प्रस्तावना
भारतीय राजकारणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा सर्वात जुना आणि प्रभावशाली पक्ष मानला जातो. स्वातंत्र्यलढ्यातील नेतृत्व, स्वातंत्र्यानंतरची सत्ता आणि देशाच्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा राहिला आहे.मात्र काँग्रेसचा इतिहास फक्त नेते, धोरणे आणि सत्ता बदलांपुरता मर्यादित नाही; त्याचा निवडणूक चिन्हांचा प्रवासही तितकाच रोचक आणि महत्त्वाचा आहे.
1952 पासून आजपर्यंत काँग्रेसच्या निवडणूक चिन्हांमध्ये झालेल्या बदलांमागे राजकीय फुट, विचारधारा, निवडणूक आयोगाचे नियम आणि जनतेशी जोडण्याची रणनीती यांचा मोठा प्रभाव आहे.
या लेखात आपण काँग्रेसच्या निवडणूक चिन्हांचा सविस्तर इतिहास पाहणार आहोत.
भारतातील निवडणूक चिन्हांचे महत्त्व
भारतातील निवडणुकीत चिन्हांना खूप मोठे महत्त्व आहे. स्वातंत्र्यानंतर देशात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यामुळे मतदारांना उमेदवार ओळखण्यासाठी निवडणूक चिन्ह ही सर्वात सोपी आणि प्रभावी ओळख ठरली.
निवडणूक आयोगाने प्रत्येक पक्षाला वेगळे चिन्ह देण्याची परंपरा सुरू केली. त्यामुळे ग्रामीण आणि अशिक्षित मतदारांपर्यंत पक्षाची ओळख पोहोचणे सोपे झाले.
1952 – 1969 : काँग्रेसचे निवडणूक चिन्ह बैलजोडी
स्वातंत्र्यानंतरची पहिली निवडणूक आणि काँग्रेस
1952 मध्ये भारतात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारा पक्ष म्हणून काँग्रेस जनतेच्या मनात खोलवर रुजलेला होता.
या काळात काँग्रेसला मिळालेले पहिले निवडणूक चिन्ह होते – बैलजोडी
त्या काळातील भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश होता.
बैलजोडी म्हणजे शेती, श्रम, ग्रामीण भारत, स्वावलंबन,
हे चिन्ह भारतीय शेतकऱ्यांचे प्रतीक मानले गेले आणि काँग्रेसची प्रतिमा जनतेचा पक्ष म्हणून अधिक मजबूत झाली.
या चिन्हावर मिळालेले मोठे यश
1952, 1957 आणि 1962 या तीन निवडणुकांत काँग्रेसने प्रचंड बहुमताने विजय मिळवला.
जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे हे सुवर्णयुग मानले जाते.
सन 1969 : काँग्रेस फुट आणि चिन्ह बदलाची सुरुवात.
1969 साल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात निर्णायक वर्ष मानले जाते. या वर्षी काँग्रेस पक्ष दोन भागात विभागला आणि भारतीय राजकारणाचा प्रवाहच बदलला.
पार्श्वभूमी : नेहरू-पश्चात काँग्रेस
1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर काँग्रेसमध्ये मजबूत सर्वमान्य नेतृत्व उरले नाही.
1964–1966 : लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. अवघ्या दोन वर्षातच त्यांचे निधन झाले.
1966 : शास्त्रींच्या निधनानंतर इंदिरा गांधी यांना पंतप्रधान करण्यात आले.
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा एक प्रभावी गट होता. त्यांना पत्रकारांनी “सिंडिकेट” असे नाव दिले.
सिंडिकेट विरुद्ध इंदिरा गांधी
मुख्य नेते:
के. कामराज, एस. निजलिंगप्पा, मोरारजी देसाई, अतुल्य घोष, एस. के. पाटील हा गट काँग्रेस पक्ष संघटना नियंत्रित करत होता. हे सर्व नेते एका चढ एक असे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या नियंत्रणात राहील असे व्यक्तिमत्व म्हणजेच इंदिरा गांधी यांची पंतप्रधानपदी निवड केली होती.
परंतु थोड्याच दिवसात इंदिरा गांधी यांनी काँग्रेसमध्ये असलेल्या वरिष्ठ नेत्यांचा अंदाज चुकीचा ठरवला. आणि वरिष्ठ नेत्यांचे न ऐकता स्वतःच निर्णय घेऊ लागल्या. त्यामुळे सुप्त संघर्षाला सुरुवात झाली.
संघर्षाची सुरुवात
इंदिरा गांधी पंतप्रधान असल्या तरी पक्षावर नियंत्रण सिंडिकेटकडे होते.
इंदिरा गांधी स्वतंत्र निर्णय घेऊ लागल्या आणि संघर्ष वाढू लागला.
1969 मधील निर्णायक घटना
1) खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण
इंदिरा गांधींनी सन 1969 मध्ये 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
सिंडिकेट या निर्णयाच्या विरोधात होते.
त्यामुळे सिंडिकेटच्या नेत्यांना हा पहिला मोठा धक्का होता.
2) राष्ट्रपती निवडणूक – संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला.
1969 मध्ये राष्ट्रपती निवडणूक झाली.
काँग्रेसने राष्ट्रपती पदासाठी अधिकृत उमेदवारी नीलम संजीव रेड्डी यांना दिली.
पण इंदिरा गांधींनी पक्षाच्या निर्णयाविरुद्ध जाऊन व्ही. व्ही. गिरी यांना समर्थन दिले.
हे पक्षशिस्तीला दिलेले थेट आव्हान होते. त्यातच इंदिरा गांधी यांनी समर्थन दिलेले व्ही.व्ही. गिरी हे राष्ट्रपती झाले. आणि काँग्रेस नेत्यांना हा धक्का जिव्हारी लागला.
त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष एस. निजलिंगप्पा यांनी इंदिरा गांधींना पक्षातून काढून टाकले.
त्यावर लगेचच इंदिरा गांधींनी त्यांना समर्थन देणाऱ्या खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन केला. लोकसभेतील बहुतेक सर्वच खासदार इंदिरा गांधींच्या बाजूने गेले.
काँग्रेसचे दोन गट निर्माण
1) Congress (O) Organisation मूळ संघटनात्मक काँग्रेस
2) Congress (R) Requisition इंदिरा गांधींचा काँग्रेस
हीच 1969 ची ऐतिहासिक काँग्रेस फुट.
1971 निवडणुकीचा परिणाम
सुरुवातीला निवडणूक आयोगाने इंदिरा गांधींच्या गटाला (Congress-R) मूळ काँग्रेस मानले होते. त्यामुळे सिंडिकेटचे नेते सर्वोच्च न्यायालयात गेले.
त्यावर मग निवडणूक आयोगाने मूळ काँग्रेसचे चिन्ह बैलजोडी गोठवले (freeze) कारण दोन्ही गट त्यावर दावा करत होते.
यामुळे काँग्रेसच्या चिन्हाच्या इतिहासात मोठा टर्निंग पॉइंट आला.
सर्वोच्च न्यायालयाने नंतर हस्तक्षेप केला.आणि इंदिरा गांधींच्या काँग्रेस (R) गटाला नवीन चिन्ह देण्यात आले गाय आणि वासरू.
जनतेत भावनिक जोड निर्माण करण्यासाठी हे चिन्ह प्रभावी ठरले.
तर Congress (O) Organisation जुना संघटनात्मक काँग्रेसला नांगर धरलेला शेतकरी हे चिन्ह मिळाले.
फुटीनंतरचे परिणाम
सन 1971 च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांनी गरीबी हटाव, बँक राष्ट्रीयीकरण यामुळे मुद्दे निवडणूक प्रचारात पुढे आणले त्यामुळे त्यांना जनतेचा पाठिंबा वाढला.आणि काँग्रेसला प्रचंड विजय मिळाला. आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान झाल्या.
1) जुना काँग्रेस कमकुवत झाला.
Congress (O) कडे संघटन होते पण जनाधार कमी होता.
2) इंदिरा गांधींची लोकप्रियता वाढली
गरीबी हटाओ, बँक राष्ट्रीयीकरण यामुळे जनतेचा पाठिंबा वाढला.
3) भारतीय राजकारणात व्यक्ती केंद्रित युग
1969 नंतर भारतीय राजकारणात व्यक्ती केंद्रित राजकारणाला सुरुवात झाली.
यामुळे इंदिरा गांधींचा काँग्रेसच “मुख्य काँग्रेस” बनला.
काँग्रेसला हाताचा पंजा हे चिन्ह 1978 मध्ये कसे मिळाले?
हे समजून घेतले तर काँग्रेसच्या चिन्हांचा पूर्ण इतिहास स्पष्ट होतो.
1) 1977 निवडणूक आणि काँग्रेसचा मोठा पराभव.
1975–77 दरम्यान देशात आणीबाणी लागू झाली होती.
आणीबाणी संपल्यानंतर 1977 मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या.
या निवडणुकीत जनता पक्षाने मोठा विजय मिळवला.
इंदिरा गांधींचा काँग्रेस पक्ष पराभूत झाला
काँग्रेस प्रथमच केंद्रातील सत्तेबाहेर गेला.
2) पुन्हा काँग्रेसमध्ये फुट (1978)
पराभवानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला.
पुन्हा पक्ष दोन भागात विभागला:
जुना गट Congress (U) – देवरेज उर्स गट
इंदिरा गांधी गट Congress (I)
इंदिरा गांधींनी स्वतःचा स्वतंत्र काँग्रेस गट तयार केला.
3) गाय-वासरू चिन्ह का काढून घेतले?
इंदिरा गांधींच्या गटाकडे आधी गाय-वासरू चिन्ह होते.
पण 1978 मध्ये समस्या निर्माण झाली:
आता पुन्हा दोन काँग्रेस गट तयार झाले
दोघांनीही “खरी काँग्रेस आम्हीच” असा दावा केला
म्हणून निवडणूक आयोगाने गाय-वासरू चिन्ह गोठवले (freeze) केले.
म्हणजे पुन्हा नवीन चिन्ह आवश्यक झाले.
4) निवडणूक चिन्ह
1978 मध्ये Congress (U) – देवरेज उर्स गटाला चरखा हे चिन्ह मिळाले. परंतु हा पक्ष पुढे टिकाव धरू शकला नाही सन 1986 मध्ये त्याचे विलीनीकरण इंदिरा काँग्रेसमध्ये झाले.
1978 मध्ये इंदिरा गांधींच्या Congress (I) ला नवीन हाताचा पंजा हे चिन्ह देण्यात आले.
हे चिन्ह सुरुवातीला तात्पुरते वाटत होते, पण नंतर तेच काँग्रेसचे कायमस्वरूपी चिन्ह राहिले.
5) हाताचा पंजा या चिन्हाची पहिली मोठी परीक्षा – 1980 निवडणूक
1978 मध्ये चिन्ह मिळाले.
1980 मध्ये निवडणूक झाली.
इंदिरा गांधींची काँग्रेस पुन्हा सत्तेत आली.
यामुळे हाताचा पंजा हे चिन्ह देशभर लोकप्रिय झाले.
हाताचा पंजा या चिन्हावर काँग्रेसचा राजकीय प्रवास
1980 – इंदिरा गांधींची पुनरागमन
1980 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आली.
1984 – राजीव गांधींचा ऐतिहासिक विजय.
1984 मध्ये काँग्रेसने 400 पेक्षा जास्त जागा जिंकून लोकसभेतील सर्वात मोठा विजय मिळवला.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवले.
1991 – 2004
या काळात काँग्रेसने अनेक चढउतार पाहिले.
2004 आणि 2014 – यूपीए सरकार
मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पुन्हा केंद्रात सत्ता मिळवली.
आजही काँग्रेसचे अधिकृत चिन्ह हाताचा पंजा हे आहे.
बैलजोडीपासून गाय-वासरू आणि नंतर हाताचा पंजा – काँग्रेसच्या निवडणूक चिन्हांचा प्रवास हा केवळ चिन्हांचा बदल नसून भारतीय राजकारणातील बदलत्या प्रवाहाचा इतिहास आहे.
आजही हाताचा पंजा हे चिन्ह भारतीय राजकारणातील सर्वात ओळखले जाणारे प्रतीक आहे.
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा