Translate

महाराष्ट्रातील लोककला प्रासादिक भारुड मंडळ / कलानाट्य : वैभव आणि वास्तव

रात्रीचे दहा वाजले होते. गावच्या यात्रेतील दिवे लुकलुकत होते. 

मंदिरासमोर हजारो लोकांची गर्दी जमली होती. टाळ-मृदंगाचा नाद आसमंतात घुमत होता. अचानक पंचपदीचे स्वर कानावर पडले आणि भारूडाच्या रंगमंचावरून अध्यात्म, विनोद, प्रबोधन आणि मनोरंजन यांचा अद्भुत संगम सुरू झाला. 

तो काळच वेगळा होता. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोककला तेव्हा आपल्या वैभवाच्या शिखरावर होती.

महाराष्ट्र ही संतांची आणि कलावंतांची भूमी आहे. विशेषतः पूर्व महाराष्ट्रातील आणि एकूणच राज्यातील ग्रामीण भागात पूर्वी अनेक वेगवेगळ्या लोककला अस्तित्वात होत्या. यामध्ये भजनी मंडळे, लेझीम पथके, प्रासादिक भजनी भारुड मंडळ, तमाशा मंडळांचे कलापथक अशा अनेक कलाप्रकारांचा समावेश होता. या कलांना थेट 'लोकाश्रय' होता, ज्यामुळे अनेक दर्जेदार कलावंत उदयाला आले आणि त्यांनी मोठी नावे कमावली.

प्रासादिक भारुडाचा पारंपरिक बाज आणि सादरीकरण

१९९५ पर्यंत प्रासादिक भारुड ही लोककला अगदी अत्युच्च पातळीवर होती. त्या काळात प्रत्येक कार्यक्रमाचा एक विशिष्ट, शिस्तबद्ध क्रम असायचा. भजनी भारुडामध्ये पुढील क्रमानुसार सादरीकरण पुढे पुढे सरकत असे:

पंचपदी:- 

पंचपदी हा वारकरी, भजनी आणि भारूड परंपरेतील एक महत्त्वाचा गायनप्रकार आहे. "पंचपदी" म्हणजे पाच चरणांची किंवा पाच ओळींची भक्तिपर रचना. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वातावरण भक्तिमय करण्यासाठी पंचपदी गायली जाते.

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी 
तो हा विठ्ठल बरवा तू हा माधवा बरवा 

गजर: 

देवाचे नामस्मरण, स्तुती किंवा जयघोष तालबद्ध पद्धतीने, समूहाने मोठ्या आवाजात करणे म्हणजे गजर.

विठ्ठल गजर: 

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!

हरिनाम गजर: 

जय जय राम कृष्ण हरी!
शिवगजर: हर हर महादेव!

गण:

आधी गणाला रणी आणला, 
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना...

धन्या शारदा ब्रम्ह नायका, 
घेऊन येईल रूद्रविणा

साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा, 
दाविल यंत्र खुणाखुणा

नाहीतर रंग पुन्हा सुना सुना...
सद्‌गुरू माझा स्वामी जगद्‌गुरू, 

मेरूवरचा धुरू आणा
ब्रम्हांडा भवता तो एक सवता, 

दिवाच लाविल म्हणा
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना...

माझ्या मनाचा मी तू पणाचा, 
जाळून केला चुना चुना

पठ्ठेबापूराव कवि कवनाचा, 
हा एक तुकडा जुना जुना

नाहीतर रंग पुन्हा सुना सुना...   

पदगायन: 

हे अभंगापेक्षा अधिक सुरेल आणि रागदारी अंगाने गायले जाते. (उदा. "अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग).

जोहार:

जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

बहु भुकेला जाहलों । तुमच्या उष्टयासाठीं आलों ॥२॥

बहु केली आस । तुमच्या दासाचा मी दास ॥३॥

चोखा म्हणे पाटी । आणिली तुमच्या उष्टयासाठीं ॥४॥

पत्र:

माझें पत्र धन्याला । वैकुंठवासी नांदतो त्याला । असा धनी माझा भला... ॥ १ ॥

संकट पाहूनि भला बोध केला । चार खाणी नऊ दरवाजे । दश इंद्रियें हाच बोध केला ॥ ३ ॥

भुक्ति मुक्ति शक्ति मजपाशीं ठेविल्या । ऐसे चार वेद वर्णी । एका जनार्दन वाणी ॥ ४ ॥

बागुल:

"निज निज बाळा दारी बागुल आला..."

पात्रे: 

भालदार, चोपदार इत्यादी.

पौराणिक वगनाट्ये आणि सादरीकरणाची वैशिष्ट्ये

प्रासादिक भारुडामध्ये किंवा कलापथकामध्ये रामायण आणि कृष्णलीला सादर करताना रंगमंचावरील पात्रांची रचना खालीलप्रमाणे असायची:

उमवरा: 

हे पात्र सुरुवातीला हातात आरतीचे तबक घेऊन रंगमंचावर प्रवेश करते आणि सर्व देवांचे स्मरण केले जाते.

सावळ्या: 

हे पात्र श्रीकृष्णाच्या बालमित्राचे असते. सावळ्या हे अत्यंत विनोदी आणि खट्याळ पात्र असायचे. रंगमंचावर दोन पायांवर लांब उड्या मारून नाच करणे हे त्याचे वैशिष्ट्य.

गणपती: 

त्यानंतर रंगमंचावर गणपतीचे पात्र येते. खाली बसलेले भजनी मंडळ "नाचत आले गणपती, पायी घुंगुर वाजती"अशा प्रकारे गणपतीची स्तुती करायचे.

सरस्वती (शारदा): 

त्यानंतर रंगमंचावर सरस्वतीचे आगमन होते आणि "आली शारदा सुंदर" हे भक्तीगीत म्हटले जायचे.

हे सर्व प्राथमिक विधी झाल्यावर प्रत्यक्ष वगनाट्याला सुरुवात होत असे. त्या काळात अनेक पौराणिक वगनाट्ये प्रसिद्ध होती, जसे की

उज्जैनीचा राजा विक्रम (शनीची साडेसात वर्षे)

भक्त प्रल्हाद (हिरण्यकश्यपूचा वध)

रामायण आणि कृष्णलीला

चिलिया बाळ

हरिश्चंद्र-तारामती

गावची जत्रा, मर्यादित साधने आणि  कलाकार

डिसेंबर ते एप्रिल महिन्यात ग्रामीण भागात उरूस आणि यात्रा-जत्रा मोठ्या प्रमाणात साजऱ्या होत. मनोरंजनाची साधने मर्यादित असूनही कलारसिकांची कमतरता नव्हती. भजनी मंडळ, ढोल-लेझीम-झांज पथके, कला नाट्य पथक, गावठी तमाशा, सनई-चौघडा, हरिपाठ मंडळ आणि पहिलवानांची तालीम अशा अनेक घटकांमुळे समाज एकत्र नांदत होता. प्रत्येक माणूस स्वतःपेक्षा आपल्या गावाचे नाव मोठे करण्यासाठी धडपडत असे.

त्याकाळी कोणताही कार्यक्रम आधीच व्यावसायिक पद्धतीने ठरवलेला नसायचा. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील अनेक कलापथके खेड आणि मावळ तालुक्यातील यात्रांमध्ये स्वतःहून येत असत. कला सादर केल्यावर त्यांना २५ रुपये किंवा ५१ रुपये एवढीच बिदागी (मानधन) दिली जायची. काही कलाकार तर पंधरा-पंधरा किलोमीटर पायी चालत यात्रेला जायचे; मानधनापेक्षा 'कलेची सेवा' हीच त्यांची खरी कमाई होती. 

पहिलवान मंडळीसुद्धा आखाड्यासाठी आवर्जून उपस्थित राहायची. त्यावेळी कुस्ती गावाच्या 'नावासाठी' खेळली जायची; आजच्यासारखी पैशासाठी 'नुरा कुस्ती' खेळून नाव धुळीस मिळवण्याचा प्रकार तेव्हा नव्हता.

साधे साहित्य, अस्सल कलाकार

त्या काळात कलापथकांकडे साहित्याची फार मोठी झगमगाट नसायची. पात्रांच्या कपड्यांची एक पेटी, एक पायपेटी (हार्मोनियम), ढोलकी आणि टाळ, एवढ्याच साहित्यावर भारुड रंगायचे. भारुडातील स्त्री-पात्रे पुरुषच करायचे, ज्यांना लोक 'नाचे' म्हणायचे. ही भूमिका वठवण्यासाठी काही पुरुष आवर्जून स्त्रियांसारखे केस राखायचे. त्या काळात संपत (चंपा) जढर, मोतीराम मोहन, सखाराम उगले, गणपत सातपुते, भिवेगावचे निधन, शंकर माळी, श्रीरंग आणि विठू नांगरे हे नाचे म्हणून प्रचंड प्रसिद्ध होते.

कलापथकांचे सुवर्णयुग आणि बदलता काळ

या लोककलेला जिवंत ठेवण्यात अनेक गावांचा आणि कलावंतांचा वाटा आहे.

खेड तालुका:- वरचे भोमाळे, टोकवडे, मडक्याचे धामणगाव, खरोशी, मदगेवाडी (धामणगाव), देवतोरणे, चांदूस, सरेवाडी व नाव्हाचीवाडी (नायफड), जावळेवाडी (मंदोशी).खरवली इत्यादी 

आंबेगाव तालुका:- पोखरी, तळेघर, गोहे बुद्रुक, आपटी, कानसे माळवाडी, डोण, आहुपे इत्यादी

मावळ तालुका:- ओझर्डे, पवळेवाडी, कल्हाट इत्यादी

त्या काळात मा. शंकरराव कोकाटे टोकवडेकर यांचा स्टेजचा तमाशा सुप्रसिद्ध होता, ज्यात ९ स्त्रिया आणि ३५ पुरुषांचा मोठा संच होता. तसेच भिवेगावचा तमाशाही गाजला.

सुरुवातीला कलापथकांचे खेळ जमिनीवर, उघड्यावर सादर केले जायचे. स्टेज, पडदे, झगमगती लाईट, लाऊडस्पीकर किंवा मंडप असा कोणताही थाट नव्हता; पण कलाकारांचे कपडे अस्सल आणि रंगीत असायचे. खेळ पाहण्यासाठी संपूर्ण भागातील अबालवृद्ध गर्दी करायचे आणि प्रचंड दाद द्यायचे.

त्यावेळेस गावठी तमाशांना सुद्धा फार महत्त्व होते. त्याला चवली पावलीचा तमाशा असे म्हटले जाई.

जमिनीवरून स्टेजवर प्रवास

जमिनीवर सादर होणारे भारुड ९० च्या दशकात स्टेजवर नेण्याचे काम पोखरी, कानसे माळवाडी, देवतोरणे आणि पवळेवाडी या कलापथकांनी केले. त्यानंतर गोहे बुद्रुक, आपटी आणि सरेवाडी (नायफड) यांनीही हाच मार्ग निवडला. 

भारुड स्टेजवर आल्यानंतर त्याला तमाशासारखा संच, लाईट्स, लाऊडस्पीकर आणि चार-पाच पडद्यांची जोड मिळाली. या झगमगाटामुळे भारुडाला एक नवा बाज मिळाला आणि ही कला जनमानसात खोलवर रुजली. काही यात्रांमध्ये तर दोन भारुड मंडळांमध्ये रंगणारे 'सवाल-जवाब' पाहणे ही रसिकांसाठी मोठी पर्वणी असायची.

आधुनिकतेचे आक्रमण आणि संस्कृतीचा ऱ्हास

९० च्या दशकाच्या शेवटी टीव्हीवर विविध चॅनेल्स आले, त्यानंतर मोबाईल आले आणि मनोरंजनाची संपूर्ण जागा डिजिटल मीडियाने व्यापली. लोक लाईव्ह कार्यक्रम पाहण्याऐवजी मोबाईलच्या छोट्या पडद्यावर वेळ घालवू लागले. परिणामी, महाराष्ट्राची ही चालती-बोलती लोकपरंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर आली.

ज्या गावांत एकेकाळी रात्रभर टाळ-मृदंगाचा नाद घुमत असे, त्या गावांत आज रात्री मोबाईल स्क्रीनचा प्रकाश दिसतो. ज्या मैदानावर भारूडाचे सवाल-जवाब रंगायचे, तिथे आज शांतता पसरलेली दिसते. बदलत्या काळाने प्रगती तर दिली, पण त्याचबरोबर आपल्या अनेक मौल्यवान लोकपरंपरा हिरावून घेतल्या.

या बदलासोबतच भारुडाचे स्वरूपही बदलले. जुनी पौराणिक आणि सामाजिक वगनाट्ये लयाला गेली. भारुडात पूर्वी पुरुष नाचे असायचे, तिथे आता स्त्रिया काम करू लागल्या आहेत. अनेक भारुडांमध्ये १०-१२ स्त्रियांचा संच असतो. मात्र, सुरुवातीची ती पंचपदी आणि लोकप्रबोधन मागे पडून, आता 'गण, मुजरा, गवळण आणि रंगबाजी' असा तमाशासारखा बाज भारुडाला आला आहे. मूळ आध्यात्मिक गाभा सोडून रंगमंचावर 'धांगडधिंगा' सुरू असणे अत्यंत वाईट आहे; पण 'काळाप्रमाणे बदलावे लागते' हेही तितकेच खरे आहे.

आशेचा किरण आणि आपली जबाबदारी

अशा कठीण आणि प्रतिकूल काळातही विठू नांगरे (मोरोशी), रामू न्हावी, सिताराम मुऱ्हे (टोकवडे), बाबुराव आणि काशिनाथ गुंजाळ (पोखरी) अशा अनेक जुन्या कलाकारांनी ही कला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य वेचले.

आजच्या काळातही आंबेगाव तालुक्यातील गोहे येथील 'वाघेश्वर कलापथक मंडळ', खेड तालुक्यातील नायफड माळेवाडी येथील 'कमलजादेवी कलापथक मंडळ' आणि 'श्री भैरवनाथ कला नाट्य देवतोरणे' अशी नामांकित मंडळे अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत, ही नक्कीच समाधानाची बाब आहे. 

या कलापथकांचे सर्वेसर्वा विठ्ठल शिंगाडे व मच्छिंद्र बांबळे हे ही कला टिकवून ठेवण्यासाठी जे अहोरात्र प्रयत्न करत आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहेत.

महाराष्ट्र शासनाने या कलाकारांचा अधिकृत गौरव केला पाहिजे आणि समाजानेही या लोकनाट्याला आर्थिक व मानसिक प्रोत्साहन दिले पाहिजे, ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.

भारूड ही केवळ कला नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा श्वास आहे. टाळ, मृदंग, पंचपदी, गजर, वगनाट्य आणि लोकप्रबोधन यांचा हा अमूल्य वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अन्यथा, उद्या इतिहासाच्या पानांवर भारूडाचा उल्लेख फक्त वाचायला मिळेल; पण रंगमंचावर त्याचे जिवंत अस्तित्व मात्र कुठेच दिसणार नाही.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...