श्री.काळभैरवनाथ (वनदेव) मंदोशी
राजगुरूनगर पासुन ५० कि.मी. भिमाशंकर मार्गावर मंदोशी ता.खेड जि.पुणे येथील श्री.काळभैरवनाथ (वनदेव) हे वनश्रीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात असलेले अतिशय जागृत, कडक, उग्र व नवसाला पावणारे असे देवस्थान आहे. दर रविवारी महाराष्ट्रातील अनेक भाविक नवस करण्यासाठी/फेडण्यासाठी व दर्शनासाठी येत असतात. या बाबतचा मंदिराचा इतिहास हा जाणुन घेऊया
शाळुंका
खुप पुर्वी देवांच्या मुर्तीच्याही आधी दगडाच्या वाटोळ्या आकाराच्या गुळगुळगुळीत अशी साधारण चार ते पाच शाळुंका होत्या.(अद्यापही त्या आहेत.) या शाळुंखांचीच तेव्हा पुजा केली जात असे.या शाळुंका या स्वयंभू असाव्यात असे माझे तरी मत आहे.
मुर्ती
सध्या मंदिरात दोन मुर्ती आहेत या दोनही मुर्ती एकाच देवाच्या म्हणजेच श्री. काळभैरवाच्या आहेत. उजव्या बाजुची मोठ्या आकाराची मुर्ती ही अतीप्राचीन व अतिशय सुबक होती. ही मुर्ती साधारणतः सुमारे नवव्या शतकात घडवली असावी. त्यावेळी सातवाहनांचे राज्य होते. सातवाहनांच्या काळात भोरगिरी येथील कोटेश्वर मंदिर बांधले गेले आहे. शिवनेरी किल्ला सुद्धा सातवाहनांच्यांच काळातला. सातवाहनांच्या काळात अशाच मूर्ती तयार करण्यात आलेल्या आहेत.
पुर्वी मंदिर नसल्यामुळे उन,वारा व पाऊस या मुळे मुर्तीची बरीच झीज झाली,त्यानंतर गावक-यांनी दुसरी अतिशय सुंदर व प्रसन्न अशी मुर्तीया मुर्तीच्या शेजारीच घडवून बसवली आहे.
ह्या मुर्तीच्या हातात नाग आहे.ह्या मुर्तीचे वैशिष्ट्य असे आहे. ज्यावेळी देवाचा अंश मुर्तीत असतो तेव्हा ही मुर्ती अतिशय प्रसन्न दिसते.आणि मुर्तीमध्ये विलक्षण तेज असल्याचे जाणवते, हे शक्यतो रविवारी सकाळी १२.०० पर्यंतच हं...इतर दिवशी मुर्तीत असे भाव बघायला मिळत देखील नाही.
ह्या दोन्ही मुर्तींच्या डाव्या बाजुला एक दगडी चीरा आहे.हा चीरा म्हणजेच ज्याच्या मुळे श्री.काळभैरवनाथ येथे आले तो त्यांचा भक्त होय,
चि-याचा इतिहास
श्री.काळभैरवनाथाचे मुख्य ठाणे खरबाच्या माळावर आहे. या माळावर अनेक गुराखी आपल्या गायी घेऊन चरावयास नेत असत. त्या गुराख्या पैकी एका हरीजन (रोकडे)असलेला गुराखी या देवाची सेवा करू लागला.(सेवा म्हणजे काय तर दररोज देवाला पाणी घालने व दर्शन घेणे.)
नंतर हा भक्त वयोवृद्ध झाल्यामुळे त्याला वर डोंगर चढुन माळावर जायचे जमेना.हे पाहून मग खरबाच्या माळावर असलेला देवच खाली आता सध्याआहे त्या ठिकाणी आला.देव खाली आल्यावर आपोआप तेथे शाळूंका निर्माण झाल्या.
त्यानंतर मात्र हा वयोवृद्ध झालेला भक्त न चुकता दररोज देवावर जलाभिषेक करू लागला..त्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी देवाच्या सांगण्यावरून देवाच्या डाव्या बाजुला त्या भक्ताला स्थान दिले.तोच हा चीरा होय.(बनाच्या पायठ्याच्या) उत्तरेला रोकडे यांची दोन गवताची घरे होती.
काळभैरवनाथ मंदिर जिर्णोद्धार
खुप पुर्वी येथे मंदिर नव्हते,.एका छोट्या ओबडधोबड चबुत-यावर दगडाच्या वाटोळ्या आकाराच्या शाळूंका होत्या. त्यावेळी शाळूंकाचीच पूजा केली जात असे. त्यानंतर मंदिर बांधले गेले.सुरूवातीचे मंदिर हे दगडाच्या भिंतींचे होते.वरचे छप्पर मात्र लाकुड व गवताचे होते. हे मंदिर आठराव्या शतकात बांधले गेले असावे.
दुसऱ्यांदा मंदिर जिर्णोद्धार
त्यानंतर सन १९४१-४२ सालात घडीव जोते व डबारात चौमोळी आकाराचे पाच खण लांबी व रुंदीचे मंदिर बांधकाम करण्याचा संकल्प गावक-यांनी केला.
मंदिराच्या घडीव जोत्याचे व भिंतीच्या दगडांचे काम हे गिरवली ता.आंबेगाव येथील काशिनाथ गवंडी यांनी केले. खांब, वासे. तुळया, लगी हे सर्व प्रकारचे लाकडी काम तसेच सुबक मखराचे काम हे गावचेच सुतार कै. सखाराम बारवेकर यांनी केले,
मंदीराची कौले व जमीनीवरील लादी (शहाबादी फरशी) लोखंडी जाळ्या इत्यादी साहित्य तत्कालीन मुंबईकर कै.राघुजी हुरसाळे यांच्या देखरेखीखाली मुंबईहून आणले होते.हे मंदीर पुर्णतः सागवानी होते.
तिसऱ्यांदा मंदिर जिर्णोद्धार
सन १९८४-८५ मध्ये पुन्हा बाळासाहेब दगडू तळपे (सरपंच) शंकर राघोजी हुरसाळे(उपसरपंच) विष्णू कामाजी हुरसाळे(कारभारी) किसन देहू तळपे(गुरूजी) चिंधू धोंडू तळपे, भीमाजी गोडे,दुलाजी गोडे ,सिताराम मोहन,शंकर नाना मोहन,शंकर दुलाजी तळपे, सोनु मारूती तळपे,तुळशिराम रोकडे,देवराम आंबेकर इत्यादी मान्यवरांच्या संकल्पनेतून नवीन मंदिर बांधकाम करण्याचे ठरवले.
हे मंदिर पूर्वीच्याच मंदिराच्या दगडी जोत्यावर गुळगुळीत डबरा मध्ये बांधकाम करण्याचे ठरले. गुळगुळीत डबर तयार करण्याचे काम जवळजवळ वर्षभर चालू होते. दगड घडवण्याचे काम श्री.दत्तात्रय बारवेकर, श्री सुदाम बारवेकर, श्री सोपान बारवेकर आणि श्री दुदाजी बांगर यांनी केले.
मंदिराचे संपूर्ण लाकडी काम हे सागवानी लाकडामध्ये करायचे ठरले होते. ही लाकडे कोकणातून आणली होती. यासाठी कै.विष्णू कामाजी हुरसाळे यांचे खूप मोठे योगदान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली श्री.चिंधू धोंडू तळपे/ आणि अजुन चार पाचजण कोकणात दोन महिने आधी लाकडे तोडण्यासाठी गेले होते.
यासाठी कै.विष्णू कमाजी हुरसाळे यांच्या मामाने जवळजवळ दोन महिने मंदोशी गावच्या ग्रामस्थांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. सर्व लाकडे तोडून झाल्यावर गावातील संपुर्ण झाडून पुरूष मंडळी लाकडे आणण्यासाठी कोकणात गेले होते.
तेथुन डोक्यावरून लाकडे वाहून मंदोशी येथे आणली गेली.ही लाकडे पुर्णतः सागवानी होती.मंदिराला एक किलचीही इतर झाडांची वापरलेली नव्हती.
हे मंदिर अतिशय सुंदर असे होते.खाली सुबक आशी गुळगुळीत काळी पांढरी लादी,सुंदर लाकडी खांब अतिशय छान अशी गच्ची व लोखंडी जाळ्या बनवलेल्या होत्या.असे मंदिर भागात असे कोठे नव्हतेच.
प्रथा परंपरा
श्री.काळभैरव मंदिरात रोज सकाळ व संध्याकाळ दिवाबत्ती व देवपुजा केली जाते.तळपे हे अधिकृत देवाचे पुजारी आहेत.
यात्रा
चैत्र महिन्याच्या दुसऱ्या रविवारी गावची यात्रा असते.सकाळी नेहमी प्रमाणे पुजा होते.सकाळी मांडव डहाळे करून लोक प्रथा व परंपरेनुसार हारतुरे आणन्यासाठी मोठ्या संख्येने शिरगाव येथे जुन्या एस,टी.स्टँडवर जमतात.(पुर्वी हारतुरे हे मुंबईकर आणत असत.आता अगदी वैयक्तिक हार फुले लोक आणतात.)
सर्वलोक जमल्यावर हारतु-यांची पुजा होते.हा मान शिरगावच्या सवाष्ण महिलांना असतो.त्यानंतर भव्य मिरवणूक सनई चौघड्यांच्या गजरात मंदोशी गावच्या दिशेने निघते.
हारतुरे,मंदिरात आल्यवर ,वस्रअलंकार व हारफुले देवावर चढवले जातात.सनई चौघडा च्या गजरात व मोठमोठ्या घंटाच्या निनादात महापुजा होते.असंख्य नारळ फुटतात. नवस फेडले जातात.
दंडवते
दुपारी ५.०० वा.सर्व ग्रामस्थ/पैपाहुने बायकामुलासह नवीन कपडे परिधान करून हातात पुजेचे ताट व प्रसाद घेऊन मंदिराच्या दिशेने मोठ्या संख्येने चालू लागतात.नवस केलेले भाविक जागोजागी जमीनीवर उपडे पडून देवाच्या नावाने मोठ्या भक्तीभावाने नतमस्तक होताना दिसतात.मंदिराच्या बाहेर व आत प्रचंड गर्दी असते.भाविक गुळ खोबरे,पेढे असा प्रसाद वाटतात.नवस फेडले जातात.बाजुलाच विविध गावांची नामांकित भजने सुरू असतात. प्रत्येकाच्या घरी पुरण पोळ्यांचे जेवण असते,
पालखी
रात्री ११.३० वा.च्या दरम्यान छबिन्यासह सनई चौघड्यांच्या गजरात,एकतारी भजन म्हणत पालखी काढली जाते.पालखीच्या वेळी प्रचंड जनसमुदाय असतो.
पालखीचे मानकरी
खुप पुर्वीपासून पालखीचे भोई (मानकरी) बांगर व मसळे हे आहेत.
फटाके व दारूकाम रोषणाई
पालखीच्या वेळीआकाशात अतिशय सुंदर,नेत्रसुखद असे दारूकाम बघायला मिळते.
करमणूक कार्यक्रम
पालखीनंतर भारूड अथवा तमाशाचा कार्यक्रम असतो.दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम व कुस्त्यांचा जंगी हंगामा असतो.तत्पुर्वी अतिशय रूचकर असे सार्वजनिक जेवण असते.
अखंड हरिनाम सप्ताह
सन 2014 पासून दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. श्री वामन महाराज जढर, श्री गोपाळ हुरसाळे व श्री रोहिदास वाघमारे श्री. नामदेव शंकर तळपे यांच्या नेतृत्वाखाली समस्त ग्रामस्थ मंडळ मंदोशी हे अतिशय उत्तम प्रकारे अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन व आयोजन करतात.
अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या दिवशी हरी कीर्तनासाठी भक्तांचा महापूर लोटतो.
आलेल्या पाहुण्यांचा मानसन्मान
आलेल्या जनसमुदायाचा सत्कार व मानसन्मान गावच्या वतीने श्री यमन हुरसाळे, श्री एकनाथ तळपे, श्री राजू तळपे, श्री नामदेव हुरसाळे,श्री.किसन तळपे गुरुजी श्री बबन गोडे, श्री मारुती मोहन,श्री नामदेव रोकडे, श्री. बाळशीराम रोकडे,नितीन तळपे,अनंता तळपे हे करतात.
गावची साथ
भात लावणी सुरू करायच्या आधी एखाद्या रविवारी गावची साथ असते.या दिवशी शिवारातील सर्व देवांना तेलाचे/शेंदराचे माजने करतात.बोकडाचा बळी दिला जातो.शिवारातील देवांना नैवद्य दाखवून मग गावकरी जेवण करतात.अशाच प्रकारे भात काढणीच्या आधी साथ केली जाते,(वर्षातुन दोनदा साथ होते.)
घटस्थापना (देवघटी बसणे)
आश्विन शुद्ध प्रतिपदेला देव घटी बसतात.यासाठी प्रत्येक देवापुढे मातीचा घट करून त्यामध्ये धान्ये पेरतात.त्यावर लाकडी छोटा मांडव बनवुन एक नवेकोरे मडके पाणी भरून ठेवतात.भक्त लोक दहा दिवस उपवास करतात. भाविक त्यांना केळी,उपवासाचे जिन्नस,देवाला देवाला दिवाबत्ती साठी तेल देतात.रात्री भजन केले जाते.
देव घटी बसल्यावर दरोरोज एक तीळांच्या फुलांची माळ घातली जाते.
पहिलीमाळ ते दहावीमाळ असे दहा दिवस घटाला माळ घालतात.देव घटी बसवायच्या वेळी,पाचव्या माळेला व दहाव्या माळेला देवाकडे भक्तांची खुप गर्दी असते.खुप लांबून भाविक दर्शनासाठी येतात.
दहावी माळ घालून घट हलवतात.यालाच देव उठले असे म्हणतात.घटातील माती चिमुटभर का होईना आपापल्या शेतात टाकायची पद्धत आहे.याच दिवशी दसरा असतो.सायंकाळी लोक आपट्याची पाने घेऊन प्रथम देवाला भेटतात.त्यानंतर इतर लोकांना भेटायची पद्धत आहे.
देव पारधी जाणे
अश्विन प्रतिपदेला देव पारधी जातात.रात्री ८.००वा.च्या दरम्यान सर्व वाड्यावस्यातील व गावचे लोक मंदिरात जातात. देवाची पुजा होते.एखाद्याच्या अंगात वारे संचारते.देवाला नैवद्य दाखवला जातो.
नैवेद्याचा काही भाग घेऊन पुढे भगत,शेजारीअंगात वारे आलेला माणुस व त्यामागे लोकढोल वाजवत मंदिराबाहेर चालू लागतात. मुक्तारदेवाच्या पाठीमागे उंच झाडांच्या खाली असलेल्या विशिष्ट अशा दगडाच्या खोबणीत नैवद्य ठेवतात.
त्यावर त्याच मापाचा दगड ठेवतात.पुढे दिवा लावला जातो.हाच नैवद्य पुढे एक महिन्यानंतर देव पारधीहून आल्यावर अशाच प्रकारे वाजतगाजत दगडाच्या खोबनीतुन बाहेर काढला जातो.
हा नैवद्य एक महिन्यानंतरही जसाच्या तसाच असतो.प्रत्येक घराण्यातील प्रमुखाला भगत नैवद्य वाटप करतो.हा नैवद्य लोक धान्यामध्ये ठेवतात.
देवाचे भगत
चीमाजी तळपे,लक्ष्मण तळपे, ठकू तळपे, बुधा तळपे,शंकर अहिलू तळपे, विठ्ठल तळपे, मारूती रामभाऊ तळपे हे होते. हे सर्वजण आता हयात नाहीत.
या पैकी कै.विठ्ठल तळपे यांची कारकिर्द सर्वांच्या स्मरणात राहील अशीच होती.
आता श्री.गणपत तळपे हे देवाचे भगत आहेत.
अंगात वारे येणारे
गावात पुर्वी देवाच्या पुजे अर्चेबाबत सर्व इत्यंभुत माहिती असलेले व कडक अंगात वारे येणारे एकमेव मणुष्य म्हणजे कै. तुकाराम आंबवणे हे होय. शिवाय कै.काळू गवारी, श्री. धोंडू मसळे,श्री.बनाजी आंबवणे, श्री.विष्णू रोकडे यांच्याही अंगात वारे येत होते.
स्रीयांमध्ये कै.नकाबाई जढर व कै.यमुनाबाई तळपे यांच्याही अंगात वारे येत होते.व लोकांच्या समस्येचे निवारण होत होते.
इतर देव व देवता
मुक्तार देव
श्री.काळभैरवनाथाच्या मुख्य मंदिराच्या समोर मुक्तारदेवाचे मंदिर आहे.मुक्तारदेव हा काळभैरवाचा अत्यंत जवळचा मानला जातो. मुक्तार देव हा श्री काळभैरवनाथाचा सेनापती आहे.
मुक्तार मंदिराच्या पाठीमागे गर्द झाडीमध्ये 25 ते 30 दगडांच्या रेखीव व सुबक अशा मूर्ती आहेत. हे श्री.काळभैरवनाथाचे सैन्य आहे. जेथे जेथे काळभैरवाचे मंदिर आहे तेथे तेथे मुक्तार मंदिरअसतेच.
मुक्तार देव हा मोहनांचा मानला जातो. परंतु प्रामुख्याने या देवाची पूजा श्री बनाजी उर्फ रघुनाथ आंबवणे हे करतात. त्यांचे मुक्तार मंदिरासाठी खूप मोठे योगदान आहे.
मारूती मंदिर
मुख्य मंदिराच्या उत्तरेला दक्षिण मुखी मारूती मंदिर असुन अत्यंत अप्रातिम अशी मारूती रायाची भव्य मुर्ती आहे. इतकी सुबक मुर्ती इतरत्र कोठेही नाही.
पुर्वी मारूतीची लहान मुर्ती होती. ती मुर्ती पोखरी ता.आंबेगावा येथील लोकांनी चोरून नेली. व वैदवाडीच्या उत्तरेला असलेल्या बनात त्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आजही ही मुर्ती आपणास त्या ठिकाणी पहायला मिळेल.
तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मंदोशीच्या ग्रामस्थांना समजले की मारूतीरायाची मुर्ती चोरी झाली आहे. तेव्हा लोकांनी भल्या मोठ्या दगडावर सुंदर अशी मुर्ती कोरून घेतली.जी कोणच चोरून नेऊ शकत नाही.
कळमजा
मुख्य मंदिराच्या डाव्या बाजुला कळमजाईचे छोटेसे मंदिर आहे.
शिवाय कळमजाईचे मुख्य ठाणे हे वर डोंगरावर जंगलात आहे.हे मंदिर भिवंडीकर व ग्रामस्थांच्या सहयोगातुन झाले आहे. ह्या मंदिराच्या बांधकामासाठी श्री.लक्ष्मण चिमाजी सुतार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मी स्वतः सिमेंटच्या व वाळूच्या गोणी मोटारसायकल वरून मंदिर बांधकामाच्या ठिकाणी पोहचवल्या आहेत. परंतु आता जमीन मालकाने जमीन सुधारण्याच्या नावाखाली हे मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त केले आहे.
कनीरबाबा
कनीरबाबा हे ठाणं मंदोशीच्या वरच्या वाडीत नविन नाव (केळेवाडी) येथील जंगलात आहे.
कनीरबाबा हा देव म्हणजे एक मोठा दगड आहे.अतिशय गरीब असा हा देव आहे. डोळ्यांना इजा झाली.डोळ्यात फुल पडले किंवा डोळ्यांविषयी काही आजार झाले तर कनीरबाबाचे दर्शन घेऊन जाळीच्या पानात जाळीचा काटा खुपसुन कनीरबाबा असलेल्या दगडात खोचायचा व नवस करायचा. देव नवसाला पावतो.
काही लोक नारळ फोडायचे. व गुळभाताचा नैवेद्य द्यायचे. तर काही चांदीचे पाणी दिलेल्या पत्र्याचे डोळे,नारळ व गुळभाताचा नैवेद्य द्यायचे. परंतू १००% गुण यायचाच. याची मी स्वतः अनुभुती घेतलेली आहे.
वेताळ
भुतांचा राजा म्हणजे वेताळ हे अगदी छोटेसे मंदिर काळभैरव मंदिराच्या उजव्या बाजूला आहे.
बाळाव
मंदिराच्या उजव्या बाजूला थोड्याशा दुर अंतरावर हा दे आहे.पुर्वी लोकांना किंवा लहान मुलांना खोकला झाल्यास बाळाव देवाला गुळभाताचा नवस करत.
सत्या
बाळावच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर सट्या देव आहे.पुर्वी कुणाला भाजल्यास या देवाला गुळभाताचा व पाणी भरलेला नारळ असा नवस करत.
देआई
दे आई हे वडाचीवाडी (हुरसाळेवाडी) येथे टोकावड्याला जाणा-या रस्त्यावर आहे. पुर्वी येथे मंदिर नव्हते.
यात्रा झाल्यावर येणा-या मंगळवारी गावातील सर्व वाड्यावस्त्यांचे लोक बायकांपोरांसह गोठणीवर जमत.
ढोलाच्या गजरात लोकांची भव्य मिरवणूक देआईकडे निघे.देवजी बांगर,रामजी तळपे,बबन गोडे मा.सरपंच हे उत्तम ढोल वादक होते. तेथे गेल्यावर गावच्या वतीने देवीची शेंदुर व तेल लावून महापुजा करत. ही पुजा करत असताना कै. नकाबाई जढर यांच्या अंगात देवीचा संचार होई.
जुने जानते लोक देवी पुढे पदर पसरत.देवीची म्हणजेच भक्तीनीचे लुगडे व चोळी देऊन बोळवन करत.यालाच देवी बोळवने म्हणत. हा संपुर्ण खर्च गावचा असे.त्यानंतर नारळ फोडले जात. प्रसाद वाटला जाई.
त्यावेळी हे सर्व अनुभवतांना खुप आनंद होई.त्या निमित्ताने लोक एकत्र येत.भेटीगाठी होत. चहापाणी होई. परंतु आता काळ बदालला.पुर्वीच्या साध्या- सुध्या आजारांची जागा आता डायबेटीस, ब्लडप्रेशर, कँन्सर, हार्टअँटक,पँरेलीसेस यांनी घेतली.लोकांचे आयुष्य कमी कमी होत चालले. एकमेकांशी संवाद हरवला.
या मंदिराच्या जिर्णोद्धार करण्याचे काम श्री.दत्तात्रय आंबेकर (अध्यक्ष )श्री.भगवानराव हुरसाळे (उपाध्यक्ष) श्री.गणेश हुरसाळे (सचीव) श्री.अंकुश हुरसाळे (खजीनदार) सर्व देआई प्रतिष्ठान मंदोशी व सर्व संचालक यांनी केली. बंद पडलेले व ग्रामस्थांकडून दुर्लक्षित झालेली देवी मंदिराच्या रुपाने पुन्हा वलयांकित झाली.
या सर्वानी भजन,प्रवचन किर्तन, हळदीकुंकू, मोफत आरोग्य शिबीर,झाडे वाटप इत्यादी उपक्रम राबवून एकेकाळचे गतवैभव देवीस पुन्हा मिळवून दिले.देवीच्या अशिर्वादाने सर्वांचे आयुष्य व प्रगती चांगली चालू आहे.
रूढी व परंपरा
श्री.काळभैरवनाथ देवस्थान अतिशय कडक असल्यामुळे मंदिराच्या परीसरामध्ये कुनीही मद्यपान करून जात नाही अद्यापही ही परंपरा टिकुन आहे.
त्याचप्रमाणे पायातील चप्पल/ पायतान मंदिरापासुन २०० फुट बाहेर काढाव्या लागतात.
स्रियांना मंदिरात अथवा मंडपात दर्शन घेणे निशिद्ध मानले जाते.
मात्र यात्रेच्या दिवशी स्रियां सभामंडपातून दर्शन घेऊ शकतात.
गावातील लोक जेव्हा मंदिरात दर्शनासाठी जातात तेव्हा अंघोळ करून व धुतलेली कपडे घालूनच मंदिरात प्रवेश करतात.अन्यथा बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते.
देवाला होळी आणि गुढीपाडव्यालाच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.इतर वेळी नारळ फोडतात.
देवाच्या गाभाऱ्यात भगताशिवाय इतर कोणालाही जाण्यास निश्चिद्ध मानले जाते.तेथे जाण्यास कोणाचेही धाडस होत नाही.
देवाची सकाळ व संध्याकाळ दिवाबत्ती करून पुजा होते.
मंदिरात काळी कपडे घालून जाणे निशिद्ध मानले जाते. शक्यतो गावकरी काळे कपडे घालतच नाहीत,
देवाला सकाळी केलेला पाण्याचा जलाभिषेक प्रिय असतो.
देवाचा वार रविवार व गुरूवार मानला जातो. तथापि रविवारी मोठ्या प्रमाणावर लोक दर्शनासाठी गर्दी करतात.
सकाळी १०.००वा.पर्यत घेतलेले दर्शन फलदायी ठरते.त्या कावेळी देवाच्या मुर्तीमधील तेजोवलय अतिशय प्रसन्न दिसते.इतर वेळी तसे दिसत नाही.सांगण्याचा मुद्दा असा की सकाळी देव मुर्तीमध्ये स्थित असतो.
दर रविवारी काही समस्याने ग्रस्त असलेले लोक भगताडे आपली समस्या मांडतात.भगत देवाच्या मुर्तीवर डाव्या व उजव्या बाजुला चाफ्याच्या कळ्या लावून कौल मागतो.
गावात कोणाचेही महत्त्वाचे काम असल्यास देवाकडे कौल लावून देवाची मान्यता घेण्याची पद्धत आहे.
दर रविवारी व गुरूवारी देवाच्या मुर्तीला तीळाच्या तेलाचा अभिषेक करतात.(इतर दिवशी नाही.) यालाच देवास माजने करणे म्हणतात,
यात्रेच्या दिवशी देवास नारळ फोडतात. नारळातील खोब-याचे तुकडे व गुळ प्रसाद म्हणुन भाविक भक्तांना वाटतात.यालाच शेरणी म्हणतात.
यात्रेला घरोघरी पुरणपोळी करतात.
देवाला कोंबडा/ बक-यांचा बळी देतात. तरी सदरचा नैवेद्य मदिरात/सभामंडपात घेऊन जात नाहीत.निशिद्ध आहे.
श्री.भैरवनाथ मंदिर प्रेक्षणीय स्थळ
श्री काळभैरवनाथाच्या उत्तर पूर्व दिशेला भीमाशंकर ला जाणारा अतिशय सुंदर असा घाट रस्ता आहे. हिरवेगार डोंगर, ठिकठिकाणी असलेले धबधबे आणि त्यात मधून नागमोडी वळणे घेत असलेला सुंदर असा डांबरी रस्ता हे पावसाळ्यात एक विलोभनीय दृश्य असते.
या ठिकाणी जून ते सप्टेंबर असा चार महिने पाऊस पडतो. त्यामुळे ओढे नाले, धबधबे ओसंडून वाहत असतात.
मंदिराच्या समोरच नदीसारखा ओढा आहे. एवढ्याला आठ ते नऊ महिने पाणी असते. शिवाय मंदिराच्या पाठीमागे खूप मोठा धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटक येत असतात.
मंदिराच्या समोर खूप मोठी विहीर असून बाराही महिने पाणी असते. शिवाय मंदिराच्या शेजारी दोन मोठे सभा मंडप असल्यामुळे भाविकांची निवाऱ्याची सोय झाली आहे.
मंदिराच्या आसपास करवंदाच्या जाळी, आंबे व जांभूळ हे वृक्ष असल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा लोकांची गर्दी असते.मंदोशी गाव ही धबधब्यासाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे
त्यामुळे लांब लांबून पर्यटक सतत येत असतात. त्याचप्रमाणे दर रविवारी श्री काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी सुद्धा खूप लांबून लोक येत असतात. सतत वर्दळ चालू असते.
लेखक :- श्री.रामदास तळपे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा