डेहणे गाव हे पश्चिम भागातील दळणवळणाचे पुर्वी पासुनचे महत्त्वाचे केंद्र आहे. माझे माध्यमिक शिक्षण तेथेच झाले.
गावात प्रवेश करणाऱ्या पायवाटा:
डेहणे गावात प्रवेश करण्यासाठी पूर्वी अनेक पाउलवाटा होत्या. खरोशी, धामणगाव,एकलहरेकरांची पाउलवाट, ही डोंगरु तिटकारे गुरुजींच्या घरासमोरून बैलघाटातून सटवाईच्या मंदिराकडून येत असे.
नायफड कडून येणारे लोक थेट रस्त्याने येत असत.
पश्चिम भागातुन येणाऱ्या लोकांची पाऊलवाट ही जानोबा मंदिराच्या पाठीमागून येत असे. पावसाळ्यात तेथील खाचरामध्ये खूपच चिखल होत असे.
शेंदुर्लीवरून येणारे लोक मारुती लांघी फेटेवाले यांच्या शेताच्या कडेकडेने वांजुळडोहा कडून डेहणे गावात प्रवेश करीत असत.
खामकरवाडी, कुडे व घोटवडीकर हे बक्षा आंब्या कडून भीमा नदी ओलांडून डेहणे गावात प्रवेश करीत असत.
एकलहरे,आंबेकरवाडी,बांगरवाडीकरांची पाऊलवाट ही आमईकडून नदी ओलांडून सुभाष भोकटे यांच्या आंब्या कडून वर आता जी बाजार समिती आहे तेथून गावात प्रवेश करीत असे.
अशा डेहणे गावात प्रवेश करणा-या ब-याच पाऊलवाटा होत्या.
आता गावोगावी रस्ते झाल्याने व प्रत्येकाकडे मोटारसायकल, चारचाकी आल्याने जवळ जवळ पाउलवाटा काळाच्या ओघात लुप्त झाल्या.आता फार क्वचितच त्यांचा उपयोग होत असेल.
गावात मुख्य रस्त्याने प्रवेश केल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजुला शांताराम कोरडे यांची गिरणी आहे. तेथे भात भरडण्यासाठी व दळणे दळण्यासाठी नेहमीच गर्दी होत असे. सुगीच्या दिवसात अनेक वैदिनी सुई दोरा विकून त्या बदल्यात भात घेऊन येत असत.आणि शांताराम कोरडे यांच्या गिरणीच्या दारात मुक्कामाला असत. तिथे भात भरडून त्याची तांदूळ करून त्या नगरला जात असत.
त्या शेजारी सिताराम कोरडे यांचे टेलरचे अतिशय छोटे दुकान होते.
सिताराम टेलर:
सीताराम टेलर हे धोंडूबाबा कोरडे यांचे चिरंजीव ते जन्मतः अपंग होते. त्यांच्या दुकानात शाळेतील बरीचशी मुले उसवलेली कपडे शिवणे, रफु करणे, तर काही उगाचच शाळेला दांडी मारून वेळ घालवत बसायची. शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ते टाईमपास करण्याचे आवडते ठिकाण होते.
सिताराम टेलरच्या शेजारी बांबळे पंक्चर कम लाईट लाउडस्पिकर मंडप डेकोरेशवचे दुकान होते. शाळेतील मुले सायकल पंक्चर काढण्यासाठी कायम त्यांच्या जवळ घोळक्याने उभी असायची.
डॉ. शितोळे:
शेजारीच उबाळे यांच्या पडवीला डाँक्टर शितोळे यांचा दवाखाना होता. हे डाँक्टर महाशय कोणताही पेशंट असुद्या. त्याला दोन इंजेक्शन दोन दंडांना देणारच हा नियमच होता.
बोर्डावर मोठ्या अक्षरात डाँ.शितोळे यांचा दवाखाना व त्याखाली छोट्या अक्षरात R.M.P.असे लिहीलेले होते. माझा मित्र सुभाष भोकटे यांनी R.M.P. चा Longfarm रोगी मारण्यात पटाईत असा मराठीत अर्थ काढला होता.
डॉक्टर शितोळे यांच्याकडे डबल नळीची एज.डी. मोटरसायकल होती.
उबाळे बंधू यांचे हॉटेल:
त्यांच्या शेजारी प्रताप, संजू व राजू उबाळे यांचे हाँटेल होते व आताही आहे. उबाळे बंधू गणपतीचे डेकोरेशन फार सुंदर करायचे. त्यांच्या हाँटेलात भजी व कुंदा फारच फेमस होता.
उबाळे यांचे हॉटेल अगदी छोटेसे जरी होते. तरी टापटीपीच्या बाबतीत ते अगदी उजवे होते. एकदम स्वच्छ नीटनेटके टापटीप असे ते हॉटेल होते. उबाळे यांच्या हॉटेलत मिसळ, कुंदा,कळीचे व बुंदीचे लाडू, खाजा, शेवपापडी आणि चहा फारच प्रसिद्ध असायचा. प्रताप उबाळे हे गल्ल्यावर असायचे. तर संजू हे गिर्हाईकांना चहा,भजी मिसळ द्यायचे.
लग्नकार्यासाठी अथवा साखरपुड्यासाठी लोक उबाळे यांच्या हॉटेल मधून बुंदी घेऊन जात असत. उबाळे यांच्या हॉटेलात जसा कुंदा प्रसिद्ध होता. तसा खाजा देखील पन्नास पैशाला दोन खाजे मिळत.
नवीन लोक म्हणतील कुंदा हा काय प्रकार आहे ? तर कुंदा म्हणजे खव्यापासून बनवलेला पदार्थ. व खाजा म्हणजे आजच्या बालुशाहीचाच एक प्रकार. परंतु बालुशाही नव्हे. बालुशाही पेक्षा छोटा.
उबाळे यांच्या हॉटेलतील खाजा तोंडात घातल्या वर लगेच विरघाळुन जात असे. व त्याच्या वेगळ्याच चवीने मन अगदी प्रसन्न होई.असा हा खाजा आता कुठेच मिळत नाही. त्याचप्रमाणे कुंदा देखील. परंतु आजही उबाळे यांच्या हॉटेलात हे सर्व पदार्थ आजही मिळतात हे विशेष.
उबाळे यांच्या हॉटेलच्या समोर असलेल्या भट्टीवर हॉटेलचे मालक श्री. राजू उबाळे हे स्वतः ताजा माल बनवीत असत.
उबाळे यांचे हॉटेलमध्ये चहा देखील अतिशय छान मिळत असे.अगदी सकाळी सकाळी उबाळे यांच्या हॉटेलात चहा पिण्यासाठी व भजी खाण्यासाठी तोबा गर्दी होत असे.
अगदी सकाळी सकाळी राजू उबाळे हे भट्टीवर असलेल्या कढईमध्ये भज्यांचा घाणा सोडत. भज्यांचा हा घमघमीत वास अगदी दूरवर दरवळत राही. त्यामुळे खव्वयांचे पाय आपोआप हॉटेल कडे वळत. आम्ही दोन दोन प्लेट भजी खात असू.आता उबाळे यांचे हॉटेल मोठ्या भव्य इमारतीत सुरू आहे. आजही राजू उबाळे यांनी पूर्वीची चव टिकवून ठेवली आहे.
व्हिडिओ थिएटर:
उबाळे हाँटेलच्या शेजारीच श्री.शिंदे यांचे व्ही.डी.ओ. थिएटर होते. बाहेर काळ्या बोर्डवर रंगीत खडूंनी मोठ्या अक्षरात चित्रपटाचे नाव व छोट्या अक्षरात कलाकारांची नावे अशी जाहिरात असायची. तसेच नवीन चित्रपटाचे पोस्टर चिकटवलेले असायचे.
अनेक विद्यार्थी तेव्हा शाळा बुडवून पिक्चर पाहण्यासाठी तेथे जात असत.
शेजारीच इन्नूसभाई तांबोळी यांचे दुकान होते. व आजही आहे. आता त्यांनी मोठी टोलेजंग इमारत बांधली आहे. तिथे त्यांचा दुकान व्यवसाय चालू आहे.
विठ्ठल कहाणे यांचे दुकान:
कै.विठ्ठल कहाणे यांचे किराणा मालाचे दुकान होते. तेथे उधारी मोठ्या प्रमाणात चालत असे. भागातील अनेक लोकांची तेथे उधारी असायची. विठ्ठल कहाणे यांचे चिरंजीव श्री.वनराज कहाणे यांचेकडे ६०८ टेंपो होता. त्यावेळेस या भागात दोनच ट्रक होते. कहाणे यांचा टेम्पो श्री रामदास तुकाराम कोरडे हे चालवायचे.
कहाणे यांचे शेजारी कैलास (बाळासाहेब) सावंत यांचे टेलरचे दूकान होते. त्याआधी किराणा मालाचे दुकान सुद्धा होते.
कै.दत्ताशेठ कोरडे यांचे किराणा दुकान:
सावंत यांचे शेजारी श्री.दत्ताशेठ बाजीराव कोरडे यांचे किराणा दुकान होते. या दुकानात विशेष गर्दी असायची. मला आठवते त्या वेळेस रामायण व महाभारत मालिका टिव्हीवर लागायच्या. मालीकेतील अनेक देवांचे पासपोर्ट साइजचे फोटो याच दुकानातुन चार-आठआणे देऊन पोरं घ्यायची व वहीमध्ये संग्रह करायची.
शिवाय तेथे सर्व शालेय स्टेशनरीचे साहित्य मिळत असे.
याच वेळी अमीरखान व माधुरी दिक्षित यांचा दिल सिनेमा हिट झाला होता.अमीर माधुरी यांचे छोटे फोटो याच दुकानातुन शाळेचे विद्यार्थी घ्यायचे व इस्रीच्या सहाय्याने शाळेच्या गणवेशातील पांढऱ्या शर्टाच्या मागील बाजुला व पुढे खिशावर ते चित्र उमटवयाचे. त्यामुळे अनेकांनी शिक्षकांच्या हातातील छड्यांचा प्रसाद खाल्ला आहे.
सहदेव गायकवाड टेलर:
कोरडे यांच्या दुकानाच्या पाठीमागे सहदेव गायकवाड यांचे टेलरचे दुकान होते. तिथे कैलास, आणि सहदेव गायकवाड कपडे शिवायचे.
त्यांच्यासमोर असलेल्या सखाराम सावंत यांच्या भिंतीच्या कट्ट्यावर पश्चिम भागातून आलेल्या महिला करवंदे, तोरणे, आंबेळी इत्यादी रानमेवा विकत असायच्या. तिथेच रस्त्यावर खानविलकर ते हात गाडीवर कुल्फी विकायचे.
गणपत भोपळे यांची भाताची व पिठाची गिरणी:
कोरडे यांच्या दुकानाच्या शेजारी शाळा व सरकारी दवाखान्याकडे जाणारा रस्ता व त्या शेजारीच कै.गणपत भोपळे यांची भात व पिठाची गिरणी होती. त्या गिरणीवर नावजी वनघरे व सदाशिव देशमुख (सदुमामा) कामाला होते.
तेथे सुद्धा भात भरडण्यासाठी व पीठ दळण्यासाठी लोकांची खूपच व गर्दी असायची.
मच्छिंद्र भोपळे बॅगी पॅन्ट स्पेशलिस्ट टेलर :
गिरणीच्या पाठीमागील पडवी मध्ये मच्छिंद्र भोपळे यांचे टेलर चे दुकान होते. त्यावेळी नवीनच सलमान खानच्या बॅगी पॅन्ट ची फॅशन आली होती. तिथे बॅगी पॅन्ट शिवायला देण्यासाठी अनेक तरुण पोरांची गर्दी असायची. मच्छिंद्र भोपळे हे बॅगी पॅन्ट व शर्ट स्पेशलिस्ट होते.
मुलांचे वस्तीगृह:
गिरणी शेजारी मुलांचे वसतीगृह होते. तेथे शाळेतील मुलांची राहण्याची सोय होती. जुन्नर,आंबेगाव व खेड तालुक्यातील विद्यार्थी वस्तीग्रहा मध्ये राहत असत. शेजारीच कै. शंकर सोळशे यांचे किराणा मालाचे व सावकारीचे दुकान होते. तेथे अनेक शिक्षक लोक व्याजाने पैसे घेण्यासाठी येत असत.
भोपळे यांच्या पुढच्या बाजुला श्री.अंकुश भोकटे यांचे टेलरचे दुकान होते.
डेहणे आदिवासी संस्थेचे कार्यालय :
भोपळे यांच्या गिरणीच्या समोर डेहणे आदिवासी संस्थेचे कार्यालय होते. तेथे कै.भागुजी हरिभाऊ भाईक
चेअरमन नेहमी बसलेले असायचे.
त्यांच्या बाजुला संस्थेचे मॅनेजर चिंतामण जठार बसलेले असायचे.
शेजारीच धोंडीभाऊ म्हातारबा दरेकर सचिव यांचेही स्वतंत्र ऑफिस होते. डेहणे आदिवासी संस्थेचा व्याप मोठा होता.
तेथे पावसाळ्याच्या सुरुवातीला सोसायटीचे पीक कर्ज प्रकरणासाठी शेतकऱ्यांची खूपच मोठी गर्दी व्हायची.
कै.बाबुरावजी कौदरे यांचे योगदान :
तेथून दक्षिणेला चालत गेल्यावर कै. बाबुराव कौदरे यांच्या इमारतीत पाचवी ते सातवी पर्यत शाळेचे वर्ग भरत.
शिवाजी विद्यालय डेहणे या शाळेसाठी कै.बाबुरावजी कौदरे यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या स्वतःच्या खोल्या शाळेसाठी दिले होत्या.
त्याचप्रमाणे शिवाजी विद्यालय हायस्कूल डेहणे येथे आणण्यासाठी त्यांनी खूपच परिश्रम घेतले होते. त्यामुळे आपल्या या शैक्षणिक वाटचालीमध्ये त्यांचा सुद्धा खारीचा वाटा आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र :
पश्चिमेकडे उजव्या बाजुला सरकारी दवाखाना म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत 1979 साली बांधण्यात आली. व दवाखाना सुरू झाला.
तेथे कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी स्वतंत्र खोल्या बांधण्यात आल्या होत्या. व डेहणे येथील आमराई मधील ओढ्या जवळील विहिरी मधून पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन केली होती. दवाखान्यात नबाबाई कोरडे अर्धवेळ स्त्री कर्मचारी म्हणून काम करायच्या.
त्यावेळेस दवाखान्यात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता. टीव्ही पाहण्यासाठी आम्ही तिथे जात असायचो. कधीकधी तेथे पडद्या वरील चित्रपट सुद्धा दाखवले जायचे.
दवाखान्यात सकाळपासून दुपारपर्यंत आजारी लोकांची खूप गर्दी असायची. त्यावेळी ठिकठिकाणी भिंतीवर
तांबी बसवा, पाळणा लांबवा,
विहिरी तळी पायऱ्यांची, साथ होते नारुची,
गप्पी मासे पाळा, रोगराई टाळा.
डी डी एस ची गोळी, करी कुष्ठरोगाची होळी
अशी स्लोगन वाक्य भिंती भिंतीवर गेरूच्या रंगाने लिहिलेली असत.
हायस्कूलचे आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग:
दवाखान्याच्या शेजारी शिवाजी विद्यालयाचे आठवी ते दहावी पर्यतचे वर्ग होते. ही शाळेची इमारत सावंत बंधू यांच्या जागेमध्ये होती. या इमारतीचा मोठा व्हरांडा व दगडी बांधकाम केलेली इमारत, मोठमोठ्या खिडक्या, आणि वर्गात असलेले बेंच याचे आम्हाला खूप अप्रूप वाटायचे.
त्यावेळेस आर जे. पाटील सर, सत्तीकर सर हे मुख्याध्यापक होते. गाडीलकर सर, सुरगुडे सर, क्षीरसागर सर, तांबोळी सर हे इंग्रजी विषय शिकवायचे.
दातीर सर, बोरकर सर हे गणित विषय शिकवायचे. वामन सर, नढे सर हे विज्ञान शिकवायचे.पोखरकर सर, लाळगे सर हे इतिहास आणि भूगोल शिकवायचे.
महामुनी सर हे मराठी स्पेशलिस्ट शिक्षक होते. कर्वे सर वरकुटे सर असे अनेक शिक्षक होते.
शिपाई कर्मचाऱ्यांपैकी पांडू सांगडे यांची कारकीर्द विशेष होती.
पगार विभाग कार्यालय:
हायस्कूलच्या खाली तालुका मास्तर पगार विभाग डेहणे यांचे कार्यालय होते. डोंगरु कुशाबा तिटकारे हे तालुका मास्तर होते. त्यानंतर श्रीपत देवजी लांघी, श्री दिवाने गुरुजी हेही तालुका मास्तर होते.
त्यांना मदतीसाठी श्री जयराम आंबेकर गुरुजी,आणि ज्योती चिलेकर मॅडम मदत करीत असत.
उजव्या बाजुला शाळेचीच इमारत होती. त्यात दहावी "ब" चा वर्ग भरायचा. त्या वर्गात मी होतो. तिथूनच शिरगाव कडे जाणारी पायवाट होती.
जानोबा महाराजांचे कौलारू मंदिर :
त्या शेजारी श्री.जानोबा महाराजांचे जुने, दगडांच्या भिंती असलेले चौमौळी कौलारू मंदिर होते. मंदिराच्या दर्शनी भिंतीवर इंदिरा गांधी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज यांची अतिशय सुंदर अशी भिती चित्रे होती.
मंदिरामध्ये सुंदर निळा ऑइल पेंट रंग दिला होता. कावळे पाटील हे देवाचे पुजारी होते.
मंदिरासमोर दिपमाळ व भव्य असा आयताकृती स्टेजसारखा मोठा पार होता. पाराच्या दोन्ही बाजुच्या कोप-यावर उंच अशी झाडे होती. दक्षिणेस दगडी रांजन होता. याच पारावर गावच्या यात्रेचे कार्यक्रम होत असत.
कौलारू मराठी शाळा :
समोरच भव्य अशी दगडी भिंतीची, कौलारू मराठी शाळा होती. या शाळेत चार वर्ग खोल्या होत्या. पुढे भव्य असे पटांगण होते. शाळेच्या पाठीमागे अनेक झाडे शिवाजी विद्यालयाच्या मुलांनी लावली होती.
शाळे शेजारी मराठी शाळेच्या शिक्षकांसाठी सरकारी निवासस्थान होते. शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात सकाळी प्रार्थना व्हायची. संध्याकाळी हाँलीबाँल खेळत.
सखाराम सावंत यांचा वडा आणि शिरा:
कै.बाजीराव कोरडे यांचे दुकानापासुन रस्त्या पलीकडे कै.सखाराम सावंत यांचे हाँटेल होते.
सखाराम सावंत यांच्या हॉटेलमधला भला मोठा बटाटा वडा, व गोड शिरा फारच प्रसिद्ध होता. 50 पैशाचा शिरा व 50 पैशाचा मोठा वडा अशा एक रुपयात त्यावेळी सकाळचा फुल नाश्ता होत असे. वडा व शिरा घेण्यासाठी लोक सखाराम सावंत यांच्या हॉटेलमध्ये येत असत.( पूर्वीचा मोठा वडा आता खूपच छोटा झाला आहे.)🥲
सखाराम सावंत हे बारीक अंगचनीचे होते. स्वच्छ धोतर व (बॉडी) बंडी परिधान केलेले असायचे. सखाराम सावंत यांच्या त्यांची पत्नी ह्या गल्ल्यावर बसलेल्या असत. सखाराम सावंत हे काही दिवस दूध डेअरीचे चेअरमन सुद्धा होते. त्यांच्याकडे एक ट्रक होता.
भाऊ आजा:
सखाराम सावंत यांच्या हॉटेलच्या समोरच त्यावेळचे प्रसिद्ध आचारी भाऊ आजा
(भाऊ तिटकारे) हे भट्टीवर असत. वडे, शिरा, शेव पापडी यांचा घाना सतत चालू असे.अगदी सकाळी, सकाळी भाऊ आजा दगडी कोळशाची भट्टी पेटवायचे.
काही लोक अगदी शेकण्यासाठी भट्टी पुढे ठाण मांडून उभे असत. व भट्टीवरच गप्पांची मैफल चालू होई.
त्या शेजारी रशिदशेठ तांबोळी यांचे किराना दुकान (त्यांचे काही काळ हाँटेलही होते.) त्या शेजारी प्रसिद्ध असे अब्बासभाई तांबोळी यांचे जनसेवा हाँटेल होते. या होटेलात तर्री फार प्रसिद्ध असायची.
अब्बास शेठ यांची प्रसिद्ध मिसळ आणि तर्री:
अब्बास शेठ यांचे हॉटेल अगदी कळकटलेले असे होते. अतिशय तेलकट व काळपट चार लाकडी टेबल व बाकडे तेथे मांडलेले होते. शेजारीच एक छोटे टेबल होते. त्यावर छोटा स्टोव्ह व चहाचे अधन ठेवलेले असे. स्टोव्हची फरफर सतत चालू असे. शेजारीच मिसळचे एक मोठे भरलेले पातेले असे. त्या शेजारी बटाराची पोती असायची.
अब्बास शेठ यांच्या हॉटेलात मिसळ अतिशय उत्तम मिळायची. त्यावेळी मिसळ ही शक्यतो बशीत मिळायची. पश्चिम भागात तेव्हा पावाचा जन्म झालेला नव्हता. लोक भाकरी कपड्यात गुंडाळून आणत असत. व मिसळ बरोबर खात असत. तेव्हा एक रुपयाला मिसळ मिळे. तेव्हा एक रुपयाही मिसळवर खर्च करू न शकणारे खूप लोक होते.अशा लोकांसाठी अब्बास शेठ हे बशीतून नुसती तर्री देत.
ही तर्री चाळीस पैशाला असे. कितीही वेळा तर्री घ्यायची मुभा होती.बिल फक्त 40 पैसे. कित्येक लोक अगदी मी देखील खूप वेळा अब्बास शेठ यांच्या हॉटेलमध्ये तर्री बरोबर भाकरी खाली असेल.
50 पैशाला तांब्याभर ( त्यावेळचा तांब्या ) तर्री मिळे. या तर्रीत दोन जणांचे जेवण होत असे.आम्ही तांब्यातून तर्री घरी नेत असू. त्या तरीची चव ही अप्रतिमच होती. त्यात तर्रीची चव अजूनही माझ्या स्मरणात घर करून आहे.अशी तरी आजच्या कोणत्याही हॉटेलमध्ये मिळत नाही.
आबास शेठ यांच्या हॉटेललात एक रुपयाला दहा बटर मिळत असत. रुपयाची दहा बटर आम्ही घरी नेऊन चहाबरोबर खात असू. ही बटारे केवळ आबास शेठ यांच्याच हॉटेलात मिळत असत.
या हाँटेल शेजारी आणखी एक V.D.O. थिएटर व बाजीराव कोरडे यांचे दुकान होते. एकदा शाँर्टसर्किटमुळे ? हे दुकान जळुन खाक झाले होते.
रशीद शेठ यांचे किराणा मालाचे दुकान :
अब्बास शेठ यांच्या शेजारी रशीद शेठ यांचे किराणा मालाचे दुकान होते. डेहणे गावठाण मधील सर्व उधाऱ्या
या दुकानांमध्ये असत. शिवाय काही काळ त्यांचे हॉटेल देखील होते. तिथे पुरी भाजी अतिशय छान मिळत असे.
गावातील पहिला टेलिफोन एक्सचेंज बुथ :
रशीद शेठ यांचे चिरंजीव आयाज तांबोळी यांनी पहिले टेलिफोन एक्सचेंज बुथ सुरू केले होते. त्यावेळी त्यांच्या टेलिफोन एक्सचेंज बुथ मध्ये फोन करण्यासाठी लोकांची खूप गर्दी घ्यायची. शिवाय त्यांचा पासपोर्ट फोटो काढण्याचा स्टुडिओ देखील होता.
पहिले व्यावसायिक केश कर्तनालाय:
पूर्वी जमिनीवर पोते अंथरून त्यावर बसून केस कापण्याची पद्धत होती. शिवराम माठे हे बलुतेदारी पद्धतीने नाभिक काम करायचे. त्यावेळी वस्तऱ्याला धार लावून टक्कल केले जायचे. तर केवळ पाणी लावून दाढी केली जायची. ब्लेड हा प्रकार गावाला अस्तित्वात नव्हता.
परंतु सन 1986 साली त्यांचे पुत्र श्री रामदास माठे यांनी मोठ्या खुर्च्या, मोठमोठे आरसे, दाढी करण्याच्या क्रीम, पावडर, पाणी मारण्याचा स्प्रे या आधुनिक वस्तूंसह अध्ययवत असे दुकान थाटले होते. डेहणे गावात हे पहिलेच अद्यायावत दुकान होते. या दुकानाचे त्यावेळी खूपच अप्रूप वाटायचे. (पोत्यावरून डायरेक्ट खुर्चीवर) 😂
त्यावेळी मिथुनचा बॉक्सर हा चित्रपट हिट झाला होता.आणि मिथुन कट सुद्धा फेमस झाला होता.
रामदास माठे यांच्या दुकानात मिथुन, अनिल कपूर, जॉकी श्राफ ह्या हिंदी चित्रपट कलाकारांचे पोस्टर लावले होते. त्यामुळे दुकानात अधिकच आकर्षक दिसायचे. मिथुन कट हा तेव्हा फारच प्रसिद्ध होता.
रामदास माठे व शामराव वाजे हे फॅशनचे त्यावेळी शिल्पकार ठरले.
श्री शामराव वाजे यांचे लॉन्ड्रीचे दुकान :
पूर्वी लोक फक्त धुतलेले कपडे वापरत असत. कपड्यांना इस्त्री करतात हे कुणालाही त्यावेळी माहीत नव्हते. परंतु काळाची पावले ओळखून श्री शामराव वाजे यांनी त्यावेळी अध्यायावत असे लॉन्ड्रीचे दुकान टाकले होते. या दुकानाला मोठा प्रतिसादही मिळाला होता.
डेहणे गावात श्री शांताराम शेंडे यांचा गणपती फार मोठा व आकर्षक डेकोरेशन असायचे. डेकोरेशन खुपच सुंदर असायचे. दहा दिवस नाच, गाणी अगदी धमाल असायची.
पंचांग, ज्योतिष्य आणि अंगारे धुपारे:
आजारी पडल्यावर लोक दवाखान्यात जात असत तसेच काही लोक भविष्य, ज्योतिष आणि अंगारे धुपारे यासाठी डेहने येथे येत असत.
बबन सोळशे कपाळाला भंडारा लावून लक्ष्मण सुतार यांच्या अंगणात बसलेले असत. त्यावेळी तिथे त्यांच्याकडे पंचांग पाहण्यासाठी अनेक लोक येत.
त्याचप्रमाणे धामणगावचे सोनू भागीत पंचांग आणि बोटचाळी करायचे. त्यांच्याकडे सुद्धा अनेक आजारी लोक येत असत. ते वाजे यांच्या घरात बसलेले असत. तेथे बरेच अंगारे धुपारे चालायचे. लोक त्यांना सोन्या भगत असे देखील म्हणायचे.
मारुती खाडे यांच्याही अंगात वारे येत होते. त्यांच्याकडे अनेक भक्तांची गर्दी होत असे. अमावस्या, पौर्णिमेला उतारे पातारे चालू असायचे.
शिवाय बनाजीबुवा कोरडे हेही पंचांग पाहून लग्नाच्या तिथी जमवत असत. तसेच सत्यनारायणाच्या महापूजा करत असत.
सुतार आळी:
सुतार आळीला काशिनाथ भालेराव व सावळेराम भालेराव हे नवीन घरांची कामे करत असत. तर दत्तु भालेराव शिक्षक होते. आणि नथू भालेराव हे तलाठी होते.
सुतारआळी यांचाही सार्वजनिक गणपती असायचा. अतिशय सुंदर नियोजन असायचे. गणपती काळात विवीध कार्यक्रम, मराठी सिनेमे अशी रेलचेल सुतार आळीला असायची.
क्रिकेटचे भव्य स्टेडियम :
त्यावेळी क्रिकेटची मोठ्या प्रमाणात क्रेझ होती. गावागावांमध्ये क्रिकेट खेळला जायचा.परंतु क्रिकेट खेळण्यासाठी भव्य असे स्टेडियम असावे व त्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा भरवाव्यात. यासाठी श्री सुनील भालेराव यांच्या नेतृत्वाखाली डेहणे येथील तरुण वर्ग यांनी कातकरी अळीच्या पाठीमागे दशरथ कोरडे यांच्या पड जमिनीत आठ दिवस कष्ट करून अतिशय सुंदर असे स्टेडियम उभारले होते. व भव्य अशा क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी भरवल्या जात असत.
सुनील भालेराव, यशवंत भालेराव, जाकिर तांबोळी, हरूण तांबोळी,अल्ताफ सर, विठ्ठल डोंगरे असे अनेक क्रिकेटर डेहणे गावात होते.
आब्बास शेठच्या हाँटेल समोर मोठा चौक व पुढे मोठा ध्वजाचा उंच लोखंडी खांब होता.कै.भरत कोरडे या खांबाच्या शेंड्या पर्यंत वर जायचा.या खांबाला वळसा घालूनच एस. टी. आब्बासभाईच्या हाँटेलच्या दारात धुरळा उडवीत थांबायची.
ध्वजाच्या खांबाच्या समोरच दुध डेअरी, शिवाजी विद्यालयाचे कार्यालय व अंगणवाडी होती. त्याशेजारी जनावरांचा दवाखाना आहे.तर जवळच असलेल्या गोडावुनच्या प्रांगणात डेहणे आदिवासी संस्थेची वार्षिक सभा सटवाई मंदिराजवळील गोडाऊनच्या आवारात होत असे. सभा संपल्यावार भेळ, लाडू खाण्यासाठी आम्ही तेथे जात असू.
सटवाई मंदिर :
डेहणे गावच्या पूर्वेला बैल घाटाच्या शेजारी असलेल्या सटवाई मंदिरात मंगळवारच्या दिवशी पश्चिम भागातील अनेक भक्त लोक तिथे कोंबड्या कापत असत. त्यानंतर जेवणावळी चालायच्या. कधी कधी आम्हालाही जेवणाचा लाभ मिळायचा.
आता जे वाढाणे यांचे हाँटेल आहे. त्या जागेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक होती. व मारूतीच्या मंदिरासमोर ग्रामपंचायत व पोष्ट आँफिस होते.
मारूतीच्या मंदिराच्या पुर्वेला खाली बैलगाड्यांचा घाट होता. यात्रेला तेथे अनेक तालुक्यातुन नामांकित बैलगाडे यायचे. प्रचंड गर्दी असायची.
बैलगाड्यांच्या शर्यती व्हायच्या. गाड्यांच्या शर्यती पहायला संपुर्ण पश्चिम भाग लोटायचा. संध्याकाळी जानोबा महारांजांच्या पारावर इनाम वाटप केला जायचा. रात्री तमाशा किंवा भारूडाचा कार्यक्रम व्हायचा.
धर्मरायाचे छप्पर नसलेले मंदिर :
शांताराम शेंडे यांच्या घरा शेजारी धरमरायाचे छप्पर व भिंती नसलेले देऊळ होते.धरमरायाच्या यात्रेला येथील जागा शेणाने सारवून छानपैकी स्वच्छता केली जायची. सकाळी लोक मांडव डहाळे आणायचे. पुजा झाल्यावर नारळ फोडण्यासाठी तोबा गर्दी व्हायची. लहान मुलांच्या कुस्त्या व्हायच्या. त्यानंतर विवीध गावच्या भजनांचा कार्यक्रम असायचा.
धर्मरायाच्या मंदिराची संपूर्ण देखभाल कै. शिवराम माठे हे करायचे.
धरमरायाच्या देवळा शेजारी मुस्लीम बांधवांचे चीरे होते. त्यांना वर्षातुन एकदा पांढरा चुना लावलेला असे. त्या चिऱ्यांवर आम्ही बसत असू. परंतु कधीही धर्म भावना दुखावल्या नाहीत. हे विशेष.
याच मंदिराच्या उत्तरेला कातकरी लोकांची चाळ आहे. तेथे सकाळी डेअरीला दुध घालायला आलेले काही लोक दारू पिण्यासाठी तेथे जात असत.
सोळशेवाडी लेझीम पथक :
सोळशेवाडी यांचे ढोल व लेझीम पथक त्यावेळी फार प्रसिद्ध होते. शिवाय त्यांचे भजन मंडळही प्रसिद्ध होते. श्री.दत्ता लांघी साहेब, श्री.एकनाथ लांघी साहेब, कै.बुधाजी खाडे, कै,चिंधू खाडे, श्री.जगदिश कशाळे साहेब, श्री.दगडू लांघी. श्री.दत्ता खाडे सरपंच यांनी खुप वर्षे भजन स्पर्धा भरविल्या होत्या. व त्यास प्रचंड प्रतिसाद लाभला.
भक्ती सांप्रदाय :
त्यावेळी श्री.सुरेश तिटकारे सर, श्री. मनोहर कोरडे, श्री.वनराज कहाणे सर, श्री.नामदेव वाजे गुरूजी यांनी श्रीहरी तरूण मंडळाची स्थापना करून मारूती मंदिराचा जिर्णोद्धार केला व तेथे दररोज सायंकाळी हरिपाठ सुरू केला. दररोज सायंकाळी हरिपाठ म्हणण्यासाठी लोक मंदिरामध्ये जात असत.
मंदिराच्या भिंतीवर अतिशय सुंदर असे सुविचार, व भगवद्गीते मधील श्लोक हे श्री क्षीरसागर सरांनी लिहिले होते.
डेहणे आदिवासी दूध संस्था :
त्यावेळी डेहणे आदिवासी दुध उत्पादक संस्था ही 25 गावांशी संलग्न होती. संस्थेची २२०६ क्रमांक असलेली दुधगाडी अनेकांच्या स्मरणात असेल. दुध संकलनाचे काम कै.नावजी वनघरे,चाहू वायाळ, विठ्ठल सावंत हे करायचे.
संस्थेचे स्वतंत्र इमारत होती.
नावजी वनघरे यांचे दूध केंद्र:
कै.नावजी वनघरे यांच्याकडे बऱ्याच म्हशी होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे ताजे दूध घेण्यासाठी स्थानिक लोक आणि नोकरदार वर्ग येत असत. शिवाय ते हॉटेललाही दूध घालत. त्यांचे चिरंजीव श्री शंकर वनघरे प्रसिद्ध पहिलवान होते.
चिमाजी आप्पा कोरडे यांच्या खोल्या:
चिमाजी आप्पा कोरडे यांच्या बऱ्याच खोल्या भाड्याने दिलेल्या होत्या. तिथे अनेक हायस्कूलचे शिक्षक राहायचे. शिवाय त्यांच्या एका खोलीत एकलहरे आदिवासी संस्थेचे कार्यालय होते. तेव्हा नमाजी आंबेकर हे एकलहरे दूध संस्थेचे चेअरमन होते.
त्यांच्या अंगणात वडाचे मोठे झाड होते. त्या झाडाखाली सकाळी एकलहरे आदिवासी संस्थेचे दूध संकलनाचे काम चालायचे.
हसन सायकल मार्ट :
श्री.तुकाराम भोकटे गुरुजी यांच्या घराशेजारी त्यांच्या जागेत हसन सायकल मार्ट होते. तिथे भाड्याने सायकल मिळायच्या. तेथे सायकल दुरुस्तीचेही काम चालत असेल.
भाड्याने सायकल चालवायचा दर हा एका तासाला एक रुपया असा दर होता. तेथे अनेक छोट्या मोठ्या सायकली असायच्या.आम्ही तेथेच सायकल चालवायला शिकलो.
बक्ष्या आंबा,आमई, सुरांडा व वांजळढोह:
बक्षा आंब्याकडे स्त्रिया कपडे धुण्यासाठी जात असत. तसेच अनेक मुले पोहायला जायचे.
आमई कडे मोठा डोह होता. बैलपोळ्याच्या वेळेस लोक आपापले बैल घेऊन या डोहात पोहोण्या पाडत असत. बैलांच्या शेपटीला धरून खोल डोहातून जाताना वर खाली व्हायचे. परंतु पैलतीराकडे जाण्याचा आनंद असायचा.
आम्ई कडे स्मशानभूमी देखील होती. तेथे मृत व्यक्ती नदीच्या काठी जाळल्या जायच्या. दशक्रिया देखील तिथेच होत असत. शिवाय गणपती विसर्जन ही तेथेच होत असे.
सुरांडा येथे देखील पाण्याचा डोह होता. मुले तिकडे पोहायला जायची.
सर्वात मोठा डोह म्हणजे वांजळडोह परंतु तिकडे भुते असतात म्हणून कोणीही दुपारी फिरकत नसायचे.
सातकं, सुतारबन, बक्षा आंबा, कातोडी रान :
सातकं, सुतारबन, बक्षा आंबा, कातोडी रान या राना मध्ये लोक गुरे राखण्यासाठी, वाळलेले शेण गोळा करण्यासाठी जात असत. तसेच जनावरांसाठी वाळलेले गवत काढण्यासाठी जात असत. अनेक लोक वाळलेल्या गवताच्या पेंड्या झाडावर रुचून ठेवत.
कातवडी देव हे एक उग्र देवस्थान होते. घरात जर काही चोऱ्यामार्या झाल्या. किंवा भांडणे झाली तर लोक कातवडी देवाची भीती दाखवायचे.
राजकीय कारकीर्द :
कै.श्री.दामू कोरडे इंग्रज काळापासून डेहणे गावचे मुलकी पाटील होते. दामू पाटील हे अतिशय सज्जन गृहस्थ होते. त्यांची कारकीर्द अतिशय महत्त्वपूर्ण होती.
स्वातंत्र्योत्तर काळात कावळे पाटील हे प्रसिद्ध होते. कावळे पाटील आता वयस्कर झाले आहेत.
डेहणे गावचे ग्रामपंचायतचे सरपंच कै.किसन उर्फ दादाभाऊ कोरडे हे होते. त्यानंतर कै.नानासाहेब कशाळे हे बरेच वर्षे सरपंच होते. शिवाय ते सन १९९२ ते १९९७ या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य देखील होते.
तसेच ह.भ.प. धोंडूबाबा कोरडे हे सुद्धा सन १९६२ ते १९६७ या कालावधीत पंचायत समिती सदस्य होते.
शिवाय श्री.रामदास माठे हे सुद्धा पंचायत समिती सदस्य व सभापती होते.
जि.प. सदस्य, प.स. सदस्य व सभापती:
डेहणे गावाने एक जिल्हा परिषद सदस्य, नानाभाऊ कशाळे, दोन पंचायत समिती सदस्य कै.धोंडू बाबा कोरडे व श्री.रामदास शिवराम माठे (सदस्य व सभापती) यांच्या रूपाने दिले. तर बी. के. कशाळे यांना महाराष्ट्र शासनाने आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
गावातील प्रतिष्ठित व्यक्ती:
कै.बी.के.कशाळे (आदिवासी सेवक), मारूती लांघी (फेटेवाले) कावळे पाटील, श्री.नामदेव कशाळे (चेअरमन), कै.श्रीपत वाजे, कै.दादाभाऊ कोरडे, श्री किसन मनाजी कोरडे, भोकटे गुरूजी, कै.डोंगरू तिटकारे गुरुजी व सखाराम सावंत, श्रीपत लांघी गुरुजी इत्यादी मंडळींना भागातुन एक प्रतिष्ठेचे वलय होते.
बी.के.कशाळे आणि मारुती लांघी (गुलाबी फेटा) यांची सुप्रसिद्ध जोडी होती. ते एकमेकांचे मित्र होते. एकमेकांशिवाय राहत नसत. मारुती लांघी डेहणे आदिवासी संस्थेचे डायरेक्टर होते. तर बी.के.कशाळे हे चेअरमन होते.
व्यापारी वर्ग :
व्यापर क्षेत्रात आब्बास शेठ, रशीद शेठ, कै.बाजीराव कोरडे, कै.विठ्ठल कहाणे, कै.भिकाशेठ उबाळे. श्री.शांताराम कोरडे गिरणीवाले, श्री.सितारामशेठ कोरडे. कै.गणपत भोपळे व्यापार क्षेत्रात प्रसिद्ध होते.
न्युज पेपर एजन्सी :
डेहणे येथे प्रत्येक हॉटेलमध्ये 1980 पासून नियमित सकाळ हे वर्तमानपत्र येत असे. त्यामुळे जगात काय चालले आहे याची माहिती मिळत असे.
काही दिवसानंतर वर्तमानपत्रांची एजन्सी श्री. विठ्ठल डोंगरे पोस्ट मास्तर यांच्याकडे होती.
फिटर सुदूमामा व हिरामण कोरडे :
त्यावेळी मोटा जाऊन शेतीसाठी नवीनच ऑइल इंजिन आले होते. हया इंजिनची ने आण करण्यासाठी लाकडाच्या कडवानावरून बैलांच्या सहाय्याने न्यावे लागत असे. इतकी ही इंजिनें जड होती.
इंजिन बिघडल्यावर इंजिन दुरुस्त करण्यासाठी सदू मामा देशमुख व हिरामण कोरडे हे प्रसिद्ध फिटर होते. त्यांना भागामध्ये खूप मागणी होती.
प्रसिद्ध गाडा मालक:
कै.नाना भिकाजी कशाळे, कै.सखाराम सावंत, कै.चिमाजी आप्पा कोरडे, श्री.सितारामशेठ कोरडे, यांचे नामांकित बैलगाडे प्रसिद्ध होते.
शिवाय कै.बापू गायकवाड, कै.वंसत व श्री.नारायण गायकवाड हे प्रसिद्ध डफडे वादक होते.
अखंड हरिनाम सप्ताह आयोजन:
गावात गुढीपाडव्याच्या दिवशी जानोबा महाराजांच्या मंदिरासमोर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात असे. या सात दिवसाच्या काळात प्रवचन, हरिपाठ, किर्तन व हरिजागर, होत असे. अनेक नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार त्यांची भागवत सेवा सादर करीत.
सकाळी साडेअकरा व संध्याकाळी सात वाजता जेवणाची व्यवस्था केलेली असे. अनेक लोक या अखंड हरिनाम सप्ताहात भाग घेत असत. काल्याच्या महाप्रसादासाठी पश्चिम भागातून मोठ्या संख्येने लोक येत असत.
सुतार काम :
कै.लक्ष्मण सुतार यांच्या दारात शेतीची लाकडी औजारे तयार व दुरूस्ती साठी अनेक गावच्या लोकांची वर्दळ असायची. त्यांच्या कट्ट्यावर अनेक लोक गप्पा मारीत बसलेले असायचे.
लोहार काम :
शेतीच्या कामासाठी विळे, कोयते, फाळ, साखळ्या, वसू,फास, पहार, फावडे, टिकाव शेवटन्यासाठी, धार लावण्यासाठी कै.वामन लोहार यांच्या दारात खुपच वर्दळ असायची. त्यांची म्हातारी भाता हलवण्याचे काम करायची.
विष्णु शेंडे:
अब्बास शेठ किंवा उबाळे यांच्या हॉटेलमध्ये कै, विष्णू शेंडे हे वेटर चे अर्धवेळ काम करीत असत.
विष्णु शेंडे हे त्यावेळचे प्रगतशील शेतकरी होते. त्यांच्याकडे खिल्लारी बैल, व लाकडी खटार गाडी होती. त्यांच्या घराच्या पाठीमागे त्यांचा जनावरांचा गोठा होता. परंतु केवळ हॉटेलचे खाण्याची आवड असल्यामुळे हे बिन पगारी वेटरचे काम करीत असत.
कातकरी आळी:
कातकरी अळीला तर बोलायचेच काम नाही. तिकडे हातभट्टीची दारू पिण्यासाठी बेवड्यांची एकच गर्दी होत असे. अनेक लोक दूध घातले की घरचे काम सोडून दारू पिण्यासाठी तिथे बसलेले असत. जास्त दारू पिल्यावर तंगडत, लेझीम खेळत घरी जात असत.
त्या ठिकाणी त्यांच्या मारामाऱ्या, भांडणे होत असत. शहाणी सुरती माणसे शक्यतो तिकडे फिरकत नसत.
कातकरी अळीला शासनाने घरकुले बांधून दिली होती.
परंतु हे कातकरी रात्री घरात न झोपता बाहेर झोपत असत. शिवाय बाहेरच स्वयंपाक देखील करत असत. मग या घरकुलांचे ते काय करतात हा मोठा प्रश्नच असे.
जानू कातकरी त्यांचा मुलगा मुक्या कातकरी, तारी कातकरीण यांची दररोज संध्याकाळी दारू पिल्यावर भांडणे होत असत. एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण होत असे.
जो त्रयस्थ माणूस त्यांचे भांडण सोडवायला जात असे. त्यालाच हे कातकरी लोक मारत असत. त्यामुळे त्यांची भांडणे सोडवण्याच्या कुणी फंदात पडत नसे.
मुक्या कातकार्याची मुले लक्ष्या, रड्या आणि बंदया यांच्याबरोबर गिलवर घेऊन आम्ही पाखरे मारायला जात असू.
कातकरी बाया आणि बापे रात्री दारू पीत असत. व मोठमोठ्याने डबे वाजवून नाचत राहत. अगदी मध्यरात्रीपर्यंत त्यांचा नाच गाण्याचा आणि डबे वाजविण्याचा कार्यक्रम चालू राही.
कातकरी आळीला शंकर शिंदे (भोई) हे सुद्धा राहत असत. त्यांच्याकडे ताजे मासे, बोंबील, सुकट,वाकट व व खरा मासा घेण्यासाठी लोक त्यांच्याकडे गर्दी करत.
डेहणे हे पश्चिम भागाचे सत्ता केंद्र:
डेहणेगाव हे पश्चिम भागाचे महत्वाचे सत्ता कारण केंद्र आहे. त्या ठिकाणी विविध गावच्या सोसायटी यांची कार्यालये, बँका, हायस्कूल, शाळा बीट, पोस्ट ऑफिस, दवाखाने, हे सर्व असल्यामुळे इथूनच पश्चिम भागाचे राजकारण चालते.
तेव्हाही इथूनच चालायचे. राजकारणाची सर्व सूत्रे इथूनच फिरायची.
त्या काळात भिवेगावचे पांडुरंग वनघरे, ढवळा वनघरे, टोकावडेचे दिगंबर धोंडीबा मुऱ्हे, मंदोशीचे किसन देहू तळपे (गुरुजी), धुओलीचे ठकुजी जठार, नायफडचे श्रीपत तावजी ठोकळ, खरोशीचे श्रीपत लांघी, डेहणेचे मारुती लांघी फेटेवाले व दादाभाऊ कोरडे हे डेहणे आदिवासी संस्थेचे संचालक होते. तर भागुजी भाईक हे चेअरमन होते.
त्याचप्रमाणे गामाशेठ मराडे, किसन लांघी, बाळासाहेब तळपे (सरपंच), शंकर राघुजी हुरसाळे (कोटेश्वर दूध संस्था संस्थापक व उपसरपंच), नारायण जठार, (उपसरपंच डेहणे ग्रुप ग्रामपंचायत) सिताराम मारुती मोहन (कारभारी), चिंधू उर्फ मारुती धोंडू तळपे (चेअरमन), सिताराम आंबेकर (पाटील), नमाजी आंबेकर (चेअरमन), धोंडीभाऊ दरेकर (सचिव), विठ्ठल आंबेकर (सभापती), पांडुरंग तिटकारे (पं.स.सदस्य) धोंडू बाबा कोरडे,(पं.स.सदस्य), नानाभाऊ कशाळे (जि.प.सदस्य), बी.के. कशाळे (चेअरमन डेहणे आदिवासी) नारायण भोर, बबन जाधव (सेक्रेटरी) भाऊ काठे पाटील, दगडू नांगरे, जिजाबा नांगरे, दामू कुडळ, पर्वत जंगले (प.सं.सदस्य), तुळाजी लांघी असे त्यावेळी अनेक पुढारी होते.
विठ्ठल आंबेकर हे अनेक वर्ष पंचायत समितीचे उपसभापती व सभापती होते.
दिगंबर मुऱ्हे हे पुणे जिल्हा दूध उत्पादक संस्थेचे संचालक होते.
त्यावेळी पश्चिम भागात आमदार नारायणराव पवार गट व सहकार महर्षी साहेबराव सातकर गट असे दोन गट होते.
त्यावेळी सत्ताकरणाची सर्व सूत्रे सहकार गटाकडे असायची. त्यामुळे सहकारातले सर्व पुढारी साहेबराव सातकर यांच्याकडे होते.
आता सहकाराला कायमची घरघर लागली आहे. का? ते आपणा सर्वांना माहीतच आहे.🥲
पश्चिम भागातले विविध गावचे सरपंच उपसरपंच हे आमदार नारायणराव पवार गटाकडे होते.
परंतु सातकर गटाचा माणूस कधीच पवार गटात जात नसे. व पवार गटाचा माणूस कधीच सातकर गटात येत नसे. त्यावेळेस या डोहातून त्या डोहात बेडूक उड्या मारण्याची पद्धत बहुतेक नसावी.
तत्कालीन खाद्यपदार्थ :
त्यावेळी कळीचे लाडू, बुंदीचे लाडू, शेव पापडी, कुंदा, खाजा, वडा व शिरा,बुंदी, मिसळ व चहा,गुळाची शिंगोळी व उपवासाचा चिवडा हे पदार्थ मिळायचे. हे पदार्थ त्यावेळी फारच प्रसिद्ध होते. त्यांची चव अजूनही अनेकांच्या मनात असेल.
परंतु आज जर विचार केला तर यातील बरेचसे पदार्थ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु त्यावेळी गरिबीच्या काळात हे पदार्थ कधीतरी खाण्यासाठी मिळत. लोक आवडीने पदार्थ खात असत. त्याला वेगळीच चव होती.ती चव म्हणजे कष्टाची,गरिबीत पैशाची किंमत असल्याची, माणुसकीची, प्रेमाची व आदराची होती.
हॉटेल वाले कष्ट, पैशाची जाण असलेले गरीब लोक,माणुसकी, प्रेम, आदर व नीतिमत्ता हे सर्व एकत्र करून हे पदार्थ बनवत होते. म्हणूनच त्यांची चव अवीट होती. आपले भाग्य थोर म्हणूनच हे पदार्थ आपल्याला चाखायला मिळाले. धन्य ते लोक धन्य ते पदार्थ.
डेहणे गावच्या जडण घडणी मध्ये या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचा सिंहाचा वाटा होता. त्याचप्रमाणे भागाचा देखील हेही तितकेच खरे..
लेखक:- रामदास तळपे
टीप :- पूर्वी मी याच विषयावर लेख लिहिला होता.परंतु या लेखाखालील माझे नाव वगळून काही महाभागानी त्यांचे नाव टाकले होते.
त्यामुळे एखाद्या लेखाची नक्कल करणे हे कॉपीराईट कायद्याचा भंग करणारे आहे.
लेख लिहिण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात.
तरी कृपया कुणीही लेखक म्हणून आपले नाव टाकण्याचा प्रयत्न करू नये.
आपलाच, रामदास तळपे
खूपच छान माहिती दिली आहे खरे तर डेहणे हे गाव भीमाशंकर रोड पासून थोडे आत आहे. मी बालपणी अनेक वेळा आमचे थोरले बंधू भिकुशेठ उबाळे यांच्या घरी गेलो आहे आमच्या वहिनी साहेब मस्त चहा बनवून प्यायला द्यायच्या, आणि गावातील अनेक गोष्टी तुम्ही फार सहज सुंदर शब्दांची गुंफण करत मांडली आहे प्रत्येकाने हा लेख वाचला पाहिजे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद साहेब
उत्तर द्याहटवाखूप सखोल माहिती जमा करून आपण खूप सुंदर लिखाण केले आहे . धन्यवाद
उत्तर द्याहटवामी डेहणे येथे शंकर वनघरे यांच्या घरी शिक्षणासाठी दहा वर्ष वास्तव्यास होतो.त्यामुळे हा लेख लिहू शकलो.
उत्तर द्याहटवा