म्हसा यात्रा व बैलांचा बाजार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
म्हसा यात्रा व बैलांचा बाजार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

म्हसा यात्रा व बैलांचा बाजार


म्हसा यात्रा व बैलांचा बाजार 

पूर्वी गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे बैलजोडी असायचीच. शेतकरी आपल्या बैलांकडून वर्षभर शेतीची कामे करून घ्यायचा.शेतीच्या आवश्यकतेच्या नुसार बैलजोडी किंवा एखादा बैल बदलायचा. तो विकून दुसरा नविन घ्यायचा. यासाठी लोक आपापले बैल घेऊन म्हशाला जायचे. म्हसा ता.मुरबाड येथे पौष पौर्णिमेला फार मोठी यात्रा भरते. ही यात्रा पुर्वी पंधरा दिवस चालायची. यात्रेला मोठ्या प्रमाणावर बैलांचा बाजार भरतो. त्याशिवाय शेळ्या मेंढया,म्हशी सुद्धा विक्रीस उपलब्ध असतात.महाराष्ट्रातील सर्व तमाशे राहुट्या ठोकून असतात.

ग्रामीण भागातील ज्या शेतक-यांना बैल विकायचे आहेत.ते म्हशाच्या यात्रेच्या चार महिने आधीपासून तयारीला लागत.बैलांना रोज ओढ्यावरा नेऊन अंघोळ घालने,गोठा टापटिप ठेवणे,बैलांना पेंड,गव्हाच्या पिठाचे गोळे खायला घालने.हिरवा चारा,कोंहंबळ व गोळी या झाडांचा कोवळा पाला खायला घालून बैल चांगले तयार करत.

म्हशाच्या यात्रेच्या आधी प्रत्येक गावचे लोक आपापल्या गावातुन सकाळी सहा वाजताच बैल घेऊन निघत. काही लोक भोरगीरी मार्गे,काही रानमळ्यातून भिमाशंकर काही आहूपे मार्गे तर काही घाटघर मार्गे आपापले बैल घेऊन म्हशावर पायी जात असत.

आम्ही सुद्धा सकाळी सहा वाजताच बैल विकण्यासाठी म्हशावर जाण्यासाठी सकाळी सहा वाजताच गाव सोडले.ज्या बैलांनी आपल्या शेतीची सेवा केली त्या बैलांना विकायचे ही कल्पनाच घरातील बाया बापड्यांना मान्य व्हायची नाही. घरातील स्रीया बैलांना गौठ्यातुन बाहेर नेतांना पदरात डोके घालून हमसू हमसून रडायच्या. परंतू त्या तरी काय करतील बापड्या.प्रपंचात राग, लोभ, द्वेश, मत्सर, मोह जास्त करून भागत नाही. नव्हे नियतीला हे मान्य नाही.आपल्या बैलांची शेवटची गळाभेट घ्यायच्या. दोन चार भाकरी किंवा काही गोडधोड बैलांना चारायच्या.आणि जो पर्यंत आपले बैल दृष्टी आड होत नाहीत तो पर्यंत तेथेच उभ्या असायच्या.

बैल एव्हांना टोकावडे,भिवेगावच्या पुढे गेलेले असायचे.तेव्हा घरातील लहान लेकरे उठायची. गोठ्यात बैल कोठे गेले असतील असा प्रश्न त्यांना पडायचा. गोठ्यातील आपले बैल कोठे गेले असे ती मुले आई किंवा आजीला विचारायची.हे सांगतांना सर्वजण गहीवरून जायची. मुले गोरीमोरी व्हायची, रडायची. परंतू आपण दुसरे नविन बैल आणनार आहोत असे समजावल्यावर कुठे शांत.

आम्ही आमचे बैल घेऊन भोरगीरी, भिमाशंकर मार्गे बैलघाटातुन पायी चालत जायचो.दुपारी तीन वाजता कोकणातील लव्हाळीवर पोहचायचो. तेथे नदीवर अंघोळ करायची. घरून आणलेली शिदोरी फडक्यातुन सोडायची. शिदोरीत तांदळाची नाचनीची भाकरी असायच्या.लसणाची, सुकट, बोंबील किंवा वाकटीची चटणी असायची.जोडीला हरभ-याच्या पिठाचे मोकळे बेसन व पातळ भजी असायची. यावर यथेच्छ ताव मारायचा. बैलांना चारा टाकायचा. 

थोडावेळ आराम करून भिलावरे गावाच्या दिशेने कुच करायचे. व तेथेच मुक्काम करायचा.दुसऱ्या दिवशी लवकर उठून काही लोकांना जागा पकडन्यासाठी पुढे पाठवायचे.पुढे गेलेले लोक जागा पकडून तेथे खुंटे ठोकून ठेवत. त्यानंतर दुपारी बैल घेऊन लोक जागा धरून ठेवलेल्या ठिकाणी खुंट्याला बैल बांधत. तेथेच सध्याकाळी राहण्यासाठी गवताची खोप करत.संथ्याकाळचे जेवण तेथेच असे.

म्हशावर टेप व मुळनदी असे दोन भाग असत.खेड,आंबेगाव व जुन्नर व अकोले भागातील लोक टेपावर आपले बैल विक्रीला आनत, तर मुळ नदीवर नगर, नाशिक शहापुर व ठाणे जिल्ह्यातील बैल विक्रीसाठी असत. जिकडे तिकडे बैलच बैल दिसत. मानसांची ही गर्दी उसळलेली असे.प्रचंड गर्दीचा कोलाहाल असे. कुणाला आपले बैल विकायचे असत. तर कुनाला आपले बैल विकून पुन्हा नविन बैल घ्यायचे असत. या यात्रेला हौशे. नौशै व गौशे असे तीनही प्रकारचे लोक असत.

शिवाय उंचच उंच पाळणे,खेळण्यांची दुकाने, हाँटेले, मिठायांची दुकाने, ठिकठिकाणी असत. ग्रामीण भागातील लोक बैल विकल्यावर व नविन बैल घेतल्यावर काही खरेदी करत. त्यामध्ये पिठ मळन्यासाठी काठवट,पेजवळ्या (घावने)ची कहाल, संसारोपयोगी भांडी, सुप, घोंगड्या, चादर, ब्लँकेट सुकट, वाकट, बोंबील, ढोमेली, सोडा (वाळलेल्या माशांचा प्रकार) यांची खरेदी व्हायची. लोक सार्वजानिक कार्यक्रमासाठी डेंगी व भांडी घ्यायचे.मुलांसाठी खेळणी गळ्यात घालन्यासाठी वाघनखे,गळ्यातील गोफ, भोंडीच्या माळा, बांगड्या, रिबनी, आरसे, कंगवे.फण्या अशी खरेदी केली जायची. विवीध प्रकारचा खाऊ घेतला जाई.

म्हशाची यात्रा म्हणजे तमाशाची पंढरी. झाडून सारे तमासगिर तिथे गोळा होत.आपली तमाशाची बारी यात्रेला उभी करत. तमासगीर रसिकांसमोर आपला खेळ सादर करत. मा.रघुविर खेडकर,मंगला बनसोडे,पांडुरंग मुळे,भिका भिमा.गणपत व्ही माने, मा.दत्ता महाडीक पुणेकर,मा. तुकाराम खेडकर, महादू, दत्तोबा तांबे शिरोलीकर, विठा भाऊ मांग, काळू बाळू या प्रसिद्ध तमासगिरांच्या बा-या म्हशाला होत.

बैल विक्रिसाठी किंवा विकत घेण्यासाठी आलेले शेतकरी दोन चार घटका जीवाचं मनोरंजन करण्यासाठी तमाशाकडे धाव घेत.तुफान गर्दी व्हायची. कधी कधी तमासगिरांचा सामनाही रंगे. गण, गवळण, रंगबाजी, फार्स आणि वग असा मोठा कार्यक्रम असे. पहाटेचं तांबडं फुटेपर्यंत पायातल्या चाळांची छुमछुम,कडयांचा कडकडाट आणि डफ, तुणतुणे आणि ढोलकीची धुमाळी चालू राही. 

तिकडे सुर्य डोंगराआडून डोकावून पाहू लागला की तमाशाचा खेळ मोडत असे. रात्री ज्यांनी पात्र रंगवली त्यांना सकाळी मेकअप नसताना पाहताना आमचा भ्रमनिरास होत असे.

लाईटच्या झगमगाटातील लावण्यवतीचं खरं रुप सकाळच्या हजेरीत पहावसंही वाटत नसे.तमाशाला गर्दी करणाऱ्या प्रेक्षकांपैकी मीही एक होतो.आम्हाला गण, गवळण, रंगबाजी आणि फार्समधील नाचगाणी, गवळणी, मावशीची फिरकी यापेक्षा तमाशाचा वग पाहणे आवडायचे. त्यातही काही अद्भुत ट्रीक सिन्स असतील तर मला फारच आवडे.

मा. दत्ता महाडिक सह गुलाबराव बोरगावकर मा.,चंद्रकांत ढवळपुरीकर, मा.माधवराव गायकवाड मा.,गणपत व्ही माने, मा. शंकरराव कोकाटे, वसंतराव अवसरीकर, साहेबराव नांदवडकर, काळू बाळू, पांडूरंग मुळे, मंगला बनसोडे,रघुविर खेडकर,भिका भिमा अशी मला माहित असलेली नामांकित मंडळी त्यावेळी तमाशात होती.

त्याकाळी काही तमाशे वगाचे नाव अगोदर जाहिर करीत असत व प्रेक्षकांची गर्दी खेचत असत.दत्ता महाडीक यांचा महाराष्ट्र झुकत नाही अर्थात धर्मवेडा संभाजी अप्रतिम वगनाट्य होते. महाराष्ट्र झुकलाच पाहिजे यापुढे जाऊन तिसरे वग नाटय आले, महाराष्ट्र झुकेल पण केंव्हा ? लग्नाआधी कुंकू पुसले, संसाराचा झाला सिनेमा, कऱ्हाडची कुर्हाड, खन्डोबाची आण, सत्या बेरड, माता न तू वैरीणी असे सामाजिक विषय असणारी वगनाट्य असत, तमासगिरांमध्ये स्पर्धा चाले. 

दत्ता महाडीकांचा तमाशा मला फार आवडे. दत्ता महाडीक म्हणजे विनोदाचा बादशहा. कवी आणि उत्तम गायक. स्टेजवर एंट्री घेतली आणि शिटया व टाळयांचा कडकडाट झाला नाही असे कधीच घडले नाही. त्यांचं वग नाटय फार जबरदस्त असे. माधवराव गायकवाड त्यात संभाजीची भुमिका करत. काय तो अभिनय,संवादफेक आणि रुबाब अहाहा ! मी त्यांच्या कामावर फिदा झालो होतो. 

म्हशाच्या तमाशा पंढरीत परंपरा म्हणून तमासगीर दरवर्षी त्यांची बारी रसिकां चरणी सादर करीत.त्या खेळावरुन अनेक गावच्या जत्रांच्या सुपा-या ठरवल्या जायच्या. मैदानात तमाशाच्या बा-या सुरु होत्या. चालताना विठाबाईच्या तमाशा जवळ थांबलो विठाबाई त्यांच्या पहाडी आवाजात पट्ठे बापूरावांची लावणी म्हणत होत्या.

"तू गं ऐक नंदाच्या नारी,काल दुपारी,

यमुनेच्या तिरी ग हा हा हा ,

धुणं धूत होतो गवळ्याच्या नारी ,

जी जी ग जी जी ग हा. 

आम्ही गवळण ऐकून पुढे सरकलो.पुढच्या बारीत ढोलकी. तुणतुणे हलगी,कडे यांची जुगलबंदी सुरु होती. या वाद्यांनी लोकांवर जादू केली आहे, ढोलकी तुणतुण्याच्या आवाज ऐकला की लोक वेडे बनून तिकडे धावत सुटतात मग 'लावणी 'या वाद्यांच्या साथीत तिचा तोरा मिरवते.काशिनाथ  म्हणाला,थांब रे, गण ऐकुन जाऊ. त्याला गण म्हणण्याचा नाद होता.

डफावर थाप मारून, ढोलकीचा तोडा संपताच शाहिरानं फेट्याचा सोगा पाठीवर भिरकावला. डाव्या हाताचा पंजा कानावर ठेवला आणि एकदम कडक आवाजात सुरु केलं,

आधी गणाला रणी आणला "

काशिनाथला दम धरवेना त्यानेही मोठ्याने सुरु केलं 

नाहीतर रंग पुन्हा सुना सुना ना... 

मी  त्याला गप्प करण्याची केविलवाणी धडपड करीत होतो पण त्याच्यात साक्षात पट्ठे बापूरावच संचारला होता.

पट्ठे बापूराव कवी कवणाचा,

हा एक तुकडा जुना जुना ना "

गण संपताच ढोलकीचा ठेका सुरु झाला चाळांची छुम छुम ऐकू येऊ लागली,लोकं मांडी घालून बसले होते ते चवड्यावर आले.आम्ही पुढच्या बारीकडे निघालो तुकाराम खेडकरांचा तमाशा चालू होता गवळणी बाजाराला निघाल्या होत्या,

"चला चला गं फार येळं झाला,

मथुरेच्या हाटा आता निघा चला ग,

बाजार मोठा, लवकर गाठा 

मथुरेच्या हाटा आता निघा चला ग "

भाऊ फक्कडांची ही प्रसिद्ध गवळण ढोलकीच्या तालावर  आणि नर्तकींच्या अदाकारीत चालू होती,गण गवळण झाल्यानंतर फार्स सुरु झाला,

मी म्हटलं.चला आता दत्ता महाडीकांचा वग सुरु होईल. 

थांबा थोडं, थोडा फार्स बघून जाऊ  काशिनाथ म्हणाला. त्याला सोंगाड्याचं काम भारी आवडायचं, तो टाचा वर करून बघू लागला. फार्स चांगलाच रंगला होता.

आरं ! एवढ्या घाईनं रातच्याला कुठं चाललास ?"

कुठं म्हंजी तमाशाला. 

लईच घाईत निघालास वाटत.

व्हय, वाईच डोळा लागला व्हता. आथुरणातून उठून घाइघाईन उशाला ठेवलेला पटका डोक्याला गुंडाळला,आन तडक निघालो. म्हटलं, गवळण हुकायला नको. 

आरं येड्या ! तू डोक्याला पटका नाय तर उशाशी पडलेलं बायकोचं लुगडं गुंडाळून आलास लेका ...

आणि हास्याचा गडगडाट  झाला.

आम्ही गर्दीतून आणखी पुढे सरकलो. दत्ता महाडीकांच्या स्टेजसमोर आलो. प्रेक्षकांची ही तुफान गर्दी. शिटया आणि गोंगाटाने काही ऐकू येत नव्हते. तमाशा थांबलेला होता आणि स्टेजवर एक ग्रामस्थ खुर्ची टाकून बसले होते.आम्ही आजुबाजुला चौकशी केली. 

काय झालय ? " 

काही माहित नाही, तमाशा थांबवलाय जणू. का ? खेळ लावलाय तो लोकांना पसंत नाही वाटतं? कोणता वग लावलाय ? 

ज्ञानेश्वर माझी माय माऊली.  

खेडच्या यात्रेत मी त्यांचा संत तुकाराम वग पाहिला होता.दत्ता महाडीक स्वतः गायक व कवी होते. त्यांनी केलेली संत तुकारामाची भुमिका व मा.चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी मुंबाजी बुवाची केलेली भुमिका आणि त्यात घेतलेले ट्रीक सिन्स माझ्या आजन्म लक्षात राहतील. एवढा सुंदर, निटनेटका वग मी प्रथमच पाहिला होता. त्यामुळे ज्ञानेश्वर माझी माय माऊली मला आवडला असता.

अरे! मी हा वग अगोदर खेडच्या जत्रेत पाहिला आहे. स्टेजवर ठाण मांडून बसलेला माणूस उठला. तोंडात साचलेला पानाचा चोथा स्टेजच्या कडेला थुकून आला व माईककडे जाऊन म्हणाला, रक्तात भिजला बंगला झालाच पाहिजे. 

मी म्हटलं, बंगला काय आहे? काही तरी हाणामारीची गोष्ट ? 

नाही, रक्तात भिजला बांगला असे त्यांना म्हणायचं आहे.  

स्टेजवरील गृहस्थ पुन्हा माईकवरुन ओरडत होता, ते काय नाय, रक्तात भिजला बंगला झालाच पाहिजे.  

पुर्वी पाकिस्तान व बांगला देशाचे युद्ध चालू होते. शेख मुजिब रेहमानच्या मुक्ती सेनेला भारताने पाठींबा दिल्याने त्या युद्धाचं वारं भारतातही फिरत होतं. त्यावर दत्ता महाडीक यांनी रक्तात भिजला बांगला हा वग बसवला होता. व तो तुफान लोकप्रिय झाला होता. 

तेवढ्यात तमाशातील एक वरीष्ठ नट चंद्रकांत ढवळपुरीकर माईकसमोर आले व आम्ही हा वग आज सादर करु शकत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्या तमाशातील प्रमुख कलावंत माधवराव गायकवाड हे आज उपस्थित नसल्याने हा खेळ आज करता येत नाही म्हणत त्यांनी हात जोडले परंतु लोक इरेला पेटले. 

सारे प्रेक्षक  बांगला ! बांगला !  बांगला !  म्हणून ओरडू लागले.

बांगला! बांगला ! रक्तात भिजला, बांगला मी पण एकदा ओरडलो. 

५-१० मिनिटांनतर दत्ता महाडीक स्वतः ज्ञानेश्वरांच्या वेशात स्टेजवर आले. सगळीकडे शांतता पसरली. लोकं गपगुमान झाली. 

रसिक मायबापहो, आपल्या विनंतीचा मान ठेऊन आम्ही 'रक्तात भिजला बांगला  हा वग सादर करीत आहोत. लोकांनी टाळयांचा कडकडाट केला. 

आम्हीही त्या गर्दीत घुसलो आणि जिथून चांगले दिसेल अशा ठिकाणी जागा धरुन बसलो. मला व्यवस्थित दिसत नव्हतं, चवड्यावर बसून पहावं लागत होते.  

मला फक्त अर्धा तास द्या.  महाडीकांनी माईकवरुन पुकारलं, एवढा मोठा समुदाय चक्क अर्धा तास गप्प बसून राहिलेला मी पाहिला, स्टेजवरचे पडदे सोडून त्याठिकाणी दुसरे पडदे लावण्यात आले. आणखी आवश्यक ते बदल नेपथ्यात करण्यात आले, विजेच्या चपळाईने सारे घडत होते आणि अर्ध्या तासाने सुरु झालं 'रक्तात भिजला बांगला हे वगनाट्य.

मुक्ती सेनेत गेलेल्या एका तरुणाची आणि त्याच्या कुटुंबाची व बांगला देश पाकिस्तानच्या लढाईची ती कथा होती. सुरुवातीलाच माधवराव गायकवाड मुस्तफाच्या (तो तरुण) वेषात स्टेजवर अवतीर्ण झाले, लोकांनी टाळयांचा कडकडाट केला. 

त्या दिवशी त्या वगाचे अप्रतिम सादरीकरण झाले. विमानांचा आवाज, बाँब, हातबाँब, रायफलच्या गोळया. मला तर वाटले  खरोखर स्टेजवर लढाईच चाललीय. चवडयावर बसून तमाशा पाहताना कळ लागली की मधुनच उभा राहूनही पहात होतो. तमाशाच्या इतर बा-यांनी कधीच आपला खेळ मोडला होता.

सगळं पब्लिक,' रक्तात भिजला बांगला ' ला लोटलं होतं. जणू काय माणसांचा महापूरच आल्यासारखं वाटत होतं. स्टेजवर होणारे बाँबस्फोट, विमानाने टाकलेले बाँब, बंदुकीच्या फैरी त्यासाठी वापरलेले आपटीबार यामुळे स्टेजच्या आजुबाजुचा परिसर धुरानं भरुन गेला, माधवराव गायकवाड, दत्ता महाडीक, गुलाबराव बोरकर,चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी अप्रतिम भुमिका केल्या. माझ्या बालमनावर कोरलेलं ते वगनाटय अजुनही माझ्या नजरेसमोर जसेच्या तसे कालच पाहिल्यासारखे ऊभे राहते.

एका तमाशाला एवढी लोकं जमतात हे मी पहिल्यांदा पहात होतो.तमाशाला दिलेले ' लोकनाट्य 'हे नाव खऱ्या अर्थाने सार्थ होत होते.

तमाशाचा खेळ पाहुन दुस-या दिवशी पुन्हा घरी जाण्यासाठी  संध्याकाळी पाच वजता म्हशातून आमचा जथा निघाला. संध्याकाळी भोमाळवाडी येथे एक मुक्काम करून पहाटे तीन वाजता प्रचंड थंडीत आमचा प्रवास सुरू झाला. रानावनातुन, खाचखळग्यातून, बैल घाटाने आम्ही सकाळी आ वाजता भिमाशंकरला आलो. तेथून पुढे चालवेना.परंतू आठ दिवसापुर्वी गाव सोडले होती. घरी जाण्याची ओढ लागली होती.आणि एकमेव त्या ध्यासाने भोरगीरी मार्गे आम्ही दुपारी साडेबारा वाजता घरी पोहचलो. नविन बैलांचे चांगले स्वगत केले गेले.🖊️🙏


सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस