Translate

गावाकडच्या मातीच्या चुली : हरवत चाललेली ऊब आणि आठवणी

गावाकडची पहाट

आज गॅसच्या जमान्यात उभी राहिलेली आधुनिक स्वयंपाकघरं पाहताना, मातीच्या चुलीची ऊब मनात नकळत जागी होते.”

पहाटेचा कोंबडा आरवल्याबरोबर स्त्रिया उठुन कामाला लागत असत.शेरभर धान्य घेऊन त्या जात्यावर दळू लागत. जात्यावर दळताना त्यांनी गायलेली जात्यावरची गाणी अगदी दुरपर्यंत निनादत असत. जात्यावरच्या ओव्यांचा ध्वनी ऐकून एक वेगळाच उत्साह असमंतात दरवळत असे. 

तो पर्यंत झुजूमुंज्र झालेले असे. त्यावेळी न्याहारीसाठी आणी रात्रीच्या जेवणासाठी भाकरीचे पिठ रोजच्या रोज दळले जात असे. 

धान्य दळून झाल्यावर प्रातर्विधी उरकून चुलीमध्ये असलेली अतिरिक्त राख काढून टाकली जाई. त्यानंतर चूल आणि भानवस सारवून चुल पेटवली जात असे. आणि मगच नवीन दिवसाला सुरुवात होई.

चुलीजवळची सकाळची ऊब

सकाळी उठून घरातील माणसे आणि लहान मुले चुलीजवळ शेकायला गर्दी करत असत. आणि शेकता शेकता चहा कधी होईल याची वाट पाहत असत.

स्टीलच्या पितळी मधून चहा पिणे ही एक वेगळीच मजा होती. काहीजण चहामध्ये नाचणीच्या शिळ्या भाकरी कुस्करून खात असत. त्यावेळी दुकानात एक रुपयाला दहा बटारे मिळत. आम्ही ग्लासमध्ये बटरं कुस्करून चहा मध्ये खात असू.

सकाळची कामे उरकली जात. त्यावेळी घरात अनेक माणसे असल्यामुळे कामे विभागुन केली जात.

कुणी स्वयंपाक तर कुणी झाडलोट तर कुणी शेण काढणे कुणी गोव-या थाबणे अशी कामे असत.

गोवऱ्या थापने

सकाळी सकाळी जनावरांचे शेण काढून झाल्यावर काही शेण जवळच असलेल्या मोकळ्या शेतात किंवा बांधावर स्रिया घेऊन जात असत. तेथेच नाचणीचे, किंवा साव्याचे भुसकाट आधीच आणून ठेवलेले असे.

थोडेसे शेण, भूसकाट व थोडेसे पाणी या मिश्रणात गोवऱ्या थापल्या जाई. या गोवऱ्या सुद्धा थापताना गोल, वाटोळ्या अशा प्रकारच्या गोवऱ्या असत. ओळीने थापलेल्या आणि शेतात किंवा बांधावर वाळत घातलेल्या गोवर्या पाहताना एक वेगळीच मजा वाटायची.

वाळलेल्या गोऱ्या तिथेच अगदी व्यवस्थित रचून ठेवलेले असायच्या.

वाळलेले शेण गोळा करणे 

लहानपणी आमचे सर्वात आवडती काम कोणते असेल तर वाळलेले शेण गोळा करणे.

सुट्टीच्या दिवशी अगदी सकाळी सकाळी चहा नाश्ता करून आम्ही पोती घेऊन रानात आणि रानोमाळ चुलीत घालण्यासाठी आणि शेतीची डाळ भाजण्यासाठी शेण गोळा करण्यासाठी भटकत असू.

वाळलेले शेण गोळा करताना अजूनही ते दिवस आठवतात. शेण गोळा करता करता भूक लागल्यावर आम्ही उंबराची पिकलेली लाल उंबरे खात असू.

उंबराच्या झाडाखाली सावलीला हमखास अनेक गाईगुरे बसलेली असायची. उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना फार गवत मिळायचे नाही. त्यामुळे उंबराच्या फळावर त्या बिचाऱ्यांची गुजराण चाललेली असायची.

आम्ही मग त्यांच्यामध्ये सामील व्हायचो. तहान लागल्यावर डोंगर कपारीतील थंडगार पाणी प्याल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जायचे.

माळरानावरचे बालपण” 

शेण गोळा करून झाल्यावर इतर मित्रांना आम्ही शेण गोळा करायला मदत करायचो गोट्या, विटी दांडू, क्रिकेट असे विविध खेळ माळरानावर आम्ही खेळत असू. देहभान विसरून आम्ही खेळात रमून जायचो.

सूर्य डोक्यावर आल्यावर मग आम्ही खेळ आटोपून वाळलेल्या शेनाची पोती घेऊन घराच्या दिशेने मार्गक्रमण करत असू.

नवीन चुलीचे आगमन 

प्रत्येकाच्या घरात तेव्हा मातीच्या चुली असत. काही दिवसानंतर चूल ठीक ठिकाणी तुटून फुटून जात असे. 

चुलीमध्ये लाकडं पुढे सारताना त्याचे झटके चुलीला बसायचे..नव्या चुलीचे सुद्धा टौकै उडायला सुरुवात व्हायची थोड्या दिवसातच. माती चांगली लागली तर चूल टिकायची नाहीतर लवकरच ढासळायची त्यामुळे कसेतरी दगडाची चीप किंवा कौलाचा तुकडा लावून वेळ निभावून नेली जाई.

परंतु नंतर मात्र खास चूल आणण्यासाठी स्त्रिया कुंभाराकडे जात असत. तिथे अनेक प्रकारच्या चुली उपलब्ध असत.

छोटी चूल, एक ववलाची चूल, एकावेळी दोन पातेले ठेवून अन्न शिजवायची बिगर वववलाची चूल असे चुलींचे वेगवेगळे प्रकार होते.

गावात कुंभारांचे आगमन 

गावाला प्रत्येक घरात एक किंवा दोन मातीच्या चुली असायच्या. मातीच्या चुली घरोघरी.. असं काहीतरी असावं बहुधा. अनेक घरात दोन चुली असायच्या…मातीच्या चुली दोन प्रकारे त्या काळात मिळायच्या. 

अगदी सकाळी सकाळी नऊ-साडेनऊच्या दरम्यान कुंभारीन तयार केलेली चूल डोक्यावर घेऊन आमच्या गावात यायची. जुन्या टॉवेलाची छोटीशी चुंबळ डोक्यावर घेऊन त्याच्यावर चूल घ्यायची. 

चूल डोक्यावर घेऊन जेव्हा तीन,चार किलोमीटर लांब असलेल्या तिच्या गावातून चालत चालत आमच्या गावापर्यंत यायची तोपर्यंत ती कमरेत वाकुन जायची. नऊवारी नेसलेली कपाळावर आडवं कुंकू ठसठशीत, तोंडावर घामाच्या धारा वाहत असायच्या.

ती आल्यावर रस्त्याच्या एका कोपऱ्यात मातीची चुल हळूच उतरायची. ती जड चुल खाली उतरताना तिला उरलासुरला जोर लावायला लागायचा…तिच्यासोबत तिचा नवरा अजून एक चुल घेऊन उभा असायचा. तो पुढच्या गल्लीत जायचा.

तीनं आवाज दिल्यानंतर पाच सहा बायका गोळा व्हायच्या…बहुतेक तो वार मंगळवार असायचा. जिला गरज आहे ती चुल पारखून घ्यायची. चुलीच्या बदल्यात तिला पैसे देण्याची पद्धत नव्हती तर ....दोन ते तीन पायली धान्य द्यायचं...'जसं ठरेल तसं'

धान्य घेण्यासाठी तीनं चांगली मजबूत फडकी आणलेली असायची.. टोपल्यातलं धान्य.. पाटीत काढल्यानंतर मापाने मोजून तिला घातलं जायचं.. आणि मग चुल आपली व्हायची.

चूल तयार करण्याची दुसरी पद्धत 

चूल बनवण्याची दुसरी पद्धत सुद्धा त्यावेळी होती. स्वतः माती आणून घरातचं भिजवायची, चांगली मळायची आणि चूल बनवायची. या पद्धतीने चुल बनवायला जास्त वेळ लागायचा. पण गावात ठराविक जानकर बायका चुली बनवायच्या. 

चांगली काळी माती आणायची, त्यातले सगळे खडे, कचरा बाजूला काढायचा, थोडासा भाताचा कोंडा मिक्स करायचा आणि चांगला मुरवायचा चिखल चांगला मळल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे. 

त्यानंतर मग चूल बनवणाऱ्या जानकर बाईला बोलावून आणायचे. आमच्या गावात माझी आई खूप छान प्रकारे चूल बनवायची 

आयताच्या आकाराचा वितभर उंचीचे मातीचे गोळे चांगले थोपटून थोपटून सपाट बनवायचे. मग चिखल थोडा सुकायला लागल्यावर चुलीचा आकार कापला जायचा. 

चुल कापून झाल्यानंतर, त्याच्यावर मातीचे उंडे बसवायचे आणि मग शेवटी तिला सुकत ठेवायची. चुल सुकल्यानंतर तिला चांगली सारवायची.

चूल आणि भानवस

भानवस असल्याशिवाय चुलीला शोभा नसे. घरातील चूल आणि भानवस पाहून घरातील स्त्री कशी आहे हे ठरवले जाई. त्यामुळे अनेक स्त्रिया चूल आणि भानवस आखीव रेखीव आली पाहिजे यासाठी आग्रही असायच्या.

चूल घातल्यावर तिच्या पाठीमागे व्यवस्थित रचलेली चुलीच्या उंची इतकीच वित दीड वीत भानवस रचलेली असायची. भानवसीच्या उजव्या बाजूला मडके पुरलेले असायचे. त्या मडक्यात शक्यतो मीठ ठेवत असत. हेच मीठ स्वयंपाकासाठी वापरले जाई. 

चूल घातल्यावर चूल आणि भानवस माती आणि राखेच्या गिलाव्याने व्यवस्थित सारवली जाई. त्यानंतर मग शेणाच्या आणि राखेच्या गिलाव्याने व्यवस्थित सारवून मग चूल पेटवली जाई.

नवीन चूल पेटवायला सुद्धा मुहूर्त पाहिला जात असे. यासाठी गावातील चार-पाच मैत्रिणींना आवतनं दिले जाई.  

चूल पेटवायच्या आधी हळद-कुंकू वाहून चुलीची पूजा केली जात असे. त्यानंतर मग दूध उतू घालायचे आणि त्यानंतर चहा करून मैत्रिणींना दिला जात असे.

घरची कारभारीन या मानाची हकदार असायची. नवीन चूल बसवल्यावर घराला नवपणं आल्या सारख वाटायचं. कारण भाकरी घालताना, जाळ व्यवस्थित लागायचा, त्यामुळे जेवण बनवणाऱ्या बाईचं डोळ झोंबायचं नाहीत... कारण अगोदरच्या चुलीनं...जाता जाता खूप त्रास दिलेला असायचा.

चुलीवरच्या जेवणाची चव 

चुलीवरच्या जेवणाची चवचं वेगळी असायची. भाकरी तव्यात टाकल्यावर एका हाताने त्याला लाकडं  सारुन जाळ लावायचा आणि आधीँ- कच्ची भाजल्यानंतर तिला थोडेसे विस्तव बाहेर काढून त्याच्यावर उभी करायची. 

लाल विस्तवावर चांगले खरपूस भाजल्यावर तिला दोनदा फिरवायची आणि भानवसीवर उभी करायची... चूल आणि भिंत याच्यामध्ये भानवसीची जागा असायची भिंतीला टेकून भानवसीवर भाकरीच्या रांगा अशा उभ्या असायच्या जसं काय बैलगाड्या शर्यतीसाठी उभ्या आहेत.

मटणाचा रस्सा , धपाटे, पुऱ्या, भाकरी, तव्यात केलेल्ं पिठलं, भाज्या आणि सगळ्यात आवडतं पुरणपोळी आणि झणझणीत सार.

मक्याच्या किंवा ज्वारी बाजरी च्या हंगामात कणसे चुलीत भाजायला भारी वाटायचं. छोटी छोटी कणसं एका मोठ्या पाटीत उकडली जायची... त्याच्यात मीठ टाकलं जायचं आणि शिजल्यानंतर ते खाली उतरून खायला सुरुवात केली जायची.

रानातून आणलेली कंदमुळे, बटाटे, रताळी, बोंबलाचे किंवा वाकटीचे छोटे तुकडे, मासे चुलीच्या आहारामध्ये आम्ही भाजून खात असू. त्यांची अप्रतिम चव अजूनही जिभेवर रेंगाळत असते.

 

चुलीवर तव्यात घालून केलेले मोकळे बेसन, बेसनाची वाटोळी भजी, पापुद्रा आलेल्या भाकरी, बीडाच्या कहालीमध्ये केलेल्या पेजवळ्या (घावणे), शेंगदाण्याच्या गूळ घालून केलेल्या पोळ्या यांची चव अजूनही आठवण आल्यावर जिभेवर रेंगाळते.

चुलीत अख्खा पावसाळा पुरतील एवढी चांगली कठीण लाकडं प्रत्येक जण पावसाळ्याच्या तोंडावर घरात माळ्यावर साठवून ठेवायचा.

चुलीचा विस्तव जपून ठेवणे 

​रात्री जेवण झाल्यावर चूल पूर्ण विझवली जात नसे.  त्यात एखादा निखारा राखेखाली दाबून ठेवला जायचा, ज्याला 'विस्तव राखणे' म्हणतात. सकाळी पुन्हा तोच विस्तव फुंकून नवी चूल पेटवली जायची. हे 'विस्तव राखणे' म्हणजे घराची लक्ष्मी आणि परंपरा जिवंत ठेवण्याचं प्रतीक मानलं जायचं.

चुलीजवळच्या काही आठवणी 

पावसाळ्यात बाहेरून आल्यानंतर चुली समोर दहा मिनिटे जरी बसलं तरी दिवसाचा शिणवटा निघून जायाचा.

पावसाळ्यात प्रत्येकाच्या घरी घोंगडी असायची. दिवसभरात रानात जाताना अंगावर घेतलेली घोंगडी भिजून जात असे. त्यामुळे ही घोंगडी चुलीवर असलेल्या दांडावर वाळत घातली जाई.

अनेक जण आपल्या छत्र्या चुलीवरच वाळत घालत असत. त्यावेळी छत्रीचे कापड देखील मांजरपाट या प्रकारचे असे. त्यामुळे छत्र्या लवकर सुकत नसत.

चुली जवळ शेकत असताना अनेक प्रकारच्या गप्पा रंगत असत.

चुलीवरचे जेवण इतकं आवडायचं की त्याची आठवण आज देखील ताजी आहे संध्याकाळी दिवस मावळायला चूल पेटवायची ते रात्री दुधाचा टोप उतरवून मशेरीला  विस्तव बाहेर काढल्या वर तिला आराम मिळायचा.

आजी आणि घरातील बायांचं ठरलेलं असायचं. जेवण झालं की तंबाखूची पिशवी घेऊन बसायच्या. मूठभर तंबाखू काढून त्याच्यावर लाल भडक विस्तव ठेवायच्या. मशेरीचा वास नाकातोंडात गेल्याशिवाय राहायचा नाही. 

मुलांना दुधाची साय पातेलं पुसून खायची सवय असायची.त्यामुळे मुले झोपायच्या अगोदर चुली समोर लुडबुड करत असायची.

चुलीभोवतीचे सणवार आणि संस्कृती

​चुलीचा संबंध फक्त रोजच्या जेवणाशी नव्हता, तर तो सणांशीही खोलवर जोडलेला होता.

​नागपंचमी: या दिवशी चूल पेटवायची नसते, असा एक नियम पाळला जायचा. त्या दिवशी आदल्या दिवशीचे पदार्थ किंवा चुलीवर न रांधलेले पदार्थ खाण्याची प्रथा कशी होती, याचा उल्लेख करता येईल.

​दिवाळीचे अभ्यंगस्नान: नरक चतुर्दशीच्या पहाटे चुलीवर मोठ्या 'हंड्यात' किंवा 'काहिलीत' पाणी तापवले जायचे. त्या पाण्याला मिळणारी एक वेगळीच 'कडक' ऊब आणि वाफ घराघरात आनंदाचे वातावरण निर्माण करायची.

दिवसभर थकलेली चूल रात्री शांत व्हायची. दुसऱ्या दिवशी जर उपवास असेल तर त्याच रात्री तिला साफ करून सारवुण घेतली जायची. 

सकाळी उठल्यावर चूल पेटवताना पहिल्यांदा सगळी राख बाहेर काढायची आणि छोटेसे वाळलेल्या शेणाचा तुकडा किंवा गोवारीचा तुकडा घ्यायचा त्यावर थोडसं रॉकेल टाकायचं आणि मग पेटवायची. तोंड धुवायच्या पाण्यापासून सुरुवात व्हायची.

चुलीशी संबंधित साधने (विस्मरणात गेलेली शस्त्रे)

​आजच्या 'मायक्रोवेव्ह' आणि 'मिक्सर'च्या काळात काही वस्तूंची नावेही नवीन पिढीला माहित नाहीत:

​फुकणी: चुलीतला जाळ विझू नये म्हणून लोखंडी किंवा बांबूच्या फुकणीने फुंकर घालताना डोळ्यांतून येणारे पाणी आणि त्यातून होणारी कसरत.

​सांडशी आणि चिमटा: गरम पातेलं उतरवण्यासाठी वापरली जाणारी ती काळीकुट्ट सांडशी.

​पळी आणि उलाथणे: भाकरी उलटण्यासाठी लागणारे लोखंडी उलाथणे आणि त्याचे चुलीवर होणारे ठणठण आवाज.


हद्दपार होत असलेली चूल 

गावाला आज घराघरात गॅस आला आहे. गॅस सिलेंडर आल्यामुळे रॉकेल बंद झाले. कुणी आताशी रानात वाळलेले शेण गोळा करायला जात नाही किंवा सरपण आणायला जात नाही. 

गोवऱ्या थाबायच्या कमी झाल्या आहेत कारण लोकांकडे जनावरच राहिली नाहीत. 

गॅस शेगडी दहा मिनिटात कुकर मधला भात शिजवून देते. परंतु काहीही म्हणा गॅस वरच्या जेवणाला चुलीवरच्या जेवणाची सर केव्हा येणार नाही. चुलीवरच्या जेवणाची चव मात्र गॅसच्या शेगडीवर कधीच मिळत नाही.

आज घराघरात गॅस आहे, वेळ वाचतो, सोय होते; पण मातीच्या चुलीची ऊब, धुरकट चव आणि चुलीजवळ रंगलेल्या गप्पा या आठवणी मात्र कधीच संपणार नाहीत. चूल फक्त स्वयंपाकाचं साधन नव्हती, ती घराचं हृदय होती.”

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान) 





महाराष्ट्रातील तमाशा परंपरा आणि शंकरराव कोकाटे यांचे जीवनकार्य

ग्रामीण भागातील कलेची आवड

महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला तमाशा कलावंतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. 

img src="..." alt=" तमाशातील एक आदा ">

पूर्वी ग्रामीण भागात कलेला अत्यंत मोठे महत्त्व होते. लोकांना कलेची खरी जाण होती आणि कलेची कदर करणारी माणसेही होती.

कलेची जोपासना

त्या काळात कलेच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. अंगभूत कला हीच कलाकाराची खरी शिदोरी होती. ग्रामीण भागातील कलाकारांवर रसिकांनी मनस्वी प्रेम केले, कलेला दाद दिली आणि प्रसंगी वर्गण्या काढून कलाकारांना मदतही केली.

यामुळे अनेक कलाकार पुढे आले, लोकप्रिय झाले आणि ग्रामीण भागाचे नाव उज्ज्वल केले. अशा कलाकारांच्या कलेचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा आणि आपण सर्वांनी तो वाचावा, हीच अपेक्षा.

लोककलेचे शिलेदार 

भागातील तमाशा क्षेत्राला खऱ्या अर्थाने वैभव मिळवून देणाऱ्यांत प्रामुख्याने शंकरराव कोकाटे (टोकावडे), विष्णू चासकर, रामचंद्र वाडेकर, राम पोखरकर आणि भोकटे परिवाराचा मोठा वाटा आहे. तसेच, विठू नांगरे यांच्यासारख्या 'भारूड सम्राटांनी' अध्यात्म आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम घडवून आणला.

ग्रामीण भागात अनेक कलाकारांनी कलेची सेवा केली आहे. त्यापैकी खालील कलाकार 

तमाशा सम्राट शंकरराव कोकाटे (टोकावडे),
विष्णू चासकर (चास)
रामचंद्र वाडेकर (सुरकुंडी)
राम पोखरकर (वाळद)
मारुती भोकटे, नंदा भोकटे, दत्ता भोकटे (साकुर्डी)
शंकरराव आहिलू तळपे,
मोतीराम मोहन, संपत जढर,
विष्णू हुरसाळे (मंदोशी),
चिंधू वनघरे, बापू साबळे (भिवेगाव),
सखाराम उगले, विठ्ठल उगले (कारकुडी),
नारायण गायकवाड (डेहणे) यांनी तमाशाची सेवा केली.

प्रसादिक भारुडाची परंपरा

प्रासादिक भजनी भारुडाची सेवा देखील अनेक मान्यवरांनी केली.
विठू नांगरे (मोरोशी) हे प्रसादिक भजनी भारूड मंडळाचे अनभिषिक्त सम्राट होते.

तसेच बाबुराव गुंजाळ, काशिनाथ गुंजाळ, कै. शेळके मामा (पोखरी),सिताराम मुऱ्हे, रामू न्हावी (टोकावडे), दत्तात्रय मिलखे गुरुजी, मुरलीधर माळी गुरुजी,
शंकर मारुती ठोकळ, मारुती सावळेराम ठोकळ, शंकर माळी (स्रीपात्र), कोथेबुवा,
सुदाम उर्फ वाळकू माळी, मारुती वडेकर, गीताराम डवणे (नायफड) यांनी ग्रामीण भागातील भारूड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवले.

आताची परिस्थिती

भारूडांचे खेळ आता शेवटची घटका मोजत आहेत. गावागावातील प्रासादिक भजने काही अपवाद वगळता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

तरीही काळाच्या ओघात या कला मागे पडल्या असल्या तरी या मातीतून कलाकारांचा ओघ अजूनही सुरू आहे.

त्यापैकी –
विकास सोनवणे (शेंदुर्ली),
दत्तात्रय तिटकारे (नायफड),
दत्ता उबाळे,(मिसेस मुख्यमंत्री)
बाबूराव भोर (पिपाणी) यांचा उल्लेख करावा लागेल.

मास्टर कै. शंकरराव कोकाटे

मास्टर कै. शंकरराव कोकाटे हे खेड तालुक्यातील टोकावडे गावचे होते. वयाच्या १३व्या वर्षी त्यांनी मुंबई गाठली. सुरुवातीला त्यांनी मुंबईत डबेवाल्यांचा व्यवसाय केला. त्या काळातच त्यांचे पाय नाटकाकडे वळले.

ते सुरंगी नाटकात दरोडेखोराची भूमिका करत असत. त्यांची कला पाहून तमाशा सम्राट कै. तुकाराम खेडकर यांनी त्यांना तमाशात काम करण्याची संधी दिली.

त्यांनी तमाशात अनेक नकारात्मक भूमिका केल्या.

कालीमातेची भूमिका

एका वगनाट्यात त्यांनी कालीमातेची भूमिका केली होती. प्रथेप्रमाणे तमाशातील महिला कालीमातेची पूजा करत असताना त्यांची स्टेजवर एंट्री झाली. त्यांच्या प्रभावी रूपामुळे एक महिला अक्षरशः बेशुद्ध पडली.

स्वतःचा तमाशा

नंतर त्यांनी स्वतःचा तमाशा काढण्याचा निर्णय घेतला. वाडा गावचे कै. अनंत दगडू केदारी (अंतूशेठ) व शांतारामशेठ यांनी आर्थिक मदत केली. मुंबईतील चाकरमान्यांनीही मोठे सहकार्य केले.

त्या काळी सुमारे १५,००० रुपयांची मदत जमा झाली जी त्या काळात मोठी रक्कम होती.

तमाशाची लोकप्रियता

त्यांच्या तमाशात ७०–८० लोकांचा मोठा ताफा होता.
स्टेज, लाईट, स्पीकरसाठी स्वतंत्र दोन ट्रक असत.

त्यांनी सिद्दी जोहर, अफजलखान, औरंगजेब यांसारख्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारल्या.

त्या काळात कलाकार होणे सोपे नव्हते. गावोगावी बैलगाडीने किंवा पायी प्रवास, रात्र-रात्र जागून केलेले प्रयोग आणि तुटपुंज्या मानधनावर चालणारा संसार... तरीही या कलावंतांनी कधी कलेशी तडजोड केली नाही. अंगात ताप असतानाही घुंगरू बांधून स्टेजवर उभे राहणारे हे 'कलेचे वारकरी' होते."

मी एकदा जालन्याला गेलो होतो.तेव्हा एका वृद्ध माणसाबरोभर चर्चा करत असताना त्यांनी कै.शंकरराव कोकाटे यांनी केलेल्या भुमीकांविषयी आठवणी सांगीतल्या. 

ते ज्या वेळी सांगत होते त्या वेळी मी रोमांचीत झालो व नकळत अभिमानाने डोळे पाणावले व उर भरून आला.

आजही कधी कोकणात जा. अनेक वृद्ध लोक आजही कै.शंकरराव कोकाटे यांच्या आठवणी सांगतील.

कोकाटे यांचा हा तमाशा साधारण ९ ते १० वर्ष चालू होता. त्यांनी त्यांचा तमाशा संपुर्ण महाराष्ट्रातील विविध भागात केला कै. कोकाटे यांनी. ख-या अर्थाने आपल्या पश्चिम भागाचे नाव संपुर्ण महाराष्ट्रात मोठे केले.

अपघात आणि उतरती कळा

कै.कोकाटे यांचा तमाशा हा ठाणे जिल्ह्यातुन शहापुर येथील एका गावातुन तमाशाचे काम संपवून परतीचा प्रवास करत असताना किनवलीच्या हद्दीत त्यांच्या तमाशाचा ट्रक उलटला.

त्या अपघातामध्ये हालगीपटू शांताराम थोरात (टोकावडे) मुळूक आचारी (चास) यांचा मृत्यू झाला.

या धक्क्यामुळे ते आजारी पडले. पुण्याला उपचारासाठी नेत असताना डेहणे येथे त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय अवघे ४८ वर्ष होते.

निष्कर्ष

शंकररावांनी केवळ खलनायकच नाही, तर 'ऐतिहासिक' आणि 'पौराणिक' पात्रांना आपल्या आवाजाने आणि देहबोलीने जिवंत केले. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी मैलोन्मैल चालत येणारा रसिक प्रेक्षक, हीच त्यांच्या श्रीमंतीची खरी साक्ष होती.

तमाशा म्हणजे केवळ नाच-गाणे नव्हते, तर ती अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी एक कला होती. वगनाट्यातील छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा सामाजिक विषयांवरील भूमिका पाहून ग्रामीण जनता भारावून जात असे."

कै. शंकरराव कोकाटे यांनी ग्रामीण भागाचे नाव महाराष्ट्रभर उज्ज्वल केले. त्यांची कला आणि योगदान सदैव स्मरणात राहील.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)

रयतेचा राजा, छत्रपती शिवरायांचा माहीत नसलेला इतिहास

रयतेचा राजा 

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर अवघ्या भारताची अस्मिता आहेत. त्यांचा इतिहास आपण शालेय पुस्तकांत वाचला आहेच, पण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे असे अनेक पैलू आहेत जे आजही सामान्य जनतेला फारसे माहित नाहीत.

महाराजांनी केवळ तलवारीच्या जोरावर साम्राज्य उभे केले नाही, तर त्यामागे त्यांचे अफाट बुद्धीचातुर्य, दूरदृष्टी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन होता. 

चला तर मग, जाणून घेऊया महाराजांच्या इतिहासातील काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला थक्क करतील.

शेतकऱ्यांचे संरक्षण आणि मदत 

पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहन दिले, सरकारी तिजोरीतून मदत केली, गरीब शेतकऱ्यांना नांगर, बैल आणि बी-बियाणे पुरविण्याचे आदेश शिवरायांनी दिले होते.

दुष्काळात करमाफी

दुष्काळाच्या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांचा सारा (कर) माफ केला जात असे आणि सरकारी कोठारातून धान्याची मदत केली जात असे.

स्त्री-सन्मान

युद्धाच्या काळातही शत्रूच्या सैन्यातील महिलांना सन्मानाने परत पाठवण्याचे, तसेच स्त्रियांची कोणतीही हानी न करण्याचे कडक आदेश सैन्याला होते.

सैनिकांच्या कुटुंबाची काळजी

सैनिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेतली जात असे.

पाणी नियोजन 

रयतेसाठी बंधारे, विहिरी आणि कालव्यांची सोय करून पाणीनियोजनाला उत्तेजन दिले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती ओलिताखाली आली. आणि स्वराज्याचा बराचसा प्रदेश धनधान्य, फळे,फुले, आणि दूध दुभते यांनी संपन्न झाला.

न्यायव्यवस्था

शिवरायांची न्यायव्यवस्था सुयोग्य आणि लोककेंद्रित होती, ज्यामुळे रयतेला हे "स्वतःचे राज्य" वाटत असे, असे वरून समजते.

धार्मिक सहिष्णुता 

स्वधर्माभिमान असूनही, त्यांनी इतर धर्मांचा आदर केला आणि आपल्या सैन्यात व प्रशासनात वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना महत्त्वाचे स्थान दिले.

स्वराज्याची संकल्पना

परकीय गुलामगिरीतून मुक्ती मिळवून, सामान्य माणसाला 'मुक्त श्वास' घेता येईल असे स्वराज्य उभे केले, असे वर नमूद केले आहे. 

त्यांचा कारभार हा लोकाभिमुख होता, जो आज्ञापत्रातून स्पष्ट होतो. 

भारतीय नौदलाचे जनक (Father of Indian Navy)

बहुतेक लोकांना माहीत आहे की महाराजांनी किल्ले बांधले, पण त्यांनी भारतीय उपखंडात स्वदेशी आरमाराची (Navy) मुहूर्तमेढ रोवली. त्या काळी समुद्रमार्गे होणारी परकीय आक्रमणे रोखण्यासाठी महाराजांनी भक्कम असे यशस्वीआरमार निर्माण केले.

कोकण किनारपट्टीचे संरक्षण

डच, पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी त्यांनी लढाऊ जहाजे बांधली.

खाडीच्या मुखावर विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ले बांधून त्यांनी समुद्री शत्रूंवर वचक निर्माण केला.

गनिमी कावा, युद्धनीती पलीकडचे शास्त्र

महाराजांनी वापरलेला 'गनिमी कावा' हा केवळ लपून हल्ला करणे हा नव्हता. ते एक प्रगत युद्धशास्त्र होते.

मानसशास्त्रीय युद्ध

शत्रूच्या मनात धडकी भरवणे आणि त्यांना त्यांच्याच प्रदेशात गोंधळात टाकणे यात महाराज माहीर होते.

भौगोलिक ज्ञान: 

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा वापर करून १० पट मोठ्या सैन्याचा पराभव कसा करायचा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रतापगडची लढाई.

पर्यावरणाचे रक्षण आणि झाडांचे महत्त्व

महाराज हे काळाच्या खूप पुढे होते. त्यांनी स्वराज्यात झाडे तोडण्यावर कडक निर्बंध घातले होते. त्यांच्या आज्ञापत्रात असे नमूद आहे की रयतेने लावलेली झाडे ही लेकरांसारखी जपावीत. अगदी वाळलेले लाकूड हवे असेल तरच परवानगी घ्यावी, पण फळ देणारी झाडे तोडू नयेत.

नौदलासाठी लाकूड हवे असताना त्यांनी कधीही प्रजेच्या बागांतील झाडे तोडली नाहीत, तर सरकारी रानातून योग्य मोबदला देऊन लाकूड मिळवले.

महिलांचा सन्मान आणि नैतिक मूल्ये

शत्रूच्या स्त्रियांनाही मातेचा सन्मान देण्याची शिकवण महाराजांनी दिली. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग असो किंवा इतर कोणत्याही मोहिमेतील महिला, महाराजांच्या सैन्याने कधीही महिलांचा अनादर केला नाही. हे त्यांच्या चारित्र्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते.

शिवमुद्रा आणि राज्यकारभार

महाराजांची राजमुद्रा (Seal) ही संस्कृतमध्ये होती, तर त्या काळी राजदरबारात फारसी भाषेचा वापर व्हायचा. प्रतिपच्चंद्रलेखेव. या मुद्रेतून त्यांनी लोककल्याणकारी राज्याचा विचार मांडला.

राज्यव्यवहार कोश

त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत/मराठी शब्द देण्यासाठी 'राज्यव्यवहार कोश' तयार करून घेतला. यामुळे प्रशासनात स्वभाषेचा वापर वाढला. मोडी लिपी ही छत्रपतींच्या काळात उदयाला आली. मोडी लिपी ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली एक देणगी होती. मोडी लिपीचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

स्थापत्यशास्त्र आणि जलव्यवस्थापन

महाराजांचे किल्ले म्हणजे स्थापत्यशास्त्राचा नमुना आहेत. रायगड किल्ल्याचे बांधकाम करताना त्यांनी हिरोजी इंदुलकर यांना सांगितले होते की, किल्ल्यावर पाणी साठवण्याची अशी सोय करा की शत्रूने वेढा घातला तरी पाणी कमी पडणार नाही.

रायगडचा बाजारपेठ

आजही रायगडची बाजारपेठ पाहताना लक्षात येते की, तिथे घोडेस्वारालाही खरेदी करता येईल इतकी ती उंच आणि प्रशस्त होती.

पाण्याचे टाके

प्रत्येक किल्ल्यावर पावसाचे पाणी साठवण्याची 'साखळी पद्धत' त्यांनी राबवली होती.

सर्वधर्मसमभावाचे मूर्तिमंत उदाहरण

​अनेकदा इतिहासाचे विकृतीकरण करून महाराजांना एका विशिष्ट धर्माचे रक्षक म्हणून रंगवले जाते. 

पण वास्तव हे आहे की, महाराजांचा लढा हा 'धर्मा' विरुद्ध नसून 'अन्यायी सत्ते' विरुद्ध होता. त्यांच्या प्रशासनात आणि सैन्यात अनेक मुस्लिम, व इतर जाती-धर्माचे अधिकारी अत्यंत उच्च पदावर होते.

मदारी मेहतर

आग्रा सुटकेच्या वेळी महाराजांच्या जागी झोपलेले मदारी मेहतर.

इब्राहिम खान 

तोफखान्याचे प्रमुख.

कान्होजी जेधे 

नौदलातील महत्त्वाचे पद.

नूर खान बेग 

महाराजांच्या पायदळाचे पहिले सरनोबत हे नूर खान बेग होते.

जिवा महाला 

जीवा महाला हा जातीने न्हावी होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावान सेवक होता. अफजल खान वधाच्या वेळी याच जीवा महालाने महाराजांचे रक्षण केले.

बहिर्जी नाईक  

बहिर्जी नाईक हे तर स्वराज्याच्या हेरखात्याचे प्रमुख होते. त्यांचा फार मोठा उपयोग स्वराज्याच्या कामी महाराजांनी करून घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मराठ्यांसोबतच मावळे (कुणबी), बारा बलुतेदार, माळी, धनगर, कोळी, भंडारी आणि आदिवासी (गोंड) समाजातील सैनिक मोठ्या संख्येने होते. 

याव्यतिरिक्त, स्वराज्याच्या नाविक दलात आणि तोफखान्यात मुस्लीम सैनिक व अनेक निष्ठवान मुस्लिम अधिकारी, तसेच गोवा/पोर्तुगीज भागातील ख्रिश्चन सैनिकांचाही समावेश होता.

सैन्यातील प्रमुख समाज आणि गट

मावळे: पुणे-सातारा पट्ट्यातील डोंगराळ भागातील मावळे हे सैन्याचा मुख्य कणा होते.

मुस्लिम सैनिक 

शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लीम सैनिक होते, तसेच तोफखान्याचा प्रमुख व काही अंगरक्षक मुस्लिम होते.

आदिवासी व इतर

गोंड, महादेव कोळी, माळी, धनगर, आणि भंडारी समाजातील शूर योद्धे स्वराज्यासाठी लढले.

शिलेदार व बारगीर

सैन्यात स्वतःचे घोडे असणारे शिलेदार आणि सरकारी घोडेस्वार (बारगीर) असा दोन्ही प्रकारचा समावेश होता. 

हे स्वराज्य सर्वसमावेशक होते, जिथे जातीभेदाला थारा नव्हता आणि गुणवत्तेला प्राधान्य देऊन सर्व जाती-धर्मांतील लोकांना सैन्यात व प्रशासनात पदे दिली जात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच जातीपतीचे राजकारण केले नाही. तर त्यांनी गुणवत्तेला महत्त्व दिले. आणि स्वराज्याच्या कामे त्यांचं येथे योग्य प्रकारे उपयोग करून घेतला.

महाराजांनी मशिदींनाही इनामे दिली होती आणि युद्धाच्या वेळी कुराण हाती लागल्यास ते सन्मानाने मुस्लिम सैनिकांच्या स्वाधीन केले जायचे.

आग्र्याहून सुटका: एक जागतिक गुप्तचर मिशन

आग्र्याहून सुटका ही केवळ एक सुटका नव्हती, तर ते जगातील सर्वात यशस्वी गुप्तचर मोहिमेचे उदाहरण आहे. मिठाईच्या पेटाऱ्यातून बाहेर पडण्यापासून ते थेट रायगडापर्यंतचा हजारो किलोमीटरचा प्रवास महाराजांनी वेशांतर करून पूर्ण केला. 

यात त्यांच्या गुप्तचर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.

निष्कर्ष

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक 'राजा' नव्हते, तर ते एक 'विचार' आहेत. शिस्त, धाडस, नियोजन आणि लोककल्याण या गुणांचा संगम म्हणजे शिवराय. त्यांचा इतिहास वाचणे म्हणजे स्वतःला घडवणे आहे.

आजच्या कॉर्पोरेट जगात 'मॅनेजमेंट गुरू' म्हणूनही महाराजांच्या युद्धनीतीचा आणि प्रशासन नीतीचा अभ्यास केला जातो.

परंतु छत्रपतींचे विचार आजच्या राज्यकर्त्यांनी पुढे घेऊन जाणे आणि जनतेने त्याचे अनुकरण करणे हे खूप गरजेचे आहे परंतु तसे होताना दिसत नाही. 

आता मूळ विकासाच्या बाबी बाजूला ठेऊन जातीयतेचे राजकारण केले जाते, हेच महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? महाराजांच्या इतिहासातील असा कोणता प्रसंग आहे जो तुम्हाला सर्वात जास्त प्रेरित करतो? कमेंट मध्ये नक्की सांगा.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)


विविध कार कंपन्या कोणत्या देशाच्या आहेत? – सोप्या भाषेत सविस्तर माहिती

आजकाल कार ही लक्झरी राहिली नाही, तर ती प्रत्येक कुटुंबाची गरज झाली आहे. भारतात आपण वापरत असलेल्या बहुतांश कार या परदेशी कंपन्यांच्या आहेत. 

पण अनेकांना अजूनही माहिती नसते की टोयोटा, होंडा, ह्युंदाई, बीएमडब्ल्यू, ऑडी अशा कार नेमक्या कोणत्या देशाच्या आहेत?

भारतात आपण वापरत असलेल्या बहुतांश कार परदेशी आहेत" अशी होते, जी तांत्रिकदृष्ट्या बरोबर असली तरी, सध्या टाटा मोटर्स (Tata Motors) आणि महिंद्रा (Mahindra) या भारतीय कंपन्यांनी मार्केट गाजवले आहे.

​परदेशी कंपन्यांसोबतच आता टाटा आणि महिंद्रा सारख्या भारतीय कंपन्या सुरक्षितता (Safety) आणि पॉवरमध्ये जगाला टक्कर देत आहेत.

ब्रिटन (UK): जगप्रसिद्ध Jaguar आणि Land Rover (Range Rover) या मूळच्या ब्रिटीश कंपन्या आहेत (ज्या आता भारताच्या टाटा मोटर्सच्या मालकीच्या आहेत).

हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला कार ब्रँड्स आणि त्यांचे देश कायम लक्षात राहतील 

जपान – विश्वासार्ह कार बनवणारा देश

भारतात सर्वात जास्त पसंती जपानी कारना मिळते. कारण एकच मायलेज + टिकाऊपणा + कमी खर्च.

टोयोटा – दीर्घकाळ टिकणाऱ्या गाड्यांचा राजा

टोयोटा ही जगातील सर्वात मोठ्या कार कंपन्यांपैकी एक आहे. भारतात Innova आणि Fortuner मुळे टोयोटाची जबरदस्त क्रेझ आहे.

लोक सरळ म्हणतात – टोयोटा घेतली म्हणजे 10–15 वर्ष काळजी नाही.

टोयोटाची खासियत :

कमी बिघाड

रीसेल व्हॅल्यू जास्त

Hybrid टेक्नॉलॉजीमध्ये आघाडी

होंडा – स्मूथ इंजिनसाठी प्रसिद्ध

Honda City हे नाव ऐकले की अजूनही लोकांच्या चेहऱ्यावर स्मित येते 😊

होंडा कार म्हणजे स्मूथ ड्रायव्हिंगचा अनुभव.

खास वैशिष्ट्ये :

पेट्रोल इंजिन जबरदस्त

ड्रायव्हिंग कम्फर्ट

इंजिन आयुष्य जास्त

सुझुकी – भारतीयांची आवडती कंपनी

Maruti Suzuki म्हणजे भारतीय कार मार्केटचा राजा.

जवळपास प्रत्येक घरात एक तरी मारुती असते.

लोक सुजुकी का घेतात?

मायलेज भारी

सर्विस सेंटर सर्वत्र

पार्ट्स स्वस्त

Swift, WagonR, Baleno – ही नावं तर घराघरात पोहोचली आहेत.

निसान – स्टायलिश आणि मजबूत

निसान भारतात कमी दिसते पण जगात मोठी कंपनी आहे. Magnite मुळे पुन्हा लोकप्रिय होत आहे.

दक्षिण कोरिया – फीचर्स देणाऱ्या कार

कोरियन कंपन्यांनी भारतीय बाजार अक्षरशः बदलून टाकला.

लोकांना कमी किमतीत जास्त फीचर्स मिळू लागले.

ह्युंदाई – भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी

Creta, i20, Verna – ही कार तुम्हाला रोज रस्त्यावर दिसतात.

लोकांना ह्युंदाई का आवडते?

सुंदर डिझाइन

फीचर लोडेड कार

आरामदायी ड्रायव्हिंग

किआ – नवीन पण जबरदस्त लोकप्रिय

Kia भारतात 2019 मध्ये आली आणि थेट हिट झाली.

Seltos आणि Sonet ने बाजार हलवला.

किआची खासियत :

लक्झरी फील

मॉडर्न इंटीरियर

टेक्नॉलॉजी भरपूर

अमेरिका – पॉवरफुल कारचा देश

अमेरिकन कार म्हणजे ताकद, साईज आणि दमदार इंजिन.

फोर्ड – मजबूत गाड्यांची ओळख

Ford Mustang हे नाव ऐकले की कारप्रेमी वेडे होतात 

आता फोर्ड कंपनी भारत सोडून गेली असली तरी ब्रँड अजूनही लोकप्रिय आहे.

शेवरलेट – स्पोर्ट्स कारसाठी प्रसिद्ध

Camaro आणि Corvette या कार जगप्रसिद्ध आहेत.

टेस्ला – भविष्य बदलणारी कंपनी

Tesla म्हणजे इलेक्ट्रिक कारची क्रांती.

इंधन नाही, आवाज नाही – फक्त टेक्नॉलॉजी.

भविष्यात Tesla भारतात आली तर बाजार बदलू शकतो.

जीप – ऑफरोडचा राजा

डोंगर, जंगल, चिखल – काहीही असो, Jeep तयार.

भारतामध्ये Jeep Compass खूप लोकप्रिय आहे.

बर्‍याच ठिकाणी BMW ला अमेरिकन कंपनी म्हटले जाते.

पण हे चुकीचे आहे ❌

 BMW ही जर्मनीची कंपनी आहे.

जर्मनी – लक्झरी आणि इंजिनिअरिंगचा देश

जर्मन कार म्हणजे गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रीमियम अनुभव.

मर्सिडीज बेंझ – लक्झरीची ओळख

व्यवसायिक लोक, सेलिब्रिटी – सर्वांची पहिली पसंती.

Mercedes म्हणजे:

कम्फर्ट

सेफ्टी

स्टेटस

ऑडी – फ्युचर टेक्नॉलॉजी

Audi कारचा लुक आणि लाईट्स पाहिले की लगेच ओळखता येते.

Quattro AWD सिस्टम खूप प्रसिद्ध आहे.

फॉक्सवॅगन – मजबूत बिल्ड क्वालिटी

Volkswagen Polo आणि Virtus भारतात लोकप्रिय आहेत.

जर्मन कार म्हणजे “सॉलिड कार”.

स्कोडा (Skoda) बद्दल माहिती

​भारतात स्कोडाच्या गाड्या (Kushaq, Slavia) खूप लोकप्रिय आहेत.

​स्कोडा ही चेक रिपब्लिक (Czech Republic) या देशाची कंपनी आहे, पण ती सध्या जर्मन 'फॉक्सवॅगन' ग्रुपचा भाग आहे.

पोर्श – स्वप्नातील स्पोर्ट्स कार

Porsche म्हणजे परफॉर्मन्स आणि लक्झरीचा परफेक्ट मिलाफ.

कोणत्या देशाच्या कार सर्वात चांगल्या?

हे पूर्णपणे तुमच्या वापरावर अवलंबून आहे.

जर तुम्हाला हवे असेल :

मायलेज → जपान 🇯🇵

फीचर्स → कोरिया 🇰🇷

पॉवर → अमेरिका 🇺🇸

लक्झरी → जर्मनी 🇩🇪

भारतात जपानी आणि कोरियन कार का जास्त विकल्या जातात?

भारतीय ग्राहक साधे आहेत 😄

त्यांना हवे असते :

मायलेज

कमी मेंटेनन्स

विश्वासार्हता

हे गुण जपानी आणि कोरियन कारमध्ये जास्त आहेत.

भविष्य कोणाचे? इलेक्ट्रिक कारचे!

पुढील 10 वर्षात पेट्रोल-डिझेल कमी होणार.

EV कार वाढणार.

या स्पर्धेत पुढे :

Tesla

Hyundai

Kia

Toyota

निष्कर्ष

प्रत्येक देशाची कार वेगळी आहे, पण चुकीचा किंवा बरोबर देश असा प्रश्न नाही.

कार घेताना लक्षात ठेवा :

तुमचा बजेट

वापर

मेंटेनन्स

देश पाहून कार घेऊ नका… गरज पाहून घ्या 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ

प्रश्न : सर्वात विश्वासार्ह कार कोणत्या देशाच्या?

उत्तर : जपानी कार.

प्रश्न : लक्झरी कार कोणत्या देशाच्या?

उत्तर : जर्मनी.

प्रश्न : भारतात नंबर 1 कंपनी?

उत्तर : Maruti Suzuki. विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी नंबर १ आहे, पण सुरक्षिततेच्या (Safety Ratings) बाबतीत टाटा आणि महिंद्रा आघाडीवर आहेत.

ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान


ग्रामदैवत यात्रा: माणुसकी आणि कुस्तीची परंपरा

ग्रामदैवत यात्रा /गावची जत्रा :

नुकतीच यात्रेच्या हंगामाला सुरुवात झाली होती. पहिलाच आखाडा हा कळंबई या गावचा होता. मंदोशी गावापासून कळंबईचे अंतर खूप लांब होते.

लो कळंबई

कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी श्री महादू मोहन, श्री सुरेश आंबेकर, श्री हरिभाऊ हुरसाळे व श्री लक्ष्मण बाळू हुरसाळे हे अगदी सकाळी दहा वाजताच कळंबई येथील आखाड्यासाठी निघाले.

img src="..." alt=" गावाकडच्या यात्रा ">

ते सर्वजण कळंबई येथे एक वाजता पोहोचले. तोपर्यंत भारुडाचा कार्यक्रम संपत आला होता. 

आखाड्याच्या जेवणाची लगबग

आखाड्याच्या जेवणाची लगबग सुरू झाली होती. आमटीचा मस्त घमघमाट सुटला होता. कधी एकदा आखाड्याचा भात खायला असे झाले होते. कारण भुकच तेवढी लागली होती.

थोड्याच वेळात खाचरांत पंगती बसल्या. भात वाढून घेण्यासाठी वडाच्या, चांदयाच्या पानांचे वाटप सुरू झाले. त्यावेळी पत्रावळी नसल्यामुळे पानावर जेवण व्हायचे. प्रत्येकाच्या पानावर थंड पाण्याचा शिपकारा मारला जाऊ लागला. 

त्यानंतर अगदी दोनही हातानी वाढपे भात वाढू लागले. त्यानंतर आमटीच्या बादल्या फिरू लागल्या. जेवणाचा एकच घमघमाट सुटला. 

सर्वांना वाढून झाल्यानंतर, वदनी कवळ घेता श्लोक म्हटला. लोक जेवणावर तुटून पडले. दोन दोन चार चार वाढ्या झाल्या. लोक जेवण करून तृप्त होऊन ढेकर देत आंब्याच्या सावलीत विसाव्याला बसू लागले.

आणि आखाडा सुरू झाला 

थोडी वामकुक्षी झाली. बरोबर तीन वाजता आखाडा सुरू झाला. सुरुवातीला रेवड्यावर कुस्त्या झाल्या. त्यानंतर 1 रुपयापासून इनामाला सुरुवात झाली. हरिभाऊने देखील दोन कुस्त्या निकाली केल्या. संध्याकाळी सात वाजता आखाडा संपला. लोक आपापल्या घरी जाऊ लागले.

राजेवाडीची यात्रा

त्याच दिवशी राजेवाडीची यात्रा व दुसऱ्या दिवशी राजेवाडीचा आखाडा होता. म्हणून हे मंदोशीचे सगळेजण राजेवाडीच्या दिशेने निघाले. त्यांच्याबरोबर विठ्ठल नांगरे, मनोहर शिंदे, असे पैलवान लोक होते. कळंबईचा डोंगर चढून हे सर्वजण राजेवाडीच्या साबळेवाडी येथे आले. 

तेथे विठ्ठल नांगरे यांची ओळख निघाली. ते नेमकं राजेवाडीचे पाटील होते. त्यांचे आडनाव साबळे. खूप सच्चा दिलाचा उमद्या व्यक्तिमत्त्वाचा माणूस. 

साबळे पाटील यांचे घरी मुक्काम

त्यांच्या नवीन घराचे काम चालू होते. जुने नऊ खानाचे घर पूर्णपणे पाडले होते. सर्व धान्य धुन्य, चार कणगी शाळू, दहा-बारा कणगी भात, व इतर धान्य, बैल व म्हशी, कोंबड्या चितड्या व इतर संसार उपयोगी साहित्य उघड्यावर पडले होते.

राम राम शाम शाम झाला. सर्व पाहुण्यांची ओळख झाली. तेथील साबळे पाटील म्हणाले. पोरांनो बसा, पाणी घ्या. आणि इथेच जेवण करा.आणि मगच राजेवाडीला जा. तेथे गोहे येथील भारुडाचा कार्यक्रम आहे. गोहे येथील भारुड अतिशय नामांकित आहे. 

पाटलांच्या येथे पुरणपोळ्यांचे जेवण होते. प्रत्येकाला सणकून भूक लागली होती. प्रत्येकाने गुळवण्यामध्ये तीन तीन चार चार पोळ्या खाल्ल्या. सारभात खाताना जेवण्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते.

जेवण झाल्यावर थोडा वेळ लोक विसाव्याला बसले. कळंबईचा डोंगर चढून प्रत्येक जण दमून गेला होता. कुणालाच भारुड पाहण्याची इच्छा नव्हती.

पाटलांना व त्यांच्या घरच्यांना पाठवले यात्रेला  

अशातच पाटील तिथे आले. आणि म्हणाले, पोरांनो, आमच्या घरच्यांना सुद्धा भारुडाचा कार्यक्रम पाहायला जायचा होता. पण काय करू? घर उस्तरून ठेवलय. सर्व संसार उघड्यावर आहे. गुरुढोर कोंबड्या चितड्या सुद्धा उघड्यावर आहेत. त्यामुळे इच्छा असूनही जाता येत नाही. 

कारण साबळेवाडी ते राजेवाडी साधारण बरेच अंतर आहे. आणि जर कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो. आणि इकडे चोरी झाली तर काय करायचे.? त्यामुळे आम्ही काही यात्रेला जाणार नाही. काय करणार इलाज नाही. इच्छा असूनही जाता येत नाही.

त्यावर हरिभाऊ बोलला. पाटील! एक काम करा.

तुम्ही सर्व घरदार यात्रेला भारुडाचा कार्यक्रम पाहायला जा.

भारुड पाहण्याची आमची इच्छा नाही. आम्ही तुमच्या घराचे राखण करतो. तुम्ही सर्वजण बिनधास्त जा.

हे ऐकून पाटलांना खूप आनंद झाला. त्यांनी घरातल्या सर्व बाया, पोरांना तयारी करण्यासाठी सांगितले. बायका पोरांनाही सुद्धा खूप आनंद झाला. भारुड पाहायला मिळणार म्हणून त्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले.

सकाळपासून श्रम करून झालेला शिन कुठल्या कुठे निघून गेला. बायकांनी ही लगबगीने सर्व तयारी केली. पहिलवान मंडळींना पाटलांनी झोपण्याची व्यवस्था केली आणि पाटील भारुडाचा कार्यक्रम पाहण्यासाठी घरच्यांना घेऊन राजेवाडीला निघून गेले.

पाटलांच्या घराचे राखण केले 

पहिलवान मंडळी चालून चालून दमले असल्यामुळे त्यांना पटकन झोप लागली. परंतु हरिभाऊ हुरसाळे आणि लक्ष्मण बाळू हुरसाळे ही शेकोटी भोवती शेकत राहिले. 

कारण त्यांनी पाटलांना शब्द दिला होता. आणि यांच्या जीवावर पाटील सर्व कुटुंबाला घेऊन भारुडाचा कार्यक्रम पाहण्यासाठी निघून गेली होती. त्यामुळे यांच्यावर जबाबदारी होती.

पहाटे साडेचार वाजता पाटील आले. पाहतोय तर हे दोघेजण शेकोटीभोवती शेकत आहेत. त्यांनी पाटलांना सांगितले. पाटील तुमचे सर्व साहित्य आहे का बघा. आम्ही तुम्हाला शब्द दिला होता. आता आम्ही झोपतो. असे म्हणून ते दोघेजण झोपले. सकाळी जेव्हा हे दोघे उठले तेव्हा नऊ वाजले होते.

सकाळचा पाहुणचार 

पाटलांनी सर्वांना समोरच्या विहिरीवर आंघोळ करण्यासाठी पाठवले. व इकडे घरात अगदी गरम गरम शाळुच्या भाकरी, बेसन व लसणाची चटणीचा बेत केला. पैलवान मंडळी आंघोळ करून घरी आली. 

पाटलांनी विचारले कुस्त्या कोण कोण खेळतात?

त्यावर लक्ष्मण हुरसाळे बोलले. 

हरिभाऊ आणि मनोहर शिंदे कुस्त्या खेळतात.

पाटलांनी या दोघांना मोठे ग्लास भरून दूध दिले. कुस्त्यांच्या गप्पा टप्पा झाल्या. आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला.

जोंधळ्याची भाकर, बेसन व लसणाच्या चटणी बरोबर दोन, दोन भाकरी खाल्ल्या. रात्रीचा बराच भात उरला होता. पाटलीनने तेल, कांदा लसूण टाकून हा भात परतून घेतला. प्रथम या लोकांना शीळा भात चालेल का विचारले. 

सर्वजणांनी सांगितले अहो, आम्ही रोजच शीळंच खातो. चालेल का काय विचारता? 

वाढा आम्हाला. असे म्हणून भात वाढला गेला.

राजेवाडीचा कुस्त्यांचा आखाडा 

जेवण झाल्यावर मात्र सर्वजण राजेवाडी कडे निघाले. तेथे भारुडाच्या हजेरीचा कार्यक्रम सुरू होता. हजेरीला भरुडाचा कार्यक्रम पाहिल्यानंतर लोक झाडाखालून विसाव्याला बसले. कुणी गप्पा टप्पा मारू लागले, काहींचा पत्त्यांचा डाव रंगला, झाडाच्या सावलीत विसावले.

एक वाजता लोक आखाड्याचे जेवण करण्यासाठी पक्ती बसल्या. जेवण झाल्यानंतर तासाभरात आखाड्यास सुरुवात झाली.

कुस्त्यांची दंगल:

प्रथमता लहान मुलांच्या रेवड्यावरच्या कुस्त्या झाल्या. त्यानंतर प्रत्यक्ष एक रुपयापासून इनामाला सुरुवात झाली. चांदीच्या कपावर हरिभाऊची कुस्ती लागली.

काच्या करून हरिभाऊ कुस्ती खेळण्यासाठी सज्ज झाला. समोरचा पहिलवान काय एवढा कसदार नव्हता. त्यामुळे पहिल्या झटक्यात बाहेरची लांग भिडवून हरिभाऊ ने कुस्ती निकाली केली व चांदीचा कप मिळवला.

हरिभाऊची कुस्ती

हरिभाऊची दुसरी कुस्ती लागली. पाच भांडी व 101 रुपये ही कुस्ती मात्र मोठी अटीतटीची झाली. 

एकमेकावर डाव प्रतिडाव होऊ लागले. समोरच्या पैलवानाकडे ताकद होती. व डाव देखील. शिवाय धिपाड शरीरयष्टी. परंतु म्हणावा तितका चपळपणा त्याच्याकडे नव्हता. ताकदीच्या जोरावर मात्र हा पैलवान टिकून होता. 

त्यामानाने हरिभाऊ कडे चार-पाच डाव व चपळपणा सोडला तर ताकदीच्या मानाने तो 25% ही नव्हता. हरिभाऊ त्याच्यापुढे अगदी किरकोळ वाटत होता.

समोरच्या पहिलवानाने हरिभाऊ ला मेटाकुटीला आणली होते.

100 % हा पैलवान हरिभाऊला चित्रपट करणार असेच वाटत होते. ही कुस्ती पंचांनी केव्हाच सोडवले असती. परंतु डाव प्रति डाव यांच्या पाठशिवनीच्या खेळामुळे खेळाला एक वेगळीच रंगत आली होती. 

पंच व प्रेक्षक वर्ग अगदी भान हरपून ही कुस्ती पाहत होते. हरिभाऊने एक दोनदा पट काढून पाहिला. परंतु समोरचा पैलवान धिपाड असल्यामुळे हरिभाऊने हा प्रयत्न सोडून दिला. 

बाहेरची लांग भिडवूनही पाहिली परंतु हा डाव सुद्धा त्याने तोडला. कोणत्याच डावावर समोरचा पहिलवान पडत नव्हता. व समोरच्या पैलवानाला हरिभाऊ सुद्धा पडत नव्हता. 

अशावेळी चपळपणा हाच खरा पर्याय होता. कारण समोरचा पहिलवान सुद्धा दमला होता. आणि अशातच हरिभाऊंनी खाली मुसुंडी मारली.आणि बगलेमध्ये हात घालून बांगडीच्या डावाने समोरच्या पैलवानाला चितपट केले.

आखाड्यात टाळ्यांचा कडकडाट 

आखाड्यात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. नवखा भाग असूनही बक्षीसांची खैरात झाली. कारण लोक खेळ पाहतात. खेळ जर आवडला तर पैलवान कोणत्या भागातला आहे हे न पाहता बक्षीस देतात.

अशाप्रकारे हरिभाऊने दोन कुस्त्या केल्या होत्या. त्या वेळचे दिवस खरंच रम्य होते. एकमेकांची कदर करणारी माणसे होती. ओळख नसतानाही एकमेकांवर विश्वास होता हेच खूप मोठं म्हणावं लागेल.

सामाजिक एकोपा :

गावोगावी होणाऱ्या यात्रा यामुळे सामाजिक एकोपा टिकून राहण्यास मोठी मदत होते. त्यामुळे गावोगावी यात्रा भरत असतात.

गावोगावी भरत असलेल्या यात्रा, जत्रा आणि कुस्त्यांचे आखाडे हे फक्त धार्मिक किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम नसून ग्रामीण संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहेत. या निमित्ताने गावागावातील माणसे एकत्र येतात, एकमेकांच्या घरी जातात, प्रेमाने जेवण करतात आणि ओळखी-अनोळखी लोकांमध्येही विश्वासाचे नाते निर्माण होते. 

पाटलांच्या घराची राखण करण्यासाठी दिलेला शब्द पाळणारे पैलवान असोत किंवा पाहुण्यांचे मनापासून केलेले आदरातिथ्य — या सगळ्या घटना त्या काळातील माणुसकीची श्रीमंती दाखवतात.

आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात अशा आठवणी आपल्याला सांगतात की खरे समाधान पैशात नसून माणसांमधील विश्वास, आपुलकी आणि सहकार्य यात आहे. 

म्हणूनच ग्रामदैवताच्या यात्रा केवळ परंपरा नाहीत, तर गावोगावी सामाजिक एकोपा टिकवून ठेवणारी अमूल्य परंपरा आहेत.

👉🏻 पैलवान हरिभाऊ हूरसळे यावर क्लिक करा आणि वाचा.

✍️ माझा हा लेख मूळतः StoryMirror, Marathishrushti आणि Pratilipi वर देखील प्रकाशित झाला आहे. लेखक: रामदास तळपे

रामदास तळपे ग्रामीण संस्कृती 

 

गावाकडचे एस टी प्रवासाचे भारलेले दिवस

गावाकडचे पूर्वीचे रस्ते 

ग्रामीण महाराष्ट्रात वाहतुकीची साधने आज जशी उपलब्ध आहेत, तशी पूर्वी नव्हती. कच्चे रस्ते, पायवाटा आणि काही मोजक्या एस.टी. बसवरच गावांचा संपर्क अवलंबून होता. 

त्या काळातील एस.टी. ही केवळ बस नव्हती, तर ग्रामीण जीवनाची खरी जीवनवाहिनी होती.

पूर्वी गावाकडे कच्चे रस्ते होते. काही ठिकाणी अजूनही आहेत.1990 पर्यंत कडधे गावापर्यंत डांबरी रस्ता होता. यापुढे भोरगिरी पर्यंत कच्चा खडीचा रस्ता होता.

त्यावेळी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच एसटी बस होत्या. लाल धुरळा उधळीत एस.टी. यायची. एस.टी.च्या पाठीमागे धुळीचा डोंगर तयार व्हायचा. या धुरळ्यात मागचे काहीच दिसत नसायचे. एसटी आल्यावर आम्ही वाऱ्याची दिशा बघून एसटीचा धुरळा चुकवायचा प्रयत्न करायचो.

त्याकाळी रस्ते झाले नव्हते. त्यामुळे ठराविक ठिकाणीच एसटीची सेवा उपलब्ध होती. तेही कच्चे रस्ते होते. 

अनेक लोक एसटी पकडण्यासाठी घरातून तासभर आधीच पायवाटेने, रान माळातून, डोंगर वाटेने पायी चालत एसटीच्या स्टॉप जवळ येत असत. 

कधी कधी आधीच एसटी निघून जाई. नाईलाजाने मग लोक पायी चालत. मी सुद्धा अनेक वेळी असा पायी प्रवास केला आहे.

सन 1990 पूर्वीची एस.टी. 

त्यावेळी रस्त्याला वाहतूकही तूरळक असायची. राजगुरूनगर - डेहणे ही एस.टी. सकाळी दहा वाजता डेहण्याला यायची. या गाडीत प्रामुख्याने शाळेचे शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि ठराविक गावाकडचे प्रवासी असायचे. 

याच गाडीत सकाळ वर्तमान पत्र, पावाच्या लाद्या आणि बटर खेड वरून पाठवत असत. 

पूर्वी 90 % लोकांकडे घड्याळे नसायची. ही गाडी आली म्हणजे दहा वाजले असे लोक बिनधास्त समजायचे आणि त्या प्रमाणे कामाचे नियोजन करायचे. काही दिवसानंतर ही गाडी बंद झाली.

ग्रामीण महाराष्ट्रातील एस.टी चे महत्व

समस्थ पश्चिम पट्ट्याची आणि मुंबईकरांची आवडती गाडी म्हणजे परेल -भोरगिरी ही होय. सकाळी 9.40 वाजता ही गाडी डेहण्याच्या स्टॉप वर उभी असे. या गाडीला त्यावेळी प्रचंड गर्दी असायची. 

शनिवारी आमची शाळा सकाळी 9.30 वा. सुटायची. बऱ्याच मुलामुलींचा लोंढा एस.टी. स्टॉपला जमा व्हायचा. त्या वेळी डेहणे ते शिरगांव तिकीट होती 75 पैसे. तर हाफ तिकीट होती 40 पैसे. बऱ्याच मुलांकडे हे पैसेही नसायचे. त्यामुळे बरीच मुले पायीच प्रवास करत असत.

काही लोकांना मुंबईला जायचं असल्यामुळे व होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून वाळद, आव्हाट, खरोशी व डेहण्यावरून या गाडीने मुंबईकर प्रवासी भोरगिरीला जात. व येताना मुंबईचे तिकीट काढत असत.

मुंबईकरांचा रुबाब 

अनेक लोक सणावाराला, यात्रेला, लग्नकार्याला व सुट्टीला बायकामुलांसह गावी येत. मुंबईकरांच्या मुलांची कपड्यांची फॅशन, पायातील बूट किंवा चपला आणि बोलण्याची स्टाईल खुपच रुबाबदार असे.

परंतु गावाकडच्या पोरांना त्यांचे कधीच आकर्षण वाटायचे नाही. खाकी चड्डी, पांढरा शर्ट व बिगर चप्पलेचे कोठेही रानोमाळ भटकणे, ओढ्यात किंवा नदीत पोहणे, गोटया, विटीदांडू व क्रिकेट खेळणे,आंबे करवंदे,जांभळे खायला रानात भटकणे हाच त्यांचा खरा आनंद व समाधान होते. 

हे मुंबईकर पोरांना जमत नसे. त्यांना गावच्या पोरांचा हेवा वाटे.

गावची यात्रा असेल त्या दिवशी सारा गाव एसटी स्टॉपवर येऊन आतुरतेने परेल - भोरगिरी गाडीची वाट पाहायचा. 

गाव आणि शहर यातील फरक त्या वेळी इतका स्पष्ट दिसायचा, पण दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा वाटायचा.

यात्रेचे दिवस मुंबईकरांची वाट पाहणे 

मुंबईकर येताना देवासाठी हरतुरे, देवाच्या रंगीत मखमली छत्र्या, छात्र चामरे व हारतुरे घेऊन येत असत. लोकांच्या दृष्टीक्षेपात गाडी येताच सनई,चौघडे ही वाद्य वाजत्री वाजू लागत. 

स्टॉप वर गाडी उभी राहताच गाडी भोवती गर्दी जमा होई. साहित्य गाडीतून बाहेर काढले जाई.

मुंबईकरांची सुट्टी संपल्यावर त्यांना गाडीत बसवून देण्यासाठी निम्मा गाव एस.टी. स्टॉपपर्यंत जात असे.

तळेगाव - टोकावडे एस.टी. 

त्याही पूर्वी तळेगाव - टोकवडे ही गाडी तळेगाव येथून 7.30 वाजता तर खेड येथून सव्वानऊ वाजता निघत असे.तर डेहाण्याला आकरा वाजता येत असे. 

या गाडीत पोस्ट ऑफिसच्या पत्राची पार्सल येत असत. ही गाडी सर्वात आधी म्हणजे साधारण 1975 ला सुरु झाली. आणि त्यानंतर मग इतर दुसऱ्या. निवांतपणाने जगणारे लोक या गाडीने प्रवास करत असत.

शालेय परीक्षेचा प्रसंग 

मी शाळेत होतो. नववीची वार्षिक परीक्षा होती. सकाळी 11.30 चा पेपर. आम्ही बरीच शाळेची मुले मुली तळेगाव गाडीची वाट पाहत बसलो. 11.20 झाले. 

गाडी काही येईना.आता काय करायचं ? पेपरला गेलो नाही तर नापास व्हायची भीती. मग काय निघालो आम्ही पळत. अर्धा तास उशीर झाला. परंतु एकदाचे आम्ही शाळेत पोचलो व पेपर लिहिला.

राजगुरुनगर भोरगिरी ही एस.टी.

राजगुरुनगर भोरगिरी ही एस.टी शिरगावला दोन वाजता यायची. ती अडीच तीन वाजता फिरून परत जायची. या गाडीला त्यामानाने गर्दी कमी असायची.

मुक्कामची गाडी 

मुक्कामची गाडी बऱ्याच लोकांची सर्वात आवडती गाडी होती. बाहेरगावी गेलेले सर्व लोक मुक्काम गाडीने घरी येत असत. ही गाडी साधारण आठ वाजता शिरगाव स्टॉपला येत असे. या गाडीला सुद्धा प्रचंड गर्दी असायची. 

या गाडीत अनेक मद्यपी लोक असायचे. कंडक्टर बरोबर त्यांचे वादविवाद व्हायचे. जास्त वादावादी झाल्यावर ड्रायव्हर गाडी उभी करत असे.

आता इथून पुढे गाडी जाणार नाही. सर्वांनी उतरून घ्या. असे म्हणल्यावर लोक तंटा सोडवत असत. 

रात्रीच्या काळ्याकभिन्न अंधारात मुक्कामची गाडी धावत राही. पुढचा उजेड सोडला तर बाहेर खिडकीतून पाहिल्यावर दूरवर नुसता अंधार दिसे. आपण कोठे आलो आहोत हेही कळत नसे.

हीच मुक्कामची गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता राजगुरुनगरला जायला निघे. प्रत्येक स्टॉपचे सकाळचे प्रवासी घेऊन ही गाडी राजगुरुनगरच्या दिशेने रवाना होई.

ड्रायव्हर, कंडक्टर यांना मोफत दुध  

त्यावेळी ठिकठिकाणीच्या स्टॉप वर गावाकडचे दूध घालणारे गवळी दूध घालण्यासाठी जमत असेल. त्या ठिकाणी दूध संकलनाचे काम चालू असायचे. 

एसटीच्या ड्रायव्हरला मोफत पिण्यासाठी दूध दिले जायचे. काही ड्रायव्हर, कंडक्टर त्यांच्याजवळ असलेल्या किटलीत फुकट दूध घ्यायचे. 

दूध संस्थेवाले लोकही त्यांना फुकट दूध द्यायचे. काही लोकांना ड्रायव्हर बसतो त्या केबिनमध्ये बसायला खूप आवडायचे. ओळखीचा ड्रायव्हर असेल तर तीन-चार जण बसायचे. त्यावेळी एस.टी ड्रायवर व कंडक्टरची लोक खुप काळजी घेत.

👉🏻हेही वाचा अलिबागची सफर, एक प्रेक्षणीय स्थळ

एसटीचा मागचा दरवाजा

पूर्वी एसटीला मागे दरवाजा होता. त्यानंतर एसटीचे रूप बदलले. अनेक अमुलाग्र बदल झाले. पाठीमागचा दरवाजा पुढे आला.

नवीन सुरवातीला लोक एस.टी आल्यावर गाडीत जागा धरण्यासाठी मागच्या बाजूला पळत जायचे. परंतु दरवाजा असायचा पुढे. परत लोक पुढे धावायचे. खूपच गंमत व्हायची.

काही लोक एसटीची गर्दी बघून गाडीच्या मागच्या खिडकीतुन मागच्या बाजूने शिरायचा प्रयत्न करायचे. तर ड्रायव्हर नाही हे बघून काहीजण ड्रायव्हरच्या दरवाज्यातून गाडीत घुसायचे. काहीजण एसटीच्या मोडक्या खिडकीतून शरीर एस. टी.त ढकलायचा प्रयत्न करायचे. 

अनेकांकडे पिशव्या, गाठोडी, भांडीकुंडी, बाजाराचे साहित्य, कोंबड्या चितड्या व कामधंद्याचे साहित्य असायचे. ते सर्व एसटीत भरताना लोकांची प्रचंड धांदल व्हायची. 

काही जण बाहेरून खिडकीतून रुमाल किंवा टोप्या एसटीतील सीटवर टाकायचे. त्या ठिकाणी आत सीटवर दुसरेच कोणीतरी बसलेले असायचे. त्यावरून प्रचंड भांडणे व्हायची. एकच कोलहाल व्हायचा.

आजच्या पिढीला या धावपळीची कल्पनाही करता येणार नाही.

एस.टी बस ग्रामीण भागासाठी जीवनवाहिनी

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी एसटीचा प्रवास करून त्यांनी त्यांची शाळा कॉलेज पूर्ण केले. दूर शहरात केव्हा तालुक्याचे ठिकाणी शिक्षणासाठी असलेल्या आपल्या मुलांना ग्रामीण भागातून जेवणाचे डबे, पोहोचवण्याचे काम सुद्धा ड्रायव्हर,कंडक्टर करत असत.

ग्रामीण भागात नोकरी करणारे अनेक नोकरदार एसटीच्या सेवेवर अवलंबून असत. प्रत्येकासाठी एस.टी अगदी वाट बघत थांबत असे. इतके एस.टीचे प्रवाशावर प्रेम होते.

पर्यायी प्रवासाची साधने 

काळ बदलला.प्रवासासाठी अनेक साधने निर्माण झाली. अनेकांकडे मोटरसायकली चार चाकी गाडी आल्या. तर काही लोक गाडी वेळेवर नाही म्हणून अन्य वाहनाने प्रवासासाठी जाऊ लागले. त्यामुळे एसटीचे महत्त्व कमी झाले.

अजूनही कधी एसटीने प्रवास केला तर जुने दिवस आठवतात. आणि जुन्या आठवणीत एसटीचे जुने किस्से, जुन्या आठवणीत मन रमून जाते.

आज प्रवासाची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी जुन्या एस.टी.च्या आठवणी मनात कायम जिवंत आहेत. कच्च्या रस्त्यांवरून धुरळा उडवत धावणारी ती लाल गाडी आजही ग्रामीण जीवनाच्या स्मृतींमध्ये धावत आहे.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)





1952 ते आजपर्यंत काँग्रेसच्या निवडणूक चिन्हांचा इतिहास : बैलजोडीपासून ‘ हाताचा पंजा’ चिन्हापर्यंतचा प्रवास

प्रस्तावना

भारतीय राजकारणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा सर्वात जुना आणि प्रभावशाली पक्ष मानला जातो. स्वातंत्र्यलढ्यातील नेतृत्व, स्वातंत्र्यानंतरची सत्ता आणि देशाच्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा राहिला आहे. 

मात्र काँग्रेसचा इतिहास फक्त नेते, धोरणे आणि सत्ता बदलांपुरता मर्यादित नाही; त्याचा निवडणूक चिन्हांचा प्रवासही तितकाच रोचक आणि महत्त्वाचा आहे.

1952 पासून आजपर्यंत काँग्रेसच्या निवडणूक चिन्हांमध्ये झालेल्या बदलांमागे राजकीय फुट, विचारधारा, निवडणूक आयोगाचे नियम आणि जनतेशी जोडण्याची रणनीती यांचा मोठा प्रभाव आहे. 

या लेखात आपण काँग्रेसच्या निवडणूक चिन्हांचा सविस्तर इतिहास पाहणार आहोत.

भारतातील निवडणूक चिन्हांचे महत्त्व

भारतातील निवडणुकीत चिन्हांना खूप मोठे महत्त्व आहे. स्वातंत्र्यानंतर देशात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यामुळे मतदारांना उमेदवार ओळखण्यासाठी निवडणूक चिन्ह ही सर्वात सोपी आणि प्रभावी ओळख ठरली.

निवडणूक आयोगाने प्रत्येक पक्षाला वेगळे चिन्ह देण्याची परंपरा सुरू केली. त्यामुळे ग्रामीण आणि अशिक्षित मतदारांपर्यंत पक्षाची ओळख पोहोचणे सोपे झाले.

1952 – 1969 : काँग्रेसचे निवडणूक चिन्ह बैलजोडी 

स्वातंत्र्यानंतरची पहिली निवडणूक आणि काँग्रेस

1952 मध्ये भारतात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारा पक्ष म्हणून काँग्रेस जनतेच्या मनात खोलवर रुजलेला होता.

या काळात काँग्रेसला मिळालेले पहिले निवडणूक चिन्ह होते – बैलजोडी

त्या काळातील भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश होता.

बैलजोडी म्हणजे शेती, श्रम, ग्रामीण भारत, स्वावलंबन,

हे चिन्ह भारतीय शेतकऱ्यांचे प्रतीक मानले गेले आणि काँग्रेसची प्रतिमा जनतेचा पक्ष म्हणून अधिक मजबूत झाली.

या चिन्हावर मिळालेले मोठे यश

1952, 1957 आणि 1962 या तीन निवडणुकांत काँग्रेसने प्रचंड बहुमताने विजय मिळवला.

जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे हे सुवर्णयुग मानले जाते.

सन 1969 : काँग्रेस फुट आणि चिन्ह बदलाची सुरुवात.

1969 साल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात निर्णायक वर्ष मानले जाते. या वर्षी काँग्रेस पक्ष दोन भागात विभागला आणि भारतीय राजकारणाचा प्रवाहच बदलला. 

पार्श्वभूमी : नेहरू-पश्चात काँग्रेस

1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर काँग्रेसमध्ये मजबूत सर्वमान्य नेतृत्व उरले नाही.

1964–1966 : लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. अवघ्या दोन वर्षातच त्यांचे निधन झाले. 

1966 : शास्त्रींच्या निधनानंतर इंदिरा गांधी यांना पंतप्रधान करण्यात आले.

इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा एक प्रभावी गट होता. त्यांना पत्रकारांनी “सिंडिकेट” असे नाव दिले.

सिंडिकेट विरुद्ध इंदिरा गांधी

मुख्य नेते:

के. कामराज, एस. निजलिंगप्पा, मोरारजी देसाई, अतुल्य घोष, एस. के. पाटील हा गट काँग्रेस पक्ष संघटना नियंत्रित करत होता. हे सर्व नेते एका चढ एक असे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या नियंत्रणात राहील असे व्यक्तिमत्व म्हणजेच इंदिरा गांधी यांची पंतप्रधानपदी निवड केली होती.

परंतु थोड्याच दिवसात इंदिरा गांधी यांनी काँग्रेसमध्ये असलेल्या वरिष्ठ नेत्यांचा अंदाज चुकीचा ठरवला. आणि वरिष्ठ नेत्यांचे न ऐकता स्वतःच निर्णय घेऊ लागल्या. त्यामुळे सुप्त संघर्षाला सुरुवात झाली. 

संघर्षाची सुरुवात

इंदिरा गांधी पंतप्रधान असल्या तरी पक्षावर नियंत्रण सिंडिकेटकडे होते.

इंदिरा गांधी स्वतंत्र निर्णय घेऊ लागल्या आणि संघर्ष वाढू लागला.

1969 मधील निर्णायक घटना

1) खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण

इंदिरा गांधींनी सन 1969 मध्ये 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.

सिंडिकेट या निर्णयाच्या विरोधात होते.

त्यामुळे सिंडिकेटच्या नेत्यांना हा पहिला मोठा धक्का होता.

2) राष्ट्रपती निवडणूक – संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला.

1969 मध्ये राष्ट्रपती निवडणूक झाली.

काँग्रेसने राष्ट्रपती पदासाठी अधिकृत उमेदवारी नीलम संजीव रेड्डी यांना दिली.

पण इंदिरा गांधींनी पक्षाच्या निर्णयाविरुद्ध जाऊन व्ही. व्ही. गिरी यांना समर्थन दिले.

हे पक्षशिस्तीला दिलेले थेट आव्हान होते. त्यातच इंदिरा गांधी यांनी समर्थन दिलेले व्ही.व्ही. गिरी हे राष्ट्रपती झाले. आणि काँग्रेस नेत्यांना हा धक्का जिव्हारी लागला. 

त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष एस. निजलिंगप्पा यांनी इंदिरा गांधींना पक्षातून काढून टाकले.

त्यावर लगेचच इंदिरा गांधींनी त्यांना समर्थन देणाऱ्या खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन केला. लोकसभेतील बहुतेक सर्वच खासदार इंदिरा गांधींच्या बाजूने गेले.

काँग्रेसचे दोन गट निर्माण

1) Congress (O) Organisation मूळ संघटनात्मक काँग्रेस

2) Congress (R) Requisition इंदिरा गांधींचा काँग्रेस

हीच 1969 ची ऐतिहासिक काँग्रेस फुट.

1971 निवडणुकीचा परिणाम

सुरुवातीला निवडणूक आयोगाने इंदिरा गांधींच्या गटाला (Congress-R) मूळ काँग्रेस मानले होते. त्यामुळे सिंडिकेटचे नेते सर्वोच्च न्यायालयात गेले.

त्यावर मग निवडणूक आयोगाने मूळ काँग्रेसचे चिन्ह बैलजोडी गोठवले (freeze) कारण दोन्ही गट त्यावर दावा करत होते.

यामुळे काँग्रेसच्या चिन्हाच्या इतिहासात मोठा टर्निंग पॉइंट आला.

सर्वोच्च न्यायालयाने नंतर हस्तक्षेप केला.आणि इंदिरा गांधींच्या काँग्रेस (R) गटाला नवीन चिन्ह देण्यात आले गाय आणि वासरू.

जनतेत भावनिक जोड निर्माण करण्यासाठी हे चिन्ह प्रभावी ठरले.

तर Congress (O) Organisation जुना संघटनात्मक काँग्रेसला नांगर धरलेला शेतकरी हे चिन्ह मिळाले.

फुटीनंतरचे परिणाम

सन 1971 च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांनी गरीबी हटाव, बँक राष्ट्रीयीकरण यामुळे मुद्दे निवडणूक प्रचारात पुढे आणले त्यामुळे त्यांना जनतेचा पाठिंबा वाढला.आणि काँग्रेसला प्रचंड विजय मिळाला. आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान झाल्या.

1) जुना काँग्रेस कमकुवत झाला.

Congress (O) कडे संघटन होते पण जनाधार कमी होता.

2) इंदिरा गांधींची लोकप्रियता वाढली

गरीबी हटाओ, बँक राष्ट्रीयीकरण यामुळे जनतेचा पाठिंबा वाढला.

3) भारतीय राजकारणात व्यक्ती केंद्रित युग

1969 नंतर भारतीय राजकारणात व्यक्ती केंद्रित राजकारणाला सुरुवात झाली.

यामुळे इंदिरा गांधींचा काँग्रेसच “मुख्य काँग्रेस” बनला.

काँग्रेसला हाताचा पंजा हे चिन्ह 1978 मध्ये कसे मिळाले? 

हे समजून घेतले तर काँग्रेसच्या चिन्हांचा पूर्ण इतिहास स्पष्ट होतो.

1) 1977 निवडणूक आणि काँग्रेसचा मोठा पराभव.

1975–77 दरम्यान देशात आणीबाणी लागू झाली होती.

आणीबाणी संपल्यानंतर 1977 मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या.

या निवडणुकीत जनता पक्षाने मोठा विजय मिळवला.

इंदिरा गांधींचा काँग्रेस पक्ष पराभूत झाला

काँग्रेस प्रथमच केंद्रातील सत्तेबाहेर गेला.

2) पुन्हा काँग्रेसमध्ये फुट (1978)

पराभवानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला.

पुन्हा पक्ष दोन भागात विभागला:

जुना गट Congress (U) – देवरेज उर्स गट

इंदिरा गांधी गट Congress (I)

इंदिरा गांधींनी स्वतःचा स्वतंत्र काँग्रेस गट तयार केला.

3) गाय-वासरू चिन्ह का काढून घेतले?

इंदिरा गांधींच्या गटाकडे आधी गाय-वासरू चिन्ह होते.

पण 1978 मध्ये समस्या निर्माण झाली:

आता पुन्हा दोन काँग्रेस गट तयार झाले

दोघांनीही “खरी काँग्रेस आम्हीच” असा दावा केला

म्हणून निवडणूक आयोगाने गाय-वासरू चिन्ह गोठवले (freeze) केले.

म्हणजे पुन्हा नवीन चिन्ह आवश्यक झाले.

4) निवडणूक चिन्ह

1978 मध्ये Congress (U) – देवरेज उर्स गटाला चरखा हे चिन्ह मिळाले. परंतु हा पक्ष पुढे टिकाव धरू शकला नाही सन 1986 मध्ये त्याचे विलीनीकरण इंदिरा काँग्रेसमध्ये झाले.

1978 मध्ये इंदिरा गांधींच्या Congress (I) ला नवीन हाताचा पंजा हे चिन्ह देण्यात आले.

हे चिन्ह सुरुवातीला तात्पुरते वाटत होते, पण नंतर तेच काँग्रेसचे कायमस्वरूपी चिन्ह राहिले.

5) हाताचा पंजा या चिन्हाची पहिली मोठी परीक्षा – 1980 निवडणूक

1978 मध्ये चिन्ह मिळाले.

1980 मध्ये निवडणूक झाली.

इंदिरा गांधींची काँग्रेस पुन्हा सत्तेत आली.

यामुळे हाताचा पंजा हे चिन्ह देशभर लोकप्रिय झाले.

हाताचा पंजा या  चिन्हावर काँग्रेसचा राजकीय प्रवास

1980 – इंदिरा गांधींची पुनरागमन

1980 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आली.

1984 – राजीव गांधींचा ऐतिहासिक विजय. 

1984 मध्ये काँग्रेसने 400 पेक्षा जास्त जागा जिंकून लोकसभेतील सर्वात मोठा विजय मिळवला.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवले.

1991 – 2004

या काळात काँग्रेसने अनेक चढउतार पाहिले.

2004 आणि 2014 – यूपीए सरकार

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पुन्हा केंद्रात सत्ता मिळवली.

आजही काँग्रेसचे अधिकृत चिन्ह हाताचा पंजा हे आहे.

बैलजोडीपासून गाय-वासरू आणि नंतर हाताचा पंजा – काँग्रेसच्या निवडणूक चिन्हांचा प्रवास हा केवळ चिन्हांचा बदल नसून भारतीय राजकारणातील बदलत्या प्रवाहाचा इतिहास आहे.

आजही हाताचा पंजा हे चिन्ह भारतीय राजकारणातील सर्वात ओळखले जाणारे प्रतीक आहे.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)





आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...