महाराष्ट्राच्या बहुसांस्कृतिक आणि बहुआयामी लोकसंस्कृतीमध्ये भटक्या-विमुक्त जमातींचे योगदान अनन्यसाधारण आहे. या जमातींमध्ये 'भराडी' ही एक सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण जमात मानली जाते.
नाथपंथीय संप्रदायाचा वारसा, कालभैरवाची अनन्यसाधारण उपासना, आगळीवेगळी लोककला, पौराणिक आख्याने आणि रंजनपर समाजप्रबोधन यांमुळे भराडी समाजाने महाराष्ट्राच्या लोकजीवनावर आपली गडद मुद्रा उमटवली आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाडा या प्रदेशांमध्ये या समाजाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आढळते.भराडी समाजाची उत्पत्ती आणि नावाची व्युत्पत्ती
अ) 'भराडी' नावाची व्युत्पत्ती:
'भराडी' या नामाभिधानाची उत्पत्ती 'भराड' या मूळ धातूपासून आणि विधीवरून झाली आहे. लोकपरंपरेत 'भरणे' (देवतेचा घट किंवा भंडार भरणे) आणि 'भाट' (स्तुतीपाठक) या दोन्ही संकल्पना एकत्र येऊन 'भराडी' हा शब्द रूढ झाला. 'भैरवनाथाच्या नावाने जोंधळ्याचा मखर आणि घट भरणारे ते भराडी' अशीही एक लोकव्युत्पत्ती ग्रामीण भागात सांगितली जाते.
ब ) भराडी आणि डवरी गोसावी यांचे परस्परसंबंध:
डवरी (डौरी) गोसावी हा मूळ देववंशीय किंवा नाथपंथीय संप्रदाय आहे. 'डवर' किंवा 'डमरू' हे वाद्य वाजवून भिक्षा मागणारे ते डवरी.
भराडी हा याच डवरी गोसावी समाजातील एक पोटविभाग किंवा विशिष्ट 'धार्मिक भूमिका' बजावणारा घटक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, डवरी गोसावी समाजातील जे लोक प्रामुख्याने कालभैरव आणि जळगावच्या नाथपीठाशी जोडले गेले आणि ज्यांनी 'भराड' हे विधिनाट्य आपल्या उपजीविकेचे आणि कुलधर्माचे माध्यम बनवले, ते 'भराडी गोसावी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळे हे दोन्ही समाज एकमेकांशी रक्ताने आणि परंपरेने जोडलेले आहेत.
क) विविध संशोधकांचे मत:
डॉ. रा. चिं. ढेरे (लोकसंस्कृतीचे अभ्यासक):
त्यांच्या मते, "महाराष्ट्रातील नाथपंथीय डवरी आणि भराडी हे मूळच्या शिव-भैरव उपासक जमातींचे आधुनिक रूप आहेत. आदिवासी किंवा आदिम संस्कृतीतून लोकसंस्कृतीत या समाजाने प्रवेश करताना नाथपंथाची दीक्षा घेतली, मात्र आपली मूळ वाद्ये (डौर) आणि विधी (घट भरणे) सोडले नाहीत."
एंथॉवेन (R.E. Enthoven - Castes and Tribes of Bombay):
ब्रिटिशकालीन गॅझेटिअरमध्ये एंथॉवेन नोंदवतो की, भराडी हे डवरी गोसाव्यांचेच वंशज असून ते भैरवनाथाचे भगत म्हणून काम करतात आणि त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार (लग्नसंबंध) होतात.
जन्म, नामकरण व मृत्यूसंस्कार (जीवनचक्र विधी)
भराडी समाजाचे संपूर्ण जीवनचक्र हे नाथपंथीय संस्कार आणि आदिम लोकविश्वास यांच्याशी घट्ट जोडलेले आहे.
अ) बाळ जन्मल्यानंतरचे विधी व नामकरण
पाचवी आणि सटवी:
बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या आणि सहाव्या दिवशी 'पाचवी' व 'सटवी' पूजली जाते. सटवी बाळाचे नशीब लिहिते, अशी समजूत असल्यामुळे तिची पूजा करून रात्री जागरण केले जाते.
बारसे व नामकरण:
साधारणपणे १२ व्या किंवा १३ व्या दिवशी बारसे होते. मुलाचे नाव ठेवताना कुळातील पिढ्यानपिढ्या चालत आलेली नावे किंवा दैवतांची नावे (उदा. भैरू, म्हाळसा, कशिनाथ, नवनाथ, गजाभाऊ) ठेवण्याकडे जुन्या लोकांचा कल असे. नामकरणाच्या दिवशी बाळाला पाळण्यात घालताना कुलदेवतेचा सिंदूर-भंडारा लावला जातो.
जावळ काढण्याची प्रथा:
मुलाचे जावळ (पहिले केस) काढण्याचा विधी अत्यंत महत्त्वाचा असतो. हा विधी प्रामुख्याने 'भैरवनाथाच्या' किंवा कुलदेवतेच्या मुख्य मंदिरात (उदा. जेजुरी, सोनारी किंवा स्थानिक भैरवनाथ देवस्थान) जाऊनच केला जातो. जावळ काढताना मानपायली दिली जाते आणि देवाचा रोट (कणकेचा नैवेद्य) केला जातो.
ब) मृत्यूसंस्कार आणि मृत्यूनंतरच्या श्रद्धा:
दफन व दहन पद्धती:
नाथपंथीय परंपरेचा प्रभाव असल्यामुळे पूर्वी या समाजात मृतदेह 'माती देणे' (दफन करणे) म्हणजेच संन्यासी परंपरेप्रमाणे 'समाधी' देण्याची प्रथा जास्त लोकप्रिय होती. मृतदेहाला पद्मासनात (बैल बठकीत) बसवून खड्ड्यात मातीमध्ये दफन केले जाई. मात्र, आधुनिक काळात हिंदू पद्धतीनुसार दहन (अग्नीसंस्कार) करण्याची प्रथाही रूढ झाली आहे.
दहावा, तेरावा आणि पितृपूजा:
मृत्यूनंतर १० व्या दिवशी सुतक विसर्जन आणि १३ व्या दिवशी 'तेरावा' किंवा 'भंडारा' केला जातो. या दिवशी नाथपंथी साधूंना किंवा समाजातील लोकांना जेवण दिले जाते. पितृपक्षात (भाद्रपद महिना) पूर्वजांच्या नावाने 'टाक' (चांदीचे देव) पूजले जातात आणि त्यांना रोट-नैवेद्य दाखवला जातो.
भैरवनाथाशी संबंधित श्रद्धा:
भराडी समाजात अशी ठाम श्रद्धा आहे की, मृत्यूनंतर व्यक्तीचा आत्मा हा शिवकुलात, म्हणजेच कालभैरवाच्या चरणी लीन होतो. म्हणूनच मृत्यूसमयी किंवा समाधी देताना 'अलख निरंजन' किंवा 'हर हर महादेव' असा गजर केला जातो.
सामाजिक रचना, कुळव्यवस्था आणि विवाह पद्धती
भराडी समाजाची सामाजिक रचना हिंदू धर्मव्यवस्थेशी जोडलेली असली, तरी त्यांच्यात अंतर्गत कुलव्यवस्था अतिशय कडक आणि सुसंघटित आहे.
कुळे आणि आडनावे:
समाजात प्रामुख्याने चव्हाण, पवार, शिंदे, जाधव, गायकवाड, भोसले, गोसावी, साळुंखे, जोगदंडे, काळे, जगताप, माने, राठोड ही आडनावे आढळतात. यावरून मराठा संस्कृतीचा व राजपूत संस्कृतीचा मोठा प्रभाव या समाजाच्या रचनेवर स्पष्ट दिसतो.
देवक व्यवस्था:
मराठा समाजाप्रमाणेच भराडी समाजातही 'देवक' पाळले जाते. यामध्ये प्रामुख्याने धार किंवा पंचपालवी' (पाच प्रकारच्या पवित्र झाडांची पाने),'लोखंडाचे कडे', किंवा 'सूर्यफूल' ही देवके असतात. एकाच देवक असलेल्या कुळात लग्न लावले जात नाही (सगोत्र विवाह बंदी).
नातेसंबंध आणि विवाहपद्धती:
पूर्वी या समाजात विनिमय विवाह (साटं-लोटं) आणि बालविवाह प्रथा अस्तित्वात होती; परंतु आधुनिक काळात ती पूर्णपणे बंद झाली आहे. विवाह प्रामुख्याने हिंदू वैदिक पद्धतीने किंवा नाथपंथी साधूंच्या उपस्थितीत होतो. लग्नानंतर 'भैरवनाथाचा कुळाचार' (भराड घालणे) करणे ही धार्मिक सक्ती असते.
नाथपंथीय दीक्षा परंपरा आणि पारंपरिक वेशभूषा
भराडी समाजात धार्मिक अधिष्ठानाला अत्यंत महत्त्व आहे. कुळातील मुलांना साधारणपणे वयाच्या १० ते ११ व्या वर्षी नाथपंथाची दीक्षा दिली जाते. समाजातील एखादा ज्येष्ठ, चारित्र्यवान आणि अनुभवी वृद्ध व्यक्ती 'गुरुस्थानी' राहून हा दीक्षा विधी पार पाडतो.
वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत ही दीक्षा प्रक्रिया आणि त्यासंबंधीचे कडक नियम पूर्ण करावे लागतात. ही दीक्षा प्राप्त झाल्याशिवाय व्यक्तीला समाजात 'भराड' सादर करण्याचा अधिकृत धार्मिक अधिकार मिळत नाही.
ब) पारंपरिक वेशभूषा आणि सांकेतिक चिन्हे:
भराडी कलाकारांची वेशभूषा ही केवळ पेहराव नसून, ती त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक ओळखीचे प्रतीक आहे:
पोशाख:
डोक्यावर भगवा रुमाल, अंगावर भगवा सदरा (किंवा अंगरखा), त्यावर काळे/रंगीबेरंगी जाकीट आणि कमरेला पांढरे शुभ्र धोतर.
सांकेतिक साधने:
काखेत भिक्षेची 'झोळी', कपाळावर ठसठशीत 'विभूती' (भस्म) आणि गळ्यात चांदीची शिंगी' (नाथपंथीयांचे शिंगवाद्य) धारण केलेली असते. या विशिष्ट वेषभूषेमुळे भराडी कलाकार ग्रामीण जनमानसात दुरूनही सहज ओळखला जातो.
भराड : भराडी समाजाची विधिनाट्य परंपरा
महाराष्ट्रातील पारंपरिक कुळधर्म-कुळाचारांमध्ये देवीचा गोंधळ, खंडोबाचे जागरण आणि भैरवनाथाचा भराड हे तीन मुख्य स्तंभ मानले जातात. ज्याप्रमाणे गोंधळी हे शक्तिदेवतांचे आणि वाघ्ये-मुरळी हे खंडोबाचे उपासक असतात, त्याप्रमाणे भराडी हे प्रामुख्याने भैरवनाथाचे उपासक म्हणून 'भराड' हे विधिनाट्य सादर करतात.
लग्न, मुंज, नवरात्र, ग्रामदेवतेची जत्रा किंवा नवसपूर्ती अशा शुभप्रसंगी घराघरांमध्ये भराड पुजले जाते. हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून यात वेद-पुराणांतील तत्त्वज्ञान सोप्या भाषेत मांडलेले असते.
भराडातील धार्मिक विधी आणि घटस्थापना
अ) पाच पावली विधी:
भराडाची सुरुवात 'पाच पावली' या अत्यंत पवित्र विधीने होते. या विधीदरम्यान यजमान (नवरा) आपल्या खांद्यावर घोंगडी आणि लंगर धरतो, तर त्याची पत्नी (नवरी) खंडोबा, भैरवनाथ आणि भवानी माता यांच्या प्रतिकात्मक टाकांची (देव्हारा) पूजा करते.
चौदा नैवेद्य, कणकेचे चौदा दिवे, रोट, दहीभात, अंडी, चिलीम, गुलाल, विडी आणि नारळ असे पूजासाहित्य घेऊन शिवारातील (शेतातील) एका पवित्र स्थळी 'पाच पावली' पुजली जाते. भैरवनाथाचे मंदिर ज्या देशात किंवा दिशेला असेल, त्या दिशेला भूमी शुद्ध करून तांदळाची गादी भरतात आणि तिथे मुख्य पूजा व आरती संपन्न होते.
ब) घट आणि देवतांची प्रतिष्ठापना:
पाच पावली आटोपल्यावर घरात मुख्य विधी सुरू होतो. जोंधळ्याच्या ताटांचा (कणसांचा) एक सुंदर मखर किंवा मंडप तयार केला जातो. त्यात गहू आणि तांदळाचा चौक (मंडळ) भरून शिवकुलातील आणि शक्तिदेवतांचे प्रतीकात्मक घट स्थापित केले जातात. या घटांमध्ये तांब्या, पाणी, नागवेलीची पाने, नारळ, भंडार, कुंकू आणि विभूती ठेवली जाते. यावेळी शैलशिंगी, त्रिशूळ आणि डम,डिमरी या पवित्र प्रतिकांची पूजा आवर्जून केली जाते.
भराडाची कलात्मक रचना आणि प्रमुख आख्याने
भराड हे केवळ गाणे नसून ते एक संगीत लोकनाट्य' आहे. याची सादरीकरण शैली अत्यंत नेटकी आणि शास्त्रोक्त असते. यामध्ये प्रामुख्याने पुढील आख्याने (कथा) रात्रभर रंगवून सांगितली जातात:
भैरवनाथ जन्मकथा:
शिव-पार्वतीच्या संवादातून शिवाच्या अंशापासून काळभैरवाची उत्पत्ती कशी झाली आणि त्यांनी काशीचे कोतवालपद कसे मिळवले, हे मुख्य आख्यान असते.
नवनाथ कथा:
मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे चमत्कार, कानिफनाथ आणि जालिंदरनाथ यांच्या कथा सांगून नाथपंथाचा महिमा गातात.
राजा हरिश्चंद्र आणि तारामती आख्यान:
सत्यासाठी सर्वस्व त्याग करणाऱ्या राजाची कथा सांगताना संपूर्ण सादरीकरणात 'कारुण्य रस' निर्माण केला जातो. ग्रामीण प्रेक्षक ही कथा ऐकून गहिवरतात.
श्रावण बाळ व भक्त प्रह्लाद:
मातृ-पितृ भक्ती आणि ईश्वर भक्तीची मूल्ये रुजवण्यासाठी ही आख्याने बालकांसाठी आणि जनसामान्यांसाठी आवर्जून सांगितली जातात.
भराडातील साहित्यिक व कलात्मक संरचना
भराडामध्ये सादरीकरण होणाऱ्या साहित्याचे वर्गीकरण खालील संगीत व नाट्यप्रकारांत करता येते.
गण:
कार्यक्रमाची नांदी. यात गणेशाची स्तुती करून सादरीकरणात विघ्न येऊ नये म्हणून प्रार्थना केली जाते.
गवळण:
कृष्ण आणि गोपिकांच्या गोकुळातील लीला. यात 'पेंद्या' नावाचे विनोदी पात्र आणून ग्रामीण भाषेत संवाद रंगवले जातात.
पद:
संथ लयीत आणि पहाडी आवाजात गायली जाणारी देवतेची भक्तीगीते. यात तुणतुणे आणि डम डिग्रीचा वेग वाढवला जातो.
गजर आणि आरती:
कार्यक्रमाचा शेवट देवाचा जयजयकार (गजर) करून आणि पारंपरिक आरती गाऊन केला जातो.
कंडी व खांडणी:
हे या साहित्याचे विशेष अंग आहे. 'कंडी' म्हणजे रचलेली तात्कालिक उपरोधिक कविता, तर 'खांडणी' म्हणजे समोरील व्यक्तीच्या किंवा चुकीच्या रूढी-परंपरांच्या मतांचे खंडन करणारी रचना.
आख्यान:
संपूर्ण रात्रभर चालणारा मुख्य कथाभाग. यात राजा हरिश्चंद्र, श्रावणबाळ किंवा गोपीचंद राजा यांच्या कथा नाट्यरूपाने गायल्या जातात.
भराडी लोकसाहित्याचा खजिना (लोकगीतांचे नमुने)
भराडी समाजाचे मौखिक वाङ्ममय अत्यंत श्रीमंत आहे. डमरु, डिमरीच्या तालावर म्हटल्या जाणाऱ्या या साहित्यात भक्ती, कारुण्य आणि हास्यरसाचा त्रिवेणी संगम असतो.
अ) गण (गणेश वंदना)
प्रथम नमुं गजानना, गौरीच्या नंदना हो...
डम-डम डौर वाजे, चरणी मुकुट साजे,
विघ्न विनाशक तू, भक्तांच्या रंजना हो..."
ब ) भैरवनाथाचे गीत (पद)
"काशीचा भैरवनाथ आला गड्यांनो, सोन्याची शिंगी वाजवीत आला!
अंगावरी भस्म, गळ्यात लंगर, भक्तांच्या हाकेला धावूनिया आला!"
क) कंडी आणि खांडण्या (विनोदी व उपरोधिक लोकगीत)
रात्रभर जागणाऱ्या प्रेक्षकांचा कंटाळा दूर करण्यासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी 'कंडी' आणि 'खांडण्या' गायल्या जातात:
"बाजारचा वारा, उलटा फिरला हो जी जी...
शिकला सवरला मुलगा, बापाला विसरला हो जी जी!
घरात नाही दाणा, अन म्हणे मला पाटील म्हणा!
भराडातील पारंपरिक वाद्यपरंपरा
भराडातील संगीताला विशिष्ट लय आणि टोक देण्याचे काम त्यांची पारंपरिक वाद्ये करतात. यात प्रामुख्याने तीन वाद्यांचा वापर होतो.
डमरु डिमरी हे चर्मवाद्य हे भगवान शिवाचे मुख्य डमरू मानले जाते. याच्या आवाजाला शब्दब्रह्माचे प्रतीक मानतात. शिवाच्या तांडव नृत्याशी याचा संबंध जोडला जातो.
तुणतुणे हे तंतुवाद्य आहे लोककलेचा कणा मानले जाणारे हे वाद्य भराडाला सुराची साथ देते.
मंजिरी हे तालवाद्य डमरु आणि तुणतुण्याच्या जुगलबंदीत योग्य तो ताल धरून ठेवण्याचे काम मंजिरी करते.
भराडी कलाकारांची पारंपरिक भ्रमंती
भराडी समाज हा परंपरेने फिरस्ता असल्याने त्यांच्या भ्रमंतीचे एक निश्चित चक्र असायचे, जे निसर्गाच्या आणि सणांच्या चक्राशी जोडलेले होते:
भ्रमंतीचा ऋतू:
चातुर्मास संपल्यानंतर, म्हणजेच 'दसऱ्यापासून ते चैत्र-वैशाखातील जत्रांपर्यंत' (ऑक्टोबर ते मे) हा काळ त्यांच्या भ्रमंतीचे मुख्य दिवस असत. पावसाळ्यात (शेतीच्या हंगामात) हे लोक आपल्या मूळ गावी (ठाण्यावर) परतत असत.
भिक्षा आणि दक्षिणा पद्धती:
गावोगावी फिरताना ते 'कोटंबा' (लाकडी किंवा नारळाच्या कवटीचे भिक्षापात्र) हातात घेऊन भिक्षा मागत. त्यांना भिक्षेत अन्नधान्य (जोंधळा, बाजरी, तांदूळ) आणि कपडे मिळत. ज्या घरांमध्ये कुलधर्म म्हणून 'भराड' घातले जाई, तिथे त्यांना रोख 'दक्षिणा' आणि सिंदूर-भंडारा दिला जात असे. याला 'कार्याची पावती' किंवा 'धान्य पदरात पाडणे' असे म्हणतात.
भराडी समाजातील स्त्रियांची भूमिका
भराडी समाजातील स्त्री ही कुटुंबाचा आर्थिक आणि सांस्कृतिक कणा मानली जाते.
भराडातील स्त्रियांचा सहभाग:
परंपरेने मुख्य रंगमंचावर किंवा रात्री चालणाऱ्या भराड विधीत डम डिग्री वाजवणे किंवा आख्यान लावण्याचे काम पुरुष कलाकारच करतात. स्त्रिया थेट समोर येऊन भराड सादरीकरण करत नाहीत; मात्र पडद्यामागची सर्व साहित्याची तयारी, घट मांडणी आणि नैवेद्य तयार करण्याची जबाबदारी त्यांचीच असते.
धार्मिक विधींमधील भूमिका:
'पाच पावली' विधीमध्ये नवरीच्या (स्त्रीच्या) हातात दैवतांचे टाक दिले जातात. तिच्या उपस्थितीशिवाय कुळाचार पूर्ण मानला जात नाही.
लोकगीते, ओव्या आणि जात्यावरची गाणी: भराडी स्त्रियांचा मौखिक वारसा अतिशय समृद्ध आहे. पहाटे जात्यावर दळण दळताना त्या भैरवनाथाच्या, सासर-माहेरच्या आणि नवनाथांच्या ओव्या गातात.
"पहिला ग जाच माझा, काशीच्या भैरवाला
दुसरा ग जाच माझा, माझ्या गोरक्षनाथाला
कुटुंब व्यवस्था व आधुनिक काळ:
पूर्वी पुरुष भ्रमंतीवर असताना कुटुंबाची व मुलांची संपूर्ण जबाबदारी स्त्रीवर असे. आज आधुनिक शिक्षणामुळे भराडी समाजातील मुली मोठ्या प्रमाणात शाळा-कॉलेजात जात असून शिक्षिका, परिचारिका (नर्स) आणि प्रशासकीय पदांवर कार्यरत होत आहेत, ज्यामुळे त्यांचे कौटुंबिक स्थान अधिक मजबूत झाले आहे.
लोकविश्वास आणि श्रद्धा
लोकसंस्कृतीचा पाया हा जनमानसातील अंधश्रद्धा आणि अलौकिक शक्तींवरील विश्वासावर आधारलेला असतो.
दैवतांवरील श्रद्धा:
कालभैरव (भैरवनाथ) हे सर्वोच्च स्थान असले, तरी हा समाज जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी माता आणि वाडी रत्नागिरीचा जोतिबा यांना अत्यंत पूजनीय मानतो. भ्रमंतीला निघण्यापूर्वी या दैवतांचा कौल घेतला जातो.
शुभ-अशुभ संकेत व स्वप्नविचार:
घराबाहेर पडताना मांजराने रस्ता काटणे, रिकामी घागर दिसणे हे अशुभ मानले जाते, तर डोक्यावर शिंगी धारण केलेल्या डवरी गोसाव्याचे दर्शन होणे अत्यंत शुभ मानले जाते. स्वप्नात साप दिसल्यास तो 'नागनाथाचा' (शिव) संकेत मानला जातो.
नवस:
आजारपण, संततीप्राप्ती किंवा संकट निवारणासाठी भैरवनाथाला 'रोट' (कणकेचा मोठा दिवा किंवा गोड पदार्थ) करण्याचा, तसेच देवीला 'भंडारा' वाहण्याचा नवस बोलला जातो आणि यात्रांच्या वेळी तो फेडला जातो.
भराडी समाजाचा ऐतिहासिक प्रवास
भराडी समाजाचा इतिहास हा प्रामुख्याने नाथपंथाचा प्रसार, महाराष्ट्रातील राजकीय सत्तांतरे आणि फिरस्तेपणाशी जोडलेला आहे.
यादवकाळ ते मराठेशाही: यादवकाळात आणि त्यानंतर बहामनी व निजामशाहीच्या काळात नाथ संप्रदायाला महाराष्ट्रात मोठे अधिष्ठान मिळाले. या काळात भराडी (डवरी गोसावी) समाजाने शिव-भैरव उपासनेचा आणि नवनाथांच्या विचारांचा प्रचार ग्रामीण भागात केला. मराठेशाहीत या समाजाला धार्मिक कार्यासाठी आणि देवस्थानांच्या सेवेसाठी राजाश्रय मिळाला. भैरवनाथाच्या मंदिरांना सनदा व इनामे देण्याच्या प्रथेमुळे या समाजाचे स्थान सुरक्षित राहिले.
ब्रिटिश काळ आणि 'क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट १८७१' (गुन्हेगार जमाती कायदा): हा काळ भटक्या समाजांसाठी काळा ठरला. ब्रिटिशांनी १८७१ मध्ये हा क्रूर कायदा आणून अनेक भटक्या-विमुक्त जमातींना जन्मानेच 'गुन्हेगार' घोषित केले.
भराडी समाज जरी थेट हिंसक गुन्हेगारीत नव्हता, तरी त्यांच्या फिरस्तेपणामुळे, जंगलांमधील वास्तव्यामुळे आणि ब्रिटिशांच्या संशयी वृत्तीमुळे त्यांच्या मुक्त भ्रमंतीवर कडक बंधने आली. त्यांना दररोज पोलीस ठाण्यात हजेरी देणे सक्तीचे केले गेले, ज्यामुळे त्यांच्या लोककलेची आणि उपजीविकेची घडी विस्कटली.
स्वातंत्र्योत्तर काळ आणि 'विमुक्त जाती' म्हणून बदल: २९ ऑगस्ट १९५२ रोजी भारत सरकारने हा काळा कायदा रद्द केला. त्यानंतर या जमातींना 'विमुक्त जाती व भटक्या जमाती' (VJNT) म्हणून ओळख मिळाली. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या अंथनी कमिशन आणि रेंके कमिशनने या समाजाच्या पुनर्वसनासाठी अनेक शिफारसी केल्या.
आर्थिक जीवन आणि उपजीविका
पूर्वीचे आर्थिक स्वरूप: पूर्वी हा समाज पूर्णपणे निसर्गावर आणि फिरस्तेपणावर अवलंबून होता. पावसाळ्यानंतर ते भटकंती करत. गावोगावी 'भराड' घालणे, धार्मिक विधी करणे, जनावरांचे पालन करणे आणि 'कोटंबा' हातात धरून भिक्षा मागणे (भिक्षुकी) हीच मुख्य आर्थिक साधने होती.
आधुनिक काळातील बदल: स्वातंत्र्यानंतर जमिनीचे वाटप आणि शिक्षणाचा प्रसार यामुळे आर्थिक जीवनाला स्थैर्य आले. आज हा समाज पारंपरिक भिक्षुकी आणि फिरस्तेपणा सोडून स्थायिक शेती, शेतमजुरी, दुग्धव्यवसाय आणि पशुपालन याकडे वळला आहे.
शिक्षणानंतरचे स्थित्यंतर: नवीन पिढी सुशिक्षित झाल्यामुळे अनेक तरुण शासकीय नोकऱ्या, पोलीस दल, सैन्य, शिक्षण क्षेत्र आणि छोट्या-मोठ्या उद्योगांमध्ये स्थिरावले आहेत.
भौगोलिक विस्तार, 'भराडी देवी' (आंगणेवाडी) आणि शासकीय वर्गीकरण :
अ) भौगोलिक विस्तार आणि आंगणेवाडी:
भराडी समाजाचा सांस्कृतिक प्रभाव कोकण किनारपट्टीवरही मोठ्या प्रमाणावर दिसतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गावाजवळील 'आंगणेवाडीची श्री भराडी देवी' हे याचे जिवंत उदाहरण आहे. भराडावर (माळरानावर) ही स्वयंभू देवी प्रकट झाली, म्हणून तिला 'भराडी देवी' असे नाव पडले. आंगणेवाडीची जत्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून, लाखो भाविक या ठिकाणी श्रद्धेने येतात.
ब) महाराष्ट्र शासनातील वर्गीकरण:
सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणामुळे महाराष्ट्र शासनाने या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रवर्गात समाविष्ट केले आहे. भराडी समाज हा महाराष्ट्रात भटक्या जमाती (ब) [NT-B] या प्रवर्गात मोडतो. शासनाच्या अधिकृत यादीनुसार, 'डवरी गोसावी' आणि 'भराडी' यांचा समावेश एकाच प्रवर्गात करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांना शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षणाचा लाभ मिळतो.
भराडी समाजातील सण आणि उत्सव
भराडी समाजाचे सण त्यांच्या कृषी संस्कृतीशी आणि धार्मिक पीठांशी जोडलेले आहेत.
कालाष्टमी: प्रत्येक महिन्यातील वद्य अष्टमीला (विशेषतः कार्तिक महिन्यातील कालभैरव जयंतीला) समाजात मोठे धार्मिक विधी होतात. या दिवशी उपवास केला जातो आणि काळभैरवाची विशेष पूजा केली जाते.
महाशिवरात्री:
शिवाचे उपासक असल्याने महाशिवरात्रीला रात्रभर मंदिरात डम डिग्री वाजवून जागरण आणि रुद्रपाठ केला जातो.
दसरा (विजयादशमी):
हा सण भ्रमंती करणाऱ्या या समाजासाठी प्रस्थान दिवस मानला जाई. या दिवशी शस्त्रांची आणि वाद्यांची (डम डिग्री, शिंगी) पूजा करून समाज वस्त्यांतून बाहेर पडत असे.
चैत्र व वैशाख यात्रा:
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख ग्रामदैवतांच्या आणि भैरवनाथांच्या यात्रा या काळात होतात. चाकण, सोनारी आणि आंगणेवाडी या ठिकाणी भराडी बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात.
भराडी समाजातील उल्लेखनीय व्यक्ती व सांस्कृतिक योगदान
अनेक संकटांचा सामना करत या समाजातील व्यक्तींनी कला, राजकारण आणि समाजकारणात महाराष्ट्रात आपले नाव कमावले आहे:
लोककलाकार आणि शाहीर:
तमाशा सम्राट दत्ता महाडिक पुणेकर:
भराडी समाजाची सर्वात मोठी कलात्मक देणगी आणि अभिमान म्हणजेच 'तमाशा सम्राट' दत्ता महाडिक पुणेकर हे होत. भराडी समाजाच्या पारंपरिक डमरु, तुणतुणे आणि गणाची उपजत लय त्यांच्या रक्तातच होती. आपल्या पहाडी आवाजाने, बहारदार ढोलकीच्या थापेवरील सादरीकरणाने आणि संवादफेकीने त्यांनी महाराष्ट्राचा तमाशा फडकवला आणि लोककलेला एका सर्वोच्च शिखरावर पोहोचवले.
त्यांच्या रूपाने भराडी समाजातील एका कलाकाराने संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकमानसावर अधिराज्य गाजवले. त्यांना महाराष्ट्र शासनाचा संगीतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
ग्रामीण भागात डौर वाजवून समाजप्रबोधन करणारे अनेक अनाम शाहीर या समाजाने दिले. अनेक भराडी कलाकारांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या 'लोकरंग' कार्यक्रमांमध्ये भराड कलेचे सादरीकरण करून तिला राज्यपातळीवर ओळख मिळवून दिली.
सामाजिक नेते:
भटक्या-विमुक्त चळवळीत डवरी-गोसावी आणि भराडी समाजाच्या हक्कांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आणि जमिनीच्या हक्कांसाठी लढणारे अनेक स्थानिक कार्यकर्ते आणि नेते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यांनी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
शाहीर रामदास जोगदंडे भराडी वय: ६८ वर्षे चाकण (पुणे) हे गेली ५० वर्षांपेक्षा जास्त काळ भराड सादरीकरण करत अहेत. ते म्हणतात सध्याची परिस्थिती "पूर्वी घराघरांतून भराड पुजले जायचे. लोक श्रद्धेने आदरातिथ्य करायचे आणि कोटंब्यात धान्य टाकायचे. आज डीजे आणि टीव्हीमुळे लोक भराड विसरले आहेत.
नवीन मुलांना वाद्ये वाजवायला लाज वाटते, पण आम्ही ही शिवपरंपरा आमच्या श्वासासारखी जपली आहे. शासनाने आमच्या तरुण पोरांना व्यासपीठ दिले पाहिजे."
भराडी समाजातील लोकदेवता
भराडी समाजाच्या देव्हाऱ्यात आणि संस्कृतीत शिवकुलातील आणि शक्तिपीठांतील दैवतांना सर्वोच्च स्थान आहे.
कालभैरवनाथ (भैरवनाथ):
समाजाचे मुख्य आराध्य दैवत. तो शिवाचा अवतार आणि काशीचा कोतवाल मानला जातो.
गोरक्षनाथ व नवनाथ:
नाथपंथाचे प्रवर्तक असल्याने नवनाथांच्या कथा आणि धून प्रत्येक धार्मिक कार्यात आवश्यक असते.
खंडोबा व जोतिबा:
जेजुरीचा मल्हारी मार्तंड आणि वाडी रत्नागिरीचा जोतिबा (केदारनाथ) हे त्यांच्या कुळाचाराचे मुख्य भाग आहेत.
तुळजाभवानी व भराडी देवी (आंगणेवाडी):
आदिशक्ती भवानी माता आणि कोकणातील स्वयंभू भराडी देवी यांच्याप्रती समाजात प्रचंड श्रद्धा असून, नवस फेडण्यासाठी या ठिकाणी यात्रा केल्या जातात.
भराडी समाजातील शिक्षणाची सद्यस्थिती
साक्षरतेचे प्रमाण:
गेल्या तीन दशकांत भराडी समाजात साक्षरतेचे प्रमाण वेगाने वाढले आहे. शासनाच्या वसतिगृह योजनांमुळे दुर्गम भागातील मुलेही शहरात येऊन शिकत आहेत.
उच्चशिक्षण व सामाजिक प्रगती: समाजातील तरुण आता पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि अभियांत्रिकी, वकिली व वैद्यकीय (Medical) क्षेत्राकडे वळत आहेत.
शासकीय योजनांचा लाभ:
व्ही.जे.एन.टी. (VJNT) प्रवर्गांतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्ती आणि सवलतींमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले आहे, ज्यामुळे समाजाची सामाजिक प्रगती गतिमान होत आहे.
भराड कलेसमोरील आधुनिक आव्हाने
आज हा समृद्ध सांस्कृतिक वारसा एका नाजूक वळणावर उभा आहे:
डीजे आणि पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव: ग्रामीण भागातील जत्रा आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आता पारंपरिक लोककलांची जागा डीजे आणि आधुनिक ऑर्केस्ट्राने घेतली आहे.
मोबाईल व सोशल मीडिया: मनोरंजनाची साधने हाताच्या बोटावर आल्यामुळे रात्रभर जागून 'भराड' ऐकण्याची मानसिकता कमी होत चालली आहे.
तरुण पिढीची उदासीनता: आर्थिक स्थैर्य नसल्यामुळे आणि या कलेला समाजात प्रतिष्ठा कमी मिळत असल्याच्या भावनेमुळे नवीन पिढी डम डिग्री शिकण्यास उदासीन आहे.
आर्थिक असुरक्षितता व शासकीय दुर्लक्ष: केवळ काही महिन्यांच्या जत्रांवर कलाकारांचे कुटुंब चालत नाही. इतर लोककलांप्रमाणे भराड कलाकारांना अजूनही मोठ्या प्रमाणावर शासकीय मानधन किंवा निवृत्तीवेतन (Pension) मिळत नाही.
संशोधकाचे मत
भराडी समाज आणि त्यांची भराड परंपरा हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक अनमोल आणि पवित्र ठेवा आहे. या समाजाच्या लोकगीतांमध्ये, कंडी-खांडण्यांमध्ये आणि आख्यानांमध्ये मौखिक साहित्याचा मोठा खजिना दडलेला आहे. आज आधुनिक मनोरंजन साधनांच्या आक्रमणामुळे 'भराड' या विधिनाट्याला पूर्वीसारखा लोकाश्रय मिळेनासा झाला आहे.
या लोककलेचे पद्धतशीर दस्तावेजीकरण (Documentation) करणे, डिजिटल माध्यमातून ते जगासमोर आणणे आणि शासकीय पातळीवर या कलाकारांना मानधन व हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे ही काळाची गरज आहे. तरच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा हा 'डमरुचा' आवाज पुढच्या पिढ्यांपर्यंत घुमत राहील.
"भराडी समाज हा केवळ एक भटक्या-विमुक्त समाज नसून महाराष्ट्राच्या शिव-नाथ परंपरेचा, लोकनाट्य परंपरेचा आणि मौखिक साहित्याचा जिवंत वारसदार आहे. भराड ही कला जपणे म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतीचे संरक्षण करणे होय."
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा