धरणात बुडालेले आंबेगाव.
डिंभे धरणात बुडालेले आंबेगाव ही एक अतिशय जुनी अशी खूप मोठी बाजारपेठ होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खेड तालुक्यातील वाडा आणि आंबेगाव तालुक्यातील आंबेगाव या अतिशय मोठ्या अशा बाजारपेठा अस्तित्वात आल्या व विकसित झाल्या.
आंबेगाव तालुक्यातील पाटण खोऱ्यातील गावे आणि माळीण,असाणे खोऱ्यातील गावे अशा चाळीसगावांची ही प्रचंड मोठी बाजारपेठ होती.
"डिंभे धरणाच्या अथांग जलाशयाखाली आज शांतपणे विसावलेले आंबेगाव हे एकेकाळी पश्चिम आंबेगाव तालुक्याचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. हिरडा, तांदूळ आणि ग्रामीण व्यापारामुळे प्रसिद्ध असलेली ही बाजारपेठ हजारो लोकांच्या जीवनाशी जोडलेली होती. धरणाच्या निर्मितीनंतर गाव पाण्याखाली गेले, परंतु त्याच्या आठवणी आजही विस्थापितांच्या मनात जिवंत आहेत."
आंबेगावचा इतिहास किमान काही शतकांपूर्वीपर्यंत मागे जातो. घोड नदीच्या खोऱ्यात वसलेले हे गाव व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण बनले होते. पश्चिम घाटातील आदिवासी भाग आणि घाटमाथ्यावरील बाजारपेठांना जोडणारा हा महत्त्वाचा व्यापारी दुवा होता."
"पावसाळ्यात धुक्याची चादर गावाला वेढून टाकत असे. जांभूळ, हिरडा, आवळा, करवंद आणि सागाच्या झाडांनी परिसर हिरवागार दिसत असे. पक्ष्यांचा किलबिलाट आणि घोड नदीच्या प्रवाहाचा मंद आवाज गावाच्या वातावरणाला एक वेगळीच शांतता देत असे."
प्रमुख उत्पन्न तांदूळ आणि हिरडा :
आदिवासी भागाचे प्रमुख उत्पन्न म्हणजे भात शेती आणि जोडीला जंगलातील हिरडा गोळा करणे. हिरडा औषधी वनस्पती असल्यामुळे हिरड्याला खूप मागणी होती. हा हिरडा आंबेगाव मधील व्यापारी विकत घ्यायचे. म्हणून आंबेगावला हिरड्याचं आंबेगाव असेही म्हटले जात असे.
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात उत्तम प्रतीची भात शेती असल्यामुळे तेथे जीर, तांबडा रायभोग, खडक्या, कोलम अशा उच्च प्रातीचा तांदूळ पिकत असे. त्याचप्रमाणे नाचणी आणि सावा हे पीक सुद्धा महत्त्वाचे होते.
पश्चिम भागातील लोक खटारगाडी मधून भाताची पोती आणून आंबेगावातील भात गिरणीमध्ये भात भरडून घेत. आवश्यक तांदूळ स्वतःसाठी घेऊन उर्वरित तांदूळ व कोंडा ते आंबेगाव मधल्या व्यापाऱ्यांना विकत असत.
आंबेगाव ही हिरड्यांची, तांदळाची आणि कोंड्याची बाजारपेठ म्हणून सबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. आदिवासी भागातील तांदूळ खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र, पंजाब आणि मध्य प्रदेशातून व्यापारी लोक आंबेगावच्या बाजारपेठेत येत असत.
आंबेगाव तालुक्यात पाटण आणि आसाणे खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिरड्यांचे उत्पन्न होते.उन्हाळ्यामधील बाळ हिरडा, व दिवाळी मधील ढोर हिरडा याला महाराष्ट्रात आणि परदेशात खूप मागणी असल्यामुळे हिरडा उत्पादन हे आदिवासी समाजाचे प्रमुख उत्पन्न आहे.
आंबेगावात हिरड्यांचे अनेक व्यापारी प्रसिद्ध होते. त्यांचे मोठमोठे ट्रक होते. या ट्रकमध्ये रस्ते असलेल्या गावी जाऊन ते हिरडा खरेदी करीत असत.
हिरड्यांच्या वखारी :
आंबेगावात व्यापाऱ्यांच्या हिरड्यांच्या अनेक वखारी होत्या. या वखारीत हिरडा साठवून ते मुंबईला एक्सपोर्ट करीत असत.
आंबेगाव मध्ये अठरापगड जातीचे लोक गुण्या गोविंदाने राहत असत.आंबेगाव हे साधारण दीड ते दोन हजार लोक वस्तीचे पश्चिम भागातील सर्वात मोठे आणि सधन असे गाव होते. या गावात 80 टक्के लोक हे नोकरी न करणारे होते. तरीही ते अत्यंत सुखी आणि समृद्ध जीवन जगणारे होते.
अखेर डिंभे धरणाने घात केला:
सन 1976 मध्ये मा.शंकरराव चव्हाण पाटबंधारे मंत्री असताना डिंभे खुर्द गावाजवळ घोड नदीवर धरण बांधण्याचा निर्णय झाला आणि थोड्याच दिवसात भूमिपूजन झाले. धरणाचे काम सन 1978 मध्ये सुरू झाले. हे धरण सन 19 92 मध्ये पूर्ण झाले. प्रत्यक्ष पाणी आडवायला सन 1993 साली सुरुवात झाली.
तत्पूर्वी आंबेगावातील स्थानिक लोकांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन केले.आपले राहते घर आणि गाव सोडून जाताना आंबेगाव मधील ग्रामस्थांना प्रचंड यतना झाल्या. ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो. शाळा शिकलो,आपल्या शेतीत आणि शिवारात कष्ट केले, खेळलो, बागडलो, वाढलो अशा प्रिय बाजारपेठ असलेल्या गावाला सोडून जावे लागणार या कल्पनेने त्यांचे काळीज गलबलून गेले. अतिव वेदना झाल्या.
सन 1993 मध्ये प्रत्यक्ष धरणात पाणी आडवायला सुरुवात केली. बघता बघता आदिवासी समाजाची अतिशय भव्य असलेली बाजारपेठ धरणाच्या पाण्यात सा मावरून गेली. प्रत्यक्ष बघणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकले.
एकच हलकल्लोळ झाला. जीव गलबलून गेला. आणि थोड्याच वेळात छत्रपतीच्या काळातली ही बाजारपेठ डिंभे धरणाच्या पाण्यात लुप्त झाली. फक्त आठवणी तेवढ्या शिल्लक राहिल्या. आजही या आठवणीवर लोक जगत आहेत.
तत्कालीन घरांची रचना :
तत्कालीन घरे ही बाहेरून दगड व आतून भाजीव विटा मध्ये बांधलेली होती. ही घरे कौलारू दोन पाखी होती. काही घरे चौमोळी होती. घरांच्या भिंतीमध्ये चुना भरत असत. त्यामुळे ती खूपच टिकाऊ अशी असत.अनेक गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांची घरे दुमजली होती. आंबेगाव मध्ये चुना कमावण्याच्या घाणी होत्या. कुंभारांच्या वीट भट्ट्या होत्या.
अठरा पगड लोकवस्तीचे गाव :
गावात ब्राह्मण, गुजराती, मारवाडी, वाणी, तेली व मुसलमान असा व्यापारी वर्ग राहत असे. त्याचप्रमाणे मराठा, कुणबी, कोळी, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, तेली, तांबोळी, बुरुड, बौद्ध,भोई, तांबटकर, सोनार, राउळ, गोसावी, कातकरी इत्यादी स्थानिक आणि बलुतेदार, जमीनदार, वतनदार असे अनेक लोक राहत असत. हे सर्व लोक ज्यांच्या त्यांच्या धार्मिक प्रथा सांभाळून गुण्या गोविंदाने एकत्र राहत होते.
तत्कालीन वाहतूक व्यवस्था:
आंबेगाव येथे जाण्यासाठी आता डिंभे खुर्द या गावच्या पुढे जी धरणाची भिंत आहे. त्या भिंतीच्या डाव्या कोपऱ्यावरून आंबेगावला रस्ता जात असे. त्यावेळी सकाळ, दुपार आणि संध्याकाळी मुक्कामी एसटी होती. त्यावेळी मुक्कामी एसटी पाटण पर्यंत जात असे. परंतु पावसाळा सुरु झाला की चार महिने एसटी सेवा फक्त आंबेगाव पर्यंतच असे.
आहुपे व तिरपाड येथे एसटी जात नव्हती. सर्व प्रवास पायी असायचा.
आंबेगावातील व्यापाऱ्यांकडे मोठे मोठे ट्रक होते. या ट्रक मधून हिरड्याच्या मालाची वाहतूक केली जायची. आंबेगावच्या बुधवारच्या बाजारात येणाऱ्या बाजारकरूना ने - आण करण्यासाठी ट्रकचा उपयोग केला जायचा. सर्व रस्ते हे खडीचे आणि मातीचे होते. डांबरी रस्ता त्यावेळी अस्तित्वात नव्हता.
आंबेगावची भव्य मोठी बाजारपेठ :
आंबेगाव ही साधारण दीड किलोमीटर इतकी लांब अशी भली मोठी बाजारपेठ होती. या बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा अनेक किराणा मालाची दुकाने, खेळण्याची दुकाने, राईस मिल, पिठाच्या चक्क्या, हिरड्याच्या वखारी, पोलीस चौकी, तेलाचे घाणे, सुतार काम, लोहार कामाची दुकाने, हॉटेल, कपड्याचे दुकाने, शालेय स्टेशनरीची दुकाने, मंदिरे, चौक, पिंपळाची झाडे अशा अनेक प्रकाराने समृद्ध अशी प्रशस्त बाजारपेठ होती.
या बाजारपेठेमध्ये शेवंतीलाल, चूनिलाल वाणी, बाबू वाणी, मंगू वाणी, पोपटलाल, कांतीलाल शहा, चंपा शेठ, मगन शेठ, छगन शेठ, सुमती लाल, नटवरलाल, जयंतीलाल व बच्चूशेठ शुक्ल, रतिलाल, लक्ष्मीपूत्र नरोत्तम मामा, असे मुख्य किराणा भुसाराचे, धान्य खरेदी विक्रीचे आणि हिरडा, बेहडा, तुप, मध यासारखी स्थानिक खरेदीचे आंबेगावातील मोठे व्यापारी होते.
व्यापाऱ्यांची घरे ही मुख्यत: रस्त्याच्या दुतर्फा असून दुमजली होती. बाजारपेठेत अनेकांच्या घरावर 'हिरड्यांचे व्यापारी' अशा पाट्या लावलेल्या असत. अनेक व्यापाऱ्यांच्या दारात पाण्याचे आड होते. या अडातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होत असे. शिवाय अनेक व्यापाऱ्यांच्या हिरड्याच्या व भाताच्या कोंड्याच्या वखारी देखील होत्या. वखारी म्हणजेच गोडाऊन.
शंकराचे दगडी मंदिर:
गावाच्या खाली पश्चिमेला घोड नदी होती. नदीला पावसाळ्यात मोठा पुर यायचा. नदीला सुंदर असा अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला दगडी घाट होता. तेथेच शंकराचे पुरातन असे दगडी रेखीव मंदिर होते. या मंदिराचा गाभारा पाच फूट खाली खोल होता. मंदिरात गेल्यावर पायऱ्या उतरून शिवलिंगाचे दर्शन घ्यावे लागायचे.
आंबेगाव मधील लोकांची या मंदिरावर खूप श्रद्धा होती. दररोज व प्रत्येक सोमवारी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी व्हायची.
एखाद्या वर्षी जर पाऊस पडला नाही तर गावातील जेष्ठ लोक एकत्र यायचे.आणि महादेव मंदिर पाण्यामध्ये कोंडायचा निर्णय व्हायचा.
गावातील समस्त स्त्रीया आपापले हांडे पाण्याने भरून भजनी मंडळी सोबत भजन म्हणत मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगावर आपापले पाण्याने भरलेले हंडे रिकामे करून शिवाला जलाभिषेक करत असत. गाभारा पाण्याने भरून जाई. हर हर महादेवचा गजर होई पाऊस पडू दे ! साय माय पिकू दे ' आबादाणी होऊ दे '
म्हणून महादेवाला साकडे घातले जात असे. देवाला अभिषेक व्हायचा. पाऊस पडून आबादीआबाद होईल या आंतरिक श्रद्धेने पाणी मंदिराच्या उत्तरेला असलेल्या दगडी गाय मुखातून सोडून द्यायचं. मंदिराच्या उत्तरेला पाठीमागे दगडी गायमुख होते. त्यामधून सगळं पाणी नदीच्या प्रवाहात वाहत जाई. महादेवाच्या कृपेने पाऊस पडला की गावकरी मनाने तृप्त होत. असं गाव आणि अशी श्रद्धा.
चला, आंबेगावात प्रवेश करू या.
पूर्व दिशेकडून आंबेगावात प्रवेश केला की पहिला पिराचा माळ लागायचा. तेथे पिर बाबाचे हिंदू-मुस्लीम सगळेच दर्शन घ्यायचे. थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला कमलजादेवीचे मंदिर होते. दुपारच्या वेळी काही वृद्ध लोक तेथे विसाव्याला पहुडलेले असत. मंदिराच्या जवळ गर्द झाडी होती.
सुतार काम:
तिथेच सुतारांची घरे होती. तेथे नवीन बैलगाड्या तयार करण्याचे काम चालत असे. खटारगाडीच्या लाकडी चाकाच्या आऱ्या, साठ्या, लोखंडी धावा, आणि इतर साहित्य तयार करण्याचे काम चालत असे. शिवाय खटारगाडी दुरुस्तीची कामे सुद्धा केली जायची. त्यावेळी प्रसिद्ध असलेले बाबुराव भालेराव (सुतार) हे कलाकुसरीच्या लाकडी वस्तू बनवत असत.
शेजारीच नांगर, कुळव, पाभार, जुकाड, लाकडी हळशी, अशी शेतीची अनेक अवजारे नवीन आणि दुरुस्ती अशी कामे या ठिकाणी चालत असत. अनेक शेतकरी त्या ठिकाणी बसून असत. सुतार आपले काम करत राही. लोक कट्ट्यावर बसून गप्पा चघळत बसलेले असत. दुपार झाल्यावर सोबत आणलेली चटणी भाकरी तेथेच सोडून खात असत.
लोहार काम :
त्या शेजारीच लोहाराचे दुकान होते. तिथे विळे, कोयते, पहारी यांना धार लावून दिली जात असे. तसेच पहारी, खोरे, टिकाव, फाळ इत्यादी वस्तू शेवटण्याचे काम सुरू असे.
तेथे मोठा लाकडी भात्या होता. भात्याची दांडी सतत खालीवर करणारी लोहाराची म्हातारी तेथे बसलेली असे. त्यामुळे भात्याला वारा मिळायचा. आणि आग धगधगत राहायची. ऐरणीवर लोखंडाचे घाव मारून शस्त्र आणि अवजारांना धार लावायचे आणि शेवटण्याचे काम सतत चालू असे.
तेथेही मोठ्या प्रमाणात लोकांचा राबता असे. विशेषता सुगीच्या दिवसात म्हणजेच भात काढणीच्या आधी लोकांची खूपच गर्दी असे.
ग्रामदैवत मुक्ताबाई व यात्रा:
अजून थोडं पुढे गेल्यावर ग्रामदैवत मुक्ताबाईचं मंदिर होते. मुक्ताबाई देवी हे आंबेगावचे ग्रामदैवत होते.
चैत्र महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी मुक्ताबाईची मोठी यात्रा भरायची. यात्रेत पालखीचा मान पिढ्यानुपिढ्या विरणकांकडे होता. यात्रेला भागातून सर्व लोक मोठ्या उत्साहाने येत असत. गावामध्ये लोकांची प्रचंड गर्दी होत असे. सकाळी मांडव डाहाळे व हरतुरे, नारळ फोडणे, प्रसाद वाटप होत असे. तर दुपारी लोक दंडवत घेण्यासाठी मंदिरात गर्दी करत. संध्याकाळी पुरणपोळीचे जेवण असे.
संध्याकाळी देवीची पालखी निघायची. विविध गावांच्या भजनाचा कार्यक्रम असायचा. करमणुकीसाठी दत्ता महाडिक, चंद्रकांत ढवळपुरीकर, रघुवीर खेडकर, गणपत व्ही. माने, विठाबाई नारायणगावकर असे मोठे मोठे तमाशा असत. लोक तमाशा पाहण्यासाठी पायी प्रवास करत असत. त्यावेळी वाहतुकीची साधने नव्हती.
दुसऱ्या दिवशी तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम होत असे. दूर वरून पहिलवान मंडळी कुस्त्या खेळण्यासाठी आंबेगावात दाखल होत असत. सर्व पहिलवान मंडळी आणि आलेल्या पाहुणे मंडळींना आणि गावकऱ्यांना आमटी आणि भात असे जेवण असे. त्यानंतर कुस्त्यांच्या भव्य दंगली होत असत.
शितळादेवीचे मंदिर :
मुक्ताबाईच्या मंदिराच्या मागे शितळा देवीची दोन छोटी मंदिरे होती. एका मंदिराच्या भिंतीवरील दगडावर नाग कोरलेला होता.
तसेच पुढे चालत गेल्यावर कुंभारवाड्या तील वीर मंदिर होते. ते कुंभारवाड्याचे श्रद्धास्थान होते. दरवर्षी तेथे सुद्धा जेवणाचा कार्यक्रम असायचा.
मारुती तालीम:
चौकातून खाली दगडी वाट उतरून गेलं की खालच्या मारुतीचे मंदिर. मंदिराबाहेर चाफ्याचे झाड होते. या झाडाला वर्षभर फुले येत असत. चाफयाच्या फुलांचा सुगंध दूरपर्यंत दरवळत राही. तेथेच पहिलवानांच्या कुस्त्यांच्या तालमी चालायच्या.
हनुमान जन्मोत्सव :
तेथून पुढे उजव्या बाजूने वर आले की रहाडीसमोर दुसरे एक मारुती मंदिर होते. तिथे श्रावण महिन्यात प्रवचने आणि अनेक धार्मिक ग्रंथांची पारायणे चालत असत. तिथे सांप्रदायिक भजने देखील होत असत. अनेक लोक श्रावण महिन्यात तेथे पारायण करत बसलेली असत.
हनुमान जयंतीला मोठ्या भक्ती भावाने हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात असे. गूळ खोबऱ्याचा प्रसादाचे वाटप होई. मारुतीरायावर चाफ्याच्या पांढऱ्या फुलांचा वर्षाव व्हायचा. संध्याकाळी गॅस बत्तीच्या उजेडात भजने व्हायची.
प्रसिद्ध असे जैन मंदिर:
सरळ पुढे बाजारपेठेतून गेलं की जैन मंदिर लागायचे. दगड विटा मध्ये बांधकाम असलेल्या या जैन मंदिरात जैन धर्मातील कल्याण पार्श्वनाथ, विमलनाथ व वासुपुज्य स्वामी यांनी या मंदिरासाठीच्या जिर्णोद्धारासाठी दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आहे. त्यांची नावे मंदिराच्या पुर्व भिंतीच्या संगमरवरी दगडावर कोरलेली आहेत. अजूनही उन्हाळ्यामध्ये धरणातील पाणी कमी झाल्यावर या मंदिराचे अवशेष बघायला मिळतात.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गज लक्ष्मीचे कोरलेले शिल्प आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर सरस्वतीची मूर्ती आहे. खांबावरील कोरीव नक्षी, छतावर असलेली गोलाकार अतिशय सुंदर अशी वर्तुळे, कोरीवकाम आणि नक्षीकाम पाहण्यासारखे आहे.
आतील गाभा-याच्या प्रवेशद्वारावर सरस्वती व दोन मोर कोरलेले आहेत. अतिशय सुंदर असे हे कोरिव काम आहे.
मंदिरात श्री पार्श्वनाथाची ध्यानस्थ बसलेली अतिशय रेखीव आणि सुरेख मूर्ती होती. हे मंदिर साधारण 1867 मध्ये बांधले होते.
आजही हे मंदिर धरणाचे पाणी कमी झाल्यावर पाहायला मिळते. इतकी वर्ष पाण्यात राहूनही मंदिर सुस्थितीत आहे.
जैन मंदिराच्या मागे मोठा भाजक्या विटांनी बांधून आणलेला मोठा आड होता. या आडाचे पाणी मंदिरासाठी उपयोगात आणत असत. जैन मंदिराच्या पुढच्या चौकात सुंदर असे श्रीराम मंदिर होते. त्या शेजारी गणपतीचे मंदिर होते.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर :
पुढे गेल्यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर होते. हे मंदिर बाहेरून दगड व आतून विटा अशा पद्धतीचे बांधकाम होते. मंदिरात भजन, काकड आरत्या दररोज होत असत. तेथे प्रत्येक वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जायचा. हा सप्ताह सात दिवस चालायचा. प्रवचन, हरिपाठ कीर्तन व हरी जागर तिथे चालत असे. अनेक हरिभक्त पारायण असलेले लोक प्रवचन कीर्तन करून आपली भागवत धर्माची पताका फडकवत असत.
आषाढ महिन्यात इथूनच दिंडी निघायची. दिंडीला जाणाऱ्या लोकांमध्ये राम कृष्ण हरी चा गजर करत सारा गाव दिंडीमध्ये सामील व्हायचा. वारकऱ्यांना निरोप द्यायला भाविक लोक पिराच्या माळापर्यंत जायचे.
संक्रातीला सुगड घेऊन सगळ्या सवाक्ष्ण स्रिया विठ्ठल रखमाईच्या दर्शनाला येत असत. तिथे सुगडीचा वाण एकमेकींना देत असत. आजही या मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे भग्न मूर्ती देखील. ह्या मूर्ती साधारण सोळाव्या शतकातील असाव्यात असे जाणकारांचे मत आहे. यावरून आंबेगाव ही बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली होती हे सिद्ध होते.
विठ्ठल मंदिरा शेजारी बाबा संत व नंदू संत यांचा वाडा होता. त्यांच्या वाड्यामध्ये मोठा आड होता. सय्यद सेठ यांच्या घरामागे मोठी विहीर होती. महादेव जोशी यांच्या वाड्यामध्ये सुद्धा मोठा आड होता.
कवडधारा मंदिर :
गावाच्या बाहेरच्या माळावर कवडधरा मातेचं छोटे मंदिर होते. तिथेच खाली खोल असा कडा होता. या कड्यामध्ये दत्त मंदिर होते.
म्हसोबा मंदिर :
नदीपात्राच्या कडेला म्हसोबाचे मंदिर होते. म्हसोबा मंदिराजवळच स्मशानभूमी होती. गावातील दशक्रिया विधी तेथेच होत असत.
तेलाचे दगडी घाणे:
गावात पूर्वी अनेक तेलाचे घाणे होते. हे तेल घाणे दगडी गोल आकाराचे असत. साधारण आठ दगडाचे घाणे होते.
नाथा केदारी, बाबुराव तेली, बबनराव मोहळे, भिकू पन्हाळे, रत्नाकर डाके यांचे तेलाचे घाणे होते.
आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात खुरसण्याचे आणि भुईमुगाचे पीक घेतले जात असे. हे सर्व शेतकरी लोक शेंगदाणे व खुरासनी घेऊन बाजाराच्या दिवशी तेल गाळण्यासाठी तेथे खूपच गर्दी करत असत. वर्षभर पुरेल इतके तेल घेऊन उर्वरित तेलाची ते विक्री करत असत. खुरासण्याचा व शेंगदाण्याचा चोथा जनावरांना पेंड म्हणून त्याचा उपयोग होत असे.
रुपाजी दगडे सावकार:
रुपाजी दगडे हे गावात मोठे सावकार होते. त्यांचा भलामोठा म्हशींचा गोठा होता. गोठ्यामध्ये चाळीस ते पन्नास म्हशी होत्या. हॉटेलला,आणि डेअरीला ते दूध घालत असत. तसेच किरकोळीने ही विक्री होत असे. ते गावातील मोठे सावकार देखील होते.
शंकरराव घोलप यांची विहीर व मोट:
घोलप आळीला गेल्यावर शंकराव घोलप यांची तेथे खूप मोठी विहीर होती. या विहिरीवर मोट होती. या पाण्यावरच शेती बहरायची. त्यांच्या या शेताला बाग शिवार म्हणत. या विहिरीवर मोट चालायची. बैल मोट ओढायचे. थारोळ्यातून पाणी थेट शेतीला जायचे. बैलांसाठी सावली मिळावी म्हणून ओळीनं आठ-दहा निलगिरीची झाडे लावलेली होती. त्या झाडांच्या सावलीत मोट चालायची.
चल माझ्या राजा, चल रं सर्जा
बिगी बिगी डौलान रं, डौलान
गाऊ मोटं वरचं गाणं, रं गाणं
बुधवार आंबेगावचा बाजार :
बुधवारी आंबेगावचा बाजार भरत असे. या बाजारात आहुपे खोरे आणि पाटण खोऱ्यातून अशा चाळीस गावचे लोक बाजाराला येत असत.
शिमग्याचा बाजार व पावसाळ्याच्या पूर्वीचा आघुटीचा बाजार हे बाजार दोन ते तीन दिवस चालायचे.
शिमग्याच्या बाजाराच्या आदल्या दिवशी मोठमोठे नामांकित तमाशे आंबेगावला येत असत. व तिकटीवर तमाशा दाखवत असत. हे तमाशे पाहायला प्रचंड गर्दी व्हायची. तमाशाची कणात प्रेक्षकांच्या गर्दीने फुलून जायची.
हिरडा खरेदी :
आंबेगावच्या पुढच्या वचपे गावच्या बाजूला पिंपळाच्या झाडाजवळ हिरड्यांचे व्यापारी, हिरडा घेण्यासाठी बसत असत. तिथे मोठ्या प्रमाणावर हिरड्यांची खरेदी होत असे. तिथे सुद्धा लोकांची खूप मोठी गर्दी पाहायला मिळत असे.
बाहेरगावचा व्यापारी वर्ग :
आंबेगावच्या बाजाराला बाहेरगावचे व्यापारी दर बुधवारी येत असत. मंचर, घोडेगाव व शिनोली येथून व्यापारी येत असत. त्यामध्ये तांदळाचे व्यापारी, घोंगड्यांचे व्यापारी, असे अनेक व्यापारी होते. शिनोलीचे गफूर भाई तांबोळी आणि मुलाणी हे खाण्याच्या विड्याची पाने विकायचे.
घोडेगावच्या आर्वीकर आणि मेहेर या व्यापाऱ्यांची आंबेगावच्या बाजारात तंबाखू प्रसिद्ध होती. त्यावेळी खाण्यासाठी पिवळी तंबाखू व मशेरी भाजण्यासाठी असलेली बारीक पानांची तंबाखू यांना प्रचंड मागणी होती. तंबाखू घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत असे.
बच्चू शेठ शिनोलीकर हे बाजरीची 100 ते 200 पोती आणायचे. त्यावेळी बाजरी दोन रुपये किलो अशी होती. हिरडा घालून आलेल्या पैशात लोक बाजरीचे कट्टे खरेदी करायचे.
वशटाचा बाजार :
हाडकी हाडवळ्याच्या हद्दीत वशटाचा मोठा बाजार भरत असे. लोक मोठ्या प्रमाणात वाळलेले बोंबिल, सुकट, वाकट, खारा मासा व ढोमेली मोठ्या प्रमाणात विकत घेत असत. पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी जो बाजार भरत असे त्या बाजाराला लोक आघुटीचा बाजार असे म्हणत असत. हा बाजार प्रचंड मोठ्या प्रमाणात भरत असे.
पश्चिम भागात पुढील चार महिन्यात प्रचंड पाऊस पडत असे. खूप पावसामुळे लोकांचे आंबेगावला येणे जाणे होत नसे. त्यामुळे पुढील चार महिने पुरेल असा बाजार ते एकदम भरत असत.
रेडीमेड कपडे :
मंचरचे क्षीरसागर रेडीमेड शिवलेले कपडे आणायचे. तेथे गंडेपट्ट्याच्या चड्ड्या, बनियन, अंडरवियर, टॉवेल, टोप्या, मुलांचे गणवेश, खाक्या चड्डया व पांढरे शर्ट, छत्र्या, लहान मुलांची कपडे, लुंग्या अशा अनेक प्रकारचे कपडे आठवडे बाजारात विक्रीस असत.
पेठेत अनेक मोठमोठी कापड दुकाने होती. दैनंदिन कपडे त्याचप्रमाणे लग्नाचे कपड्यांचे बस्ते, मानापनाची लुगडी, टॉवेल टोप्या इत्यादी साहित्य मोठ्या प्रमाणात शहा यांच्या कपड्याच्या दुकानातून खरेदी केले जात असे. शिवाय अजूनही दोन-चार कपड्यांचे दुकान होती.
बस्ता बांधल्यानंतर दुकानदार बस्ता बांधण्यासाठी कपडे घेण्यास आलेल्या आलेल्या लोकांना दोन-तीन किलो लाडू घेऊन देत असे. बस्त्याला आलेल्या लोकांना लाडूचे वाटप होत असे. काही लहान मुले केवळ लाडू खायला मिळतो म्हणून लग्नाच्या बस्त्याला हट्ट करून जात असत.
भांड्यांची दुकाने :
शेजारीच भांड्यांची दुकाने होती. लग्नसराईच्या वेळी ही दुकाने तुफान चालायची. अहेराची भांडी, घरगुती भांडी, तांब्या पितळेची भांडी या ठिकाणी मिळत असत. पश्चिम भागातून आलेले अनेक लोक या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भांड्यांची खरेदी करत असत.
घड्याळाची दुकाने आणि दुरुस्ती :
त्यावेळी पेठेमध्ये एक-दोन घड्याळाची दुकाने होती. तेथे नवीन घड्याळ घेण्यासाठी आणि घड्याळ दुरुस्तीसाठी लोकांची गर्दी होत असे. विशेष म्हणजे तेव्हा चावीची घडाळे होती. दररोज सकाळी घड्याळाला चावी द्यावी लागत असे. चावी दिली तरच घड्याळ चालायचे.
सायकल रिपेअरिंग:
थोडे पुढे गेल्यावर सायकल दुरुस्तीचे दुकान होते. या ठिकाणी सतत सायकलींची दुरुस्ती केली जात असे. अनेक लोक आपल्या सायकली दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी घेऊन येत असत.
शालेय स्टेशनरी :
सायकल रिपेरिंग दुकाना शेजारी शालेय स्टेशनरीचे दुकान होते.अजून थोडे पुढे गेल्यावर अजून दोन दुकाने होते.
या दुकानांमध्ये शालेय साहित्य, वह्या पुस्तके, नवनीत गाईड, दहावीचे अपेक्षित प्रश्नसंच, वह्या पुस्तकांचे कव्हर, कंपास पेटी, रंगपेटी, पेन आणि पेन्सिल असे अनेक साहित्य मिळत असे. शाळा सुरू होण्यापूर्वी या दुकानांमध्ये शालेय साहित्य घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची अगदीच झुंबड उडालेले असे.
कासार बांगड्यांचे दुकान :
स्टेशनरीच्या शेजारी शेजारी कासारांची दुकाने बांगड्या भरण्यासाठी मांडलेली असत. त्यावेळी हातभर बांगड्या घालण्याची पद्धत होती. अनेक रंगीबेरंगी बांगड्यांची बंडले लक्ष वेधून घेत असत, सणावाराला, यात्रेला, लग्नकार्याला हौसेने बांगड्या हातभर भरण्याची पद्धत होती.
प्रसिद्ध धोंडिबा न्हावी:
धोंडीबा कृष्णा शिंदे यांचे आंबेगाव मध्ये अतिशय प्रसिद्ध असे केश कर्तनालय दुकान होते. ते मोठे बलुतेदार देखील होते. बलुतेदार म्हणजे वर्षभर एखाद्या कुटुंबाच्या पुरुष व्यक्तींचे केस कापायचे. व त्या बदल्यात भात काढणीच्या वेळी त्यांना त्यांना ठरलेले भात आणि कठाण द्यायचे.
आता तुम्ही म्हणाल कठाण म्हणजे काय? तर सुगी संपल्यानंतर ज्या जमिनीना ओल आहे तेथे लोक हरभरा, वाटाणा, मसूर असे धान्य पेरायचे. या धान्याचे मोठे पीक घ्यायचे. यालाच कठाण कठाण असे म्हणतात.
आंबेगावात अजूनही दोन-तीन नाव्ह्यांची दुकाने होती.
पडकई :
त्यावेळी पश्चिम आदिवासी भागात भात आणि नाचणीची शेती केली जायची. त्यासाठी माघ महिन्यात प्रत्येक गावात पडकई असायची.
पडकई म्हणजे गावातील सर्व शेतकरी लोक एकत्र येऊन प्रत्येकाच्या शेतात एक दिवस काम करायचे. त्यालाच पडकई असे म्हणतात. त्यावेळी नाचणीची आणि भाताची रोपे भाजायची पद्धत होती.
त्यासाठी झाडाच्या फांद्या तोडून त्यांची ओझी एका ठिकाणी ओळीने रचून ठेवायची. यालाच राब काढणे असे म्हणतात. किंवा राबणी असेही म्हटले जाते.
झाडाच्या फांद्या वाळल्यावर त्या शेत नांगरून केलेल्या भुसभुशीत जमिनीवर अंथरूण त्यावर गवत टाकून पेटवून देतात यालाच दाढ भाजणे असे म्हणतात. तर प्रत्येक गावात अशा पडकई असायच्या. प्रत्येकाच्या शेतात राब काढायला जायचा. किंवा इतर बांधबंधिस्तीची कामे केली जायची.
काही लोक पडकई मध्ये भाग घेत नसत. किंवा इतर कारणामुळे त्यांना ते शक्य नसे. त्यावेळी ते ठराविक पैसे देऊन आपल्या शेतात ही पडकई राबवून घेत असत. त्यावेळी गावात अनेक लोकांकडे अशा पडकई राबवून घेतल्या जायच्या. त्यामुळे त्यांच्याकडे बरेच पैसे जमा होत असत.
हे सर्व पैसे एकत्र करून हे गावातील लोक होळीच्या बाजाराला आंबेगावला जात असत. प्रत्येक पडकाईवाले 25 ते 30 गुळाच्या ढेपी खरेदी करीत असत.
त्याचप्रमाणे 50 ते 60 किलो हरभऱ्याची डाळ खरेदी करत असत. 30 ते 40 किलो खोबरे खरेदी केले जाई. व घरी गेल्यानंतर त्यांचे समान वाटप करत असत.
ही सर्व खरेदी एका पडकईची होती. तर अशा गावे आणि वाड्यावत्यांसह त्यावेळी पश्चिम भागात साधारण शंभर ते सव्वाशे पडकई होत्या. त्यामुळे किती माल संपत असेल याचा विचार करा. शिवाय फुटकळ गिऱ्हाईक वेगळेच.
👉🏻 हेही वाचा धरणात बुडालेले खेड तालुक्यातील वाडा गाव
व्यापाऱ्यांची वर्षाची कमाई दोनच बाजारांत:
यावरून आंबेगावच्या बाजारपेठेचा व्याप लक्षात घेता ही किती मोठी बाजारपेठ होती याचा अंदाज येतो. शिमगा आणि आघुटी या दोनच बाजारात व्यापाऱ्यांची संपूर्ण वर्षाची कमाई होत असे.
आंबेगाव ही गुळाची बाजारपेठ :
त्यावेळी आंबेगावच्या बाजारात प्रचंड गुळाच्या ढेपी खपायच्या. प्रत्येक ढेप ही साधारण 20 किलोची असायची. डाळीची पोतीच्या, पोती रीती व्हायची. त्यामुळे आंबेगाव ही गुळाची बाजारपेठ म्हणूनही प्रसिद्धीस आली होती.
शिमग्याच्या बाजाराला यात्रा, जत्रा, सण उत्सव व लग्न खरेदी साठी मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी व्हायची. त्यावेळी मांडवकर लुगडी खूपच प्रसिद्ध होती. शिमगा आणि अघुटी हे बाजार दोन ते तीन दिवस चालत असत.
कासाराच्या बांगडीच्या दुकाना शेजारी असलेल्या चणे फुटाण्याच्या दुकानापासून किराणा व भुसार मालाची ओळीने दुकाने मांडलेली असत.
बाजारात खाण्याच्या वस्तुपासून, साठवून ठेवायच्या वस्तू पर्यत सारं काही विक्रीस उपलब्ध असे. पेठेमध्ये सुद्धा अनेक किराणा मालाची दुकाने होती.
बाजाराच्या दिवशी नेहरू चौका पासून मुक्ताबाईच्या मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बाजाराची पालं मांडून विक्रीसाठी वस्तू ठेवलेल्या असत. मोठे दुकानदार मंगळवारीच आंबेगावला मुक्कामाला येत.
खाऊ गल्ली आणि हॉटेल:
त्यावेळी बाजारात भोकरे शेठ यांची ओली भेळ फारच प्रसिद्ध होती. बाजार करून झाल्यावर लोक भेळ खाण्यासाठी तिथे जमायचे. मटकी भेळवाला मटकी भेळ घेऊन बाजारातून फिरायचा. व आपला माल हातोहात संपवायचा.
गावात इनामदारांचे आणि बबनराव घोलप यांचे हॉटेल प्रसिद्ध होते. बबनराव घोलप यांची साबुदाणा खिचडी खूपच प्रसिद्ध होती. त्यांचे कळीचे लाडू खूपच लोकप्रिय होते. हे लाडू कोकणातील धसई, कर्जत आणि मुरबाड पर्यंत निर्यात होत असत. इतकी अप्रतिम चव त्यांच्या लाडू मध्ये होती.
सय्यद शेठ यांची मिसळ, वडा आणि खाज्या प्रसिद्ध होता. मिसळ खाण्यासाठी सय्यदशेठ यांच्या हॉटेलात खूपच गर्दी होत असे. शिवाय नानाचा गुळाचा पेढा आणि दळवी आचाऱ्याचा पेढा सुद्धा खूपच लोकप्रिय होता. अजूनही त्याची चव अनेकांच्या जिभेवर रेंगळत असेल.
नाथाभाऊ च्या चिवड्याची सुद्धा अनेकांना आठवण येत असेल.तसेच त्यांची भजी आणि बर्फी सुद्धा तितकीच प्रसिद्ध होती.
बुवा राऊळ यांची कांदा भजी खूपच फेमस होती. बुवा राऊळ हे कढईमध्ये भज्यांचा घाणा सोडत असत तेव्हा त्याचा दरवळ असमंतात दरवळत असे. आणि त्या दरवळीने खवय्यांचे पाऊल बुवा राऊळ यांची भजी खाण्यासाठी आपोआप वळत असत.
ममत्या नाना घोलप यांचेही हॉटेल प्रसिद्ध होते.
घोंगड्यांचा व्यापार :
आंबेगावच्या बाजारात जून महिन्यात घोंगड्यांना खूप मागणी असायची. खूप मोठा घोंगड्यांचा बाजार भरत असे. सोलापूर वरून व्यापारी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच घोंगड्यांचे मोठमोठे बंडल आंबेगावमध्ये दाखल होत असत.
गावातील मनाजी कुंभार यांच्याकडे ह्या घोंगड्या बांधलेले बंडल उतरवायचे. त्या बदल्यात त्यांना भाड्यापोटी आठ दहा घोंगड्या देण्यात येत असत.
आंबेगावच्या बाजाराच्या दिवशी ग्रामपंचायत शेजारी मोकळ्या जागेत ते निरनिराळ्या घोंगड्या विक्रीसाठी ठेवत असत.पांढऱ्या,करड्या आणि काळ्या रंगाच्या घोंगडया विक्रीसाठी उपलब्ध असत.या घोंगड्या आठ फूट, दहा फूट आणि बारा फूट लांबीच्या असत. ग्राहकांची त्या ठिकाणी घोंगड्या घेण्यासाठी एकच झुंबड उडालेली असे.
आयुर्वेदिक औषधांची दुकाने:
लमाण समाजही कवडधरा देवीच्या माळावर उतरत. ते लोक आयुर्वेदिक औषधे, हातातील अंगठ्या, खडे, शंख विकत असत. त्यांच्या महिलांचा पोषाख रंगीबेरंगी आणि कपड्यांवर बिलोरी आरसे असा असे.आजारी असलेल्या माणसाच्या हाताला ते कुठलातरी मलम चोळत. मलम चोळल्यावर हाताच्या त्वचेवरून मोठ्या प्रमाणात धूर निघत असे. तिथे सुद्धा अनेक रुग्ण त्यांच्याकडून उपचार घेत असायचे.
वैदू समाज:
सुगीच्या दिवसात वैदू समाज दरवर्षी आंबेगावात येत असे. हे लोक पिराच्या माळावर उतरत असत.आणि आपले पाल म्हणजेच तंबू पिराच्या माळावर ठोकत. त्यामध्येे आपला संसार थाटत असत.
वैदु लोक हे आदिवासी भागातील गावागावांमधून अगदी सकाळी सकाळी डबे sss करा, डब्याला झाकण sss बनवा, अशी हाळी देत फिरून रिकामे तेलाचे डबे घेऊन त्याच्या वस्तू बनवून ते आदिवासी भागात विकत असत.
तुटलेल्या जुन्या लोखंडी वस्तूंना जोड देत असत. त्या बदल्यात भात घेत असत. काही वैदू जडीबुटीचे औषध लोकांना देत असत. तर काहीजण तुंबड्या सुद्धा लावत असत.शरीराच्या दुखऱ्या भागात ते मोठमोठ्या सुया टोचून शरीरातील काळे रक्त काढत असत. यालाच तुंबडी लावणे असे म्हणत. तुंबडी लावल्यावर अनेक लोक बरे झाल्याची सुद्धा उदाहरणे आहेत.काही घरगुती उपाय करत. संध्याकाळी ते आपल्या पिराच्या माळावरील पालावर येत असत.
सुया घे, दाभण घे, बायो:
वैदू स्रिया म्हणजेच वैदिनी गोधड्या शिवायच्या सुया, दाभण, दोऱ्याचे बंडल, पोत, नाकातील फुल्या, केसातील चाप, आरसे, कंगवे, लहान मुलींच्या बांगड्या, व लहान मुलांसाठी केसावर फुगे विकत असत. त्यांच्याकडून स्रिया हातावर व कपाळावर गोंदून घेत असत. व त्यांच्या कडील साहित्याची खरेदी करत.
त्यांच्या डोक्यावर गोधडी सारखी एक मोठी खोळ असे. त्यामध्ये ते विक्री केलेल्या वस्तूच्या बदल्यात भात घेत असत. त्यांच्या या खोळीमध्ये मनभर भात सहज मावत असे.
साधारण दीड-दोन महिने त्यांचा मुक्काम आंबेगावातील पिराच्या माळावर असे.
त्यांनी गोळा केलेले भात गुंजाळाच्या गिरणीतून भरडून त्याचे तांदूळ करून घेत. गरजेपुरता तांदूळ ठेवून उर्वरित तांदूळ शेवंती शेठ यांना विकत असत.
म्हाताऱ्या झालेल्या वैदिनी त्यांच्या पालात बसून गोधड्या शिवायचे काम करत. व त्या गोधड्या विकत असत. किंवा व्यापारी लोकांना गोधड्या शिवून देत असत. त्यासाठी त्यांची मजुरी घेत असत.
पावसाळा सुरू झाला की आंबेगावला वळसा मारून घोडनदी पुढे धावत असे. त्याचप्रमाणे बोरघर कडून आलेला ओढा, कड्यात उतरून नदीला मिळायचा. त्यामुळे बाराही महिने ओढ्याला आणि नदीला पाणी असायचे.
गावात प्रवेश केल्यावर धोंडीबा कातकऱ्यांच्या घरामागे मोठी विहीर होती. तसेच नेहरू चौकाजवळ मोठी विहीर होती. या विहिरीला बाजार विहिर असे म्हणत असत. बाजाराला आलेले बाजारकरू या विहिरीवर पाणी पीत असत.
गाव विहीर :
उजव्या बाजूला ओढ्याकडे जाताना एक विहीर होती. या विहिरीला गाव विहीर असे म्हणत. या विहिरीच्या पाण्याची चव अमृतासारखी होती. सर्व गाव विहिरीचे पाणी शेंदून पिण्यासाठी वापर करायचे.
कुंभार वाडा :
कुंभार वाड्याच्या मागे श्री गोवर्धन शेठ यांच्या घरापुढे मोठा आड होता. कुंभार वाड्यामध्ये अनेक कुंभारांकडे गाढवे होती. ही गाढवे हिरड्याची ओझी, माती, वाळू अशा जड मालाची वाहतूक करत असत. त्यामुळे कुंभारांचा हा व्यवसाय मोठा भरभराटीला आला होता.
नदीच्या बाजूला अनेक कुंभारांच्या वीटभट्टी होत्या. वीटभट्टी साठी लागणारी माती गाढवावर वाहून आणली जात असे.
त्याशिवाय चुली बनवणे, गाडगी, मडकी, मोठमोठे रांजण, बैलपोळ्याला बैल आणि गणपती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. आणि पश्चिम आदिवासी भागातून या सर्व साहित्याला खूप मोठी मागणी होती. विशेषता त्यांच्या माठाला उन्हाळ्यात खूप मोठी मागणी असायची. थंड पाण्यासाठी आंबेगावातील कुंभाराचे माठ फारच प्रसिद्ध होते. त्यांच्या चुलीसुद्धा खूपच लोकप्रिय होत्या.
गडगी:
खाली उत्तरेला गेल्यावर गाडगीचा जिवंत पाण्याचा झरा. गाडगीत चोवीस तास बारा महिने आणि तीनही ऋतूत जिवंत पाण्याचा झरा वहायचा. तेथे पाणी भरपूर असायचे पण हे पाणी आळणी आणि मचूळ होते. त्यामुळे हे पाणी कुणीच पीत नसत.
डाव्याबाजुला मोरोपंत संत व बाबा संत यांच्या वाड्यात मोठा आड होता. बंडोपंत यांच्या घरीही पाण्याचा मोठा आड होता.
शाळा व विद्यालय:
आंबेगाव येथे चौथीपर्यंत मराठी शाळा होती व इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत मा. कृष्णराव मुंडे साहेबांच्या आदिवासी शिक्षण संस्थेचे हायस्कूल होते. त्या ठिकाणी 400 ते 500 विद्यार्थी शिक्षण घेत असत. शिवाय तिथे मुलांना राहण्यासाठी वस्तीगृहाची सुद्धा सोय केलेली होती.
पोस्ट ऑफिस :
आंबेगावमध्ये पोस्टाचे ऑफिस देखील होते. या पोस्टमधून पश्चिम भागात पोस्टाचे काम चालत असे. साधी पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र, तार आणि मनीऑर्डर अशी सर्व प्रकारची व्यवस्था या पोस्टमध्ये होती.
पोलीस चौकी:
आंबेगाव गावात पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या इमारतीमध्ये पोलीस चौकी होती. बाजाराच्या पोलीस हवालदार आणि शिपाई हे बसून असत. अनेक प्रकारची भांडणे, वादविवाद पोलीस स्टेशनला येत असत.
सरकारी कार्यालय:
आंबेगावात ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, फॉरेस्ट डिपार्टमेंट, पोलीस चौकी, पोस्ट ऑफिस, जिल्हा परिषदची शाळा, हायस्कूल, मुलांचे वसतिगृह, मंडल अधिकारी यांचे कार्यालय, विविध कार्यकारी सोसायटी व जनावरांचा दवाखाना अशी अनेक कार्यालये होती. सर्व शासकीय कर्मचारी आंबेगावात वास्तव्य करून राहायचे.
गावाजवळ, पिंपळ, आंबा, जांभूळ, साग, सादडा, हिरडा, सायर, काकड, पांगारा, मोगीर, आईन, तोरणे, आंभेळी, काटी साबर, चिल्हार, आवळा, करवंद अशी अनेक झाडे आणि झुडपे होती.
तत्कालीन पेहराव :
त्यावेळेसच्या लोकांचा पेहराव हा धोतर पैरण व डोक्यावर पागोटे तर काही लोक लेंगा पैरन आणि टोपी घालायचे. तर स्रिया लुगडे आणि चोळी किंवा झंपर हा वेश परिधान केलेला असायचा. वयोवृद्ध स्त्रिया मांडवकर लुगडी नेसायच्या तर तरुण आणि मध्यमवर्गीय महिला छापील पातळ लुगडे नेसायच्या. लहान मुले चड्डी आणि सदरा घालत तर मुली रंगीबेरंगी झगा आणि झंपर घालत असत.
शालेय गणवेश मुलांसाठी खाकी चड्डी, पॅन्ट, पांढरा शर्ट आणि टोपी असा असे. तर मुलींसाठी निळी फ्रॉक, निळा झगा, आणि पांढरा शर्ट (झम्पर) लाल रिबनी असा असे.
मोडी लिपी अनेकांना येत होती. त्यावेळेस सर्व हिशोब तोंडी चालत असे. पावकी, निमकी, दिडकी, अडीचकी यावर त्यांचा विशेष भर असायचा.
तत्कालीन शेती:
भात हे मुख्य पीक होते. तसेच नाचणी व सावा ही पावसाळी पिके होती. तर रब्बी हंगामात वरई, उडीद, मूग, भुईमूग, घेवडा, वाल, हरभरा, वाटाणा, मसूर, हुळगा व चवळी हया पिकांचे उत्पादन होत असे. शिवाय काही लोक बागायत पिके देखील घेत असत.
डिंभे धरण झाल्यामुळे या पाणलोट क्षेत्रात आंबेगाव, कोकणेवाडी, कानसकरवाडी, कोलतावडे, फुलवडे, वचपे, कळंबई, दिगद आणि मेघोली ही गावे पूर्णतः धरणाच्या पाण्यात लुप्त झाली. काही उर्वरित गावांची शेती पाण्याखाली गेली. त्यामुळे ती गावे सुद्धा विस्थापित झाली.
कोकणेवाडी आणि बोरघर :
कोकणेवाडी आणि कानसकरवाडी या आंबेगावच्या वाडी होत्या. या वाडीत कोकणे आणि कानसकरांची घरी होती.
तर बोरघर हे आंबेगावच्या उत्तरेला अगदीच समोरासमोर होते. बोरघर हे स्वतंत्र्य गाव आहे.
सर्वात मोठी निर्यातदार बाजारपेठ :
आंबेगाव ही सर्वात मोठी तांदूळ, हिरडा आणि भाताच्या कोंड्याची प्रचंड मोठी निर्यातदार बाजारपेठ होती. आंबेगाव मधून हिरडा, तांदूळ आणि भाताचा कोंडा सबंध महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर पोहोचवला जात होता. तेथील व्यापाऱ्यांकडे मोठमोठे ट्रक होते. या ट्रक मधून माल एक्सपोर्ट केला जात असे.
वचपे गाव :
वचपे गावाच्या जवळ दोन नद्यांचा संगम होत असे. या संगमाजवळ नवव्या शतकात शिलाहार राजानी बांधलेले अतिशय सुंदर असे दगडी शिवमंदिर होते. हे मंदिर अतिशय जागृत असे होते.
त्या ठिकाणी महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरत असे. या यात्रेला शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी पश्चिम भागातून मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे.महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी अनेक खाऊची आणि खेळण्याची दुकाने येत असत.
वचपे गावच्या नदीच्या कडेला गावात जर मोठा कार्यक्रम असेल तर नदी मधून आपोआप भांडी बाहेर येत असत. ही भांडी वापरून झाल्यावर पुन्हा घासून पुसून नदीच्या काठावर ठेवली जात. आणि त्यानंतर ही भांडी गायब होत असत. अशी एक आख्यायिका देखील होती.
वचपे आणि कळंबईच्या मध्ये नदीमध्ये तास होते. या तासामध्ये पाणी शांत असल्यावर पाण्यात बघितल्यावर सुंदर अशा मंदिराची प्रतिकृती पाण्यामध्ये दिसायची. परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मंदिर नव्हते.असे असतानाही या पाण्यात मंदिराची प्रतिकृती दिसणे म्हणजे एक आश्चर्यच होते.
आंबेगाव हे केवळ व्यापाराचे केंद्र नव्हते, तर लोककला आणि लोकसंस्कृतीचेही केंद्र होते. भजने, कीर्तने, हरिपाठ, तमाशे, कुस्त्या, भारुडे आणि यात्रांमधील लोकनृत्ये यांमुळे गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध झाले होते."
गाव सोडताना अनेकांनी आपल्या घरातील उंबरठ्याला, देवघराला आणि अंगणातील झाडांना नमस्कार केला. काहींनी घरातील माती सोबत नेली. अनेक वृद्धांच्या डोळ्यात अश्रू होते. पुनर्वसन झाले, परंतु जन्मभूमीची ओढ मात्र कधीच संपली नाही."
आज डिंभे धरणाच्या शांत पाण्याकडे पाहताना त्या पाण्याखाली दडलेले रस्ते, मंदिरे, बाजारपेठ, शाळा आणि असंख्य आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहतात.
आंबेगाव जरी भौतिक स्वरूपात अस्तित्वात नसले, तरी तेथील संस्कृती, इतिहास आणि लोकांच्या स्मृती आजही जिवंत आहेत. या स्मृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्या गावाला खरी आदरांजली ठरेल."
लेखक:- रामदास तळपे.(ग्रामीण संस्कृती)
सदर लेखासाठी श्री.आत्माराम जगदाळे सर यांच्या संदर्भ लेखाचा उपयोग झाला. त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🏻
एखाद्या लेखाची नक्कल करणे हे भारतीय कॉपीराइट कायदा, 1957 नुसार कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा आहे.
या कायद्याच्या कलम 63 नुसार, कॉपीराइट उल्लंघनासाठी 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत कारावास आणि ₹ दोन लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तरी कृपया हया लेखाची कोणीही नक्कल करू नये













सर आपले लेख वाचण्याची नेहमी उत्सुकता असते खूप छान माहिती या लेखातून मिळाली पण आपन बलुतेदार कोळी याबाबत माहिती टाका त्याचे कामे त्याची आडनाव व इतर रूढी परंपरा
उत्तर द्याहटवानक्कीच, धन्यवाद. 🙏🏻
उत्तर द्याहटवामामाच गाव
उत्तर द्याहटवातळपे साहेब खूप छान माहिती दिली असून आपण आसेच सुंदर लेख व माहिती नवीन पिढीला मिळत असल्याचे मत त्यांनी व्यक्त करत असून आसीच माहितीव वाचनात आल्यानंतर मागचे जुने दिवस डोळ्यासमोर उभे राहतात, खूप सुंदर
उत्तर द्याहटवाखूप छान विश्लेषण केले धन्यवाद
उत्तर द्याहटवाखूप अप्रतिम अस वास्तव्य पाहायला मिळाले.माहिती खूप सुंदर आहे.
उत्तर द्याहटवाखुप छान लेख आहे... आम्ही कधी पाहिलं नाही आंबेगाव परंतु आई वडील आजी आजोबा यांनी त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.. त्यामुळे खरच एकदा प्रत्यक्ष आंबेगाव बाजारपेठेत गेल्यासारखे वाटले....
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती खूप खूप आभार तळपे साहेब मी नेहमी तुमचा लेख वाचत असतो आणि जुन्या आठवणींचा आनंद घेत असतो खूप आवडतात जुन्या काळातील गोष्टी ऐकायला
उत्तर द्याहटवासर्व वाचकांना धन्यवाद. 🙏🏻
उत्तर द्याहटवाअतिशय छान माहिती.. नव्या पिढीला आपला गाव नक्कीच समजायला हवा या दृष्टीने छान लेख.
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाVery nice. I am grandson of Baba Sant and son of Nandu Sant. Missing all these of my home town Ambegaon!!!
उत्तर द्याहटवायोग्य ती दुरुस्ती केली आहे. धन्यवाद सर 🙏🏻
उत्तर द्याहटवासरजी डिंभे धरण हे घोडनदीवर बांधलेले आहे.भामा नदीवर नाही... घोडनदीचे पाटण खोरे आणि बुब्रानदीचे माळीण-असाणे खोरे आहे...घोडनदीचे उगमस्थान म्हणून आहूपे सांगतात आणि पुणे जिल्ह्याचे आंबेगाव तालुक्याचे घाटावरील शेवटचे टोक आहे...लेख सुंदर आहे...मी वचपे या गावचा असल्याने माझे बालपण त्याच भागातील आहे...मी पाटबंधारे विभागातंर्गत डिंभे येथे. धरण बांधकाम काळात सेवेत होतो...
उत्तर द्याहटवातळपेजी मी आदिनाथ रावळ (राऊळ), वचपे या गावचा असून रावळांचा आदिवासी समाजाशी गुरु या नात्याने आणि इतरही सर्व समाजाशी जवळचा संबंध येत होता म्हणून माहिती देत आहे...आपला लेख अजून सुंदर, सुदृढ आणि परिपूर्ण स्वरुपात होण्याचे दृष्टीने मी माहिती देत आहे...धरणात गेलेल्या मुख्य विस्थापित गावांपैकी अजून एक कोलतावडे हे गाव राहिलेलेआहे...व्यापार उदिम करणारे शेवंतीशेठ, नटवरलाल , जयंतीलाल, लक्ष्मीपूत्र नरोत्तम मामा, पोपटशेठ, कांतीलाल, रतिलाल यांच्यासारखे गुजराथी आणि एक बच्चूशेठ भैय्या असे मुख्य किराणा भुसाराचे ध धान्य खरेदी विक्रीचे आणि हिरडा, बेहडा, तुप, मध यासारखी स्थानिक उत्खपादने खरेदीचे आंबेगावातील मोठे व्यापारी होते...
हटवाधन्यवाद गुरुवर्य, आदिनाथजी आपण दिलेली महत्त्वपूर्ण माहितीची नोंद या लेखामध्ये केलेली आहे धन्यवाद🙏🏻
हटवातुम्ही सांगितलेली दुरुस्ती केली आहे. धन्यवाद.
उत्तर द्याहटवायाबरोबरच फुलवले गाव आणि आंबेगाव ची कानस्करवाडी विस्थापित झालेले आहे...ममत्यानाना घोलप यांचेही हॉटेल होते...बाबू सुतार हे कलाकुसरीच्या सुतारकामातील व महान कारागीर होते...याबरोबरच अजूनही बऱ्याच गोष्टी उल्लेखीत करण्यासारख्या आहेत...
हटवानोंद घेतली आहे.धन्यवाद, सर 🙏🏻
हटवाछान सर
उत्तर द्याहटवाअतिशय उत्कृष्ट अशी माहिती आपण आपल्या आंबेगाव आणि वचपे गावाबद्दल सांगितली आहे.
उत्तर द्याहटवाव्यापार व्यवसायाबद्दल माहिती देत असताना वशाटाच्या दुकानातील सुके बोंबील, सुकट, वाकट यांच्या दुकानांचा आपण उल्लेख आवर्जून केला आहे. तो बाजार हाडकी हाडावळीच्या हद्दीत भरायचा असाही उल्लेख केला आहे. ही हाडकी हाडावळी म्हणजे काय हे आदिवासी तरुण पिढीला जे विशेषतः शहरी भागात आपल्या आदिवासी भागापासून दूर नोकरी व्यवसायानिमित्त रहातात त्यांना माहिती नसणार आहे,त्यांना आपल्या इतर समाज बांधवांना माहिती साठी हाडकी हाडावळी बद्दल माहिती सांगितली तर आपल्या संस्कृतीचा एक भाग असणार्या या घटकाची सर्वांना माहीत होईल. बाकी आपण दिलेली माहिती खूपच आवडली. आपले मनापासून आभार
धन्यवाद सर,आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल आभारी आहे. 🙏🏻
उत्तर द्याहटवाखुप छान लेख लिहिला आहे. वाचताना लहानपणी पाहिलेल्या आंबेगावची बाजार पेठ, आंबेगावची जत्रा डोळ्यासमोर दिसू लागली.
उत्तर द्याहटवातुमच्या लेखातून जुनं आंबेगावच दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद
तुम्ही खूप छान माहिती लिहिली आहे पण नाव्ही समाजात मोठ्या प्रमाणात नाव होत यांचं धोंडीबा कृष्णा शिंदे आंबेगाव मध्ये यांचं दुकान आणि बलुतीदार सर्वांच्या चर्चेत असणारे नाव्ही यांचा पण आपण उल्लेख करावा अशी माझी विनंती आहे सर मी महेश किसन शिंदे
उत्तर द्याहटवाgood
उत्तर द्याहटवाJunya athvani madhe neun anle tasech mahit naslelya goshtinbaddl samajle
उत्तर द्याहटवाtyabaddl dhanywad
मी १९८६-८७ आणि ८८-८९ या दोन वर्षी शिवशंकर विद्यालयात गणित अध्यापक म्हणून सेवेत होतो. फिरण्याचं वेड होतं, पंचक्रोशीतील गावांना भेटी व्हायच्या. या लेखामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या. आजही काही विद्यार्थी संपर्कात आहेत. छान ऐतिहासिक आढावा घेतलाय. कौतुकास्पद प्रशंसनीय.
उत्तर द्याहटवाप्रा. विजय जोरी, लोणावळा ९७६६१६७०६८
साहित्यिक
खूप छान लेख जुन्या आठवणी जाग्या झाल्या
उत्तर द्याहटवाखुब छान माहिती आहे जून्या आठवणी जाग्या झाल्या
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती आहे माझेही बालपण बोरकर गावात गेले व मामाचे गाव फुलवडे असल्यामुळे
उत्तर द्याहटवामाझा आंबेगावशी भावनीक संबंध आहे
पुर्वी चे दिवस आठवले की मनाला खूप यातना होतात
मी लहान पणी डैक्यावर कडबा वैरण फाट्याच्या भोळ्या वाहून शिक्षण पूर्ण केले आहे
माहिती बद्दल धन्यवाद