यात्रांचा हंगाम व कुस्त्यांचे आखाडे

ग्रामदैवत यात्रा /गावची जत्रा :

नुकतीच यात्रेच्या हंगामांना सुरुवात झाली होती. पहिलाच आखाडा हा कळंबई या गावचा होता. मंदोशी गावापासून कळंबई हे अंतर खूप लांब होते. आखाडा हाती लागण्यासाठी श्री महादू मोहन,श्री सुरेश आंबेकर, श्री हरिभाऊ हुरसाळे व श्री लक्ष्मण बाळू हुरसाळे हे अगदी सकाळी दहा वाजताच कळंबई येथील आखाड्यासाठी निघाले.

ते सर्वजण कळंबई येथे एक वाजता पोहोचले. तोपर्यंत भारुडाचा कार्यक्रम संपत आला होता.आखाड्याच्या जेवणाची लगबग सुरू झाली होती.आमटीचा मस्त घमघमाट सुटला होता. कधी एकदा आखाड्याचा भात खायला असे झाले होते. कारण भुकाच तेवढ्या लागल्या होत्या.

थोड्याच वेळात खाचरांतून पंगती बसल्या. भात वाढून घेण्यासाठी वडाच्या, चांदयाच्या पानांचे वाटप सुरू झाले. त्यावेळी पत्रावळी नसल्यामुळे पानावर जेवण व्हायचे. प्रत्येकाच्या पानावर थंड पाण्याचा शिपकारा मारला जाऊ लागला. 

त्यानंतर अगदी दोनही हातानी वाढपे भात वाढू लागले. त्यानंतर आमटीच्या बादल्या फिरू लागल्या. जेवणाचा एकच घमघमाट सुटला. 

सर्वांना वाढून झाल्यानंतर,वदनी कवळ घेता श्लोक म्हटला आणि लोक जेवणावर तुटून पडले. दोन दोन चार चार वाढ्या झाल्या. लोक जेवण करून तृप्त होऊन ढेकर देऊन आंब्याच्या सावलीत विसाव्याला बसू लागले.

थोडी वामकुक्षी झाली. बरोबर तीन वाजता आखाडा सुरू झाला. सुरुवातीला रेवढ्यावर कुस्त्या झाल्या. त्यानंतर एक रुपयापासून इनामाला सुरुवात झाली. हरिभाऊने देखील दोन कुस्त्या निकाली केल्या. संध्याकाळी सात वाजता आखाडा फुटला. लोक आपापल्या घरी जाऊ लागले.

त्याच दिवशी राजेवाडीची यात्रा व दुसऱ्या दिवशी राजेवाडीचा आखाडा होता. म्हणून हे मंदोशीचे सगळेजण राजेवाडीच्या दिशेने निघाले. त्यांच्याबरोबर विठ्ठल नांगरे, मनोहर शिंदे, असे पैलवान लोक होते. कळंबईचा डोंगर चढून हे सर्वजण राजेवाडीच्या साबळेवाडी येथे आले. 

तेथे विठ्ठल नांगरे यांची ओळख निघाली. ते नेमकं राजेवाडीचे पाटील होते. त्यांचे आडनाव साबळे. खूप सच्चा दिलाचा उमद्या व्यक्तिमत्त्वाचा माणूस. 

त्यांच्या नवीन घराचे काम चालू होते. जुने नऊ खानाचे घर पूर्णपणे खोलले होते. सर्व धान्य धुन्य, चार कणगी शाळू, दहा-बारा कणगी भात, व इतर धान्य, बैल व म्हशी, कोंबड्या चितड्या व इतर संसार उपयोगी साहित्य उघड्यावर पडले होते.

राम राम शाम शाम झाला. सर्व पाहुण्यांची ओळख झाली. तेथील साबळे पाटील म्हणाले. पोरांनो बसा, पाणी घ्या. आणि इथेच जेवण करा.आणि मगच राजेवाडीला जा. तेथे गोहे येथील भारुडाचा कार्यक्रम आहे. गोहे येथील भारुड अतिशय नामांकित आहे. 

पाटलांच्या येथे पुरणपोळ्यांचे जेवण होते. प्रत्येकाला सणकून भूक लागली होती. प्रत्येकाने गुळवण्यामध्ये तीन तीन चार चार पोळ्या खाल्ल्या. सारभात खाताना जेवण्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते.

जेवण खान झाल्यावर थोडा वेळ लोक विसाव्याला बसले. कळंबईचा डोंगर चढून प्रत्येक जण दमून गेला होता. कुणालाच भारुड पाहण्याची इच्छा नव्हती. 

अशातच पाटील तिथे आले. आणि म्हणाले, पोरांनो, आमच्या घरच्यांना सुद्धा भारुडाचा कार्यक्रम पाहायला जायचा होता. पण काय करू? घर उस्तरून ठेवलय. सर्व संसार उघड्यावर आहे. गुरु ढोर कोंबड्या चितड्या सुद्धा उघड्यावर आहेत. त्यामुळे इच्छा असूनही जाता येत नाही. 

कारण साबळेवाडी ते राजेवाडी साधारण बरेच अंतर आहे. आणि जर कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो. आणि इकडे चोरी झाली तर काय करायचे.? त्यामुळे आम्ही काही यात्रेला जाणार नाही. काय करणार इलाज नाही. इच्छा असूनही जाता येत नाही.

त्यावर हरिभाऊ बोलला. पाटील! एक काम करा.

तुम्ही सर्व घरदार यात्रेला भारुडाचा कार्यक्रम पाहायला जा.

आम्हाला भारुड पाहण्याची काही इच्छा नाही.आम्ही तुमच्या घराचे राखण करतो. तुम्ही सर्वजण बिनधास्त जा.

हे ऐकून पाटलांना खूप आनंद झाला. त्यांनी घरातल्या सर्व बाया, पोरांना तयारी करण्यासाठी सांगितले. बायका पोरांनाही सुद्धा खूप आनंद झाला. भारुड पाहायला मिळणार म्हणून त्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले.

सकाळपासून श्रम करून झालेला शिन कुठल्या कुठे निघून गेला.बायकांनी ही लगबगीने सर्व तयारी केली. पहिलवान मंडळींना पाटलांनी झोपण्याची व्यवस्था केली आणि ते सर्वजण भारुडाचा कार्यक्रम पाहण्यासाठी राजेवाडी ला निघून गेले.

पहिलवान मंडळी चालून चालून दमले असल्यामुळे त्यांना पटकन झोप लागली. परंतु हरिभाऊ हुरसळे आणि लक्ष्मण बाळू हुरसाळे ही शेकोटी भोवती शेकत राहिले. कारण त्यांनी पाटलांना शब्द दिला होता. आणि यांच्या जीवावर पाटील सर्व कुटुंबाला घेऊन भारुडाचा कार्यक्रम पाहण्यासाठी निघून गेली होती. त्यामुळे यांच्यावर जबाबदारी होती.

पहाटे साडेचार वाजता पाटील आले. पाहतोय तर हे दोघेजण शेकोटीभोवती शेकत आहेत. त्यांनी पाटलांना सांगितले. पाटील तुमचे सर्व साहित्य आहे का बघा. आम्ही तुम्हाला शब्द दिला होता. आता आम्ही झोपतो. असे म्हणून ते दोघेजण झोपले. सकाळी जेव्हा हे उठले तेव्हा नऊ वाजले होते.

पाटलांनी सर्वांना समोरच्या विहिरीवर आंघोळ करण्यासाठी पाठवले. व इकडे घरात अगदी गरम गरम शाळुच्या भाकरी, बेसन व लसणाची चटणीचा बेत केला. पैलवान मंडळी आंघोळ करून घरी आली. 

पाटलांनी विचारले कुस्त्या कोण कोण खेळतात?

त्यावर लक्ष्मण हुरसाळे बोलले. हरिभाऊ आणि मनोहर शिंदे कुस्त्या खेळतात.

पाटलांनी या दोघांना मोठे ग्लास भरून दूध दिले. कुस्त्यांच्या गप्पा टप्पा झाल्या. आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला.

जोंधळ्याची भाकर, बेसन व लसणाच्या चटणी बरोबर दोन, दोन भाकरी खाल्ल्या. रात्रीचा बराच भात उरला होता. पाटलीनने तेल, कांदा लसूण टाकून हा भात परतून घेतला. प्रथम या लोकांना शीळा भात चालेल का विचारले. 

सर्वजणांनी सांगितले अहो,आम्ही रोजच शीळं खातो. चालेल का काय विचारता? 

वाढा आम्हाला. असे म्हणून भात वाढला गेला.

जेवण झाल्यावर मात्र सर्वजण राजेवाडी कडे निघाले. तेथे भारुडाच्या हजेरीचा कार्यक्रम सुरू होता. हजेरीचा कार्यक्रम पाहिल्यानंतर लोक झाडाखालून विसाव्याला बसले. कुणी गप्पाटप्पा मारू लागले, काहींचा पत्त्यांचा डाव रंगला, झाडाच्या सावलीत विसावले.

एक वाजता लोक आखाड्याचे जेवण करण्यासाठी पक्ती करून बसले. जेवण झाल्यानंतर तासाभरात आखाड्यात सुरुवात झाली.

कुस्त्यांची दंगल:

प्रथमता लहान मुलांच्या रेवड्यावरच्या कुस्त्या झाल्या. त्यानंतर प्रत्यक्ष एक रुपयापासून इनामामला सुरुवात झाली. चांदीच्या कपावर हरिभाऊची कुस्ती लागली.

हरिभाऊ ने जाग घालून आखाड्यात कुस्ती खेळण्यासाठी सज्ज झाला. समोरचा पहिलवान काय एवढा कसदार नव्हता. त्यामुळे पहिल्या झटक्यात बाहेरची लांग भिडवून हरिभाऊ ने कुस्ती निकाली केली. व चांदीचा कप मिळवला.

हरिभाऊची दुसरी कुस्ती लागली. पाच भांडी व 101 रुपये ही कुस्ती मात्र मोठी अटीतटीची झाली. एकमेकावर डाव प्रति डाव होऊ लागले. समोरच्या पैलवानाकडे ताकद होती. व डाव देखील शिवाय धिपाड शरीरयष्टी.परंतु म्हणावा तितका चपळपणा त्याच्याकडे नव्हता. ताकदीच्या जोरावर मात्र हा पैलवान टिकून होता. त्यामानाने हरिभाऊ कडे चार-पाच डाव व चपळपणा सोडला तर ताकदीच्या मानाने तो 25% ही नव्हता. हरिभाऊ त्याच्यापुढे अगदी किरकोळ वाटत होता.

समोरच्या पहिलवानाने हरिभाऊ ला मेटाकुटीला आणली होते.

100 % हा पैलवान हरिभाऊला चित्रपट करणार असेच वाटत होते. ही कुस्ती पंचांनी केव्हाच सोडवले असती. परंतु डाव प्रति डाव यांच्या पाठशिवनीच्या खेळामुळे खेळाला एक वेगळीच रंगत आली होती. 

पंच व प्रेक्षक वर्ग अगदी भान हरपून ही कुस्ती पाहत होते. हरिभाऊने एक दोनदा पट काढून पाहिला. परंतु समोरचा पैलवान धीपाड असल्यामुळे हरिभाऊ ने हा प्रयत्न सोडून दिला. 

बाहेरची लांग भिडवूनही पाहिली परंतु हा डाव सुद्धा त्याने तोडला. कोणत्याच डावावर समोरचा पहिलवान पडत नव्हता. व समोरच्या पैलवानाला हरिभाऊ सुद्धा पडत नव्हता. 

अशावेळी चपळपणा हाच खरा पर्याय होता. कारण समोरचा पहिलं सुद्धा दमला होता. आणि अशातच हरिभाऊंनी खाली मुसुंडी मारली.आणि बगलेमध्ये हात घालून बांगडीच्या डावावर समोरच्या पैलवानाला चित केले.

आखाड्यात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. नवखा भाग असूनही बक्षीसांची खैरात झाली. कारण लोक खेळ पाहतात. खेळ जर आवडला तर पैलवान कोणत्या भागातला आहे हे न पाहता बक्षीस देतात.

अशाप्रकारे हरिभाऊ ने दोन कुस्त्या केल्या होत्या. त्या वेळचे दिवस खरच रम्य होते. एकमेकांची कदर करणारी माणसे होती.ओळख नसतानाही एकमेकांवर विश्वास होता हेच खूप म्हणावे लागेल.

सामाजिक एकोपा :

गावोगावी होणाऱ्या यात्रा यामुळे सामाजिक एकोपा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे गावोगावी यात्रा भरत असतात.

रामदास तळपे aapliaawad2.blogspot.com



                 पैलवान हरिभाऊ हुरसाळे 

६ टिप्पण्या:

  1. श्रीमान..तळपे साहेब...किती बारकाईने लिखान करता आपत..खुप आभ्यास आहे आपला...आपल्या लेखनीतून काहीच सुटत नाही...खुपच छान..

    उत्तर द्याहटवा
  2. रामदास तळपे असेच लिहीत रहा. दिवस फार बदलले आहेत पण आपल्या लिखाणातून आदिवासी संस्कृतीचेही दर्शन घडतेय..

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान लेख तळपे साहेब.माझी कुस्तीची माहिती लिहिलेली आहे.धनयवाद..साहेब.

    उत्तर द्याहटवा
  4. मी हरिभाऊ हुरसाळे,,माझा कुस्तीचा इतिहास लिहिल्या बद्दल धन्यवाद तळपे साहेब..

    उत्तर द्याहटवा
  5. खुप सुंदर लेख...अप्रतिम

    उत्तर द्याहटवा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस