.व वर संपुर्ण डबर अंथरलेले होते.पुलाखाली पाणी जाण्यासाठी पाच मोठया सिमेंटच्या नळ्या होत्या. पावसाळ्यात अनेक वेळा महापुर आल्यावर पुलावरून पाणी जायचे.व वहातुक बंद व्हायची.पुर आल्यावर खालच्या पुलावर बसुन अनेकांनी विशिष्ट प्रकारे छत्री उघडुन मासे पकडले आहेत.
या पुलाने १९९० साली प्रचंड पुर आला असताना तत्कालीन शेतकरी कै.नारायण हुरसाळे यांच्या बैलाचा बळी घेतला होता.पुरामध्ये बैल पुरात वाहुन जात असताना या सिमेंटच्या नळीतुन वाहून जात असताना एक नळीतच आडकला व तेथेच गतप्राण झाला.कित्येक महिने त्याचा सांगाडा तसाच नळीत होता.
हाच तो मंदोशीचा सुप्रसिद्ध धबधबा

मोहनवाडीमध्ये आता जे शांताबाई वाघमारे यांचे घर आहे तेथे श्री.लक्ष्मण मोहन यांची गवताची पडाळ होती.व कै.शांताराम वाघमारे यांचे शेतात सन १९८५ मध्ये इलेक्ट्रिक नळ होता. या नळावर इलेक्ट्रिक पंप बसवला होता.बटन दाबल्यावर प्रचंड वेगाने पाणी यायचे.सतत लाइट जाणे व सतत होणारे बिघाड या मुळे कंटाळून इलैक्ट्रिक मोटार काढून १९९१ मध्ये साधा हापसा बसवन्यात आला.
त्याही पुर्वी जिल्हा लोकल बोर्ड असताना १९५६ मध्ये आता जो मोहनवाडीच्या उड्डाणपुलावरून पुढे गावठ्यावर रस्ता झाला आहे.त्यापुढे बोर्डाची विहीर होती.ऐन उन्हाळ्यात सुद्धा आम्ही दिवसभर त्या विहीरीवर पोहत असायचो.
समोरच एक छोटा दगडाचा गणपती होता.आम्ही बादलीने गणपतीवर पाणी घालायचो.त्यापुढेच दुसरी एक विहीर होती.या विहीरीला चिखाळीची विहीर असे नाव होते.
ही विहीर बोर्डाच्या विहीरीपेक्षा लहान होती.ही विहीर सन १९८१ साली मंजूर होऊन सन १९८२ साली बांधकाम पुर्ण झाले होते. कै.बाबुराव गुंजाळ व कै.बारकू बेलदार यांनी ही विहीर बांधली होती.या विहीरीवर पोहण्यासाठी व कपडे धुण्यासाठी दिवसभर गर्दी असायची.
हुरसाळे वस्ती येथील विहीरही मला वाटते १९८१ च्या आसपासची असावी.ही विहीर स्वतः हुरसाळेवस्तीने स्ववर्गणी,मांडव खणन्या,व पै..पै..जमा करून बांधलेली आहे शिवाय जनावराना पाणी पिण्यासाठी प्रचंड मोठी लोखंडी काठवठ.होती.या वरून पुर्वी लोक कसे एकविचाराने राहत असत हे दिसुन येते.मंदोशी गावच्या (सर्व वाड्या वस्त्या) माध्यमातुन या उड्डाण पुलाच्या बाजुला वड व नांदरूकीच्या झाडाभोवती पार बांधला होता.याला गोठण म्हणत असत.
या पारावर गावच्या यात्रेच्या मिटिंग होत.व यात्रेनंतर दुस-या दिवशी हजेरीचा कार्यक्रम होत असे.जनावराच्या पायात काटा भरला तर कै.किसन चांभार याच ठिकाणी काटा काढायचा.
क्रिकेट सुरपारंब्या, तिसका, कब्बडी,विटीदांडू गोटया हे खेळ याच मैदानावर होत..शिवाय याच ठिकाणी गावडोह होता येथे सुद्धा पोहणे व्हायचे.वडाची लाल पिकलेली फळे व नांदरूकीची छोटी गोड फळे खायला मुलांची झुंबड व्हायची.काही मुले नांदरूकिच्या पिकलेली फळे दो-यामधे ओऊन गळ्यात घालत असत व नंतर काही वेळाने खाऊन टाकत.

वर उल्लेख केलेली सर्व ठिकाणे हुरसाळे वाडीची विहीर वगळता आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत.आता त्यांची नामो निशानीही शिल्लक राहीलेली नाही.
सन जुन १९९१ रोजी मंदोशी येथे पाचवीचा वर्ग सुरू झाला..आणि अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडली गेली.आज अनेक विद्यार्थी चांगले जीवण जगत आहेत.
गावात पुर्वी १९५५साली जीवण शिक्षण मंदिर मंदोशी शाळा मंजूर झाली तेव्हा जिल्हा लोकल बोर्ड होता.
गावातील पहिले शिक्षक कै.श्री देवजी विरणक हे होते.त्यांना वर्षाला गाव मुले शिकवण्याच्या मोबादल्यात धान्य देत असे.नंतर जिल्हा लोकल बोर्ड बरखास्त होऊन १९६२ जिल्हा परिषद आली.व गुरूजींना महीन्याला पगार सुरू झाला. त्यामुळे गावाने गुरूजींना धान्य देणे बंद झाले.
त्यानंतर कै दिवाणे.गुरूजी १९६५ ते १९७१ श्री गे.मा तनपुरे गुरूजी १९७१ ते जुलै १९८६ पर्यंत..श्री.रोडे गुरूजी १९७७ श्री.पंढरीनाथ भागीत गुरूजी जुलै १९८६ ते सन २००७ श्री.सुनील हांडे गुरूजी श्री.शिवराम सुपे गुरूजी.कै..मुक्ता मदगे गुरूजी.श्री.संजय नाईकरे गुरूजी,कै.मारूती मोरमारे मुख्याध्यापक श्री.शंकरराव विरणक मुख्याध्यापक श्री.चौधरी,श्री राजू मदगे,श्री कु-हाडे श्री.मनोज केंगले श्री माळी गुरूजी.श्री गवळी केंद्रप्रमुख अशा अनेकांनी विद्यार्थी घडवले.
हुरसाळेवाडी व जावळेवाडी येथे १९८२ साली शाळा सुरू झाल्या. जावळेवाडी येथे के.पांडुरंग आसवले गुरूजी तर हुरसाळेवाडी येथे श्री.विठ्ठल मोरमारे गुरूजी हे प्रथम शिक्षक लाभले.जावळेवाडी येथे श्री.रामदास तिटकारे गुरूजी श्री.सुनील देवरे.श्री.रविकिरण डोंगरे यांची पहीलीच नियुक्ती जावळेवाडी येथे होती.त्यांच्याच काळात विद्यार्थी ख-या अर्थाने घडले.
पुर्वी मंदोशी गावठाणातील शाळा ही दगड मातीची होती.दरवर्षी शाळेला रंग दिला जाई.प्रत्येक विद्यार्थ्यांमागे दहा पैसे वर्गणी काढली जाई.खाली लाल वर पिवळा व मध्ये निळ्या रंगाची पट्टी मारली जाई. गुरूजी फक्त पिवळा मातीचा रंग व पुडीमध्ये निळ पावडर डेहण्यावरून आणत.
लाल रंग आणायला तीसरी चौथीतील मोठी मुले श्री केशव हुरसाळे यांच्या घराच्या बाजूला त्यांच्या शेतातील लाल माती आणत व तीच माती भीजवून कापडाच्या बोळ्याने भिंतीला रंग दिला जाई.मुलींना शेण व पाणी आणुन द्यायचे.त्या खालील जमीन सारवायच्या.शाळा एकदम नवी कोरी दिसे.
सन १९८४-८५ मध्ये पुन्हा मंदिराचे बांधकाम करण्यात आले.हे मंदीर पुर्वीच्याच पायावर बांधण्यात आले.हे मंदीराचे वैशिष्ट्य असे होते की ते पुर्णता: घडीव दगडामध्ये व सागवाणी लाकडामध्ये बांधले होते.खाली काळी पांढरी उच्च प्रतीची लादी बसवण्यात आली होती.व जाळीच्या डिझाइन होत्या.बाहेर सुंदर गच्ची व लाकडामध्ये जाळ्या बसवण्यात आल्या होत्या
त्यानंतर पुन्हा मंदिराचे बांधकाम २०१४ साली करणेत आले.व सन २०१८ ला जिर्णोद्धार झाला.
देवाच्या मुर्ती या आठराव्या शतकातील इतक्या जुन्या आहेत.या मुर्तीपुर्वी...छोट्या छोटया दगडी चारपाच शाळुंका होत्या.त्या अजुनही आहेत.
खुप पुर्वी या शाळुंकाचीच पुजा व्हायची.त्यामुळे हे देवस्थान जागृत देवस्थान असल्याचे सिद्ध होते...याच देवाचे मुख्य ठिकाण खरबाच्या माळावर आहे.तेथे पुर्वी साधे छोटे मंदिर होते.नंतर सन १९९५ मध्ये नवीन मंदीर बांधले आहे.
हारतुरे,दंडवते,पालखी,नवरात्र (देव बसणे, पाचवी व नववी माळ ,देव उठणे,) देव पारधी जाणे,देव पारधीवरून येणे व श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी,रविवार हे मुख्य कार्यक्रम असतात.या वेळी दुरवरून लोक उपस्थित असतात.
पुर्वी जावळेवाडीकडे जाताना पिपाळडहाळ येथे कै.शिवराम मोहन यांनी त्यांच्या शेतावर मोट बसवली होती. ह्या मोटेचे दगडी बांधकाम हे रसुल गुलाब धोंडफोडे या गवंड्याने केले आहे.
येथे पुर्वी बटाट्याचे पीक घेतले जाई.पुर्वी मंदोशी, शिरगाव, टोकावडे,कारकुडी,भिवेगाव व भोरगीरी अशी संयुक्त ग्रामपंचायत होती.सन १९८३ मध्ये कै. बाळासाहेब दगडू तळपे हे पहिल्यांदा सरपंच झाले तर १९८५ ते १९९० पर्यंत कै.शंकरराव राघुजी हुरसाळे हे उपसरपंच होते. शिवाय कै.किसन देहू तळपे नंतर, कै.सिताराम दारकू तळपे हे ४० गावांशी सलग्न असलेल्या डेहणे आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे डायरेक्टर होते.
गावात १९७८ साली लाईट आली.गावात पहिल्यांदा १९७६ साली कै.सिताराम दुलाजी तळपे यांनी सायकल घेतली.तर पहीला रेडिओ श्री सहदेव जढर यांचा होता.आता सध्या जे वर गावठान आहे तेथे आंबेकर,मुठे,जढर,आंबवणे,तळपे दिघे,विरणक ही कुटुंबे रहायची परंतू १९३२ साली आलेल्या प्लेगच्या साथीत अनेक कुटुंबे विस्थापीत झाली.
गावाला शिरगाव, टोकावडे,कारकुडी,तळेघर,नायफड,
वांजाळे व धुओली अशा सात गावांची हद्द लाभलेली असुन मंदोशी गावच्या हद्दीत...श्री काळभैरवनाथ ग्रामदैवत, मारुती मंदीर, मुक्तार, वेताळ, वीर, कळमजा, दे..आई.सुळ्याचा महादेव कनीरबाबा. कोकाटवीर. भुमीर. खरबाचा मुख्य देव अशी देवस्थाने लाभली आहेत..
मंदोशी गाव हे निसर्गरम्य ठिकाण असुन आंबे, करवंदे, जांभळे,तोरणे,आंभेळी अशी अनेक फळे सिझनेबल उपलब्ध असतात.

पावसाळ्यात हिरवागार निसर्ग,खळाळते पाणी, डोंगरद-या,व निसर्गत:तयार झालेले धबधबे यामुळे पर्यटकांची महाराष्ट्रातुन गर्दी होते.नयनरम्य निसर्गसौंदर्यानं नटलेलं, धबधब्यांसाठी सुप्रसिद्ध मंदोशी,अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा अनमोल ठेवा,चारही बाजुंनी डोंगरांनी वेढलेलं, सहयाद्रीच्या कुशीत वसलेलं, भिमाशंकरजवळील हे छोटंसं गाव धबधब्यांसाठी प्रसिध्द आहे. याठिकाणी सुंदर फेसाळणारे छोटे, मोठे अनेक धबधबे आहेत. तरारलेली भात शेती, सर्वदूर पसरलेली हिरवळ, झुळझुळ वाहणारे पांढरेशुभ्र झरे, डोंगराच्या पायथ्याशी तुडुंब भरून वाहणारे ओढे,अधूनमधून पसरणारी धुक्याची चादर या सर्व निसर्गसौंदर्यानं डोळ्यांसोबतच मनही तृप्त होतं.
रामदास तळपे
चित्र सौजन्य :-गणेश हुरसाळे, अरुण मोहन