धरणात बुडालेल्या आंबेगाव चा समग्र इतिहास. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धरणात बुडालेल्या आंबेगाव चा समग्र इतिहास. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

धरणात बुडालेल्या आंबेगावचा समग्र इतिहास

धरणात बुडालेले आंबेगाव.

डिंभे धरणात बुडालेले आंबेगाव ही एक अतिशय जुनी अशी खूप मोठी बाजारपेठ होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खेड तालुक्यातील वाडा आणि आंबेगाव तालुक्यातील आंबेगाव या अतिशय मोठ्या अशा बाजारपेठा अस्तित्वात आल्या. व विकसित झाल्या.

आंबेगाव तालुक्यातील पाटण खोऱ्यातील गावे आणि माळीण,असाणे खोऱ्यातील गावे अशा चाळीसगावांची ही प्रचंड मोठी बाजारपेठ अशी होती.

प्रमुख उत्पन्न तांदूळ आणि हिरडा :

आदिवासी भागाचे प्रमुख उत्पन्न म्हणजे भात शेती आणि जोडीला जंगलातील हिरडा गोळा करणे. हिरडा औषधी वनस्पती असल्यामुळे हिरड्याला खूप मागणी असायची. हाच हिरडा आंबेगाव मधील व्यापारी घ्यायचे. म्हणून आंबेगावला हिरड्याचे आंबेगाव असेही म्हटले जायचे.

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात उत्तम प्रतीची भात शेती असल्यामुळे तेथे जीर, तांबडा रायभोग, खडक्या, कोलम अशा उच्च प्रातीचा तांदूळ पिकत असे.

पश्चिम भागातील लोक खटार गाडी मधून भाताची पोती आणून आंबेगाव मधील गिरणीमध्ये भात भरडून घेत. आवश्यक तांदूळ स्वतःसाठी घेऊन उर्वरित तांदूळ व कोंडा ते आंबेगाव मधल्या व्यापाऱ्यांना विकत असत. त्यामुळे आंबेगाव ही हिरड्यांची, तांदळाची आणि कोंड्याची बाजारपेठ म्हणून सबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध होती.

हा तांदूळ खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र, पंजाब आणि मध्य प्रदेशातून व्यापारी लोक आंबेगावच्या बाजारपेठेत येत असत

आंबेगाव तालुक्यात पाटण आणि आसाणे खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिरड्यांचे उत्पन्न होते.उन्हाळ्यामधील बाळ हिरडा, व दिवाळी मधील ढोर हिरडा याला महाराष्ट्रात आणि परदेशात खूप मागणी असल्यामुळे हिरडा उत्पादन हे आदिवासी समाजाचे प्रमुख उत्पन्न आहे.

आंबेगावात हिरड्यांचे अनेक व्यापारी प्रसिद्ध होते. त्यांचे मोठमोठे ट्रक होते. या ट्रकमध्ये रस्ते असलेल्या गावी जाऊन ते हिरडा खरेदी करीत असत.

हिरड्यांच्या वखारी :

आंबेगावात व्यापाऱ्यांच्या हिरड्यांच्या अनेक वखारी होत्या. या वखारीत हिरडा साठवून ते मुंबईला एक्सपोर्ट करीत असत.

आंबेगाव मध्ये अठरापगड जातीचे लोक गुण्या गोविंदाने राहत असत.आंबेगाव हे साधारण दीड ते दोन हजार लोक वस्तीचे पश्चिम भागातील मोठे आणि सधन असे गाव होते. या गावात 80 टक्के लोक हे नोकरी न करणारे होते. तरीही ते अत्यंत सुखी आणि समृद्ध जीवन जगणारे होते.

अखेर डिंभे धरणाने घात केला:

सन 1976 मध्ये मा.शंकरराव चव्हाण पाटबंधारे मंत्री असताना डिंभे खुर्द गावाजवळ घोड नदीवर धरण बांधण्याचा निर्णय झाला. व त्याप्रमाणे भूमिपूजन झाले. या धरणाचे काम सन 1978 मध्ये सुरू झाले. व हे धरण सन 19 92 मध्ये पूर्ण झाले. प्रत्यक्ष पाणी आडवायला 1993 साली सुरुवात झाली.

तत्पूर्वी आंबेगावातील स्थानिक लोकांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन केले.आपले राहते घर आणि गाव सोडून जाताना आंबेगाव मधील ग्रामस्थांना प्रचंड यतना झाल्या. ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो. शाळा शिकलो,आपल्या शेतीत आणि शिवारात कष्ट केले, खेळलो, बागडलो, वाढलो अशा प्रिय बाजारपेठ असलेल्या गावाला सोडून जावे लागणार या कल्पनेने त्यांचे काळीज गलबलून गेले. अतिव वेदना झाल्या.

सन 1993 साला मध्ये प्रत्यक्ष धरणात  पाणी आडवायला सुरुवात केली. आणि बघता बघता आदिवासी समाजाची अतिशय भव्य असलेली बाजारपेठ म्हणजेच आंबेगाव धरणाच्या पाण्यात सा मावरून गेले. प्रत्यक्ष बघणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकले. एकच हलकल्लोळ झाला. जीव गलबलून गेला. आणि थोड्याच वेळात छत्रपतीच्या काळातली ही बाजारपेठ डिंभे धरणाच्या पाण्यात लुप्त झाली. फक्त आठवण तेवढी शिल्लक राहिली. आजही या आठवणीने लोक जगत आहेत.

तत्कालीन घरांची रचना :

तत्कालीन घरी ही बाहेरून दगड व आतून भाजीव विटा मध्ये बांधलेली असत. ही घरे कौलारू दोन पाखी किंवा काही घरी चौमोळी होती. घरांच्या भिंतीमध्ये चुना भरत असत. त्यामुळे ती खूपच टिकाऊ अशी असत. गुजराती व मारवाडी यांची घरे दुमजली होती. आंबेगाव मध्ये अनेक चुना कमावण्याच्या घाणी होत्या. कुंभारांच्या वीट भट्ट्या होत्या.

अठरा पगड लोकवस्तीचे गाव : 

गावात ब्राह्मण, गुजराती, मारवाडी, वाणी, मुसलमान असा व्यापारी वर्ग राहत असे. त्याचप्रमाणे मराठा, कुणबी, कोळी, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, तेली, तांबोळी, बुरुड, बौद्ध,भोई, तांबटकर, सोनार, राउळ, गोसावी, कातकरी इत्यादी स्थानिक आणि बलुतेदार, जमीनदार वतनदार असे अनेक लोक राहत असत .हे सर्व लोक ज्यांच्या त्यांच्या धार्मिक प्रथा सांभाळून गुण्या गोविंदाने एकत्र राहत होते.

वाहतूक व्यवस्था:

आंबेगाव येथे जाण्यासाठी डिंभे खुर्द  मधून पुढे जी धरणाची भिंत आहे. त्या भिंतीच्या डाव्या कोपऱ्यावरून आंबेगावला रस्ता जात असे.

त्यावेळी सकाळी दुपारी आणि संध्याकाळी मुक्कामी एसटी असायची. त्यावेळी एसटी पाटण पर्यंत जात असे. परंतु पावसाळा सुरु झाला की चार महिने एसटी सेवा फक्त आंबेगाव पर्यंतच असे.

आहुपे व तिरपाड येथे एसटी जात नव्हती. सर्व प्रवास पायी असायचा.

आंबेगावातील व्यापाऱ्यांकडे त्यावेळी मोठे मोठे ट्रक होते. या ट्रक मधून हिरड्याच्या मालाची वाहतूक केली जायची. त्याचप्रमाणे बुधवारच्या बाजारात आलेल्या बाजारकरूना ने आण करण्यासाठी ट्रकचा उपयोग केला जायचा. सर्व रस्ते हे खडीचे आणि मातीचे होते. डांबरी रस्ता त्यावेळी अस्तित्वात नव्हता.

भव्य मोठी बाजारपेठ :

आंबेगाव ही साधारण दीड किलोमीटर इतकी लांब अशी भली मोठी बाजारपेठ होती.

या बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा अनेक किराणा मालाची दुकाने, खेळण्याची दुकाने, राईस मिल, पिठाच्या चक्क्या, हिरड्याच्या वखारी, पोलीस चौकी, तेलाचे घाणे, सुतार काम, लोहार कामाची दुकाने, हॉटेल, कपड्याचे दुकाने, शालेय स्टेशनरीची दुकाने, विविध प्रकारचे मंदिरे, चौक, पिंपळाची झाडे अशा अनेक प्रकाराने समृद्ध अशी बाजारपेठ होती. 

या बाजारपेठेमध्ये शेवंतीलाल, चूनिलाल वाणी, बाबू वाणी, मंगू वाणी, पोपटलाल, कांतीलाल शहा, चंपा शेठ, मगन शेठ, छगन शेठ, सुमती लाल, नटवरलाल, जयंतीलाल व बच्चूशेठ शुक्ल, रतिलाल, लक्ष्मीपूत्र नरोत्तम मामा, असे मुख्य किराणा भुसाराचे ध धान्य खरेदी विक्रीचे आणि हिरडा, बेहडा, तुप, मध यासारखी स्थानिक उत्खपादने खरेदीचे आंबेगावातील मोठे व्यापारी होते...

त्यांची घरी ही मुख्यत: रस्त्याच्या दुतर्फा असून दुमजली होती. बाजारपेठेत अनेकांच्या घरावर 'हिरड्यांचे व्यापारी' अशा पाट्या लावलेल्या असत. अनेक व्यापाऱ्यांच्या दारात पाण्याचे आड असत. या अडातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होत असे. शिवाय अनेक व्यापाऱ्यांच्या हिरड्याच्या व भाताच्या कोंड्याच्या वखारी होत्या. वखारी म्हणजेच गोडाऊन.

शंकराचे दगडी मंदिर: 

गावाच्या खाली पश्चिमेला घोड नदी होती. नदीला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पुर यायचा. नदीला सुंदर असा दगडी घाट होता. तेथेच शंकराचे मंदिर होते. या मंदिराचा गाभारा पाच फूट खाली खोल होता. मंदिरात गेल्यावर पायऱ्या उतरून शिवलिंगाचे दर्शन घ्यावे लागायचे.

आंबेगाव मधील लोकांची या मंदिरावर खूप श्रद्धा होती. दररोज तसेच प्रत्येक सोमवारी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी व्हायची. 

एखाद्या वर्षी जर पाऊस पडला नाही तर गावातील जेष्ठ लोक एकत्र यायचे.आणि महादेव पाण्यामध्ये कोंडायचा निर्णय व्हायचा.

गावातील समस्त स्त्रीया आपापले हांडे पाण्याने भरून भजनी मंडळी सोबत भजन म्हणत मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगावर आपापले पाण्याने भरलेले हंडे रिकामे करून शिवाला जलाभिषेक करत असत. गाभारा पाण्याने भरून जाई. हर हर महादेवाचा गजर होई पाऊस पडू दे ! साय माय पिकू दे ' आबादाणी होऊ दे ' म्हणून महादेवाला साकडे घातले जात असे.

देवाला अभिषेक व्हायचा.आणि पाऊस पडून आबादीआबाद होईल या आंतरिक श्रद्धेने पाणी मंदिराच्या उत्तरेला असलेल्या दगडी गाय मुखातून सोडून द्यायचं. मंदिराच्या उत्तरेला पाठीमागे दगडी गायमुख होते. त्यामधून सगळं पाणी नदीच्या प्रवाहात वाहत जाई. महादेवाच्या कृपेने पाऊस पडला की गावकरी मनाने तृप्त होत. असं गाव आणि अशी श्रद्धा.

चला,गावात प्रवेश करू या.

पूर्व दिशेकडून आंबेगावात प्रवेश केला की पहिला पिराचा माळ लागायचा. तेथे पिर बाबाचे हिंदू-मुस्लीम सगळेच दर्शन घ्यायचे. 

थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला कमलजादेवीचे मंदिर लागायचे. दुपारच्या वेळी काही लोक तेथे विसाव्याला पहुडलेले असायचे. मंदिराच्या जवळ गर्दशी झाडी होती.

सुतार काम: 

तिथेच सुतारांची घरे होती. तेथे नवीन बैलगाड्या तयार करण्याचे काम चालायचे. खटारगाडीच्या लाकडी चाकाच्या आऱ्या, साटी, लोखंडी धावा, आणि इतर साहित्य तयार करण्याचे काम चालत असे. तसेच दुरुस्तीची कामे सुद्धा केली जायची. त्यावेळी बाबुराव भालेराव हे प्रसिद्ध सुतार अतिशय कलाकुसरीच्या लाकडी वस्तू बनवत असत.

शेजारीच नांगर, कुळव,पाभार, जुकाड, लाकडी हळशी, अशी शेतीची अनेक अवजारे नवीन आणि दुरुस्ती अशी कामे या ठिकाणी चालत असत. अनेक शेतकरी त्या ठिकाणी बसून असत. सुतार आपले काम करत राही. आणि लोक कट्ट्यावर बसून गप्पा चघळत बसलेले असत.

लोहार काम : 

तेथेच लोहाराचे दुकान होते. तिथे विळे, कोयते, पहारी यांना धार लावून दिली जात असे. तसेच पहारी, खोरे, टिकाव, फाळ इत्यादी वस्तू शेवटण्याचे काम सुरू असे.

तेथे मोठा लाकडी भात्या असायचा.त्याची दांडी सतत खालीवर करणारी लोहाराची म्हातारी तेथे बसलेली असायची. त्यामुळे भात्याला वारा मिळायचा. आणि आग धगधगत राहायची. ऐरणीवर लोखंडाचे घाव मारून शस्त्र आणि अवजारांना धार लावायचे आणि शेवटण्याचे काम सतत चालू असे.

तेथेही मोठ्या प्रमाणात लोकांचा राहता असे. विशेषता सुगीच्या दिवसात म्हणजेच भात काढणीच्या आधी लोकांची खूपच गर्दी असे.

ग्रामदैवत मुक्ताबाई व यात्रा: 

अजून थोडं पुढे गेल्यावर ग्रामदैवत मुक्ताबाईचं मंदिर लागायचे. मुक्ताबाई देवी आंबेगावचे ग्रामदैवत होते. 

चैत्रात तिसऱ्या मंगळवारी मुक्ताबाईची मोठी यात्रा भरायची.यात्रेत पालखीचा मान पिढ्यानुपिढ्या विरणकांकडे होता.यात्रेला भागातून सर्व लोक मोठ्या उत्साहाने येत असत. गावामध्ये लोकांची प्रचंड गर्दी होत असे. सकाळी मांडव डाहाळे व हरतुरे, नारळ फोडणे, प्रसाद वाटप होत असे. तर दुपारी लोक दंडवत घेण्यासाठी मंदिरात गर्दी करत. संध्याकाळी पुरणपोळीचे जेवण असे.

संध्याकाळी देवीची पालखी निघत असे. त्यानंतर विविध गावांच्या भजनाचा कार्यक्रम असायचा. करमणुकीसाठी दत्ता महाडिक,चंद्रकांत ढवळपुरीकर, रघुवीर खेडकर, गणपत व्ही. माने, विठाबाई नारायणगावकर असे मोठे मोठे तमाशा असत.

दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम होत असे. त्यानंतर कुस्त्यांच्या भव्य दंगली होत असत.

आंबेगावातील मुक्ताबाईच्या यात्रेला पश्चिम भागातून लोकांचा महापूर लोटत असे.

शितळा देवीचे मंदिर :

मुक्ताबाईच्या मंदिराच्या मागे शितळा देवीची दोन छोटी मंदिरे होती. एका मंदिरावर नाग कोरलेला होता.

तसेच पुढे चालत गेल्यावर कुंभारवाड्या तील वीर मंदिर दिसायचे.

मारुती तालीम:

चौकातून खाली दगडी वाट उतरून गेलं की खालच्या मारुतीचे मंदिर. मंदिराबाहेर चाफ्याचे झाड होते. या झाडाला वर्षभर फुले येत असत. चाफयाच्या फुलांचा सुगंध दूरपर्यंत दरवळत राही. तेथेच पहिलवानांच्या कुस्त्यांच्या तालमी चालायच्या.

हनुमान जन्मोत्सव :

तेथून पुढे उजव्या बाजूने वर आले की रहाडीसमोर दुसरे एक मारुती मंदिर होते. तिथे श्रावण महिन्यात प्रवचने आणि अनेक धार्मिक ग्रंथांची पारायणे चालत असत. तिथे सांप्रदायिक भजने देखील होत असत.  

हनुमान जयंतीला मोठ्या भक्ती भावाने हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात असे. गूळ खोबऱ्याचा प्रसादाचे वाटप होई. मारुतीरायावर चाफ्याच्या पांढऱ्या फुलांचा वर्षाव व्हायचा. संध्याकाळी गॅस बत्तीच्या उजेडात भजने व्हायची.

प्रसिद्ध असे जैन मंदिर: 

सरळ पुढे बाजारपेठेतून गेलं की जैन मंदिर लागायचे.दगड विटा मध्ये बांधकाम असलेल्या या जैन मंदिरात जैन धर्मातील कल्याण पार्श्वनाथ, विमलनाथ व वासुपुज्य स्वामी यांनी या मंदिरासाठीच्या जिर्णोद्धारासाठी दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आहे. त्यांची नावे मंदिराच्या पुर्व भिंतीच्या संगमरवरी दगडावर कोरलेली आहेत.

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गज लक्ष्मीचे कोरलेले शिल्प आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर सरस्वतीची मूर्ती आहे. खांबावरील कोरीव नक्षी, छतावर असलेली गोलाकार अतिशय सुंदर अशी वर्तुळे, कोरीवकाम आणि नक्षीकाम पाहण्यासारखे आहे.

आतील गाभा-याच्या प्रवेशद्वारावर  सरस्वती व दोन मोर कोरलेले आहेत. अतिशय सुंदर असे हे कोरिव काम आहे.

मंदिरात श्री पार्श्वनाथाची ध्यानस्थ बसलेली अतिशय रेखीव आणि सुरेख मूर्ती होती. हे मंदिर साधारण 1867 मध्ये बांधले होते.

आजही हे मंदिर धरणाचे पाणी कमी झाल्यावर पाहायला मिळते. इतकी वर्ष पाण्यात राहूनही मंदिर सुस्थितीत आहे.

जैन मंदिराच्या मागे मोठा भाजक्या विटांनी बांधून आणलेला मोठा आड होता. 

जैन मंदिराच्या पुढच्या चौकात सुंदर असे श्रीराम मंदिर होते. त्या शेजारी गणपतीचे मंदिर होते.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर :

पुढे गेल्यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर होते. हे मंदिर बाहेरून दगड व आतून विटा अशा पद्धतीचे बांधकाम होते. मंदिरात भजन, काकड आरत्या दररोज होत असत. तेथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जायचा. आज सप्ताह सात दिवसाचा असायचा. प्रवचन, हरिपाठ कीर्तन व हरी जागर तिथे चालत असे. अनेक हरिभक्त पारायण असलेले लोक प्रवचन कीर्तन करून आपली भागवत धर्माची पताका फडकवत असत.

आषाढ महिन्यात इथूनच दिंडी निघायची. दिंडीला जाणाऱ्या लोकांमध्ये राम कृष्ण हरी चा गजर करत सारा गाव दिंडीमध्ये सामील व्हायचा. वारकऱ्यांना निरोप द्यायला भाविक लोक पिराच्या माळापर्यंत जायचे.

संक्रातीला सुगड घेऊन सगळ्या सवाक्ष्ण स्रिया विठ्ठल रखमाईच्या दर्शनाला येत असत. तिथे सुगडीचा वाण एकमेकींना देत असत.

आजही या मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे भग्न मूर्ती देखील. ह्या मूर्ती साधारण सोळाव्या शतकातील असाव्यात असे मत आहे. यावरून आंबेगाव ही बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली होती हे सिद्ध होते.

विठ्ठल मंदिरा शेजारी बाबा संत व नंदू संत यांचा वाडा होता. त्यांच्या वाड्यामध्ये मोठा आड होता. सय्यद सेठ यांच्या घरामागे मोठी विहीर होती. महादेव जोशी यांच्या वाड्यामध्ये सुद्धा मोठा आड होता.

कवडधारा मंदिर :

गावाच्या बाहेरच्या माळावर कवडधरा मातेचं छोटे मंदिर होते. तिथेच खाली खोल असा कडा होता. या कड्यामध्ये दत्त मंदिर होते. 

म्हसोबा मंदिर : 

नदीपात्राच्या कडेला म्हसोबाचे मंदिर होते. म्हसोबा  मंदिराजवळच स्मशानभूमी होती. गावातील दशक्रिया विधी तेथेच होत असत.

तेलाचे दगडी घाणे:

गावात पूर्वी अनेक तेलाचे घाणे होते.हे तेल घाणे दगडी गोल आकाराचे असत. साधारण आठ दगडाचे घाणे होते.

नाथा केदारी, बाबुराव तेली, बबनराव मोहळे, भिकू पन्हाळे, रत्नाकर डाके यांचे तेलाचे घाणे होते.

आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात खुरसण्याचे पीक आणि भुईमुगाचे पीक  घेतले जात असे. हे सर्व लोक शेंगदाणे  व खुरासनी घेऊन बाजाराच्या दिवशी तेल गाळण्यासाठी तेथे खूपच गर्दी करत असत. वर्षभर पुरेल इतके तेल घेऊन उर्वरित तेलाची ते विक्री करत असत. खुरासण्याचा व शेंगदाण्याचा चोथा जनावरांना पेंड म्हणून त्याचा उपयोग होत असे. 

रुपाजी दगडे सावकार:

रुपाजी दगडे हे गावात खूप मोठे सावकार होते. त्यांचा भला मोठा म्हशींचा गोठा होता. गोठ्यामध्ये चाळीस ते पन्नास म्हशी होत्या. हॉटेलला,आणि डेअरीला ते दूध घालत असत. तसेच किरकोळीने ही विक्री होत असे. ते गावातील मोठे सावकार देखील होते.

शंकरराव घोलप यांची विहीर व मोट: 

घोलप आळीला गेल्यावर शंकराव घोलप यांची तेथे खूप मोठी विहीर होती. या विहिरीवर मोट होती. या पाण्यावरच शेती फुलायची. 

त्यांच्या या शेताला बाग शिवार म्हणायचे. या विहिरीवर मोट चालायची. बैल मोट ओढायचे. थारोळ्यातून पाणी थेट शेतीला बैलांसाठी सावली मिळावी म्हणून ओळीनं आठ-दहा निलगिरीची झाडे लावलेली होती. त्या झाडांच्या सावलीत मोट चालायची. 

चल माझ्या राजा, चल रं सर्जा 

बिगी बिगी डौलान रं, डौलान

गाऊ मोटं वरचं गाणं, रं गाणं

बुधवार गावचा बाजार :

बुधवारी आंबेगावचा बाजार भरत असे. या बाजारात आहुपे खोरे आणि पाटण खोऱ्यातून अशा चाळीसगावचे लोक बाजाराला येत असत. 

शिमग्याचा बाजार व पावसाळ्याच्या पूर्वीचा म्हणजेच आघुटीचा बाजार हे दोन ते तीन दिवस चालायचे.

शिमग्याच्या बाजाराच्या आदल्या दिवशी मोठमोठे नामांकित तमाशे आंबेगाव ला येत असत. व तीकटीवर तमाशा दाखवत असत. 

हिरडा खरेदी :

आंबेगावच्या पुढच्या वचपे गावच्या  बाजूला पिंपळाच्या झाडाजवळ हिरड्यांचे व्यापारी हिरडा घेण्यासाठी बसत असत. तिथे मोठ्या प्रमाणावर हिरड्यांची खरेदी होत असे.

बाहेरगावचा व्यापारी वर्ग :

त्याचप्रमाणे आंबेगावच्या बाजाराला बाहेरगावचे व्यापारी दर बुधवारी येत असत.मंचर,घोडेगाव व शिनोली येथून व्यापारी यायचे शिनोलीचे गफूर भाई तांबोळी आणि मुलाणी खाण्याच्या विड्याची पाने विकायचे.

घोडेगावच्या आर्वीकर आणि मेहेर यांची तंबाखू प्रसिद्ध होती. त्यावेळी खाण्यासाठी पिवळी तंबाखू व मशेरी भाजण्यासाठी असलेली बारीक पानांची तंबाखू यांना प्रचंड मागणी होती. तंबाखू घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत असे.

बच्चू शेठ शिनोलीकर हे बाजरीची 50 ते 60 पोती आणायचे. त्यावेळी बाजरी दोन रुपये किलो अशी होती. हिरडा घालून आलेल्या पैशात लोक बाजरीचे कट्टे खरेदी करायचे.

वशटाचा बाजार :

हाडकी हाडवळ्याच्या हद्दीत वशटाचा मोठा बाजार भरत असे. लोक मोठ्या प्रमाणात वाळलेले बोंबिल, सुकट, वाकट खारा मासा, ढोमेली मोठ्या प्रमाणात विकत घेत असत. पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी जो बाजार भरत असे त्या बाजाराला लोक आघोटीचा बाजार असे म्हणत असत. हा बाजार प्रचंड मोठ्या प्रमाणात भरत असे.

पश्चिम भागात पुढील चार महिन्यात प्रचंड पाऊस पडत असे. खूप पावसामुळे लोकांचे येणे जाणे होत नसे. त्यामुळे पुढील चार महिने पुरेल असा बाजार ते एकदम भरत असत.

रेडीमेड कपडे : 

मंचरचे क्षीरसागर रेडीमेड शिवलेले कपडे  आणायचे. तेथे गंडेपट्ट्याच्या चड्ड्या, बनियन, अंडरवियर, टॉवेल, टोप्या, मुलांचे गणवेश, खाक्या चड्डया व पांढरे शर्ट, छत्र्या, लहान मुलांची कपडे, लुंग्या अशा अनेक प्रकारचे कपडे आठवडे बाजारात विक्रीस असत. 

त्याचप्रमाणे पेठेत अनेक मोठमोठी कापड दुकाने होती. दैनंदिन कपडे त्याचप्रमाणे लग्नाचे कपड्यांचे बस्ते, मानापनाची लुगडी, टॉवेल टोप्या इत्यादी साहित्य मोठ्या प्रमाणात शहा यांच्या कपड्याच्या दुकानातून खरेदी केली जात असे. त्याचप्रमाणे अजूनही दोन-चार कपड्यांचे दुकान होती.

बस्ता बांधल्यानंतर दुकानदार बस्ता बांधण्यासाठी कपडे घेण्यास आलेल्या आलेल्या लोकांना दोन-तीन किलो लाडू घेऊन देत असे. त्यानंतर लाडूचे वाटप होत असे.

भांड्यांची दुकाने :

शेजारीच भांड्यांची दुकाने देखील होती. लग्नसराईच्या वेळी ही दुकाने तुफान चालायची. अहेराची भांडी, घरगुती भांडी, तांब्या पितळेची भांडी या ठिकाणी मिळत असत.

पश्चिम भागातून आलेले अनेक लोक या ठिकाणाहून भांड्यांची खरेदी करत असत.

घड्याळाची दुकाने आणि दुरुस्ती :

त्यावेळी पेठेमध्ये एक-दोन घड्याळाची दुकाने होती. तेथे नवीन घड्याळ घेण्यासाठी आणि घड्याळ दुरुस्तीसाठी लोकांची गर्दी होत असे. विशेष म्हणजे तेव्हा चावीची घडाळे होती. दररोज सकाळी घड्याळाला चावी द्यावी लागत असे. चावी दिली तरच घड्याळ चालायचे.

सायकल रिपेअरिंग:

तिथेच पुढे गेल्यावर सायकल दुरुस्तीचे दुकान होते. या ठिकाणी सतत सायकलिंगची दुरुस्ती केली जात असे. अनेक लोक आपल्या सायकली दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी आनत असत.

शालेय स्टेशनरी :

सायकल रिपेरिंग दुकाना शेजारी शालेय स्टेशनरीचे दुकान होते.अजून थोडे पुढे गेल्यावर अजून दोन दुकाने होते.

या दुकानांमध्ये शालेय साहित्य, वह्या पुस्तके, नवनीत गाईड, दहावीचे अपेक्षित प्रश्नसंच, वह्या पुस्तकांचे कव्हर, कंपास पेटी, रंगपेटी, पेन आणि पेन्सिल असे अनेक साहित्य मिळत असे. शाळा सुरू होण्यापूर्वी या दुकानांमध्ये शालेय साहित्य घेण्यासाठी लोकांची अगदीच झुंबड उडालेले असे.

कासार:

त्या शेजारी कासारांची दुकाने बांगड्या भरण्यासाठी मांडलेली असत. त्यावेळी हातभर बांगड्या घालण्याची पद्धत होती.

प्रसिद्ध धोंडिबा न्हावी:

धोंडीबा कृष्णा शिंदे यांचे आंबेगाव मध्ये अतिशय प्रसिद्ध असे केश कर्तनालय दुकान होते. ते मोठे बलुतेदार देखील होते. बलुतेदार म्हणजे वर्षभर एखाद्या कुटुंबाच्या पुरुष व्यक्तींचे केस कापायचे. व त्या बदल्यात भात काढणीच्या वेळी त्यांना त्यांना ठरलेले भात आणि कठाण द्यायचे. आता तुम्ही म्हणाल कठाण म्हणजे काय? तर सुगी संपल्यानंतर ज्या जमिनी नवल आहे तेथे लोक हरभरा, वाटाणा, मसूर असे धान्य पेरायचे. त्यानंतर या धान्याचे मोठे पीक घ्यायचे. यालाच कठाण कुठाण असेही म्हटले जायचे.

तसेच आंबेगावात अजूनही दोन-तीन नाव्ह्यांची दुकाने होती.

पडकई :

त्यावेळी पश्चिम आदिवासी भागात भात आणि नाचणीची शेती केली जायची. त्यासाठी माघ  महिन्यात प्रत्येक गावात पडकई असायची. पडकई म्हणजे गावातील सर्व शेतकरी लोक एकत्र येऊन प्रत्येकाच्या शेतात एक दिवस काम करायचे. त्यावेळी नाचणीची आणि भाताची रोपे भाजायची पद्धत होती. त्यासाठी झाडाच्या फांद्या तोडून त्यांची ओझी एका ठिकाणी ओळीने रचून ठेवायची. यालाच राब काढणे असे म्हणतात. किंवा राबणी असेही म्हटले जाते. 

झाडाच्या फांद्या वाळल्यावर त्या शेत नांगरून केलेल्या भुसभुशीत जमिनीवर अंथरूण त्यावर गवत टाकून पेटवून देतात यालाच दाढ भाजणे असे म्हणतात.

तर प्रत्येक गावात अशा पडकई असायच्या. प्रत्येकाच्या शेतात राब काढायला जायचा. किंवा दुसरी बांधबंधिस्तीची कामे केली जायची. 

काही लोक पडकई मध्ये भाग घेत नसत. किंवा इतर कारणामुळे त्यांना ते शक्य नसे. त्यावेळी ते ठराविक पैसे देऊन आपल्या शेतात ही पडकई राबवून घेत असत.

त्यावेळी गावात अनेक लोकांकडे अशा पडकई राबवून घेतल्या जायच्या. त्यामुळे त्यांच्याकडे बरेच पैसे जमा होत असत. हे सर्व पैसे एकत्र करून हे गावातील लोक होळीच्या बाजाराला आंबेगावला जात असत. प्रत्येक पडकाईवाले 25 ते 30 गुळाच्या ढेपी खरेदी करीत असत. त्याचप्रमाणे 50 ते 60 किलो हरभऱ्याची डाळ खरेदी करत असत. 30 ते 40 किलो खोबरे खरेदी केले जाई. व घरी गेल्यानंतर त्यांचे समान वाटप करत असत.

ही सर्व खरेदी एका पडकईची होती. तर अशा गावे आणि वाड्यावत्यांसह त्यावेळी पश्चिम भागात साधारण शंभर ते सव्वाशे पडकई होत्या. त्यामुळे किती माल संपत असेल याचा विचार करा. शिवाय फुटकळ गिऱ्हाईक वेगळेच.

वर्षाची कमाई दोनच बाजारांत:

यावरून आंबेगावच्या बाजारपेठेचा व्याप लक्षात घेता ही किती मोठी बाजारपेठ होती याचा अंदाज येतो. 

शिमग्याच्या आणि आघुटीच्या बाजारात या दोनच बाजारात व्यापाऱ्यांची संपूर्ण वर्षाची कमाई होत असे.

आंबेगाव ही गुळाची बाजारपेठ :

त्यावेळी आंबेगावच्या बाजारात प्रचंड गुळाच्या ढेपी खपायच्या. प्रत्येक ढेप ही साधारण 20 किलोची असायची. डाळीची पोतीच्या पोती रीती व्हायची. त्यामुळे आंबेगाव ही गुळाची बाजारपेठ म्हणूनही प्रसिद्धीस आली होती.

शिमग्याच्या बाजाराला लहान मुलांना व स्त्रियांसाठी कापडांची खरेदी केली जायची. त्यामुळे हा बाजार दोन ते तीन दिवस चालत असे.

कासाराच्या बांगडीच्या दुकाना शेजारी चणे फुटाण्या पासून किराणा व भुसार मालाची ओळीने दुकाने मांडलेली असत. 

बाजारात खाण्याच्या वस्तुपासून, साठवून ठेवायच्या वस्तू पर्यत सारं काही विक्रीस उपलब्ध असे. 

पेठेमध्ये अनेक किराणा मालाची दुकाने होती.

बाजाराच्या दिवशी नेहरू चौका पासून मुक्ताबाईच्या मंदिरा पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बाजाराची पालं मांडून विक्रीस वस्तू ठेवलेल्या असत. मोठे दुकानदार मंगळवारीच मुक्कामाला येत.

खाऊ गल्ली आणि हॉटेल:

त्यावेळी बाजारात भोकरे शेठ यांची ओली भेळ फारच प्रसिद्ध होती. बाजार करून झाल्यावर लोक भेळ खाण्यासाठी तिथे जमायचे.

मटकी भेळवाला मटकी भेळ घेऊन बाजारातून फिरायचा. व आपला माल हातोहात संपवायचा. 

गावात इनामदारांचे आणि बबनराव घोलप यांचे हॉटेल प्रसिद्ध होते. 

बबनराव घोलप यांची साबुदाणा खिचडी खूपच प्रसिद्ध होती. त्याचप्रमाणे त्यांचे कळीचे लाडू खूपच लोकप्रिय होते. हे लाडू कोकणातील धसई, कर्जत आणि मुरबाड पर्यंत निर्यात होत असत. इतकी गोडी हे लाडू मध्ये होती.

सय्यद शेठ यांची मिसळ, वडा आणि खाज्या प्रसिद्ध होता. मिसळ खाण्यासाठी सय्यद शेठ यांच्या हॉटेलात खूपच गर्दी होत असे.

शिवाय नानाचा गुळाचा पेढा आणि दळवी आचाऱ्याचा पेढा सुद्धा खूपच लोकप्रिय होता. अजूनही त्याची चव अनेकांच्या जिभेवर रेंगळत असेल.

नाथाभाऊ च्या चिवड्याची सुद्धा अनेकांना आठवण येत असेल. त्याचप्रमाणे त्यांची भजी आणि बर्फी सुद्धा तितकीच प्रसिद्ध होती. 

बुवा राऊळ यांची कांदा भजी खूपच फेमस होती. बुवा राऊळ हे कढईमध्ये भज्यांचा घाणा सोडत असत तेव्हा त्याचा दरवळ असमंतात दरवळत असे. आणि त्या दरवळीने खवय्यांचे पाऊल बुवा राऊळ यांची भजी खाण्यासाठी आपोआप वळत असत. 

ममत्या नाना घोलप यांचीही हॉटेल प्रसिद्ध होते.

घोंगड्यांचा व्यापार :

आंबेगावच्या बाजारात जून महिन्यात घोंगड्यांना खूप मागणी असायची. खूप मोठा घोंगड्यांचा बाजार भरत असे. सोलापूर वरून व्यापारी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच घोंगड्यांचे मोठमोठे बंडल आंबेगाव मध्ये दाखल होत असत. 

गावातील मनाजी कुंभार यांच्याकडे ह्या घोंगड्या बांधलेले बंडल उतरवायचे. त्या बदल्यात त्यांना भाड्यापोटी आठ दहा घोंगड्या देण्यात येत असत.

आंबेगावच्या बाजाराच्या दिवशी  ग्रामपंचायत शेजारी मोकळ्या जागेत ते निरनिराळ्या घोंगड्या विक्रीसाठी ठेवत असत.पांढऱ्या,करड्या आणि काळ्या रंगाच्या घोंगडया विक्रीसाठी उपलब्ध असत.या घोंगड्या आठ फूट, दहा फूट आणि बारा फूट लांबीच्या असत. ग्राहकांची त्या ठिकाणी घोंगड्या घेण्यासाठी एकच झुंबड उडालेली असे.

आयुर्वेदिक औषधांची दुकाने:

लमाण समाजही कवडधरा देवीच्या माळावर उतरत.ते लोक आयुर्वेदिक  औषधे, हातातील अंगठ्या, खडे,शंख विकत असत. त्यांचा महिलांचा पोषाख  रंगीबेरंगी आणि कपड्यांवर बिलोरी आरसे असा असे.आजारी असलेल्या माणसाच्या हाताला ते कुठलातरी मलम चोळत. मलम चोळल्यावर हाताच्या त्वचेवरून मोठ्या प्रमाणात धूर निघत असे.

वैदू समाज:

सुगीच्या दिवसात वैदू समाज दरवर्षी आंबेगावात येत असे. हे लोक पिराच्या माळावर उतरत असत.आणि आपले पाल म्हणजेच तंबू पिराच्या माळावर ठोकत. व त्यामध्येे आपला संसार थाटत असत.

वैदु लोक हे आदिवासी भागातील गावागावांमधून अगदी सकाळी सकाळी डबे sss करा, डब्याला झाकण sss बनवा, अशी हाळी देत फिरून रिकामे तेलाचे डबे घेऊन त्याच्या वस्तू बनवून ते आदिवासी भागात विकत असत. तुटलेल्या जुन्या लोखंडी वस्तूंना जोड देत असत.आणि त्या बदल्यात भात घेत असत. काही वैदू जडीबुटीचे औषध लोकांना देत असत. व घरगुती उपाय करत. संध्याकाळी ते आपल्या पिराच्या माळावरील पालावर येत असत.

शरीराच्या दुखऱ्या भागात ते मोठमोठ्या सुया टोचून शरीरातील काळे रक्त काढत असत. यालाच तुंबडी लावणे असे म्हणत. तुंबडी लावल्यावर अनेक लोक बरे झाल्याची सुद्धा उदाहरणे आहेत.

सुया घे, दाभण घे, बायो:

वैदू बाया म्हणजेच वैदिनी गोधड्या शिवायच्या सुया, दाभण, दोऱ्याचे बंडल, पोत, नाकातील फुल्या, केसातील चाप, आरसे, कंगवे,लहान मुलींच्या बांगड्या, व लहान मुलांसाठी केसावर फुगे विकत असत. त्यांच्याकडून स्रिया हातावर व कपाळावर गोंदून घेत असत.

त्यांच्या डोक्यावर गोधडी सारखी एक मोठी खोळ असे. त्यामध्ये ते विक्री केलेल्या वस्तूच्या बदल्यात भात घेत असत. 

साधारण दीड-दोन महिने त्यांचा मुक्काम आंबेगावातील पिराच्या माळावर असे.

त्यांनी गोळा केलेले भात गुंजाळाच्या गिरणीतून भरडून त्याचे तांदूळ करून घेत. गरजेपुरता तांदूळ ठेवून उर्वरित तांदूळ  शेवंती शेठ यांना विकत असत.  

म्हाताऱ्या झालेल्या वैदिनी त्यांच्या पालात बसून गोधड्या शिवायचे काम करत. व त्या गोधड्या विकत असत. किंवा व्यापारी लोकांना गोधड्या शिवून देत असत. त्यासाठी त्यांची मजुरी ते घेत असत.

आंबेगावला वळसा मारून घोडनदी पुढे धावत असे. त्याचप्रमाणे बोरघर कडून आलेला ओढा, कड्यात उतरून नदीला मिळायचा. त्यामुळे बाराही महिने ओढ्याला आणि नदीला पाणी असायचे.

गावात प्रवेश केल्यावर धोंडीबा कातकऱ्यांच्या घरामागे मोठी विहीर होती. तसेच नेहरू चौकाजवळ मोठी विहीर होती. या विहिरीला बाजार विहिर असे म्हणत असत. बाजाराला आलेले बाजार करू या विहिरीवर पाणी पीत असत.

गाव विहीर :

उजव्या बाजूला ओढ्याकडे जाताना एक विहीर होती. या विहिरीला गाव विहीर असे म्हणत. या विहिरीच्या पाण्याची चव  अमृतासारखी होती. सर्व गाव विहिरीचे पाणी शेंदून पिण्यासाठी वापर करायचे.

कुंभार वाडा :

कुंभार वाड्याच्या मागे श्री गोवर्धन शेठ यांच्या घरापुढे मोठा आड होता. कुंभार वाड्यामध्ये अनेक कुंभारांकडे गाढवे होती. ही गाढवे हिरड्याची ओझी, माती, वाळू अशा जड मालाची वाहतूक करत असत. त्यामुळे कुंभारांचा हा व्यवसाय मोठा भरभराटीला आला होता.

नदीच्या बाजूला अनेक कुंभारांच्या वीटभट्टी होत्या. वीट भट्टी साठी लागणारी माती ही गाढवावर वाहून आणली जात असे.

त्याशिवाय चुली बनवणे, गाडगी, मडकी, मोठमोठे रांजण, बैलपोळ्याला बैल आणि गणपती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. आणि पश्चिम आदिवासी भागातून या सर्व साहित्याला खूप मोठी मागणी होती. 

गडगी

खाली उत्तरेला गेल्यावर गाडगीचा जिवंत पाण्याचा झरा. गाडगीत चोवीस तास बारा महिने आणि तीनही ऋतूत जिवंत पाण्याचा झरा वहायचा. तेथे पाणी भरपूर असायचे पण हे पाणी आळणी आणि मचूळ होते. त्यामुळे हे पाणी कुणीच पीत नसत. 

डाव्याबाजुला मोरोपंत संत व बाबा संत यांच्या वाड्यात मोठा आड होता. बंडोपंत यांच्या घरीही पाण्याचा मोठा आड होता. 

शाळा व विद्यालय:

आंबेगाव येथे चौथीपर्यंत मराठी शाळा होती व इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत मा. कृष्णराव मुंडे साहेबांच्या आदिवासी शिक्षण संस्थेचे हायस्कूल होते.

त्या ठिकाणी 400 ते 500 विद्यार्थी शिक्षण घेत होते. शिवाय तिथे मुलांना राहण्यासाठी वस्तीगृहाची सुद्धा सोय केलेली होती.

पोस्ट ऑफिस :

आंबेगाव मध्ये पोस्टाचे ऑफिस देखील होते. या पोस्टमधून पश्चिम भागात पोस्टाचे काम चालत असे.

पोलीस चौकी:

आंबेगाव गावात पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या इमारतीमध्ये पोलीस चौकी होती.

सरकारी कार्यालय:

आंबेगाव गावात ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, फॉरेस्ट डिपार्टमेंट, पोलीस चौकी, पोस्ट ऑफिस, जिल्हा परिषद ची शाळा, हायस्कूल, मुलांचे वसतिगृह, मंडल अधिकारी यांचे कार्यालय, विविध कार्यकारी सोसायटी व जनावरांचा दवाखाना अशी अनेक कार्यालये होती. 

गावाजवळ, पिंपळ, आंबा, जांभूळ, साग, सादडा, हिरडा, सायर, काकड, पांगारा, मोगीर, आईन, तोरणे, आंभेळी, काटी साबर, चिल्हार, आवळा, करवंद अशी अनेक झाडे आणि झुडपे होती.

तत्कालीन पेहराव :

त्यावेळेसच्या लोकांचा पेहराव हा धोतर पैरण व डोक्यावर पागोटे तर काही लोक लेंगा पैरन आणि टोपी घालायचे. तर स्रिया लुगडे आणि चोळी किंवा झंपर हा वेश परिधान केलेला असायचा. वयोवृद्ध स्त्रिया मांडवकर लुगडी नेसायच्या तर तरुण आणि मध्यमवर्गीय महिला छापील पातळ लुगडे नेसायच्या. 

मोडी लिपी अनेकांना येत होती. त्यावेळेस सर्व हिशोब तोंडी चालत असे. पावकी, निमकी, दिडकी, अडीचकी यावर त्यांचा विशेष भर असायचा.

तत्कालीन शेती:

भात हे मुख्य पीक होते. तसेच नाचणी व सावा ही पावसाळी पिके होती. तर रब्बी हंगामात वरई,उडीद, मूग, भुईमूग,घेवडा, वाल, चवळी हया पिकांचे उत्पादन होत असे. शिवाय काही लोक बागायत पिके देखील करत असत.

डिंभे धरण झाल्यामुळे या पाणलोट क्षेत्रात आंबेगाव, कोकणेवाडी, कानसकरवाडी, कोलतावडे, फुलवडे, वचपे, कळंबई, दिगद आणि मेघोली ही गावे पूर्णतः धरणाच्या पाण्यात लुप्त झाली. काही उर्वरित गावांची शेती पाण्याखाली गेली. त्यामुळे ती गावे सुद्धा विस्थापित झाली.

कोकणेवाडी आणि बोरघर :

कोकणेवाडी ही आंबेगावची एकमेव वाडी होती. या वाडीत कोकणे आणि कानसकरांची घरी होती.

तर बोरघर हे आंबेगावच्या उत्तरेला अगदीच समोरासमोर होते. बोरघर हे स्वतंत्र्य गाव आहे.

सर्वात मोठी निर्यातदार बाजारपेठ :

आंबेगाव ही सर्वात मोठी तांदूळ, हिराडा आणि भाताच्या कोंड्याची प्रचंड मोठी निर्यातदार बाजारपेठ होती. आंबेगाव मधून शिरडा, तांदूळ आणि भाताचा कोंडा सबंध महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवला जात होता. तेथील व्यापाऱ्यांकडे मोठमोठे ट्रक होते. या ट्रक मधून माल एक्सपोर्ट केला जात असे.

वचपे गाव : 

वचपे गावाच्या जवळ दोन नद्यांचा संगम होत असे. या संगमाजवळ नवव्या शतकात शिलाहार राजानी बांधलेले अतिशय सुंदर असे दगडी शिवमंदिर होते. हे मंदिर अतिशय जागृत असे होते.

त्या ठिकाणी महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरत असे. या यात्रेला शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी पश्चिम भागातून मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे.

महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी अनेक खाऊची आणि खेळण्याची दुकाने येत असत.

वचपे गावच्या नदीच्या कडेला गावात जर मोठा कार्यक्रम असेल तर नदी मधून आपोआप भांडी बाहेर येत असत. ही भांडी वापरून झाल्यावर पुन्हा घासून पुसून नदीच्या काठावर ठेवली जात. आणि त्यानंतर ही भांडी गायब होत असत. अशी एक आख्यायिका देखील होती.

वचपे आणि कळंबईच्या मध्ये नदीमध्ये तास होते. या तासामध्ये पाणी शांत असल्यावर पाण्यात बघितल्यावर सुंदर अशा मंदिराची प्रतिकृती पाण्यामध्ये दिसायची. परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मंदिर नव्हते.असे असतानाही या पाण्यात मंदिराची प्रतिकृती दिसणे म्हणजे एक आश्चर्यच होते.

लेखक:- रामदास तळपे.

सदर लेखासाठी श्री.आत्माराम जगदाळे सर यांच्या संदर्भ लेखाचा उपयोग झाला. त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🏻

एखाद्या लेखाची नक्कल करणे हे भारतीय कॉपीराइट कायदा, 1957 नुसार कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा आहे.

या कायद्याच्या कलम 63 नुसार, कॉपीराइट उल्लंघनासाठी 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत कारावास आणि ₹ दोन लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तरी कृपया हया लेखाची कोणीही नक्कल करू नये.
















चित्रे सौजन्य :- श्री.मीननाथ परांडकर 
                       श्री प्रशांत मंडलिक
        व्हिडिओ सौजन्य:- श्री. शांताराम बाम्हणे 

 





 












सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस